किल्ल्यांवरची हागणदारी...!

Submitted by हेम on 7 November, 2012 - 12:41

तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट डेस्टिनेशन्स ठरलेली आहेत. नाणेघाटाची गुहा, हरिश्चंद्रगड आणि रतनगड! ...त्याच्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर ही सगळी झुंबड डॉट कॉम राजमाचीला लॉग इन असते! त्यांचा गोंगाट, प्लास्टीक कचरा आणि एकूणच वर्तणुकीचा पारंपारिक त्रास सगळ्यांना नेहमीच होतो आणि हे प्रमाण वाढतंच रहाणार आहे. आणखी एक त्रासाचा प्रकार २ वर्षांपूर्वी पावसाळ्याअखेरीस आम्ही रतनगडला अनुभवला तो म्हणजे या गडावर मुक्कामी असलेल्यांच्या प्रातर्विधीचा! नाणेघाट म्हणा किंवा हरिश्चंद्रगड, राजमाचीला मोठ्या पठारवजा जागा तरी आहेत पण रतनगडावर मुक्कामाच्या गुहांच्या जवळपास सपाटी नसल्याने (..आणि मुळातच रतनगडावर सपाटीचा भाग अतिशय कमी आहे) आणि जोडून कसल्यातरी आलेल्या सुट्ट्यांमुळे मुक्कामी असलेल्यांची संख्या मोठी असल्याने प्रातर्विधीच्या कार्यक्रमाला काहीच शिस्त नव्हती. रतनगडावर दरवाजा ओलांडून वर आलं की उजवीकडे वरील बाजूस राणीचा हुडा नांवाने ओळखला जाणारा गोल बुरूज आहे. तिथून थोडं डावीकडे वर पाण्याची टाकी आहेत. रतनगडावर मुक्कामी असणार्‍यांना पिण्यासाठी या टाक्यांचं पाणी सर्वात जवळ..! या टाक्यांजवळ कोंबड्यांच्या पिसांचा पसारा आणि इतर मद्य-मांसाहारी घाण टाकलेली होती. ( ..हा त्रास माहुलीलादेखील होतो) इथून मागील बाजूस जाणार्‍या पायवाटेवरच हागणदारीला सुरुवात झाली होती. आमच्याबरोबर दोघे- तिघे रतनगडाचे पहिलटकर होते, त्यांनी ही घाण पाहून तिथूनच कलटी मारायच्या गोष्टी सुरु केल्यावर मात्र त्यांना चुचकारत कसं तरी पुढे नेलं. पुढील गडदर्शनाने गेलेला मूड परत आला हा भाग वेगळा पण हा अनुभव वाईट्ट होता.
गडावरील जाण्यायेण्याच्या वाटा, स्मारके इ. जागा टाळून मंडळींनी आपले विधी उरकायला हवेत . ..पण हल्ली होतं कांय की सुट्टीच्या दिवशी अनेक गट किल्ल्यावर मुक्कामी असतात, त्यांत वर वर्णिलेली जनताच भरपूर असते. सकाळी पॉटघाईच्या वेळी जागा शोधायला वेळही नसतो अशा वेळी मुक्कामी असलेल्या प्रत्येक गटाच्या नेत्याने आदल्या रात्री आपल्या गटाला प्रातर्विधीच्या जागेबाबत सूचना देणं अपेक्षित म्हणण्यापेक्षा अनिवार्य असतं. ते होत नाही आणि मग किल्ला दर्शनाच्या वेळी हा सगळा त्रास सोसण्याची वेळ बाकी जनतेवर येते. आता बायोडिग्रेडेबल वगैरे असलं म्हणून कांय कुठेही टाकायचं की काय? काही सूचनांचा अवलंब केला तर खूप त्रास कमी होईल. त्या म्हणजे - आदल्या दिवशीच नेत्याने सर्व सहभागींना योग्य जागा दाखवून ठेवावी. मुली/ महिलांना वेगळी जागा ठरवून ठेवावी. महत्त्वाची सूचना म्हणजे दगडाने छोटा खड्डा करावा आणि विधी आटोपल्यावर वर माती टाकावी याचे कारण एखादा कँप असेल आणि प्रातर्विधीची जागा जरी लांब असली तरी कँपवर माशांचा त्रास होतो तो होत नाही, हा अनुभव आहे! किमान एवढया सूचना अवलंबल्या तरी आपले व इतरांचे गडदर्शन सुखकर होईल.
खरं तर हा खरडायचा विषय नव्हे पण भोग भोगल्यावर तितकाच महत्त्वाचा वाटला म्हणून खरडलं.

-हेमंत पोखरणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिथे वर्दळ अधिक आहे तिथे शौचालयाची सोय करण्याची अत्यंतिक गरज आहे. उदा. लोहगड, राजगड आणि आता रतनगड, हरिश्चंद्रगड वगैरे...

जिथे शक्य नाही प्रत्येक गडावर पुरुष आणि स्त्रीया यांच्याकरिता ठराविक जागा ठरवल्या गेल्या पाहिजेत. तश्या पाट्या तिथे लावायला हव्यात. अर्थात त्याचे पालनही केले गेले पाहिजे. बेशिस्त आणि कचरा करणार्‍या लोकांकडून ही अपेक्षा ठेवता येईल. Uhoh

हिमालयात ट्रेक करताना तुम्हाला खड्डा करून, प्रातःविधी उरकून, तुम्हाला तो खड्डा बुजवावा लागतो. युथ हॉस्टेल ट्रेकमध्ये हे आवर्जून सांगतात. ज्यावेळी २० वा अधिक लोकांचा जमाव एकत्र ट्रेकला असेल तेंव्हा स्वच्छ्तेसाठी अशी उपाय योजना हवीच. Happy

.
.
.
शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या तटात बांधलेले शौचकूप आजही राजगडावर आहेत. पद्मावती देवळामागच्या तटबंदी मध्ये असलेले सर्व शौचकुप आता दरवाजे लावून बंद करून टाकलेत असे ऐकले आहे.

खूप महत्त्वाचा धागा. भारत-अमेरिका तुलना तर शक्यच नाही पण भारतात हा प्रश्ण खरंच वाईट आहे. सरकार तर शून्य प्रयत्न करतं आणि जनता पण आळशी. :रागः
आम्ही इथे अमेरिकेत अनेकदा कॅम्पिंगला जातो. लहान मुलं, म्हातारी माणसे यांना घेऊन पण बरेचदा अवघड ठिकाणी गेलो आहोत. प्रत्येक ठिकाणी केबिन, फ्लशचे संडास असा अगदी श्रीमंती थाट जरी नसला तरी अनेक कॅम्पग्राऊंड्सवर बेसिक सुविधा असतात आणि त्या स्वच्छ असतात.
आपले गड, किल्ले, आपली संस्कृती म्हणून ऊर बडवत बसायचं आणि आपला माणूस आणि त्याच्या नैसर्गिक स्वाभाविक गोष्टींसाठी अशी उरफोड करून घ्यायची. Sad
भारतभेटींमधे दरवेळी एखादा ट्रेक करायची इच्छा असते. पण या अशा गोष्टींमुळे कधीच जीव धजावत नाही.

हिमालयात ट्रेक करताना तुम्हाला खड्डा करून, प्रातःविधी उरकून, तुम्हाला तो खड्डा बुजवावा लागतो. युथ हॉस्टेल ट्रेकमध्ये हे आवर्जून सांगतात.>>>>> मलाही हेच आठवले. सारपास ट्रेकमध्ये एका निवासी कँप लिडरने तर आमच्यापैकी कोणीतरी टॉयलेट टिश्युजची विल्हेवाट व्यवस्थितपणे न लावल्याने आम्हा सगळ्यांकडून ती साईट स्वच्छ करुन घेतली होती. Sad

इथे जंगलातल्या किंवा वीज नसलेल्या कँपिंगग्राऊंडवर कंपोस्टचे टॉयलेटस असतात. तसे आपल्याकडे अशा ट्रेक्सच्या ठिकाणी व्हायला हवेत.

मी रतनगडावर १२ वर्षांपुर्वी गेले होते. तेव्हा अशी भयंकर परिस्थिती नव्हती. अर्थात तेव्हा ते ठिकाण एव्हढे प्रसिद्धी पावले नव्हते.

सरकार सोयी सुविधा देत नाही हे खरेच पण आपल्याकडे लोकांना सार्वजनिक ठिकाणी टॉयलेटस वापरण्याची कणभर शिस्त नाही हे ही तेवढेच खरे आहे.
आपला कार्यभाग उरकल्यावर तो कार्यभाग नष्ट कसा होईल हे बघण्याची आपली जबाबदारीच नसते. 'हेरिटेज' राखून ठेवणे हा मुद्दा फक्त याच बाबतीत सिरीयसली घेतला जातो.

हेम,
बरे झाले लिहीलेत. पोटतिडकीने लिहीलेत. संतापात सहभागी आहे. लोकांचे खरंच कळत नाही. पूर्वी ट्रेकिंगला ग्लॅमर नव्हतं तेव्हा परिस्थिती जरा बरी होती असे म्हणायची वेळ आली आहे.

इथल्या हायकिंग ट्रेल्स पाहिल्या की स्तिमीत व्हायला होते.

सेनापती +१. नीधप+१

अगदी नेमका विषय, पण मग एखाद्या परदेशी (चायना?) वृत्तपत्रे/मासिकात हगंदरीचा फोटो छापुन आला तर वाईट का वाटून घ्यावे?
अहो इथे शहरात तर स्त्रीयांकरतादेखिल नैसर्गिकविधीच्या सार्वजनिक सोई अजिबात नाहीत.
स्त्रीपुरुषांकरीता गडकिल्ल्यांवर असल्या सोईंची अपेक्षा ये देशी ये सरकारी व्यवस्थेत व्यर्थ आहे.
अन असल्या तरी नीधप म्हणते त्याप्रमाणे, येथिल मठ्ठ निगरगट्ट बेपर्वा बेशिस्त जन्ता त्याचा वापर नीटपणे करत नाही ते नाहीच.
हा आख्खा देश "बाकी सर्व कायदेकानून" बाजूला ठेवुन "मिलिटरीच्या" ताब्यात शिस्त लावण्याकरता द्यायची वेळ आली आहे. किमान गंभिररित्या मिलिटरी शिक्षण अनिवार्य आहे.

हेम, याबद्दल तुम्ही वृत्तपत्रांतूनही लिहा.
सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत अजून बरीच सुधारणा व्हायला हवी.
अपने किये कराये पे पानी फेरना आपल्याला जमत नाही.

हेम,
एक सांगु का? याच तक्रारी याच शब्दात (इंग्रजीत) मी जपानात ऐकल्या आहेत 'फुजीसान' बद्दल. कितपत खरे सांगु शकत नाही कारण मी स्वत: गेले नाही. नियमीत ५ वर्षे जाणार्‍यांकडुन ऐकले आहे मात्र.
आपल्याइतकी परिस्थिती नसणार असे मला उगीचच वाटते, पण फुजीसानवर मलमुत्र असते हे मी ऐकले आहे मात्र.

लोकहो,
स्वच्छतागृहांची मागणी करणार्‍यांनी एक लक्षात घ्या की एकदा नैसर्गिक नसणारे स्ट्रकचर बांधले (स्वच्छतागृह) की त्याची विल्हेवाट, पाण्याचा प्रबंध, पाईपलाईन्स इतर आले म्हणजे ती जागा किती नैसर्गिक राहील?

खुद्द एवरेस्टवरच्या कचर्‍याबद्दल ओरड कमी का होत असते.

वत्सला+१

लोकहो,
स्वच्छतागृहांची मागणी करणार्‍यांनी एक लक्षात घ्या की एकदा नैसर्गिक नसणारे स्ट्रकचर बांधले (स्वच्छतागृह) की त्याची विल्हेवाट, पाण्याचा प्रबंध, पाईपलाईन्स इतर आले म्हणजे ती जागा किती नैसर्गिक राहील?>>>> ह्म्म! जिथे संवंर्धित केलेले किल्ले गड आहेत तिथे अशी सोय शक्य आहे (काही ठिकाणी आहे ही माझ्या माहितीत)

जिथे ते शक्य नाही तिथे निदान गृपने काही रुल्स ठरवून घ्यायला हवेत हे खरे.

महत्वाचा विषय.

सिंहगडावर टॉयलेट आहे.
त्याची अवस्था बघता इतर गडावर जरी टॉयलेट्स ठेवले तरी ते मेन्टेन होणार नाहीतच.

हा आख्खा देश "बाकी सर्व कायदेकानून" बाजूला ठेवुन "मिलिटरीच्या" ताब्यात शिस्त लावण्याकरता द्यायची वेळ आली आहे. किमान गंभिररित्या मिलिटरी शिक्षण अनिवार्य आहे.>>>>> सही बोल्लात लिंबुभौ.

हेम... स्वच्छतेचा हा मुद्दा ऐरणीवर येणे फार गरजेचे होते.

सध्या झालयं काय की ट्रेकिंग ही हौस न रहाता हमखास नफा कमवून देणारी फॅक्टरी बनली आहे. दरवर्षी नविन ग्रुप्स (unregistred groups) तयार होत आहेत. या नफेखोर ग्रुप्सना ना ट्रेकर्सची काळजी असते ना निसर्गाची... परिणामी गडाची स्वच्छता धोक्यात येऊ लागली आहे.

जिथे संवंर्धित केलेले किल्ले गड आहेत तिथे अशी सोय शक्य आहे (काही ठिकाणी आहे ही माझ्या माहितीत) >>> बर्‍याच ठिकाणी आहे. पन्हाळा, रायगड (MTDC), सिंहगडावर आहे.

हेम, याबद्दल तुम्ही वृत्तपत्रांतूनही लिहा > +१

उत्तम विषय...

बायोगॅस हा पर्याय कसा वाटतो.. म्हणजे स्वछ्ताग्रह असण्याची गरज नाही... निचरा होईल आणि वीज ही मिळेल.
आपले सरकार उदासिन असल्याने अजून दहा वर्षे काही होईल असे वाटत नाही... अहो पुण्या मुंबई सारख्या शहरात स्वच्छताग्रुहाची वानवा आहे... किल्ल्यांवर अशा सुविधा तर स्वप्नवत आहेत.

हेम नेमकं लिहिलंयस.
वरील सर्व प्रतिसादांना अनुमोदन.
पूर्वी ट्रेकिंगला ग्लॅमर नव्हतं तेव्हा परिस्थिती जरा बरी होती असे म्हणायची वेळ आली आहे. >>>>रैना +१

लोक्स, जाणार्‍या गृप्सनी हे टाळण्यासाठी काय करता येईल हे सजेशन्स पण लिहा. आत्ता पर्यंत बच्चे कं. चा कॅम्प नेताना हा प्रॉब्लेम आला नाही कारण अजून तरी बेसच्या ठिकाणी स्वच्छता गृह असलेली घरे हेच मुक्कामाचे एक ठिकाण राहील हे बघत आलेलो. पण हे थम्ब रुल्स म्हणून माहीत असलेले केव्हाही उत्तम.

माझी काही सजेशन्स

१) गृप लिडर्सनी जागा ठरवून द्याव्यात त्याची माहिती पार्टिसिपेंटसना द्यावी
२)माती वगैरे गोष्टी नंतर टाकण्याची सुचनाही द्यावी
३)जसे चढताना अ‍ॅरो मार्क्स असतात तसे अ‍ॅरो मार्क्स/ इंडीकेटर्स मार्क केले तर नंतर येणार्‍या गृप्स ना देखील फायदा होईल

हा आख्खा देश "बाकी सर्व कायदेकानून" बाजूला ठेवुन "मिलिटरीच्या" ताब्यात शिस्त लावण्याकरता द्यायची वेळ आली आहे
military pahilyanda internet mhanaje paryaayane MA. BO. vaparayla bandi karel. chaalel kaa?

आता वर्दळ वाढल्यावर हा प्रश्न जास्तच तीव्र होत जाणार. शौचालये बांधून उपयोग नाही, कारण तिथे पाण्याची व्यवस्था कधीच पुरेशी होऊ शकत नाही, आणि मग ती वापरली जात नाहीत.
खरं तर या सूचना मुद्दाम कराव्या लागतात, हे आपल्यालाच लज्जास्पद आहे.

स्काऊट कँपमधे करत असू, तसा विना पाण्याचा खड्ड्याचा संडास तयार करता येतो.
हा संडास तात्पुरता बनवून वापर होतो तसातसा आपोआप बंद होतो. सोबत एक पावडी किंवा तत्सम अवजार असणे गरजेचे असते फक्त.
साधारणतः आपले टॉयलेटचे भांडे असते तशा लांबी रुंदीचा असा लांबट व सुमारे १-१.५ फूट खोल खड्डा खणावा. याची माती तिथेच दोन्ही बाजूंना ठेवायची असते. पाय ठेवायचे जागी. म्हणजे उंचवटा अधिक होईल. हे टॉयलेट वापरून झाले की फ्लश करतो, त्याऐवजी थोडी माती खाली ढकलून द्यायची असते. वापर होतो, तसे हे टॉयलेट आपोआप बुजविले जाते. हवे असल्यास/शक्य असल्यास त्याला चारी बाजूंनी आडोसा करता येतो. ज्यासाठी ४ बांबू अन गोणपाट वापरले जाई. (शहरात लटकणारे वाढदिवसांचे फ्लेक्स चे कापड जुन्याबाजारात मिळते. हे यासाठी आयडियल स्वस्त मटेरियल होइल Wink ) या दिलेल्या मापांत सुमारे १०-१५ वेळा तरी याचा वापर होऊ शकतो.
याची जालावर चित्रे मिळाली नाहीत, पण पुस्तकात वाचल्याचे आठवते. सापडल्यास स्कॅन करून टाकतो.

कवीन.. तिनही मुद्दे लागू आहेत.

राजगड प्रदक्षिणा, पन्हाळा-विशाळ्गड ट्रेक दरवर्षी आयोजित करणार्‍या संस्थांकडे पाहिलेत तर हे उपाय तो योजतातच. खड्याचे संडास बांधणे हे उत्तम उपाय. माती वापरणे हे देखील.

पण वैयक्तिक ट्रेकला जाणार्‍यांकडून हे केले जाईल ही अपेक्षा व्यर्थ आहे. तर मग नफा कमवणार्‍या अनेक हौशी क्लब्सकडून ही अपेक्षा ठेवुच नये. Happy जागा नक्की करणे खुपच महत्वाचे आहे. पुर्वी देखील गडावर जेंव्हा राबता असेल त्याकाळी देखील ह्या बाबतीत काही नियम असतीलच की.

सेनापती,

विचार जरा विचित्र वाटेल, पण किल्ल्यावर जाताना तडस लागेल, इतके खाणे खरेच गरजेचे आहे का ?

गेल्या लोकप्रभात, भूतानमधल्या एका सायकल रेस मधे भाग घेतलेल्या, दोन भारतीय डॉक्टरांचा अनुभव आहे. त्यांना १६ तास सलग सायकल चालवायची होती. त्या दरम्यान त्यांनी केलेल्या, खाण्यापिण्याच्या व्यवस्थेचे
तपशील आहेत. पुरेशी शक्ती देतील, असे द्रवरुप आहार, आता उपलब्ध आहेत.

किल्ल्यावर कोंबड्या कापणे, पाण्याच्या बाटल्या फेकणे.. हे तर मी १० वर्षांपूर्वीच बघितलेय. लिहायला बोटे रेटत नाहीत, पण बियरच्या बाटल्या दिसतील, असा दिवस आता दूर आहे असे वाटत नाही.

पायथ्याच्या गावात प्रातर्विधीच्या सोई ठराविक ठिकाणी असतात. वन डे ट्रेकला आम्ही त्याच सोईंचा वापर करतो. मात्र गडावर रात्रीचा मुक्काम असेल तर सोईस्कर ठिकाणाची पहाणी आदल्या दिवशीच करुन ठेवावी लागते. कॅम्प, पायवाट, समाधी, चौथरे, पाणवठ्याच्या जागे पासून दूर गवताळ प्रदेशात जावे.

पण बियरच्या बाटल्या दिसतील, असा दिवस आता दूर आहे असे वाटत नाही. > त्या तर असतातच. Sad

बियरच्या बाटल्या दिसतील, असा दिवस आता दूर आहे असे वाटत नाही.
>>> काय बोलताय दा?? माझ्या ह्या पाठीवरून सॅक भरून भरून रिकाम्या बाटल्या कित्येक वेळा मी खाली उतरवल्या आहेत. ही गोष्ट चांगली ७-८ वर्षापुर्वीची बर का. Happy बीयरच्या बाटल्या दिसणे ही गोष्ट जुनी झाली आता. Happy

तो लेख मी वाचला होता. तसेही करता येईल. पुरेशी उर्जा देणारे पदार्थ / द्रवपदार्थ देखील चालतील. हे नियमीत ट्रेकला जाणार्‍यांकडून फारतर अपेक्षित आहे. 'हौशी ट्रेकर' यात मोडणार्‍या लोकांचे काय करायचे हा मोठा प्रश्न आहे.

अख्या बाटल्या परवडल्या, पण जोशात ( म्हणजे काय, माहित नाही ) त्या खडकावर आपटून फोडतात, त्याचे तर आणखीनच. माझ्यासमोर कुणी अशी बाटली फोडली, तर त्याच्याच टाळक्यात हाणून दुसरी बाटली फोडीन मी.
काच हा असा पदार्थ आहे, कि तो कधीही नाश पावत नाही.

पण मला वाटते, तात्पुरते खड्डे करुन ते बुजवणे हेच योग्य आहे. पण मग अशा जागा, वारंवार बदलाव्या लागतील. अनेकांची हि जागा, म्हणजे मुक्कामाच्या ठिकाणच्या आजूबाजूचीच असते. त्यापेक्षा वाटेने जरा खाली, उतरून, जागा शोधली तर बरे !

हेम.. अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहेस..

कॅम्प, पायवाट, समाधी, चौथरे, पाणवठ्याच्या जागे पासून दूर गवताळ प्रदेशात जावे. >> हे तर नक्की करावे.. पण आजुबाजूस सरपटणारे प्राणी/जीव तर नाही ना ही पण खबरदारी करुन घ्यावी..... शक्य असेल त्या गडावर खडडे करुन बुजवणे हा पर्याय देखील उत्तम.. नि सेना म्हणतोय तसे ट्रेकपुर्वीच तशी जागा ठरवून देण्यात यावी.. थोडे कष्ट घेउन वा चालून आडवाटेला जावे...

Pages