कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ३ (शेरलॉक होम्स साहसकथा स्वैर अनुवाद)

Submitted by निंबुडा on 10 December, 2012 - 05:42

कॉपर बीचेसचे रहस्य - भाग १
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग २

"तुमच्या बाबतीत जे काही घडले ते आता कृपया तुम्ही आम्हाला सांगा" - होम्स.
... इथून पुढे चालू -

"ते तर मी तुम्हाला सांगेनच परंतु मला हे काम लगेच उरकायला हवे. कारण मि. रुकास्टलना मी दुपारी तीन च्या आत परत येईन असे सांगून निघाले होते. इथे सकाळी मला शहरात एक काम आहे असे कारण मी पुढे केले होते, परंतु अर्थातच ते काम काय ह्याची त्यांना कल्पना नाही."

"आता आम्हाला सर्व काही क्रमवार सांगा, मिस. हंटर" होम्स पाय सैलावत बसून म्हणाला.

"सर्वात प्रथम मला हे कबूल करावे लागेल की मिस्टर आणि मिसेस रुकास्टल ह्या उभयतांकडून मला कोणत्याही प्रकारची वाईट वागणुक मिळालेली नाही. पण तरीही त्यांच्या बाबतीत माझे मन साशंक आहे. त्यांच्या वागण्याची तर्‍हा मला समजतच नाही."

"काय समजत नाही तुम्हाला?"

"त्यांच्या अश्या विचित्र वागण्यामागचे कारण! जेव्हा मी येथे आले तेव्हा मि. रुकास्टल कबूल केल्याप्रमाणे त्यांच्या डॉगकार्ट सकट येथे माझ्यासाठी थांबले होते. मग ते मला त्यांच्या बंगलीवर - कॉपर बीचेसवर - घेऊन गेले. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्यांचा हा छोटासा बंगला खरंच रमणीय प्रदेशात वसलेला आहे. पण आतून तो अजिबात सुंदर नाही. कारण घर म्हणजे एक मोठा चौकोन आहे - ज्याला चुन्याची सफेदी दिली आहे. पण वाईट हवामान व दमटपणामुळे जागोजागी घराचा रंग उडाला आहे. भिंतींना अवकळा आली आहे. घराच्या आजूबाजूला मैदान असून घर तीनही बाजूंनी झाडांनी वेढलेले आहे. चौथ्या बाजुला जरा उताराची मोकळी जागा आहे. ह्याच बाजूला घराचे मुख्य प्रवेशद्वार असून तिथपासून सुमारे शंभर यार्डांवर साऊदम्टन कडे जाणारा महामार्ग आहे. ही घरासमोरची मोकळी जागा घरमालकाची आहे, परंतु तीनही बाजूची झाडे ही, हा भूभाग ज्याच्या मालकीचा आहे, त्याची आहेत. घराच्या दिवाणखान्याच्या बरोब्बर समोर ताम्रवर्णी बीच झाडांचा समूह आहे, ज्यांच्यामुळे ह्या घराचे नाव 'कॉपर बीचेस' दिले गेले आहे.

"तर माझ्या ह्या नव्या मालकाने मला त्याच्या घरापर्यंत आणले व त्याच संध्याकाळी त्यांची पत्नी व त्यांचा लहान मुलगा - एडवर्ड - ह्यांच्याशी ओळख करून दिली. आपण तुमच्या बेकर स्ट्रीट येथल्या घरात बसून चर्चा करताना जी शक्यता गृहीत धरली होती, ती साफ खोटी ठरली. मिसेस रुकास्टल मनोरुग्ण खचितच नाहीत. ती एक शांत व फिकट चेहेर्‍याची स्त्री असून वयाने तिच्या नवर्‍यापेक्षा बरीच लहान असावी. माझ्या अंदाजाप्रमाणे तिने अद्याप तिशीही पार केलेली नसावी. मि. रुकास्टल मात्र नक्कीच पंचेचाळीस पेक्षा जास्त वयाचे आहेत. त्या उभयतांच्या संभाषणावरून मी एकदा ताडले की त्यांच्या लग्नाला सात वर्षे उलटून गेली आहेत. मि. रुकास्टल हे विधूर असून त्यांच्या पूर्वपत्नीपासून त्यांना अ‍ॅलिस हे एकच अपत्य आहे. ही अ‍ॅलिस आता फिलाडेल्फियाला असल्याचे उभयतांनी मला सांगितले. मि. रुकास्टल ह्यांनी मला एकदा खाजगीत सांगितले की सावत्र आईशी कटुता निर्माण झाल्याने अ‍ॅलिस त्यांना सोडून फिलाडेल्फियास निघून गेली. ही मुलगी वीसपेक्षा कमी वयाची असू शकत नव्हती. त्यामुळे तिला तिच्या पित्याच्या ह्या तरुण पत्नीबद्दल संबंध जुळवून घेणे बेरेच अवघड झाले असणार, हे मी समजू शकते.

मिसेस रुकास्टल ह्या मला मनाने तसेच इतरही अंगभूत गुणांच्या बाबतीत अगदीच रंगविहिन असल्यासारख्या वाटत. त्यांच्या बद्दल माझ्या मनात त्यांच्या बाजुने किंवा विरोधात अश्या कुठल्याच प्रकारचे भाव निर्माण होऊ शकले नाहेत. माझ्या दृष्टीने त्या खिजगणतीतही नव्हत्या. हे मात्र प्रकर्षाने जाणवत असे की त्या त्यांच्या पती आणि लहान मुलासाठी सदैव सेवातत्पर असत. त्या दोघांवरही त्या आळीपाळीने लक्ष ठेवून असत की जेणेकरून त्यांना कोणत्या वेळी काय हवे ह्याचे त्यांना भान ठेवता येईल. मि. रुकास्टलही त्यांच्या ह्या पत्नीशी अतिशय नरमाईने व दयाळुपणे वागत असत. ह्या सर्वावरून माझे असे मत बनले होते की दोघेही त्यांच्या संसारात अतिशय आनंदी होते. आणि तरीही पत्नीच्या मनात एखादे सुप्त दु:ख असावे असे मला सतत वाटत होते. बर्‍याचदा त्या गाढ विचारांत गढलेल्या असत आणि अश्या वेळी त्यांच्या चेहर्‍यावर दु:खाची गडद छाया असे. एक-दोनदा मी त्यांना गुपचूप रडतानाही पाहिले आहे. मला वाटले की त्यांच्या लहानग्याच्या दुर्वर्तनामुळे त्या चिंतित असाव्यात. खरोखरंच मी इतका बिघडलेला आणि इतके वाईट वर्तन करणारा लहान मुलगा आजतागायत पाहिलेला नाही. त्याच्या वयाच्या मानाने त्याचे डोके फारच मोठे आहे. त्याला अधूनमधून वेडाचे झटके येत असत. तेव्हा तो अतिशय हिंसक चाळे करीत असे. त्या व्यतिरिक्तचा वेळ तो मंदबुद्धी मुलांसारखा निर्जीव व निरुत्साही असा बसून राहण्यात घालवत असे. त्याच्यापेक्षा अल्प शक्ती असलेल्या किडामुंगी सारख्या कीटकांना त्रास देणे हा त्याचा एकमेव छंद होता. लहान पक्षी, उंदीर, कीटक इत्यादींना पकडण्यात त्याला चांगले कौशल्य अवगत झाले आहे. पण त्याविषयी मी जास्त काही बोलू इच्छित नाही, कारण तसा त्याचा माझ्या ह्या कथेशी काहीच संबंध नाही."

"तुमच्या ह्या तपशीलवार कथनाबद्दल तुमचे आभार, मिस हंटर," मध्येच होम्स उद्गारला," भलेही तुम्हाला हे तपशील महत्वाचे वाटोत न वाटोत!"

"एकही महत्वाचा तपशील न वगळता मी सर्व घटना यथाशक्ती सांगण्याचा प्रयत्न करेन. एक विचित्र गोष्ट जी मला सगळ्यात आधी जाणवली होती ती म्हणजे घरातल्या नोकरांचे अजब तर्‍हेचे वागणे व त्यांचा घरातला वावर. टोलर हा नोकर अतिशय कडक स्वभावाचा आणि असभ्य इसम आहे. त्याचे केस आणि मिश्या करड्या रंगाच्या आहेत. आणि त्याच्या अंगाला कायम दारूचा गलिच्छ वास येत असतो. मी दोन वेळा त्याला पिऊन तर्र झालेल्या अवस्थेत पाहिला आहे. तरीही मि. रुकास्टल ह्या बाबीची नोंदही घेत नाहीत असे एकंदर दिसते. त्याची बायकोही एक ऊंच व करारी स्त्री आहे. तीही जवळपास मिसेस रुकास्टलसारखीच शांत असून तिच्याबद्दल खास भाव निर्माण व्हावेत असे तिच्यात काहीही नाही. इमारतीच्या एका टोकाला असलेल्या माझ्या खोलीत किंवा त्या लहान मुलाच्या खोलीत माझा दिवसाचा बराचसा वेळ जात असल्याने सुदैवाने ह्या अप्रिय जोडप्याबरोबर माझा जास्त संबंध येत नसे, ही समाधानाची बाब आहे.

"कॉपर बीचेस मध्ये आल्यापासून पुढचे दोन दिवस शांततेत गेले. तिसर्‍या दिवशी मिसेस रुकास्टल सकाळच्या न्याहारीनंतर त्यांच्या पतीच्या कानात काहीसे कुजबुजल्या.

"'अरे, हां,' मि. रुकास्टल माझ्याकडे वळून म्हणाले, 'आमच्या खुळापायी तुम्ही तुमचे केस कापून कमी केलेत ह्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, मिस हंटर. मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या व्यक्तिमत्वाला त्यामुळे जराही झळ पोचलेली नाही. आता गडद निळ्या रंगाचा पेहराव तुम्हाला कसा दिसतो ते आम्हाला पहायचे आहे. तुमच्या खोलीत तुमच्या पलंगावर तो झगा ठेवलेला तुम्हाला सापडेल. कृपया तुम्ही तो आता परिधान करावा अशी आमची इच्छा आहे.'

"मला देण्यात आलेला तो झगा एका विशिष्ट निळसर छटेच्या अतिशय ऊंची कापडापासून बनवलेला होता. परंतु कुणीतरी तो आधीच परिधान केल्याच्या खुणा त्यावर स्पष्ट होत्या. मी तो परिधान केल्यानंतर माझ्याकडे पाहून उभयतांनी अत्यंत आनंद झाल्याचे दर्शविणे हे मला अतिशयोक्तीपूर्ण वेडगळपणाचे लक्षण वाटले. दोघेही दिवाणखान्यात माझी वाट पाहत बसले होते. घरासमोरील भागाला समांतर पसरलेला असा हा भला मोठ्ठा दिवाणखाना आहे. ह्या दिवाणखान्याच्या रस्त्याकडील बाजूला तीन मोठ्या खिडक्या असून त्यांतून बाहेरील नजारा स्पष्ट दिसू शकतो. त्यांतील मधल्या खिडकीलगत बाहेरील दृश्य पाठीमागच्या बाजूस येईल अश्या रीतीने एक खुर्ची ठेवण्यात आली होती. मला त्या खुर्चीवर बसण्यास सांगण्यात आले आणि मि. रुकास्टल दिवाणखान्यात इकडून तिकडे फेर्‍या मारत मी ह्या आधी कधीही न ऐकलेल्या एक से एक विनोदी कथा मला सांगू लागले. तुम्ही कल्पना करू शकणार नाही की ते दृश्य इतके मजेशीर होते आणि ते इतके विनोदी ढंगात गोष्ट सांगत होते की मी हसून हसून बेजार झाले. मिसेस रुकास्टलना काडीचीही विनोदबुद्धी नसावी. कारण हा संपूर्ण वेळ त्या मांडीवर हात ठेवून रुक्षपणे व उस्तुकतापूर्ण चेहर्‍याने बसून होत्या. साधारण तासाभराने अचानक मि. रुकास्टलना वाटले की हे आता पुरे झाले व त्यांनी मला मी कपडे बदलून येण्यास सुचविले आणि त्यानंतर लहानग्या एडवर्डकडे लक्ष द्यावे असे सांगितले.

"दोन दिवसांनी अक्षरशः ह्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. मी निळा झगा घालून खिडकीकडे पाठ करून बसणे, त्यांनी मला अशक्य विनोदी गोष्टी सांगणे व हसवणे - सगळे अगदी त्याच क्रमाने पुन्हा घडले. हे सगळे झाल्यानंतर त्यांनी मला एक पुस्तक दिले आणि माझी सावली पुस्तकावर पडणार नाही अश्या बेताने माझी खुर्ची हलवून बसण्यास सांगितले. मी तसे करताच त्या पुस्तकाचे एक पान काढून मला त्यावरील मजकूर वाचण्यास सांगितले. कुठल्याश्या कथेचा तो मधलाच भाग होता. मी थोडी वाक्ये वाचली असतील नसतील तोच अचानक एक वाक्य अर्धवट वाचून होतानाच मला थांबण्यास सांगितले व कपडे बदलून येण्याची आज्ञा केली.

"ह्या अगम्य प्रकाराबद्दल माझी उत्सुकता किती चाळवली गेली असेल ह्याची तुम्ही सहज कल्पना करू शकता, मि. होम्स! माझ्या एक लक्षात आले की माझी खिडकीकडे पाठ असण्याबाबत ते कायम जागरूक असत. त्यामुळे माझ्या पाठीमागे नक्की काय घडतेय ते जाणून घ्यायची अनिवार इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. सुरुवातीला मला ते अशक्य वाटले, पण लवकरच मी त्यावर एक उपाय शोधून काढला. माझ्या सौंदर्य-प्रसाधनांमधला लहान आरसा बर्‍याच दिवसांपासून तुटला होता, त्याचा मी उपयोग करायचे ठरविले. मी माझ्या रुमालात तो आरशाचा तुकडा लपवून ठेवला. पुढच्या वेळी जोरजोरात हसताना मी माझ्या रुमाल माझ्या तोंडापाशी नेला आणि हळूच आरशातून मागचे दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला. पण मागे संशयास्पद असे काहीच दिसले नाही, त्यामुळे मी जरा खट्टु झाले. पहिल्या वेळी तरी तसले काही नसल्याचेच आढळले. पुढच्या वेळेस मात्र खिडकीसमोरील साऊदम्प्टन रोडच्या अलीकडच्या बाजूस उभा असलेला एक दाढीधारी मनुष्य मला दिसला. त्याने राखाडी रंगाचा पेहराव केला होता आणि तो माझ्याच दिशेने पाहत होता. हा रस्ता महामार्ग असल्याने तशी बर्‍याच लोकांची त्यावर वर्दळ असे. पण हा मनुष्य आमच्या घराबाहेरील मोकळ्या जागेला बंदिस्त करण्यासाठी जे कुंपण घातले होते त्याला रेलून उभा होता आणि आमच्या घराच्या खिडकीकडे लक्षपूर्वक पाहत होता. मी रुमाल खाली घेताच मिसेस रुकास्टलची शोधक नजर माझ्यावरच स्थिरावल्याचे मला जाणवले. त्या काही म्हणाल्या नाहीत पण त्यांच्या एकंदर हावभावांवरून मला जाणवले की माझ्या आरशाच्या उपायाचा थांगपत्ता त्यांना लागला असावा. कारण त्या अचानक उठून उभ्या राहिल्या.

"'जेफ्रो," त्या ओरडल्या,"त्या तिथे एक उद्दाम मनुष्य खिडकीबाहेरील रस्त्यावर उभा राहून मिस हंटरकडे पाहतो आहे."

"'तुमचा कोणी मित्र वगैरे?' मि. रुकास्टलनी विचारले.

"'नाही! ह्या भागात मी कोणालाच ओळखत नाही.'

"'किती धीट आहे हा मनुष्य! कृपा करून त्याला इथून निघून जाण्याचा इशारा करून दाखवा.'

"'त्यापेक्षा अश्या लोकांकडे दुर्लक्ष करणेच रास्त होईल!" मी म्हटले.

"नाही नाही. ह्या माणसाला ह्या आधीही आमच्या घराच्या आसपास रेंगाळताना पाहिले आहे. तेव्हा कृपा करून मी सांगितले तसे करा व त्याला त्वरित इथून जायला सांगा.'

"मी तसे करताच मिसेस रुकास्टलनी लागलीच खिडकीचा पडदा ओढून घेतला. ही घटना आजपासून बरोबर आठवड्यापूर्वी घडलेली आहे. त्यानंतर मला पुन्हा त्या खिडकीत बसावे लागले नाही. पुन्हा तो निळा पेहराव करावा लागला नाही की तो मनुष्यही परत तिथे दिसला नाही.'

"कृपा करून सांगत रहा," होम्स उद्गारला," तुमची ही कथा अतिशयच रंजक आहे."

क्रमशः

कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ४
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ५ (अंतिम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users