किल्ल्यांवरची हागणदारी...!

Submitted by हेम on 7 November, 2012 - 12:41

तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट डेस्टिनेशन्स ठरलेली आहेत. नाणेघाटाची गुहा, हरिश्चंद्रगड आणि रतनगड! ...त्याच्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर ही सगळी झुंबड डॉट कॉम राजमाचीला लॉग इन असते! त्यांचा गोंगाट, प्लास्टीक कचरा आणि एकूणच वर्तणुकीचा पारंपारिक त्रास सगळ्यांना नेहमीच होतो आणि हे प्रमाण वाढतंच रहाणार आहे. आणखी एक त्रासाचा प्रकार २ वर्षांपूर्वी पावसाळ्याअखेरीस आम्ही रतनगडला अनुभवला तो म्हणजे या गडावर मुक्कामी असलेल्यांच्या प्रातर्विधीचा! नाणेघाट म्हणा किंवा हरिश्चंद्रगड, राजमाचीला मोठ्या पठारवजा जागा तरी आहेत पण रतनगडावर मुक्कामाच्या गुहांच्या जवळपास सपाटी नसल्याने (..आणि मुळातच रतनगडावर सपाटीचा भाग अतिशय कमी आहे) आणि जोडून कसल्यातरी आलेल्या सुट्ट्यांमुळे मुक्कामी असलेल्यांची संख्या मोठी असल्याने प्रातर्विधीच्या कार्यक्रमाला काहीच शिस्त नव्हती. रतनगडावर दरवाजा ओलांडून वर आलं की उजवीकडे वरील बाजूस राणीचा हुडा नांवाने ओळखला जाणारा गोल बुरूज आहे. तिथून थोडं डावीकडे वर पाण्याची टाकी आहेत. रतनगडावर मुक्कामी असणार्‍यांना पिण्यासाठी या टाक्यांचं पाणी सर्वात जवळ..! या टाक्यांजवळ कोंबड्यांच्या पिसांचा पसारा आणि इतर मद्य-मांसाहारी घाण टाकलेली होती. ( ..हा त्रास माहुलीलादेखील होतो) इथून मागील बाजूस जाणार्‍या पायवाटेवरच हागणदारीला सुरुवात झाली होती. आमच्याबरोबर दोघे- तिघे रतनगडाचे पहिलटकर होते, त्यांनी ही घाण पाहून तिथूनच कलटी मारायच्या गोष्टी सुरु केल्यावर मात्र त्यांना चुचकारत कसं तरी पुढे नेलं. पुढील गडदर्शनाने गेलेला मूड परत आला हा भाग वेगळा पण हा अनुभव वाईट्ट होता.
गडावरील जाण्यायेण्याच्या वाटा, स्मारके इ. जागा टाळून मंडळींनी आपले विधी उरकायला हवेत . ..पण हल्ली होतं कांय की सुट्टीच्या दिवशी अनेक गट किल्ल्यावर मुक्कामी असतात, त्यांत वर वर्णिलेली जनताच भरपूर असते. सकाळी पॉटघाईच्या वेळी जागा शोधायला वेळही नसतो अशा वेळी मुक्कामी असलेल्या प्रत्येक गटाच्या नेत्याने आदल्या रात्री आपल्या गटाला प्रातर्विधीच्या जागेबाबत सूचना देणं अपेक्षित म्हणण्यापेक्षा अनिवार्य असतं. ते होत नाही आणि मग किल्ला दर्शनाच्या वेळी हा सगळा त्रास सोसण्याची वेळ बाकी जनतेवर येते. आता बायोडिग्रेडेबल वगैरे असलं म्हणून कांय कुठेही टाकायचं की काय? काही सूचनांचा अवलंब केला तर खूप त्रास कमी होईल. त्या म्हणजे - आदल्या दिवशीच नेत्याने सर्व सहभागींना योग्य जागा दाखवून ठेवावी. मुली/ महिलांना वेगळी जागा ठरवून ठेवावी. महत्त्वाची सूचना म्हणजे दगडाने छोटा खड्डा करावा आणि विधी आटोपल्यावर वर माती टाकावी याचे कारण एखादा कँप असेल आणि प्रातर्विधीची जागा जरी लांब असली तरी कँपवर माशांचा त्रास होतो तो होत नाही, हा अनुभव आहे! किमान एवढया सूचना अवलंबल्या तरी आपले व इतरांचे गडदर्शन सुखकर होईल.
खरं तर हा खरडायचा विषय नव्हे पण भोग भोगल्यावर तितकाच महत्त्वाचा वाटला म्हणून खरडलं.

-हेमंत पोखरणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग त्यामानाने डॉग वॉकर्स जास्त जबाबदार वाटतात. डॉग पूप टिश्यूने उचलून. डिग्रेडेबल गार्बेज बॅगमध्ये ठेवून कचरापेटीत टाकणे आजिबात अवघड नाही. एकदा शिस्त लागली की. ट्रेकिन्ग च्या सामानात गार्बेज बॅगस व टिश्यू पॅक करता येइल की. सामाजिक स्वच्छतेचे संस्कार आजिबातच नाहीत. सांगायला गेले तर बाटली डोक्यात मारतील.

सेना, हौशी ट्रेकर म्हणजे नेमके कोण? त्याची काय व्याख्या आहे?

आमच्या नेहमीच्या ट्रेक गृपमधेही एखाद दुसरा नियमित ट्रेकर "कचरा" जमा करुन योग्य जागी फेकण्यास टाळं टाळ करण्याच्या मोहात पडलेला बघितलाय. म्हणून विचारलं

मुळात लहानपणापासून ना.शास्त्र हा फक्त कागदावरचा विषय म्हणून शिकतो. तो वागण्याचा/जगण्याचा भाग असायला हवा हा सेन्स रुजवला जात नाही.

अश्विनी, गार्बेज बॅग योग्य पर्याय नाही. या बॅगा मग कड्यावरुन भिरकावल्या जातील Happy खालच्या गावात अस्मानी संकट. नकोच ते Happy

खड्डा करणेच चांगले.

मामी, आमच्या इथले डॉग वॉकर्स स्वतःही बेशिस्त आहेत आणि डॉग्जच्या बबातीतही बेजबाबदार. व्यक्ती व्यक्ती वर अवलंबून आहे हो हे

कवीन.. डोंगरातले नियम न पाळणारे ते हौशी.. फक्त मजा करायला जाणार आणि कचरा करून येणार. तुझ्या ओळखीत असा कोणी असेल जो कचरा उचलायला टाळाटाळ करतोय तर त्याला ट्रेकर का म्हणावे हा प्रश्न आहेच. तसेही सर्व नियमीत ट्रेकर कचरा करतच नाहीत हे देखील चुक. मी देखील पुर्वी असे काही नग पाहिले आहेत.

दिनेशदा... अस्मानी संकट. Proud

सेना, ट्रेकर्ससाठी नियमावली / आचारसंहिता करुन, तुम्ही सगळ्यांनी आपापल्या ब्लॉगवर ठेवा. कुठल्याही गडाच्या माहितीसाठी, कुणी ते ब्लॉग शोधले तर त्याला, ते दिसले पाहिजे.

आपल्याकडे, पूर्वतयारी वर पण चांगली माहिती जमा झालीय, ती पण वापरु शकता.

तर त्याला ट्रेकर का म्हणावे हा प्रश्न आहेच. >>> तसं नाही रे सेन्या, ते बाकी गोष्टीत उत्तम आहेत. नवख्यांना नीट चेढवणं उतरवणं, ट्रेक मधे करावी लागणारी बाकीही बरीच कामं वगैरे बाबतीत १० पैकी ९ मार्क देता येतील. Happy
ह्या एका बाबतीत १० पैकी ० गूण Sad (आम्ही कचरेवाल्या होतो मग अशावेळी)

सेना, ट्रेकर्ससाठी नियमावली / आचारसंहिता करुन, तुम्ही सगळ्यांनी आपापल्या ब्लॉगवर ठेवा. कुठल्याही गडाच्या माहितीसाठी, कुणी ते ब्लॉग शोधले तर त्याला, ते दिसले पाहिजे.>>>+१

अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्तित केला हेम...
आपण लोक तर त्याच भान ठेवतो... पण सर्वांनी याची काळजी घ्यायला पाहिजे..

मग त्यामानाने डॉग वॉकर्स जास्त जबाबदार वाटतात. डॉग पूप टिश्यूने उचलून. डिग्रेडेबल गार्बेज बॅगमध्ये ठेवून कचरापेटीत टाकणे आजिबात अवघड नाही.>> बायोडिग्रेडेबल बॅग्स, कचरापेट्या..... एक तर भारतात फार अमुलाग्र बदल झालेत, सगळे भारतीय मलबार हीलवर रहायला गेलेत किंवा भारतातील किल्ले अमेरीका/युरोपात हलवले आहेत. पुर्वी हे नव्हतं.

माझ्याप्रमाणेच त्रासलेल्या सगळ्यांचे, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
किल्ल्यांवर शौचालये बांधणे अजिबात अपेक्षित नाहीये. ट्रेकर्सनी कांय करायला हवं ते लेखाच्या शेवटी मांडलेलं आहेच. पायवाटांपासून दूर छोटा खड्डा खणून ससे पकडून झाल्यावर मातीने बुजवला, इतकी साधी गोष्ट
सगळ्यानी पाळली तरी पुरे. युथ हॉस्टेलच्या ट्रेकमुळेच ही गोष्ट मला माहित झाली. चक्रम हायकर्सच्या सह्यांकनातही हीच पद्धत अवलंबतात. सह्याद्रीत याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कँपसाईटवर कुठेही माशांचा त्रास होत नाही.

या सूचना मुद्दाम कराव्या लागतात, हे आपल्यालाच लज्जास्पद आहे. - +१

विचार जरा विचित्र वाटेल, पण किल्ल्यावर जाताना तडस लागेल, इतके खाणे खरेच गरजेचे आहे का ? अनुभवातून सांगतो.... रेंज ट्रेक करतांना, मुक्कामाठिकाणी समोर कितीही चमचमीत अन्न ठेवलं तरी अजिबात जास्त खाल्लं जात नाही. शरीराचं घड्याळ त्यावेळी बरोब्बर चालतं.

कविन.. न विचारताही मित्रांना पाठवला असता तरी हरकत नव्हती.

पायवाटांपासून दूर छोटा खड्डा खणून ससे पकडून झाल्यावर मातीने बुजवला, इतकी साधी गोष्ट
सगळ्यानी पाळली तरी पुरे.
+१००

किल्ल्यावरचे काय, पाणी, फ्ल्श असताना सुद्धा लोकं वापरत नाहीत व तसेच बाहेर येतात. त्यात वेस्टर्न संडासात बसायचे कसे पण काहींना कळत नसते. बाहेरच घाण...
इतका राग येतो.

लोहगडावर गेले होते गेल्या वर्षी इतका कचरा बाटल्यांचा.... :रागः

>>>रेंज ट्रेक करतांना, मुक्कामाठिकाणी समोर कितीही चमचमीत अन्न ठेवलं तरी अजिबात जास्त खाल्लं जात नाही. शरीराचं घड्याळ त्यावेळी बरोब्बर चा>>><<
अगदी बरोबर. भरपूर ग्लूकॉन डी व सी पाणी असले की खूप होते.

इथे (अमेरीकेत) ट्रेकर्स साठी वायटॅमिन बी चे शॉट्स मिळतात.. इन्संट एनर्जी म्हणून. ते प्यायले की काहीही गरज लागत नाही.

सुका मेवा खावून राहिले तरी रहातो माणूस्(स्वानुभव) ट्रे़कींग करताना.
काजू , खारीक टाळावे. Happy

भरपूर ग्लूकॉन डी व सी पाणी असले की खूप होते.
.. ट्रेक करतांना ग्लुकॉन डी अजिबात घेऊ नये. थोड्या थोड्या वेळाने पाणी पित रहावे. मला फर्स्ट एड ट्रेनिंगच्या वेळी डॉक्टरांनी तसेच कँपवरही अनेक तज्ज्ञांनीही (ट्रेकर असलेले) हेच सांगितले आहे. नेमकं कारण मी विचारून पोस्ट करतो, पण 'नो ग्लुकॉन डी' हे नक्की!!
विषयांतर होतंय खरं पण इथे कुणाला याबद्दल माहिती असेल तर लिहा रे..

चांगला विषय.

पायवाटांपासून दूर छोटा खड्डा खणून ससे पकडून झाल्यावर मातीने बुजवला, इतकी साधी गोष्ट
सगळ्यानी पाळली तरी पुरे. >>> +११११

हा लेख मला फेसबूकवर शेअर कसा करता येईल ?

हा मुद्दा आणि त्यातुन बाकिच्याना होणारा त्रास जास्त लोकाना कळायला हवा.

ओक! हेम, काही स्पे. कारण आहे का त्यामागे? कारण बर्‍याचशा ब्लॉग्ज वर "ट्रेकला नेण्याच्या वस्तू" मधे ह्याचा समावेश आहे.

ओ. आर. टी. (इलेक्ट्रॉल ) किंवा श्रीजल हे चांगले पर्याय आहेत. घाम आल्यावर शरीरातून साखर नाही तर क्षार बाहेर पडतात, त्यांची भरपाई होणे गरजेचे आहे. ग्लुकोज ने फक्त शक्ती मिळते, क्षार नाहीत.

मुख्यतः ग्लुकॉन डीची सवयच लावू नये.. थकवा जाणवू दे वा नको.. पण कोणी जर ग्लुकॉन डी पुढे केले तर मला ती लहान पोरासाराखी नुसती भुकटीच तोंडाला लावायला आवडते.. Proud Wink

परत एक मुद्दा, या भुकट्या थेट तोंडात घालू नयेत, त्या पाण्यात विरघळवून प्याव्यात.

असो, पण माझे हे पोस्ट, इथे गैरस्थानी आहे.

दा. ही चर्चा ट्रेकची पुर्वतयारी बाफवर होउ शकते. Happy तिथे कॉपी पेस्ट करून ठेवा हवतर. Happy

Pages