आता मैदानावर पुन्हा मैफील नाही..

Submitted by Kiran.. on 19 August, 2012 - 01:52

laxman exit.jpgआता मैदानावर पुन्हा मैफील नाही..

इडन गार्डनसारखं प्रतिष्ठेचं मैदान. समोर अतिरेकी क्रिकेटवेडे बंगाली प्रेक्षक आणि भारत डावाने पराभवाच्या छायेत ! सगळ्या आशा संपलेल्या. खाली गाळ राहीलेला. जिव्हारी लागेल असा पराभव समोर दिसत असतो. मन इतरत्र रमवायचे सगळे प्रयत्न विफल झालेले असतात. त्यातल्या त्यात एका बाजूला नांगर टाकून भिंत उभी राहील्याचं समाधान असतं.

पण दुस-या एण्डचं काय ?

परिस्थिती ही अशी नाजूक असताना तो येतो. स्क्रीनकडे पहायचं धाडस होत नसतं. किलकिल्या डोळ्यांच्या कोप-यातून पाहताना त्याच्या हातात तंबोरा असावासा वाटू लागतं आणि चक्क कुणीतरी शिवरंजनी आळवत असल्याचा भास होत राहतो. कानामधे अचानक मेरे नैना सावन भादो वाजायला लागतं. आणि त्याच्या त्या मैफिलीने परिस्थितीचा विसर पडायला होतं.. तोच तो व्हेरी व्हेरी स्पेशल... लक्ष्मण ! रामायण काळापासून तारणहार म्हणून धावून येणारा व्ही व्ही एस लक्ष्मण !! निव्वळ फलंदाज म्हणून त्याचा उल्लेख होणं हे माझ्यासारख्याल दुखावणारं आहे. तो फलंदाजीतला पिकासोच !!!

त्याची एक एक इनिंग हे एक सुंदर चित्र आहे. लताचा आवाज नेहमीच छान असतो, पण काही गाण्यात जेव्हां तो खुलतो तसा लक्ष्मण एकदा खुलला कि त्या नजाकतीने गोलंदाज देखील मंत्रमुग्ध झालेले दिसलेत. ब्रेट ली ला अशा वेळी त्याच्या मैफिलीला आपण दाद देतोय असंच वाटत असणार जणू !

हैदाबाद संस्थानातच काही तरी आहे. वागण्या बोलण्यात असलेली नबाबी अदब, कलात्मकता यापूर्वीही एकाने मैदानावर दाखवली होती. महंमद अजहरुद्दीन त्याचं नाव. आणि आता लक्ष्मण !! पण लक्ष्मणचं वेगळेपण म्हणजे ज्या ज्या वेळी गरज पडली त्या त्या वेळी तो धावून आलाय. तळाच्या फलंदाजांना घेऊन खेळलाय. अझरुद्दीन देखील शैलीदार खराच.. पण संघासाठी जो लढला तो लक्ष्मणच ! या निकषावर लक्ष्मण हे नाव नेहमीच हि-यासारखं लखलखतं राहणार आहे. राहुलने देखील अनेकदा किल्ला लढवलाय खरा पण त्याची इनिंग ही लक्ष्मणसारखी कलाकुसरीने सजलेली नाही वाटली कधी. तुलना होऊ शकत नाही हे खरंच म्हणूनच या जोडीने एकमेकांना पूरक अशी भूमिका घेत अविस्मरणीय आणि अविश्वसनीय भागीदा-या रचल्या. जणू काही राम आणि लक्ष्मणाची जोडीच त्या वेळी संघात असावी.
18slde4.jpg
आणि मग उपकार सिनेमातला प्राणचा डायलॉग आठवतो..

रामने हरेक युग मे जनम लिया है, लेकिन लक्ष्मण फिर पैदा नही हुआ !!!

आपलं नशीब कि आपल्याला लक्ष्मण पहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. त्याची बॅटींग ही आकडेवारीची गोष्टच नाही. दुस-या दिवशीच्या बातमीचा विषयही नाही.

मन क्यूं बहका रे बहका या गाण्यात आशा लतांची मैफील जमावी तशी लक्ष्मणची ती मैदानावर जमलेली मैफील होती. कधी बहरलेली कधी रुसलेली. अर्थात रूसलेल्या मैफिलीची भरपाई कसलेला गायक ज्या पद्धतीने रसिकांना करून देतो तशीच कामगिरी लक्ष्मणने ऑस्ट्रेलिया या त्याच्या परंपरागत शत्रूविरुद्ध केली आहे. पिवळा रंगाची जर्सी दिसली कि त्याच्या बॅटीच्या तारा आपोआप झंकारू लागायच्या आणि कधी शिवरंजनी, कधी भूप असे एकामागून एक राग आळवले जायचे.

opening laxman.jpg

काल त्याच्या निवृत्तीची घोषणा ऐकताना खूप वेदना झाल्या मनाला. अर्थात त्याने दिलेलं कारणही त्याच्या संवेदनशीलतेची साक्ष देऊन गेलं. काही असो, कालची त्याची ती सांजभैरवी उदासवाणी वाटली आणि कळून चुकलं... आता मैदानावर पुन्हा ही मैफील भरणे नाही.. !

व्हीव्हीएस लक्ष्मणची मैदानाबाहेरची इनिंगही अशीच व्हेरी व्हेरी स्पेशल होवो या शुभेच्छा !
VVS-Laxman-with-wife-and-children-before-a-press-conference-to-announce-his-retirement-from-international-cricket-at-the-Rajiv-Gandhi-International-cricket-stadium-in-Hyderabad.jpg

- Kiran..

( सर्व प्रचि आंतरजालावरून साभार )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण.. लेख अत्यंत आवडला रे..
उपकार मधला डायलाक तर एकदम सही फिट्टं बसला..
शाबास!! Happy
व्हीव्हीएस लक्ष्मण विल बी मिस्ड टेरिबली!!!

>>जणू काही राम आणि लक्ष्मणाची जोडीच त्या वेळी संघात असावी
१००% अनुमोदन!

त्याने न्युझिलंडविरुद्धची मालिका गाजवून निवृत्त व्हायला हवे होते असे मात्र वाटत राहील.... तो धोनीशी संपर्क साधत होता मात्र संपर्क होउ शकला नाही म्हणे Sad

योग्य वेळी योग्य निर्णय! लक्षमणाचं अभिनंदन.. गेली अनेक वर्षे आम्हा क्रिकेट रसिकांना दिलेल्या मेजवानीबद्दल आभार आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

ग्रेट प्लेअर्सना ज्याप्रकारे निवृत्त व्हावे लागते ते पाहून वाईट वाटते Sad

राहुलने देखील अनेकदा किल्ला लढवलाय खरा पण त्याची इनिंग ही लक्ष्मणसारखी कलाकुसरीने सजलेली नाही वाटली कधी. >>> हे नाही पटलं,

.

सुंदर लेख! मस्त लिहीले आहे.

त्याची बॅटींग ही आकडेवारीची गोष्टच नाही.>>> एकदम सहमत. त्याने किती शतके केली वगैरेला काही अर्थ नाही. जे मनापासून क्रिकेट पाहतात त्यांना त्याचे अत्यंत महत्त्वाचे डाव कायमच लक्षात राहतील.

पुढच्या आठवड्यातील हैदराबाद कसोटी खेळून त्याने निवृत्ती स्वीकारायला हवी होती.

काय सुर्रेख लिहिलंस किरण......... प्रचंड आवडलं............
त्याची बॅटींग ही आकडेवारीची गोष्टच नाही.>>> एकदम सहमत. त्याने किती शतके केली वगैरेला काही अर्थ नाही. जे मनापासून क्रिकेट पाहतात त्यांना त्याचे अत्यंत महत्त्वाचे डाव कायमच लक्षात राहतील. >>. +१००

सुरेख लिहिलस रे...
अजून लिहायला हव होतंस..

लक्ष्मण द्रविड ला पर्याय अजून तरी भारताकडे नाहीत
सचिन गेल्यावर.. कसोटी संघाचं काय होणारे देवच जाणे

वर व्यक्त केलेल्या भावनांशी १००% सहमत.
द. आफ्रिकेतल्या विश्वचषकासाठी निवडलेल्या संघातून लक्ष्मणला वगळलं गेलं होतं [ जो अन्याय त्याच्या सततच वाटेला आला !]. त्यावेळीं एका द.आफ्रिकेच्या समीक्षकाने म्हटलं होतं कीं एखादा देश लक्ष्मणसारख्या अद्वितीय फलंदाजाला आपल्या संघातून वगळूं शकतो ही कल्पनाच अचंबित करणारी आहे !
'लक्ष्मणरेषा' हा शब्दप्रयोगच जणूं ज्याच्या मैदानातल्या व बाहेरच्या वर्तणूकीवरूनच आला असावा इतपत आदर्शवत असलेल्या या शैलीदार खेळाडूला मनःपूर्वक शुभेच्छा.

लक्ष्मण आवडत्या क्रिकेटपटू पैकी एक... इडन गार्डनच्या खेळीची तुलनाच होऊ शकत नाही.

'लक्ष्मणरेषा' हा शब्दप्रयोगच जणूं ज्याच्या मैदानातल्या व बाहेरच्या वर्तणूकीवरूनच आला असावा इतपत आदर्शवत असलेल्या या शैलीदार खेळाडूला मनःपूर्वक शुभेच्छा. > +१

किरण.. लेख अत्यंत आवडला!
मला पडलेला एक प्रश्नः
धोनीची काहीशी तुटक प्रतिक्रिया वाचली. मला बरेचदा प्र्श्न पडला की द्रविडच्या निवृत्तीनंतर किंवा सचिनची १०० शतके झाल्यावरही धोनी ने काही प्रतिक्रिया कशी व्यक्त केली नाही. माझ्या तरी वाचनात अथवा बघण्यात आले नाही. टवीटर (कसे लिहावे?) वर प्रतिक्रिया देणे कितपत योग्य आहे? खरचं काही खेळाडूंचे धोनी बरोबर वाद आहेत का?
खरतर ह्याबद्दल इथे काही चर्चा चालु आहे का ते बघायलाच मी इथे आले होते आणि हा लेख वाचला.

मस्त रे....
अजुन कुणा-कुणाला असे जाताना बघावे लागणार आहे कुणास ठाऊक?
सहवाग बरोबरही धोनीचे वाद आहेत असे दिसतेय. Sad

<सचिन आता एकटा पडणार. त्याने पण आता मानाने जावे. उगाच कपिल सारखे बसु नये असे वाटते.>

हा इथे वादाचा मुद्दा होवू शकतो Proud

धोनीचे वाद नक्कीच आहेत सेहवाग, हरभजन, युवराज बरोबर. पण आत्तापर्यंत त्याने कुजट वृत्ती कधीच दाखवली नव्हती. यावेळेस लक्ष्मणच्या बाबतीत काय झाले माहीत नाही. पूर्ण सीझन साठी प्रॅक्टिस केलेला लक्ष्मण त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करतो आणि तो होत नाही, मग अचानक निवृत्ती जाहीर करतो - ते ही पुढच्या कसोटीत निवड झालेली असताना (आणि नंतरच्या त्याच्या घरच्या पार्टीत धोनीला आमंत्रण नाही). जरा गडबड वाटते.

जबरदस्त... एकदम मनातलं लिहिलंय

>>> रामने हरेक युग मे जनम लिया है, लेकिन लक्ष्मण फिर पैदा नही हुआ !!! << < प्रचंड सहमत Happy Happy

<सचिन आता एकटा पडणार. त्याने पण आता मानाने जावे. उगाच कपिल सारखे बसु नये असे वाटते.>

हा इथे वादाचा मुद्दा होवू शकतो Lol +१

त्याने किती शतके केली वगैरेला काही अर्थ नाही. जे मनापासून क्रिकेट पाहतात त्यांना त्याचे अत्यंत महत्त्वाचे डाव कायमच लक्षात राहतील. >> +१

पूर्ण सीझन साठी प्रॅक्टिस केलेला लक्ष्मण त्याच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करतो आणि तो होत नाही, मग अचानक निवृत्ती जाहीर करतो - ते ही पुढच्या कसोटीत निवड झालेली असताना (आणि नंतरच्या त्याच्या घरच्या पार्टीत धोनीला आमंत्रण नाही). जरा गडबड >> कुठल्यातरी selector ने लक्ष्मणला हि तुझी शेवटची सिरीज असा अल्टिमेटम दिला होता म्हणे. तो ज्या तर्‍हेने दिला गेला त्यामूळे विफल होऊन VVS ने आधीच निव्रुत्ती घेतली असे वाचले. एकंदर ज्या तर्‍हेने निवड समिती काम करते त्यानुसार हे एकदम चपखल बसणारे कारण आहे.

प्रामाणीकपणे विचारल तर द्रविडच्या ऐवजी लक्ष्मण निव्रुत्ती जाहीर करेल असे मला वाटले होते नि द्रविड हा सिझन खेळेल अशी आशा होती.

वर काही काड्या टाकण्यात आलेल्या आहेत. Proud
कपिलदेव हा इथे लेखाचा विषय नाही. ( त्याने किंवा सुनीलने इतकं करून ठेवलेलं आहे भारतिय क्रिकेटसाठी कि ते आजही खेळत राहीले असते तरी त्यांना घरी बसा म्हणायचा कुणाला अधिकार पोहोचत नाही ).

यावर पुन्हा टिप्पणी नको Proud

आपण ललित लेखामध्ये स्वातंत्र्य घेतलं असेल कदाचित, पण जर आपण सुरवातीच्या परिच्छेदात २००१ च्या कोलकाता सामन्याबद्दल म्हणत असाल, तर त्यामध्ये दुसर्‍या डावात लक्ष्मण क्रमांक ३ वर आला होता आणि द्रविड क्रमांक ७ वर.

चांगला लेख... आवडला

लक्ष्मणसारखा स्टायलिश बॅट्समन मी तरी पाहीला नाही.

हैदराबाद व स्टायलिश बॅट्समन हे खरच आहे.. टायगर उर्फ मन्सुर अलि खान पतौडी व अब्बास अली बेग हेही तिथलेच...

Pages