होतंच ते असं कधी

Submitted by अमेलिया on 12 December, 2012 - 00:07

जुन्या वह्या सापडल्या काही
काही आठवणींच्या वेशीत होत्या
काही अगदीच वय सरलेल्या
कोणे एके काळापासून
जपत आलेल्या
कोणे एके काळच्या मला

पिवळ्या पडलेल्या पानांतून
क्षण ओघळलेच काही बेसावध
असेही काही घडले होते कधी
माझ्या आत
याचे लख्ख पुरावे फेकत माझ्यासमोर
माझ्याच हस्ताक्षरात

ही अशीही मी होते कधी
अन हे असेही उमटले होते काही
मनाच्या गाभ्यात
नि आता तसे राहिले नाहीये काहीच
असे वाटतेय पण..
पटत नाहीये कुठेतरी आत

जुनेच काही शोधू पाहतेय
अस्पष्टश्या ओळींमधून
शब्दांचे अर्थ जे कळतायत आता
तसेच आहेत की
विरून गेलंय त्यांच्यामधलं
ते आभाळलेलं मौन?

लागतंच मग हाताला काही
माझंच माझ्यातलं अनोळखी
उत्खननातल्या अवशेषांसारखं
हवं-नकोच्या पल्याडचं..
करू काय ह्याचं आता
विसरणं शक्यंय का पहिल्यासारखं?

स्वतःलाच भेटणं असं
कुठल्याही बहाण्याशिवाय
अंगावरंच येतं तसं
वाटून जातं राहून राहून
का नाही थांबले मी
होईतो वह्यांची पाने आणखी जीर्ण-जून?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पिवळ्या पडलेल्या पानांतून
क्षण ओघळलेच काही बेसावध
असेही काही घडले होते कधी
माझ्या आत
याचे लख्ख पुरावे फेकत माझ्यासमोर
माझ्याच हस्ताक्षरात>>
खूप आत्मप्रत्ययाचं अमेलिया, तुझं हे मनभावन लेखन मिस केलं होतं.स्वतःलाच सापडण्याचे क्षण आहेत त्यात. ले.शु.

स्वतःलाच भेटणं असं
कुठल्याही बहाण्याशिवाय
अंगावरंच येतं तसं >>>>> फार, फार सुंदर - सगळी कविताच जमून आलीये अगदी........

अमेलिया, वाचून अंगावर काटा आला... किती सारख्याच अनुभवविश्वाच्या आणि त्यात रमण्याच्या त्याच त्या वाटांनी बांधून ठेवलेलं असतं... आपल्यातल्या अनेकांना.

का नाही थांबले मी
होईतो वह्यांची पाने आणखी जीर्ण-जून
....
(का? ते तुझ्या विपूत.)