भाषा आणि भाषांतरे - काही निरीक्षणे - भाग १/२

Submitted by दिनेश. on 26 November, 2012 - 04:55

लोकसत्ताच्या रविवारच्या पुरवणीत, दोन भाषांमधला संवाद, यावर एक लेख वाचला, आणि काही
निरीक्षणं नोंदवावीशी वाटली.. याची क्षेत्रानुसार विभागणी करतो.

१) गीतलेखन

आज मिलनकी रात है, रात है
अधर ना बोले, भेद न खोले
नयनोसे, नयनोंकी बात है, बात है

जल कि लहरीयाँ झूम रही है
चंद्रकिरनको चूम रही है,
आ फ़िर प्यासे, प्यास बुझा ले
मदीरा कि बरसात है

आजा रे आ, मत देर लगा
ये घडीयाँ ना बित कही जाये रे
चमकेंगे लाखो चंदॉं,
मगर ये रात फ़िर कब ना आये रे
झनक रही है, पॉंव मे पायल
मेंहंदी लगे मेरे हाथ रे, हाथ रे

गीतलेखनात अनुवादाची परंपरा बरीच मोठी आहे. मी वर जे गाणे लिहिलेय, ते जरी लताने गायलेले असले, तरी तूमच्यापैकी, अनेकजणांना अपरिचित असेल. याचे कारण ते फारसे ऐकवले गेले नाही.

आता वरचेच गाणे तूम्ही, लताच्याच, धुंद मधुमति रात रे, रात रे या चालीवर गुणगुणून पहा. ( चित्रपट : किचकवध, संगीत मा. कृष्णराव. ) नाही हा चाल चोरण्याचा प्रकार नाही, तर गाण्याचे भाषांतर आहे.
वरचे गाणे, हिंदी किचकवध मधले आहे. पण हे भाषांतर मराठीत झालेय का मराठीतून झालेय, याची
मला कल्पना नाही.

खरं तर मला वाटतं, गाण्याचे भाषांतर करताना, शब्दशः भाषांतरापेक्षा, सूरांना प्राधान्य द्यावं. आणि वरच्या
गीतात, तेच साधलेय. मराठीत, या गाण्यात, जललहरी या धीट धावती, हरिततटांचे ओठ चुंबिती... किंवा,
अलिं रमले कमलात रे.. अशा सुंदर ओळी आहेत. अगदी शब्दशः भाषांतर न करताही, दोन्ही गाणी, आपापल्या
जागी, स्वतंत्रपणे सुंदर आहेत.

एकाचवेळी जर दोन भाषांत चित्रपट निघत असेल, तर असा प्रयोग चांगल्या तर्‍हेने करता येतो. ( अर्थातच
डब केलेल्या चित्रपटात, असे करणे कठीण जाते, कारण त्यावेळी पडद्यावरील कलाकारांच्या ओठाच्या
हालचाली पण विचारात घ्याव्या लागतात. आणि मग कुची कुची राक्कम्मा.. असले भयानक प्रयोग केले जातात.)

शांताराम बापूंनी अशी अनेक चित्रपटांची द्वैभाषिक निर्मिती केली. ( कुंकू-दुनिया न माने, स्त्री-शकुंतला,
लडकी संह्याद्री कि - इये मराठीचीये नगरी.. ते चानी.. हिंदी पिंजराची निर्मिति मात्र नंतर केली. )
असा एक चांगला प्रयत्न, सुबह - ऊंबरठा मधे पण झाला. तिथे तर एकाच चालीचा आग्रह न धरता,
तूम आशा विश्वास हमारे आणि गगन सदन तेजोमय.. अशा दोन स्वतंत्रपणे सुंदर रचना केल्या गेल्या.
( सून्या सून्या मैफिलीत माझ्या च्याच चालीत, खिले थे लाखो फूल.. अशी रचना ऐकल्याचे आठवतेय.)

मराठी, पाठलाग या चित्रपटावरुन, हिंदीत, मेरा साया हा चित्रपट करताना, या डोळ्यांची दोन पाखरे, या
गाण्याचे हिंदी रुपांतर करताना, तू जहॉं जहाँ चलेगा, असे शब्द योजले गेले. दोन्ही गाणी स्वतंत्रपणे
सुंदर आहेत. हे भाषांतर नसूनही, गीताचा मूळ भाव तोच राहिला आहे. नको मारुस हाक, या गाण्याचे
भाषांतर न होता, झुमका गिरा रे, असे रुपांतर झाले. तरीही, दोन्ही गाणी गाजलीच.

पण हा भाषांतराचा प्रयोग मात्र काहीवेळा फसतो. वातामि गणपति गजानन, या हंसध्वनि रागातल्या
मूळ तामिळ रचनेवर, बेतलेले लताचेच, दाता तू गणपति गजानन, तितकेसे जमलेले नाही, काही ओळींवर तर
लतालाही कसरत करावी लागलेली आहे.

शास्त्रीय संगीत, महाराष्ट्रात लोकप्रिय करण्याचे श्रेय अर्थातच नाट्यसंगीताचे. ती पदे आणि त्यांचे राग, एकेकाळी जनमानसावर इतके रुळले होते, कि रागांची ओळखच, त्या त्या पदावरून होत असे.
पण इथे मात्र प्रचंड तडजोडी कराव्या लागल्या. कधी कधी मूळ चीजेचा भाव आणि नाटकातला प्रसंग, यांचा
मेळ बसायचा नाही, तर कधी कधी. थेट भाषांतर शक्यच नसायचे. अगदी मोजकी उदाहरणे देतो.

मूळ ठुमरीचे शब्द आहेत,

मोरे सैंया किवडीया खोलो
रसकि बूँद पडे
जोबन मेरा भिग पडे है
और तूम मोसे रुठ पडे हो

किती सुंदर शृंगारीक शब्द आहेत ना ? पण या ठुमरीवर बेतलेले नाट्यगीत, जरी शॄंगारीक असले, तरी, त्यात
बराच संयम आणि सूचकता आहे. ते नाट्यपद असे.

दूतिं नसे हि माला,
सवतचि भासे मला
नच एकांती सोडी नाथा
भेटू न दे, हृदयाला

ठुमरी गाताना सहसा, दुसरी ओळ हि जास्त आळवली जाते. खालच्या उदाहरणात तर ते अक्षरशः साधलेय.
मूळ ठुमरी,

किस गये बावरी बनाये,
कानोमें कुंडल, गले वनमाला

नाट्यपद, असे

संशय का मनी आला,
आळवतां कि चित्र दिले मी..

कधी कधी तर मराठीत, अनैसर्गिक वाटतील, अशा वाक्यरचना कराव्या लागल्या.

पिया कर धर देखो,
धरकत है, मोरी छतियाँ

( माझे दिल किती धडकतेय, ते बघायला तरी, माझा हात धर .. )
यावर जे मराठीत पद रचले गेले, त्याचे शब्द

मधुकर वनवन फिरत करी,
गुंजारवाला, भोगी पुष्पमाला

मला सगळ्यात अनोखी वाटली, ती रचना अशी.

मूळ ठुमरी, पंजाबी भाषेत आहे, तिचे बोल आहेत, तेंडेरे नाल वसैया, पिया वै..

यावर बेतलेले पद असे.

स्वकुल तारक सूतां, सुवरा
वधुनी वाढवी वंश वनिता
ऐसी कांता, नर करता

एक तर ही वाक्यरचना सुलभ नाही. ( भाषांतर तर नाहीच नाही ) शिवाय नाटकातला संदर्भ माहीत असल्याशिवाय, अर्थ लावणेही कठीण, आहे.

आपल्या स्वयंवरात वाद निर्माण झाल्याने, रुक्मिणी, श्रीकृष्णाला सांगतेय. स्वत:च्या कूळाचा रक्षणकर्ता,
असा माझा भाऊ ( रुक्मि ) याच्या वधाला कारणीभूत झालेल्या, अशा मला, तू पत्नी म्हणून स्वीकारून,
तूझा वंश वाढवणे, कितपत योग्य आहे ?

पण असो, हि नाट्यपदे, अवीट गोडीची आहेत, यात शंकाच नाही.भाषांतरांपेक्षा, ज्या कारणासाठी, त्यांची
योजना झाली, त्यात ती पदें, कमालीची यशस्वी झालीत.

२) भाषा शुद्धीकरण आणि बोलीभाषा

मला नेमके वर्ष माहीत नाही, पण आचार्य अत्रे, मराठी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीशी संबधित झाल्यापासूनच
असावे, मराठी भाषा, शुद्धीकरणाचे जोरदार वारे वाहू लागले. भाषाशुद्धी म्हणजे काय, याच्या आचार्य अत्र्यांच्या
ठाम कल्पना होत्या. त्यांनी अनेक संतांच्या रचना, त्यांच्या मताप्रमाणे, सुधारून घेतल्या. प्रचलित असलेले
अनेक शब्द ग्राम्य मानले गेले, आणि अजूनही ते तसेच मानले जातात.

भले तरी देऊ, कासेची लंगोटी.. या ओळीतला, कासेची हा शब्द अत्र्यांचा. मूळ शब्द, अर्थातच थेट होता.
त्या काळात लोकप्रिय झालेली अनेक दर्यागीते ( वारा फोफावला, नको वळून बघू माघारी, आला खुषित
समिंदर ..) हि कोळी लोकांच्या भाषेत नव्हती, तर मराठी साहित्यिक भाषेत होती. हिला प्रमाण भाषा,
असे म्हणण्याचा प्रघात होता. पण ती कुणी प्रमाणित केली, याचा मात्र मला कधी पत्ता लागला नाही.

आमच्या शाळेत पण, मग शिकवताना, शुद्ध लिहावे, असा आग्रह धरण्यात यायचा. सध्या आपण, करावं तसं
भरावं, असे सहज लिहून जातो, पण आमच्या शाळेत, ते करावे तसे भरावे, असे लिहिण्याचा आग्रह धरला
जायचा.

आणि या शुद्धीकरणात, गळचेपी झाली ती मराठीच्या बोलीभाषांची. माझेच उदाहरण घ्या. माझ्या वडीलांचे
मूळ गाव मालवण. (खुद्द मालवण ) घरही तिथेच. आईचे माहेर, कोल्हापूर जिल्ह्यातले. पण दोन्ही घरात,
स्थानिक भाषा कधी बोललीच गेली नाही. त्यामूळे आम्हा भावंडांच्या जिभांवर, ती भाषा रुजलीच नाही.
उलट, गावाहून आल्यावर, आमच्या उच्चारांकडे, आईचे बारीक लक्ष असायचे. आज मला या दोन्ही,
भाषा, उत्तम समजत असल्या तरी, बोलायला अजिबातच जमत नाहीत.

त्या काळात, मग या भाषांत साहित्यपण, मर्यादीतच असायचे. शंकर पाटलांच्या काही कथांत ( उदा; भूक, जौळ ) फक्त संवाद, बोलीभाषेत आहेत. निवेदन मात्र, प्रमाण भाषेतच आहे. ( अर्थात स्वतः कथाकथन करताना मात्र, बोलीभाषेतच करत. )

पण ही गळचेपी, फार काळ टिकली नाही. मराठी चित्रपटांची निर्मिती, बहुत करून कोल्हापूरात होत
असल्याने, ती भाषा पुढे येतच राहिली. लिला गांधीचे नाटक, वर्‍हाडी माणसं, राजा परांजपेंचा चित्रपट, वर्‍हाडी
आणि वाजंत्री, पुलंचे वार्‍यावरची वरात असे काही प्रयत्न होतच राहिले. दळवी देखील, काही कादंबर्‍यातून
( उदा. सारे प्रवासी घडीचे ) मालवणी भाषेची, ओळख करुन देत होते.
पण दणदणीत सुरवात झाली, ती मच्छिंद्र कांबळीच्या, वस्त्रहरण नाटकाने. त्यानंतर मालवणी, आग्री भाषेतली
नाटके येतच राहिली.
शिवाय कथा कादंबर्‍यांतून, इंदौरी, कोकणी मुसलमानी, अहिराणी अशा भाषाही दिसू लागल्या. आणि सगळ्यात महत्वाचे आमच्या पिढीतला न्यूनगंड , पुढच्या पिढीत अजिबात राहिला नाही.
आज आपली मायबोली देखील, या सर्व भाषांनी समृद्ध झालीय. आणि नेटाने वाचल्यास, या सर्व भाषा
आपल्याला अगदी सहज कळतात. त्यामूळे या भाषांचे मराठीत भाषांतर होऊ नये ( केवळ काही अवघड
शब्दांचाच अर्थ दिला जावा ) असे मला वाटते.

शिवाय या प्रत्येक भाषेचा, स्वतःचा असा एक रांगडेपणा आहे. तो भाषांतरात हमखास हरवतो.
एका उदाहरण बघा. प्रमाण भाषेत, पायावर पाणी घाल म्हंटल; तर विचारशील तोरड्या ( साखळ्या ) कितीच्या ? अशी एक म्हण आहे, मालवणी भाषेत मात्र, कुल्यार पानी दी म्हंजे दी, लोंबता काय, म्हणून इच्यारू नाका.
अशी समांतर म्हण आहे. आता सांगा, भाषांतराची काही गरज आहे का ?

३) संबोधन

एकमेकांना संबोधन करताना, काय शब्द वापरायचे, यावर पण आपल्या भाषेत, बरीच परकीय आक्रमणे, झाली.
मला सगळ्यात खटकतो तो सर आणि मॅडम या शब्दांचा, मराठीतला उपयोग. इंग्रज भारतात आल्यावरच
अर्थात, हे दोन शब्द वापरात आले. पण त्याचवेळी, त्याचे देशी भाषांतर, साहेब, साहब, साब, / मेमसाहेब, मेमसाहब, मेमसाब अशी झालीच. मराठीत, शब्दाच्या मधे असलेला ह, आपल्याला उच्चारायला थोडा
कठीण जातो, त्यामूळे, साहब मधला ह गाळला गेला असावा. पण साब हा शब्द आपल्या समाजात, फारच
रुळला. राजघराण्यातील स्त्रियांना, अक्कासाब, ताईसाब, दिवाणसाब अशी संबोधने पडली. जिजाबाईंनादेखील,
आऊसाहेब, अशी हाक मारत असत ( ती खरीच होती, का नंतरच्या लिखाणात, आली ? ) रावसाहेब, साहेबराव अशी संबोधने पण होती.

पुर्वी ऑफीसमधे एखादाच वरीष्ठ अधिकारी असायचा. त्यामूळे सर हे संबोधन एकाच व्यक्तीसाठी असायचे,
पण पुढे खाती वाढली, खातेप्रमुख वाढले, तसे सर या शब्दासोबत, आणखी एखादा शब्द वापरणे आवश्यक
झाले, आणि इथेच घोळ झाला. सध्या बहुतेक ऑफिसात, पाध्ये सर, शिंदे सर, बापट मॅडम अशी संबोधने
वापरली जातात. पण मूळ इंग्लीशमधे हे शब्द नेहमीच, नावाच्या आधी वापरले जातात, नंतर नाही.
( जसे, सर आयझॅक न्यूटन, मादाम क्यूरी ) याबाबतीत, माझी सावंतवाडी येथे शिकलेली, सहकारी,
नेहमी वाद घालायची. आम्ही दोघे एकमेकांना हाक मारताना, नेहमीच योग्य शब्दप्रयोग करत असू. पण तो
प्रयत्न फारच क्षीण ठरला.

मूळ नावानंतर हा शब्द वापरायचा घोळ, हा खरेच अलिकडचा. पूर्वी आपल्याकडे मूळ इंग्लीश भाषेतून आलेली
बिरुदे आणि पदव्या, नावाच्या आधीच वापरल्या जात. उदा: बॅरिष्टर, रेव्हरंड, इतकेच नव्हे, तर लोकांनी
सन्मानाने दिलेल्या पदव्याही ( उदा. लोकमान्य, स्वातंत्र्यवीर, महात्मा, आचार्य ) नावाच्या आधीच लिहिल्या
जात. फक्त घरगुति संबोधने, जसे दादा, अक्का, माई, राव नावानंतर लिहिली जात.
पण आता हा घोळ, निस्तारण्याच्या पलिकडचा आहे.

मराठीतील मुळच्या संबोधनांना, परकिय भाषांमुळे, चुकीचे अर्थ जोडले गेलेत, अशीही काही उदाहरणे आहेत.
मराठीत बाई हे संबोधन, कायम आदरानेच घेतले जात असे. जिजाबाई, झांशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, हिराबाई बडोदेकर, सुंदराबाई, हि संबोधने आदराचीच आहेत. इतकेच कशाला, आम्ही शाळेतील शिक्षिकांना सुद्धा बाईच म्हणत असू.
नाट्यक्षेत्रात, तर बाई म्हणजे, विजया मेहता हे आदरयुक्त समीकरण आहे. पुर्वी गाण्यातही, मैत्रिणीला
उद्देशून, बाई हा शब्द वापरला जाई ( बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला, काय बाई सांगू.. )
उत्तरेकडे मात्र, बाई या शब्दाला थोडा हिणकस अर्थ होता आणि आहेही ( आठवा, तिसरी कसम चित्रपटातली,
कंपनीवाली बाई, हिराबाई )

पण गेल्या काही वर्षांत, उत्तरेकडच्या प्रभावाने म्हणा, किंवा एम टिव्ही चॅनेलच्या प्रभावाने म्हणा, बाई हा
शब्द बदनाम झाल्यासारखा झालाय. अनेकदा तर बाई, म्हणजे मोलकरीण.. असाच अर्थ घेतला जातो.

पुर्वी गाण्यातच सखी, सखये, सखीबाई ( सखी शशिवदने गे, सखये अनसूये, थांब कि बाई, सखीबाई सांगते मी
नवल घडले ) अशी पण संबोधने असत. ते शब्दही काळाच्या ओघात हरवले.
माझ्या शाळेत आम्ही वर्गमित्र मैत्रिणींना, गड्या किंवा गडे हा शब्द वापरत होतो. अनेक वर्षांनी, फेसबुकवर
भेटलेल्या, एका वर्गमैत्रिणीशी बोलताना, आमच्या दोघांच्याही तोंडी, अगदी सहज हे संबोधन आले. डब्बा
ऐसपैस खेळताना, लपलेल्या खेळाडूला, सावध करताना, " गड्या गड्या, लपून रहा. " असा पुकारा आम्ही
करत असू. पण आता कुणाला, गड्या हाक मारलेली आवडायची नाही. (उगाचच, घरगड्याचा संदर्भ चिकटलाय.)

त्याच काळात, लेका, भिडू हे पण शब्द आम्हा मित्रांत सहज वापरात होते. मित्रा.. हा शब्द मात्र नंतर प्रचारात आला. ( अवधूत गुप्ते ला श्रेय द्यायचे का ? ) माझ्या पंजाबी / हरयाणवी मित्रांशी बोलताना, तोंडात सहजपणे
यार ( खरं तर यारं ) असा शब्द येतो. हा शब्द तिथल्या मुली पण वापरतात. पण मराठीत मात्र, एका मुलीचा
किंवा स्त्रीचा, यार असा उल्लेख केला, कि लगेच त्याचा संबंध जारकर्माशी जोडला जातो.

मुंबईत "दोस्त" या संबोधनाला तर आज इतका विचित्र अर्थ चिकट्लाय, कि फोर्टसारख्या ठिकाणी, कुणाला
दोस्त, म्हणून हाक मारायचीच चोरी झालीय. ( मला वाटतं, मुंबईकरांना हा संदर्भ लगेच कळेल.)

स्थानिक भाषेतली संबोधने, मात्र नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा विषय ठरली. याचा धडा मात्र मी, गोव्यात
घेतला. त्य ऑफिसमधला, पहिलाच दिवस होता. मला कुठलीतरी जूनी फाईल हवी होती, मी स्टूल मागवले,
आणि स्वतः फाईल शोधू लागलो. त्यावेळी माझा मदतनीस, मला मागून म्हणाला, " होडले पात्रांव मरे तू. "
मला अर्थातच ते कळले नाही. शिवाय मला तो पात्र, मरे असे कसे म्हणेल, असे वाटले. हे त्याच्यापण लगेच,
लक्षात आले, आणि त्याने, त्याच्यापरीने मराठीत भाषांतर केले, ते असे, " मोठे साहेब ना आपण. " ( गोव्यात
तू असाच उल्लेख केला जातो, तूम्ही चा वापर अगदीच मर्यादीत, त्यामूळे आदर वगैरे दाखवायचे असेल,
तर ते थेट आपण च म्हणतात. ) आणि त्याच्या या वाक्याचा पण मला अर्थ लागला नाही. मला असे वाटले,
कि आपण दोघे मोठे साहेब, त्यामूळे स्टूलावर चढायचे नाही. असे म्हणतोय तो. मी त्याला म्हणालो, तू असशील मोठा साहेब, मी नाही. बिचारा आणखीनच खजील झाला. मग तिसर्‍याच माणसाने, हा घोळ निस्तरला.

त्यानंतर अनेक देशांत मला, अनेक संबोधने लाभली. तूम्हाला वाचायला आवडतील, म्हणून मुद्दाम लिहितोय.
हबीबी, रफिक, ( अरेबिक- ओमान ) रफिकी, मझे, मझूंगू, मलिबू ( स्वाहिली-केनया ) ओईबो, बाबा, ओगा ( ब्रोकन इंग्लीश- नायजेरिया ) अमिगो, बोनितो, शेफ ( पोर्तूगीज - अंगोला ). या सर्व शब्दांना, त्या त्या भाषेत
सुंदर अर्थ आहेत.

पुढच्या भागात, पुस्तके, स्थानकांवरील उद्घोषणा, वगैरे बाबतीतली निरीक्षणे नोंदवतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेश....

~ या क्षणी पूर्ण लेख-वाचन आनंद घेत आहे. खूपच आगळेवेगळेपण जाणवत आहे वाचताना. नित्यनेमाच्या घटना वर्णन केल्या असूनही वाचताना त्या किती अनोख्या वाटत आहे असा जो अनुभव येत आहे त्याचे सारे श्रेय तुमच्या 'बोलक्या' लेखनशैलीकडे जाते.

पुढील भागाचा तुम्ही उल्लेख केला असल्याने दोन्ही भागांमुळे जो काही अपेक्षित वाचन आनंद प्राप्त होणार आहे, त्याविषयीची प्रतिक्रिया स्वतंत्रपणे नंतर देत आहेच.

अशोक पाटील

अशोक, आता मदत पाहिजे, कालपासून एक गाणे सतावतेय, आठवतच नाही.

माडगूळकरांनी, मीरेच्या एका गाण्याचे भाषांतर केले होते.
सखी मी प्रेमदीवाणी, माझी व्यथा न जाणे कोणी... असा मुखडा होता बहुतेक. आशाने गायलेय आणि पडद्यावर
सीमा होती. पण मला चित्रपट आठवत नाही.

यात दुखणेकरी मी, वैद्य तू... किंवा अशीच काहीतरी, मराठीत अनैसर्गिक वाटेल अशी, शब्दयोजना होती.

दिनेश ~~
"सीमा" नावामुळे आठवले. 'सुवासिनी' मधील ते गाणे.

मी तर प्रेम दिवाणी
माझे दु:ख न जाणे कोणी

आर्ताची गत आर्ता ठावी
कळ ज्या अंत:करणी
स्थिती सतीची सतीच जाणे
जिती चढे जी सरणी

शूलावरती शेज आमुची
कुठले मीलन सजणी ?
गगनमंडळी नाथ झोपती
अमुच्या दैवी धरणी !

दुखणाईत मी फिरते वणवण
वैद्य मिळेना कोणी
या मीरेचा धन्वंतरी हरि
शामल पंकजपाणी !

यू ट्यूबची लिंक मुद्दाम देत आहे :

http://www.youtube.com/watch?v=3frMlkePlGw

~ इथे आशाचा आवाज ओळखतो येतो, पण स्वतंत्र ऑडिओवर आशा नसून ललिता फडके आहेत.

आभार अशोक,
हा दुखणाईत शब्दच मला छळत होता. मीटरमधे बसवायला अवघड गेलाय, असे वाटते.
आणि हि कल्पना पण मराठीत, आणखी कुठे दिसली नाही.

माडगूळकरानी, " विकत घेतला श्याम " गाण्यात मात्र, हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासांचा श्रीराम, अशी ओळ
टाकून चलाखी केलीय.

दिनेशदा....

तुमचा हा लेख फक्त तुम्हालाच सुचु शकतो. केवढं चपखल लिहिलं आहेत.... खरच हे वाचे पर्यंत हे उमगलेच नव्हते. खरच... बोली भाषा कोणी बोलली तर लोकं हसतात.

रच्याकने....
माझा ड्रायव्हर हा पक्का सांगली ची बोली बोलतो. ठाण्यात राहुन, इकडेच शिक्षण होवुनही तो अजुनही बोली भाषाच वापरतो. पण हा लेख काल वाचल्यावर आज त्याचं " म्हणुनशान" आणि "म्होरं " खटकलं नाही.