वालाचं बिरडं

Submitted by मृण्मयी on 6 May, 2009 - 20:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१ वाटी कडवे वाल
प्रत्येकी एक लहान चमचा: हळद, तिखट, मीठ आणि जीरं पूड
आलं-लसूण-हिरवी मिरची ह्यांचं वाटण एक मोठा चमचाभर
वाटीभर खवलेला ओला नारळ, ५ लवंगा आणि एक पेरभर दालचिनीचा तुकडा ह्यांचं बारिक वाटण
एक मोठा कांदा : बारिक चिरून
बचकाभर कोथिंबीर : धुऊन चिरलेली
पळीभर तेल
आंबटाला एक टोमॅटो (एकाच्या आठ फोडी) किंवा कैरी २-३ मोठ्या फाका किंवा कोकम (आमसूल)
गुळाचा खडा (साधारण सुपारीएवढा)
चिमुटभर हिंग
पाव चमचा जीरे
३ वाट्या आधणाचं पाणी

vaal-solaayalaaya.JPG

क्रमवार पाककृती: 

*वालाला छानसे मोड आणून सोलावं.
*सोललेल्या डाळींब्यांना बारिक चिरलेला कांदा, आलं लसूण मिरचीचं वाटण, हळद, तिखट, मीठ आणि जीरपूड चोळून बाजूला ठेवावं.
*एका जाड बुडाच्या पातेल्यात, तेल गरम करून त्यात जीरं, हिंग घालून वर डाळींब्या ओताव्या. (मोहरी घालायचची नाही.)
* हलक्या हातानं ५-७ मिनिटं सवताळाव्या (परताव्या). आलं लसणाचा तसंच डाळींब्यांचा उग्र वास जायला हवा.
*आधणाचं पाणी ओतून एक उकळी येऊ द्यावी.
* आता ह्यात खोबरं, लवंग, दालचिनीचं वाटण, गुळाचा खडा आणि आंबट घालावं. (वर दिलेल्या आंबटांच्या यादीतलं काही नसेल तर काहीही आंबट घालु नये. चिंच तर अजीबात नाही.)
*पुन्हा एक उकळी आली की कोथिंबीर पेरून झाकण ठेवून शिजु द्यावं.
*धीर धरवला नाही तर डाळींब्या वगळून बिरड्यातला रस्सा (?) प्यायला सुरवात करावी.

birada-bhaat-maayboli.JPG

वाढणी/प्रमाण: 
फारफार तर दोन माणसं :)
अधिक टिपा: 

* वाल सोलण्याआधी कढत पाण्यात टाकून ठेवावे. सालं पटापटा निघतात.
*सवयीनं दोन्ही हातांनी वाल सोलता येतात, (टीव्ही बघत).
*नारळ नसल्यास सुकं कोबरं चालेल, पण चव तीतकी अप्रतीम येत नाही.
* पांढरं बिरडं करायला हळद आणि तिखट घालायचं नाही. वाटणात मिरं घ्यायचं.
*नारळाच्या दुधात शिजवलेलं बिरडं छानच लागतं.
* नुस्त्या डाळींब्या उरल्या(च) तर दुसर्‍या दिवशी त्यात तांदुळ फुलवून वालाची खिचडी होते.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

*धीर धरवला नाही तर डाळींब्या वगळून बिरड्यातला रस्सा (?) प्यायला सुरवात करावी.

* नुस्त्या डाळींब्या उरल्या(च) तर दुसर्‍या दिवशी त्यात तांदुळ फुलवून वालाची खिचडी होते.

>>>> हे दोन्ही एक्दम भारी (त्यातल्यात्यात पहिले Wink )

कांदा कधी वापरायचा?

कांदा कधी वापरायचा?>>>

सोललेल्या डाळींब्यांना बारिक चिरलेला कांदा, आलं लसूण मिरचीचं वाटण, हळद, तिखट, मीठ आणि जीरपूड चोळून बाजूला ठेवावं.
***
सहि क्रुति!

मस्तच ग. वेगळा मसाला नी एकदमच वेगळी कृती.

माझ्या मैत्रिणीची कृती साधारण या सारखीच आहे. पण ती आले लसुण खोबरे वाटुन चोळत नाही डाळिंब्यांना. आणि लवंग/दालचिनी/खोबरे वाटण घालत नाही बहुतेक. त्याऐवजी ती तिचा कोणतातरी स्पेसिफिक मसाला आहे जो तिची आई आणि सासुबाई करतात. तो ती घालते. मी एअदा गोडा मसाला घालुन केलीय आणि बकिच्या बर्‍याच वेळा मालवणी मसाला घालुन केलीय. मालवणी मसाल्याची चव वेगळीच छान लागते. आणि चिंचेचे अगदी बरोबर. चिंचेने डाळींब्या शिजता शिजत नाहीत (हा स्वानुभव).

आहा. मृणमयी काय पदार्थ काढलाय. जीभ अँड डोळे पाझरले. ( फक्त वाल दुस-यांनी सोलले तर सोने पे सुहागा) Happy

शॉर्टकट म्हणून भारतातल्या लोकांनी रस्त्यावरचे आयते सोललेले घेऊ नयेत. कधीही लाभत नाहीत (स्वानुभव).

यावरून एक खतरनाक किस्सा आठवला. आपल्या सासुरवाशीण पोरीसाठी कोणतरी माय लय प्रेमाने सोललेले वाल घेऊन बशीतून चालली होती. (मी बी त्याच बशीतून येत होते. उन्हाळ्याचे दिवस. पुढले सांगूच का ?) तो वास , तो वास , तो वास नंतर दादच्या त्या फेमस कटाच्या आमटीसारखा ८ दिवस डोक्यातून गेला नाही. येवढा बेशुद्ध करणारा वास नंतर फक्त जपानी "नातो"चा. (धूम ठोकणारी बाहूली)

आम्ही वालाच्या बिरड्याला हिंग मोहोरीची फोडणी करतो आणि जिरे, लसूण वाटून लावतो. आलं घालत नाही. खोबर्‍याच वाटण असत. त्यात दालचिनी, लवंग नसते. चिंच आणि गूळ घालतो. गूळ आणि चिंच नेहेमीच शिजल्यावर घालायची असते. वरून कोथिंबीर भरपूर.

कधी कधी मिरे वाटून मिरवणीसारखं करतो पण पहिली पध्द्त नेहेमीची.

मृ, तुझ्या पध्द्तीने करून बघितलं पाहिजे.

या बिरड्यात दोन तीन वेलच्या घातल्या तर उग्र वास जातो.

Lol रैना.
मायबोलीवर भारतातल्या कुणी सासुरवाशिण मुलीवाल्या आया असतील तर त्यांनी लक्षात घ्या नी सोललेले वाल घेऊन बशीतून जाऊ नका. टॅक्सीतून जाऊन फक्त डायवरलाच बेशुद्ध करा. Wink
सॉरी, मृ. टीपी करायचा मोह आवरला नाही.

मिनोती, कृतीसाठी धन्यवाद!

आईचा मसाला (हा गरम मसाला नाही) मी मूग, उडीद आणि चण्याच्या बिरड्यांना वापरते.

रैना, Lol

कोकणातल्या 'नागोठण्याचे' कडवे वाल 'फ्येमस' आहेत! त्यामुळे 'जेवणं झाल्यावरची जी कुठली एस्टी सुटते त्यात बसु नये' असं ऐकलंय! Proud

कांदा कधी वापरायचा?>>>
प्राजक्ता, मिनोतीचा प्रश्ण बरोबर आहे कारण तीने आठवण करून दिल्यावर मी ते संपादन करून लिहिलंय. Happy

मी पण नेहमीच काळा मसाला घालूनच करते. आता एकदा असं करून बघेन. Happy

(बाकी डाळिंब्यांची आमटी, खिचडी, किंवा पडवळ-डाळिंब्यांसारखी combinations हा डाळिंब्यांचा धडधडीत अपमान आहे असं माझं मत आहे. Proud

रैना, ष्टोरी भारी. पुढच्या वेळी वाल भिजवलेलं जे पाणी असतं त्याचा वास घेऊन बघ. :P)

मृ, Lol

काय योगायोग आहे. इथे हे वाचतच होते नी सुमा फूडसची विकेंडला 'वालाचं बिरडं' उपलब्ध आहे म्हणून मेल आली. फक्त वाल नागोठण्याचं नाहीत ना, हे विचारून खात्री करुन घ्यायला हवी. Proud

>>>पुढच्या वेळी वाल भिजवलेलं जे पाणी असतं त्याचा वास घेऊन बघ

हो ग, तो बशीतला वास मिस करत असशील तर Wink

कांदा नीट परतला जातो काय? डाळींब्यांना लावुन टाकल्याने निराळी चव येत असेल? आई तेलात परतते आधी कांदा.
आता जाते करायला बिरडं Happy

अमृता, हो. कांदा अगदी व्यवस्थीत परतला जातो. नेमकं कारण माहिती नाही, पण घरातल्या जेष्ठ बायकांच्या मते आधी तेलात परतून घ्यायचा नाही, कांदा डाळींब्यांबरोबरच परतायचा. डाळिंब्या भांड्याच्या बुडी लागेपर्यंत परतायच्या. तोवर कांद्यातलं पाणी निघून जातं. आणि सगळं एकत्र परतताना कांदा caramelize पण होत नाही. Proud

हो अग मृ, आत्ताच आईशी(ती शिकेपीच आहे बर्का) बोल्ले. ती पण तुझ्यासारखाच कांदा आधीच टाकते. Happy मला असं का वाटत होते देव जाणे Uhoh कोक्यांकडे डाळींब्या करुन करुन बिरडं विसरुनच गेले होते Sad

मृ, काल केलं होतं ह्या पद्धतीने. काही अपरीहार्य कारणांमुळे १-२ बदल केले: कडवे वाल उपलब्ध नसल्यामुले साधे वाल घेतले, लसूण-मिरची-आलं ह्यांचं वाटण करण्याजोगा मिक्सर/ग्राइंडर नसल्यामुळे हे सगळं खोबर्‍याबरोबरच वाटलं आणि मग सगळच त्या डाळिंब्यांना लावून ठेवलं. ह्याने चवीत कितपत फरक पडला माहिती नाही. पण जे काही झालं ते अप्रतीम लागत होतं. कृतीसाठी धन्यवाद Happy

आता कडवे वाल नाहीत म्हणजे ते बिरडं नाहीच वगैरे भानगडी काढू नका कुणी.

माझी आई सुध्धा मस्त बनवते ही उसळ. पन वाल सोलणे म्हणजे प्रचंड किचकट काम असते...त्यामुळे हा मेन्यू शक्यतो रविवारी...:) आई कांदा-खोबरे, तीळ भाजून त्याचे वाटण करुन घालते...फोटो पाहून एकदम तों.पा.सु

बिरडं तयार आहे. धीर न धरवल्यामुळे वाटीत घेऊन खाण्यात आलेलं आहे. लै भारी झालेलं आहे.

कडवे वाल उदार मनाने दिल्याबद्दल आणि वेळोवेळी बहुमुल्य मार्गदर्शन केल्याबद्दल संबंधितांचे मानावे तितके आभार कमीच Happy

पुढच्या वेळी वाल भिजवलेलं जे पाणी असतं त्याचा वास घेऊन बघ>>>>>>>> ईईईईईईईईईईईई Proud

आमची पद्धत थोडी वेगळी आहे. मोहरी-जिरं-कढीपत्त्ता-हिंग-हळद फोडणीला+ तिखट घालून लगेच डाळिंब्या घालायच्या. झाकण ठेऊन वाफ काढायची. मग टॉमेटोच्या फोडी घालायच्या म्हणजे आमसूल नसले तरी चालते. वाफेस ठेवतानाच कोथिंबीर+ओलं खोबरं वाटण घालणे.(ऑप्शनल). पाणी घालून शिजवणे, भरपूर कोथिंबीर अन ओलं खोबरं घालायचे. गुळ शेवटी घालायचा....कुकरमदून दोन शिट्ट्या काढल्या की छान शिजतात डाळींब्या. माझा फेवरेट्ट आयटम....आमच्या घरी दर सोमवारी, संकष्टीला अन श्रावणात तर शनिवार, सोमवार, गुरूवार व सणासुदीला हमखास होणारा पदार्थ! Happy यामध्ये उकडीचे मोदक बुडवून खाते मी Happy भन्नाट कॉम्बो!