कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ४ (शेरलॉक होम्स साहसकथा स्वैर अनुवाद)

Submitted by निंबुडा on 12 December, 2012 - 00:45

कॉपर बीचेसचे रहस्य - भाग १
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग २
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ३

"कृपा करून सांगत रहा," होम्स उद्गारला," तुमची ही कथा अतिशयच रंजक आहे." ... इथून पुढे चालू -

"आता मी तुम्हाला अश्या काही अजब घटना सांगणार आहे ज्यांचा माझ्या ह्या कथानकाशी विशेष संबंध असेलसे वाटत नाही व तुम्हाला कदाचित मूळ विषय भरकटल्या सारखेही वाटू शकेल. माझ्या कॉपर बीच येथील वास्तव्याच्या पहिल्याच दिवशी मि. रुकास्टलनी मला स्वयंपाकघराच्या दरवाजाजवळील एका लहानशा आऊटहाऊसकडे नेले. मी आऊटहाऊसच्या जवळ जाताच एका जड साखळदंडाचा आवाज झाला. एखाद्या मोठ्या प्राण्याला जड साखळदंडाने बांधून ठेवले असेल तर तो प्राणी जागेवरून उठल्यावर जसा आवाज होईल तश्या प्रकारचा तो आवाज होता.

"'ह्या इथे पहा!' दोन लाकडी फळकुटांमधल्या फटीतून आत दिसणार्‍या दृश्याकडे माझी नजर वेधून घेत मि. रुकास्टल म्हणाले, 'किती सुंदर आहे नाही हा?'

"मी आत पाहण्याचा प्रयत्न केला असता मला काळोखात चमकणारे दोन डोळे व एक अंधुक आकृती दिसली. तो नक्कीच एखादा हिंस्त्र व महाकाय प्राणी होता.

"'घाबरू नका!', मि. रुकास्टल माझ्या चेहर्‍यावरील घाबरलेले भाव बघून हसत सांगू लागले,'हा कार्लो आहे. माझा पाळीव शिकारी कुत्रा. मी त्याचा नावाचा मालक आहे. प्रत्यक्षात माझा नोकर टोलर वगळता कुणाचीही ह्याच्या जवळही जायची बिशाद नाही. आम्ही त्याला दिवसातून फक्त एकदाच खाऊ घालतो आणि तेही पुरेसे नाही. त्यामुळे तो सदैव भुकेलाच असतो. रात्रीच्या वेळी टोलर त्याला मोकळा सोडतो. अश्या वेळी वाट चुकलेला कुणी वाटसरू ह्याच्या समोर आला तर ह्याच्या पंज्यापासून त्याचे देवच रक्षण करो! तुम्ही सुद्धा रात्री उशीरा चुकूनही घराबाहेर न पडण्याची दक्षता घ्याल तर बरे. तुमचा जीव मोलाचा आहे. नाही का?'

'मि. रुकास्टलनी दिलेला इशारा खोटा नव्हता. कारण दोनच दिवसांनतर एका रात्री दोन वाजता मी माझ्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहत होते. त्या चांदण्या रात्रीत आजूबाजूचा परिसर चांदीसारखा चमचमत होता. दिवसाच्या उजळ उजेडापेक्षाही ते दृश्य मनोरम होते. मी शांतपणे त्या शीतल चांदण्याचा आस्वाद घेत असताना मला अचानक बीच च्या झाडांच्या सावलीत काहीतरी हलताना दिसले. ती धूसर आकृती उजेडात आल्यानंतर मी ते काय आहे ते लागलीच ओळखले. तो तोच भयंकर महाकाय असा कुत्रा होता. एका मोठ्या शिकारी जनावरासारखा त्याचा जबडा वासलेला होता. त्यातून त्याची जीभ बाहेर लोंबत होती. डोळे विखारी होते. तो चांगलाच मजबूत हाडापेराचा होता. गवतातून हळूवार चालीने चालत तो दुसर्‍या बाजूच्या सावलीत दिसेनासा झाला. माझी चांगलीच पाचावर धारण बसली. एका दरोडेखोराला पाहूनही माझी भीतीने इतकी गाळण उडाली नसती.

"आणि आता मी तुम्हाला अजून एक अजब किस्सा सांगणार आहे. तुम्हाला मी आधी सांगितलेच होते की मी माझे सुंदर, लांब केस लंडन मध्ये असतानाच कापून कमी केले होते. ते केस मी आठवण म्हणून माझ्या सामानाच्या पेटीच्या तळाशी एका बटव्यात ठेवून दिले होते. एका रात्री लहान एडवर्ड झोपी गेल्यानंतर मी सहज चाळा म्हणून माझ्या खोलीतील सामानाचे निरिक्षण करण्यास सुरुवात केली. खोलीतील लाकडी कपाटांमध्ये मी माझे लहान सहान सामान भरू लागले. त्या खोलीत एक लहान लाकडी कपाट होते. त्याचे वरचे दोन ड्रॉव्हर्स उघडे व रिकामे होते. तिसरा मात्र कुलूप घालून बंद करण्यात आला होता. वरच्या दोन्ही ड्रॉव्हर्स मध्ये मी माझे जरुरीचे सामन ठेवून दिले. तरीही अजून बर्‍याच सामानाची व्यवस्था लावायची होती. त्यामुळे त्या तिसर्‍या बंदिस्त ड्रॉव्हरवर मी कमालीची उखडले होते. मला असे वाटून गेले की कदाचित नजरचुकीने हा एकच ड्रॉव्हर कुलूपबंद राहून गेला असावा. म्हणून माझ्याकडे असलेल्या किल्ल्यांच्या जुडग्यातून एक किल्ली कुलुपात घालून मी तो ड्रॉव्हर उघडण्याचा प्रयत्न करू लागले. सुदैवाने पहिलीच किल्ली काम करून गेली आणि मला ड्रॉव्हर उघडता आला. त्यात मी जे पाहिले ते पाहून क्षणभर माझाच माझ्यावर विश्वास बसेना. त्यात माझेच कापलेले सोनेरी मुलायम केस होते.

"ते केस हातात घेऊन मी नीट न्याहाळले. तीच झाक, तोच स्पर्श, केसांची जाडीही माझ्या केसांइतकीच! पण ते माझे केस असण्याची शक्यता मी लगेच फेटाळून लावली. माझे केस त्या बंदित ड्रॉव्हर मध्ये कोणी कसे काय ठेवू शकेल? मी थरथरत्या हातांनी माझी सामानाची पेटी उघडली. तळाशी माझे केस सुरक्षित असल्याची खात्री पटल्यानंतर मी केसांचे ते दोन्ही नमुने माझ्या हातांत घेतले. दोन्ही नमुने आश्चर्यकारकरीत्या अगदी सारखे होते. तुमचा ह्यावर विश्वास बसू शकतो का? मी फारच गोंधळून गेले होते. असे कसे होऊ शकेल ह्याचा मला काहीच अंदाज लावता येईना. मी ते केस परत त्याच ड्रॉव्हर मध्ये ठेवून दिले. तो रुकास्टल कुटुंबाने कुलूपबंद केलेला ड्रॉव्हर उघडून मी स्वतःला संकटात तर लोटून घेतले नाही ना ह्या विचाराने माझी झोप उडाली. ह्या घटनेबाबत मी रुकास्टलांकडे अवाक्षरानेही बोलले नाही.

"मि. होम्स, तुम्हाला हे जाणवले असेल की माझी निरीक्षणशक्ती अतिशय चांगली आहे. काही दिवसांतच घराचा संपूर्ण आराखडा माझ्या डोक्यात पक्का झाला. घराची एक अशी बाजू होती जिच्यामध्ये कुणाचेच वास्तव्य नव्हते. त्या दिशेकडे जाणारा दरवाजा टोलरच्या खोलीला लागून होता व तो नेहमी कुलूप लावून बंद करण्यात आला होता. एके दिवशी मी जिन्याने खाली उतरत असताना मि. रुकास्टलना त्या दरवाजातून बाहेर येताना पाहिले. किल्ली त्यांच्या हातात होती. त्यांच्या चेहर्‍यावर मी आधी कधीही न पाहिलेले विचित्र भाव होते. त्यांचे गाल आवेशाने लाल झाले होते. त्यांच्या कपाळावरील शीर रागाने उडत होती. एकंदरीत त्यांच्या चहर्‍यावर एकदम कृद्ध भाव होते. त्यांनी हातातल्या किल्लीने ते दार पूर्ववत बंद केले आणि माझ्याकडे लक्षही न देता आणि अक्षरही न बोलता ते माझ्या बाजूने निघून गेले.

"ह्या घटनेने माझी उत्सुकता चाळवली. त्यामुळे मी सहज हिंडण्यासाठी असे दाखवून बाहेर पडले आणि वळसा घालून घराच्या ह्या गूढ भागाकडे मुद्दाम गेले आणि त्या बाजूच्या खिडक्या न्याहाळू लागले. एका ओळीत चार खिडक्या होत्या, पैकी तीन धूळीने भरलेल्या होत्या व कैक दिवसांत न उघडलेल्या अवस्थेतील वाटत होत्या. चौथीचे दार मात्र थोडेसे किलकिले होते. त्या खिडक्या असलेल्या खोलीत नक्कीच कुणीतरी राहत होते. मी त्या खिडक्यांवर लक्ष ठेवून हिरवळीवर फेरफटका मारताना मि. रुकास्टल तेथे आले. आता त्यांच्या चेहर्‍यावरील मी मागे पाहिलेले कृद्ध भाव जाऊन ते नेहमीच्या हसर्‍या रुपात माझ्यासमोर उभे ठाकले होते.

"'मी मघाशी तुमच्याशी न बोलता बाजूने निघून गेल्याबद्दल मला तुमची क्षमा मागायला हवी, मिस हंटर,' ते खोट्या विनयाने हे म्हणत होते हे तर उघडच होते, 'मी माझ्या व्यवसायासंबंधित विचारांत मश्गूल होतो!'

मला वाईट वाटले नसल्याचे मी त्यांना सांगितले. 'तुमच्या बंगल्यातील काही खोल्या रिकाम्या दिसतात. ते बघा वरच्या एका रिकाम्या खोलीची खिडकी थोडी उघडी आहे.' मी माझे सहज लक्ष तिकडे गेल्याच्या थाटात त्यांना म्हटले.

त्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्यचकित भाव उत्पन्न झाले. थोड्या संशयास्पद नजरेने त्यांनी मला न्याहाळले.

"मला फोटोग्राफी करण्याचा छंद आहे,' ते म्हणाले, 'त्यासाठी लागणारी काळोखी खोली त्या तिथे वर आहे. तुमची नजर भलतीच तेज आहे. तुम्हाला बघून हे कोण ओळखू शकले असते? कोण ओळखू शकले असते?' ते सहज म्हणत असल्यासारखे पुटपुटत होते. पण त्यांचा चेहरा कमालीचा संशयी दिसत होता व त्यांच्या बोलण्यात नेहमीची सहजता नव्हती.

"तर मि. होम्स, मला जेव्हापासून त्या गूढ खोल्यांत काहीतरी रहस्य असल्याचे वाटू लागले होते, तेव्हापासून मी ते रहस्य शोधण्याच्या मागावर होते. फक्त उत्सुकता हे एकच कारण त्यामागे नव्हते, तर ह्या शोधकार्यातून कदाचित काहीतरी चांगले हाती लागेल असे मला वाटत होते. कारण ह्या घरातील एक नोकर ह्या नात्याने ते काम मला माझे कर्तव्यच वाटत होते. आम्हा स्त्रियांना उपजतच एक खास प्रकारची बुद्धी लाभलेली असते, जी आम्हाला बर्‍यावाईट घटनांचे संकेत देत असते. हे असेच काहीतरी होते. त्यामुळे काही का होईना मला त्या बंद दरवाजाच्या पलीकडे एकदा तरी जायचेच होते.

"आणि कालच तशी संधी मला मिळाली. तत्पूर्वी मला तुम्हाला हे सांगावे लागेल की मि. रुकास्टल व्यतिरिक्त टोलर आणि त्याच्या बायकोलाही त्या दरवाजाशी खुडबुड करताना मी पाहिले होते. एकदा तर मी टोलरला एक मोठी काळी कापडी पिशवी त्या दरवाजातून आत नेताना पाहिले होते. हल्ली टोलर जरा जास्तच पिऊ लागला आहे. काल तर तो अतिशय मद्यधुंद अवस्थेत होता. ह्या संधीचा फायदा घेऊन मी जिना चढून वर गेले तर त्या दाराला किल्ली तशीच लटकलेली मला दिसली. मला खात्री होती की टोलर कडून नशेत ती किल्ली चुकून तिथेच राहिली होती. रुकास्टल पती-पत्नी घराच्या खालील भागात होते. त्यांचा मुलगाही त्यांच्याबरोबर असल्याने मला लाभलेली ही सुवर्णसंधीच होती. मी लगेच किल्ली कुलपात फिरवून दार उघडले व चपळाईने आत शिरले.

"आता माझ्यासओर एक लांब बोळकांड होता. बाजूच्या भिंती रंगविहिन होत्या. जमिनीवर गालिचा नव्हता. दुसर्‍या टोकाला तो बोळकांड उजवीकडे वळत होता. ह्या वळणाच्या रस्त्यालगत ओळीत तीन दरवाजे होते. त्यातले पहिला व तिसरा असे दोन दरवाजे उघडे होते. हे दोन्ही दरवाजे ज्या खोलीत उघडत होते त्या खोल्या पूर्णपणे रिकाम्या व कुबट, अंधार्‍या अश्या होत्या. पैकी एका खोलीत एक तर दुसरीत दोन खिडक्या होत्या. त्या खिडक्या धुळीने भरलेल्या होत्या. संध्याकाळचा फिकट संधीप्रकाशही जन्मात आत आला असण्याची शक्यता नव्हती इतक्या त्या खोल्या कोंदट होत्या. मधला दरवाजा मात्र बंद होता. लोखंडाची एक जडशीळ कडी घालून तो बंद करण्यात आला होता. शिवाय वरती एक भलेमोठे लोखंडी कुलूप घालण्यात आले होते. ह्या कुलपाची चावी मात्र माझ्याजवळ नव्हती. ते थोडेसे किलकिले दार असलेली खिडकी ह्याच खोलीची असावी ह्याबाबत माझी खात्री झाली. दरवाजाच्या फटीतून दिसणार्‍या प्रकाशामुळे हे नक्की होते की ही खोली अंधारी नव्हती. त्या खोलीत कुठूनतरी नक्कीच सूर्यप्रकाश पोचत होता. ह्या दरवाजापलीकडे काय रहस्य असेल ह्याचा विचार करीत मी उभी असताना अचानक दरवाजामागे मला पावलांचा आवाज ऐकू आला. त्या बंद दरवाजाआडूनचा जो काही फिकट प्रकाश तिथे होता त्यात मला त्या खोलीतल्या व्यक्तीच्या सावलीची हालचाल दिसली. भीतीची शिरशिरी माझ्या सर्वांगातून लहरत गेली. मी वाघ पाठीमगे लागल्याप्रमाणे घाबरून पळण्यास सुरुवात केली. तो अंधारा बोळकांड पार करून मी दरवाजातून बाहेर आले तो थेट मि. रुकास्टलच्या पुढ्यात येऊन आदळले. ते दरवाजाबाहेर माझी वाट पाहत थांबले होते.

"'ओहो! तर त्या तुम्ही आहात तर', ते हसत उद्गारले, 'दरवाजा उघडा पाहून मला शंका आलीच होती!'

"'मी फारच घाबरलेय', मी अजूनही धापा टाकत होते.

"'कशामुळे इतक्या घाबरला आहात, मिस हंटर?', त्यांनी फारच ममतापूर्ण आणि काळजीच्या स्वरात हा प्रश्न विचारला. पण आता मी त्यांच्या नाटकी ढंगाला चांगलीच ओळखू लागले होते. त्यामुळे त्यांच्या बाबत माझे मन मला पुन्हा सावधानतेचा इशारा देऊ लागले.

"'घराच्या ह्या रिकाम्या भागाकडे जाऊन खरे म्हणजे मी मूर्खपणाच केला. इतका अंधार आहे तिथे की मला धडकीच भरली आणि मी बाहेर पळत आले. खरंच सर्व काही शांत व सुनसान होते तिथे!' मी उत्तरले.

"'फक्त इतकेच?' त्यांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नसावा.

"'का? तुम्हाला काय वाटले?'

"'तुम्हाला काय वाटते? मी हा दरवाजा कुलूप लावून का ठेवत असेन?'

"'ते मला कसे ठाऊक असेल?'

"'ह्या बाबीशी काहीही संबंध नसलेल्या लोकांना ह्या भागापासून दूर ठेवण्याचा उपाय आहे तो! आता कळले?' त्यांचे हास्य अजूनही ओसरले नव्हते.

"'मी तुम्हाला खात्री देते की जरी मला तिथले काहीही कळले असते तरीही...'

"'आता तुम्हाला सर्व कळलेच आहे तर एक सांगून ठेवतो. परत जर का ही लक्ष्मणरेषा ओलांडाल-' ह्या शब्दांसरशी त्यांचा चेहरा राक्षसी व रागीट झाला होता. 'तर तुम्हाला माझ्या त्या शिकारी कुत्र्यासमोर टाकेन.'

"मी इतकी गर्भगळित झाले होते की मला आठवतही नाही की त्यानंतर मी नक्की काय केले...

क्रमशः

कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ५ (अंतिम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users