सहप्रवास ११

Submitted by भारती.. on 24 July, 2012 - 10:28

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450
http://www.maayboli.com/node/36481
http://www.maayboli.com/node/36480
http://www.maayboli.com/node/36550
http://www.maayboli.com/node/36570
http://www.maayboli.com/node/36582
http://www.maayboli.com/node/36620

सहप्रवास ११

( इनामदारांचं घर.बैठकीची प्रशस्त खोली जिथून बाहेरचा मोकळा ओवरीचा व अंगणाचा भाग दिसतोय. घरात गतवैभवाच्या खुणा. मोठी झुंबरे,शिसवी खुर्च्या व कपाटे, यातच उमाची वीणाधारिणी सरस्वतीही विराजमान झालेली दिसतेय. शेखरसाहेब इनामदार व काही प्रतिष्ठित मंडळी बोलणी संपवून निघायच्या बेतात.शेखरसाहेब सावळे,उंच,चाळिशी ओलांडलेले, शांतभाव चेहर्‍यावर. परंपरेने आलेले पुढारीपण अधोरेखित करणारे पांढरे कपडे.)

साहेब- बेटा संजीवन ( हाक मारताहेत ) जरा आईंना बोलव बाहेर,आम्ही निघतोय म्हणावं.

(उमा बाहेर येते. मध्ये लोटलेला चारपाच वर्षांचा काळ चेहर्‍यावर,शरीरावर अजिबात उमटलेला नाही.तिच्यातलं,साहेबांमधलं वयाचं अंतर त्यामुळे अधिकच जाणवतंय. )

उमा- काय झालं साहेब? तुमच्या मीटिंगला लागणारे सगळे पेपर्स काढून ठेवलेत मी मघाशीच.त्यांची एक वेगळी फाइलच बनवताहेत कृपाळकाका. तयारी झालीय त्यांचीही निघायची.

साहेब- (हसून इतरांना) कृपाळकाकांची सगळी खाती अशी बाईसाहेबांकडेच गेली आहेत क्रमशः.. आता अधिक देव-देव करायला मोकळे होतील ते असं दिसतंय..

पंडितराव-(उपस्थितांपैकी एक) पुढची निवडणूक वहिनीसाहेबांनाच लढायला सांगा साहेब- लोकप्रियताही भरपूर आहे त्यांची- अरविन्दजींकडे आतापासूनच बोलून ठेवा- घरचा उमेदवार असताना बाहेरच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची रखरख कशाला म्हणतो मी !

उमा- हे खूप चुकीचं बोललात हं पंडितराव राजकारण हा माझा प्रांतच नाही.माझा लोकांशी संबंध येतो साहेबांमुळे,या घराच्या परंपरेमुळे. घरचीच कामं होत नाहीत मला-एवढ्या माणसांची कामं करायची सवयच आहे कुठे मुळात?!

साहेब- त्यातून आम्ही अर्धा वेळ बाहेरच..कधी लोकप्रतिनिधींबरोबर, कधी गावच्या सामाजिक कार्यात नाहीतर शेतीवाडीच्या देखरेखीत. पण पंडितराव,(हसत) नाही म्हणायला कृपाळकाका आणि संजीवन यांची पूर्णवेळ मदत आहे बाईसाहेबांना !

उमा-( तीही हसते) ही असली मदत कामं वाढवणारी ! संजीवन तरी पोरच आहे, आणि कृपाळकाका..

( वाक्य अर्ध्यावरच - मान 'अशक्य' अशा अर्थी हलवत -सोडून आत निघून जाते ..कृपाळकाका एक बॅग सावरत बाहेर येतात.पन्नाशीपुढचं वय,धोतर-सदर्‍याचा पेहराव,कपाळावर गंध. )

कृपाळकाका - नमः शिवाय नमः शिवाय! ( ही अभिवादनाची पद्धत. मंडळी हात जोडतात.) चला साहेब. सगळी फाइल तयार झालीय ठसक्यात.जोरात होणारेय काम यावेळी.

साहेब- असं? कृपाळकाका ,फाइल तयार तुम्ही केलीत की फक्त फायलिंग केलंत?

(सगळे हसतात. कृपाळकाका रुसलेले.)

कृपाळकाका -फाइल वहिनीसाहेबांनी केली. त्यांच्यासारखं वाचन,संदर्भ आम्हाला कुठून असणार? आधी स्वत; होऊन सगळं अंगावर घ्यायचं मग कुरकुरत रहायचं.आजवर मी करतच होतो ना सगळं माझ्या परीने तरी पण ?

पंडितराव -(स्वरात थोडीशी दटावणी) कृपाळकाका तुमची परी आणि वहिनीसाहेबांची परी यात जमीन-अस्मानाचा फरक आहे म्हणून त्यांना लक्ष घालावं लागतं हे जाहीर आहे.'मला मोठं म्हणा 'असा डांगोरा पिटणार्‍यांपैकी त्या नव्हेत.

साहेब -(विषय आवरता घेत )बरं चला निघू या मंडळी .आधीच उशीर झालाय. अरविंदजींच्या सगळ्या प्रचारमोहिमेची रूपरेषा आखायचीय आपल्याला आज. ( आतमध्ये बघून पुन; हाकारतात-) बेटा संजीवन, आईंना सांगा आम्ही निघालो म्हणून.

( संजीवन,उमा बाहेर येतात.संजीवन आठ नऊ वर्षांचा चुणचुणीत मुलगा,सावळं आकर्षक व्यक्तिमत्व.)

संजीवन- बाबासाहेब,लवकर परत येणार ना?की मुक्काम करणार नांदगावी? मुक्काम नका ना करू बाबासाहेब.उद्या माझ्याबरोबर, आईबरोबर शेतावर यायचं कबूल केलं होतं तुम्ही.

साहेब- मुक्काम करावाच लागला ना बेटा,तर कृपाळकाकांना पाठवून देईन.त्यांच्याबरोबर जा शेतावर.

संजीवन- नको नको बाबासाहेब. म्हणजे कृपाळकाकांबरोबर जायचं असेल तर शेतावर कशाला ?त्यापेक्षा घरीच आराम करू आम्ही.मी मित्रांना घरीच बोलवेन,आईला मस्त शेव आणि कुरमुर्‍याचे लाडू करायला सांगेन.

साहेब- उगीच कामं वाढवू नका आईची. त्यांना झेपेल तेवढंच करा काय ते.आम्ही निघतो.

(सगळे निघताता आता उमा आणि संजीवनच उरलेले.)

संजीवन- बाबासाहेब आले की खूप माणसं दिसतात घरात आणि गेले की खूप रिकामं वाटतं घर..आई,तुला कसं आवडतं ग ? असं की तसं?

उमा-(हसते ) मला तू असलास की भरलेलं वाटतं घर आणि शाळेत गेलास की खायला येतं. (त्याला जवळ घेते.)

संजीवन- आई,कृपाळकाका नेहमी रागावलेले असतात का ग तुझ्यावर? पण सारखं तू काय करते आहेस इकडेच लक्ष असतं त्यांचं.

उमा-माहिती आहे मला ते.एकतर्फी मत्सर करणार्‍यांची सवय आहे मला.माणसं मिडिओकर असली ना संजीवन,की स्वतःची प्रगती करण्याऐवजी दुसर्‍याचा दुस्वास करतात.

संजीवन-मिडिओकर म्हणजे काय ग आई? तू रोज नवे पाच इंग्रजी शब्द पाठ करून घेतेस माझ्याकडून,पण हा शब्द गेला नव्हता कधी.

उमा- मिडिओकर म्हणजे बेताच्या वकूबाची. आजचे पाच शब्द पाठ झाले का संजूबेटा?

संजीवन-करतो ग आई. उद्या रविवार आहे ना- उद्या एकदम दहा शब्द करूया.किती मागे लागतेस. एक तर एवढा मोठा गृहपाठ देतात दर शनिवारी. आता असं करूया,मस्त जेवून विश्रांती घेऊ या थोडा वेळ,म्हणजे तू विश्रांती घे ग, मी कॉमिक्स वाचेन. नंतर चार वाजता खेळायची वेळ होईल माझी.

उमा- जेवायची वेळ,विश्रांतीची वेळ, खेळायची वेळ. तुझ्या वेळापत्रकात अभ्यासाची वेळ कधी असते संजीवन?

संजीवन-आणि आई,तुझ्या वेळापत्रकात सारखी अभ्यासाचीच वेळ असते बघ.किती छळतेस. पहिला नंबर येतो ना माझा वर्गात? अजून कशाला अभ्यास करायचा?

उमा- संजूबेटा,हा पहिला नंबर या गावापुरता आहे राजा. नंतर मोठ्या शहरातल्या शाळेतही टिकवता आला पाहिजे तो.आणि त्याहीनंतर जर शिकण्यासाठी खूप खूप लांब जावं लागलं तुला,जिथे आई जवळ नसेल तिथे ,तर ?तोपर्यंत तुझी तुलाच सवय व्हायला नको मोठ्ठा अभ्यास करायची?

संजीवन- तुला सोडून कुठ्ठेच जाणार नाही मी आई.खूप खूप लांबही तुला घेऊनच जाईन.

उमा- आणि बाबासाहेब?

संजीवन- आपण दोघं गेलो की त्यांना यावंच लागेल.कृपाळकाकांना नाही न्यायचं बरोबर.

उमा- पुरे इतकंच आज.चल वाढते तुला. जेवल्यावर एक तास विश्रांती,मग एक तास अभ्यास. नंतरच खेळ.

संजीवन-अश्शी आहेस ना आई..

( दोघंही आत जातात आणि दरवाजातून दादा नाईक प्रवेशतात.अधिकच थकलेली अंगकाठी. गुपचूप आपली पिशवी एका कोपर्यात ठेऊन टेबलावरच्या तांब्यातलं पाणी पितात. एका खुर्चीत शांत डोळे मिटून बसतात. उमा आतून पुनः बाहेर येते ती दचकतेच त्यांना पाहून.)

उमा- बाबा?! कधी आलात? कळलंसुद्धा नाही. किती थकलेले दिसताय! चला आधी जेवायलाच बसा संजूबरोबर. तो बसलाय आत जेवायलाच.

दादा- थांब ग उमा. काय जेवण जेवण करतेस. शांत बसावंसं वाटतंय थोडा वेळ. सकाळी निघतांना व्यवस्थित खाऊन निघालोय.आज स्वामीजींची पुण्यतिथी म्हणून आनंद ओवरीत पुष्कळ कार्यक्रम आहेत. तुला,मला आग्रहाचं आमंत्रण अर्थातच होतं.या सगळ्या प्रकारात तुझी जोरदार आठवण झाली म्हणून निघून आलो बाळा.कशी आहेस? आनंदात आहेस ना?

उमा- बाबा! आनंदातच म्हणायची. पण तुमची सारखी आठवण येते.इकडेच या ना रहायला.नाहीतरी साहेब अर्धावेळ घरात नसतातच. कशाला एकटं राहून आबाळ करून घ्यायची स्वतःची?सोबत होईल एकमेकांची आपल्याला.

दादा- आबाळ कशाची उमा? दोन वेळ जेवायला वाढतात सरस्वतीकाकू. जमतील ती कामं ,थोडं वाचन,फेरफटका.थोडासा जनसंपर्क. होईल तिथपर्यंत चालवायचा रामरगाडा.शेवटी आहेसच तू अगदीच जमेनासं झालं तर.तुमचं कसं चाललंय शेतीवाडीचं?

उमा-बडा घर पोकळ वासा बाबा. तरी मी आल्यापासून पुष्कळ शिस्त आणली सगळ्या कारभारात.विक्री,वसुली,गड्यांचे पैसे सगळ्याच हिशेबात कृपाळकाकांना ढिलं सोडून साहेबांचं पुढारपण चालू होतं.इतर पुढारी पैसे खाऊन गडगंज होतात,हे सगळ्यांना मदत करण्यात आपले खिसे खाली करतात.

दादा- म्हणूनच गाठ पडली तुम्हा दोघांची. निसर्गाची संतुलनव्यवस्था चोख असते नेहमीच.

उमा- बाबा, कसं अगदी तुमच्यासारखंच बोललात! निसर्गाचाच दाखला दिलात.स्वामी असते तर म्हणाले असते, परमेश्वराची इच्छा अचूक असते.

दादा-आज त्यांची आठवण काढणारच तू.उमा, मी तुझा नैसर्गिक पिता,पण ही दोन माणसंही किती पितृतुल्य वागली तुझ्याशी. निमकरकाका आणि स्वामीजी.

उमा-हं... माझं father fixation इतकं जोरदार होतं म्हणून बचावले मी.. नाहीतर साहेबांच्या वागण्याचा रागराग केला असता. आता कळतंय ते एवढंच की दोन जबाबदार्‍या आहेत माझ्यावर,एक संजीवनची, एक साहेबांची!

दादा- आधीच घरात लक्ष घालायची आवड नाही..त्यातून तुझ्यासारखी बायको मिळाली त्यांना.एखादी करीअर करावी तसं गृहिणीचं काम करते आहेस. पण मी पुरता ओळखतो तुला उमा, मनाने सर्वस्वी रमलेली नाहीयेस यात तू.

उमा-बाबा, आनंद-ओवरीचं एक पर्व झालं.मागितलं नसताना खूप कौतुक मिळालं.आता वाट्याला आलेली भूमिकाच करीअर म्हणून करायला काय हरकत आहे?मन स्थिर रहातं त्यामुळे. ते रमत नसतंच सर्वस्वी,कधीच,कुठेही.ते गुंतवायचं असतं फक्त कशाकशात. चला आता तरी जेवायला.

(दोघेही आत जातात. पडदा...)

भारती बिर्जे डिग्गीकर.

गुलमोहर: 

हं, उमाने अखेर लग्न केलं तर........मागील भागावरुन मला वाटलं की हा आता नवीन प्रश्न (उमा - शेखर) सुरु होतोय की काय..... देखते है आगे होता है क्या.......
एकंदरीत छानच चाललीये मालिका ही......

आभार शशांकजी,सामी, होय,उमाने लग्न केलंच .. नाहीतर मठातच रहायची वेळ आली होती तिची :)) काळ निर्णय घ्यायला लावतोच..

हे पण छान जमले आहे. पहिले काही भाग मला संवाद फार लेखी साहित्यिक वाटले होते. बोली भाषेतले नव्हते वाट्त. पण आता वाट्त आहेत.