बालचित्रवाणी - सावलीची बाहुली (सावली)

Submitted by संयोजक on 19 September, 2012 - 14:05
मायबोली आयडी - सावली
कलाकाराचे नाव - सावलीची बाहुली
वय - पावणे सहा वर्ष

लिंक - http://youtu.be/azqZik60eCM


कार्यक्रमाचे नाव - पिंकीचा गणपती

आज आम्ही पपेट शोच्या माध्यमातून गोष्ट सांगायचा प्रयत्न करणार आहोत.
खरतर बाहुलीला गोष्ट सांगायची फारच हौस आहे. पण स्वत:च सांगितलेली गोष्ट दुसऱ्या मिनिटाला विसरते. तर तिने स्वतःच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि नंतर लिहून ठेवाव्यात असे मला वाटले. त्यासाठी नुसते "लिहुयात ग" असे सांगून काही प्रगती झालीच नाही. काहीतरी वेगळे केल्याने तिला लिहायला हुरूप येईल असा विचार करत होते. आणि साधारण तीनेक महिन्यांपूर्वी घरातले रिकामे खोके पाहून पपेट थिएटर करण्याची कल्पना सुचली. थिएटरसाठीची कापाकापी वगैरे कामं मीच केली. तिने चिकटवण्याची मदत केली. हे काम बरेच दिवस चालूच होते. घरात एक भिंतीचा रंगाचा डबा होता. थिएटर गुळगुळीत करण्यासाठी त्यावर वर्तमान पत्राचे तुकडे चिकटवत तो रंग फासत गेलो. दोघींचे पांढऱ्या रंगाने हात पाहून तिलाच टेन्शन आले होते कि हा रंग आता जाणार कसा!
पपेट शो चे नाव 'गंधर्व पपेट शो'. नाव तिचे तिनेच ठरवले आहे. समर्पक असले तरीही ठरवण्याचे कारण वेगळेच आहे. शाळेत हिचा हाउस 'कालिदास' आणि मैत्रिणीचा हाउस 'गंधर्व'. ते 'गंधर्व' हे नाव तिला फारच आवडले म्हणून तेच शोचे नाव!
मग बरेच दिवस पडद्याचे काम राहून गेले होते. एक दिवशी आज्जीकडून मखमली कपडा आणून ते पूर्ण केले. आता महत्वाचे काम म्हणजे कथानक! तितक्यात मायबोलीवर गणेशोत्सवाची कामं सुरु झाली आणि जमल्यास या गणपतीसाठीच आपण प्रोग्राम करावा असे वाटले. मग गणपतीमध्ये सांगता येईल अशा गोष्टीवर आम्ही काही दिवस चर्चा केली. गोष्टीत गणपती असावा हे तिला सांगितले. मग हळूहळू आमची गोष्ट तयार झाली. कल्पना तिचीच पण गाडी रुळावर ठेवण्याचे काम मी केले. तिने सांगितलेली गोष्ट टेम्पररी बफर सारखी मी लक्षात ठेवली मग तिनेच थोडी थोडी वहीत लिहून काढली. पण मग आम्हाला लक्षात आले कि गोष्ट वेगळी आणि नाटकाचे स्क्रिप्ट वेगळे!! त्यासाठी लिहिलेल्या गोष्टीचेच थोडे संवाद करायचा प्रयत्न केला. नंतर तिनेच चित्रे काढली ती कापून पुठ्ठ्यावर चिकटवली.
शेवटी गणपतीच्या आदल्या दिवशी रेकोर्डिंग करायला सुरुवात केली. अनपेक्षितपणे आयत्या वेळी 'मला करायचे नाही' वगैरे संवाद झाले. जरा गोंधळ घालून झाला. करायचे कि नाही असा विचार करत करत अर्धे अर्धे असे चार तुकड्यात रेकोर्डिंग केले. ते एकत्र केल्यावर ठीक वाटले. मग पुन्हा रेकोर्डिंग करण्यासाठी तिच्या मागे लागले नाही.
मी केलेली मदत मुद्दाम इथे लिहितेय कारण 'तिने सगळे केले' असे सांगायचे नाही. पण आमचा हा असाच केलेला एक प्रोजेक्ट मायबोलीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने वापरता आला याचाच आनंद आहे. मात्र या प्रोजेक्ट मुळे उत्स्फूर्त गोष्ट सांगायची हौस मारली जाईल का अशी पुसटशी भीतीही वाटतेय.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जब्बरदस्त कल्पना आणि सादरीकरण! वा! क्या बात है!
बाहुलीची सावली, तुझा गंधर्व पपेट शो जामच आवडला हो आम्हाला! Happy

>>>जब्बरदस्त कल्पना आणि सादरीकरण
अगदी अगदी!

गणपतीबाप्पाच्या सांगण्यावरून मैत्र-मैत्रिणींबरोबर 'एरियात' झाडं लावायची, त्यांना पाणी टाकून वाढवायची, जोपासायची कल्पना मस्तच! त्यात पुन्हा बाप्पा मोदक देतात, आणि झाडांवर, तुम्ही झाडांची काळजी घेताय की नाही यावर लक्षही ठेवून असतात! Lol

फारच आवडलं.

आईग्गं......कित्ती गोडु ! प्र चं ड आवडला पपेट शो.
सावली, तुम्हा दोघींचं फार्फार कौतुक.
"हो ssss चालेल" कित्ती गोड म्हणते गं बाहुली.

मनोगत फार आवडले.

मी केलेली मदत मुद्दाम इथे लिहितेय कारण 'तिने सगळे केले' असे सांगायचे नाही. > है शाब्बास. खास सावली स्टाईल. अतिशय प्रामाणिक आणि सडेतोड. Happy

मात्र या प्रोजेक्ट मुळे उत्स्फूर्त गोष्ट सांगायची हौस मारली जाईल का अशी पुसटशी भीतीही वाटतेय. > नाही. असे नाही होणार असे वाटते खरे. मुलांच्या लहरीचे काही सांगता येत नाही म्हणा.
तसेच आपणही प्रोत्साहन देणे,टेकु देणे ते मागे लागणे ते क्वचित सक्ती करणे ते गिवप मारणे या लंबकांवर झुलत असतो की काय असे वाटते.

ऐकायची, पहायची फार उत्सुकता आहे. रात्री घरुन पाहीन.

मस्त Happy सावली आणि तिची बाहुली, दोघींचे खूप कौतुक!
गणपतीला नमस्कार करुन झोपून जायचे कारण रात्रीचे १० वाजलेत Lol

तसेच आपणही प्रोत्साहन देणे,टेकु देणे ते मागे लागणे ते क्वचित सक्ती करणे ते गिवप मारणे या लंबकांवर झुलत असतो की काय असे वाटते. >> +१०००००. रैना, अगदी मनातलं बोललीस.

अरे वा! कसलं गोड प्रकरण आहे हे! आणि बाईंचा ठसकाही एकदम वाखाणण्यासारखा. संवाद जबरदस्त म्हटलेत. फारच आवडलं.

शाब्बास, बाहुली! Happy

खूपच मस्त!!
कल्पना आणि सादरीकरण दोन्ही खास.
बाहुलीला शाब्बासकी आणि तुमचही कौतुक.

कधी एकदा घरी जाऊन माझ्या मुलीला दाखवतीये, असं झालयं. तिला हा puppet show नक्कीचं आवडेल.

बाहुलीला खूप शुभेच्छा!

खुप छान कल्पना. एव्हढ्या छोट्या बाहूलीकडून हा अभिनव उपक्रम पूर्ण करून घेतलास, सावली तुझे आधी खुप अभिनंदन Happy
अन बाहुली तर काय एकदम ठसके बाज Happy बरोब्बर हवे ते चित्र वर घेणे मस्त जमलेय तिला. शाब्बास बाहुली Happy
गंधर्व शो - भारी आहे नाव.
रैना +१०० Happy

फारच भारी सांगितलीय गोष्ट. गणपतीबाप्पाच सगळ्यांना मोदक खायला देतात हे आवडलंच Lol
बाहुली, तुला खूप खूप शाब्बासकी Happy

संयोजक आणि इथल्या सगळ्यांनाच मनापासुन धन्यवाद Happy
तीला प्रतिसाद उद्या वाचुन दाखवेन.
अग्गं हिचे जपानी नाजूक बोलणे कित्ती बदलले. >> Lol त्या आवाजात बोलले की शाळेत कुणालाच ऐकु जात नाही हे तीचे तीलाच कळले असावे Wink

Pages