'हे गोपाळराव...हे गणपतराव..' - आशूडी

Submitted by संयोजक on 22 September, 2012 - 09:55

'हे ईश्वरराव... हे पुरुषोत्तमराव...' हे श्याम मनोहरांचं पुस्तक वाचून संपवलं, तेव्हा गोपाळकाला नुकताच संपलेला आणि गणपती 'आम्ही येतोय...' अशी हाळी देत उंबरठ्यावर उभे. त्या पुस्तकाच्या प्रभावातून सुचलेलं हे स्फूट.

****
हे गोपाळराव...हे गणपतराव..

गेल्या महिन्यात गोपाळराव आले होते. ते काही सामान्य माणूस नव्हेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची तयारी नागरिकांनी एकदम उत्साहात केली होती. हल्ली राजकारणातील लोकांचे, म्हणजे फक्त नेत्यांचेच नाही, कार्यकर्त्यांचेही मोठे पोस्टर, होर्डिंग लावून अभिनंदन करण्याची पद्धत आहे. मग त्यात अभिनंदन करणार्‍या खूप लोकांचे फोटो असतात, नावांची यादी असते. कधी कधी काव्यमय शुभेच्छाही असतात. तर गोपाळराव काही सामान्य माणूस नव्हते, पण ते सध्याच्या राजकारणातले कुणी नेते वा कार्यकर्तेही नव्हते. मग लोकांना कळेचना की यांचे स्वागत करायचे तरी कसे? सवयीप्रमाणे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावात जागोजागी मोठी पोस्टरे लावली. लोकांना माणसामागचा माणूस शोधायची सवय लागली आहे. म्हणजे, 'ब' हा माणूस (हो, 'ब' च, नेहमी पहिले 'अ' का आठवतो, लिहितो आपण? पहिले अक्षर म्हणून 'अ' शिकल्याचा एवढा जबर परिणाम आयुष्यभर सोसावा लागत असेल तर नशीब पहिले 'ळ' नाही शिकलो.) फक्त जेवढा दिसतो तेवढा तो नाहीये. तो अजून पण काय काय आहे. तो काय आहे हे जाणून घेऊन लगेच त्याचे पोस्टर लावायचे. हे फार आध्यात्मिक होतंय. पण हे तर गोपाळरावांनीच कुरुक्षेत्रावर सांगितल्याप्रमाणे झाले. ते तर म्हणाले होते, सगळ्यांमध्ये मीच आहे, मला शोधा. इथे लोकांनी त्यांच्यातल्या त्यांनाच शोधून दाखवले. म्हणजे लोक आध्यात्मिक होतायत. फक्त पोस्टर लावून?

तर गोपाळराव प्रत्येकाकडे वेषांतर करून गेले होते. आमच्याकडे बाळ होऊन आले होते, शेजारच्या कुलकर्ण्यांकडे तारुण्यात गेले होते. पण त्यांच्याकडच्या फोटोची आणि त्यांची संगती जुळेना म्हणून किती वेळ कुलकर्ण्यांनी त्यांना घरातच घेतले नाही. शेवटी मला फेसबुकवर जाऊन नितीश भारद्वाजचा बिनमुकुटाचा आणि बिनकुंडलांचा फोटो दाखवावा लागला तेव्हा कुठे गोपाळरावांना दहीपोहे मिळाले.

आता गणपतराव आलेत. आमच्याकडे म्हणजे दर महिन्यात कोणीतरी पै पाहुणा असतोच. गणपतरावांकरता लोकांनी एका नवेच स्वागत केले आहे. त्यांच्या फोटोशेजारी 'मी येतोय!' असे लिहिले आहे. आता ही धमकी आहे की सुचना आहे की साधं आपलं सांगणं आहे, 'मी येतोय, घरी कुणीतरी थांबा, कुलूप बघायला लावू नका. जमलं तर स्टेशनवर न्यायला या.' हे विचारणारं आहे. मात्र ते पोस्टर स्वागत नसून ते स्वगत आहे हे मी विनूला समजावयाचा खूप प्रयत्न केला. तर तो म्हणे, स्वगत असे काही नसते. स्वगत जर प्रकट दुसर्‍याला सांगितल्याशिवाय समजत नसेल तर ते स्वगत नाहीच. तो म्हणाला, नाटकात दाखवतात तशी स्वगताची लांबलचक वाक्ये आपण कुणाच्या स्वागतालाही बोलत नाही. मी जर असे स्वत:शी तात्विक लांब बोलत राहिलो तर मला वेड लागेल. कारण फक्त सर्व वेडे फक्त स्वगत बोलत असतात. वेडे नसलेल्या माणसांचे स्वगत हे फक्त नाटकात असते. कारण ते फार नाटकी असते. विनू हे सारे बोलत असताना विचित्र हातवारे आणि हावभाव करत होता. ते बघत असताना त्याचे शब्द ऐकायला विसरले. त्यामुळे ते मला खरंतर स्वगत वाटत होते. मी जर हे त्याला सांगितले असते तर त्याने या कल्पनेचे मुळीच स्वागत केले नसते. मी गप्प बसले. तसेही आपल्या लोकांना बोलायला लागले कि समोरचा ऐकतोय किंवा नाही याने काहीही फरक पडत नाही. तावातावाने तात्विक बोलणार्‍यांच्या बाबतीत मी हे पाहून ठेवले आहे.

तर असे वाजत गाजत गणपतराव घराघरात आले. त्यांनी तर त्यांचा पोर्टफोलिओच बनवायचा ठरवले आहे. किती विविध वस्त्रालंकार आणि भावमुद्रा! प्रत्यक्ष घरात आणायच्या आधी महिना महिना दुकानाच्या फळ्यांवर बसायची शिक्षा गणपतरावांना केली जाते. तिथे निमूट बसून रस्त्यावरची बेशिस्त रहदारी, पुराच्या पाण्यासारखे फक्त पुढे पुढेच सरकत राहणारे रस्त्याकडेचे भाजीवाले, फळवाले आणि रस्ता, शाळा, मैदान, बाग यात फरक करायला न शिकलेली लहान मुले बघत त्यांचा वेळ मस्त जातो. आपण हेच सारे बघत वा बसची किंवा कुणाची तरी वाट बघत उभे वा बसलेले असतो तेव्हा मात्र आपल्याला या सार्‍याचे प्रचंड घर्षण सोसावे लागते. हे कायाय? एकाच दृश्याचा परिणाम आपल्यावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा कसा होतो? नेमकी कोणत्या वेळी या घर्षणाची सक्ती होते, हे लिहून ठेवायची प्रेरणा झाली पाहिजे.

गणपतराव काय किंवा गोपाळराव काय दोघांचेही मी एक पाहून ठेवलं आहे. सतत परीक्षा घ्यायची असते त्यांना. बघू बरं या पोरांना आमच्यासारखी दहीहंडी फोडता येते का? बघू बरं कुणाला सर्वात सुंदर उकडीचे मोदक करता येतात? त्यांचं घरी येणं म्हणजे 'होम मिनिस्टर' कार्यक्रम लागल्यासारखे वाटते. काहीतरी पेच आणि दबावाचे घर्षण. ही सक्ती नसते; पण सक्ती करून घ्यायची आतूनच प्रेरणा होते. हे दोघेही घरी आले की साधे चहापाणी, पोहे यावर भागत नाही. ते माहेरचे पाहुणे असल्यागत गृहिणी सुंदर सुंदर पदार्थ करतात. लहान मुले बर्थडे साजरा करावा तशी गणपतरावांच्या खोलीची सरप्राईज सजावट करतात. पुढ्यात केक ठेवत नाहीत अजून तरी. गणपतराव जितके आध्यात्मिक तितके वेल्हाळ आहेत. ते मुलांना कधीच नाराज करत नाहीत. त्या आराशीने त्यांचे डोळे कितीही दुखू लागले, त्या झिरमिळ्या त्यांच्या सुपाएवढ्या कानांना गुदगुल्या करत असल्या किंवा ते नवे कोरे आसन, वस्त्र कितीही टोचत असले तरी गणपतराव सोंडेकडेने हसतच असतात. त्यांचा हसताना एकमेव दात दिसत असल्याने ते लहान मुलांना 'दात पडले आणि कुणीही चिडवले तरी हसतच राहायचे' असे सांगतात. तर मोठी माणसं आपणहूनच 'लंबोदर' असण्यात काहीच वावगं नाही हा त्यांचाच संदेश आहे असे समजून चालतात.

गोपाळरावांच्या आणि गणपतरावांच्या बाळलीला फार प्रसिद्ध आहेत. गोपाळराव पुढे मोठे झाले तरी त्यांच्या लीला थांबल्या नाहीत. त्यांना वेगवेगळी नावे मिळाली इतकेच. प्रमोशनमुळे माणूस पुढे गेला तरी त्याचे गुण, स्वभाव, दोषही पुढे येतात पण त्यांचे रूप बदलते. प्रश्नाचा चुकीचा आकडा घालून उत्तर लिहिणार्‍या मुलाचे शाळेत फक्त मार्क जातात तोच पुढे मंत्री होऊन चुकीच्या ठिकाणी सही केली की त्याचे आदर्श घोटाळे होतात. चुका त्याच, रूप वेगळे. कोणत्या चुकांचे भविष्यात काय रूप होऊ शकते यावर संशोधन केले पाहिजे. तर मग यांच्या बाळलीला. लहान मुले निष्पाप असतात की त्यांच्यात शक्ती नसते म्हणून त्यांना आपण माफ करतो? माफी करायला आपल्याला ठोस कारण हवे असते. पण कर्जबाजारी शेतकर्‍यांप्रमाणे मुलं सारखी चुकाच करतात म्हणून त्यांना ‘निष्पाप’ योजनेंतर्गत घाऊक शिक्षामुक्ती दिली जाते. अर्थात सरकारची ही योजना तळागाळात पोहोचेपर्यंत कधी कधी दोन रट्टे दिलेही जातात. तर ही सगळी कार्यवाही लोकांना कळावी म्हणून गोपाळराव आणि गणपतराव दोघांनीही चिकार बाळलीला करून आपापल्या आयांना जेरीस आणले. मग गणपतरावांच्या आईने त्यांच्याकरता ब्लॅकजेरीच आणला! तोच ते अजूनही वापरत आहेत.

गोपाळराव अन गणपतराव, दोघांचा पाय घरात टिकेल तर शपथ. जन्म झाल्या झाल्या तुरुंगातून पळ काढला, मग गोकुळात पळापळ. मग मथुरेत कंस चळचळ. तिथून हस्तिनापूर, खांडववन, पांचाळ, मगध, अंगदेश अशी धावपळ आणि शेवटी कुरुक्षेत्रावरची भव्य पळापळ! बालपणीही घरात सापडतील तर फक्त आईने शिक्षा केलेल्या अवस्थेत. गणपतरावांनी तर कहरच केला. बालपणीच पृथ्वीप्रदक्षिणा उरकून घेतली. आम्हाला चाळीसाव्या वर्षी अमरनाथला जायचे तर म्हातारे झाल्यागत वाटते. दोघंही धाकटे होते पण थोरल्या भावांशी काय भांडायचे, काय खोड्या काढायचे! तीच सवय ते घरात आले कि घरातल्या पोरांना लागते. दहीहंड्या बघत, गणपती बघत गावभर उंडारायचं. कुणी काही बोलत नाही. यशोदाबाई अन पार्वतीकाकूंचे आदर्शच तसे ना. नंदाशेठ अन महादेवरावांचे लक्ष कुठे होते घरात पोरांकडे? एक तरी आठवण आहे का त्यांनी पोरांना कधी अभ्यासाला बसवलंय, का जेवू घातलंय? महादेवरावांचे तर मुलुखावेगळेच. तो पार्वतीकाकूंच्या उटीचा आणि गणपतरावांच्या पहार्‍याचा किस्सा त्रिखंडात गाजला. कुठं म्हणून तोंड दाखवायची चोरी झाली पार्वतीकाकूंना. तेव्हापासून त्यांनी महादेवरावांना गणपतरावांपासून चार हात लांबच ठेवले आहे. त्याच सांगत होत्या परवा, "शप्पथ, खोटं नाही सांगत! एवढा कसा संताप बाई ..लेकराला गजमुख लावायची वेळ आली! हाताला लागला नशीब. आता रोज आरशात बघून भोकाड पसरतो म्हणून मोदकांचे ताट पुढ्यात ठेवावे लागते. रोज नारळ खवा, उकड करा. आता मी इतकी एक्स्पर्ट झाले आहे तरी जरा कुठं वाट्याला कौतुक नाही. इथे आहेत फक्त नंदी आणि नाग. मानडोले कुणीकडचे! यांच्यासमोर कुणाची एक अक्षर काढायची टाप नाही. इथे या कैलासपर्वताच्या रिमोट लोकेशनवर धड इंटरनेटही नाही. त्यामुळे घरी कुणाला कदर नाही तर मायबोलीवरच्या सुगरणींसारखी इथे चढाओढ नाही कि प्रकाशचित्र दाखवायची सोय नाही. पिकतं तिथं विकत नाही हेच खरं!"

गोपाळराव अन गणपतराव दोघेही आले कि नुसते उत्साहाचे आणि चैतन्याचे वारे वाहतात. मित्र मंडळे दहादहा फुटांवर मांडव उभारतात. मैत्रिणी मंडळे नसतात असे नाही, त्याविषयी नंतर कधीतरी. तूर्तास ती नामानिराळी आहेत असे समजू. गोपाळरावांचे आणि राधाक्कांचे, रुक्मिणीबाईंसोबतचे अशा काही पोजेसमध्ये हे तीस तीस फुटी फोटो लावतात कि.. की त्यांचे त्याना पण आठवत नाही..! यावरूनच गोकुळात, द्वारकेत तेव्हाही स्टिंग ऑपरेशन होत असल्याची शक्यता इतिहासकारांनी वर्तवली आहे. पुन्हा गोपाळरावांना वर जाऊन सत्यभामेला सामोरे जावे लागते ते वेगळेच. फार त्रास होतो त्यांना, पण सांगता कुणाला! म्हणून एक दिवसातच गोपाळराव इथून काढता पाय घेतात. गणपतरावांचे तसे नाही. पण बिचार्‍याचे दुखणे वेगळेच आहे. दहा दिवस त्या झगमगत्या, गरगरत्या रंगीत लाईटस मध्ये, भव्य दिव्य मूर्तींच्या सान्निध्यात, त्या भयंकर राक्षसांच्या गडगडाटी हास्याच्या आवाजात, विजांच्या कडकडाटात शांत बसून राहायचे म्हणजे सोपे काम नाही! कधी कधी तर डायानासोर, अ‍ॅनाकोंडा पण असतात अवतीभवती. आणि सुपाएवढ्या कानात हलकट जवानी. येताना ढोल ताशे जाताना ढोल ताशे. निदान त्यात लय असते, ताल असतो, शिस्त असते. पण सर्वात त्यांना खुपतात त्या देखाव्याच्या वर्णनातल्या, बसल्या जागी दिसणार्‍या दुकानाच्या पाट्यांवरच्या चुका. पोरांना तीन शब्द धड लिहिता येत नाहीत याचा त्यांना अतिशय खेद वाटतो. नीट लिहीत नाहीत, म्हणून बाकीचे नीट वाचू शकत नाहीत. बुद्धीचे, अभ्यासाचे डिपार्टमेंट त्यांच्याकडेच असल्याने वर जाऊन सगळा खराखुरा रिपोर्ट द्यावाच लागतो. उदाहरण घ्यायचे तर मोठ्याने वाचून दाखवा बरे हुबेहूब लिहिले तसे : 'घटत्कोचाचा वध', 'प्रचडांसुराचा वध', 'लांवन्या ब्युटी पार्लर', 'भाचकी डाळ मिळेल.' हे असले रिपोर्ट वरपर्यंत गेले कि त्यांना इथे नवीन ऐकलेल्या 'चिकनी चमेली', 'सिंघम' 'छम्मक छल्लो' वर न नाचता फक्त 'गणराज रंगी नाचतो' वरच नाचायची परवानगी मिळते. म्हणजे तमाम जनतेने गणपती डान्स केला तरी गणपतरावांना मात्र ती सोय नाही! म्हणून त्या स्पीकर्सच्या भिंतीजवळ बसून ते गुपचूप मनातल्या मनात नाचून घेतात. अन वर गेल्या गेल्या ते संपूर्ण दहा दिवस विपश्यना करतात.

नुसता लहान मुलांसमोर आदर्श ठेवून गोपाळराव अन गणपतराव शांत बसले नाहीत तर पुढे तारुण्यातही कसे वागावे याचे आदर्श घालून दिले. एकापेक्षा एक किंवा अनेक 'ठिकाणी' लक्ष केंद्रित करून शिवाय आपणच 'केंद्रस्थानी' कसे राहता येईल हे तमाम पुरुषजातीत फक्त यांनाच जमले. इथे लोकांना दोन मोबाईल - कशाला, दोन सिमकार्डे सांभाळता येत नाहीत! तर असे हे गणपतराव अन गोपाळराव. दोघेही कमालीचे आध्यात्मिक आणि तरीही सांसारिक. एकामुळे महाभारत घडले, एकाने लिहिल्यामुळे ते कळले. आता घडले आधी की लिहीले आधी हे त्या दोघातलं सनातन घर्षण. शेवटी ते ही माणूसच आहेत. आं!!??

****

-- आशूडी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

mast lihilays...
bhokad... mabo warchya sugrani....
sevatahi chhan !

ते माहेरचे पाहुणे असल्यागत गृहिणी सुंदर सुंदर पदार्थ करतात. लहान मुले बर्थडे साजरा करावा तशी गणपतरावांच्या खोलीची सरप्राईज सजावट करतात. पुढ्यात केक ठेवत नाहीत अजून तरी. >>>>>>>>>> Proud
ब्लॅकजेरी>>> Happy
आता रोज आरशात बघून भोकाड पसरतो म्हणून मोदकांचे ताट पुढ्यात ठेवावे लागते>>>>>>>>>> Lol
गणपती डान्स>>>>>>>>>> Proud उद्या

मस्त Happy

छानच Happy

'अ' शिकल्याचा एवढा जबर परिणाम आयुष्यभर सोसावा लागत असेल तर नशीब पहिले 'ळ' नाही शिकलो. >> Lol खरेच नशिब! 'ळ' म्हणजे फारच घर्षण आहे. Proud मस्त आहे खुसखुशीत. गणपतराव गोपाळरावच काय, पण शंकर्रावांना देखील आवडेल! Happy

आता नवरात्रात तोरणं येतील.. त्यामुळे पुढची असाईनमेंट लग्गेच घ्या.. 'हे आदिमाते.. हे खादीनेते!'

मस्तच!
>>माणसामागचा माणूस
Biggrin

>>घटत्कोचाचा वध
म्हणून बघितले.

लेख एकदम आवडला.

'मी येतोय!' >> एका फ्लेक्स वर ते वाचून इतके हसायला आले होते की बास!

पूर्ण लेख जबरी जमलाय. Happy

श्याम मनोहर असे सुरुवातीलाच जाहीर केल्यावर लेख थोडा क्लिष्ट किंवा जडभारी होतोय का काय आणि वाचता वाचताच निम्मे वाचक पळून जातायत का काय (अजूनही शक्यता नाकारता येत नाही. Proud ) अशी शंका होती. तरी तुम्ही चिकाटीने शेवटपर्यंत आस्वाद घेतलात याबद्दल धन्यवाद सर्वांना! Happy