गणा ये - सूरमाय (१)

Submitted by संयोजक on 18 September, 2012 - 11:46


गीतः गणा ये (गीतकारः पेशवा)
गणा ये गणा ये ||धृ||

मोदक केले
दुर्वा आणिल्या
सजवूनी चौरंग
दिवा लाविला
भक्तीभावाची फुले घेवूनी स्वागताला उभा रे ||१||

तुझ्या आगमने झांझले मन
नादवीणेची हृदयी हुरहुर
वेडावलेले सारे नाचती
ढोला ताशा वरी रे ||२||

सरते साऊली बुद्धीवरची
सरते डळमळ पायामधली
कंपणार्‍या कर्तव्याची
मूठ पुन्हा वळू दे ||३||

देहभान रे एक झाले
डोळ्यामधली ओल परतते
भेगा पडल्या जगण्यावरती
खपली तुझी धरू दे ||४||


संगीत/संगीत संयोजन/वाद्ये प्रोग्रॅमिंगः योग
गायकः भुंगा, प्रमोद देव व समूह

गीतकार मनोगतः

गीत लेखन हा माझा प्रांत अजूनतरी नाही. गीत लिहिणे म्हणजे नक्की काय करायचे? त्याचे काय निकष आहेत ह्याची देखील मला कल्पना नाही. पण एक सर्वसामान्य विचार केल्यास गीताचा आकृतीबंध शब्द उच्चारण व त्यांचे वजन, लहेजा व भावनेचा प्रत्ययदर्शी अनुभव ह्यांच्याशी जास्त निगडित असावा असे वाटते. असे म्हणतात उत्तम गीत ही उत्तम कविता असते पण उत्तम कविताही गीत असेलच असे नाही. केवळ व्यक्त होणे ह्या एकाच उद्देशाने म्हणून लिहायचे. ते थोडे कविते सारखे वाटते व कवितेची व्याख्या लवचिक असल्याने, जे लिहिले त्याला कविता म्हणायचे हे माझे सूत्र. अश्या वेळेस 'तुझी २००४ गणेशोत्सवातील एक कविता संगीतबद्ध करत आहे. ह्या माबो गणेशोत्सवात प्रकाशित करू. परवानगी गृहीत धरतोय कळव.' असे इ-पत्र योग कडून आले. विचारात पडलो की जे काही लिहिलंय ते कविता म्हणूनही साधेसेच आहे त्यातून त्याला थोडीफार लय आहे पण ह्याचे गीत होण्याच्या पात्रतेचे हे खरंच आहे का? परवानगी नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.

काही दिवसांनी योगने पहिली चाल ऐकवली. ऐकूनच अरे, लिहिताना हा रिदम किंवा हे वजन डोक्यात अजिबात नव्हते असा विचार आला. २००४ साली ज्या आरत्या माबो गणेशोत्सवात लिहिल्या त्यातल्या ज्यांना थोडीफार लय आहे त्या सगळ्या गणपतीच्या वेळेस वाजणारा ढोल-ठेका (हा कोणता ताल?) मनात ठेवून खरडल्या होत्या असे अंधुक आठवते. योगने ह्या सामान्य कवितेला 'कजरी' बनवून टाकले.

संगीतकार मनोगतः

कवितेचे शब्द व मीटर नेहेमीपेक्षा थोडे वेगळे वाटले. फार बोजड वा अलंकारिक शब्द नाहीत पण सरळ सोट साधे शब्द जे एखाद्या भक्ताच्या मनात येतात तसे "सच्चे" वाटले.. म्हणून ऊगाच न बदलता तसेच ठेवतो आहे. श्री गणरायाच्या कृपेने यातून एखादी "कजरी" बसवता येईल का असे सुचले. कजरी म्हणजे थोडक्यात भोजपूरी भजन/गवळण/ समूह गानाचा प्रकार. यात शब्द वा भाव या इतकेच किंवा पेक्षा थोडे जास्ती महत्व हे ताल, साज, वाद्य याला असते. खरे तर एकत्र बसून मस्त कीर्तन करायचा हा प्रकार असतो. यात तबला, ढोलक, नाल, कंजिरी, करताल, डफली, अशा "ताल" प्रधान वाद्याचा वापर असतो. शिवाय रचनेमध्ये एक प्रकारचा "झोल" असतो. म्हणजे मूळ रिदम चालू असला तरी त्यात मध्ये मध्ये ब्रेक येतात (मुखडे किंवा छोट्या तोडी..). त्यातून एक विशीष्ट लय, नाद तयार होतो. सहसा चढ्या आवाजात/वरच्या पट्टीत व मुख्य पुरूष गायक मंडळीच हे गातात. समूहातील इतर लोकही त्यात मुख्यत्वे टाळ्या वाजवणे, धृवपद म्हणणे, हारमनी मध्ये तान घेणे वगैरे योगदान देतात.
सहसा कजरीचा मूड, स्वर चढेच असतात.. पण इथे शेवटच्या कडव्यात मी मुद्दामून थोडा शिवरंजनी चा वापर केला आहे. त्या कडव्यातील शब्व्दांचे गांभीर्य व भाव दोन्ही त्यातून प्रतीत होतात असे वाटते. खास भुंग्याच्या गायनासाठी मुद्दाम वरच्या पट्टीत रचले आहे.
असो... एक लहान तोंडी मोठा घास आहे... पण गणपतीच्या आगमनाचे हे गीत मला वाटते तोच पुरे करून घेईल.

शेवटच्या कडव्यात मला एक शंका होती त्याचे निरसन जय (पेशवा) ने केले:
>>>डोळ्यामधली ओल "परतते".. म्हणजे काय म्हणायचे आहे?
- आयुष्याच्या तापाने रडून रडून डोळ्यातले पाणी आटले, भावानांचा ओलावा हरवला होता. इतरांबद्दल सहानुभूती संपली होती. तुझ्या येण्याने देहाची मनाशी सांगड पडली (आत्मजाणीवा) व तो ओलावा परतत आहे असे काहीसे :-)

गायक मनोगतः

प्रमोद देव: गीताचे शब्द फारसे आकर्षक नाही वाटले पण योगेशने ऐकवलेली चाल प्रथमदर्शनीच इतकी आवडली की हे गीत जर बनले तर खूप छान बनेल ह्याची खात्री वाटली. योगेशने ज्या स्वरात (पट्टीत) ह्या गीताची योजना केली आहे ती ऐकल्यावर माझ्या आवाक्यात हे गाणं नाही ह्याची जाणीव झाली... कारण वयोमानानुसार माझी नैसर्गिक पट्टी आता खाली उतरलेय आणि त्यामुळे अशा पट्टीत गाणे हे एक तर कर्कश्य तरी वाटू शकते किंवा आवाजा चोरावा लागू शकतो हे लक्षात घेता मी ह्याच्या भानगडीत न पडणं बरं असंच ठरवलं होतं... पण जितक्या वेळा चाल ऐकत गेलो, मी त्या चालीच्या प्रेमात पडत गेलो आणि एका अनपेक्षित क्षणी आवाज बर्‍यापैकी लागला आणि मी ते गाणं ध्वनीमुद्रित करून एक गंमत म्हणूनच योगेशकडे पाठवलं....खरं तर ते त्याला आवडेल असंही नव्हतं वाटलं. पण त्याने ते प्रमुख गायक मिलिंदच्या (भुंगा) साथीने जोडून मला आश्चर्याचा सुखद धक्का दिला... आवाजाने साथ दिली असती तर मी ह्यापेक्षा जास्त चांगले गाऊ शकलो असतो असा आत्मविश्वास आहे.

भुंगा : योगने आणि इतर मंडळींनी ठरवल्याप्रमाणे येत्या गणेशोत्सवात "सूरमाय" तर्फे काही गाणी करायची हे कळलं तेंव्हा आनंदच झाला. शिवाय योगने एक सोलो गीत तुला गायचे आहे हे सांगितल्यावर आता कसं जमणार ब्वा हाच विचार आधी आला. पेशवा यांचं "गणा ये" हे गीत ठरलं... यात कित्येक शब्द हे रोजच्या बोलीभाषेतलेच आहेत, म्हणजे अलंकारिक शब्द नाहीत तेंव्हा आधी वाचताना यावर चाल कशी लागणार आणि ह्याचं गीत कसं गायचं असं वाटत होतं...
मग योगने चाल पाठवली त्यावर देवकाकांकडे दोनदा रिहर्सल्-कम- रेकॉर्डिंग झालं... जसंजसं गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं तशी चाल कळत गेली... पण तरीही प्रांजळपणे सांगायचं तर मला आवश्यक तितका वेळ देता आला नाही आणि त्यामुळे गाण्यात माझा परफॉर्मन्स तसा "सुमार"च आहे... व्यक्तिशः मला तो तितकासा जमल्याचं वाटत नाही आजही. पण संगीतकार म्हणून योग इस बेस्ट जज्ज... त्यामुळे सारं काही त्याच्यवर सोपवलय... आमच्याकडून मिळालेल्या रेकॉर्डस् वर संस्कार करून त्याने त्याचे बेस्ट दिलेय...
माझा आवाज आणि तयारी कमी पडलीये याची जाणीव आहे. सांभाळून घ्या.
आपला
भुंगा (मिलिंद पाध्ये)
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीतगायन आणि चालीसाठी अभिनंदन!!!
तांत्रिकबाबी सोडल्यातर एखाद्या मंदीरासमोर बसलेल्या भजनमेळ्यात त्या भक्तिमय वातावरणात बसून ऐकल्यासारखं वाटलं......

खूप खूप अभिनंदन... सगळ्या टीमचे Happy

फारच छान.
गाण्याचा ठेका फारच छान वाटतोय.
भुंगा, देव काका, खूप छान गायलात.
पेशवा- डोळ्यामधली ओल परतते- साठी सलाम !!
योग, तुस्सी ग्रेट हो! एकदम हट के गीत!
आज दिवसभर 'गणा ये' हेच डोक्यात असेल Happy

गाण छान आहे.. पण रेकॉर्डींगची क्वालिटी जरा गंडली आहे का? की माझ्या इथेच विचित्र ऐकू येतय? आवाज दुरुन आणि घुमल्यासारखा येतो आहे.

पराग, ध्वनीमुद्रण व्यवस्थितच झालंय..अगदी स्टुडिओ क्ल्वालिटी नसली तरी..गंडलंय असं म्हणण्यासारखं वाईट नक्कीच नाहीये....दोष असलाच तर तो तुझ्या मशीनमध्येच असेल हे मी इथे बसून सांगू शकतो. Happy
लवकरात लवकर तुझी अडचण दूर होवो हीच सदिच्छा व्यक्त करतो.

भुंगा, व काका,

छान स्वागत केलेत गणाचे.. Happy

>>आवाजाने साथ दिली असती तर मी ह्यापेक्षा जास्त चांगले गाऊ शकलो असतो असा आत्मविश्वास आहे.

निश्चीत! आणि ही तर सुरूवातच आहे ना.. त्यातही (मायबोली सारख्या) जागतिक व्यासपीठावर सूमराय सारख्या सुरेल समूहाच्या ऊद्घाटनाचा नारळ फोडण्याची संधी तुम्हाला मिळाली.. या "पाऊलखुणा" कायम रहाणार बर का!

वा, मस्तच झालंय गाणं Happy
मला गाण्याचे शब्द आवडले. शब्द कमी आहेत पण देवाची आळवणी करताना एक तल्लीन अवस्था येते, नादावल्यासारखे होते ते त्या शब्दांतून अचूक व्यक्त होतंय. शब्दांतला भाव सुरांमधून एकदम नेमका पुढे येतोय. 'डोळ्यांमधली ओल परतते' किंवा 'हुरहुर' च्या चालीत ती व्याकुळता जाणवतेय.
भुंग्या, तुझ्या आवाजाला एक नॅचरल एक्स्प्रेशन आहे. खूप आवडले मला तुझे गाणे. देवकाकांची साथही छान.

खूपच छान झालं आहे गाणं. अगदी गावाकडं गेल्यासारखं वाटलं! लहानपणीचे मेळे आठवले आणि अलिकडे हरवत चाललेला गणपती उत्सवाचा फील आला परत. शब्द, चाल, आवाज सगळ्यांत एक नैसर्गिक, सहजभाव आहे तो अगदी काळजाला भिडतोय. अप्रतिम गीत!

अरे वा. अगदी वेगळ्या बाजाचं गाणं झालंय. गणपतीच्या मुर्तीसमोर बसून, खूप लोकांचा समुह हे गीत आळवत आहे असं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. सुरुवात छान झाली.
गीत , संगीत आणि गायन सर्व आवडले. योग तुमची प्रयोगशीलता आवडली.
भुंग्या , तू छान गायलेस. प्रमोदजींनी छान साथ दिलीय.
अभिनंदन सर्वांचं.

ऐकलं. चाल, वाद्यमेळ अतिशयच आवडला. मस्त जोशात वाजणारी चाल आहे. शेवटच्या कडव्यात कमाल केली आहे. धन्यवाद, योग.

पण... चौरंग आणि वेडावलेले हे शब्द खूप घाईघाईनं उच्चारले जातात, ते खटकलं. एका आवाजातच गाणं ऐकायला आवडलं असतं. जे दोन आवाज वापरले आहेत ते कॉप्लिमेंटरी नाही वाटले.

भुंग्याचा आवाज त्यानं म्हटल्याप्रमाणे परफेक्ट लागला नाहीये. मायबोली शीर्षकगीतात भुंगा अप्रतिम गायला होता, त्यामुळे त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. Happy

मस्तच गाणं.
अगदी गावाकडं गेल्यासारखं वाटलं! >> +१ अगदी रात्री रंगलेल्या भजनाची आठवण झाली.
सहभागी सर्वांचेच अभिनंदन

मस्त! सुरुवातीचा ठेका- तबला फार आवडला. काय म्हणायचं त्याला? लग्गी?
की अजून काही?
गाणं आणि शब्दांबाबत अगो +१

भुंग्या, रियाज कर रे रियाज कर जरा Happy

पेशव्याचे शब्द खरोखर हटके आहेतच. वेगळ्या बाजाच गाणं सुंदर झालें आहे.

आम्ही आमच्या आमच्या घरात बसून आवाज रेकॉर्ड केला आहे, सगळ्यांच्या आवाजाचा योग्य मेळ घालण्याचं कसब योगेश च , योगेशच्या सहनशिलतेला दाद द्यायला हवी Happy

मस्त झालंय गाणं.
पेशव्यांचे शब्द योगेशच्या संगीताने बहरले आणि प्रमोदजी, भुंग्याच्या स्वरांतून मस्तच उतरले.

प्रमोदजी आणि मिलिंद,
इथे बसून आम्हाला गाणं ऐकायला छान वाटलं तरी त्याची चाल थोडी कठीणच आहे.
पण तुम्ही दोघांनी कमाल केलीत, मस्त गायलात...... सलाम.

गाणं परत परत ऐकावसं वाटतं.

मस्त मस्त !!
योग चाल एकदम वेगळी.
भुंगा, देवकाका.... छान गायला आहात.
दोन- तीन आवाज मिक्स करतांना थोडं मागेपुढे झालंय त्यामुळे मधेमधे किंचित गोंधळ वाटतोय.

गणपती येताहेत त्याचा आनंद ज्या प्रकारच्या चालीतून व्यक्त व्हायला हवा तशीच चाल आहे. मस्तच झालंय हे गीत आणि सगळ्यांनी आपापल्या घरी रेकॉर्ड करून मग मिक्स केलंय हे लक्षात घेतलंत तर दादच द्यायला हवी...मिक्स करताना एक दोन जागचा गोंधळ लक्षात येतो पण त्तेवढं माफ व्हायला हरकत नसावी Proud

चाल कठीण आहे +++
चांगलं टीम वर्क Happy

शुभेच्छा...

गाणं तितकं प्रभावी नाही वाटत आहे, जेवढं अपेक्षित होतं. पण... शेवटच्या कडव्यासाठी मात्र १०० गुण. ते जमलेलं आहे. त्या कडव्याचे शब्द, चाल आणि तुझ्या आवाजातून व्यक्त झालेली भावनाही.

एकुणातच तयारीसाठीचा वेळ कमी पडला हे मात्र खरंय. त्यामुळे रचना, संगीत, गायन, संयोजन सगळं योग्य असूनही 'उत्तम' ऐवजी 'बरे' असे म्हणेन.
मिलिंद, तु पूर्ण प्रयत्न केला आहेस, बेसुर झालेलं नाही पण तु म्हणतोयस त्याप्रमाणे खरच तुझा अपेक्षित जोर लागलेला नाही. उपाशीपोटी केलं का रेकॉर्डिंग? की दमलेला वगैरे होतास? त्यामुळेही असं होऊ शकतं. दिवसभराची कामे आटोपून मग त्या 'टेंपो'त जाऊन गाणे ही गोष्ट अवघड आहे, तो थकवाही यासाठी कारणीभूत होऊ शकतो. विशेषतः रोज नित्यनेमाने रियाझ नसेल तर.
असो, पुढच्या गाण्यांसाठी शुभेछा.

>>मिक्स करताना एक दोन जागचा गोंधळ लक्षात येतो
नक्की कुठे...? जरा कळवलत तर बरं होईल!

>>दोन- तीन आवाज मिक्स करतांना थोडं मागेपुढे झालंय त्यामुळे मधेमधे किंचित गोंधळ वाटतोय.
नक्की कुठल्या जागी...? जरा कळवलेस तर बरे होईल.. (कोरस चे आवाज मुदामून थोडे लॅग ठेवले आहेत.. शेवटी याचं सेटींग हे देवापुढे केलेली कजरी असे आहे.. त्यात ध्वनिफीतीसारखे सर्व क्लिक वर टेक्निकली मुद्दामून ठेवलले नाही.. कारण ते अतीशय कृत्रीम वाटते मला तरी! पण तुला दुसर्‍या काही ठिकाणी वाटले असेल तर जरूर कळवावे.. ईथे किंवा ईमेल वर किंवा सूरमाय मध्येच. "श्रवणीय" करायचे एव्हडा फोकस मात्र निश्चीतच आहे, पण कजरी काय वा भजन काय जेव्हा समूह गातो तेव्हा कधीच प्रत्त्येक शब्द काट्यवार पडत नसतो ते नैसर्गिक आहे. असो. वाद्यमेळा मात्र काट्यावरच ठेवावा लागतो कारण ताल/लय हाच वाद्यांचा फोकस असतो.)

>>पण रेकॉर्डींगची क्वालिटी जरा गंडली आहे का?

पराग,
मी तुम्हाला ईथे संपर्कातून ईमेल केली आहे.. पण त्याला तुमचे ऊत्तर नसल्याने आता तुमची अडचण दूर झाली असे गृहीत धरतो!.. Happy
सूरमाय मध्ये सर्वच सूचना व प्रतिक्रीयांचे स्वागत आहे पण नुसते मोघम न लिहीता अचूक निदर्शनास आणून दिले तर सुधारणा करायला सोपे पडते.
धन्यवाद!

किशोर, (बरेच दिवसांनी?)
शोभनाताई,

धन्यवाद!