गानभुली - तुझे गीत गाण्यासाठी

Submitted by दाद on 13 December, 2012 - 23:22

http://www.youtube.com/watch?v=y4lznz6E8oo&feature=related

शुक्रवारी रात्री त्या प्रवचनाहून परत येताना कुणीच काही बोलत नव्हतं. स्वामीजी विषयातले पारंगत. अधिकारवाणीने बोलत होते. सुघड मुद्रेवर तेज होतं. वचनं, प्रमाणं, श्लोक, अभंग चपखल सुचत होते. मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी.... भाषांवर प्रभुत्व होतं.
विषय तसा कठिण. गीतेतील कर्मसंन्यासाची व्याख्या. पण मांडणी भुरळ पाडणारी, कन्व्हिन्सिंग म्हणतात ना, तशी.... तळहातावरील रेषेसारखे स्वच्छ, या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखे सोहोपे करून सांगत होते.....
पण......
निखळ कर्मसंन्यास कसा, कर्मसंन्यासी व्यक्तीचं वागणं कसं, बोलणं कसं हे सारं सागताना, कर्मसंन्यास त्यांनी शुद्ध कर्म-सन्यास म्हणून सांगितला.
एखाद्या विस्तीर्ण वाळवंटाचं भव्य, एकांडं, अन अतिशय विरक्त रूप बघावं अन त्याची भुरळही पडावी असं अवघड होऊन गेलं. आमच्या सारख्या संसारी श्रोत्यांना ह्या मात्रेचा वळसा थोडा जास्तच लागला!

परतताना, नवरा आपल्याच विचारात गाडी चालवत होता, माझीही तीच अवस्था होती. इतरवेळी काहीनाकाही बोलून खुलवणारे रवीभैय्यासुद्धा गप्प होते. नाही म्हणजे त्यांची बोटं गुढग्यावर तबला वाजवत असतात. ते ही आपल्याच विचारात खिडकीबाहेर बघत होते. आमच्या ब्लॉकपाशी आलो आणि रवीभैय्या नुसताच हात हलवून वरच्या जिन्याकडे वळले.

जितके टाळावेत तितके तेच तेच फकिरी विचार तरंगत राहिले. सकाळी लवकर उठून नवरा चार आठवड्यांच्या टूरवर जाणार होता.
’श्शी... भेटणार नाहियेस आता तब्बल चार आठवडे...’ असलं काही बोलण्याऐवजी नुसतेच छताकडे बघत झोपी गेलो दोघेही. अशी ओढ.... ह्याला मोह म्हणायचं का? असलं काहीतरी पुन्हा पुन्हा ठसकत राहिलं मनाच्या कोपर्‍यात, त्याच्याही अन माझ्याही.

आजूबाजूला जे सुंदर दिसतय ते मोह-माया म्हणून का नाकारायचं?
माझ्या सख्याच्या छातीवर माथा टेकला की ऐकू येणारी स्पंदनं अन त्याने मला झालेलं सुख, माझ्या लेकराच्या जावळाचा गंध, त्याच्या इवल्या बोटांनी माझं बोट घट्ट धरून टाकलेलं पहिलं पाऊल, मित्र-मैत्रिणी, सखे-सहोदर, त्यांची आपल्याला अन आपली त्यांना वाटणारी काळजी, वाटून घेतलेले सुख दु:खाचे प्रसंग, प्रेमाने जोडलेली घरची-माहेरची माणसं, त्यांच्यावर जडलेला जीव.... हे सगळं मोह, माया म्हणून त्याज्यं? असं पायाखालची स्वस्थं जमीन काढून घेऊन तापल्या भांगरावर चालण्याचा अट्टाहास का?

फकिरांना सुखं, दु:खं नसतं का? संन्यासी कशाने सुखावतो, कशाने दुखावतो? संन्याशाचे आई-वडील... त्यांना दु:ख कसलं असेल, आनंद कशाचा होतो? हे आत्ता आपण विचार करतोय ते तरी किती सुसंगत आहे? हे ही कळत होतच.

काय आहे आणि काय नाही.... नुसतेच कालवलेले विचार.... आतून उलटं पालटं करीत रात्रं कशी सरली कळलच नाही. पहाटे चार वाजताच, नुसतच ’हो हो’... ’नाही नाही’... इतकच बोलत, आपल्याच विचारात नवर्‍यानेही घर सोडलं. मग अधिकच भरून आलं.
नुसतंच आतून रिकामी वाटण्याची ही पहिली वेळ नाही.... पण ते रिकामीपण असं निष्फळतेनं भरलेलं.... असं पहिल्यांदाच अनुभवलं. एका गूढ निष्क्रीय अवस्थेत बसून राहिले बाल्कनीत येऊन.

कृतकृत्य होऊन मावळतीला झुकला चंद्र, झाडांची हलकी सळसळ, पहाटेचा उत्सुक वारा.... ह्यातलं काहीच जाणवत नव्हतं. जणू आतल्या कालव्याने नेहमीच्या सजग संवेदनाही बोथटल्या होत्या.....
तरीही, वरती रवीभैय्यांच्या ब्लॉकमधून त्यांच्या रियाजाची तयारी सुरू झाल्याचं कळत होतं. तानपुरा लागला होता... पण तेही सुखदायी होईना. रवीभैय्यांनी तरफेच्या तारा छेडल्या आणि समोरचा काळोख अधिकच गडद झाला. जोगिया......
अतीव एकलेपण. विलक्षण रितं, अपूर्ण, असहाय्य करणार्‍या जोगियाची आलापी. एक एक स्वर, एक एक तार माझं उरलं सुरलं "असलेपण" निचोडून काढत होती.... रितं रितं करीत सुटली.....

ते सहन न होऊन मी उठणार इतक्यात का कुणास ठाऊक पण, रवीभैय्या अर्ध्या तानेतच तटकन थांबले......
चिकारीच्या तारेचा एकतारी सारखा वापर करीत त्यांनी नुसताच ताल धरला....

झाकोळून आलेल्या मनाने कान टवकारले.... किलकिलं झालं, सजग झालं.

रवीभैय्यांनी एकच ओळ छेडली.... तुझे गीत गाण्यासाठी.... सूर लागू दे... रे......
परत एकदा छेडली.....
तिन्ही लोक आनंदाने भरुन वाहू दे रे.... तुझे गीत गाण्यासाठी.....!

आणि..... सर्रकन काटा आला अंगावर.

पाडगावकरांचे शब्द... अमृताची झड होऊन रवीभैय्यांच्या सतारीतून झरू लागले.
तरफेच्या तारा अजून जोगियात लागलेल्या होत्या.... पण त्यातलेही काही सूर होतेच की ह्या ही गाण्यात..... त्या तारा झिणझिणत राहिल्या, इतर जोगियाच्या तारांचं न ऐकता....... तुझे गीत गाण्यासाठी....

शुभ्र तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा....
या सुंदर यात्रेसाठी....

मन कधीच त्या सुंदर यात्रेला निघाले होते.... हे असं जडाचं अस्तित्वं, त्याची पंच इंद्रीय आणि त्यांचे भास या सार्‍याला चेतस देणारे कसे हे शब्द, कसे हे सूर....

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारी....
झर्‍यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी......
सोहळ्यात सौंदर्याच्या... तुला पाहूदे रे...

ह्या इथे माझ्यासमोर माझ्यासाठी सतारच बोलत होती...
सभोवतालच्या सार्‍या सौंदर्याच्या सोहळ्याचा तोच एक निरंतर साक्षीदार नव्हता का? आपल्या आयुष्यातल्या सार्‍याच सोहळ्याचा तो नाही तर दुसरा कोण साक्षीदार? किंबहुना त्यानेच स्वश्रीहस्ते घडवलेला प्रत्येक सोहळा नव्हता का? आपण फक्त निमित्तमात्रं नाही का? सार्‍या होण्या न-होण्याचं, सार्‍या असण्या न-असण्याचं कर्तेपण त्याच्याच हातात नाही का?
इतकं स्वत:ला यत्किंचित, लहान करणारे विचार सुरू होऊनही... आई-बापाच्या कुशीत हिंदकळणार्‍या लहानग्यासारखं मन निवांत झालं.

पूजा केल्यासारखं असावं की प्रत्येक काम, प्रत्येक कर्म. पूजेत वाहण्यासाठी खुडलेल्या कोणत्या फुलात आपला जीव अडकतो? कोणती कळी आपण हुंगतो? कोणता प्रसादाचा पदार्थ आपण नैवेद्य दाखवण्याआधीच चाखतो?
... हं हे "मी" खुडलेलं फूल, हा "मी" खपून शिजवलेला, दाखवलेला नैवेद्य, बरं का.... ही आत्ता म्हटली ती "मी" म्हटलेली आरती.... अशी नसते ना पूजा!
ह्या ’मी’ चा स्पर्श नसलेली निष्काम नसते का पूजा? मग असंच का असू नये प्रत्येक काम?

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे....
तुझे प्रेम घेऊन येती गंध-धुंद वारे...
चांदण्यात आनंदाच्या...
माझ्या समोरचंच दृश्यपटल होऊन बोलताहेत हे सूर.... सारं काही जसं समोर होतं तस्सं! दृश्यं, प्रत्यक्ष... काहीही अदृश्य नाही. हा कुणा दुसर्‍याचा अनुभव नाही... ही माझी अनुभूती!
त्याचं प्रेम वाहून आणणारे वारे, त्याच्याच प्रेम-गंधाने कोंदून गेलेला आसमंत.... हे माझं त्या क्षणाचं सत्य.... आत-बाहेर त्या एकाच सत्याचा वास!
वेडे, हे क्षणिक नाही.... हेच सत्य स्थळ-काळाच्या कक्षांचा भेद करून आपल्यासाठी चिरंतन होऊन उभं आहे.... हा विश्वास माझ्यातल्या ’मी’ इतका मला खरा, जिवंत वाटला..... तेव्हा.....

रवीभैय्यांची बोटं त्याच कृपेची तार छेडत होती....
एक एक नक्षत्राचा दिवा लागताना
आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना.....

सुरांना शब्दांचा धुमारा फुटला आणि मला हुंदका....
सारा आसमंत गाढ झोपेत असतो तेव्हा फुलून येण्यासाठी कळ्या जागतात ना? आपणहून, अधीर होऊन...
मी उगवलोय असं ना सूर्य सांगत अन, हे माझ्याच चांदण्याचे शैत्य असा चंद्राचाही दावा नाही.... घरातल्या कोनाड्यात किंवा तुळशीपाशी ठेवल्या दिवलीची ज्योत जळिताच्या पहिल्या क्षणापासून आनंदाने लवलवते..... आपल्यापरीने आस-पास उजळते....

रात्रभर रितं रितं, अस्वस्थ झालेलं मन एका दाट समाधानाने, विश्वासाने भरून आलं..... त्याच्या कृपेची सामक्षा याहून वेगळी ती कोणती?
मनोमन हात जोडत,
’माझ्या सार्‍या पौर्णिमा तुलाच वाहण्याची निर्लेप बुद्धी दे,
तुझे गीत गाण्यासाठीच सूर लागू दे रे’........
असं म्हणून माझ्या तान्ह्याकडे धावले.... अपार निष्काम मायेने!
******************************************************************************
(जुन्या मायबोलीवर हा लेख ललित म्हणून पूर्ब प्रकाशित आहे. सिडनीतल्या आमच्या सतारियाला खूप गळ घालून झाली, की बाबा, दे नं... हे गाणं सतारीवर वाजवून... तेव्हढ्यासाठी तटले होते. ते जमत नाही म्हटल्यावर लेख गानभुली म्हणून पुन्हा देतेय.)

माझ्या अनेक आवडत्या गीतांमधलं हे एक. आजूबाजूला चाललेल्या अनेक निरर्थक गोष्टींमध्ये जेव्हा मी ओढली जाते आणि ’कामापेक्षा मगजमारी जास्तं’ असलं काहीतरी घडत, घडवत रहाण्याची जबरदस्ती होत रहाते, तेव्हा उबून जातो जीव... त्या तसल्या क्षणांसाठी मनात कायम ताजं ठेवलेलं हे गाणं. कोणत्याही क्षणी चिकारीवरची एकतारीची ’दिडदा दिडदा’ मनात सुरू करायची की आपोआप शब्दांसहीत हे गाणं सकाळच्या वेळी प्राजक्तीवरून टपटपणार्‍या दवासारखं झिरमिळायला लागतं... मनाची माती ओली, सतेज होऊन दरवळते.

बंगाली गीतांना असलेला एकतारी अन नाळ ह्या तालवद्याचा ठेका का कुणास ठाऊक पण आपल्या गावांकडे सकाळी येणार्‍या वासुदेव, पावकांच्या भजनांची आठवण करून देतो, मला. ह्याच ठेक्यात हे गाणं बांधलय.
बाबुजींचे शब्दोच्चार! त्यांच्याकडे त्यांच्या गाण्यांची तालीम घेणारे सांगतात... शुद्धं अन नेमक्या शब्दोच्चारांसाठी त्यांचा किती आग्रहं असतो... नव्हे हट्टं असतो... असायचा.
पण ह्या गीतात शब्दोच्चाराकडे लक्षं पुरवताना, अर्थं अन भाव दाखवण्यावरची त्यांची हुकुमत केवळ अप्रतिम आहे.

शुभ्रं तुरे माळुन आल्या निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा....
इथं ’शुभ्रं’ चा उच्चार स्पष्टं आहे पण आघाती "स्पष्टं" नाही. ’राsssन’वरचं गमक किती सहज!

मोर केशरांचे झुलती पहाटेस दारीssss
इथं ती ओळ पुन्हा म्हणण्यापूर्वी दारीssss वरती "ई"कारात झुललेले केशराचे सुर-मोर... केवळ केवळ अप्रतिम.
आणि फुले होण्याआधी कळ्या जागताना... ह्यातल्या ’जा’ वरचा मिंड ऐकताना मान वेळावीत डोळ्यांवरली झोप उडवीत जागणार्‍या टपोर कळ्या डोळ्यांसमोर येतात.

शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे... आधीची दोन्ही कडवी चढ्या सुरातली वरच्या सुरांकडे झेपावणारी आहेत. हे कडवं खालच्या सुरांत आहे. त्याचा सुरसमुह खरोखरच निरव शांतता, विझूविझू होत आलेल्या चांदण्या, हलका विंझण असं काहीसं दृश्यमान करतो.
दुसर्‍यांदा म्हटलेल्या ह्याच ओळीत "रात्री" हा शब्दं ते सुरांच्या पट्टीतून बोलण्याच्या पट्टीत उतरवतात. ही एक विलक्षण मोहक लकब होती त्यांची.

’चांदण्यात आनंदाच्या’ आणि ’पौर्णिमा स्वरांची माझ्या’.... दोन्हींनंतर आलाप आहे. ते दोन्ही वगवेगळे आलाप आहेत. हे गाणं गाणारे अनेक जणं एकच आलाप घोटून दोन्ही ठिकाणी टाकतात.
पण बाबुजींचा आलाप असा काही पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्यासारखा तना-मनावर लेप करून रहातो... की, पुढल्या शब्दं-सुरांची अनुभूती स्वसंवेद्यं होऊन जाते.

यशवंत देवांची ही एक अप्रतिम संगीत रचना, जी बाबुजींनी गायलीये. ह्या गाण्यातल्या शब्दांना सूर, ताल, वाद्यांचे तुकडे सगळं इतकं दृश्यमान, जिवंत करतायत की, ते गाणं निव्वळ भावगीत म्हणून ध्वनीमुद्रित असलं तरी, असंच्या असं उचलावं न त्यावर चित्रिकरण करत सुटावं.
ऐकताना मनात पहाट उगवते... बाहेर डोकावलो तर वासुदेव किंवा एखादा फकीर गात जाताना दिसेलही... भिक्षेची अपेक्षाही नसलेला... आपल्याच तारेत.
आपणही एखादी एकतारी घेऊन सूर लावावा... उठून त्या सूराच्या मागे जात रहावं असं वाटतं.... हे मनातलं गाणं संपतच नाही.... पुढल्या अख्ख्या दिवसाची एक अखंड पूजा होऊन जाते.

पाडगावकरांचे शब्दं, बाबुजींचे सूर अन "त्या"ची कृपा... इतकी सुंदर प्रार्थना अनुभवण्याचं नशीब भाळी लिहिण्याबद्दल किती म्हणून देवाचे आभार मानावेत.
समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशोक पाटील-
ह्या गीताचा 'राग भीमपलास' च आहे का?
सुरुवातीच्या सतारीच्या आलापात थोडा कीरवाणीही जाणवतोय
बहुधा, फक्त एकाच रागातलं नसावं हे गाणं. अर्थात, मला फार काही कळत नाही, पण मला तरी तो भीमपलास नाही वाटत.

चैतन्य....

धागा वाचल्यानंतर ते गाणेही मुद्दाम ऐकले आणि सुरवातीला तर मला चक्क 'आसावरी' चा भास झाला होता. पण नंतर 'शुभ्र फुले.....' च्या वेळी बाबुजींचा अवरोह जाणवला आणि मग लक्षात आले की अरे हा तर भीमपलास. प्रतिसाद देण्यापूर्वी या क्षेत्रातील कोल्हापूरातील माझ्या एक तज्ज्ञ मित्राला [जे गांधर्व महाविद्यालयाचे शिक्षकही आहेत] फोनवरून विचारले आणि मगच राग कन्फर्म केला आहे. त्यामुळे त्यात दुमत असणार नाही.

भीमपलास रागातील लताची 'कुछ दिल ने कहा....कुछ भी नही' ही अनुपमा मधील सुंदर रचना 'तुझे गीत गाण्यासाठी...' सोबतीने ऐका. चटकन साम्ये सापडतील.

'किरवाणी' चा तुम्ही केलेला उल्लेखही ठीकच आहे. दोन्ही राग कर्नाटकी शैलीतील असल्याने तसा आभास निर्माण होणे योग्यच. भक्ती, शृंगार रस दर्शविण्यासाठी या दोन्ही रागांचा उपयोग होतो. 'किरवाणी' मधील लाल पत्थर या चित्रपटातील रफीने गायलेले 'गीत गाता हूं मै, गुनगुनाता हूं मै....' जरूर ऐका. त्यावेळी उमजेल की 'गीत गाता...' आणि 'तुझे गीत गाण्यासाठी' मध्ये किती जवळीक वाटते.

असो. आवड असल्याने मीही रागदारीमधील भटक्या मुशाफिर आहे....तज्ज्ञ बिलकुल नाही.

अशोक पाटील

दाद,
जुन्या मायबोलीवर हा लेख वाचल्याचं नक्की आठवतं पण त्यावेळी पसंतीची पावती फाडली होती की नाही ते आठवत नाही. तुम्ही नेहमीच्या, आठवणीतल्या एकेका गाण्याचं निरुपण - शब्द आणि संगीत दोन्ही अंगांनी - करता तेंव्हा होणारा आनंद काही फक्त पुनःप्रत्ययाचा नसतो ; आपल्या लक्षात न आलेली सौंदर्यस्थळं सापडण्याचा असतो. ते, पूर्वी अनेकवेळा ऐकलेलं गाणं, पुन्हा ऐकताना त्याच्या शब्द-सुरावटीच्या जोडीला तुमचे शब्द आठवतात आणि किती सहजपणे तुम्ही तुमच्या वाचकांची आयुष्यं समृद्ध करून जाता याची 'दाद' आभारपूर्वक द्यावीशी वाटते!
तुमच्या निरुपणाला 'कर्म-संन्यास' संकल्पनेची पार्श्वभूमी लाभली आहे. संसारी माणसाला संन्यासाची कल्पना पचवताना जड जातं हे तर खरंच. पण माझ्या मते, निष्काम कर्मयोगाची शिकवण म्हणजे काही संसाराचा त्याग करून वानप्रस्थाश्रमात जाण्याचा आदेश नाही तर संसार-कर्तव्यं पार पाडत असताना, त्यात गरजेपेक्षा जास्त गुंतून न पडण्याची सूचना आहे ; [ रंगूनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा / गुंतूनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मो़कळा अशी ही तारेवरची कसरत आहे] प्रत्येक यशाची पायरी चढताना अहंकाराची लागण होऊ न देण्याची खबरदारी घेण्याची आहे; प्रत्येक सुखाचा आणि सौंदर्याचा अनुभव घेत असताना 'हे सारं क्षणभंगूर आणि अशाश्वत आहे' याची स्वतःला सतत आठवण करून देण्याची आहे. आपण भौतिक अपेक्षा बाळगतो तेंव्हा अपेक्षाभंगाचं दु:ख त्याला चिकटलेलंच असतं आणि त्या दु:खावर औषध नाही, प्रतिबंध एव्हढा एकच इलाज त्यावर असतो, याची जाणीव देणारी आहे. षडरिपुंपासून स्वतःला जपण्याची ही शिकवण आहे. यात खिन्न होण्यासारखं, वैराग्य येण्यासारखं किंवा सौन्दर्याचा / संसारसुखाचा आस्वाद घेताना अपराधी वाटण्यासारखं काही नाही. उलट, हा उपदेश ऐकण्यापूर्वी अर्जुन खिन्न, उदास आणि किंकर्तव्यमूढ झाला होता. त्याला त्याचं प्राप्त कर्तव्य करायला उद्युक्त करण्यासाठी तर भगवंतांनी गीता सांगीतली. 'योगः कर्मसु कौशलम' असं म्हटलं आहे, अर्थात आपापली कर्तव्य-कर्मं कुशलतेनें, तत्परतेने आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्याचा हा उपदेश आहे, असं मला वाटतं.
वार्धक्य, आजार, मृत्यु आणि वियोग म्हणजे मानवी जीवनाचा अविभाज्य आणि अटळ भाग आहे,हे वास्तव राजपुत्र सिद्धार्थापासून लपवलेलं होतं पण जेंव्हा त्याचं दर्शन त्याला झालं तेंव्हा तो पुरता हादरून गेला आणि या सर्व दु:खांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडला. आपण या वास्तवाची जाणीव स्वतःला सतत करून देत रहिलो तर आपल्यावर ती वेळ येणार नाही. हेच कर्मयोग आपल्याला सांगतो ना?

-प्रभाकर [बापू] करंदीकर.

अहाहा...... दाद....... !!!

मायबोलीचे शतशः आभार....!! मायबोलीमुळेच तुझं लिखाण वाचायला, अनुभवायला मिळतंय........ काय लिहितेस गं.... !!!

धन्यवाद अशोक,
खूप छान माहिती दिलीत.
कुछ दिल ने कहा हे ही भीमपलासमधलं आहे ही नवीन माहिती मिळाली.

फार फार भिडलं हे लिखाण मनाला...़काय वाटलं ते व्यक्त करायला खरंच योग्य शब्द सापडत नाहीत....

सगळ्यांचे पुन्हा पुन्हा आभार.
भीमपलास भौतेक... मिश्र भीमपलास म्हणूया Happy
मला स्वतःला काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके सोडल्यास राग ओळखता येत नाहीत. ह्या गाण्याच्याही बाबतीत तो विचार केलाच नाही.
बापू, कर्मयोगाचं सुंदर विवेचन... धन्यवाद.
अशोक पाटील, चैतन्य, बापू... चर्चेमुळे धागा अधिक समृद्धं झालाय असं वाटत नाही?
त्यासाठी ह्या तिघांचेच नाही... पण सगळ्यांचे खूप आभार.
मायबोली, तुझे ऋणी आहोत, बाई.

तुम्ही केलेल्या वर्णनासहित गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं आणि त्या गाण्याची वेगळीच अनुभूती मिळाली. दाद तुमचा हा लेख त्या गाण्याला मिळालेली एक दादच आहे जणू! Happy

फार फार आवडलं हे ललित, शलाका!

इतका उत्कट, सजग अनुभव घेता येणं आणि त्यापुढे जाऊन, तो आपला अनुभव तश्शाच उत्कटतेने इतरांपर्यंत इतक्या सहजतेने पोचवता येणं...

Pages