मी अन गजल - अबके हम बिछडे

Submitted by दाद on 15 August, 2012 - 04:38

गजल ऐकण्याच्या प्रवासातला हा खर्‍या अर्थाने पहिला "समज" आलेला टप्पा. म्हणजे या आधी गजल ऐकल्या नाहीत असं नाही. पण काहीसा उथळ पाण्याला खळखळाट फार... तसं ऐकण होतं. म्हणजे गजल कशाशी खातात किंबहुना गजल आपल्याला कशी खाते, ते न कळत्या वयाचा प्रमाद होता तो. अनुप जलोटा, पंकज उधास, गुलाम अली अशी गाव परत परत घेत.... ती, गोल गोल फिरणारी, एखाद्या लहान मुलांच्या पार्कातली गाडी असावी ना, तसं चाललं होतं.

पंकज उधास म्हटलं की, त्या काळातल्या त्याच्या गाजलेल्या शराबच्या गजला आठवतात. शराब चीज ही ऐसी है, साकी शराब ला, असल्या.
आठवी-ते-दहावीची वर्षं असतिल. टेप रेकॉर्डर घरात नव्याने आला होता. टीव्ही नव्हताच. ऐकण्याची आवड... त्यामुळे वाढदिवसाचे वगैरे असे पैसे जमवून पंकज उधासच्या गजलांची ती धम्माल कॅसेट आणल्याचं आठवतय. पंकज उधासच्या गजल गायनात, अनेक वाद्य लावलेला जवळ जवळ ऑर्केस्ट्रा ऐकायला मिळायचा. त्यातल्या एका गजलने, त्यातल्या गिटारच्या ट्यूनने आणि त्याबरोबरच्या ठेक्याने जरा झोप उडवली होती-
कठिन है राह गुजर
थोडी दूर साथ चलो

गिटारची एक मस्तं ट्यून आणि साध्या तबला-डग्ग्यावर वाजलेला वेगळाच ठेका.... त्या वयातला अगदिच ’आय हाय’ प्रकार होता. आमच्या वर्गातला एक, एकीच्या घरी गेला... काहीतरी वही घ्यायला-द्यायला असलंच निमित्त असणार. निघताना दाराशी येऊन आगाऊपणे ही गजल गुणगुणली... चप्पल पायात सरकवता सरकवता. मुलीचे बाबा आरामखुर्चीत बसलेले, उठले आणि म्हणाले, ’चल, नाक्यापर्यंत सोडतो तुला’.
ऐकल्यावर आम्ही हसून हसून कोसळलो होतो. त्यांच्याकडे सामंतकाकाच गजला-बिजला जरा ऐकायचे... ही आमची वर्गमैत्रिण औरंगजेब होती.

असाच एक दिवस गुलाम अलि नावाचा धक्का बसला आणि पंकज उधास अगदिच ’उदास’ वाटायला लागला. तोपर्यंत माझ्यातही, जरा ’गायकी-बियकी’ भिनायला लागली होती. पल्लेदार ताना, आलापी, हरकती.... ह्यात आनंद मिळायला लागला होता. मग जरा शोधून शोधून गुलामलीच्या (हो, आम्ही गुलामलीच म्हणायचो, यडचाप सारखे) पंजाबी गजलाही ऐकल्या, नज्म, गीत, असलंही बरच काही.

हंगामा है क्यू बरपा, आवारगी, वो चौदवीकी रात थी, ऐ दिल ये पागल दिल मेरा.... असल्या अनेक गजलात नरम, मुलायमपणे, अल्लाद फिरणारा त्याचा आवाज, तालावरची त्याची हुकुमत, मधे मधे घेतलेल्या ताना, सरगम.... ह्या सगळ्याची एक वेगळीच जादू होती. गुलामलीच्या काही सोप्प्या गजला गाऊन भाव मारून जाणारं कुणी आलं, की आम्ही हमखास एका गजलची "फर्माइश" करून धुपवायचो - ’पारा पारा हुआ....’
फुरशासारखी तिरपी चाल बांधली होती.... आणि फिरकीच्या तानात गुलाम अली नुस्ता घुमवायचा. ही गजल गायला सुरूवात करून त्याच स्वरात संपवणारा वीर अजून मी बघितला नाही.... एखाद्याने केलाच प्रयत्नं तर त्याची ’पार पार’ वाट लागलेली असायची.

गंमत अशी की.... अगदी तेव्हाही त्याच्या ’गाण्यात’ इतके गुरफटले होत्ये, की ’गजल’ ही आधी एक कविता आहे, कुणा गजलकाराच्या लेखणीतून उतरलेली एक स्वयंभू मूर्त अहे..... गाणार्‍यांनी तिला सजवलीये, फक्त... हेच मुळी कळलं नव्हतं. त्यामुळे गजल कुणाची आहे? ह्याला उत्तर - ’गुलामलीची’ असं असायचं.... दागची किंवा अहमद फराज ची हे कळण्याइतकी समज आली नव्हती. आणि तसाही गजलचा घास जरा तोंडापेक्षा मोठाच झाला असता.

मला आठवतं, माझ्या मित्रपरिवारातल्या कुणीतरी गुलाम अलिच्या मुंबईतल्या एका खाजगी मैफिलीचं चोरून केलेलं रेकॉर्डिंग ऐकवलं. त्यात अब्दुल सत्तार नावाच्या एका पाकिस्तानी पठ्ठ्याने तबला वाजवला होता.... अगदी छप्परतोड म्हणतात तसला! कितीही जलद गतीतली गजल असली तरी ह्याची लग्गी दुप्पट-चौपट लयीत तितक्याच तयारीने वाजायची. शिवाय लय कोणतीही असली तरी, प्रत्येक बोल सोन्याच्या नाण्यासारखा... खणखणित, नजाकत तशीच.... ठेकेही न ऐकलेले....
ऐकण्यासारखच नव्हे तर शिकण्यासारखंही खूप होतं त्यात. मग अनेक दिवसच्या दिवस त्या लग्ग्या घोटवण्यात गेले.... गजलला तबला कसा कडक्क वाजला पाहिजे!

एक दिवस ’रंजिशही सही...’ बरोबर साथ करायची वेळ आली. माझ्या लग्ग्या मलाच जरा जास्तंच नटखट वाटल्या. म्हणून मग चौकशी केली की ही मुळची ऐकायला मिळेल का? अन तेव्हा पहिल्यांदा, ’मेहदी हसन’ हा नवा चमत्कार ऐकायला मिळाला.

साध्या पेटी, तबला, सतार अशा साथीवर गजलची नजाकत अजून खुलवत गाणं हा एक नवीन प्रकार होता. आत्तापर्यंत गायकीच्या लिबासात, ताना, लपटे ह्यांच्या अलंकारात गुरफटलेली गजल ऐकायची सवय....

आता समोर आलेली गजल म्हणजे नुक्ती न्हाऊन, ओलेत्यानेच, नि:संकोचपणे पण... अकस्मात समोर आलेल्या सुंदर तरूणीसारखी..... बोजड पेहराव नाही, कोणतंही आभुषण नाही...... नेसूचं, सुती पाटव अंगप्रत्यंगाला नुस्तं लपेटलेलं.... विधात्याच्या ह्या करणीचं कौतुक करीत नतमस्तक व्हावं असं अभिजात सौदर्य.

तेव्हा कळायला लागलं की गजल ही आधी एक कविता आहे आणि मग ते एक गाणं आहे.... म्हणूनच तो एक शब्दप्रधान गायकीचा प्रकार आहे. मग लक्षात यायला लागलं की, गजलची एक ओळ म्हणून झाल्यावर मधल्या काळात "ऑर्केस्ट्रा"चा गोंधळ नसला की, आधीच्या शब्दांची, सुरांची नजाकत कानांतून डोक्यापर्यंत आणि तिथून मनात उतरायला जरा उसंत मिळते.
सताठ वेळा मेहदी हसन एकच एक ओळ आळवतो तेव्हा प्रत्येक वेळी काहीतरी वेगळी गंमत असते... लफ्फेदार ताना नाहीत, चौतिस वाद्यांचे नव्वद आवाज नाहीत. आहे ते खूप साधं, सोप्पं, गोमटं आहे.

शब्द तेच पण त्यातला हर एक शब्दाचं अर्थानुरूप सौदर्य खुलवत गातो, मेहदी हसन.... शब्दांशी इमान ठेवत सूर लावणं सोप्पं नाही.... खूप आगळी कलाकुसर आहे ही... गाणार्‍याने संयमानं म्हणायची आणि ऐकणार्‍याने अलगद टिपायची...

’अबके हम बिछडे’ ही, मेहदी हसनने गायलेली, माझ्या त्या वयात जरा चटकाच लावून गेलेली अशीच एक गजल. गजलकार आहे, अहमद फराज.

अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमे मिले
जिसतरहा सूखे हुए फूल किताबों मे मिले ॥

मोहना किंवा भूपेश्वरी या रागात बांधलेली, अतिशय संथ लयीतली ही गजल. ’मालवून टाक दीप’ या गाण्याचाही तोच राग.

गम-ए-दुनिया ही गम-ए-यारमे शामिल करलो
नशा बढता है, शराब जो शराबों मे मिले ॥ (गम-ए-यार, अन दुनियेची सारी दु:खं.... सगळं एकत्र करा गडे हो... कारण एक शराब दुसरीत मिसळली की तिचा नशा वाढतो....)

ह्या गजलेचा मक्ता मोठा जीवघेणा आहे...

अब न वो मै हू न तू है न वो माझी है ’फराज’
जैसे दो साये तमन्नाके सराबों मे मिले ॥ (सराब - मृगजळ)

गजल ’ऐकायला’ सुरूवात इथे केली.... अहमद फराजच्या ह्या बिछोड्याच्या गजलेत मला ’गजल’ पहिल्यांदा थोडी भेटली, सापडलीशी वाटते... खूप गजल ऐकल्या नंतर... पण ह्या गजलची धुंद अजून उतरली नाहिये.

समाप्त.

******************************************************************************
मूळ गजल इथे ऐकायला मिळेल. नक्की ऐका.
http://www.esnips.com/displayimage.php?pid=34184962

भल्या पहाटेची वेळ....
थांब ना, अजून काहीच क्षण... काकुळतीला येऊन, डोळ्यांतलं पाणी न थोपवता सांगतोय तिला, नको नं जाऊस....
आता एकमेकांना हरवलो ना, तर... तर...
काळाच्या पुस्तकात कुठेतरी दडपून जाऊ, राणी.... वाट बघून बघून शुष्कं झालेल्या अशा फुलांची प्रत्यक्षं भेट कधी अन कशी मग?
...पुन्हा फक्तं स्वप्नांत भेट आपली...
म्हणून म्हणतो.... नको नं जाऊस....

भूपेश्वरी किंवा मोहना रागातली ही रचना व्याकूळ करणारी आहे. नेहमीचा भूप हा संध्याकाळचाच राग. त्यात फक्तं धैवत कोमल झालाय... रागाला कुण्या झावळ्या झावळ्या पहाटेच्या उन्मादात, एखाद्या नाजुक करंगळी नखाची... चंद्रकोर रेखल्यासारखी एक इवली, हळवी जखम झालीये. त्या साजणीवेळेच्या आठवणीनं झिणझिणून उमटलेला सित्कार म्हणजे तो कोमल धैवत.

कमालीच्या संथ लयीत ही गजल मेहदी हसन साहेबांकडून ऐकणं एक विलक्षण अनुभव आहे... अस्वस्थं करणारा अन तरीही सुकून देणारा.
तू खुदा है न मेरा..... किती किती प्रकारांनी गातात मेहदी हसन. पण कुठेही तानमात्रंही शब्दांशी प्रतारणा नाही. गजलवर, तिच्या शब्दंवैभवावरलं त्यांचं असीम प्रेम जराही ढळलेलं दिसत नाही.
ह्याच गजलमधला, माझा अजून एक आवडता शेर -
ढूंढे उजडे हुए लोगोंमे वफाके मोती
ये खजाने तुझे मुम्किन है खराबोंमे मिले
ह्यात "वफाके मोती"वरली त्याचं नक्षीकाम केवळ अप्रतिम. तळहातावर मोती घेऊन त्याचे विविध पैलू दाखवीत रहातात, साहेब.

गजल हे एक घडीव शिल्पं आहे. तिला स्वत:चं म्हणून एक अभिजात सौदर्य आहे, शब्दंवैभव आहे. ते झाकून, विस्कटून, किंवा त्याचे ढलपे पाडीत गाण्याला कदाचित गाण्यावरची हुकुमत दाखवण्याचा सोस म्हणता येईल... पण त्या सौदर्याचा तो कोण अपराध होईल, किती प्रतारणा असेल ती...
मेहदी हसन साहेबांनी गजल ही अशी माझ्यासमोर... अशी अलगद उलगडली. एक एक शमा उजळीत तिच्या अंग-प्रत्यंगाला त्यांनी कमालीच्या हळूवारपणे... अगदी लाजरीच्या पानानं उघडावं पण मिटू नये म्हणून अलवार स्पर्शावं तसं आपल्या सुरांनी स्पर्शिलं.
तिच्या अभिजात सौदर्याचा कुठेही उपमर्द होणार नाही, त्याला धस लागणार नाही अशा नाजुकतेनं आपल्या सुरांचं लेपन करीत राहिले मेहदी हसन साहब... अन...
अन गजलही त्यांच्या सुरांच्या-लयींच्या सेजेवर नि:संकोच, अनुरक्त झालेली, आढळली मला...

मला अगदी अलगद हाताला धरून गजलच्या ह्या पहिल्या अनुभुतीच्या क्षेत्री घेऊन गेलेल्या ह्या गजल सम्राटाला माझे लाखो करोडो सलाम.
इथे सुरू झालेलं हे प्रेमप्रकरण... माझं अन गजलचं.
कुठेतरी मी सुद्धा तिच्या सावलीला पुन्हा पुन्हा चुंबित हेच म्हणत राहिले...
अबके हम बिछडे....

समाप्त
*****************************************************************************
अवांतर: गजल खर्‍या अर्थानं भेटण्याच्या, ऐकण्याच्या प्रवासातला मेहदी हसन साहब हा पहिलाच टप्पा.
बेगम अख्तर हे वेड इतकं टोकाचं आहे की, गजल माझ्यापर्यंत किंवा मी गझलपर्यंत पोचण्याच्या ह्या प्रवासात बाईंचा उल्लेखही करायचं धाडस झालं नाही.... किती वाहावले असते त्याला सुमार नाही.

आणि अगदी खरं सांगायचं तर, तो प्रवासाचा भागच नाही...

जिच्यापर्यंत पोचण्याचा प्रवास, प्रवास म्हटला, यातायात केली... ती गजल, तो दर्द... इथे, काळजातच कधीचाच घमघमतोय.... ह्याचा साक्षात्कार म्हणजे अख्तरीबाई!
ती एक जखम खोलून दाखवायचीच आहे कधीतरी, यारो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे निवांत वाचण्याचं आहे... पण राहवलं नाही म्हणून घाई घाईत एकदा वाचलं... तुमच्याच शब्दात तुमच्या लेखनाबद्दल म्हणतो... की,

"बोजड संकल्पना नाहीत, चमकदार शब्द नाहीत. आहे ते खूप साधं, सोप्पं, गोमटं आहे."

छान लिहिलंत दाद!

स्वातीताई, प्रतिसाद आवडला..

काय झक्कास चर्चा झालीये इथे... मला जुन्या मायबोलीची आठवण झाली

+१

दादचे लेखन आहे आणि ते आवडणारच याची खात्री असतेच, म्हणून वाचले.

पण गझलचे नवे गायनतंत्र मला कधी भिडले नाही. मी अगदी दूरदर्शनवरचा मॉडेला प्रायोजित आणि सरिता सेठी संचलित, कार्यक्रम बघत असे, तरिही हे तंत्र मला रुचले नाही.

लता, आशा, रफी, तलतची जादू कधी ओसरूच शकली नाही.

वाह! दाद काय लिहीतेस बाई.. जीव घुटमळत रहावा साडेतीन राती याच शब्दांत..
नको नको ती नावं घेऊन तबियतीची वाट लावली आहेसच. आता नेटवर नाहीतर जुन्या कॅसेटस शोधणं आलं.
शब्द अनमोल खरेच.. पण त्यातलं सौंदर्य ठसठशीतपणे मांडावं असले आवाज लाभलेल्या माणसांनी ते आपल्यासमोर मांडावेत हीच तर कला. सगळेच आवाजवाले गझला गात नाहीत ना. आणि सगळेच शब्दप्रभू त्या लिहीतही नाहीत. त्यांचा मिजाज तुम्हाला सांभाळता येत असेल तर लिहा आणि गा (बापडे!) असला एक कॉन्स्टंट अ‍ॅटिट्युड त्यांच्यातच जन्मजात असतोच. त्यामुळं स्वाती म्हणतेय तेही आहेच.
स्वाती, तू म्हणतेयस त्या अ‍ॅटिट्युडमधे खरंच अजून पॉसिबिलिटी जाणवतात मला. (हा सामान्य वर्तमानकाळ यासाठी की अशा सुरातली काव्यं उर्दूत नेहमी दिसत रहातात.) की ते प्रेयस न मिळण्याच्या शक्यतांच्या किंवा मिळण्याच्या अशक्यतांच्या वेगवेगळ्या पायर्‍या आशिक-माशुक पार करत रहातात. आणि प्रेयस मिळो न मिळो, काळानुसार (दुरून का होईना) परिचयाचे टप्पे पार होत अनेक गोष्टींशी सामना, स्वीकार करत, खाचाखोचा ओळखत पुढं जाणारं हे प्रेम "आता मी तुला ओळखलंय (तूही कदाचित इतर चार जणींसारखीच आहेस) पण तरीही प्रेम तर आहेच" या असहायतेच्या पायरीवर आलेय. त्यामुळंही ते एक्स्प्रेशन असेल.
किंवा
इतक्या जमान्यानंतरहीचा स्टेटस क्युओ लक्षात येऊन त्या बेबसीमधे तिलाही थोडं दुखवावं तरी असंही. कदाचित काहीतरी बाऊन्स बॅक होईल तिच्या आतून.
त्यातही राजरोसपणे आपण दोघं एक म्हणून मिरवू शकत नाही, सगळी गुलाबी स्वप्नं पण पाहून आणि सत्यात उतरणार नाहीयेत याची खात्री पटवून तोंड मिटून बसली आहेत पण नेगेटिविटीमधे (प्रॉब्लेम्स तर आपलेच आहेत.. फक्त दोघांचे..) तर ती "आपण" "आपलं" ही टुगेदरनेसची भावना मांडता येऊ शकतेच म्हणून असेल.
अजूनही काही..
अर्थात तू म्हणतेयस तो कुर्रेबाजपणा जाणवतो, आवडतोच मला आणि हलकंच हवंसं दुखावतोसुद्धा.

वाह! क्या बात है! अतिशय सुंदर लेख. मला वाटत की गजल आवडण्याचा हा प्रवास सर्व गजलप्रेमी करतात, हा प्रवास मी ही असाच केला ह्याची जाणीव लेख वाचताना झाली आणि नकळत डोळे भरुन आले.....मनात अगदी आतपर्यंत जाऊन भिडणारा लेख, पुन्हा पुन्हा वाचत रहावं असं झाल आहे, असं वाटल की हे असच यायला हवं होतं...सर्व प्रतिसादही सुरेख, नेमके, आणखी असही वाटुन गेलं की या गाऊन चर्चा करायला काय बहार येइल...गजल जशी शब्दांतुन व्यक्त होते तितकीच सुरांतून देखील होते, आणि म्हणुनच तुम्ही जे म्हटल आहे की "गुलाम अली" ची गझल ते योग्य वाटते, कारण सामान्यांपर्यंत गजल पोहोचवण्याचे काम त्या सुरांनी आधी केले....आणि मग आपले त्या शब्दांकडे लक्ष गेले, अर्थात शब्द अप्रतिम आहेत हे कळायला आणि त्यांचा नेमका अर्थ कळेपर्यंत खुप काळ गेला पण जेव्हा ते शब्द आणि त्यातील काव्य कळत गेले तसे आयुष्याला एक छान अर्थ आला.
पुढच्या लेखाची वाट पहाते आहे, शुभेच्छा!

शलाकाताई, तुम्ही सुगंधी जख्मेवरची खपली अशी अलवारपणे काढतात, की जखम भळभळा वाहते, दिवसरात्र ओल जाणवत राहते, पण सलत नाही!
लेख वाचल्यापासून काहीतरी आठवत मोठ्ठे मोठ्ठे श्वास भरायला झालयं... Happy ( हो, हो, डॉक्टर गाठतेच आता :प)

जुन्या मायबोलीची आठवण करून दिल्याबद्दल तुला आणि सर्वांना धन्यवाद. बाईंना पेशल थांक्यु.

असामी+१.
इतर जख्मांनीही खपलीच धरली आहे, व्रण आला नाहीये अजून.. countdown begins!

बर्‍याच दिवसांनंतर मायबोलीवर येऊ शकलो आणि हा लेख वाचायला मिळाला, खूप बरं वाटलं.
दाद, तुम्ही गझलेपर्यंत पोहोचण्याचा प्रवास थोडक्यात पण छान मांडलाय.

प्रतिसादांतून झालेली चर्चाही लेखाइतकीच उद्बोधक वाटली.
स्वाती आंबोळे यांनी काहीसं वेगळं मत मांडलं असलं तरी, दाद यांनी त्या मताचा दिलखुलासपणे केलेला स्वीकार हा प्रतिसादातला खास भाग वाटला. दाद यांना सुरांतून गझल भेटते, तर स्वाती गझलेच्या शब्दांतून शब्दांच्या पलिकडलं अनुभवतात. खूप मस्त वाटलं हे सर्व वाचताना.
बेफिकीर यांचा प्रतिसादही विशेष उल्लेखनीय.

मायबोलीत गझल या विषयावर, विषयाला धरून झालेली चर्चा गेल्या तीन वर्षात माझ्या तरी वाचनात आलेली नाही. जाणकारांचे असेच लेख, प्रतिसाद, चर्चा यातून माझ्यासारख्या अनभिज्ञाला शिकायला मिळावं
ही इच्छा आणि अपेक्षा.

किती जीव घेणं लिहितेस गं. तुझा स्वतःचा खासगी अनुभव इतक्या समर्थपणे आमच्यापर्यंत पोहचवतेस की तो अनुभव आमचाही होऊ जातो, दाद.

पुन्हा एकदा सगळ्या सगळ्यांचे खूप आभार. विशेषत: चर्चेला...
बेफिकीर...
<<बाईंनी लिहिलेले प्रतिसाद अतिशय महत्वाचे आहेत. त्यांचे 'मत शब्दबद्ध करण्याचे कसब' शिकण्यासारखे आहे>>... माझ्या मनातलं बोललात. फक्तं बया फारशी येत नाही... आली तर अशी दुरुस्तंच येते Happy
तुम्ही म्हणताय <<गझल गायकीबाबतचे स्वानुभव काव्यमयरीत्या गुंफून समोर ठेवणारे एक अतिशय सुंदर लालित म्हणता येईल हे. >>
इतकाच ह्या लेखाचा विषय आहे, व्याप्ती आहे...
म्हणूनच अगदी जीवाभावाची असूनही ह्यात मराठी गजलला हात घातला नाही. एकतर मला हिंदी गजल आधी भेटली आणि मग मराठी.
तसंही गीतात सूर, लय आधी भेटतात नंतर शब्दं... ह्या आयुष्यातली ही बेबसी आहे... काय करू?
कधीतरी तुम्ही, वैभव ह्यांना आमोरी-सामोरी बसवून घेऊन शुद्धं, बुद्धं, मुक्तं... स्वभावमान गजल ऐकायची असं स्वप्नं आहे... (केव्हढा मोठा घास)
असो... पुढले भाग जसे जमतिल तसे...

वाह दाद! तुमचा हा लेख वाचणे म्हणजे एखादी सुंदर गजल ऐकण्या इतकाच सुंदर अनुभव!

गजल ही जर मूळ कविता, गायकाचे सूर आणि साथीचे संगीत यांची गोळाबेरीज मानली तर गायकाचे सूर आणि साथीचे संगीत यामध्ये गजलेची मूळ कविता हरवून जाता कामा नये! किंबहुना, गायकाचे सूर आणि साथीचे संगीत हे कवितेची शोभा वाढवणारे असावेत! फारच सुन्दर विचार!

मला मेहेंदी हसन यांच्या 'रंजिश ही सही' या गजल व्यतिरिक्त त्यांच्या काही इतर गजलासुद्धा ('युं मिल न मुझसे', 'मुझे तुम नजरसे', 'नवाजीश करम' इ.) किंवा फरीदा खानुम यांची 'आज जानेकी जिद ना करो' आणि इतर गजला सुद्धा फार प्रीय आहेत.

असे जरी असले तरी आपल्या बॉलीवूड मधील जुन्या गजला पण मला फार आवडतात. उदा. जहाआरा मधील मदन मोहन यांची लतादीदीनी गायलेली 'वोह चूप राहे तो मेरे दिलके दाग' ही गजल माझी अत्यंत आवडीची! दिनेशदानी वर म्हणल्या प्रमाणे, लता, रफी आणि आशा यांच्या काही गजलांची जादू ओसरलेलीच नाही!

तुमच्या या सुंदर लेखा बद्दल तुमची जितकी दाद द्यावी तितकी कमीच!

व्वा! कोणत्या शब्दात दाद देऊ कळत नाहीये!
मीही आधी मेहेंदी हसनच्या गझला ऐकून वेडी झाले होते. तेव्हा कॅसेट्स होत्या.
नंतर गुलामली(आमचाही तो गुलामलीच होता.) ऐकून अगदी वेडाच्याही पलिकडची अवस्था झाली होती.
आणि उधास हा आधीपासूनच उदास वाटायचा.
नंतर गुलाम अली लाइव्ह ऐकला तेव्हा तर मी पुढे कित्येक दिवस या पृथ्वीतलावर नव्हतेच.
असो....... आजही जेव्हा जेव्हा गझल ऐकते तेव्हा उर्दू शिकायची खूप तीव्र इच्छा होते. गझल ऐकताना ओव्हरऑल अर्थ कळलेला असतो, अगदी भिडलेलाही असतो, पण एकादाच शब्द अगदी हुरहुर लावून जातो.
आणि भूपेश्वरीची माहिती नवीनच कळली.कोमल धैवताचं वर्णन वाचून अंगावर काटा आला.
सध्या हरिहरनच्या गझलाही आवडतात.

__/\__
लेख नेहमीप्रमाणेच सुंदर Happy
गाण्यातलं कळत काहीच नाही, पण कानाला-मनाला गोड वाटतं.>>>>रुणुझुणू +१००० Happy

दाद, अतिशय सुंदर लेख....
गझल अशीच आस्ते आस्ते चढत जाते.... प्रत्येक पुढचा टप्पा अधिकाधिक सुंदर असतो!

शाम - त्याला ढका लागणार नाही >>> टायपो. रसभंग करतो.....>>

ढका ला साजेसा दुसरा शब्दं सापडायला तीनेक आठवडे लागले... ह्याला म्हणायचं शब्ददारिद्र्य!
असो... मिळाला - 'धस' (पण मी अजून समाधानी नाही.... अजून काही सुचल्यास सांगा)

व्वा… दाद व्वा… किती सुर्रेख लिहिलंय…. तुमचं हे प्रकरण अफाट खास आहे…. का ती ल….
ती एक जखम खोलून दाखवायचीच आहे कधीतरी, यारो>>> खूप घाणेरडी वाट बघतोय. (आमच्या सोलापुरात एखादं काही जर खूप आवडलं असेल तर असं म्हणायची पद्धत आहे. कृगैनं)

खूप घाणेरडी वाट बघतोय>>
भयंकर सुंदर सारखं Happy
लिहायला बसलं की, अख्तरीबाई गवसल्या किती पेक्षा हरवल्या किती चं पारडं इतकं जड होतं ना की सगळच एकदम फोलकट वाटायला लागतं.
काय लिहितोय आपण... का लिहितोय... काय चाल्लय काय... असं वाटून त्यांच्यावर लिहायला घेतलेली गानभुली इतक्यांदा बाजूला सारलीये की माझी मलाच प्रचंड कीव येते.
एकदिवस हे लहानपण... क्षुल्लकपणाच्या भूमिकेतून लहानग्यापणात ढळणारय... तेव्हा अख्तरीबाई घेतील संभाळून... आंदोळतील आपणच अल्लाद उचलून घेऊन... असं ठरवून स्वस्थं बसलेय, झालं.

कुमारांच्या बाबतीतही तेच.

असो... इगो(च) असतो हो, आपलापण Happy

दाद, तुमचा हा लेख म्हणजे खुद्द एक गझलच की !
माझे आणि गझलेचे नाते कधी फारसे जुळले नाही,
पण अगदी अलिकडे परदेशात असताना, एका शांत मध्यरात्री एका निसर्गरम्य ठिकाणी एकटाच बसलेलो असताना अचानक बेगम अख्तर यांची एक गझल सापडली आणि अधाशासारखी ऐकत राहिलो.
कुछ तो दुनिया की इनायात ने दिल तोड दिया !!!
दुनियेतला तमाम दर्द देवाने या बाईंच्या आवाजात भरून ठेवला आहे असे वाटते.

संगीतावर तुम्ही जे जे लिहिता ते वाचायला आम्हाला आवडतं. (आम्ही म्हणजे मी आणि स्वीटर टॉकर).

तुमची आय डी अगदी अनुरूप आहे.

दाद,
लेख खूप आवडला. माझ्याही बाबतीत गझल आवडण्याची किंवा गझलेने आपल्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया साधारणपणे हिच होती. सर्वसाधारणतः सारख्या परिस्थितीत वाढलेल्या आणि गझल आवडणार्‍या व्यक्तींमधे हे बर्‍याच अंशी असेच घडत असावे..
गझलेचा अर्थ बहुतांशी तोच असला तरी व्यक्ती व्यक्तीनुसार, तिने घेतलेल्या अनुभवाच्या विशेषतः दर्दभरे, दु:खद, फसवणूक, प्रेमभंग, विश्वासघात वगैरेंच्या तिव्रतेनुसार आणि त्याच्या त्या व्यक्तीच्या मनात तयार होणार्‍या एकंदर रसायनानुसार त्या अर्थाचे पदर आणि आयाम कमी जास्त प्रमाणात वेगळे होतात. भावना तीच राहिली तरी वैयक्तिक स्तरावर तिचे आकलन, अनुभूती बदलते.
अर्थात हे अशा ललित प्रकारांचं सामर्थ्यही आहे आणि खासियतही.
म्हणूनच स्वाती_आंबोळे यांचा प्रतिसाद खूपच आवडला. संघमित्रा यांचाही...
आता एक शंका..... (कदाचित चुकीची)
<< ह्याच गजलमधला, माझा अजून एक आवडता शेर -
"ढूंढे उजडे हुए लोगोंमे वफाके मोती
ये खजाने तुझे मुम्किन है खराबोंमे मिले" >>
ह्यामधील "ढूंढे" हा शब्द "ढुंढ" असा आहे का.....?

तसा असावा असा माझा समज आहे... आणि त्यामुळे अर्थ थोडा का होईना पण बदलतो....

पुन्हा एकदा.... लेख अतिशय छानच...

दाद,

मी सध्या नुसता लेख चाळला ! सविस्तर नंतर लिहेन.

लेख उघडून चाळण्याचं प्रमुख कारणे म्हणजे 'दाद' हे नाव, गजल (गझल नव्हे) हा शब्दप्रयोग आणि धागा वर रहावा हा उद्देश! Happy

दाद! नेहमीसारखाच काळजाला हात घालणारे लिखाण!

बेफिकीरच्या मतांशी मी पूर्ण सहमत आहे.

माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर एन्.डी.ए.त असताना एकदा जगजित सिंग - चित्रा सेन आले होते. आता कॅडेटना गजलांशी काय सोयरसुतक? तरुणाईला शक्य ती धमाल हवी असते; मग काही अर्थ असो वा नसो. शांताबाई हवी असते. त्यामुळे त्या कार्यक्रमामुळे गजलची ओळख झाली नाही; उलट गजलविषयी एक धाक निर्माण झाला.

पुढे मिलिट्रीत असताना कधीतरी पंकज उधासच्या गजलांची ओळख झाली. मग त्या गजलांचे अक्षरशः वेड लागले. "कभी कभी तेरा मैखाना याद आये बहुत, एक बूंद भी ना पी और लडखडाये बहुत" ही गजल तर आम्ही रात्र रात्र ऐकायचो. आता सगळ्या गजला आठवत नाहीत; पण ते दिवस आठवतात.

नंतर कधीतरी मी गजला रचायला लागलो. (गजल 'रचणे' हाच शब्दप्रयोग योग्य आहे. कारण माझ्यामते कुठलीही गजल एका बैठकीत होत नाही; एक एक द्वीपदी पन्नास पन्नास वेळा मनात घोळवावी लागते; तेव्हा कुठे चपखल शब्द सापडतो आणि कोंदणात हिरा बसल्यासारखा द्वीपदीत योग्य त्या ठिकाणी जाऊन बसतो. गजल रचावीच लागते. माझ्या इतक्या वर्षांच्या व्यासंगात फक्त दोन्-तीनच गजला एका बैठकीत झाल्या आहेत. बाकी सार्‍यांना आठवडे-महिने लागलेत) तेव्हा मग उर्दू गजला वाचायला सुरवात केली. म्हणजे मला उर्दू लिपी येत नाही, पण देवनागरीत लिहिलेल्या गजला वाचल्या. खूप पुस्तके वाचली. शकील बदायुनी माझा सगळ्यात आवडता गजलकार! त्याखालोखाल साहीर लुधियानवी! एका पेक्षा एक सुंदर गजला! मीर तकी 'मीर', गालीब वगैरे सुद्धा वाचल्या... पण शकील हा वेगळाच! त्याच्या गजला वाचता वाचता कधी ते मधुर विष मनभर - शरीरभर पसरले ते सांगतासुद्धा येणार नाही! त्याच काळात इलाहीची ओळख - मैत्री झाली. सुरेश भट भेटले. त्यांनी आपल्या सगळ्या गजलसंग्रहांची एक एक प्रत मला भेट दिली. त्या सगळ्या गजला मी आधाश्यासारख्या वाचून काढल्या. त्यांनी माझ्यावर काय जादू केली ते सांगता येणार नाही. पण माझ्या जवळ जवळ सर्व कविता गजलांचेच रूप धारण करतात. असो.

हल्ली मी प्रयत्नपूर्वक गजलांच्या दुनियेपासून दूर राहतो. एकदा त्या विश्वात शिरलो की बाहेर पडणे खूप कठिण जाते. त्याचा मग माझ्या व्यवसायावर विपरीत परिणाम होतो.

दाद, तुझ्या या लेखाने सगळ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या! मनापासून धन्यवाद! मी भरकटलोय याची मला जाणीव आहे; पण कधीतरी हे बाहेर यायला हवे होते.

माझे तरूण्पणात गुलाम अली यान्च्या गझलशी नाते जडले. सम्पूर्ण आयुश्यच सुगन्धीत करून गेले. त्यान्चे सूर आणी गझल इतके सहज एक्मेकात गुन्तलेले असतात की ती अनूभूतीच विच्क्शण असते. त्यात आर्तता , चन्चलता , चपळता , अनपेक्षितता , अचानकता असे विविध पैलू आहेत , जे स्वरानुबन्धाने आपला ताबा घेतात.

न विसरता येणार्या काही ओळी ....

जब भी देखी है किसी चेहेरे पे इक ताजा बहार
आज तो देख के मै सबह सुहानी रोया ......

वो रात का बेनवा मुसाफिर
वो तेरा शाइर वो तेरा नासिर
तेरी गली तक तो हमने देखा था
फिर न जाने किधर गया वो ......

(हे ऐकल्यानन्तरची मनाची स्थिती ही जी ए न्च्या कथा वाचल्यानन्तर येणार्या सुन्नतेसारखी असते)
----------------------------------------------------------------------
आवाजाच्या नजाकतीने मोहित करून टाकणारे जगजित सिन्ग जी. त्यानची गझल तुमच्या ह्रुदयातूनच उमटती आहे असे वाटत रहाते

मेहेरुबा हो के बुला लो मुझे चाहो जिस वख्त
मै गया वख्त नही हू के फिर आ भी ना सकू ......

डालकर हाथ मेरे खून पे कातिल ने कहा
कुछ ये मेहेन्दी नही हाथोन्की के मिटा भी ना सकू ......

---------------------------------------------------------------------

काय उमदा लेख आहे. प्रत्येक शब्द पाणीदार मोती.
_______
परवीना शाकीर यांचे शेर आवडतात मला.
गझल पेक्षा नज्म फार आवडते. रेख्ता वरती नज्म वाचत बसते बरेचदा.

Pages