लिंबु लोंणचे--गोड व तिखट--[उकडुन केलेले.]

Submitted by सुलेखा on 22 December, 2012 - 02:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

६ मोठी लिंबे.
१ टेबलस्पून किसलेले आले.
इतर साहित्य--गोड लोणचे--
२ वाट्या साखर.
१ टी स्पून लाल तिखट.[अगदी सपाट चमचा]
१ टी स्पून मीठ.
१/२ टी स्पून लवंग पुड.
१/२ टी स्पून दालचीनी पुड.
तिखट लोणचे साहित्य-
१ टेबल्स्पून तेल.
१/२ टी स्पुन हिंग.
१/२ टी स्पून मोहोरी व जिरे.
१/२ टी स्पून हळद.
१/२ टी स्पून जिरे पुड
१/२ टी स्पून मेथीदाणा पुड .
.[१०-१२ मेथीदाणे खरड/लहान खलबत्ता वापरुन पुड केली]
१ टेबलस्पून मोहोरीची डाळ .
१ टी स्पून तिखट.
१ टी स्पून मीठ.

क्रमवार पाककृती: 

लिंबे धुवुन,पुसुन घ्यावी.एका लिंबाच्या ८ फोडी याप्रमाणे चिरुन घ्यावी.चिरताना लिंबातील बिया काढुन टाकाव्या.
एका भांड्यात /कूकरच्या डब्यात या चिरलेल्या फोडी ठेवुन त्यात पाणी अजिबात न घालता कूकर मध्ये हे भांडे ठेवुन २ शिट्या देवुन घ्याव्या.
लिंबाच्या कूकरमधे शिजवलेल्या फोडी व १ टेबलस्पून किसलेले आले.
limbu lonache.--22 Dec.12 001_0.JPG
कूकर प्रेशर निघाल्यावर या फोडी ,अर्धे किसलेले आले मिक्सरमधे वाटुन घ्याव्या.
वाटलेला लिंबाचा गर वाटीने मोजायचा आहे.
एक वाटी गर गोड लोणच्यासाठी व उरलेला पाऊण वाटी गर तिखट लोणच्यासाठी वापरला आहे.
आता गोड लोणच्यासाठीचा एक वाटी गर कढईत घेवुन त्यात २ वाट्या साखर घालुन चमच्याने छान एकजीव करुन मध्यम गॅसवर ठेवावे.मिश्रण सतत ढवळावे.साखर विरघळली कि मिश्रण पातळसर होईल त्यात तिखट,मीठ,दालचीनी पुड व लवंग पुड घालुन पुन्हा ढवळावे.
लगेचच गॅस बंद करावा.झाले गोड लोणचे तयार !!
हे लोणचे कोंबट असताना बाटलीत भरुन ठेवावे.
२ दिवस तसेच ठेवावे.त्यानंतर हे गोड लोणचे खाण्यासाठी तयार होते..लिंबाची साले व साखर शिजल्यावर कडु होतात. त्यामुळे लगेच खाऊ नये. हा कडुपणा २ दिवसांनी लोणचे मुरल्याने आपोआप जातो.शिजवलेले लोणचे फार दाट/घट्ट होऊ देवु नये.थंड झाले कि अजुन घट्ट होते..म्हणुन पातळसर असताना गॅस बंद करावा व कोंबट असतानाच बाटलीत काढावे.म्हणजे कढई ला चिकटत नाही व कढई लगेच स्वच्छ होते.
तिखट लोणचे--
एका लहान कढईत तेलाची फोडणी करायची.गरम तेलात मोहोरी-जिरे,हिंग,हळद,मेथी दाणा पुड व लिंबाचा गर व उरलेले अर्धे किसलेले आले घालुन ढवळुन घ्यावे आता त्यात मोहोरीची डाळ,तिखट,मीठ घालुन छान परतावे.एक चटका दिला कि झाले तिखट लोणचे तयार !!
एखाद्या बाटलीत काढुन ठेवावे.
हे लोणचे लगेच खायला घेता येते.
फ्रीज मधे ठेवल्यास ही दोन्ही लोणची जास्त दिवस टिकतील.
limbu lonache.--22 Dec.12 005.JPG

अधिक टिपा: 

तिखट लोणच्याच्या फोडणीत लसणीचे तुकडे -ते लाल होवु द्यायचे नाहीत--घातल्यावर लगेच लिंबाचा गर टाकुन परतायचे. या लोणच्याची वेगळी खमंग चव येते..
गोड लोणच्यात शिजताना किशमीश/मनुका/जरदाळु घातल्यास खूप छान चव येते.
उकडलेली लिंबे वाटताना अगदी बारीक वाटायची नाहीत.
वर्षभर लिंबं मिळतात त्यामुळे हे दोन्ही प्रकार सतत करता येतात.
लोणचे दाटसर केल्याने पोळी,पराठा,ब्रेड ला स्प्रेड सारखे पसरुन लावता येते.

माहितीचा स्रोत: 
आई..
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार.
माझे आवडते. इथे जाड सालीची लिंबे मिळतात. त्यांचे नेहमीच होते. पण मी उकडत नाही. इथल्या कडक उन्हात ते आठवडाभरात मुरते.

वा माझे आवडते लोणचे. सम हाऊ मला जमतच नाही हे . आता तुझ्या पद्धतीने करून पाहीन, धन्यवाद Happy
गोड शिरा अन हे लोणचे , किंवा गरमागरम तुपमीठ्भात अन हे लोणचे, यम्मी Happy

व्वॉव, यम्मी :). मी हल्लीच एक मस्त लोणचे खाल्ले, असेच लिंबाच्या फोडी उकडून साखर घालून केले होते पण त्यात तिखट हिरव्या मिरच्यांचे थोडे तुकडे सुद्धा होते. त्यामुळे एकदम मस्त तिखट, गोड आणि आंबट चव होती.

मी पण असेच उकडुन करते. आले कधी घातले नव्हते, आल्याची चव छान लागत असणार. पित्तावर औषध म्हणुन ही वापरता येईल का?

लिंबू उकडण्यापेक्षा ते ४-५ दिवस मुरवत ठेवले तर चांगली नैसर्गिक चव येते. त्यामुळे मी तर लिंबू न कापता प्रथम गरम पाण्यात ५ मिनिटे ठेवून बाहेर काढतो आणि मग फोडी करतो.

- पिंगू

नानबा,फोडी उकडुन घ्यायच्या..अंदाजाने साखर घेवुन त्याचा २ तारी पाक /पक्का पाक ही चालेल ..करायचा ..पाकात तिखट-मीठ-जिरे पुड-मीरे/याशिवाय खजुराचे तुकडे घालायचे नंतर उकडलेल्या फोडी घालायच्या..मस्त रंग व चव,पाकाचा आंबटगोड स्वाद असलेले लोणचे तयार.हे लोणचे लगेच खाल्ले तरी कडू लागत नाही पण २ दिवसांनी जास्त छान लागते..