आता मैदानावर पुन्हा मैफील नाही..

Submitted by Kiran.. on 19 August, 2012 - 01:52

laxman exit.jpgआता मैदानावर पुन्हा मैफील नाही..

इडन गार्डनसारखं प्रतिष्ठेचं मैदान. समोर अतिरेकी क्रिकेटवेडे बंगाली प्रेक्षक आणि भारत डावाने पराभवाच्या छायेत ! सगळ्या आशा संपलेल्या. खाली गाळ राहीलेला. जिव्हारी लागेल असा पराभव समोर दिसत असतो. मन इतरत्र रमवायचे सगळे प्रयत्न विफल झालेले असतात. त्यातल्या त्यात एका बाजूला नांगर टाकून भिंत उभी राहील्याचं समाधान असतं.

पण दुस-या एण्डचं काय ?

परिस्थिती ही अशी नाजूक असताना तो येतो. स्क्रीनकडे पहायचं धाडस होत नसतं. किलकिल्या डोळ्यांच्या कोप-यातून पाहताना त्याच्या हातात तंबोरा असावासा वाटू लागतं आणि चक्क कुणीतरी शिवरंजनी आळवत असल्याचा भास होत राहतो. कानामधे अचानक मेरे नैना सावन भादो वाजायला लागतं. आणि त्याच्या त्या मैफिलीने परिस्थितीचा विसर पडायला होतं.. तोच तो व्हेरी व्हेरी स्पेशल... लक्ष्मण ! रामायण काळापासून तारणहार म्हणून धावून येणारा व्ही व्ही एस लक्ष्मण !! निव्वळ फलंदाज म्हणून त्याचा उल्लेख होणं हे माझ्यासारख्याल दुखावणारं आहे. तो फलंदाजीतला पिकासोच !!!

त्याची एक एक इनिंग हे एक सुंदर चित्र आहे. लताचा आवाज नेहमीच छान असतो, पण काही गाण्यात जेव्हां तो खुलतो तसा लक्ष्मण एकदा खुलला कि त्या नजाकतीने गोलंदाज देखील मंत्रमुग्ध झालेले दिसलेत. ब्रेट ली ला अशा वेळी त्याच्या मैफिलीला आपण दाद देतोय असंच वाटत असणार जणू !

हैदाबाद संस्थानातच काही तरी आहे. वागण्या बोलण्यात असलेली नबाबी अदब, कलात्मकता यापूर्वीही एकाने मैदानावर दाखवली होती. महंमद अजहरुद्दीन त्याचं नाव. आणि आता लक्ष्मण !! पण लक्ष्मणचं वेगळेपण म्हणजे ज्या ज्या वेळी गरज पडली त्या त्या वेळी तो धावून आलाय. तळाच्या फलंदाजांना घेऊन खेळलाय. अझरुद्दीन देखील शैलीदार खराच.. पण संघासाठी जो लढला तो लक्ष्मणच ! या निकषावर लक्ष्मण हे नाव नेहमीच हि-यासारखं लखलखतं राहणार आहे. राहुलने देखील अनेकदा किल्ला लढवलाय खरा पण त्याची इनिंग ही लक्ष्मणसारखी कलाकुसरीने सजलेली नाही वाटली कधी. तुलना होऊ शकत नाही हे खरंच म्हणूनच या जोडीने एकमेकांना पूरक अशी भूमिका घेत अविस्मरणीय आणि अविश्वसनीय भागीदा-या रचल्या. जणू काही राम आणि लक्ष्मणाची जोडीच त्या वेळी संघात असावी.
18slde4.jpg
आणि मग उपकार सिनेमातला प्राणचा डायलॉग आठवतो..

रामने हरेक युग मे जनम लिया है, लेकिन लक्ष्मण फिर पैदा नही हुआ !!!

आपलं नशीब कि आपल्याला लक्ष्मण पहायला मिळाला, अनुभवायला मिळाला. त्याची बॅटींग ही आकडेवारीची गोष्टच नाही. दुस-या दिवशीच्या बातमीचा विषयही नाही.

मन क्यूं बहका रे बहका या गाण्यात आशा लतांची मैफील जमावी तशी लक्ष्मणची ती मैदानावर जमलेली मैफील होती. कधी बहरलेली कधी रुसलेली. अर्थात रूसलेल्या मैफिलीची भरपाई कसलेला गायक ज्या पद्धतीने रसिकांना करून देतो तशीच कामगिरी लक्ष्मणने ऑस्ट्रेलिया या त्याच्या परंपरागत शत्रूविरुद्ध केली आहे. पिवळा रंगाची जर्सी दिसली कि त्याच्या बॅटीच्या तारा आपोआप झंकारू लागायच्या आणि कधी शिवरंजनी, कधी भूप असे एकामागून एक राग आळवले जायचे.

opening laxman.jpg

काल त्याच्या निवृत्तीची घोषणा ऐकताना खूप वेदना झाल्या मनाला. अर्थात त्याने दिलेलं कारणही त्याच्या संवेदनशीलतेची साक्ष देऊन गेलं. काही असो, कालची त्याची ती सांजभैरवी उदासवाणी वाटली आणि कळून चुकलं... आता मैदानावर पुन्हा ही मैफील भरणे नाही.. !

व्हीव्हीएस लक्ष्मणची मैदानाबाहेरची इनिंगही अशीच व्हेरी व्हेरी स्पेशल होवो या शुभेच्छा !
VVS-Laxman-with-wife-and-children-before-a-press-conference-to-announce-his-retirement-from-international-cricket-at-the-Rajiv-Gandhi-International-cricket-stadium-in-Hyderabad.jpg

- Kiran..

( सर्व प्रचि आंतरजालावरून साभार )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Indian Cricket will miss players like Dravid, Anil & VVS... Happy

लेख छान. काही विधाने पटली नाहीत, पण ठीक आहे.
वैयक्तिक वादातून त्याला असा निर्णय घ्यावा लागला असेल, तर ते दुर्दैवी आहे.

"ना तमीज से खेला जाता है, ना तमीज से देखा जाता है" च्या जमान्यात द्रविड, लक्ष्मण (आणि काही काळानंतर सचिन)सारख्या खेळाडूंना तसाही फारसा स्कोप राहिलेला नाही. आपण सुदैवी, की आपल्याला यांचा खेळ याची देही याची डोळा अनुभवता आला...

Pages