हट्ट

Submitted by चैतन्य दीक्षित on 26 July, 2012 - 08:55

हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी |
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे |

'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे |
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात |

असंख्य वेळा अशी भेटशी
मिठीत घेशी हळुवार
'थांबवून ठेवावे तुज' ही
इच्छा अपुरी, अनिवार |
हट्ट सांग मी करू कोणता?
थांबशील जो पुरवाया,
थांबशील का अजून थोडी
आज एवढे ठरवाया?

-चैतन्य दीक्षित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है चैतन्या....... किती दिवसांनी दर्शन देत आहेस ??
फारच मस्त जमलीये कविता........

त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे |

उपमा आवडली. कविता मस्त आहे.

ऑर्फी..............घे! ..............आता वाच अन् मीटर "पकड"!!

हट्ट कोणता करू तुजकडे? थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा भेट हवी मज, हवी मिठी |

आणि हासुनी ओळखशी तू,देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता, इच्छांचे त्या पुन्हा पिसे |

'थांब थांब तू, नकोस जाऊ'सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली काजळगहिरे तम दाटे |

म्हणून जाशी मिठी छेडुनी झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते मनी अनावर सुरुवात |

असंख्य वेळा अशी भेटशी मिठीत घेशी हळुवार
'थांबवून ठेवावे तुज' ही इच्छा अपुरी, अनिवार |

हट्ट सांग मी करू कोणता? थांबशील जो पुरवाया,
थांबशील का अजून थोडी आज एवढे ठरवाया?

असं काहीतरी वाचायला मिळालं की आनंद होतो. (चैतन्य, कविता - मला तरी - किंचित लांबल्यासारखी वाटली. क्षमस्व). पण लय इतकी मोहक आहे की फ्लोमध्ये वाचावेसे वाटत गेलेच.

आपण अधिक लिहा अशी आग्रहपूर्वक विनंती

धन्यवाद

-'बेफिकीर'!

( मराठीतील जुन्या कवितांचीही आठवण झाली - ही स्तुतीच आहे)

प्रतिसादाबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
बेफी, नक्की लिहीन. ही कविताही खूप दिवसांनी झाली. रात्री २:०० ला वगैरे Happy
लिहून पूर्ण होईपर्यंत चैन नव्हतं. आजकाल अशा 'प्रसूतिकळा' फार कमी झाल्यात हो Sad

आजकाल अशा 'प्रसूतिकळा' फार कमी झाल्यात हो Sad <<<<<< याचे तुम्हाला वाईट वाटत आहे ही प्रॉमिसिंग बाब आहे. असे झाले की मी रस्त्यावर उभा राहून खाणाखुणा करणार्‍यांचे हावभाव तपासतो Happy