"ते" - ४

Submitted by मुरारी on 3 January, 2013 - 00:58

भाग १: http://www.maayboli.com/node/38066
भाग २: http://www.maayboli.com/node/38133
भाग 3 : http://www.maayboli.com/node/39907

'जयदीप .. हो जयदीपच. तू परत आलायस इथे , माझा अजूनही विश्वास बसत नाहीये . दत्त दत्त '
अगदी योग्य वेळी आलास , जसा मागे आलेलास तसाच , मागच्यावेळी एकट्याने युद्ध हाती घेतलेलस, वेडा जीव , एकट्याने "त्यांच्याशी" लढायला गेलेलास ,माझं काही एक न ऐकता. किती समजावलेलं मी तुला तेंव्हा , मला डरपोक म्हणून , येथेच्छ अपमान करून तू निघून गेलास , तुझ्या ज्ञानाचा तुला ज्वर चढलेला होता , पण कित्येक गोष्टी या विज्ञानालाही उमगलेल्या नाहीत हे तू विसरलास, तुझ्या जीवाची बाजी लावून
तात्पुरते तू त्यांना थोपव्लेस. पण जयदीप ... भाऊ थरथर कापत होते.
जयदीप, जयदीप "ते" परत आलेत

*******************************************
a

मला काय बोलू सुचेनासेच झालेले होते. थोड्यावेळाने भाऊ भानावर आल्यासारखे वाटले, ते म्हणाले 'काय नाव म्हणालात तुमच ?
'मी प्रसन्न, आणि हा माझा मित्र शिरीष', पुढे आम्ही कोण, कुठले, इथे काय कामानिमित्त आलो आहोत हा हि सगळा वृतांत त्यांना मी सांगितला . ते अजूनही बरेच विचारमग्न होते . मग म्हणाले त्या जागेवर माणूस साधा पाय ठेवायलाही कचरतो, तिकडे तुम्ही ती तोडून , नवीन हॉटेल बांधायच्या गोष्टी करता आहात , अतिशय हास्यास्पद आहे हे . ती जागा अतिशय भयानक आहे , कित्येक जणांचे बळी गेले आहेत तिकडे , सगळंच अमानवीय
तिथली जमीन, पाणी , हवा , वनस्पती सर्वच भेसूर, गेल्या कित्येक वर्षात त्या बाजूला कोणी साध उतरूनही गेलेलं नाही, गाई- गुरं सुद्धा तिकडे चरायला जात नाहीत , माणसांची गोष्टच सोडा .
सुहास काका तेवढ्यात बाहेर आले , म्हणाले 'तुम्ही म्हणता त्यावरून आठवलं, मागच्या महिन्यात बहुतेक कोणीतरी त्या गढीपाशी गेलेलं होतं,आमच्या गड्यांनी त्यांच्या गाड्या पहिल्या, शिवाय त्यांना सावधही केलं , पण त्याचं न ऐकताच ते तसेच खाली गेले. तासभरात ते वर आले , तोपर्यंत आमचे गडी तिथेच उभे होते. बरेच फोटो काढले मग त्यांनी आणि निघून गेले' ( आमचा YZ आणि आरेकर असणार ) जोपर्यंत सूर्यास्त होत नाही तोपर्यंत तिकडे सगळं आलबेल असत, पण एकदा का सूर्य मावळला कि 'त्याचं' राज्य सुरु होतं. तुम्हाला आम्ही सांगतोय ते काही तुमच्यावर रागवून नव्हे , माणुसकीच्या नात्याने मी मगाशी तसं वागलो. काका बरेच शांत झालेले होते .
म्हणजे काका तिकडे भुताटकी सारखा काही प्रकार चालतो का ? शिरीष ने तोंड उघडलं. काका क्षीण हसून म्हणाले , अहो कोकणात भूत आणि त्यांच्या दंत कथा याला कधीच मरण नाही . तसं असत तर आम्ही जास्त विचार केला नसता . पण या गढीत जो काही प्रकार आहे तो भूत , खेत , जारण मारण , तांत्रिक विद्या , जादू-टोणा, या कुठल्याच प्रकारात बसत नाही .
तोच धागा पुढे पकडून भाऊ म्हणाले बाळांनो 'जो काही दोष आहे तो त्या वास्तूत नसून, त्या परिसरात आहे , तिकडे जे काही वास्तव्य करून आहे , ते अनादी काळापासून तिथेच आहे , त्या रोगाची लागण किती वर्षांपासून झाली हे कोणालाच नक्की माहित नाही . ती गढी हे फक्त त्यांच्या अस्तित्वाचं प्रतिक आहे . " ते" कोण हे नक्की कोणीच पाहिलेलं नाही , पण ते त्या भागात सगळी कडे आहेत , झाड , दगड , माती , हवा , तिथल्या प्रत्येक गोष्टीत ते सामावून गेलेले आहेत . काही जणांनी बर्याच सावल्या त्या गढीत पहिल्या आहेत , पण कोणी एक पाउल जरी त्यांच्या हद्दीत टाकलं कि त्यांना त्याची जाणीव होते .आणि 'ते' त्याला हुसकावून लावायला सज्ज होतात आणि गढी बद्दल बोलायचं झालं तर हि खूपच अलीकडची म्हणावी लागेल , काही शे वर्षांपूर्वी ,कोणा एका मुघल रजपूत सरदाराने विजयदुर्ग मोहिमेवर असताना काही महिने इथे मुक्काम केलेला होता , त्यासाठी त्याला हि जागा फार आवडली होती , त्याच्यासाठी म्हणून हि खास राजस्तानी प्रकारची गढी बांधली. पण अवघ्या काही दिवसातच त्याचं अख्खं कुटुंब सैन्या सकट गायब झालं , ते कुठे गेले? त्याचं काय झालं हे शेवटपर्यंत कोणालाही समजलेलं नाही , त्यानंतर बर्याच जणांनी त्या गढीत प्रवेश मिळवून लुटालूट केली , जे होतं नव्हत ते सर्व लुटून नेलं. पण सूर्यास्त नंतर जे तिथे थांबले , ते परत कोणालाही दिसले नाहीत.
पण भाऊ, हे नक्की काय प्रकरण आहे? हा जयदीप कोण ? तो इथे कशाला आलेला? मला पाहिल्यावर तुम्हाला त्याची आठवण का झाली ? आणि मलाही तुम्हाला काही अजून सांगायचे आहे... मी पुढे बोलणार तेवढ्यात भाऊच म्हणाले आपण एक काम करू आपण बाहेर चक्कर मारून येऊया,काय सांगायचे ते तिकडे सांग . त्यांना बहुधा हा विषय घरात नको होता . संध्याकाळचे पाच वाजून गेले होते , परत चहा झाला , काकू अतिशय अस्वस्थ वाटत होत्या , पण कारण काय ते कळायला मार्ग नव्हता . आम्ही बाहेर पडलो , YZ ला फोन करायचा होता पण मोबाईल ला
अर्थातच रेंज नव्हती . घरी फोन होता , त्यांना विचारून , ऑफिस मध्ये आधी फोन करून सगळं सांगितलं , उद्यापासून कामाला सुरुवात करा, हे मुद्द्याच बोलून त्याने फार काही न विचारता , ऐकता फोन ठेवून दिला.
आम्ही बाहेर पडलो , पाउस थांबलेला होता ,पण गारठा बराच होता . आजूबाजूला घरं दिसत होती, पण बरीचशी बंदच होती , मध्ये मध्ये कोण कोण बाहेर डोकावून जात होते , आम्ही भाऊंच्या चालीने हळू हळू जात होतो. भाऊनी एका वाटेने आम्हाला वर वर नेले , आजूबाजूंनी आंब्याची दाट झाड होती . या वयात देखील ते ज्या चपळतेने चालत वर जात होते , आम्ही दोघे एकमेकांकडे बघतच राहिलो . थोडा चढ चढल्यावर एक छोटसं घर दिसायला लागलं. ते म्हणाले या इकडे . चिखल तुडवत आम्ही तिकडे पोचलो. दरवाज्याला कुलूप होतं , खिडकी बाजूच्या एका चीरेतून त्यांनी
एक चावी काढली, आणि घर उघडले, लहानसेच घर होते एका बाजूला बरीच पोती ठेवलेली होती , आंब्याला लागतात त्या पेट्यांची फळकुट सुद्धा बरीच होती , दुसर्या बाजूला एक जुनाट पलंग ठेवलेला होता . बाजूला एक टेबल, बाकी काही नाही .आत मध्ये एक स्वयपाक घर होते.
इथे राहायची सोय होऊ शकते, हे आमच्या गुरवाच घर , आमची आंब्याची बाग हाच सांभाळतो , सध्या मुलीच्या लग्नाला म्हणून देवगड ला गेलाय , तो काय अजून महिनाभर तरी येत नाही . जराशी गैरसोय आहे खरी, पण उद्या एका गड्याला सांगून हे सर्व साफ करून घेतो . शिरीष इकडे तिकडे करत बाहेर पडला . भाऊ पलंगावर बसले , मी त्यांच्या बाजूला . ह .. सांग काय सांगायचे होते, ते सांग . मी एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली , पार एकदम लहानपणा पासून जी स्वप्न मालिका दिसायला लागलेली ती सर्व तपशीलवार सांगितली. मी सांगत होतो तसं ऐकताना भाऊंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते , अगदी काल पडलेले स्वप्न देखील सांगितले , हे ऐकून भाऊ बरेच अस्वस्थ झाले , स्वताशीच बोलल्यासारखे पुटपुटले , माझं अंतर्मन मला कधी दगा देणार नव्हतं आणि तसच झालं.. जयदीप मला परत यायचं वचन देऊन गेलेला होता, आणि आज इतक्या वर्षानंतर त्याने /विधात्याने ते पाळल.
तेवढ्यात पाउस सुरु झाला , आणि शिरीष पण आत येऊन बसला. भाऊंनी मला मागच्या बाजूची खिडकी उघडून पाहायला सांगितलं , मी आत गेलो ,आणि खिडकी उघडून पाहिलं , कोसळणाऱ्या पावसात दूरवर त्या गढीच टोक दिसत होतं, अंगावर शहारा आला, मी लगेच खिडकी बंद केली . भाऊ म्हणाले तुम्हाला आता सर्व सांगतो , मला जमेल तसं आठवेल तसं ... भाऊ जुन्या आठवणीत हरवले .
बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, माझे वडील या गावाचे सरपंच होते, आत्ता दिसतंय तसं भकास गाव नव्हत तेंव्हा , चांगली शे दोनशे कुटुंब गावात गुण्या गोविंदाने वस्ती करुन होती. आंब्याच्या मोठ्याला बागा , काजूची, फणसाची झाड, गावाच्या दक्षिणेला भरपूर भात शेती, त्याच्या वरच्या बाजूला ग्रामदेवता सुखाने नांदत होती , रोजच्या रोज तिची पूजा अर्चा होत असे . खाली एक दत्त मंदिर देखील होतं, म्हणजे आहे . डोंगरात कोळ्यांची वस्तीही होती , त्यांच्या पाच सहा मोठ्या नावा होत्या, संध्याकाळी जे मासेमारीला जायचे ते सकाळीच परतायचे, प्रत्येक उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा व्हायचा. एकूण गावात शांतता होती . पण मला एक गोष्ट खूप खटकायची, ती म्हणजे समोरची ती अभद्र वास्तू.
एकदा आमचे 'पोळ' गाव भयानक बातमीने हादरले. कोळ्यांच्या समुद्रात गेलेल्या नावा अचानक बुडाल्या. आम्ही घाबरलो , गावात त्यांची कुटुंब भयानक ओरडत , आक्रोश करत आली , आमची आई, आजी त्याचं सांत्वन करत होत्या, सगळी घर झाडून लोटली होती, अनेकांनी समुद्रात त्यांच्या शोधासाठी उड्या घेतल्या होत्या. तो संपूर्ण दिवस आम्ही समुद्रावरच होतो , संध्याकाळच्या सुमारास एक शोधासाठी गेलेली होडी येतांना दिसली , आम्ही आशेने पाहायला लागलो , पण बातमी वाईट होती. जेमतेम तीन ते चार जणांचेच मृतदेह सापडलेले होते , बाकी २० गडी बेपत्ता होते , आणि फक्त एक जण दत्तू तो कुडकुडत एका बाजूला बसून होता. मृतदेहांच्या चेहऱ्यावरचे भाव ,भयानक होते .. मला ते पाहून मळमळू लागले. कसलातरी भयंकर धक्का बसलेला असावा.
कसेबसे दोन दिवस उलटून गेले. गावातली पुरुष मंडळी चिंतेत होती, दत्तू कडून आमच्यापर्यंत आलेली बातमी अशी होती. संध्याकाळच्या सुमारास होड्या नेहमीप्रमाणे समुद्रात गेल्या , कोळ्यांनी त्यांचे काम सुरु केले, पण थोड्या वेळात अचानक आकाशात वर भयंकर स्फोट झाल्यासारखे झाले , नुसताच प्रचंड उजेडाचा भास झाला , आवाज आलाच नाही.. पण दूरवर काहीतरी भयानक वेगाने समुद्रात कोसळले . काही सेकंदातच तिथून उसळेल्या प्रचंड लाटांनी यांच्या बोटी उलटवून टाकल्या.. दत्तू जीवाच्या आकांताने पोहून किनारा गाठण्याचा प्रयत्न करत होता , पण बाकीचे कुठे गेले काही कळत नव्हते, हळूहळू दत्तू सावरला.. हात मारून कसाबसा पाण्यावर राहायचा प्रयत्न करत होता.. पण तेवढ्यात पाण्याखालून गुलाबी , निळसर रंगाचा एक प्रवाह त्याला वाहत जाताना दिसला , त्याचा वेग भयानक होता , त्यातच त्याला त्याचे साथीदारही खेचले जाताना दिसले .. यालाही ती ओढ जाणवली , पण हाती लागलेल्या एका फळकुटाने याला वाचवले , काही सेकंदातच तो प्रवाह किनार्याला लागला , पण तो त्या गढीच्या भागात घुसला.. पुढे काय झाले त्याला काही आठवत नव्हते, आमच्या माणसांनी त्याला वाचवले तेंव्हाच त्याला शुद्ध आली .
झालं आता तर ती गढी अजूनच बदनाम झाली, नाना तर्क कुतर्क सुरु झाले , पोलीस केस झाली , पण बेपत्ता लोकांचा काही शोध लागला नाही . हळू हळू लोकं झाला प्रकार विसरून गेले. पण गढी बद्दल मनात प्रचंड भीती होतीच .गावाने जणू तो विषय वाळीतच टाकलेला होता . रात्री अपरात्री जर एकटा गडी तालुक्याहून आला तर तो वरतून तुम्ही आलात तसे सड्यावरून न येता, मागून बराच वळसा घालून 'तिकोळी' गावातून यायचा, जणू काही ती वास्तू दिसली कि याचा जीवच जाईल, गावातहि बर्याच दंतकथा पसरलेल्या होत्या . अर्थात तिथे भुताटकी असते अशाच पद्धतीच्या, तो भागच वेगळा होता , सड्यावर आम्ही पोर पोर गुपचूप जायचो, आणि तिकडे पाहत बसायचो, तिकडे
नक्की काय आहे हे पाहण्याची तारुण्य सुलभ उत्सुकता होतीच , शिवाय तरुण सळसळत रक्त!! एकदा आम्ही काही झालं तरी तिकडे जायचंच असा बेत केला , आम्ही दोघे भाऊ , रामोशाची चार पोर , आणि बजा गुरवाचा एक असे सर्व ग्रामदेवतेच्या देवळात जमलो, नक्की काय बोलणं झालं ते आठवत नाही, पण गढी ला निदान जवळून पहायचे असे काहीसे ठरलेले होते , बेत अगदी गुप्त होता . तालुक्याला जत्रा भरायची , तेंव्हा अख्ख गाव तिकडे लोटायचं, तोच मुहूर्त साधायचा ठरवला. शेवटी तो दिवस उगवला , सकाळपासून आम्ही त्याच विचारात होतो , दुपारी जमून परत एकदा बोलणं झालं ,
रामोशाची पोरं मशाली आणणार होती , आमच्याकडे दोन कुर्हाडी होत्या, गुरव देवीचा अंगारा आणणार होता, आमच्या बुद्धीप्रमाणे आम्ही तयारी केलेली होती . त्या दिवशी पोर्णिमा होती . लक्ख चांदणे पडलेले होते . आणि आम्ही निघालो , अंगावर शहारा येत होता , भयंकर धाडस करत होतो , सगळे गुपचूप सड्यावर आलो .. समोर अंधारात ती गढी दिसत होती , आम्ही एकमेकांचे हात पकडलेले होते , गावच्या लोकांनी रस्त्याला लागून गुर त्या भागात जाऊ नयेत म्हणून कुंपण लावलेले होते ... ते आम्ही उचकटले.. भर थंडीत देखील घाम फुटलेला होता .. अक्ख्या उतारावर विचित्रच झाडं वाढलेली होती खुरटी.. सगळे तसेच स्तब्ध होते , शेवटी मनाचा हिय्या केला
आणि पहिले पाउल मीच 'त्यांच्या' हद्दीत टाकले

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रंगतेय कथा , एक एक पात्र समोर येतंय
हा भाग पण तसा लवकर आला Wink

ते वरच चित्र तुम्ही केलं आहेत का?
भयानक आहे, पण चपखल बसलाय तिथे ते