सांताक्लॉजा (स्फुट )

Submitted by Kiran.. on 24 December, 2012 - 12:29

सांताक्लॉजा
========

"आई, आज नक्की येईल ना गं तो ?"
"अरे बेटु, आई काम करतेय "
"सांग ना गं .."
" कोण येईल ?"
" तू म्हणालेलीस तो "
" ते बघ आता.. कसं समजायचं मी ?"
" तू सांगितलेलं ना एकदा? तो येतो म्हणून..मी लहान असताना ?"
" मग आत्ता मोठा झालास का ?"
" हो मी मोठा झालोय"
" हो ना माझा बेटुराजा.. चार वर्षांचं मोठ्ठं बाळ ते "
" अगं मी खरंच मोठ्ठा झालोय.. बाबा एव्हढा "
" हम्म "
"आई ! आई.. ओ दे ना "
,
,
,
,
,
,
,
,
,

"चला सगळे जेवायला. माझी क्युट गर्ल कुठेय?"
"भूक नाही "
" हे काय ! अगं काय पोरगी आहेस तू.. सकाळी अर्धी पोळी खाल्लेलीस. डबा पण जसाच्या तसा परत आणलास "
" नको ना गं.. भूक नाही म्हटलं ना !"
" मी मार देईन हं अशाने. मी काय काय करायचं गं ? तुमचं आवरा, डबे करा, नाश्ता बघा, ऑफीस, धावपळ आणि तू असं केलंस तर आईचं लक्ष राहील का कामात ?"
" ऊं.. आई झोपायचंय गं. "
" काय बोलणार ! माझं कोण ऐकणार.. "
" आई ! आज रात्री डेट बदलणार ना ?"
" हो ! का गं ?"
" म्हणजे आजच ख्रिसमस ?"
" हो "
" यिप्पी SSSSS !!"
" काय झालं ?"
" उशीखाली गिफ्ट मिळणार ना सकाळी... !!"
" आई काय झालं ? दीदी काय म्हणतेय ?"
" या ! तुमचीच कमी होती "
" सांग ना आई !"
" अरे आज सांताक्लॉजा येणार आहे "
" ये SSSSS....यिप्पी SSSS .. आई आई.. मी सकाळी म्हणत होतो ना एकदा .. तर तू ऐकत नव्हतीस "
" ओ रे माझ्या राजा शोना.. शॉरी "
" आई ! ते बघ.. तू नेहमी त्यालाच असंच लाडाने बोलतेस. मला नाही ना बोलत ?"
" अगं तू पण माझी परीराणी आहेस. तू तर माझ्याकडे त्याच्याआधी आलीस. तुझा तर खूSSप लाड झालाय "
" तुम्ही बसा हं मुलांनो. दंगा करू नका. मी आलेच दुकानात जाऊन "
,
,
,
,
,
,

" आई ! गुड नाईट "
" गुड नाईट बेटु "
" आज येणार ना सांताक्लॉजा ?"
" का नाही येणार ? माझ्या राजाबेटुसाठी नक्की येणार "
" हं"
" दीदी झोपली वाटतं "
" आई सांताक्लॉजा बाबा असतो ?"
" नाही. सांताक्लॉजा तर लांब चंद्रावर राहतो. तो चंद्राच्या किरणांच्या गाडीवर बसून येतो आणि सगळ्या मुलांना गिफ्टस देतो "
" सगळ्या मुलांना ?"
" हो "
" अगं पण तो आपला असतो ना ?"
" नाही, सर्वांचा असतो. झोप बरं. गडबड करणा-या शैतान मुलांना नाही देत गिफ्ट"
" आई मी शैतान आहे ?"
" नाही रे शोना ! तू तर राजा बेटा आहेस. गुड बॊय !"
" मग सांताक्लॉजा येईल आपल्याकडे ?"
" अरे हो हो हो ! येईल. किती प्रश्न विचारतोस सारखा !"

" आई पण तो बाबा असतो ना ?"
" नाही म्हटलं ना ? झोप आता ! "
" रागवू नकोस ना आई ! नाहीतर सांताक्लॉजा तुला शिक्षा करेल "
" गुड नाईट ! झोप आता नाहीतर सांताक्लॉजा येणार नाही तू जागा असल्यावर "
,
,
,
,
,
,
,
,
,
,
" गुड मॉर्निंग चिल्ड्रेन ! मेरी ख्रिसमस !!"
" सकाळ झाली ?"
" हो ! सकाळ झाली. दीदीला उठवा. आजसे ख्रिसमस कि छुट्टी है "
" ये SSSSSSSS "
" दीदी पण उठली बघ ! मेरी ख्रिसमस !! "
" आई ! माझं गिफ्ट ?"
" मला नाही माहिती. बघ बरं उशीखाली ?"
" यिप्पी SSS ! हे माझं गिफ्ट "
" आई सांग ना त्याला. माझं गिफ्ट घेतलं त्याने "
" बेटु, तुझ्या उशीखाली पण असेल ना. बघ बरं "
" सांताक्लॉजा आलेला ?"
" मला पण नाही माहीत. मी तर झोपले होते. "
" मग माझं गिफ्ट ?"
" थांब हं. बघू बरं या उशीखाली... व्वाव ! हे बघ "
" यिप्पी !! माझं गिफ्ट !!"
" आई ! काय गं.. फक्त चॉकलेट ?"
" अगं ! तसं नसतं म्हणायचं.. सांताक्लॉजा जे देईल ते घ्यायचं असतं बेटा "
" उं जा ! "
" दीदी.. दीदी ! तसं नसतं म्हणायचं. सांताक्लॉजा जे देईल ते घ्यायचं असतं "
" ए जा तू तिकडं "
" अगं हो ! सांताक्लॉजा जे देईल ते घ्यायचं असतं .. सांताक्लॉजा बाबा असतो !"
" हे काय बेटु. कितीदा सांगितलं तसं म्हणायचं नाही "
" दीदीच म्हणत होती. सांताक्लॉजा बाबा असतो ते "
" मी कट्टी आई ! "
" असं काय गं ! मी काय करू आता सांग बरं "
" मला माहीत आहे सगळं "
" काय ? "
" बाबा इथं असता तर किती छान छान गिफ्ट मिळाल्या असत्या. मला बार्बी डॉल. शोनुला गाडी "
" आई ! सांताक्लॉजाने एकदा दिलेली गाडी कुठंय माझी ?"
" ती कधीच मोडली "
" मग आता दुसरी द्यायची ना त्याने "
" शोनु ! आई खोटं बोलतेय रे. आईच ठेवते गिफ्ट उशीखाली. हो ना आई ?"
" नाही रे सोनु..."
" मग सांताक्लॉजाने चांगले गिफ्टस का नाही दिले ?"
" अरे ! मी तरी काय सांगणार ? त्याने गाडीतून येता येता उशीखाली टाकले असतील गिफ्टस "
"पण बाबा असतानाच कसा चांगले चांगले गिफ्ट द्यायचा सांताक्लॉजा ?"
" खूप बोलतेहेस हं तू हल्ली !!"
" हो मग ! आताच का फक्त चॉकलेटस ?"
" दीदी... माझी परीक्षा नको पाहूस . "
" जा ! तू नेहमी मलाच असं बोलतेस "
,
,
,
" रडू नको दीदी ! आपण बाबाला नाव सांगू आईचं ! आई सांताक्लॉजा आपल्या बाबाला का नाही घेऊन येत ? तो पण तिथेच असतो ना ?"
".............................................."
" आई आई सांग ना.. मला त्याची खूप आठवण येते. तू बाबाला बोलव "
" शोनु..............................."
" मला बाबा पाहीजे.. आत्ताच्या आत्ता बाबा पाहीजे. मला चॉकलेट नको "
"............................................................
...............................................................
............................................................... "

" शोनु ! काय केलंस ? आईला रडवलंस ना ? "
" मला बाबा पाहीजे "
"अरे ! आपला बाबा तर खेळणी वाटायला गेलाय मुलांना "
" म्हणजे सांताक्लॉजा ??"
" हो ! त्याला खूप काम आहे. सगळी मुलं त्याची वाट बघतात "
" मग आपल्याला का नाही भेटला तो ? "
" आपण झोपलो होतो "
" सगळे ?"
" हो !! "
"आपण झोपलो होतो तेव्हां बाबा आलेला ?"
" हो "
" मग बाबाने गाडी का नाही दिली मला ?"
" अरे त्याच्या लक्षात नाही राहीलं. त्याला वाटलं तू अजून चॉकलेटच खातोस.."
" आई ! बाबाला सांग ना परत चंद्रावर जाऊ नकोस म्हणून.. मला त्याच्याशी खूप खेळायचंय !!"
,
,
,
,

" आई ! सॉरी गं ... माझ्यामुळे रडलीस ना ?"
"नाही गं राणि !! माय स्वीट गर्ल "
" मी जर तसं नसते म्हटले तर शोनुने बाबाचा हट्ट केला नसता आणि तुला रडायला नसतं आलं "
" जा.. बाथरूममधे जा सगळे. मी आवरते सगळं "
" आई !! तू आता रडणार आहेस का एकटी ?"

" जा गं प्लीज ! वैताग आणलाय नुस्ता .....!!!
जा दोघंही. इथून जा.
मला आता खरंच एकटीला सोडा..
प्लीज जा !!
मला ना आता ...
माझ्या सांताक्लॉजाजवळ रडायचंय..
माझं गिफ्ट नाही आणलंस म्हणून...!
,
,
मला एकटीला सोडा प्लीज.. पाच मिनिटासाठी ..!!!"

- Kiran

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप टचिंग लिहीलेत... आज ख्रिसमस ईव्ह असुन मी पण खुप अस्वस्थ आहे.. आनंद अभ्यंकर्,पेंडसे बातमीने.....त्यात तुमचे हे स्फुट...छान लिहीलेत पण आज नको होते मी वाचायला.

किरण,
खूप सुंदर लिहीलंस तू. लहान लेकरांच मनोविश्व.. एकल्या मातेची व्यथा पुरेपूर पोहोचवलीस...
God Bless u ma frnd!

छान लिहिलं आहेस. सध्याच्या दोन बातम्या आणि काल वाचलेल्या पुस्तकाच्या पार्श्वभुमीमुळे जास्तच पोचलं.

खुप टचिंग लिहीलेत... आज ख्रिसमस ईव्ह असुन मी पण खुप अस्वस्थ आहे.. आनंद अभ्यंकर्,पेंडसे बातमीने.>>>>>>>>>>. खरेच... आनन्द आणी अक्शय आणी प्रत्युश .... वय ४८ आणि ३५ आणी २ ...हे काहि जाण्याच वय आहे???