गानभुली - तुझे गीत गाण्यासाठी

Submitted by दाद on 13 December, 2012 - 23:22

http://www.youtube.com/watch?v=y4lznz6E8oo&feature=related

शुक्रवारी रात्री त्या प्रवचनाहून परत येताना कुणीच काही बोलत नव्हतं. स्वामीजी विषयातले पारंगत. अधिकारवाणीने बोलत होते. सुघड मुद्रेवर तेज होतं. वचनं, प्रमाणं, श्लोक, अभंग चपखल सुचत होते. मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी.... भाषांवर प्रभुत्व होतं.
विषय तसा कठिण. गीतेतील कर्मसंन्यासाची व्याख्या. पण मांडणी भुरळ पाडणारी, कन्व्हिन्सिंग म्हणतात ना, तशी.... तळहातावरील रेषेसारखे स्वच्छ, या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखे सोहोपे करून सांगत होते.....
पण......
निखळ कर्मसंन्यास कसा, कर्मसंन्यासी व्यक्तीचं वागणं कसं, बोलणं कसं हे सारं सागताना, कर्मसंन्यास त्यांनी शुद्ध कर्म-सन्यास म्हणून सांगितला.
एखाद्या विस्तीर्ण वाळवंटाचं भव्य, एकांडं, अन अतिशय विरक्त रूप बघावं अन त्याची भुरळही पडावी असं अवघड होऊन गेलं. आमच्या सारख्या संसारी श्रोत्यांना ह्या मात्रेचा वळसा थोडा जास्तच लागला!

परतताना, नवरा आपल्याच विचारात गाडी चालवत होता, माझीही तीच अवस्था होती. इतरवेळी काहीनाकाही बोलून खुलवणारे रवीभैय्यासुद्धा गप्प होते. नाही म्हणजे त्यांची बोटं गुढग्यावर तबला वाजवत असतात. ते ही आपल्याच विचारात खिडकीबाहेर बघत होते. आमच्या ब्लॉकपाशी आलो आणि रवीभैय्या नुसताच हात हलवून वरच्या जिन्याकडे वळले.

जितके टाळावेत तितके तेच तेच फकिरी विचार तरंगत राहिले. सकाळी लवकर उठून नवरा चार आठवड्यांच्या टूरवर जाणार होता.
’श्शी... भेटणार नाहियेस आता तब्बल चार आठवडे...’ असलं काही बोलण्याऐवजी नुसतेच छताकडे बघत झोपी गेलो दोघेही. अशी ओढ.... ह्याला मोह म्हणायचं का? असलं काहीतरी पुन्हा पुन्हा ठसकत राहिलं मनाच्या कोपर्‍यात, त्याच्याही अन माझ्याही.

आजूबाजूला जे सुंदर दिसतय ते मोह-माया म्हणून का नाकारायचं?
माझ्या सख्याच्या छातीवर माथा टेकला की ऐकू येणारी स्पंदनं अन त्याने मला झालेलं सुख, माझ्या लेकराच्या जावळाचा गंध, त्याच्या इवल्या बोटांनी माझं बोट घट्ट धरून टाकलेलं पहिलं पाऊल, मित्र-मैत्रिणी, सखे-सहोदर, त्यांची आपल्याला अन आपली त्यांना वाटणारी काळजी, वाटून घेतलेले सुख दु:खाचे प्रसंग, प्रेमाने जोडलेली घरची-माहेरची माणसं, त्यांच्यावर जडलेला जीव.... हे सगळं मोह, माया म्हणून त्याज्यं? असं पायाखालची स्वस्थं जमीन काढून घेऊन तापल्या भांगरावर चालण्याचा अट्टाहास का?

फकिरांना सुखं, दु:खं नसतं का? संन्यासी कशाने सुखावतो, कशाने दुखावतो? संन्याशाचे आई-वडील... त्यांना दु:ख कसलं असेल, आनंद कशाचा होतो? हे आत्ता आपण विचार करतोय ते तरी किती सुसंगत आहे? हे ही कळत होतच.

काय आहे आणि काय नाही.... नुसतेच कालवलेले विचार.... आतून उलटं पालटं करीत रात्रं कशी सरली कळलच नाही. पहाटे चार वाजताच, नुसतच ’हो हो’... ’नाही नाही’... इतकच बोलत, आपल्याच विचारात नवर्‍यानेही घर सोडलं. मग अधिकच भरून आलं.
नुसतंच आतून रिकामी वाटण्याची ही पहिली वेळ नाही.... पण ते रिकामीपण असं निष्फळतेनं भरलेलं.... असं पहिल्यांदाच अनुभवलं. एका गूढ निष्क्रीय अवस्थेत बसून राहिले बाल्कनीत येऊन.

कृतकृत्य होऊन मावळतीला झुकला चंद्र, झाडांची हलकी सळसळ, पहाटेचा उत्सुक वारा.... ह्यातलं काहीच जाणवत नव्हतं. जणू आतल्या कालव्याने नेहमीच्या सजग संवेदनाही बोथटल्या होत्या.....
तरीही, वरती रवीभैय्यांच्या ब्लॉकमधून त्यांच्या रियाजाची तयारी सुरू झाल्याचं कळत होतं. तानपुरा लागला होता... पण तेही सुखदायी होईना. रवीभैय्यांनी तरफेच्या तारा छेडल्या आणि समोरचा काळोख अधिकच गडद झाला. जोगिया......
अतीव एकलेपण. विलक्षण रितं, अपूर्ण, असहाय्य करणार्‍या जोगियाची आलापी. एक एक स्वर, एक एक तार माझं उरलं सुरलं "असलेपण" निचोडून काढत होती.... रितं रितं करीत सुटली.....

ते सहन न होऊन मी उठणार इतक्यात का कुणास ठाऊक पण, रवीभैय्या अर्ध्या तानेतच तटकन थांबले......
चिकारीच्या तारेचा एकतारी सारखा वापर करीत त्यांनी नुसताच ताल धरला....

झाकोळून आलेल्या मनाने कान टवकारले.... किलकिलं झालं, सजग झालं.

रवीभैय्यांनी एकच ओळ छेडली.... तुझे गीत गाण्यासाठी.... सूर लागू दे... रे......
परत एकदा छेडली.....
तिन्ही लोक आनंदाने भरुन वाहू दे रे.... तुझे गीत गाण्यासाठी.....!

आणि..... सर्रकन काटा आला अंगावर.

पाडगावकरांचे शब्द... अमृताची झड होऊन रवीभैय्यांच्या सतारीतून झरू लागले.
तरफेच्या तारा अजून जोगियात लागलेल्या होत्या.... पण त्यातलेही काही सूर होतेच की ह्या ही गाण्यात..... त्या तारा झिणझिणत राहिल्या, इतर जोगियाच्या तारांचं न ऐकता....... तुझे गीत गाण्यासाठी....

शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा....
या सुंदर यात्रेसाठी....

मन कधीच त्या सुंदर यात्रेला निघाले होते.... हे असं जडाचं अस्तित्वं, त्याची पंच इंद्रीय आणि त्यांचे भास या सार्‍याला चेतस देणारे कसे हे शब्द, कसे हे सूर....

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी....
झर्‍यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी......
सोहळ्यात सौंदर्याच्या... तुला पाहूदे रे...

ह्या इथे माझ्यासमोर माझ्यासाठी सतारच बोलत होती...
सभोवतालच्या सार्‍या सौंदर्याच्या सोहळ्याचा तोच एक निरंतर साक्षीदार नव्हता का? आपल्या आयुष्यातल्या सार्‍याच सोहळ्याचा तो नाही तर दुसरा कोण साक्षीदार? किंबहुना त्यानेच स्वश्रीहस्ते घडवलेला प्रत्येक सोहळा नव्हता का? आपण फक्त निमित्तमात्रं नाही का? सार्‍या होण्या न-होण्याचं, सार्‍या असण्या न-असण्याचं कर्तेपण त्याच्याच हातात नाही का?
इतकं स्वत:ला यत्किंचित, लहान करणारे विचार सुरू होऊनही... आई-बापाच्या कुशीत हिंदकळणार्‍या लहानग्यासारखं मन निवांत झालं.

पूजा केल्यासारखं असावं की प्रत्येक काम, प्रत्येक कर्म. पूजेत वाहण्यासाठी खुडलेल्या कोणत्या फुलात आपला जीव अडकतो? कोणती कळी आपण हुंगतो? कोणता प्रसादाचा पदार्थ आपण नैवेद्य दाखवण्याआधीच चाखतो?
... हं हे "मी" खुडलेलं फूल, हा "मी" खपून शिजवलेला, दाखवलेला नैवेद्य, बरं का.... ही आत्ता म्हटली ती "मी" म्हटलेली आरती.... अशी नसते ना पूजा!
ह्या ’मी’ चा स्पर्श नसलेली निष्काम नसते का पूजा? मग असंच का असू नये प्रत्येक काम?

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे....
तुझे प्रेम घेऊन येती गंध-धुंद वारे...
चांदण्यात आनंदाच्या...
माझ्या समोरचंच दृश्यपटल होऊन बोलताहेत हे सूर.... सारं काही जसं समोर होतं तस्सं! दृश्यं, प्रत्यक्ष... काहीही अदृश्य नाही. हा कुणा दुसर्‍याचा अनुभव नाही... ही माझी अनुभूती!
त्याचं प्रेम वाहून आणणारे वारे, त्याच्याच प्रेम-गंधाने कोंदून गेलेला आसमंत.... हे माझं त्या क्षणाचं सत्य.... आत-बाहेर त्या एकाच सत्याचा वास!
वेडे, हे क्षणिक नाही.... हेच सत्य स्थळ-काळाच्या कक्षांचा भेद करून आपल्यासाठी चिरंतन होऊन उभं आहे.... हा विश्वास माझ्यातल्या ’मी’ इतका मला खरा, जिवंत वाटला..... तेव्हा.....

रवीभैय्यांची बोटं त्याच कृपेची तार छेडत होती....
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना.....

सुरांना शब्दांचा धुमारा फुटला आणि मला हुंदका....
सारा आसमंत गाढ झोपेत असतो तेव्हा फुलून येण्यासाठी कळ्या जागतात ना? आपणहून, अधीर होऊन...
मी उगवलोय असं ना सूर्य सांगत अन, हे माझ्याच चांदण्याचे शैत्य असा चंद्राचाही दावा नाही.... घरातल्या कोनाड्यात किंवा तुळशीपाशी ठेवल्या दिवलीची ज्योत जळिताच्या पहिल्या क्षणापासून आनंदाने लवलवते..... आपल्यापरीने आस-पास उजळते....

रात्रभर रितं रितं, अस्वस्थ झालेलं मन एका दाट समाधानाने, विश्वासाने भरून आलं..... त्याच्या कृपेची सामक्षा याहून वेगळी ती कोणती?
मनोमन हात जोडत,
’माझ्या सार्‍या पौर्णिमा तुलाच वाहण्याची निर्लेप बुद्धी दे,
तुझे गीत गाण्यासाठीच सूर लागू दे रे’........
असं म्हणून माझ्या तान्ह्याकडे धावले.... अपार निष्काम मायेने!
******************************************************************************
(जुन्या मायबोलीवर हा लेख ललित म्हणून पूर्ब प्रकाशित आहे. सिडनीतल्या आमच्या सतारियाला खूप गळ घालून झाली, की बाबा, दे नं... हे गाणं सतारीवर वाजवून... तेव्हढ्यासाठी तटले होते. ते जमत नाही म्हटल्यावर लेख गानभुली म्हणून पुन्हा देतेय.)

माझ्या अनेक आवडत्या गीतांमधलं हे एक. आजूबाजूला चाललेल्या अनेक निरर्थक गोष्टींमध्ये जेव्हा मी ओढली जाते आणि ’कामापेक्षा मगजमारी जास्तं’ असलं काहीतरी घडत, घडवत रहाण्याची जबरदस्ती होत रहाते, तेव्हा उबून जातो जीव... त्या तसल्या क्षणांसाठी मनात कायम ताजं ठेवलेलं हे गाणं. कोणत्याही क्षणी चिकारीवरची एकतारीची ’दिडदा दिडदा’ मनात सुरू करायची की आपोआप शब्दांसहीत हे गाणं सकाळच्या वेळी प्राजक्तीवरून टपटपणार्‍या दवासारखं झिरमिळायला लागतं... मनाची माती ओली, सतेज होऊन दरवळते.

बंगाली गीतांना असलेला एकतारी अन नाळ ह्या तालवद्याचा ठेका का कुणास ठाऊक पण आपल्या गावांकडे सकाळी येणार्‍या वासुदेव, पावकांच्या भजनांची आठवण करून देतो, मला. ह्याच ठेक्यात हे गाणं बांधलय.
बाबुजींचे शब्दोच्चार! त्यांच्याकडे त्यांच्या गाण्यांची तालीम घेणारे सांगतात... शुद्धं अन नेमक्या शब्दोच्चारांसाठी त्यांचा किती आग्रहं असतो... नव्हे हट्टं असतो... असायचा.
पण ह्या गीतात शब्दोच्चाराकडे लक्षं पुरवताना, अर्थं अन भाव दाखवण्यावरची त्यांची हुकुमत केवळ अप्रतिम आहे.

शुभ्रं तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा....
इथं ’शुभ्रं’ चा उच्चार स्पष्टं आहे पण आघाती "स्पष्टं" नाही. ’राsssन’वरचं गमक किती सहज!

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारीssss
इथं ती ओळ पुन्हा म्हणण्यापूर्वी दारीssss वरती "ई"कारात झुललेले केशराचे सुर-मोर... केवळ केवळ अप्रतिम.
आणि फुले होण्याआधी कळ्या जागताना... ह्यातल्या ’जा’ वरचा मिंड ऐकताना मान वेळावीत डोळ्यांवरली झोप उडवीत जागणार्‍या टपोर कळ्या डोळ्यांसमोर येतात.

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे... आधीची दोन्ही कडवी चढ्या सुरातली वरच्या सुरांकडे झेपावणारी आहेत. हे कडवं खालच्या सुरांत आहे. त्याचा सुरसमुह खरोखरच निरव शांतता, विझूविझू होत आलेल्या चांदण्या, हलका विंझण असं काहीसं दृश्यमान करतो.
दुसर्‍यांदा म्हटलेल्या ह्याच ओळीत "रात्री" हा शब्दं ते सुरांच्या पट्टीतून बोलण्याच्या पट्टीत उतरवतात. ही एक विलक्षण मोहक लकब होती त्यांची.

’चांदण्यात आनंदाच्या’ आणि ’पौर्णिमा स्वरांची माझ्या’.... दोन्हींनंतर आलाप आहे. ते दोन्ही वगवेगळे आलाप आहेत. हे गाणं गाणारे अनेक जणं एकच आलाप घोटून दोन्ही ठिकाणी टाकतात.
पण बाबुजींचा आलाप असा काही पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्यासारखा तना-मनावर लेप करून रहातो... की, पुढल्या शब्दं-सुरांची अनुभूती स्वसंवेद्यं होऊन जाते.

यशवंत देवांची ही एक अप्रतिम संगीत रचना, जी बाबुजींनी गायलीये. ह्या गाण्यातल्या शब्दांना सूर, ताल, वाद्यांचे तुकडे सगळं इतकं दृश्यमान, जिवंत करतायत की, ते गाणं निव्वळ भावगीत म्हणून ध्वनीमुद्रित असलं तरी, असंच्या असं उचलावं न त्यावर चित्रिकरण करत सुटावं.
ऐकताना मनात पहाट उगवते... बाहेर डोकावलो तर वासुदेव किंवा एखादा फकीर गात जाताना दिसेलही... भिक्षेची अपेक्षाही नसलेला... आपल्याच तारेत.
आपणही एखादी एकतारी घेऊन सूर लावावा... उठून त्या सूराच्या मागे जात रहावं असं वाटतं.... हे मनातलं गाणं संपतच नाही.... पुढल्या अख्ख्या दिवसाची एक अखंड पूजा होऊन जाते.

पाडगावकरांचे शब्दं, बाबुजींचे सूर अन "त्या"ची कृपा... इतकी सुंदर प्रार्थना अनुभवण्याचं नशीब भाळी लिहिण्याबद्दल किती म्हणून देवाचे आभार मानावेत.
समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

किती सुरेख लिहिलयस ! माझं ही अतिशय आवडतं गाणं
अत्ता प्रत्यक्ष न ऐकता सुद्धा वाचून ऐकल हे गाणं Happy

कसलं लिहिलंय , अहाच!!!

पण आमच्याकडे शब्ददुर्भिक्ष इतकं आहे , कि इतक्या सुंदर मुक्तकाला, तितकीच संपर्पक "दाद" इच्छा असूनही देता येत नाही

मग उगाच चान, चान . सुंदर . __/\__ हे असले त्याच त्याच छापाचे प्रतिसाद द्यावे लागतात .

प्लीज आम्हाला , म्हणजे मला त्यासाठी माफ कर Happy

काही स्वर, सूर आणि शब्द काळजामधे कळ उमटवतात..... ती कधी दुखा:मुळे वेदनेने उठते तर कधी सुखामुळेही..... ती कळ व त्याचबरोबर उमटणार्‍या तरल विचारांचे आवर्त शब्दबद्ध करण्याचे शिवधनुष्य लीलया (सातत्याने व वारंवार) पेलण्याकरता देवाने जे देणे आपल्याला दिले आहे त्या देण्याला साष्टांग प्रणिपात.... हे देणे म्हणजे आपल्या अंतर्यामी तेवत असलेली एक स्निग्ध ज्योतच जणू.... ह्या ज्योतीच्या प्रकाशात आम्ही एरवी ऐकलेली गाणी आम्हाला नीटपणे उमगतात व वेगळीच भासतात. आपल्या अंतर्यामीची ती ज्योत कधीच विझू नये म्हणून देवाकडे प्रार्थना....

दाद! सुरेख!! Happy
माझेही अत्यंत अत्यंत आवडते गाणे! कित्ती दिवसांनी आज परत 'अनुभवले'! अगदी नकळत्या वयापासूनच ह्या गाण्याचे मनावर पडलेले गारूड..... अर्थात, त्यातल्या सूरांच्या जादूची समज नव्हती... आजही नाहीच. पण मोहिनी पडली त्यातल्या शब्द-अर्थाची. त्यामागचा भाव असाच हळूहळू उलगडत गेला.....
शास्त्रातील घटपटादि रूक्ष चर्चेऐवजी ह्या काव्यातील भावामुळेच "सार्‍या पौर्णिमा 'त्या'लाच वाहण्यामागचा समर्पणभाव जाणवला. आणि ईशोपनिषदातले "त्यक्तेन भुन्जीथा" असे सुंदर होऊन सामोरे आले!! Happy
'निष्काम कर्मयोग' म्हणजे काही शुष्क-निष्फळ असा नीरसच असायला हवा असे नाही! उलट सगळा "त्यानेच स्वश्रीहस्ते घडवलेला "सौंदर्याचा सोहळाच!!" तो त्याच्यासाठीच जगतांना, त्यालाच अर्पण केला, की उरतात फक्त "आनंदाचे डोही - आनंदतरंग! "
छान मांडले आहेस दाद!!
सध्याच्या ’कामापेक्षा मगजमारी जास्तं’ अश्या अस्वस्थ काळात तुझी ही त्या गाण्यातले सूर-आलापही उलगडणारी भेट, हे दुधात केशरच!
खरंच, 'त्या'च्यासह तुझेही आभार!!!

आहाहा ! काय सुरेख लिहिलय्स !
>>>आजूबाजूला जे सुंदर दिसतय ते मोह-माया म्हणून का नाकारायचं? ....
आणि..... सर्रकन काटा आला अंगावर ( अगदी वाचतानाही आमच्याही अंगावर असाव सर्रकन काटा आला )....
हे असं जडाचं अस्तित्वं, त्याची पंच इंद्रीय आणि त्यांचे भास या सार्‍याला चेतस देणारे कसे हे शब्द, कसे हे सूर........
आई-बापाच्या कुशीत हिंदकळणार्‍या लहानग्यासारखं मन निवांत झालं.
मग असंच का असू नये प्रत्येक काम? ....
रात्रभर रितं रितं, अस्वस्थ झालेलं मन एका दाट समाधानाने, विश्वासाने भरून आलं..... <<< क्या बात है!
दुसरा भाग वाचताना सारं सारं गाणं मनात वाजत गेलं... अगदी हूबेहूब वर्णन; तेही संगीताचं कसं जमतं तुला Happy
धन्यवाद ! धन्यवाद !! धन्यवाद !!!

आहाहा!
दाद, शतशः आभारी आहे ह्या सुंदर लेखासाठी.

>पूजा केल्यासारखं असावं की प्रत्येक काम, प्रत्येक कर्म. पूजेत वाहण्यासाठी खुडलेल्या कोणत्या फुलात आपला >जीव अडकतो? कोणती कळी आपण हुंगतो? कोणता प्रसादाचा पदार्थ आपण नैवेद्य दाखवण्याआधीच चाखतो?
>... हं हे "मी" खुडलेलं फूल, हा "मी" खपून शिजवलेला, दाखवलेला नैवेद्य, बरं का.... ही आत्ता म्हटली ती "मी" >म्हटलेली आरती.... अशी नसते ना पूजा!
>ह्या ’मी’ चा स्पर्श नसलेली निष्काम नसते का पूजा? मग असंच का असू नये प्रत्येक काम?

क्या बात है!
हर्पेन ह्यांच्या प्रतिसादाशी अक्षरशः सहमत आहे.

मी जितके वेळा वाचतो तितके वेळा इथे खूपवेळ रेंगाळतो.
>>सुरांना शब्दांचा धुमारा फुटला आणि मला हुंदका.... <<

या गाण्याचे सुघड शब्द, तो स्वर्गिय स्वरसाज आणि हा तुझा अलवार लेख सारं कसं अंतरंग निववून टाकणारं आहे...
.... त्याच्या कृपेची सामक्षा याहून वेगळी ती कोणती?
मनोमन हात जोडत, >>>> _______/\_______

हर्पेन यांनी जणू सर्वांचे हृदगतच अशक्य शब्दात व्यक्त केलंय.....

सारं सारं भावलं... अगदी आतपर्यंत पोहोचंल... अध्यात्मिक साधनेच्या दोलायमान अवस्थेतून जात असताना हे असलं काही भेटणं, ते इतक्या संवेदनशील रितीनं झिरपून घेऊन उमटलंच शब्दांत तर हे असंच असणार.. अगदी असंच!
काही गाणी अशी थांबलेली असतात एखाद्या वळणावर... फक्त ती भिनून घ्यायला असं तुमच्यासारखं सर्जनशील मन हवंच. हेही तितकंच भाग्याचं आमच्यासाठी की ते पोहोचवणारे शब्दसामर्थ्यही उदंड लाभलंय तुम्हाला.
खरोखर हाही अनुभव इतका उत्कट सुरेख उतरवला आहात दाद, की खरंच सर्रकन काटा आल्याशिवाय राहिलाच नाही.
एकदा वाचून थांबण्याची जागाच नाही ही... पुन्हा पुन्हा येत राहणार इथे...

मन कधीच त्या सुंदर यात्रेला निघाले होते..>>>

अगदी अगदी. आम्हाला वाचताना ती अनुभूती आली.... बाप रे ! कसलं लिखाण आहे.

पण आमच्याकडे शब्ददुर्भिक्ष इतकं आहे , कि इतक्या सुंदर मुक्तकाला, तितकीच समर्पक "दाद" इच्छा असूनही देता येत नाही

मग उगाच छान छान . सुंदर . __/\__ हे असले त्याच त्याच छापाचे प्रतिसाद द्यावे लागतात .

>>> खरंच दाद... शब्दच नाहीत! Happy

सुंदरच लिहिलेय !
त्या केशराच्या मोरांबरोबर कितीदा झुललो असेन, त्याची गणनाच नाही.

सुरेख!
माझे अतिशय आवडते गाणे! नुसतं मनात हे गाणं वाजायला लागलं की बस्स! आत्तापर्यंत कितीवेळा या गाण्याने मला सावरलयं त्याला गणतीच नाही!

दाद,

सुंदर !

बाबुजींची अनेक गाणी अशी आहेत की ऐकताना तल्लीनता सहज लाभते. हे गाण या अश्या अनेक गीतांच्या मधील एक.

दाद,अश्या अनेक गीतांवर आपली लेखणी चालण्यासाठी आपल्याला सुर सापडुदे !

शलाकाताई, you are blessed! म्हणून गाणं तुम्हाला असं शोधत येतं. तुमचा अनुभव वाचकाला समृद्ध करतो. अशीच कृपा असू द्या. Happy

दाद, आजपर्यंत पाडगांवकरांचे शब्दच जास्त ऐकले होते, आज तू स्वरांची दारे सताड उघडलीस अन त्या सुंदर गीताचा कानाकोपरा उजळून निघाला.

खूप मनस्वीपणे मांडले आहेस रसिकतेने जगण्यातले शल्य.. ही सारी माया कशी जर अस्तित्वच या उत्कट अनुभवांचे बनले आहे ?!

आपल्यासारख्यांसाठी हा 'चिद्विलास !' ज्ञानेश्वरांनी प्रतिपादलेला अन या गीतकाराने इतक्या साधेपणात श्रीमंतीने आपल्यापर्यंत पोचवलेला.

वाह वाह...फारच सुंदर...

एक फक्त विनंती आहे...आपल्या लिखाणात त्या निळ्या पिवळ्या बाहुल्या नसल्या तरी चालतील...आपल्या लेखणीची ताकदच इतकी जबरदस्त आहे कि वाचकांपर्यंत आपल्या भावना पोहोचतातच...त्यासाठी बाहुल्यांची गरज लागतच नाही... कृपया गैरसमज नसावा...

दाद....

गीतातील नेमका भाव तुम्ही अधोरेखीत करीत आहात तो "...इतकी सुंदर प्रार्थना अनुभवण्याचं नशीब भाळी लिहिण्याबद्दल...." या कबुलीद्वारा. खरंय, काही प्रार्थना आपल्या ओठी येवोत ना येवोत, ते भाग्य येईलच याची खात्री नाही. पण काही अशाही असतात की ज्या केवळ ऐकण्यासाठीही भाग्य लागते. गोव्यात मंगेशीच्या देवालयात ध्यानीमनी नसताना एकदा पहाटे तेथील एक कोकणी प्रार्थना....जे एक जोडपे अत्यंत तन्मयतेने गात होते....कानी पडले. एकही शब्द कळला नाही, पण विशेषतः त्या पुरुषाच्या तोंडून ज्या नम्रतेने मंगेशीचे गुणगाण बाहेर पडत होते तेव्हा जाणवले की भाव समजला तरी पुष्कळ....शब्द दुय्यमच तसे.

"तुझे गीत गाण्यासाठी...." ची नाळच मुळात भक्तीरसाची असल्याने बाबुजींचा आवाज काय, मंगेश पाडगावकरांचे शब्द काय किंवा यशवंत देवांचे संगीत काय... या तिघांचीही लय विनीत झालेली दिसते ती त्या अनंतनायकापुढे.

ज्या रागात हे गाणे बांधले आहे तो राग "भीमपलास". भक्ती, शृंगार आणि विरह भावनेच्या छ्टा दर्शविण्यासाठी हा राग उपयोगात आणला जातो. या नीतांतसुंदर गाण्याच्या सोबतीने तुम्ही जर कधी लताचे 'मेरा साया' मधील 'नैनो मे बदरा छाये" तसेच रफी यानी गायिलेले "मैने चांद सितारोंकी तमन्ना की थी...." हे "चन्द्रकांता' मधील गाणे ऐकले तर तुम्हाला 'तुझे गीत...' आणि या दोन गाण्यांतील भक्तीरस किती साम्याचा आहे हे जाणवेल.

एक सुंदर अनुभव तितक्याच सुंदरतेने तुम्ही शब्दबद्ध केला आहे.

अशोक पाटील

कसलं जबरदस्त, जुन्या मराठी गाण्यांचा भरगच्च संग्रह आहे माझ्याकडे, बाबुजींची जवळपास सगळी गाणी आहेत त्यात. प्रवासात वगैरे ऐकण्यासाठी खास तयार केलेल्या प्ले लिस्ट मधे हे गाणं पहीलंच आहे.
ज्या काही भावना दाटतात त्यांना शब्दबध्द केल्याबद्दल धन्यवाद दाद

अवांतर : गाण्यावरून आठवलं, दाद तुमचा जुन्या मायबोलीवरचा एक गायन कार्यक्रमावरचा अचाट विनोदी लेख आहे, त्याला जरा पुनर्जन्म द्या की.

खरच खुप सुरेख गाणं आहे ते आणि आपण लेखही फार छान लिहिलाय. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे तेव्हढंच म्हणायला प्रचंड अवघड. (निदान सर्वसामान्य जनतेला तरी)
बाबूजींनी ईतक्या सहजतेने, साधे पणाने आणि भाव ओतून म्हणलं आहे कि त्याला तोडच नाही. शब्द लिहिणारे, चाल देणारे आणि सूर गूंफणारे ह्यांच्यासाठी त्यांची कला म्हणजेच धर्म आहे असं ऐकताना वाटतं.

खूप खूप मनापासून धन्यवाद. सगळे प्रतिसाद वाचले. खरतर प्रत्येक प्रतिसादाला खास उत्तर देण्याइतके ते वेगळे आहेत... अगदी आतूल आलेले, आवर्जून, वेळ घेऊन लिहिलेले.
कुणीतरी म्हटलय की " I am blessed". खरच. I am loved, also.
तुमच्या प्रेमाचं ऋण मनसोक्तंपणे वाहणार आहे... आनंद आहे.

Pages