गजवदना - सूरमाय (४)

Submitted by संयोजक on 21 September, 2012 - 09:44


गजवदना (गीतकारः अनिताताई)

गजवदना शिवसूत तूच कृपाघना
सुखदायक भक्तजना, नमितो तव चरणा ||धृ||

महाकाय तुंदिलतनु मोदक प्रिय तुजला
रक्तवरण सुमने ही अर्पित तव पूजना ||१||

सकलजना तारीलेसी ताप करूनी हरणा
साधक तव अर्पिताती गीत करी श्रवणा ||२||

संगीत/गायन - अनिताताई

संगीत संयोजन / वाद्ये प्रोग्रॅमिंग - योग

अनिताताईंचे मनोगत -

मायबोली गीताच्या निर्मितीनंतर, या गीतात सहभागी झालेल्या मंडळींचा एक ग्रुप जमला. संगीतकार योग यांच्या पुढाकारामुळे आणि प्रेरणेमुळे सर्व पुन्हा एकत्र आले. या ग्रुपला सूरमाय हे नाव दिले गेले. आता सर्वांनी काही सृजनात्मक काम पुढे सुरु ठेवावे असे ठरले. यातून दोन नव्या गीतांची निर्मितीही झाली. नंतर सर्व आपापल्या कामात गुरफटल्यामुळे नवनिर्मिती थांबली. परत श्री गणेशाच्या कृपेमुळे परत नवे करण्याची प्रेरणा मिळून नवनिर्मिती सुरु झाली. बासरीवादक चैतन्य, व्हायोलिन वादक पद्मजा आणि कवयित्री क्रांति हे कलाकारही या ग्रुपमधे सामिल झाले. गेल्याच महिन्यात श्री गणेश स्तुतीपर गीते करायची असे ठरले. अलिकडे मी काही रुक्ष आणि क्लिष्ट विषयांच्या जबाबदा-या स्वीकारलेल्या असल्यामुळे, त्यात फार व्यग्र असल्यामुळे मला या उपक्रमात सहभागी होता येणार नाही असे वाटले. तसे मी कळवूनही टाकले! कधीमधी कामासाठी मेलबॉक्स उघडला की सर्वांचे भरभरून वाहणारे मेल पाहून आणि नवी गीते तयार होताना पाहून मस्त वाटायचे. पण ती गीते ऐकायला आणि लिहिलेले वाचायला वेळ होत नव्हता. आणि गेल्या आठवडयात योग यांनी लिहिले, ''सूरमाय चे हे मायबोलीवरील प्रथमच प्रवेश/सहभाग असेल आणि अनिताताईंच्या सहभागाशिवाय त्यास पूर्णत्व येत नाही असे मला वाटते. तेव्हा सूरमाय च्या सर्व सदस्यांतर्फे विनंती, कृपया जमेल तसे वेळात वेळ काढून एखादी चीज, बंदीश, रचना पाठवाच... निव्वळ तानपुरा/तालमाला यावरही चालेल... फार साज संगीत द्यायचे नसल्यास किंवा तेव्हडा वेळ नसल्यास. पण तुमची रचना व तुमचे गायन हवेच हवे असा खास दीया चा देखिल आग्रह आहे! अश्विनी, जरा जोर लाव बरे :)" त्यांची ही कळकळीची विनंती, त्याला जोडून छोटया दीयाच्या आग्रहाची जोडलेली पुस्ती... मी वेळ काढायचं ठरवलं. मला मुभाही दिली होती की बंदीश रूपातलं गीतही चालेल. दुस-या संगीतकाराचं गाणं करायचं असतं तर ते परत परत ऐकणं, तंतोतंत गाण्याचा प्रयत्न करणं, परत परत रेकॉर्डिंग करून एम पी ३ फाईल पाठवणं, हे करायला फुरसत नव्हती.

आता ''हम करे सो कायदा'' असल्यामुळे जमेल असं वाटलं. त्यातून सगळे ऑफिसची कामे, कौटुंबिक जबाबदा-या सांभाळत या उपक्रमात सहभागी झाली आहेत आणि आपण सबबी सांगतोय याबद्दल अपराधीपणाची भावनाही मनात होतीच.मग ठरवलं की चला, आपणही प्रयत्न करु या. बाहेर धुवांधार पाऊस कोसळत होता. मनात मल्हार भरून राहिला होता आणि आता नव्या उमटू लागलेल्या गीतात मल्हार येणार हे नक्की झालं. सूर आणि गजाननाचे रूप एक होत होत शब्द सुचत गेले. भक्तीभाव, शरणागती व्यक्त करणारा जयजयवंती ही मल्हारात मिसळला आणि जयंत-मल्हार रागात रचना तयार झाली. रचना एकतालात झाली. हा एकताल कुठुन आला हे काही सांगु शकणार नाही. अगदी थोड्या अवधीत गणपतीबाप्पांनी गीत बनवून दिलं.

सर्वांना उद्दुक्त करण्याचं, ढकलण्याचं काम योग यांनी केलं. नाहीतर हे नवनिर्मितीचं कार्य घडलं नसतं हे नक्की. म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद. अशीच प्रेरणा सर्वांना श्री गणेशाकडून मिळो. ही छोटीशी रचना मायबोली गणेशोत्सवात श्री गणेशाच्या चरणी सादर अर्पण.

योग चे मनोगत

खरे तर अशा प्रकारच्या म्हणजे शास्त्रीय अंग जास्त असलेल्या गाण्याला विशेष वाद्यमेळा देणे उचित वाटत नाही. त्यातही शब्द, चाल व गायकाचा एकंदर फोकस हा गीताचा अर्थ व भाव श्रोत्यापर्यंत पोचवण्याचा असल्याने साथ संगतीपुरते असे तबला पेटीच योग्य वाटते. त्यानुसार आनिताताईंशी विचार विनीमय करूनच एकंदर वाद्य सुरावट केली आहे. मी काही पट्टीचा पेटी वादक अजीबातच नव्हे त्यामूळे जाणकार संभाळून घेतीलच.

(खरे तर हे गीत क्रमवारीत थोडे आधी आले असते तर बरे झाले असते पण संपूर्ण होईपर्यंत उशीर झाला.)
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छानच!! गीताचे शब्द अगदी सहज,सोपे आहेत आणि जयजयवंती व मल्हार यांचा मिलाप वैशिष्ट्यपूर्ण वाटतोय त्यामुळे गाण्याची चाल खूप आवडली. बाकी मला असं वाटतं की या बंदिशीचं संगीत संयोजन अजुन छान होऊ शकलं असतं. गाण्यात बासरी समाविष्ट केली असती तर गाण्याला भरीवपणा आला असता.
तू हे रेकॉर्डिंगचं तंत्र शिकण्याचा प्रयत्न करणं, सॉफ्टवेअर डाऊनलोड करणं, गाण्याच्या MP3 फाईल्स बनवुन पाठवणं हे खूप कौतुकास्पद, प्रेरणादायी आहे.

मनोगतात संगीत संयोजनाबद्दल लिहिलेलं नाही कारण ते रेकॉर्डिंग पाठवल्यावर लगेच पाठवलं होतं.
माझं फायनल गीत मी कालच ऐकल्यामुळे आता लिहिते. योग तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून सं. संयोजन केलंत या बद्दल आभारी आहे. अजून अवधी मिळाला असता तर अजून चांगले रेकोर्डिंग
पाठवता आले असते. मी ट्रॅकवर रेकोर्डिंग करणं हे शिकण्याच्या प्रयत्नात आहे.
आपण इथे गीत प्रकाशित करतो तेव्हा त्याचा दर्जा उत्तमच असायला हवा यासाठी गंभीरपणे विचार करून आपण तितका वेळ सबब न सांगता काढायला हवा!
त्यातही शब्द, चाल व गायकाचा एकंदर फोकस हा गीताचा अर्थ व भाव श्रोत्यापर्यंत पोचवण्याचा असल्याने..>>>>>>>>> योग, हे मी तुम्हाला अगोच्या रेकॉर्डिंगमधे व्होकलचा आवाज थोडा मोठा ठेवण्याविषयी लिहिले होते. कारण लहान आवाजात शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचले नाहित तर गीताचा उद्देश कसा साध्य होणार या संदर्भात. असो. या गीतात तंबोरा आणि तबला, पेटी याचा आवाज थोडा जास्त हवा होता. या उपक्रमाचा उद्देश काही नवं शिकण्याचा, नवं करण्याचा असल्याने मी हे इथे लिहिलं.
मायबोली आपली आणि आपण मायबोलीचे असल्याने सर्व श्रोते आवडून घेत आहेत. कौतुक करत आहेत. म्हणून खूप धन्यवाद.

>>योग, हे मी तुम्हाला अगोच्या रेकॉर्डिंगमधे व्होकलचा आवाज थोडा मोठा ठेवण्याविषयी लिहिले होते. कारण लहान आवाजात शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचले नाहित तर गीताचा उद्देश कसा साध्य होणार या संदर्भात.
अनिताताई,
बरोबर! मला याही गीताच्या बाबतीत तोच निकष योग्य वाटला..

>>आपण इथे गीत प्रकाशित करतो तेव्हा त्याचा दर्जा उत्तमच असायला हवा यासाठी गंभीरपणे विचार करून आपण तितका वेळ सबब न सांगता काढायला हवा
+१००० Happy

ही रचना माझ्या निवडक १० त! काय सुरेख आवाज आहे अनिताताई! अगदी आवर्जून शिकावी अशी बंदिश झाली आहे ही! वाद्यमेळही अगदी बंदिशीला सुयोग्य! फारच छान जमलं आहे गीत.

सुरेख झालीय बंदिश. खूप आवडली मला. 'कृपाघना' ची जागा तर फारच खास ! एकतालात गायला मजा येते.
तुझ्या आवाजात तुझं स्वतःचं असं काहीतरी वेगळं आहे ते मनाला स्पर्शून जातं, नेमकं काय ते नाही सांगता येणार. तुझं गाणं फार प्रांजळ आहे असं मला नेहमीच वाटतं Happy

आहे तो वाद्यमेळ मला आवडला. फक्त गाणे चालू असताना मागून तानपुरा थोडा जास्त ऐकू आला असता ( क्लासिकलच्या मैफिलीत येतो तसा ) तर अजून छान वाटलं असतं. पेटी साथ म्हणून वाजवलेली आहे त्यामुळे तिचा आवाज योग्य वाटतोय.

अनिताताई,
खूपच आवडली बंदिश.
एकताल मला प्रचंड आवडतो. शेवटच्या कडव्यात चालीत अजून काही ट्विस्ट आणता आला असता का?
*म्हणजे, आहे ते सुंदर आहेच, अजून सुंदर होऊ शकेल का? असा विचार आला मनात.

खुपच सुंदर, श्रवणीय झालंय गाणं.. अनिताताई, तुम्ही आवर्जून वेळ काढलात म्हणून आमच्या कानांना इतकी सुरेल मेजवानी मिळाली. गीतरचना आणि गायन दोन्ही सुरेख. शास्त्रिय बैठकीचे आहे, बंदिश आहे, तरिही कुठेही ते क्लिष्ट झालेलं नाही, अगदि कुणालाही सहज आवडेल अशी सुरावट आहे.
आणि योग तुही त्या साधेपणाला कुठेही धक्का लागू दिला नाहियेस हे महत्त्वाचं. तुम्हा दोघांचंही खुप खुप अभिनंदन.