कॉपर बीचेसचे रहस्य - भाग १ (शेरलॉक होम्स साहसकथा स्वैर अनुवाद)

Submitted by निंबुडा on 6 December, 2012 - 02:28

वसंत ऋतु नुकताच सुरू झाला होता. एका गुलाबी थंडीत सकाळचा नाश्ता नुकताच संपवून मी आणि होम्स बेकर स्ट्रीट वरील आमच्या खोलीत भट्टीची आल्हाददायक ऊब शेकत बसलो होतो. खिडकीसमोरच्या ओळीने पसरलेल्या करड्या रंगाच्या घरांच्या रांगांमधून धुक्याचा एक दाट ढग तरंगत चालला होता. त्याच्या पिवळसर आच्छादनात लपेटलेल्या त्या घरांच्या खिडक्या अंधुक, धुरकट दिसत होत्या. आम्ही नाश्ता केलेल्या मेजावर अजूनही चीनी मातीची भांडी व प्लेट्स इत्यादी सामन तसेच पडले होते. शेरलॉक सकाळपासूनच शांत शांत होता. गेल्या काही दिवसांतल्या वर्तमानपत्रांतले जाहिरातींचे रकाने बारकाईने वाचण्यात तो गढून गेला होता. शेवटी कंटाळून त्याने तो नाद सोडला आणि माझ्या लेखनातील तृटींवर त्याची गाडी घसरली. कडवटपणे त्याने माझ्यावर उपदेशांचा भडीमार चालू केला. मी त्याच्याबरोबर आत्तापर्यंतच्या ज्या ज्या केसेस मध्ये काम केले होते त्या सर्व केसेस चा मी संग्रह केला होता. त्या लिखाणातील त्याला आवडलेला व न आवडलेला भाग ह्यावर आमचे संभाषण चालू होते.

अचानक तो अतीव नैराश्याने म्हणाला, "सर्व गुन्हेगारांनी आपापले उद्योग थांबवलेले दिसतात. आता माझ्या ह्या गुप्तहेरगिरीचेच बघ! सध्या माझ्याकडे फक्त हरवलेल्या शिसपेन्सिली शोधून देणे किंवा तरुण स्त्री शिक्षिकांना त्यांच्या नोकरीबाबतीत सल्ले देणे अश्याच स्वरुपाची कामे येत आहेत. मला वाटते की माझ्या कामाच्या सर्वात खालच्या पातळीला आता मी पोचलो आहे. आजच सकाळी माझ्या नावाने ही चिठ्ठी आली आहे व ह्या केस मध्ये मला काडीचीही रुची वाटत नाहीये. हे घे वाच!" असे म्हणत त्याने एक चुरगळलेला कागद माझ्या पुढ्यात फेकला.

त्या चिठ्ठीवर माँटेग प्लेस येथील पत्ता आणि काल संध्याकाळची तारीख-वेळ नोंदवलेली होती. चिठ्ठीतील मजकूर पुढीलप्रमाणे होता:

माननीय मि. होम्स,

मला चालून आलेली आयाच्या नोकरीची संधी मी स्वीकारावी कि नाही ह्यासंदर्भात मी तुमची भेट घेऊ इच्छिते. तुमची गैरसोय होणार नसेल तर उद्या सकाळी साडे दहा वाजता मी तुम्हास भेटण्यास येईन.

आपली विश्वासू,
व्हायोलेट हंटर

"ह्या स्त्रीला तू ओळखतोस का?" मी विचारले.

"नाही!"

"साडे दहा वाजलेच की!"

"होय, आणि मला वाटते सध्या आपल्या दारावर वाजत असलेली बेल त्या स्त्रीनेच वाजवलेली आहे."

"तुला वाटते त्यापेक्षा ही केस रंजक असू शकण्याची शक्यता आहे. मागे एका केसच्या बाबतीत असेच झाले होते. आपल्याला ती केस साधी-सोपी वाटली होते. पण शेवटी तिचे रुपांतर एका गंभीर तपासात झाले होते. तसेच ह्यावेळेलाही होऊ शकते."

"तसेच होवो! तसेही आपल्याला हवी असणारी व्यक्ती आलीच आहे, तर तिच्याकडूनच काय केस आहे ते आपल्याला कळेल!"

आम्ही असे बोलत होतो तोच एका तरूण स्त्रीने आमच्या खोलीत प्रवेश केला. तिने साधाच पण नेटका पेहराव केला होता. वर्णाने उजळ असणारी ती स्त्री चपळ, हुशार व उत्साहाने सळसळलेली अशी वाटत होती. ह्या जगात स्वतःचे एक निश्चित स्थान बनवायल्या निघालेल्या स्त्रीसारखी ती दृढनिश्चयी वाटत होती.

होम्स ला भेटावयास आलेली मिस. हंटर
Miss Hunter Comes to meet Holmes.jpg

"तुम्हासा तसदी दिल्याबद्दल तुम्ही मला क्षमा कराल, अशी मी आशा करते," तिचे अभिवादन करण्यासाठी उठलेल्या होम्सकडे पाहत तिने म्हटले, "परंतु मला आलेला अनुभव हा फारच विचित्र आहे व माझ्या जवळचे असे माझे कुणीच नाही - ना आई-वडील ना आप्तस्वकीय - की ज्यांचा सल्ला मी ह्याबाबतीत घेऊ शकेन! मला असे वाटले की तुम्हीच ह्यात मला मदत करू शकाल."

"कृपया आसन ग्रहण करा, मिस हंटर. मी तुमच्या कामी येऊ शकलो तर मला आनंदच होईल."

मला समजत होते की आमच्या ह्या पाहुणीच्या वर्तनाने नि भाषणाने होम्स बराच प्रभावित झाला होता. त्याने एकदा तिच्याकडे शोधक नजरेने पाहिले आणि मग तिची कथा ऐकण्यास हाताची बोटे जुळवून आणि सावधचित्त होऊन बसला. तिने सांगायला सुरुवात केली,

"मी गेली पाच वर्षे कर्नल स्पेन्स मन्रो ह्यांच्या कुटुंबात आयाची नोकरी करत आहे. परंतु दोन महिन्यांपूर्वी कर्नल मन्रो ह्यांची अमेरिकेतील नोव्हा स्कॉटिया येथील हेलिफॅक्स येथे बदली झाली व त्यांनी सबंध कुटुंबासकट तेथे स्थलांतर केले. त्यामुळे तेव्हापासून मी नोकरीच्या शोधात आहे. मी स्वतः काही जाहिराती दिल्या व काही जाहिरातींना प्रतिसादही दिले. परंतु सारे प्रयत्न फोल ठरले. सरते शेवटी मी साठवलेला पैसा संपत आला तशी माझी बुद्धी चालेनाशी झाली.

"वेस्ट एंड परिसरात 'वेस्ट अवे' ह्या नावाची आया चे काम करणार्‍या स्त्रियांना रोजगार मिळवून देणारी एक सुप्रसिद्ध एजन्सी आहे. तेथे माझ्यासाठी योग्य अशी नोकरीची संधी पाहण्यासाठी मी आठवड्यातून एकदा भेट देत असे. खरे म्हणजे त्या संस्थेच्या संस्थापकांचे नाव वेस्टअवे आहे व त्यावरूनच संस्थेचे नामकरण करण्यात आलेले आहे, पण तेथील सर्व कारभार मिस. स्टॉपर पाहतात. तेथल्याच एका लहानशा खोलीत त्यांचे कार्यालय आहे. ज्या स्त्रिया नोकरीच्या शोधात आहेत त्यांना बाहेरील प्रतीक्षालयात बसवले जाते. त्यांच्याकडील नोंदवहीतून पाहून त्या उमेदवाराला एक एक करून आत बोलावतात व त्यांच्यासाठी सुयोग्य नोकरीची संधी त्यांच्या नोंदींमध्ये उपलब्ध आहे का ते पाहतात.

"मी शेवटचे तेथे गेले होते तेव्हा नेहमीप्रमाणे मला त्या लहानशा खोलीत बोलावण्यात आले. पण ह्या वेळी मिस. स्टॉपर तेथे एकट्या नव्हत्या. त्यांच्याबरोबर तेथे एक आश्चर्यकारकरीत्या तगडा असलेला पण हसर्‍या चेहर्‍याचा इसम बसला होता. त्याच्या गुबगुबीत चेहर्‍यामुळे त्याच्या हनुवटीवर दोन घड्या पडल्या होत्या. त्याच्या नाकावर घसरलेल्या चष्म्यातून आत शिरणार्‍या प्रत्येक स्त्री उमेदवाराकडे तो टक लावून पाहत होता. मी आत शिरताच त्याने जागच्या जागी उडी मारली व मिस. स्टॉपर कडे वळून तो म्हणाला,

"'ही चालेल! मी ह्यापेक्षा जास्त चांगल्या उमेदवाराची अपेक्षा करू शकत नाही. उत्कृष्ट! छान!'

"तो इसम जरा जास्तच खुशीत व उत्साहात आला होता आणि अत्यानंदात आपले हात एकमेकांवर चोळत होता. त्याला तसे करताना पाहणे फारच मजेशीर वाटत होते.

"'तुम्हाला नोकरीची आवश्यकता आहे असे कळते, मिस!' तो म्हणाला.

"'होय, सर.'

"'आयाची नोकरी?'

"'होय, सर.'

"'तुमची पगाराची अपेक्षा काय आहे?'

"'मी ह्या आधी कर्नल स्पेन्स मन्रो ह्यांच्याकडे काम करत असताना माझा पगार दरमहा चार पाऊंड इतका होता.'

"'ओह...च्च! च्च! हे फारच दयनीय आहे!' असे म्हणून त्याने आपले गुबगुबीत हात निराशेने हवेत झटकले. 'इतक्या सुंदर व कामाला निपुण असलेल्या स्रीला इतका कमी पगार कोणी कसे काय देऊ शकते?' तो रागाने उसळून म्हणाला.

"'तुम्ही समजता किंवा तुम्हाला अपेक्षित आहे त्यापेक्षा माझी योग्यता कदाचित कमी आहे, ' मी उत्तरले, 'मला थोडेसे फ्रेंच व थोडेसे जर्मन येते. संगीत आणि चित्रकला -..'

"'च्च! च्च! ते सर्व नंतरचे मुद्दे आहे. मुद्दा हा आहे की तुम्हाला त्या कुटुंबातील स्त्रीला आणि तिच्या वर्तनाला सांभाळावे लागले होते की नाही? जर तुम्ही तसे केले नसेल आणि फक्त एका लहान मुलाला सांभाळण्याचे काम तुम्हाला देण्यात आलेले असेल तर ते काही तुमच्या योग्यतेचे काम नाही. परंतु जर तुम्ही ते केले असेल तर कुणीही सद्गृहस्थ तुम्हाला तीन आकडी पगारापेक्षा कमी पगार देऊच कसा शकतो? माझ्याकडे तुमचा पगार दरवर्षी शंभर पाऊंड ह्या आकड्याने सुरू होईल.'

"तुम्ही कल्पना करू शकता, मि. होम्स. माझ्यासारख्या पैशाविना असहाय्य मुलीसाठी हा पगार फारच लोभसवाणा होता. तरीही माझा साशंक व प्रश्नांकित चेहरा पाहून त्या सद्गृहस्थाने स्वतःच्या खिशातील पैशाचे पाकीट काढून तीमधील एक नोट माझ्यासमोर धरली.

"'ही माझी पद्धत आहे,' चेहर्‍यावर हसू आणून तो म्हणाला, 'माझ्याकडे कामावर येणार्‍या कुठल्याही स्त्रीला मी आधीच अर्धा पगार देऊन टाकतो. जो त्यांना त्यांच्या प्रवासासाठी व कामाला लागणारे कपडे इ. खरेदी करण्यासाठी उपयोगात आणता येईल.'

"मी इतका उमदा आणि विचारी मनुष्य आजतागायत पाहिला नव्हता. आधीच माझी देणेकर्‍यांची देणी थकली होती. त्यामुळे माझ्यासाठी ही आगाऊ रक्कम स्वीकारणे सोयीचे ठरणार होते. तरीही हे सगळे मला इतके कृत्रिम वाटत होते की मी त्यांना माझा पूर्ण होकार कळविण्याआधी ह्याबाबतीत अजून थोडी माहिती करून घ्यावी अशी इच्छा मला झाली.

"'मला हे सांगू शकाल का, सर की तुम्ही नक्की कुठे राहता?' मी विचारले.

"'हॅम्पशायर. एक सुरेख गावठाण! कॉपर बीचेस, विंचेस्टर च्या एका बाजुला ५ मैलांवर! ही एक खूप छान व रमणीय अशी खेडेगावातली जागा आहे व तितकीच सुरेख माझी जुनी व छोटेखानी बंगली आहे.'

"'आणि मला काय काम करावे लागेल, सर? ते कळल्यास मला जास्त आनंद होईल.'

"'माझा मुलगा! माझा प्रिय सहा वर्षांचा छोटा व बदमाष मुलगा. ओह! आणि तुम्ही त्याला जर का पायातल्या सपातांनी झुरळाला मारताना पाहिले ना तर.... सप! सप! सप! तुमची पापणी लवायच्या आत तीन मेलेली झुरळे! हा हा हा!' हे सांगताना त्याला हसू अनावर झाले होते. डोळ्यांच्या कडांपर्यंत पोचणारे हसू अजिबात न दाबता तो मागे खुर्चीवर रेलला.

"त्या लहानग्याच्या मन रमवण्याच्या ह्या पद्धतीचे मला थोडे आश्चर्य वाटले. पण त्या मनुष्याचे हसू पाहून मला वाटले की ते थट्टा करत असावेत.

"'म्हणजे त्या लहान मुलाला सांभाळणे इतकेच माझे काम आहे ना?'

"'नाही नाही! फक्त तितकेच नाही, मिस. हंटर, त्याव्यतिरिक्त तुम्हाला माझी पत्नी ज्या काही लहान-सहान आज्ञा देईल त्या पाळाव्या लागतील. मला वाटते त्यात तुम्हाला काही आक्षेप नसावा? हुं?'

"'मी तुमच्या कामी येऊ शकले तर मला आनंदच होईल.'

"'छानच! आता हेच बघ. आम्ही लोक कपड्यांच्या बाबतीत जरा चोखंदळ आहोत. पण चोखंदळ असलो तरी मनाने चांगले आहोत. जर एखाद्या वेळी आम्ही तुम्हाला अमुक एक पेहराव कर असे म्हटले तर तुम्हाला त्यात काही वावगे वाटू नये, ही अपेक्षा! हुं?'

"'नाही!', मी थोड्याश्या अविश्वासानेच उत्तर दिले.

"'किंवा मग कधी इथे बस किंवा कधी तिथे बस असे सांगितले तर तुमचा त्याला आक्षेप असता कामा नये.'

"'ठिक आहे.'

"'किंवा मग आम्ही तुम्हाला विनंती करू की तुम्ही आमच्या घरी कामावर रुजू होण्यापूर्वी तुमचे हे अतिशय लांब असलेले केस कापून अगदी छोटे करावेत....' बारीक नजरेने माझ्याकडे पाहत तो माझ्या चेहर्‍यावरचे भाव ताडत होता.

"माझा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. तुम्हाला हे जाणवले असेल माझे केस चांगले भरघोस आणि मऊ-मुलायम व सोनेरी असे आहेत. अश्या विचित्र परिस्थितीत मी त्यांचा त्याग करण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही.

"'माफ करा, श्रीमान, पण हे मी करू शकत नाही.' माझ्या ह्या वाक्यासरशी त्याच्या डोळ्यातले भाव बदललेले मला जाणवले.

"'पण हे खूप महत्वाचे आहे, मिस हंटर. हा माझ्या बायकोचा विचित्र हट्ट आहे. आणि बायकांचा हट्ट ही काय चीज आहे, ते तर तुम्ही जाणतच असाल. बायकोचे हट्ट पुरवले नाहीत तर...! तर मग तुम्ही तुमचे हे लांबसडक केस कापणार नाही म्हणता?'

"'नाही, सर. नक्कीच मी ते करू शकत नाही.' मी ठामपणे उत्तर दिले.

"'आह्ह! ठिक आहे तर. तसे असेल तर प्रश्नच मिटला. मला खेद होतोय. हा एक मुद्दा वगळला तर तुम्ही माझ्या कामासाठी खूप योग्य आहात, मिस हंटर. मिस. स्टॉपर, मला तुमच्याकडील अजून काही मुली पहाव्या लागतील.'

"मिस स्टॉपर आमचे हे संभाषण चालू असेस्तोवर आम्हा दोघांशी अवाक्षरही न बोलता त्यांच्यासमोरील कागदपत्रांमध्ये डोके खुपसून बसल्या होत्या. परंतु त्या इसमाच्या बोलण्यावर त्यांनी माझ्याकडे एकदा रागाने पाहिले. त्यांच्या निराशेने भरलेल्या चेहर्‍यावरूनच मी अंदाज बांधला की मी ही संधी नाकारल्याने त्यांना मिळणार्‍या तगड्या कमिशनला त्यांना मुकावे लागणार होते.

"'तुला अजूनही तुझे नाव आम्ही आमच्याकडील यादीत ठेवावे असे वाटते का?' - मिसेस स्टॉपरनी विचारले.

"'जर का तुम्ही तसे करू शकलात तर उपकार होतील!'

"'तसे पहायला गेले तर असे करणे आमच्यासाठी काहीच फायद्याचे नाही. कारण अश्या प्रकारच्या चांगल्या संधी तू नाकारते आहेस.', त्या फारच कठोरपणे म्हणाल्या, 'ह्या पुढे आम्ही तुझ्यासाठी इतक्या चांगल्या नोकरीच्या संधी शोधाव्यात अशी अपेक्षा ठेवू नकोस. तू आता येऊ शकतेस, मिस. हंटर.' असे म्हणून तिने मेजावरील घंटी वाजवली व पुढच्या मुलीस आत येण्याचे फर्मान सोडले.

"इतके झाल्यानंतर, मि. होम्स, मी आपल्या घरी परत आले. कपाटातील माझी अत्यल्प रक्कम आणि मेजावर पडलेली खूप दिवसांपासूनची थकलेली दोन-तीन बिले पाहून मी स्वतःच्याच मूर्खपणाला दोष देऊ लागले. जरी ह्या लोकांच्या इतक्या वेडगळ व पराकोटीच्या विचित्र अटी असल्या आणि मी त्या पाळाव्या अशी त्यांची न स्वीकारता येण्याजोगी विनंती असली तरी निदान त्यांच्या ह्या वेडेपणासाठी ते तशी रक्कम देऊ करत होते. इंग्लंड मधील फारच थोड्या स्त्रियांना आयाच्या नोकरीतून दरवर्षी शंभर पाऊंड इतके उत्पन्न मिळत होते. तसेच ह्या लांबसडक केसांचा तसाही मला काय मोठा उपयोग होणार होता? कितीतरी लोकांचे व्यक्तिमत्व लहान केसांमुळे बदलून जाते. मग मीही तसा प्रयत्न का करू नये? दुसर्‍या दिवशीपर्यंत मी जवळपास ह्या मताला पोचले होते की ती संधी नाकारून मी खूप मोठी चूक केली आहे. त्यानंतरच्या दिवशी तर माझी खात्रीच झाली होती. मी माझा अहंकार, स्वाभिमान वगैरे बाजुला सारून त्या एजन्सीमध्ये पुन्हा जाऊन ती संधी अजूनही आहे का ते पहायचे ठरविले, तोच त्या सद्गृहस्थांचेच पत्र मला माझ्या पत्त्यावर आले. मी ते सोबत आणले आहे व आता तुम्हाला वाचून दाखवते:

क्रमशः

कॉपर बीचेसचे रहस्य - भाग २
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ३
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ४
कॉपर बीचेसचे रहस्य - भाग ५ (अंतिम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच एक वाईट बातमी समजली.

मनोगत ह्या मराठी साईटवर शेरलॉक होम्स च्या कथांचा अनुवाद टंकणार्‍या अदितीचे दुःखद निधन झाले. Sad

ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.

मनोगतावर वाचलेले तिने केलेले अनुवाद वाचूनच मला शेरलॉक होम्स ह्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली होती. तिच्याशी व्यक्तिगत परिचय नसूनही ही बातमी कळल्यावर धक्का बसला आहे. Sad

छान अनुवाद Happy असाच अनुवाद करत रहा.. माझ्याकडे असलेला इंग्लिश ठोकळा मला वाचवत नाहिये.. तुझ्यामुळे तरी त्या कथा वाचुन होतील Happy

अदितीने केलेले अनुवाद मी वाचले होते.. वाईट बातमी. Sad

ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.

हाय फ्रेन्ड्स. मी नवीन आहे इथे. Happy
निंबुडा, सही झाला आहे अनुवाद. अजून वाचते आहे. पण लगेच सान्गावे वाटले.
सॉरी चुकून चिमुरी लिहीले. तिची कॉमेन्ट वाचली होती ना आधी. थॅन्क्स चिमुरी.

मस्त झालीये सुरवात निंबुडा ... Happy पुढ्चे भाग लवकर येउ देत.

अदिती बद्द्ल वाचुन वाइट वाटले......
ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो.

अमित

प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद. Happy

"मिसेस स्टॉपर आमचे हे संभाषण चालू असेस्तोवर >>>> इथे मिस स्टॉपर अस हवयं ना?
>>>
धन्यवाद, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल. कथेत पाहिले मी. ते मिस स्टॉपर असे हवे आहे. बदल करत आहे.

आज दुसरा भाग टाकतेय.

ही कथा भा. रा. भागवतांनी अनुवादित केलेल्या कथांपैकी आहे. बहुतेक 'ताम्रवर्णी बंगल्याचे रहस्य' असे काहीतरी नाव आहे कथेचे. घरी जाऊन नीट बघून सांगते. उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा' या मालिकेतल्या एका पुस्तकात हा अनुवाद आहे. बहुतेक सहा पुस्तकांचा संच आहे. आणि आता बहुतेक दुसरी आवृत्ती बाजारात आली आहे 'शाबास शेरलॉक होम्स' या नावाने.
सगळंच बहुतेक बहुतेक आहे. घरी जाऊन नीट तपासून सांगते.

येस्स, मंजुडी. मी तुला विपू करणारच होते ह्या बाबतीत. मला आठवते त्याप्रमाणे माझ्या शेरलॉक होम्स च्या धाग्यावर तू शेरलॉक होम्स च्या मराठीतलल्या अनुवादित कथा तुझ्याकडे असल्याचे सांगितले होतेस एका प्रतिसादात. तिथेही तु ह्याच लेखकाचा उल्लेख केला होतास. पण रीसेंटली अजून एका मैत्रिणीकडे हा अनुवाद आहे व लेखकाचे नाव भालबा केळकर असल्याचे कळले. तेव्हा तू तुझ्याकडील कथासंच पाहून कन्फर्म करशील का हेच विचारायला विपू करणार होते. Happy

तिथेही तु ह्याच लेखकाचा उल्लेख केला होतास. >>> तो उल्लेख मी नाही, अनघा दातारांनी केलेला आहे.

हाय! मी नवीनच आहे इथे,आणि पहिलाच दिसला तो होम्स..धन्यवाद निंबुडा..ते लेखक भालबा केळकरच आहेत. आणि या अनुवादित कथेचं नाव 'ताम्रवर्णी बीचवृक्षाच्या छायेत' असं आठवतंय..

निंबुडा...मझ्याकडे शाब्बास शेरलॉक होम्स.... भा. रा. भागवत असा कथासंच आहे. एकुण ५ पुस्तके आहेत. पण मला ३ च मिळाली... next india trip मध्ये बघते पुढची २ मिळाली तर.

धन्यवाद मंजुडी आणि अनघा,
मला कंफ्युजन झाले होते.

पिशी अबोली,

मला नुकतेच कळले की एकापेक्षा जास्त लोकांनी होम्स कथांचे अनुवाद केले आहेत. Happy

तू केलेला अनुवाद वाचताना नव्याने कथा वाचल्यासारखं वाटलं.. >>
धन्यवाद Happy

आज तिसरा भाग टाकलाय. Happy