सुके मासे १) सुकी करंदी/सुकट

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 November, 2012 - 13:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

करंदी १ ते २ वाटे
२ कांदे चिरुन
१ वांग्याच्या फोडी
२ छोट्या टोमॅटोच्या फोडी
२ मिरच्या
थोडी चिरलेली कोथिंबीर
१ ते १ १/२ मसाला
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
चविनुसार मिठ
२ पळ्या तेल

क्रमवार पाककृती: 

करंदीचे शेपुट डोक्याकडील टोकेरी भाग व मधले पाय काढून टाकावेत. डोके पूर्ण काढायचे नाही. त्याच भागाला जास्त चव असते.

भांड्यात तेल चांगले गरम करुन त्यावर कांदा बदामी रंग येई पर्यंत तळून घ्या.

तळलेल्या कांद्यावर हिंग, हळद, मसाला घालून परता. आता ह्या मसाल्यावर धुतलेली करंदी व वांगी घालून परतून घ्या.

जर रस्सा करायचा असेल तर गरजेपुरते पाणी घाला.

साधारण १०-१२ मिनीटांत करंदी शिजेल. मग त्यावर टोमॅटो, कोथिंबीर मिरच्या (मोडून), मिठ घाला.

रस्सा असणार्‍या करंदीला ढवळून एक उकळी येऊ द्या. सुके करायचे असेल तर एक वाफ आणा आणि गॅस बंद करा.

हे आहे करंदीचे कालवण (रस्सा)

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा: 

१) करंदी म्हणजे छोटी कोलंबी सुकवलेली. सुके मासे खारट असतात त्यामुळे मिठ थोडे कमी प्रमाणात घालावे.
२) टोमॅटो ऐवजी चिंच, कोकम घालू शकता.
३) कोणत्याही सुक्या माश्यांमध्ये वांगे, शेवग्याच्या शेंगा चविष्ट लागतात. करंदीत बटाटाही घालता येतो.
४) करंदीचे सुके करताना सिमला मिरची घातल्यासही छान लागते.
५) मसाला असेल तर दिड चमचा तिखट असेल तर १ सपाट चमचा वापरावा.
६) सुक्या माश्यांमध्ये लसुण सहसा घालत नाहीत. पण मन साशंक असेल तर घालू शकता फोडणीला किंवा पेस्ट करुन.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगं जरा गुरुवारची थांब की....मी आज शाकाहारी रेसिपी शोधायला आले आणि आले का समोर तुझे मासे क्र्मांक्स Wink
माझ्या नवर्याला हे करंदी सुकट जाम आवडतात...अपुन सिर्फ एकच सोडेएएएएए ..

फोटो मस्त आहे....रसरशीत.

वा मस्त! यात सिमला मिरची कधी घालुन पाहीली नाही. बघेन कधीतरी तसेही करुन. आम्ही यात आले+लसुण घालतो. याबरोबर भाकरी हवीच. नुसत्या वरण्+भाता बरोबरही छान लागते.

तुला सिमला मिरची कुठे दिसली? Happy पण घातलीस तर चालेल.

माझी आई छोट्या कोलंबीत फ्लॉवर बटाटा ( असल्यास वांगंपण) घालते...यमी कुर्म्यासारखं Happy

माझं फेवरीट Happy आम्ही यात वांग्याशिवाय दुधी भोपळा, कोहळा (पांढरा), फ्लॉवर, बटाटा हे सुद्धा उपलब्धतेनुसार घालतो. Happy कैरीचे तुकडेही घालतात.

माझी आवडती सुकी मासळीची भाजी.

कैरीने वेगळीच मजा येते असे माझे मत.

जागू - माश्यांच्या इतक्या रेसिपीज माहिती असलेली दुसरी व्यक्ती माझ्या माहीतीत नाही Happy

सुकि कर्दी आणि कच्ची कैरी अप्रतिम कॉम्बो..........
रसरशीत कर्दी आणि गरम गरम भात अजुन काय पाहिजे ह्या जिवाला.........................!
पु.ले.शु.
लिहित रहा वाचत राहु!

अमी, विजय, तृष्णा कैरीचे नाव काढून तोपासु. खरच कैरी ही सुक्या माश्यांमध्ये खासकरुन करंदी, जवळा, बोंबील ह्यांमध्ये खुप छान लागते.

वेका मी टिप मध्ये लिहीले आहे सिमला मिरची घालण्याबद्दल.

अगो करंदी बोनलेसच असते.

विद्या, दक्षिणा,

अमी घेवडाही घालतात सुके केले की तोही छान लागतो.

विजय आता तुम्हीही सगळे झालात हे वाचुन माहीतगार.:स्मितः

मस्त. माझीही सेम रेसिपी. पण मी करदी किंवा इतरही कुठलीही सुकी मासळी जसे जवळा, सुके बोबिंल, तेंडली सुकट आधी जरा तव्यावर भाजुन घेते. मग सगळी फोडणी.
जागु तु सुकट भाजत नाहीस का?

मला ही अंबाडी सुकट जाम आवडते. खासकरुन बटाटे घातलेली सुकी भाजी.
चपाती, तांदळाची भाकरी किंवा खिचडीबरोबर सुद्धा.

तृष्णा वा मस्त आहे आज बेत.

सृष्टी, अखी, नुतन धन्यवाद.

जेम्स आमच्याइथेही हिला आंबाड म्हणतात.

सस्मित आम्ही नाही आधी भाजून घेत. हा पण जवळा नुसता भाजून कुरकुरीत भाकरीबरोबर छान लागतो.

जागू, या माशाचा नंबर एवढा उशीरा का लागला ?
हा प्रकार समुद्रकिनारीच नाही, तर अगदी घाटात देखील लोकप्रिय आहे. पावसाळ्यात वगैरे, भाज्या मिळत नाहीत. त्यावेळी हाच प्रकार केला जातो. आमच्याकडे तो धुवून थोडा वेळ पाण्यात भिजवतात.

जागू अगं तू 'करंदीचे शेपुट डोक्याकडील टोकेरी भाग व मधले पाय काढून टाकावेत.' असे लिहिलेस ना म्हणून मी विचारले सुकट बोनलेस नसते का. मला वाटायचे की कोलंबीचे सोललेले वाटे मिळतात तशीच कोलंबी घेऊन ती सुकवत असतील. बाकी मासे पण आहेत तसेच सुकवतात का ? मग खाताना काटे काढावे लागतात का ? माहितीसाठी विचारते आहे Happy

अगो, कोलंबी हा शेलफिश आहे, त्याला काटा नसतो. पण सुकवलेला बांगडा किंवा बोंबील, आतल्या काट्यासकट सुकवतात, खाताना तो काढावा लागतो.
काही मोठ्या माश्यांचे तूकडे ( काटे वगळून ) करतात व सुकवतात.

अगो कोलंबी, बोंबील, वाकटी, बांगडा, पापलेट हे मासे जसेच्या तसे सुकवतात. खाताना त्यातील काटे काढावे लागतात. फक्त कोलंबीत काटा नसतो.

तर मोठ्या आकाराचे मासे म्हणजे घोळ, रावस अशा माशांचे तुकडे करुन मिठ लावून ते सुकवतात. माकुळचेही सुके मिळते. ह्या प्रकारच्या सुक्या माशांमध्ये काटे मिळत नाहीत.