महिकावतीची बखर - भाग २ : बखरीतील जुनी नावे ...

Submitted by सेनापती... on 14 May, 2011 - 05:33

मागील भाग -
महिकावतीची बखर - भाग १ : प्रस्तावना ...

महिकावतीची बखर ही १४ व्या ते १६ व्या शतकात लिहिली गेली असल्याने ह्यात जुन्या मराठी शब्दांचा प्रचंड समावेश आहे. कै. राजवाडे यांनी बखरीमधल्या एकूण शब्दांची संख्या मोजली ती सुमारे १२ हजार इतकी भरली. ह्यात १०३ यावनी उर्फ फारशी शब्द आलेले आहेत असे त्यानी प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. १२ हजारात फक्त १०३ शब्द म्हणजे मुसलमानी सत्ता येऊनही रोजच्या व्यवहारात डोईजड होईल इतकी ती कोकणात तरी फैलावली नव्हती असेच म्हणावे लागेल. संपूर्ण बखरीमध्ये उत्तर कोकण म्हणजे मुंबई - ठाणे आणि आसपास परिसरातील गावांची, नद्यांची, किल्ल्यांची आणि प्रांतांची एकूण ३९६ नावे आलेली आहेत. त्यातील महत्वाची आणि मोजकी ६० नावे पुढे देत आहे. त्यांच्या जुन्या नावांपुढे सध्याची नावे तिथे कंसात दिलेली आहेत...

१. आगाशी (आगाशी- विरार जवळ)
२. उतन (उत्तन - भाईंदर जवळ)
३. कळवे (कळवा - ठाणे शहर)
४. कान्हेरी (बोरीवली)
५. कोंडीवटे (कोंदिवडे - कर्जत - राजमाची पायथा)
६. आन्धेरी (अंधेरी)
७. कानझुरे (कांझूर - कांझूरमार्ग)
८. कालिणे (कालिना - सांताक्रूझ)
९. कोपरी (कोपरी - ठाणे पूर्व)
१०. कोलसेत (कोलशेत - ठाणे - घोडबंदर)
११. उरण (उरण)
१२. आसनपे (आसनगाव?)
१३. कल्याण (कल्याण)
१४. कांधवळी (कांदिवली)
१५. खरडी (खर्डी - कसारा जवळ)
१६. घोडबंदर (घोडबंदर ठाणे)
१७. चेउल (चौल - अलिबाग)
१८. डिडोशी (दिंडोशी)
१९. तांदूळवाडी पैलदेची (तांदूळवाडी - पालघर जवळ)
२०. ताराघर (तारापूर - पालघरजवळ)
२१. तुरफे (तुर्भे)
२२. गोराई (गोराई)
२३. चरई (चरई - ठाणे पश्चिम)
२४. चेने (चेना - ठाणे घोडबंदर)
२५. चेंभूर (चेंबूर)
२६. जवार (जव्हार)
२७. डोंगरी (डोंगरी - मुंबई)
२८. दहीसापूर (दहिसर?)
२९. गोरगाव (गोरेगाव)
३०. चेंदणी (चेंदणी - ठाणे खाडीकडील भाग)
३१. जुहू (जुहू)
३२. तळोजे महाल (तळोजा - पनवेलजवळ)
३३. दांडाळे (दांडाळेतळे वसई)
३४. नागावे (नायगाव)
३५. बोरवली (बोरीवली)
३६. भाईखळे (भायखळा)
३७. महिकावती (माहीम - पालघर)
३८. बिंबस्थान (केळवे - पालघर)
३९. देवनरे (देवनार)
४०. नाउर (नाहूर - मुंबई)
४१. मणोर (मनोरी - मुंबई)
४२. मागाठण (मागाठणे - मुंबई)
४३. वरोळी (वरळी)
४४. वासी (वाशी)
४५. वाळुकेश्वर (वाळकेश्वर)
४६. वेउर (येऊर - ठाणे)
४७. वोवळे (ओवळे - ओवळा - ठाणे घोडबंदर)
४८. वरसावे (वर्सोवा)
४९. वांदरे (बांद्रा - मुंबई)
५०. विह्रार (विरार)
५१. माझिवडे (माजिवडा - ठाणे घोडबंदर)
५२. काशीमिरे (काशीमिरे - मीरारोड मधील)
५३. सीरगाव (शिरगाव - पालघर)
५४. मुंबई (मुंबई)
५५. मुळूद (मुलुंड)
५६. सानपे (सानपाडा?)
५७. साहार (सहार - मुंबई विमानतळ भाग)
५८. सीव (शिव - सायन)
५९. साष्टी (ठाणे परिसर)
६०. सोपारे (नालासोपारा)

क्रमश: ... महिकावतीची बखर - भाग ३ : प्रताप बिंबाची कोकणावर स्वारी ...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्कीच... आता १० व्या शतकाच्या आधीचा इतिहास तपासून पहायला हवा.. अर्थात तेंव्हा लिखाणाचे माध्यम हे शिलालेख, ताम्रपट असे असल्याने लिखाण खूपच मर्यादित स्वरूपात आहे..

कान्हेरी आणि बोरवली मिळून आजची बोरिवली आहे का?
आणि नव्या नावांवर गुजराती प्रभाव आहे अस मला उगाच वाटत आहे क?

रोहन, यातील काही गावांची नावे गोव्यातल्या गावांशी मिळतीजुळती आहेत.

आगशी, काजूर, नागवे, शिरगाव, ठाणे ही पटकन आठवलेली. पण सगळ्यात चकित करणारा भाग म्हणजे मडगाव ज्या तालुक्यात आहे त्याचं जुनं नाव "साष्टी."

यातल्या दोनतीन नावाबाबत वेगळे मत आहे. बखर-उल्लेखित कोंडवटें हे कर्जतजवळील कोंडवटें नसून महाकाली डोंगर व आसपासचा भाग म्हणजे कोंडवटे गाव होते. या भागाला अद्यापही कोंदिविटा/कोण्डिवटा म्हटले जाते. बखरलेखनकाळात हे गाव चर्चेत असावे कारण त्या काळात(लेखनकाळात) इथे पुष्कळ प्रमाणात धर्मांतरे झाली. साष्टी प्रांतातले सर्वात जुने सुमारे पाचशे वर्षाpoorveeMche चर्च याच परिसरात मरोळ येथे आहे.

५९. साष्टी (ठाणे परिसर)
>>>>
रोहन, मी बर्‍याच इतिहासकालिन पुस्तकात साष्टीची लढाई किंवा साष्टीचा किल्ला असे वाचले आहे. तो अ‍ॅक्चुअली ठाण्याजवळ कुठे आहे?

ठाण्याचे सेंट्रल जेल म्हणजे साष्टीचा किल्ला.. १७३३ आसपास त्याचे बांधकाम सुरु झाले आणि १७३९ मध्ये तो मराठ्यांनी ताब्यात घेतला.

१)मणोर म्हणजे मालाडजवळचे खाडीपल्याडचे मनोरी नव्हे तर नॅशनल हाय्वे आठ वरचे पालघर तालुक्यातले मनोर हे गाव होय. मनोरी हे अगदीच चिमुकले गाव आहे. मनोर हे पालघर-वाडा रस्त्यावरचे मोठे ठाणे आहे.
२)आसनपे म्हणजे आसनगाव नसून सध्याच्या अंधेरी-घाटकोपर रस्त्यावरचे आसलफे (असल्फा) असावे.
३)कालीणे म्हणजे सध्याचे कालीना मानल्यास बखरीचा काळ फारच अलीकडचा ठरतो. कारण सध्याचे कलीना म्हणजे जिथे मुंबई विश्वविद्यालयाचे मुख्य ठाणे आहे ते कोळे-कल्याण म्हणून सन १९८०पर्यंत प्रसिद्ध होते. आणि तिथल्या धर्मांतरित ईस्ट्-इंडिअन समाजाच्या कागदपत्रांमधून त्याचे स्पेलिंग caliana (उच्चार कल्याना) असे केलेले मी वाचलेले आहे. कोळे-कल्याणचे कलीणे हे रूपांतर अगदी अलीकडचे आहे. अलीकडचे म्हणजे सांताक्रूझ्(पूर्व)-वाकोला भागात मूळ धर्मांतरित मराठीभाषक क्रिश्चनांखेरीज इतर भाषकांची वस्ती वाढू लागल्यानंतरचे. मूळ लोक कलियाना असाच उच्चार करीत होते. नंतरच्या लोकांनी मात्र तो कलीना केला आणि स्पेलिंगमध्ये सी ऐवजी के करून मधला ए गाळून टाकला. हे मुद्दाम झाले नाही. नव्या लोकांना ग्रामनावांची माहिती इंग्रजी स्पेलिंग वरून झाली आणि त्या स्पेलिंगचे त्यांना वाटले तसे उच्चार त्यांनी केले. ह्याच परिसरात एक कोळीवाडी नावाचे ठिकाणही आहे. त्याचे स्पेलिंग मूळ कोलिवारी या आगरी-कोळी उच्चारानुसार colivary असे होते. आता त्याचा उच्चार कोल्व्हेरी असा होतो आणि व्हाय धिस कोलावेरी हे गाणे प्रसिद्ध झाल्यापासून तर तो कोलावेरी असाही होऊ लागला आहे. या सगळ्याचा शोध घेणे मोठे रंजक ठरते.
४) वरसावे नावाविषयीही असेच म्हणता येईल. वरसावे म्हणजे आजचे अंधेरीनजिकचे वर्सोवा नव्हे. हे वरसावे गाव मुंबई-ठाणे रस्त्यावर घोडबंदर नाक्यानजिक आहे. येथे एक छोटीशी खाडी आहे.तिला 'वरसावे खाडी' म्हणतात. या खाडीवर जो पूल आहे त्यालाही 'वरसावे पूल' म्हणतात. डिसेंबर २०१३ मध्ये हा पूल खचल्यामुळे राष्ट्रीय हमरता आठवर कमालीची वाहतूक कोंडी होत होती.
सध्याचे वर्सोवा (अंधेरीनजिकचे)याचे जुने नाव वेसावें असे आहे. मूळचे जुने धर्मांतरित कोळी याला वेस्सोवा म्हणतात. हिंदू कोळी येसांव किंवा येसांवे म्हणतात. लिहिताना वेसांवे लिहितात. आपल्याकडे कोंकणात बोलीभाषेत नपुंसकलिंगी एकारान्त ग्रामनामे आकारान्त उच्चारण्याची चाल होती. जसे आपटें-आपटा, रोहें-रोहा, मसुरें-मसुरा, भोगवें-भोगवा, वांदरें-वांद्रा वगैरे. त्यानुसार वेसांव्याचे वेसावा झाले असावे. पण वेर्सोव्यातला 'र' त्यात कुठून आला ते कळत नाही. कदाचित वेस्सावा हा परिपूर्ण उच्चार व्हावा यासाठी ब्रिटिशांनी मध्ये 'आर' टाकला असावा, जो त्यांच्या उच्चारानुसार 'सायलेन्ट' असतो पण त्याआधीच्या अक्षराचा उच्चार लांबवतो. वरसावे हे वेगळेच गाव आहे.
५) मुंबई म्हणजे आजची सगळी मुंबई नव्हे, तर आजच्या मुंबईतल्या मूळ सात बेटांपैकी सर्वात मोठे असलेले डम्बेल च्या आकाराचे छोटेसे मुंबई बेट, जे मलबार हिल, गिरगाव, चरणी,मुगभाट,ठाकुरद्वार,धोबीतलाव,गवळी तळे या सध्याच्या भागापुरते मर्यादित होते. हे बेट मूळ सात बेटांमध्ये सर्वात मोठे असल्याने भराव घालून बेटे संलग्न केल्यावर या सर्वच भूभागाला मुंबई नाव मिळाले.
६)कान्हेरी म्हणजे बोरिवली नव्हे. कान्हेरी हे आजच्या बोरिवली तालुक्यातले एक मोठे गाव होते. येथे बौद्धांच्या जगप्रसिद्ध गुंफा आहेत. हे कान्हेरी भारताच्या पश्चिम किनार्‍यावरचे एक मोठे बौद्ध विद्यापीठ होते, अगदी नालंदा-तक्षशिलासारखे, आणि ते पंधराव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जागते होते. आजचा बोरिवली भाग हा १९६० पर्यंत ठाणे जिल्ह्याचा भाग होता. किंबहुना वांद्र्याच्या पुढची सर्व पश्चिम उपनगरे ब्रिटिश काळात ठाणे जिल्ह्यातच मोडत होती.
७)साष्टी हा तत्कालीन ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. वांद्र्याच्या पुढे वसईखाडीपर्यंतचा प्रदेश साष्टीमध्ये मोडत असे. पूर्व किनार्‍यावर मात्र कुरले, चेंबूर वगैरे वेगळी गावे होती. उत्तरेला वसईची खाडी आणि दक्षिण-पूर्व दिशांना माहीमची खाडी यामुळे साष्टी हा प्रदेश एक द्वीपकल्पच होता.
८) 'भाइखळे हे नामरूपसुद्धा अलीकडचे वाटते. बखरलेखनकाळात हे रूप प्रचलित होते असल्यास बखरलेखनकाळ फार जुना नसावा असे अनुमान काढण्यास जागा आहे. (येथे बहावा-स्थानिक भाषेत 'बाया'ची झाडे होती म्हणून या भागाला बायाखळे हे नाव पडले अशीही एक व्युत्पती सांगितली जाते, जी अर्थात पटण्याजोगी नाही.) ठाणे जिल्ह्यात विशेषतः वसई-विरार पट्ट्यात पाणी साठवण्यासाठी केलेले खड्डे अजूनही. दृष्टीस पडतात. या खड्ड्यांना बावखल/बावखोल म्हणतात. हा एक शेतात खणलेला शंभरदीडशे फूट व्यासाचा मोठा आणि उथळसर खड्डा असतो. त्याच्या केंद्रभागी एक कठडा नसलेली विहीर असते. पावसाचे पाणी या खड्ड्यात साठून रहाते आणि जमिनीत खोल मुरते. हे पाणी शेत शिंपण्यासाठी वापरले जाते. आधुनिक शेततळ्यांचा हा जुना अवतार होय. या बावखल/बायखलावरून भायखळा शब्द आला असण्याची शक्यता या निमित्ताने इथे नोंदून ठेवावीशी वाटते. न जाणो कोणी संशोधक पुढे कधीतरी हा प्रतिसाद वाचेल आणि त्या दिशेने पुरावे गोळा करेल. स्थानिक लोकभाषा आणि जीवनपद्धतीशी परिचित नसल्यामुळे भल्याभल्या संशोधकांच्या नजरेतून अनेक मुद्दे निसटले आहेत.

@ ज्योति कामत, गोव्यात अशी ग्रामनामे सापडतात यात काहीच नवल नाही. कारण यातली काही नावे ही त्या भूभागाचे वर्णन करणारी नावे आहेत. आगशी म्हणजे गच्ची किंवा गच्चीसारखा सपाट प्रदेश. जूं, जुवें म्हणजे पाणथळ भागातला थोड्याश्या उंचवट्याचा प्रदेश. मुंबईच्या आसपास अशी अनेक जूंगावे आहेत, कोंकणातही कुंभारजुवे वगैरे गावे आहेत. मिर्‍ये हे तसेच एक नाव. जलमय प्रदेशातला उंचवट्याचा डोंगरी भाग म्हणजे मिर्‍यें अथवा मिरें.
नागाव, नायगांव ही गावे मुंबई -रायगड पट्ट्यात निदान तीन आहेत.
कदाचित दमणगंगा ते गोमंतक या कोंकणकिनारपट्टीत समान संस्कृती एकेकाळी नांदत असावी म्हणून अशी साम्ये दिसत असावीत.

@हिरा

यात कितपत तथ्य आहे.

<<<<<<बोधगयेमध्ये महाबोधी विहाराजवळ मुचलिंद विहार आहे. अवघ्या शंभर पावलांच्या अंतरावर मुचलिंद राजानं तिथं तळं बांधलं होतं. तळं आणि महाबोधी विहाराचा मुकुट एकाच समान पातळीवर आहेत. राजा मुचलिंद हा आताच्या मुलुंड नगरीचा बुद्धकाळातील राजा. त्याच्या नगराची सीमा सोपाऱ्यापासून सुरू होऊन मुलूंड आणि त्यानंतर बरीच मोठी विस्तारलेली होती. मुचलिंदनगर ही त्याची राजधानी. मुचलिंदचं कालांतराने अपभ्रंश होऊन झालं मुलुंड.>>>>>>