तुज शरण गणनाथा - सूरमाय (५)

Submitted by संयोजक on 21 September, 2012 - 11:29


तुज शरण गणनाथा (गीतकारः चैतन्य दिक्षीत)

तुज शरण गणनाथा गणनाथा
मज सांभाळी एकदंता ||धृ||

मिळे मनाला शांती अनुपम
जळती विघ्ने फिते दुरित तम
ईप्सित जे ते लाभे उत्तम
कृपादृष्टि तव होता ||१||

अजाण बालक मातेपुढती
कर जोडुनिया करी विनंती
पुत्र जरी का कुपुत्र जगती
माता नसे कुमाता ||२||

चिंतामणि तू तू मंगलनिधि
देइ देइ मज अंत:शुध्दी
पार कराया हा भवजलधी
चरणी ठेवितो माथा ||३||

संगीत/ संयोजन/ वाद्ये प्रॉग्रॅमिंगः योग
गायकः योग


चैतन्य चे मनोगतः
मी दर संकष्ट चतुर्थीला उपास करतो आणि उपास सोडण्यापूर्वी किमान एकदा तरी अथर्वशीर्ष म्हणतो. पण ऑगस्ट मधल्या संकष्ट चतुर्थीला मी अथर्वशीर्ष म्हणण्याचा कंटाळा केला. ही गोष्ट माझ्या मनाला खूप खात होती. दिवसभरातून एकदा तरी ते आठवायचं आणि मी बेचैन व्हायचो.आणि असेच एकदा सकाळी देवपूजा करत असताना 'तुज शरण शरण गणनाथा, मज सांभाळी एकदंता' ह्या ओळी सुचल्या. लगेचच पुढची दोन कडवीही सुचली. सुचताना ते काहीसं चालीतच सुचलं होतं. खरं तर देवाची माफी मागणं म्हणजे एखाद्या लहान मुलाने आईसमोर उभं राहून, 'मी चुकलो, पुन्हा असा नाही वागणार' हे म्हणण्यासारखंच. पण ते म्हणायचाही धीर होत नाही, उगाचच आपण आयुष्य गंभीर करत राहतो असे काहीसे विचार हे सुचल्यावर मनात आले. नुकतीच 'सूरमाय'ची ओळख झाली होती, म्हणून सगळ्यांना ती दोन कडवी आणि मला जसं सुचलं ती चाल बासरीवर वाजवून पाठवली. गाण्याच्या दृष्टीने त्यातलं दुसरं कडवं (अजाण बालक मातेपुढती) हे गाण्याच्या शेवटी शोभेल असं होतं म्हणून मधे अजून एखादं कडवं लिहायचं असं ठरलं. काही दिवसांनी तेही सुचलं आणि योगला पाठवलं. 'पुत्र जरी का कुपुत्र जगती, माता नसे कुमाता' ही कल्पना आद्य शङ्कराचार्यांच्या 'देव्यापराधक्षमापनस्तोत्रातली' पण अशीच सुचली, त्याच भावनेतून सुचली. गाणं लिहून झाल्यावर खूप शांत वाटलं होतं. हे गाणं लिहून व्हावं म्हणूनच मला त्या चतुर्थीला अथर्वशीर्ष म्हणायचा कंटाळा यावा अशी बाप्पांची इच्छा होती असंच मला आता वाटतं.
मला सुचलेली चाल गंभीर होती. माफी मागायच्या वेळी शब्दच तोंडातून फुटत नाहीत अशी काहीशी.

योगने मात्र वेगळीच आणि खूपच छान चाल लावली. यातून एकाच शब्दरचनेकडे दोन माणसं कशी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतात हेही अगदी 'सोदाहरण' समजले. योगने लावलेली चाल गंभीर नाही पण शब्दातली आर्तता आणि भाव त्यात कुठेही कमी पडत नाही. माझी आई देवपूजा झाल्यावर नेहमी 'भोळं-भाबडं गोड मानून घे' असं देवाला म्हणते. मला अगदी तेच म्हणावंसं वाटतंय. बाप्पांनाही आणि सर्व माबोकर मंडळींनाही. 'भोळं-भाबडं गोड मानून घ्या'!


योग चे मनोगतः

चैतन्य ने जेव्हा गीताच्या पहिल्या दोन ओळी लिहून पाठवल्या होत्या तेव्हाच मीटर व चाल डोक्यात तयार झाली होती... (हे विचीत्र वाटू शकते, पण तसे घडले खरे.) मग त्याने जेव्हा संपूर्ण गीत लिहून पाठवले तेव्हा आधी सुचलेली चाल कडव्यांच्या शब्द/मीटर ना लागू होते आहे याचे समाधान वाटले.

गीतातील शब्द वाचल्यावर गीतकाराच्या खोल विचारांची बैठक अगदी ठळकपणे समोर येते.. "माता नसे कुमाता" किंवा "देई देई मज अंतःशुध्दी"... हे शब्द ठरवून लिहीता येत नसावेत, ते अनुभव संपन्न वाटतात. त्यामूळे या गीताला संगीतबध्द करताना अनुभवाची जोड द्यायची हा विचार आधीपासून होता.. ती अशी की गणपतीच्या समोर भजन मंडळी बसली आहेत, प्रत्त्येक जण आपापल्या परीने शब्द सूरांची साथ देतो आहे.. तबला वाजतो आहे... पखवाज घुमतो आहे, मंजिर्‍या झांजत आहेत... वातावरणात शरणागती, भक्ती, आर्जव असे सर्व काही भरून राहिले आहे आणि यात कुणीतरी एक गायक गायकी दाखवण्यासाठी नव्हे तर संपूर्ण भक्तीभावाने हे गीत गात आहे.. अक्षरशः असे दृष्य डोळ्यापूढे ऊभे राहीले. (गीत इतके पॉवरफुल आहे!) त्यातून पुढील वाद्यमेळा सुचत गेला... आणि त्या दृष्टीकोनातून एकंदर वाद्यमेळा निश्चीतच थोडा लाऊड ठेवलेला आहे. गणेशाच्या चरणी सेवा अर्पण म्हणून गीत देखिल स्वतःच गायले.
शेवटचे आलाप खरे तर मी रेकॉर्डींग करताना तंद्रीत दोन तीन वेळा वेगवेगळे गायले होते.. आणि ते असे ओव्हरलॅप वगैरे होतील असे वाटले नव्हते (गातना). मिक्सींग करताना सहज ते सर्वच तुकडे एकामागोमग एक ठेवले तर चांगला परिणाम होतो आहे असे वाटले म्हणून तसेच इथे ठेवले आहेत... यात हेतू प्रयोगशीलता नसून ज्या भावाने गीत गायले त्याच्याशी प्रामाणिक राहणे एव्हडाच होता. बाकी श्रोते जाणकार आहेतच.

हे सर्वच श्री गणेशाच्या चरणी अर्पण!

सूरमाय ची सर्व पाच गीते श्री गजाननानेच पुरी करून घेतली व सर्वांना बळ दिले... दिशा दिली...
गणपती बाप्पा मोरया!
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर!
गीत,चाल,संगीत संयोजन आणि गायन..सगळंच मस्त!
शेवटचा कल्लोळ विशेष आवडला.....

अवांतर: असाच कल्लोळ ’गणा ये’च्या शेवटी अपेक्षित होता.

२१ सप्टेंबरला चढवलेलं गीत इतक्या उशीरा कसं दिसलं?

२१ सप्टेंबरला चढवलेलं गीत इतक्या उशीरा कसं दिसलं?>>
प्रमोद देव,
गाण्यांची माहिती मिळाली होती तेव्हा धागे तयार केले होते पण ते गणेशोत्सवात रोज एक असे प्रकाशीत करायची सूचना सूरमायने केली होती. म्हणून तुम्हाला रोज एकेक धागा दिसतोय. गणेशोत्सवाच्या मुख्य पानावर गेलात तर इतरही सर्व धागे एकत्र दिसतील.

चैतन्य, कविता वाचली होती तेव्हाच खूप आवडली होती पण त्यामागची कथा माहीत नव्हती. अगदी आतून आले आहेत शब्द.
शब्दांतला शरणभाव चालीत सुयोग्य उतरलाय. पहिल्यांदा ऐकली होती तेव्हापासूनच मी ह्या चालीच्या प्रेमात आहे. चैतन्यच्याच शब्दांत सांगायचे तर 'मिळे मनाला शांती अनुपम' अशी चाल आहे.

गीत, गायन, संयोजन सगळंच छान जमलंय !! >>> + १

योग, फार छान वाटतंय गाणं ऐकून. शेवटचा कल्लोळ तर फारच छान!
जगाच्या वेगवेगळ्या कोपर्‍यात असलेल्यांनी रेकॉर्ड करून पाठवणे, त्यांवर आवश्यक ते संस्कार करून एकत्रित इतकं परिणामकारक गीत तयार करणे- याबाबत तुला सलाम आहेत योगेश्वरा! Happy
सगळे एकाच शहरात असतो आणि स्टुडिओत रेकॉर्डिंग केलं असतं तर काय बहार आली असती सूरमायच्या सगळ्याच गाण्यांत!!
जमेल हेही कधी तरी नक्कीच

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.
मोरया!!

>>गणेशोत्सवात रोज एक असे प्रकाशीत करायची सूचना सूरमायने केली होती
संयोजक ते बरोबरच आहे... ईथे गाणे प्रकाशन तारीख २१ सप्ट. दिसत असल्याने बहुतेक गोंधळ झाला असावा.. Happy
असो.

अप्रतिम! खुपच आवडलं, सर्वार्थाने एकदम जमलं आहे. रचना, गायन, कोरस आणि मुख्य म्हणजे शेवट अत्यंत परिणामकारक झाला आहे.

सर्वच गाण्यांमध्ये छान वैविध्य आहे. योग, सगळ्यांची मोट बांधून, त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी करुन घेऊन, पुन्हा त्यावर संस्कार करून, दर्जा सांभाळून ते सगळं पूर्णत्वाला नेणं ही खायची गोष्ट नाही. आणि तू दर वेळी ते नेटाने करतोस हे कौतुकास्पद आहे.

सई,
किती ते कौतूक.... Happy अनेक धन्यवाद!
(बाकी तुझ्या सारख्या "जाणकारांचे" प्रतिसाद पाहून समाधान मिळते.)