अ‍ॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ५ (अंतिम) (शेरलॉक होम्स साहसकथा अनुवाद)

Submitted by निंबुडा on 3 December, 2012 - 05:12

अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग १
अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग २
अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ३
अॅबी ग्रेंज प्रकरणाचे रहस्य - भाग ४

इतक्यात खाली जिन्यावर पावलांचा आवाज ऐकू आला.... इथून पुढे चालू -

इतक्यात खाली जिन्यावर पावलांचा आवाज ऐकू आला आणि पाठोपाठ आमच्या खोलीच्या मुख्य दरवाजातून एक उंचपुरा राकट तरुण पुरुष आत आला. त्याच्या मिश्या सोनेरी होत्या, डोळे निळे होते, चेहर्‍याचा वर्ण उष्णकटिबंधीय लोकांप्रमाणे काळवंडल्यासारखा होता. त्याच्या दमदार चालीतून समजून येत होते की तो एक चपळ आणि दणकट इसम होता. आत आल्या आल्या त्याने दरवाजा आतून लावून घेतला व हातांची घडी करून धपापत्या छातीने तो काही क्षण तसाच उभा राहिला. तो त्याच्या भावनांना आवर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होता हे जाणवत होते.

"आसन ग्रहण करा, कप्तान क्रॉकर. तुम्हाला माझी तार मिळाली ना!"

होम्स ला भेटावयास आलेला जॅक क्रॉकर:
Homes, Watson and Crocker_0.jpg

आमचा हा पाहुणा तसाच समोरच्या खुर्चीत कोसळला व प्रश्नार्थक नजरेने आम्हा दोघांकडे पाहू लागला.

"तुमची तार मला मिळाली. तुम्ही त्यात दिलेल्या वेळेप्रमाणेच मी आलो आहे. मी असे ऐकले तुम्ही नौपरिवहन विभागाच्या कार्यालयातही भेट दिलीत. तेव्हा तुम्हाला चकवा देऊन पळून जाण्यात काहीच हशील नव्हता. आता जी काही वाईट बातमी आहे ती वेळ न दवडता मला देऊन टाकाल का? काय करणार आहात तुम्ही माझ्यासोबत? अटक करवणार आहात का मला? कृपया बोला, साहेब. असा उंदीर-मांजराचा खेळ माझ्यासोबत खेळू नका!"

"त्याला एक सिगारेट दे, वॉटसन", होम्स म्हणाला, " कप्तान क्रॉकर, शांत व्हा. असे तुमचे रक्त उसळवून घेऊ नका. कृपया ह्याची खात्री बाळगा की तुम्ही सर्वसामान्य गुन्हेगार असता तर ह्या इथे असा मी तुमच्या सोबत सिगारेट चा आस्वाद घेत बसलो नसतो. कृपया मला सर्व सत्य सांगा आणि त्यावर काय करायचे ते मी पाहिन. पण एक शब्दही खोटा सांगाल किंवा चलाखी करण्याचा प्रयत्न कराल तर माझ्यासारखा वाईट मीच ठरेन!"

"तुमची माझ्याकडून नक्की काय अपेक्षा आहे?"

"मला सत्य वृत्तांत सांगा, श्रीमान. काल अ‍ॅबी ग्रेंज येथल्या हवेलीत जे काय घडले त्याचा साद्यंत व खराखुरा वृत्तांत! लक्षात ठेवा एक शब्द उणा नाही की अधिक नाही. मला आधीच ह्या घटनेसंबंधातले इतके तपशील ठाऊक आहेत की तुम्ही तसूभरही कमी-जास्त सांगितलेत तर ही माझी खुणेशी शिट्टी वाजवून मी पोलिसांना त्वरित पाचारण करू शकतो आणि मग प्रकरण माझ्या हातांत राहणार नाही."

जॅकने एक क्षणभर विचार केला आणि मग आपले हात मांडीवर ठेवून तो निश्चयपूर्वक स्वरात म्हणाला,

"मी तुम्हाला एक संधी देऊ इच्छितो. मला असे वाटतेय की तुम्ही तुमच्या शब्दाला जागणारे इसम आहात, त्यामुळे मी त्या रात्री जे काही घडले ते तुम्हाला खरेखुरे सांगेन. पण तत्पूर्वी माझे काही सांगणे आहे. झाल्या प्रकाराबद्दल माझ्या मनात कुठलीही अपराधी भावना नाही किंवा मला कुणाचेही भय वाटत नाही. मला पुन्हा संधी मिळाली तर हाच गुन्हा पुन्हा करायला मी मागे-पुढे पाहणार नाही व त्या बद्दल मला अभिमानच वाटेल. त्या राक्षसाच्या नशिबात जितक्यांदा जन्म घेणे असेल त्या प्रत्येक जन्मात त्याची गाठ माझ्याशी असेल हे नक्की! पण जेव्हा कुमारी मेरीचा विचार येतो - मला माफ करा मी तिला तिच्या विवाहानंतरच्या त्या अपवित्र नावाने हाक मारू शकत नाही - तेव्हा माझ्या हृदयाचे पाणी पाणी होते. तिच्या प्रिय चेहर्‍यावरच्या एका स्मितासाठी मी माझे सबंध आयुष्य पणाला लावू शकतो. तरीही मी तिच्यासाठी ह्या कृत्याखेरीज दुसरे काय करू शकलो? मी तुम्हाला माझी कथा सांगतो आणि मग तुम्हीच मला सांगा की मी जे केले त्या व्यतिरिक्त किंवा त्यापेक्षा कमी गंभीर असे अजून कोणते कृत्य मी करू शकलो असतो?

"त्यासाठी मला थोडे मागे जावे लागेल. तुम्हाला आता बरेचसे कळले आहे, तेव्हा मी गृहित धरतो की तुम्हाला हे ही माहीत असेल की मी कुमारी मेरी हिला प्रथमतः 'रॉक ऑफ जिब्राल्टर' ह्या जहाजावर अधिकारी म्हणून कार्यरत असताना भेटलो. ती त्या जहाजातील अनेक प्रवाश्यांपैकी एक होती. तिला भेटल्या क्षणापासून ती माझ्या आयुष्यातली एकमेव स्त्री आहे. प्रत्येक दिवसागणिक मी तिच्यावर अधिकच प्रेम करत होतो. कित्यकदा जहाजाच्या ज्या भागांवर तिने पाऊल ठेवले होते तिथल्या जमिनीचे मी रात्रीच्या अंधारात चुंबन घेतले आहे. आम्ही दोघेही कुठल्याही अधिकृत बंधनात नव्हतो. तिने मला कायमच एक शालीन स्त्री एका अनोळखी पुरुषाला जसे वागवेल तसेच वागवले. त्याबाबत माझी कुठलीच तक्रार नाही. हे जे काही प्रेम होते ते माझ्याकडून व एकतर्फी होते. तिच्याकडून कायम हे एक निखळ मैत्रीपूर्ण नाते होते. आम्ही विलग झाल्यानंतर ती एक स्वतंत्र स्त्री होती, परंतु आता मी मात्र स्वतंत्र राहिलो नव्हतो.

"त्यानंतरच्या सागरी सफरीवरून मी परत आलो, तेव्हा मला तिच्या विवाहाची बातमी समजली. तसं बघायला गेलं, तर का करू नये तिने तिला आवडलेल्या व्यक्तीशी लग्न? पैसा आणि प्रतिष्ठा - ह्यांना तिने भूषवावं अशीच ती होती. जगातल्या यच्चयावत सुंदर व रमणीय गोष्टींसाठीच जणु तिचा जन्म झालेला होता. मला तिच्या लग्नाचे कळूनही तिचा मत्सर वगैरे वाटण्याइतपत मी वाईट वा स्वार्थी नव्हतो. उलटपक्षी तिच्या ह्या सौभाग्याबद्दल मला आनंदच वाटला व माझ्यासारख्या निष्कांचन नाविकापेक्षा चांगला जोडीदार तिला मिळाला म्हणून समाधान पावलो. माझे तिच्याविषयीचे प्रेम हे असे होते.

"त्यानंतर तिला परत कधी भेटायला मिळण्याची आशा मी सोडूनच दिली. परंतु त्यानंतर माझी बढती झाली आणि नवीन जहाजाचे उद्घाटन व्हायला अजून बराच अवकाश असल्याने काही महिने मला माझ्या कुटुंबाबरोबर सिडनहॅम येथे राहण्याची संधी मिळाली. एका दिवशी मी शहरात फिरत असताना एका गल्लीत माझी गाठ तिच्या दाईशी - थेरेसा राईटशी पडली. तिने मला मेरी बद्दल, तिच्या नवर्‍याबद्दल आणि एकुणच तिच्या घरच्या परिस्थितीबद्दल इ. सांगितले. मी तुम्हाला सांगतो, श्रीमान, ते नुसते ऐकूनच माझे पित्त खवळले. तो नराधम पशू ज्याची स्वतःचे जोडे चाटायचीही लायकी नव्हती, अश्या इसमाने तिच्यावर हात टाकावा! मग मी थेरेसाची पुन्हा एकदा भेट घेतली. आणि त्यानंतर मेरीची! परंतु एका दिवशी माझ्याकडे बातमी आली की येत्या आठवड्याभरात मला माझ्या नव्या बोटीवर रुजू व्हायचे होते. मग मात्र सफरीवर निघण्यापूर्वी मेरीला एकदा शेवटचे भेटावे असे माझ्या मनाने घेतले. थेरेसाशी माझे सख्य झालेच होते. आणि तिला ही माझ्याइतकाच त्या राक्षसाचा तिटकारा होता. तिच्याकडूनच मला घरातल्यांच्या सवयी, पद्धती कळल्या. मेरी रात्री झोपण्यापूर्वी हवेलीत तळमजल्यावरील तिच्या छोट्याश्या खोलीत वाचन करीत बसत असे. त्या रात्री मी बगीच्यात त्या खोलीजवळ येऊन खिडकीच्या तावदानावर टकटक केली. सुरुवातीला तिने मला कोणताच प्रतिसाद दिला नाही. पण मला कळून चुकले होते की ती ही मनातून माझ्या प्रेमात पडली होती. त्यामुळे त्या रात्रीच्या कुडकुडत्या थंडीत ती मला तसेच बाहेर राहू देणार नाही ह्याची मला खात्री होती. तिने मला वळसा घालून एका मोठ्या खिडकीशी येण्यास कुजबुजत्या स्वरात सांगितले. मी तसे करताच त्या खिडकीचा दरवाजा मी माझ्यासमोर उघडा पाहिला ज्याच्यातून मी थेट भोजनकक्षात प्रवेश करू शकलो. तिच्याकडून मी तिच्या दयनीय कहाणीचा पुनरुच्चार ऐकला, ज्यामुळे माझे रक्त पुन्हा एकदा उसळ्या खाऊ लागले. मी जिच्यावर अतोनात प्रेम करत होतो तिच्याबरोबर असे अत्याचार करीत असलेल्या त्या नराधमाला मी लाखो शिव्या घातल्या. माझा देव साक्षी आहे की अश्या प्रकारचा वार्तालाप करत आम्ही दोघे त्या खिडकीपाशी निरागसपणे उभे होतो आणि त्याच सुमारास तिचा पती वेड्यासारखा धावत तिथे आला. तोंडाने तो तिला अर्वाच्य शिव्या देत होत्या - अश्या शिव्या ज्या एखादा सभ्य पुरुष एका शालीन स्रीला क्वचितच देऊ शकेल. आमच्याजवळ पोचताच त्याने त्याच्या हातातल्या छडीचा जोरदार तडाखा तिच्या चहर्‍यावर दिला. मीही चपळाईने भट्टीशेजारी खोचलेली सळई उचलली. थोडा वेळ आमची तुल्यबळ झटापट झाली. हे बघा, इथे माझ्या हातावर, त्याने माझ्यावर केलेल्या पहिल्या घावाचे व्रण अजूनही आहेत! त्यानंतर मात्र हल्ला करण्याची माझी वेळ होती आणि मी तो एक नासका भोपळा असल्यागत त्याच्यावर वार केले. तुम्हाला काय वाटते? त्याचा खून करून मला पश्चात्ताप झाला? मुळीच नाही. आम्हा दोघांपैकी एकाचाच प्राण वाचू शकणार होता. आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे की हा मेरीच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता. तिला अश्या क्रूस इसमाच्या तावडीत मी परत कसा देऊ शकणार होतो? आणि म्हणूनच मी त्याला ठार मारले. मी चुकीचे केले का? तुम्हा दोघांपैकी कुणीही माझ्या जागी असतात तर तुम्ही काय केले असते?

"काठीचा मार बसताच मेरीने एक किंकाळी फोडली होती. त्या आवाजाने थेरेसा धावत खाली आली. तिथे जवळच एका कपाटात वाईनची बाटली होती. त्यातली थोडी वाईन एका पेल्यात काढून मी भीतीने अर्धमेल्या झालेल्या मेरीच्या ओठांना लावली. मग मी स्वतःसाठीही अजून एका पेल्यात थोडी वाईन काढून ती प्यायली. थेरेसा मात्र बर्फासारखी थंड होती. हा सगळी बनावट कथा मग तिने आणि मीच रचली. आम्हाला असे भासवायचे होते की चोरट्यांनीच हे कृत्य केले. थेरेसा मेरीला ती कथा परत परत सांगत होती. तोपर्यंत मी भट्टीच्या चौकटीवर चढून त्या घंटेचा दोर कापून घेतला. मग मी मेरीला त्या खुर्चीला बांधून टाकले व दुसरे कापलेले टोक ओढून काढल्याचा आभास निर्माण करण्यासाठी चाकूने घासून टाकले. त्यानंतर चोरीचा आभास निर्माण करण्यासाठी मी काही चांदीचे सामान चोरले - जे अर्थात मी पळण्यापूर्वी त्या तलावात फेकून दिले - आणि मी पळून गेल्यानंतर पंधरा मिनिटांनी , म्हणजे मला पोबारा करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाल्यानंतर - आरडा ओरडा करण्याची ताकीद दोघींना दिली. त्यानंतर मी सिडनहॅमला माझ्या घरी परत आलो. पहिल्यांदाच मला आयुष्यात मी काहीतरी चांगले कृत्य केल्याचे समाधान मिळाले होते. असा हा एकंदरीत वृत्तांत आहे, श्री. होम्स! पूर्णपणे खरा वृत्तांत! आता ही जबानी दिल्यामुळे मला फासावर लटकवले गेले तरी बेहत्तर!"

होम्स काही क्षण शांत राहून पाईप ओढत राहिला. मग आपल्या जागेवरून उठून त्या पाहुण्याजवळ येऊन होम्सने त्याच्याशी हस्तांदोलन केले.

"मलाही तसेच वाटते.," होम्स म्हणाला, "मला ठाऊक आहे, की तुम्ही केलेल्या कथनात एक अक्षरही खोटे नाही. कारण मला माहीत नसलेली एकही बाब त्यात नव्हती. इतक्या उंचावरच्या चौकटीवर चढणारी व्यक्ती एक तर नौसेनेत कार्यरत असलेली व्यक्ती असू शकते किंवा मग करामतीचे खेळ करून दाखवणारी कलंदर व्यक्ती. ज्या पद्धतीने खुर्चीला त्या दोराने गाठी मारलेल्या होत्या त्या पद्धतीच्या गाठी केवळ एखादी नाविक व्यवसायातील व्यक्तीच बांधू शकते. माझ्या अंदाजाप्रमाणे मेरी फ्रेझर ह्या फक्त एकदाच अश्या लोकांच्या संपर्कात आल्या असण्याची शक्यता होती - त्यांचा ऑस्ट्रेलिया ते इंग्लंड हा सागरी प्रवास! शिवाय गुन्हेगार व्यक्ती ही नक्की त्यांच्या जिव्हाळ्याची व्यक्तीच असू शकणार होती, त्याशिवाय त्यांनी त्या व्यक्तीचा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला नसता. पाहिलंत? एकदा का मी योग्य दिशेने तपास चालू केला की माझ्यासाठी तुमच्या पर्यंत पोचणे किती सोपे होते?"

"माझा असा अंदाज होता की पोलिसांना आमचा हा खेळ कधीच समजणार नाही." - जॅक त्याच्या स्वरातली निराशा न लपवता उद्गारला.

"पोलिसांना अजूनही ह्याचा पत्ताच नाही आणि खात्री बाळगा त्यांना समजणारही नाही असा माझा अंदाज आहे. आता इकडे बघा, कप्तान क्रॉकर, ही एक गंभीर बाब आहे पण माझा विश्वास पटला आहे की अश्या उत्तेजक क्षणी कुणाच्याही हातून तोच गुन्हा घडला असता. परंतु मला विश्वास वाटत नाही की तुमचे हे कृत्य 'स्वतःचा जीव वाचविण्यासाठी केलेले कृत्य' ह्या न्यायाने कायद्याकडून वैध ठरविले जाईल की नाही. हे सर्व ब्रिटिश कायदेपंडीतांच्या हातात आहे. परंतु हे प्रकरण न्यायदानाच्या पातळीला जाण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या चोवीस तासात तुम्ही भुमिगत होऊ इच्छित असाल तर मी तुम्हाला पूर्णपणे अभय देईन. आणि मी तुम्हाला खात्री देतो की तोपर्यंत तुम्हाला कोणीही अडवणार नाही."

"आणि त्या कालावधीनंतर हे गुपित उघडकीस येईल?"

"नक्कीच उघडकीस येईल!"

जॅकचा चेहरा रागाने लालेलाल झाला.

"ही कशा प्रकारची मदत करता आहात? मला कायद्याची इतकी जाण तर नक्कीच आहे की हे सर्व उघडकीला आल्यानंतर गुन्ह्यात मदत केल्याच्या आरोपाखाली मेरीला अटक करण्यात येईल व शिक्षा केली जाईल. आणि तुम्हाला असे वाटते का की स्वतःला ह्यातून वाचवून मी तिला कायद्याच्या कचाट्यात अडकू देईन? त्यापेक्षा त्यांनी मला कितीही वाईट शिक्षा केली तरी हरकत नाही, श्री. होम्स! पण माझी बिचारी मेरी ह्या कोर्ट कचेर्‍यांपासून दूर राहील अशी एखादी उपाययोजना करा."

होम्स ने अत्यानंदाने पुन्हा एकदा जॅकशी हस्तांदोलन केले.

"मी फक्त तुमची परीक्षा घेत होतो, श्री. क्रॉकर. आणि माझ्या प्रत्येक कसोटीला तुम्ही खरे उतरलात. तसं बघायला गेलं, तर मी माझ्या शिरावर फारच मोठी जबाबदारी घेतो आहे, कारण मी हॉपकिन्स ला ह्या प्रकरणात संदर्भातला एक जबरदस्त संकेत आधीच दिला आहे. पण त्याचा उपयोग त्याने करून घेतला नाही तर त्याउप्पर मी काहीच करू शकत नाही. हे बघा, श्री. क्रॉकर, आपण हे सर्व कायद्याच्या चौकटीतच राहून करतो आहोत. तुम्ही आरोपी आहात. वॉटसन, तू ब्रिटिश वकिलाची भुमिका बजाव. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत ह्याच्याइतका उत्कृष्ट वकिल आजतागायत पाहिलेला नाही. आणि मी बनतो न्यायाधीश! तर मग बोला, वकिलसाहेब. पुरावे तुमच्यासमोर आहेत. तुम्ही ह्या अशीलाला आरोपी मानता की नाही?" होम्स नाटकी ढंगात म्हणाला.

"नाही, न्यायाधीश साहेब. आरोपी निर्दोष आहे." मी हसू दाबत उत्तर दिले.

"पाचामुखी परमेश्वर! जास्तीत जास्त लोकांच्या मतानुसार हे कोर्ट तुमची निर्दोष सुटका करत आहे, श्री. क्रॉकर! इग्लंडच्या कायद्याला जोपर्यंत ह्या गुन्हाचा ठपका ठेवावयास दुसरा बळी मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला मी अभय देतो, असे समजा. साधारण वर्षभराने तुम्ही तुमच्या प्रियतमेकडे परत या.आम्ही आज केलेला निवाडा योग्यच होता ह्याची खात्री आम्हाला व्हावी असा भविष्यकाळ तुम्हा दोघांना लाभो, ह्या आमच्याकडून शुभेच्छा!"

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निंबुडा, खुप खुप धन्यवाद. हा भाग पोस्ट केल्याबद्दल. नाहीतर काहीही अशक्य पाणचट वाचत बसले होते सकाळपासुन माबोवर. Happy
आता वाचते.

मस्त!!
अनुवाद छान जमला.

पण पहिल्या चार भागात रहस्याची उत्सुकता जितकी वाढली होती तितक्या अपेक्षेने ती अंतिम भागात पूर्ण झाली नाही.
तू असे भाग पाडल्यामुळे मला असे लिहिणे भाग पडले Proud

.

पण पहिल्या चार भागात रहस्याची उत्सुकता जितकी वाढली होती तितक्या अपेक्षेने ती अंतिम भागात पूर्ण झाली नाही.
>>>
कथा माझी नाही रे. कॉनन डोयल ह्यांची आहे. त्यामुळे त्यांनी रहस्याची उकल जशी केली तशीच मी अनुवादित केलीय.

आणि तसे पण होम्स ची निवाड्याची पद्धत आणि गुन्हेगाराला शोधण्या पर्यंतचा प्रवास, हाच रंजक असतो. पुढे फक्त त्या गुन्हेगाराकडून वदवून घेतलेले सत्य किंवा होम्स ने आपली विचारांची बैठक वॉटसन समोर मांडणे व त्याने शोधकार्याची साखळी कशी पूर्ण केली हे विशद करणे हेच उरते कथेत. व ते कथेच्या ओघात वाचकाला बर्‍यापैकी होम्स किंवा वॉटसनच्याच तोंडून तुकड्या तुकड्यात समजलेले ही असते. त्या दृष्टीनेच मी कथेचे ५ भाग पाडले. अर्थात ठरवून पाडले नाहीत. अनुवाद करण्याच्या ओघामध्ये लिहित गेले. जिथे कथेला ट्विस्ट मिळतोय असे वाटले किंवा जिथे थांबून पुढच्या भागासाठीची उत्सुकता ताणून धरता येईल असे वाटले तिथे थांबत गेले. Happy

बेसिकली होम्स ची शोधकार्याची पद्धत फारच कमी शब्दांत बद्ध आहे सर्वच गोष्टींमध्ये! घडलेल्या घटनांचा रंजक विस्तार, व्यक्ती व वास्तु, इ. ची चित्रदर्शी वर्णने हेच सर्वात मोठे सौंदर्यस्थळ म्हणावे लागेल जवळपास सर्वच होम्स कथांचे.

छान झालाय हा भाग.. ओघवता झालाय.
रहस्यकथा आवडत असतील तर एखादा प्रयत्न स्वतंत्रपणे करता येईल. ( प्रत्येक भागात एक खून आणि नवा संशयित मात्र हवा Happy )

छान अनुवादिली आहेस निंबू.. वाचले, आवडले सगळे भाग. Happy
अजून करणारहेस का अनुवाद ? नक्की कर. चांगले जमलेय तुला Happy

वाईन ग्लासात, मदिरा प्याल्यात, वारुणी चषकात आणि ताडी तांब्यात... शोभतात.

निंबुडाताई धन्यवाद..मस्त..पण शेवटी वॉट्सनला होम्स 'ज्यूरी' म्हणतो ना? मग त्याचा 'वकील' हा अनुवाद योग्य आहे का?

पण शेवटी वॉट्सनला होम्स 'ज्यूरी' म्हणतो ना? मग त्याचा 'वकील' हा अनुवाद योग्य आहे का?
>>>
खरे आहे. पण ज्युरी चा योग्य अर्थ "निर्णायक समिती" असा होतो आणि इथे वॉटसन ही एकच व्यक्ती असल्याने मराठीत ते कसे मांडावे हे न समजल्याने सोयीसाठी वकील बनवले मी वॉटसनला.

ह्या निमित्ताने मलाही हा प्रश्न पडलाच होता की इग्लंडात कोर्टात अशी स्वतंत्र निर्णय समितीही असते का, की जी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा प्रतिवादांनंतर आपले मत देते? तसेच न्यायाधीश जे न्यायाच्या उच्चासनावर असतात त्यांच्या निकालावर ज्युरींच्या निवाड्याचा असर होतो का? आपल्याकडील कोर्टात वकील आणि जज्जसाहेब इतकेच ऐकले आहे.