मी अन गजल - अबके हम बिछडे

Submitted by दाद on 15 August, 2012 - 04:38

गजल ऐकण्याच्या प्रवासातला हा खर्‍या अर्थाने पहिला "समज" आलेला टप्पा. म्हणजे या आधी गजल ऐकल्या नाहीत असं नाही. पण काहीसा उथळ पाण्याला खळखळाट फार... तसं ऐकण होतं. म्हणजे गजल कशाशी खातात किंबहुना गजल आपल्याला कशी खाते, ते न कळत्या वयाचा प्रमाद होता तो. अनुप जलोटा, पंकज उधास, गुलाम अली अशी गाव परत परत घेत.... ती, गोल गोल फिरणारी, एखाद्या लहान मुलांच्या पार्कातली गाडी असावी ना, तसं चाललं होतं.

पंकज उधास म्हटलं की, त्या काळातल्या त्याच्या गाजलेल्या शराबच्या गजला आठवतात. शराब चीज ही ऐसी है, साकी शराब ला, असल्या.
आठवी-ते-दहावीची वर्षं असतिल. टेप रेकॉर्डर घरात नव्याने आला होता. टीव्ही नव्हताच. ऐकण्याची आवड... त्यामुळे वाढदिवसाचे वगैरे असे पैसे जमवून पंकज उधासच्या गजलांची ती धम्माल कॅसेट आणल्याचं आठवतय. पंकज उधासच्या गजल गायनात, अनेक वाद्य लावलेला जवळ जवळ ऑर्केस्ट्रा ऐकायला मिळायचा. त्यातल्या एका गजलने, त्यातल्या गिटारच्या ट्यूनने आणि त्याबरोबरच्या ठेक्याने जरा झोप उडवली होती-
कठिन है राह गुजर
थोडी दूर साथ चलो

गिटारची एक मस्तं ट्यून आणि साध्या तबला-डग्ग्यावर वाजलेला वेगळाच ठेका.... त्या वयातला अगदिच ’आय हाय’ प्रकार होता. आमच्या वर्गातला एक, एकीच्या घरी गेला... काहीतरी वही घ्यायला-द्यायला असलंच निमित्त असणार. निघताना दाराशी येऊन आगाऊपणे ही गजल गुणगुणली... चप्पल पायात सरकवता सरकवता. मुलीचे बाबा आरामखुर्चीत बसलेले, उठले आणि म्हणाले, ’चल, नाक्यापर्यंत सोडतो तुला’.
ऐकल्यावर आम्ही हसून हसून कोसळलो होतो. त्यांच्याकडे सामंतकाकाच गजला-बिजला जरा ऐकायचे... ही आमची वर्गमैत्रिण औरंगजेब होती.

असाच एक दिवस गुलाम अलि नावाचा धक्का बसला आणि पंकज उधास अगदिच ’उदास’ वाटायला लागला. तोपर्यंत माझ्यातही, जरा ’गायकी-बियकी’ भिनायला लागली होती. पल्लेदार ताना, आलापी, हरकती.... ह्यात आनंद मिळायला लागला होता. मग जरा शोधून शोधून गुलामलीच्या (हो, आम्ही गुलामलीच म्हणायचो, यडचाप सारखे) पंजाबी गजलाही ऐकल्या, नज्म, गीत, असलंही बरच काही.

हंगामा है क्यू बरपा, आवारगी, वो चौदवीकी रात थी, ऐ दिल ये पागल दिल मेरा.... असल्या अनेक गजलात नरम, मुलायमपणे, अल्लाद फिरणारा त्याचा आवाज, तालावरची त्याची हुकुमत, मधे मधे घेतलेल्या ताना, सरगम.... ह्या सगळ्याची एक वेगळीच जादू होती. गुलामलीच्या काही सोप्प्या गजला गाऊन भाव मारून जाणारं कुणी आलं, की आम्ही हमखास एका गजलची "फर्माइश" करून धुपवायचो - ’पारा पारा हुआ....’
फुरशासारखी तिरपी चाल बांधली होती.... आणि फिरकीच्या तानात गुलाम अली नुस्ता घुमवायचा. ही गजल गायला सुरूवात करून त्याच स्वरात संपवणारा वीर अजून मी बघितला नाही.... एखाद्याने केलाच प्रयत्नं तर त्याची ’पार पार’ वाट लागलेली असायची.

गंमत अशी की.... अगदी तेव्हाही त्याच्या ’गाण्यात’ इतके गुरफटले होत्ये, की ’गजल’ ही आधी एक कविता आहे, कुणा गजलकाराच्या लेखणीतून उतरलेली एक स्वयंभू मूर्त अहे..... गाणार्‍यांनी तिला सजवलीये, फक्त... हेच मुळी कळलं नव्हतं. त्यामुळे गजल कुणाची आहे? ह्याला उत्तर - ’गुलामलीची’ असं असायचं.... दागची किंवा अहमद फराज ची हे कळण्याइतकी समज आली नव्हती. आणि तसाही गजलचा घास जरा तोंडापेक्षा मोठाच झाला असता.

मला आठवतं, माझ्या मित्रपरिवारातल्या कुणीतरी गुलाम अलिच्या मुंबईतल्या एका खाजगी मैफिलीचं चोरून केलेलं रेकॉर्डिंग ऐकवलं. त्यात अब्दुल सत्तार नावाच्या एका पाकिस्तानी पठ्ठ्याने तबला वाजवला होता.... अगदी छप्परतोड म्हणतात तसला! कितीही जलद गतीतली गजल असली तरी ह्याची लग्गी दुप्पट-चौपट लयीत तितक्याच तयारीने वाजायची. शिवाय लय कोणतीही असली तरी, प्रत्येक बोल सोन्याच्या नाण्यासारखा... खणखणित, नजाकत तशीच.... ठेकेही न ऐकलेले....
ऐकण्यासारखच नव्हे तर शिकण्यासारखंही खूप होतं त्यात. मग अनेक दिवसच्या दिवस त्या लग्ग्या घोटवण्यात गेले.... गजलला तबला कसा कडक्क वाजला पाहिजे!

एक दिवस ’रंजिशही सही...’ बरोबर साथ करायची वेळ आली. माझ्या लग्ग्या मलाच जरा जास्तंच नटखट वाटल्या. म्हणून मग चौकशी केली की ही मुळची ऐकायला मिळेल का? अन तेव्हा पहिल्यांदा, ’मेहदी हसन’ हा नवा चमत्कार ऐकायला मिळाला.

साध्या पेटी, तबला, सतार अशा साथीवर गजलची नजाकत अजून खुलवत गाणं हा एक नवीन प्रकार होता. आत्तापर्यंत गायकीच्या लिबासात, ताना, लपटे ह्यांच्या अलंकारात गुरफटलेली गजल ऐकायची सवय....

आता समोर आलेली गजल म्हणजे नुक्ती न्हाऊन, ओलेत्यानेच, नि:संकोचपणे पण... अकस्मात समोर आलेल्या सुंदर तरूणीसारखी..... बोजड पेहराव नाही, कोणतंही आभुषण नाही...... नेसूचं, सुती पाटव अंगप्रत्यंगाला नुस्तं लपेटलेलं.... विधात्याच्या ह्या करणीचं कौतुक करीत नतमस्तक व्हावं असं अभिजात सौदर्य.

तेव्हा कळायला लागलं की गजल ही आधी एक कविता आहे आणि मग ते एक गाणं आहे.... म्हणूनच तो एक शब्दप्रधान गायकीचा प्रकार आहे. मग लक्षात यायला लागलं की, गजलची एक ओळ म्हणून झाल्यावर मधल्या काळात "ऑर्केस्ट्रा"चा गोंधळ नसला की, आधीच्या शब्दांची, सुरांची नजाकत कानांतून डोक्यापर्यंत आणि तिथून मनात उतरायला जरा उसंत मिळते.
सताठ वेळा मेहदी हसन एकच एक ओळ आळवतो तेव्हा प्रत्येक वेळी काहीतरी वेगळी गंमत असते... लफ्फेदार ताना नाहीत, चौतिस वाद्यांचे नव्वद आवाज नाहीत. आहे ते खूप साधं, सोप्पं, गोमटं आहे.

शब्द तेच पण त्यातला हर एक शब्दाचं अर्थानुरूप सौदर्य खुलवत गातो, मेहदी हसन.... शब्दांशी इमान ठेवत सूर लावणं सोप्पं नाही.... खूप आगळी कलाकुसर आहे ही... गाणार्‍याने संयमानं म्हणायची आणि ऐकणार्‍याने अलगद टिपायची...

’अबके हम बिछडे’ ही, मेहदी हसनने गायलेली, माझ्या त्या वयात जरा चटकाच लावून गेलेली अशीच एक गजल. गजलकार आहे, अहमद फराज.

अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले
जिसतरहा सूखे हुए फूल किताबों मे मिले ॥

मोहना किंवा भूपेश्वरी या रागात बांधलेली, अतिशय संथ लयीतली ही गजल. ’मालवून टाक दीप’ या गाण्याचाही तोच राग.

गम-ए-दुनिया ही गम-ए-यारमे शामिल करलो
नशा बढता है, शराब जो शराबों मे मिले ॥ (गम-ए-यार, अन दुनियेची सारी दु:खं.... सगळं एकत्र करा गडे हो... कारण एक शराब दुसरीत मिसळली की तिचा नशा वाढतो....)

ह्या गजलेचा मक्ता मोठा जीवघेणा आहे...

अब न वो मै हू न तू है न वो माझी है ’फराज’
जैसे दो साये तमन्नाके सराबों मे मिले ॥ (सराब - मृगजळ)

गजल ’ऐकायला’ सुरूवात इथे केली.... अहमद फराजच्या ह्या बिछोड्याच्या गजलेत मला ’गजल’ पहिल्यांदा थोडी भेटली, सापडलीशी वाटते... खूप गजल ऐकल्या नंतर... पण ह्या गजलची धुंद अजून उतरली नाहिये.

समाप्त.

******************************************************************************
मूळ गजल इथे ऐकायला मिळेल. नक्की ऐका.
http://www.esnips.com/displayimage.php?pid=34184962

भल्या पहाटेची वेळ....
थांब ना, अजून काहीच क्षण... काकुळतीला येऊन, डोळ्यांतलं पाणी न थोपवता सांगतोय तिला, नको नं जाऊस....
आता एकमेकांना हरवलो ना, तर... तर...
काळाच्या पुस्तकात कुठेतरी दडपून जाऊ, राणी.... वाट बघून बघून शुष्कं झालेल्या अशा फुलांची प्रत्यक्षं भेट कधी अन कशी मग?
...पुन्हा फक्तं स्वप्नांत भेट आपली...
म्हणून म्हणतो.... नको नं जाऊस....

भूपेश्वरी किंवा मोहना रागातली ही रचना व्याकूळ करणारी आहे. नेहमीचा भूप हा संध्याकाळचाच राग. त्यात फक्तं धैवत कोमल झालाय... रागाला कुण्या झावळ्या झावळ्या पहाटेच्या उन्मादात, एखाद्या नाजुक करंगळी नखाची... चंद्रकोर रेखल्यासारखी एक इवली, हळवी जखम झालीये. त्या साजणीवेळेच्या आठवणीनं झिणझिणून उमटलेला सित्कार म्हणजे तो कोमल धैवत.

कमालीच्या संथ लयीत ही गजल मेहदी हसन साहेबांकडून ऐकणं एक विलक्षण अनुभव आहे... अस्वस्थं करणारा अन तरीही सुकून देणारा.
तू खुदा है न मेरा..... किती किती प्रकारांनी गातात मेहदी हसन. पण कुठेही तानमात्रंही शब्दांशी प्रतारणा नाही. गजलवर, तिच्या शब्दंवैभवावरलं त्यांचं असीम प्रेम जराही ढळलेलं दिसत नाही.
ह्याच गजलमधला, माझा अजून एक आवडता शेर -
ढूंढे उजडे हुए लोगोंमे वफाके मोती
ये खजाने तुझे मुम्किन है खराबोंमे मिले
ह्यात "वफाके मोती"वरली त्याचं नक्षीकाम केवळ अप्रतिम. तळहातावर मोती घेऊन त्याचे विविध पैलू दाखवीत रहातात, साहेब.

गजल हे एक घडीव शिल्पं आहे. तिला स्वत:चं म्हणून एक अभिजात सौदर्य आहे, शब्दंवैभव आहे. ते झाकून, विस्कटून, किंवा त्याचे ढलपे पाडीत गाण्याला कदाचित गाण्यावरची हुकुमत दाखवण्याचा सोस म्हणता येईल... पण त्या सौदर्याचा तो कोण अपराध होईल, किती प्रतारणा असेल ती...
मेहदी हसन साहेबांनी गजल ही अशी माझ्यासमोर... अशी अलगद उलगडली. एक एक शमा उजळीत तिच्या अंग-प्रत्यंगाला त्यांनी कमालीच्या हळूवारपणे... अगदी लाजरीच्या पानानं उघडावं पण मिटू नये म्हणून अलवार स्पर्शावं तसं आपल्या सुरांनी स्पर्शिलं.
तिच्या अभिजात सौदर्याचा कुठेही उपमर्द होणार नाही, त्याला धस लागणार नाही अशा नाजुकतेनं आपल्या सुरांचं लेपन करीत राहिले मेहदी हसन साहब... अन...
अन गजलही त्यांच्या सुरांच्या-लयींच्या सेजेवर नि:संकोच, अनुरक्त झालेली, आढळली मला...

मला अगदी अलगद हाताला धरून गजलच्या ह्या पहिल्या अनुभुतीच्या क्षेत्री घेऊन गेलेल्या ह्या गजल सम्राटाला माझे लाखो करोडो सलाम.
इथे सुरू झालेलं हे प्रेमप्रकरण... माझं अन गजलचं.
कुठेतरी मी सुद्धा तिच्या सावलीला पुन्हा पुन्हा चुंबित हेच म्हणत राहिले...
अबके हम बिछडे....

समाप्त
*****************************************************************************
अवांतर: गजल खर्‍या अर्थानं भेटण्याच्या, ऐकण्याच्या प्रवासातला मेहदी हसन साहब हा पहिलाच टप्पा.
बेगम अख्तर हे वेड इतकं टोकाचं आहे की, गजल माझ्यापर्यंत किंवा मी गझलपर्यंत पोचण्याच्या ह्या प्रवासात बाईंचा उल्लेखही करायचं धाडस झालं नाही.... किती वाहावले असते त्याला सुमार नाही.

आणि अगदी खरं सांगायचं तर, तो प्रवासाचा भागच नाही...

जिच्यापर्यंत पोचण्याचा प्रवास, प्रवास म्हटला, यातायात केली... ती गजल, तो दर्द... इथे, काळजातच कधीचाच घमघमतोय.... ह्याचा साक्षात्कार म्हणजे अख्तरीबाई!
ती एक जखम खोलून दाखवायचीच आहे कधीतरी, यारो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

किंबहुना गजल आपल्याला कशी खाते, ते न कळत्या वयाचा प्रमाद होता तो. >>
खल्लास !!!
लेख नेहमीप्रमाणेच सुंदर Happy
गाण्यातलं कळत काहीच नाही, पण कानाला-मनाला गोड वाटतं.

अतीशय सुन्दर

गझल लिहिणे हे माझे काम ! इतकंच जमतं तेही जमेल तसं मी लिहित असतो

गझलगायकीत मला काहीएक समजत नाही पण तुम्ही लिहिलेलं वाचताना त्यात असंच हरवून जातच .....राहावं जातच राहावं असं वाटत होतं

मनःपूर्वक धन्यवाद या लेखनाखासाठी

आई ग्गं!! केवढे अप्रतिम लिहिलेय तुम्ही दाद!! खूप खूप आवडलं! Happy
मेहदी हसनजींच्या विषयी तर अगदी त्यांच्या गायकीइतकंच सुरेख लिहिलेय... अगदी सही सही पोहोचलं. गज़लेच्या शब्दांत गुंगून जातानाच ती कशी पेश केलीय अन ती ऐकावी कशी ह्याचा सुंदर पाठच मिळाला मला.
तुम्ही स्वत: एक कलाकार आहात असे वाटतेय आणि त्यामुळेच तुमचे उत्कट रसिकत्व अगदी मनाला भिडलेच. खूप छान! जियो!! Happy

एका एका शब्दा सोबत नुसतं हरवत जावं असं लिहता तुम्ही. पाहिलेला नसला तरी एक गोडसा चेहरा फिरत राहतो डोळ्यासमोर .. कानातून उमटत राहतो शब्द अन शब्द मेंदूच्या धुसर पडद्यावर.. एखाद्या गोड गळ्याने शब्दांऐवजी नुसतच स्वरांनी गुणगुणावं तसं....

लेख नेहमीप्रमाणेच.... क्लास!!!
.................................................................

त्याला ढका लागणार नाही >>> टायपो. रसभंग करतो.....

शाम Happy

शाम Happy
मला ढका च म्हणायचय... धक्का नाही.
टायपो म्हणून नाही पण शब्दंच रसभंग करीत असेल असं वाटतय. लिहिण्याच्या ओघात निघून गेलेला शब्दं आहे तो.
बदलू या.
सगळ्यांचे आभार... मला खूप खूप आवडणारी गजल आहे ही.

दाद, 'गझलकडे वाटचाल' छान मांडली आहेस.
पण या गझलची 'वृत्ती' तू म्हटल्याप्रमाणे लडिवाळ ('जाऊ नकोस नं' इ.) नाही वाटलेली मला.
फराझसाहेब आयुष्यातल्या अटळ परिणितींना अगदी सर्जिकल कठोरपणे मांडतात अनेकदा. कडवटसुद्धा होत नाहीत. निव्वळ स्पष्ट!
(आठवा :
आँख से दूर ना हो - दिल से उतर जायेगा
वक्त का क्या है - गुजरता है, गुजर जायेगा)

या गझलमधेही असाच कठोर स्वीकारच दिसतो मला.
इतके दिवस दुरावा, पुन्हा उमाळे हे सगळं झालं खरं, वय होतं, उर्मी होती, विरोधावर मात करायची ईर्षा होती, पण आता मात्र दुरावलो तर पुन्हा एकत्र येऊ असं वाटत नाही. कधी चुकून भेट झाली तर स्वप्नातच! पुस्तकात सुकलेल्या फुलासारखी. कोरडी आणि नि:संदर्भ.

मला सर्वात आवडणारा शेर असाच कुर्रेबाज आहे.
तू खुदा है, न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनों इन्साँ हैं तो क्यूँ इतने हिजाबों में मिलें?

आपले दोघांचेही पाय मातीचेच आहेत! तूही देव नाहीस आणि माझं प्रेमही भक्तीच्या पातळीला गेलेलं नाही! तू करणार आहेस ती कृपा नाही आणि तू कृपावंत होशील म्हणून मी फार काळ वाट बघेन असंही नाही! आपण दोघंही असलं काही 'प्रोजेक्ट' करायच्या फंदात न पडता स्वच्छपणे भेटलो तरच काही घडण्याची शक्यता!

'नश्शा बढता है शराबें जो शराबोंमें मिलें'ची अशीच गंमत! दु:ख, वंचना ही शराब आहे. तिची चव कडवट तरी नशा हवीशी आहे. 'वफा के मोती' वरवर कितीही कौतुकाचे वाटले तरी कोणीही गळ्यात घालून घेत नाही, ते धुळीतच पडलेले सापडायचे! काळानुसार जमानाच काय, मीही बदलतोच आहे की! आता तो पूर्वीचा मी आणि हा आजचा मी इतकी वेगळ्या जगातली माणसं झालो आहोत की आम्ही भेटण्याची शक्यता कुठल्यातरी मृगजळाच्या लाटांवर वाहणार्‍या सावल्या भेटण्याइतकीच दुर्धर!

हा 'अ‍ॅटिट्यूड'च गझलची खरी मजा असते. म्हणूनच गझल 'कहने'वाली बात है. गायली की तो अ‍ॅटिट्यूड हरवतोच बर्‍याचदा आणि कवीला अभिप्रेतच नसलेले तरल/तलम उसासे त्यात कोंबले जातात असं माझं एक (मेहंदी हसन आणि सगळ्याच दिग्गजांची क्षमा मागत) नम्र मत. Happy

नेमकी कालच मीरच्या 'दिखाई दिये यूँ'वर एक छोटीशी चर्चा झाली होती इथेच, तेव्हा हेच प्रकर्षाने जाणवलं म्हणून हे सगळं लिहायचा प्रपंच. Happy

दाद, लेख आवडला Happy

स्वाती, मस्त पोस्ट .. एकदम पटली.

तू खुदा है, न मेरी इश्क फरिश्तों जैसा
दोनों इन्साँ हैं तो क्यूँ इतने हिजाबों में मिलें? >> माझाही आवडता Happy

दाद, छान लेख, सगळीच माहिती नवीन आहे. Happy

स्वाती, मस्त पोस्टं! शेर उलगडून सांगितलेस तो भाग फारच आवडला. Happy

हा लेख म्हणजे सुद्धा एक मखमली गझल झाली आहे ....

ती एक जखम खोलून दाखवायचीच आहे कधीतरी, यारो. >> countdown begins

हा 'अ‍ॅटिट्यूड'च गझलची खरी मजा असते. म्हणूनच गझल 'कहने'वाली बात है. गायली की तो अ‍ॅटिट्यूड हरवतोच > > बाई हे दर वेळी असेच असते असे नाही ना. कधी कधी तीच गझल वेगळ्या स्वरुपात समोर येते. 'दिखाई दिये यूँ' चेच उदाहरण समोर आहे. more the merrier आहे ना इथे.

छान.

>> बाई हे दर वेळी असेच असते असे नाही ना.
नाहीच. 'बर्‍याचदा' असंच म्हटलं आहे. 'मोअर द मेरिअर' हे खरं, इन फॅक्ट 'इम्कानात' (possibilities) असलेली शायरी उत्तमच समजतात. पण त्याच शब्दांचे अनेकविध पदर उलगडत जाणं निराळं आणि इतर संस्कारांमुळे (चाल बांधताना वापरलेला राग, गायकीची पद्धत, आवाजाचा पोत इ.) त्यांचा मूळ अर्थ बदलून / झाकोळून जाणं निराळं.
कोणाला स्वाभाविकतःच सुरांचे विभ्रम अधिक जाणवतात/भावतात तर कोणाला शब्दांचे. सूर हीच गाणार्‍यांची भाषा असते, म्हणूनच शास्त्रीय गायकीत शब्द अत्यंत दुय्यम स्थानावर असतात. पण जिला शब्दप्रधान गायकीच म्हणायचं, तीत सुरांमुळे शब्दांचा विपर्यास झाला असं होऊ नये. Happy

त्यांचा मूळ अर्थ बदलून / झाकोळून जाणं निराळं >> पण समजा झाले असे तर ते चांगले नाहीच असे का धरायचे ? गझल उलगडायची अजून एक पातळी Happy

शब्दांचा विपर्यास झाला असं होऊ नये >> विपर्यास होऊ नयेला अनुमोदन पण वेगळा अर्थ उलगडला तर फारसे बिघडू नये असे मला वाटते. कदाचित कलाकारावर अन्याय होणारे असेल पण consumer (श्रोता/रसिक्/वाचक ह्यातला कुठलाच शब्द हि छटा पकडत नाहिये) वर नाही Happy

भूप रागात फक्त एक सूर बदलून भूपेश्वरी ( मुस्लिम कलाकार त्याला भूपकली म्हणतात) बनतो.
अवांतर - चढता सूरज धीरे धीरे पण यातच आहे.
चू. भू. दे. घे.

दाद,कुर्निसात.
याच क्रमाने ही माणसं आयुष्यात आलीत..

तेव्हा कळायला लागलं की गजल ही आधी एक कविता आहे आणि मग ते एक गाणं आहे.... म्हणूनच तो एक शब्दप्रधान गायकीचा प्रकार आहे. मग लक्षात यायला लागलं की, गजलची एक ओळ म्हणून झाल्यावर मधल्या काळात "ऑर्केस्ट्रा"चा गोंधळ नसला की, आधीच्या शब्दांची, सुरांची नजाकत कानांतून डोक्यापर्यंत आणि तिथून मनात उतरायला जरा उसंत मिळते.
सताठ वेळा मेहदी हसन एकच एक ओळ आळवतो तेव्हा प्रत्येक वेळी काहीतरी वेगळी गंमत असते... लफ्फेदार ताना नाहीत, चौतिस वाद्यांचे नव्वद आवाज नाहीत. आहे ते खूप साधं, सोप्पं, गोमटं आहे.
अगदी खरं.
स्वातीचा प्रतिसादही कडक.

अप्रतिम!
तू खुदा है, न मेरा इश्क फरिश्तों जैसा
दोनों इन्साँ हैं तो क्यूँ इतने हिजाबों में मिलें?
हा तर अत्यंत आवडता शेर, अगदी आतून पुरेपूर पटलेला!

मस्त लेख !
स्वातीची पोस्ट पण मस्त.
सताठ वेळा मेहदी हसन एकच एक ओळ आळवतो तेव्हा प्रत्येक वेळी काहीतरी वेगळी गंमत असते. >> अगदी अगदी. मेहंदी हसनच काय गुलाम अली पण... 'इतनी मुद्दत बाद मिले हो' मधे गुलाम अली जितक्या वेळा ती ओळ म्हणले आहेत तितक्या वेळा वेगवेगळी गंमत आहे त्यात.
मस्त चर्चा आहे इथे.

सुंदर लेख दाद! अगदी अनुभवला.
असामीना अनुमोदन.
>>हा 'अ‍ॅटिट्यूड'च गझलची खरी मजा असते. म्हणूनच गझल 'कहने'वाली बात है. गायली की तो अ‍ॅटिट्यूड हरवतोच बर्‍याचदा आणि कवीला अभिप्रेतच नसलेले तरल/तलम उसासे त्यात कोंबले जातात असं माझं एक (मेहंदी हसन आणि सगळ्याच दिग्गजांची क्षमा मागत) नम्र मत. >>

गझल 'कहने'वाली बात पेक्षा "महसूस" करनेवाली बात है. ती लिहिताना शायराची भावनाच तेव्हढी ओरिजिनल. बाकी कोणाला ती कशी कळली हे त्या भावनेशी जुळणारच नाही. या कळण्यात मग अनेक बाह्यगोष्टींचा वाटा असतो. संगित, सूर, आवाज हे तर झालेच, पण माझी तेंव्हाची मनःस्थिती ही.

दाद!!!! माझ्या जीवाभावाच्या विषयावर, तुझ्या लेखणीतून.(इथे बोटांतून Happy ) सांडलेले हे अनमोल मोती उचलता उचलता तिरपीट होते.. काय काय पुन्हा पुन्हा वाचू असे होते..
पटकन वाचून समाधान होत नाही.. एकेक मोती नजरेपुढून हळूहळू ,नीट निरखला जातो,मनात ,डोक्यात रजिस्टर होईपर्यंत!!
नुकत्याच सोडून गेलेल्या 'मेहदी हसन ' ची त्याच दिवशी मुद्दाम लावलेली ,' शोला था जल चुका हूँ..'
ऐकताना काळजचे अक्षरशः अनगिनत तुकडे झाले गं!!!....
गुलाम अली जी, मेहदी साहब, बेगम अख़तर ही नावे घेताना आपोआप काना ला हात लागतो ...
प्लीज बेगम अख़तर वर लिहीच !!

>>>
अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले
जिसतरहा सूखे हुए फूल किताबों मे मिले ॥

थांब ना, अजून काहीच क्षण... काकुळतीला येऊन, डोळ्यांतलं पाणी न थोपवता सांगतोय तिला, नको नं जाऊस....
आता एकमेकांना हरवलो ना, तर... तर...
काळाच्या पुस्तकात कुठेतरी दडपून जाऊ, राणी.... वाट बघून बघून शुष्कं झालेल्या अशा फुलांची प्रत्यक्षं भेट कधी अन कशी मग?
<<<

भल्या पहाटेच ऐकायचा योग आला.

अर्थ थोडा वेगळा जाणवला.
अत्ता जर वेगळे झालो, तर पुन्हा भेट होणे कठीण.. कदाचित कधीतरी स्वप्नांत भेटलीस तितकीच भेट होईल.. तीही कशी अचानक, ध्यानीमनी नसताना. कधीतरी जुन्या पुस्तकात ठेवलेलं फूल सापडतं, ते तसं अचानकच.

काय झक्कास चर्चा झालीये इथे... मला जुन्या मायबोलीची आठवण झाली Happy
स्वाते... Happy
अगदी अगदी खरय... आणि सगळंच्या सगळं पटलं अन कबूलही...

सूर, लय ह्यांचं(अन बहुतेकदा ह्यांचंच) अनुभवक्षेत्रं ही माझी मर्यादा आहे. माझ्या बुद्धीची झेप ते झाकोळ काढून अधिक खोल, गहन... कवीला नक्की काय अभिप्रेत ह्यापर्यंत बहुतेकदा पोचत नाही. ह्या गजलच्या बाबतीत तरी पोचलेली नाही. तू म्हणते आहेस, तेच अहमद फराज साहेबांना (कदाचित) म्हणायचं असेल...

पण भूपेश्वरी रागात, मेहदी हसन साहेबांनी जिला माझ्या पहिल्या-वहिल्या भेटीला आणली ती... ती अशीच आहे.
ही गजल माझ्यापर्यंत पोचली तेव्हा आडनिड्या मजेशीर वयाच्या टप्प्यात होते. ह्या लेखात म्हटलय अगदी तितकीच "हळवी अन भावुक" होऊन ती मला तेव्हा भेटलीये. ह्या गजलचं हे रूप माझ्यासाठी इतकं मोहनी की, त्यामागची गजलकाराची मूळ भूमिका समजून घेण्याची आवश्यकताच भासली नाही... तेव्हा तर तितकी समज नव्हती आणि अजूनही नाही...
त्याबाबतीत माझी समज अजूनही तितक्याच आडनिड्या मजेशीर वयाची आहे असं मीच म्हणेन.

कधीतरी हे ही सावट (चुकीचा शब्दं...)... हा ही पडदा दूर होईल आणि तू म्हणते आहेस त्या विशुद्धं स्वरूपात मला गजल भेटू येईल... तोपर्यंत तरी तुला असच मधे मधे येऊन चार तरी शब्दं सुनवावे लागतिल असं दिसतय.

दाद! .. पून्हा अतिशय सुंदर लेख. मला हसनसाहेबांना ऐकायला तसं फार उशिरा मिळालं, सौदीत असतांना एका पाकिस्थानी मित्राने त्यांच्या गझलांची सिडी दिली होती.. बघता बघता त्या गझला तनमनात भिनत गेल्या. त्यांच्या 'एक बस तूही नही', 'केसरीया बालमा', 'पत्ता पत्ता' ई. ई. कितीही ऐकल्या तरी मन भरत नाही.

मेहदी हसन यांच्या गजला मी अजून तरी ऐकल्या नाहीयेत... पण तुझा लेख, स्वातीच्या विशेष टिप्पण्या हे सर्व एक अनामिक आनंद देऊन गेले.......

तुम्ही लोक फार तरल संवेदनांचे आहात ते तुमच्या लिखाणात उतरतेच उतरते - त्या संवेदना माझ्यासारख्या सामान्य माणसालादेखील जाणवतात हेच तुमच्या लेखणीचे कौशल्य.......

एखादे फूल काय किंवा अवचित पहाटेस दिसणारी द्वितीया - तृतीयेची कोर काय - मन मोहून टाकायला पुरेशी असते - मी फार विचार न करता तो आनंद, ते सुख अनुभवीत रहातो - चिकित्सा न करता....

लेख / ललित छान आहे. गझल आस्वादण्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या काही प्रमुख शक्यतांपैकी एक म्हणजे गझल गायकी आवडू लागणे. या मार्गाने अनेक जण गझल रसिक व काही वेळा गझलकारही होऊ शकतात, होतात, लेखामध्ये स्वतःच्या आवडी निवडी व अनुभुती उत्तम गुंफल्या गेलेल्या आहेत. त्यातील भावनांशी सहमत होणारे खूप जण असणार यात शंका नाही. त्याचसहीत लेखात थोडा 'गझल रचण्याची प्रक्रिया व्हर्सेस गझल गायकीतून गजल रचण्यावर पडलेला प्रभाव' याबाबत थोडे विवेचन यायला हवे होते असे वाटले. (कदाचित ते या लेखाच्या व्याप्तीत नसावेही)

(गंमत म्हणजे - ज्या गझला गुलाम अली, जगजीत सिंग या प्रभृतींनी गायल्या त्या मुळातच श्रेष्ठ गझला , निदान श्रवणीय व गायनानुकूल गझला तरी होत्या. पण आजचे - आमच्या पिढीचे - गझलकार, खास पांचाळेंनी आपली गझल गावी यासाठी गझल रचण्यापर्यंत गेले आहेत हे नवलाईजनक दु:खद वास्तव आहे. कवीने कवीच्या ताठ्यात असावे, कोणी गायला गझल मागीतली तर एक पैसा न घेता देऊन टाकावी पण कोणी गझल गावी म्हणून एक साधा शेकहॅन्डही करू नये असे माझे स्पष्ट आहे. तशीही, गझल ही गप्पा मारल्यासारखी मुशायर्‍यात ऐकवून दाद मिळवण्याची पात्रता अंगी आली आणि ते सुख जाणवले की लोकांना आपोआप समजतेच की गझल गायक हे गझलकाराच्या जीवावर असतात , गझलकार त्यांच्या नव्हे) Happy

पंकज उधास - मुलायम आवाज, मद्याचे सभ्य व मिश्कील उदात्तीकरण आणि साध्या सोप्या रचनांची निवड

गुलाम अली - आवाजातून चित्र डोळ्यासमोर उभे करण्याची अफाट क्षमता. जसे 'कंगन घुमाना'मधील 'घुमाना' या शब्दाचा उच्चार किंवा 'दिलमे इक लहरसी उठी है अभी'मधील 'लहर' या शब्दाच्या उच्चारातून लाटांची जाणीव करून देऊ शकणे. उर्दूचा भर अधिक असलेल्या उत्तम गझलांची निवड.

जगजीत सिंग - अतिशय दर्दभरा आवाज आणि वैविध्यपूर्ण गीते, गझलांची निवड. गायकी दाखवण्याचा उत्साह गुलाम अलींप्रमाणेच भरपूर.

मेहंदी हसन - (मला नाही आवडले कधी, खरे तर, पण इतर म्हणतात म्हणून आपणही मोठे म्हणायचे तसे झाले आहे इतकेच). जाड आवाज , अस्पष्ट उच्चार आणि गायकीवर अतोनात भर

या सर्व गायकांनी गझल आम केली असली तरीही त्यातून ते स्वतः मोठे होत राहण्याच्या प्रक्रियेलाच वेग आला. जसे दाद यांनी लिहिले आहे तसेच 'गझल कोणाची?' तर 'गुलाम अलीची' असेच होत राहिले. याला अनेक कारणे आहेत. मोमीन जिवंत असताना गुलाम अली जन्माला आलेले नव्हते आणि एकाचवेळी दोघेही (कवी व गायक) जिवंत असले तर निव्वळ मानधनावर कवी गप्प बसले. यातूनच शायरांच्या लाईव्ह मुशायर्‍यांचे महत्व किती असायला हवे, किती आहे ते लक्षात यावे.

गझल आम झाली खरी, पण मराठी माणसासाठीही उर्दू गझल मराठी गझलेपेक्षा अधिक मोठी राहिली. (हा विषय येथे अस्थानी आहे याची नम्र जाणीव आहे).

बाईंनी लिहिलेले प्रतिसाद अतिशय महत्वाचे आहेत. त्यांचे 'मत शब्दबद्ध करण्याचे कसब' शिकण्यासारखे आहे. फक्त त्यांचें एकच मत 'जैसे सुखे हुवे फूल किताबोंमे मिले' यातील त्या फुलांसाठी बाईंनी वापरलेला 'नि:संदर्भ' हा शब्द मला पटला नाही व रुचलाही नाही. त्या वाळलेल्या फुलांचे अचानक समोर येणे याला लाखो संदर्भ असल्यानेच तो शेर व त्यातील ती विशिष्ट ओळ हे त्या शेराचे सौंदर्यस्थान झाले आहे असे माझे मत आहे. त्या उपमेला, त्या बाबीला खूप संदर्भ आहेत असे कवी म्हणत आहे असे मला वाटते. Happy

=================

गझल गायकीबाबतचे स्वानुभव काव्यमयरीत्या गुंफून समोर ठेवणारे एक अतिशय सुंदर लालित म्हणता येईल हे. पण यातही मराठी गझल, ज्या गायल्या गेल्या, जसे सुरेश भट, वैभव जोशी, यांचेही उल्लेख कदाचित योग्य ठरले असते. याचे कारण निव्वळ मराठीचा अभिमान वगैरे नसून आपणच आपल्या लोकांबाबत (एवढे ललित लिहिताना) चार शब्द लिहिणे आवश्यक वाटणे इतकेच आहे. Happy ही टीका तर अजिबातच नसून केवळ एक मैत्रीतले मत आहे.

(अर्थात, भटसाहेबांना या उल्लेखांची आवश्यकता असण्याचा काळ पन्नास वर्षांपूर्वीच गेला असेल म्हणा.)

=================

मला वाटते दाद यांनी या ऐकलेल्या गझला प्रत्यक्षात कोणी, कुठे व किती मोठ्या लिहिलेल्या आहेत त्याचा आढावा 'पुढच्या भागात' घ्यायलाच हवा. जसे मीरची 'दिखाई दिये' ही गझल प्रत्यक्षात किती मोठी आहे हे त्या धाग्यावर दिसून आले. Happy याचा अर्थ पुढचा भाग यायला हवा. Happy

शुभेच्छा व अभिनंदन

-'बेफिकीर'!

Pages