सहप्रवास ५

Submitted by भारती.. on 17 July, 2012 - 06:27

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450

सहप्रवास ५

(पुनः तोच उमाच्या घराचा हॉल.संध्याकाळची वेळ.. उमा दरवाजाचं लॉक उघडून आत येतेय.चेहर्‍यावर अस्वस्थ प्रश्नचिन्ह.काहीतरी विपरीत घडतंय..)

उमा- (हाका मारत आत-बाहेर जाते-येते-) आक्का-आक्का ..कुठे आहेस ग तू?काय झालंय? निमकरकाकांनी बोलावून घेतलंय मला..काय झालंय? अरे कुणी आहे की नाही घरात?
(पुनः जोरात हाक मारते-) आक्का !

(दरवाजावर जोरात ठकठक.-उमा दार उघडते-निमकरकाका आत येतात.चेहरा अत्यंत गंभीर.)

काका- उमा तू कधी आलीस?बैस आधी. पाणी पी जरासं.

उमा- काका असं का बोलताय तुम्ही? तुम्हीच तर ऑफिसात फोन केलात.आक्काला बरं नाहीय,लगेच ये म्हणालात.कुठेय ती? काहीतरी कमीजास्त तर नाही ना घडलेलं ?

काका- विपरीतच घडलंय उमा.आधी तू शांत रहा बाळा. हे सगळं समजून घ्यावंच लागेल तुला..दुपारीच तुझ्या आक्काला हार्ट अटॅक आला.म्हणजे तेव्हा ते कळलं नाही.घरात एकटीच होती पण जोरात ओरडली म्हणून शेजारच्या पावशेकाकूंनी दरवाजा वाजवला-कसाबसा उघडला आक्कांनी आणि मग खालीच कोसळल्या..मग काकूंनी कोण दिसेल त्या दोघातिघांना बोलावलं.डॉक्टरला बोलावलं.डॉक्टरने लगेच admit करायला सांगितलं.तू एकटीच घाबरशील म्हणून आधी मला फोन केला.. admit मीच केलं येऊन मग तुला फोन केला..पण हृदयक्रिया मंदावत गेली ती कायमचीच.मी आत्ता हॉस्पिटलमधूनच येतोय.

उमा -(प्रचंड शॉक.काही प्रतिक्रियाच नाही काही वेळ.) पण का .. काका.. कशामुळे? सकाळी तर ठीक होती.. आक्का..आक्का.. तूसुद्धा.. ?

काका- तेही थोडंसं कळलं मला.उमा , बहुधा पुनः त्यांना धमक्यांचा फोन आला असावा त्यांच्या नातेवाईकांकडून..म्हणजे तिचा तो दुष्ट दीर,त्याची मुलगी,जावई--काहीतरी तुटकतुटक बोलल्या आक्का. थोडंसंच समजलं.

उमा - ( आता प्रचंड वैफल्याची लाट पेलत नाहीय) आक्का..कशी बळी गेलीस ग..मी जाऊ दिलं तुला- या लोकांचा गंभीरपणे बंदोबस्त करायला हवा होता.गोष्टी इथवर जातील हे कळलंच नाही हो काका.. गुन्हेगारी वृत्ती समजून घ्यायलासुद्धा वेगळा पिंड लागतो- तेवढाही नाहीय माझा. अलीकडे बरेच महिने शांतता होती त्या आघाडीवर. काय झालं हे? काय करू मी आता? अपेश आलं माझ्या वाट्याला सगळीकडून.माझी भाबडी आक्का ! छळून मारलं तिला या लोकांनी. खून झालाय खून. (हिस्टेरिक होते ) मीसुद्धा खुन्यांना सामील आहे काका....आक्का.. (मोठ्याने रडते.)

काका- (तिला जवळ घेत )उमा बेटा,काय बोलते आहेस तू! शुद्धीवर ये बाळा-सगळ्याच घटनांचं कर्तेपण स्वतःकडे घेणं झेपेल का आपल्याला बेटा ? आपलं सगळ्यांचच चुकतं बघ. आपली सात्त्विक सोशिक जडणघडण सगळ्याच प्रसंगांना पुरी पडत नाही उमा.तू एकटी मुलगी काय करणार होतीस ?मुळात मनस्तापाचं काही मोजमाप नसतं उमा.आक्का अशी कोसळेल हे कुठे आपल्याला कधी कळलं?

उमा- ( हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. ओक्साबोक्शी रडतेय.) आई..आई.. तू गेलीस..आणि आता आक्का-मी कुणाकडे बघून जगू आई- तुझ्या आक्काला नाही सांभाळू शकले मी.किती वाचवलं होतं या सगळ्यापासून तुम्ही दोघांनी तिला.माझ्या लहानशा खांद्यांना नाही झेपला तिचा भार. आई .. माफ कर ग मला-मरेपर्यंत जळत राहील मनाचा एक कोपरा आक्कासाठी आता.

काका- सावर,उमा, सावर.आधी भानावर ये.समोर उभं असलेलं वास्तव समजून घे. दादा नाईकांना फोन लावलाय सातार्‍याला मी.लगेच बोलावून घेतलंय. इथे त्याआधी हॉस्पिटलमध्ये काही फॉर्मलिटीज आहेत.मेडिकली हा साधा हार्ट अटॅक आहे. तिथे जायचंय.आज बॉडी डॉर्मिटरीत आहे.उद्या सकाळी विद्युतदाहिनीची व्यवस्था करावी लागेल.तुझ्याकडे रात्री पावशेकाकू असतील. पैसे मी काढून आणलेत सध्या,कमी पडले तर कार्डवर काढावे लागतील. तर आता घट्ट हो जरा.संकटांना सामोरं जावंच लागतं बेटा.. तिथे वयाचा,प्रकृतीचा कसलाच हिशेब नसतो.

उमा-(अजूनही नॉर्मल नाहीच.) मी सूड घेईन.मी पोलिस केस करेन. काय समजले काय ते आम्हाला?आमचीही माणसं आहेत. काँटॅक्टस आहेत.

काका - (काहीसे हताश) बेटा तू अजूनही भानावर येत नाहीयेस. सूड घेता येत असेल तर अवश्य घ्यावा पण कसं नी काय सिद्ध करणार आहोत आपण ?कायद्याच्या चौकटीत या मृत्यूला कसं म्हणायचं खून ?बरं मग कसं काय सिद्ध करणार आहेस तू ?पुन; वकिलाला गाठणं कोर्टकचेरी करणं या प्रचंड वेळखाऊ रूटीनचं काय?मोकळी होणारेस का त्यासाठी? एकटीने जमेल? मी शंभर टक्के सहमत आहे तुझ्या भावनेशी उमा, पण भावना आणि व्यवहारातली तफावत समजून घे एकदा तरी..

(पावशेकाकू,इतर काही मंडळी येतात.)

उमा-तुम्हीच सगळं केलंत पावशेकाकू.मला समजलंसुद्धा नाही.कशी तडफडली असशील शेवटच्या क्षणी .. माझी सशाच्या काळजाची आक्का.. शिकार केली तिची.काम साधलं पशूंनी.मोकळे झाले तिचा वाटा खायला. सही हवी होती त्यांना तिची.आयुष्यभर आई- बाबांनी संघर्ष केला त्यांच्याशी.कसं कळलं नाही मला..सही देऊन टाकायला हवी होती.काहीच कळलं नाही..संघर्ष करणारेय मी काका-(हसते) कसला संघर्ष ? माझ्यासाठी तो शब्दच आहे नुसता एक.अंगात नाही बळ.म्हणे संघर्ष करणार.यशस्वी माघार घ्यायलासुद्धा अक्कल लागते..

पावशेकाकू - गप्प रहा ग पोरी.किती बोलशील? किती शिणवशील स्वतःला? निमकर मला तर हिचीच काळजी वाटतेय. डॉक्टरला बोलावूया हिच्यासाठी नाहीतर रात्रभर चालेल हे. शांत झोपायची सुद्धा नाही.

उमा-झोप ?काकू ? झोप हरवली माझी.मनःशांतीच हरवली.इतकं दु:ख,इतकं दु:ख..मला सोसेल असं वाटलं कसं तुला परमेश्वरा? तुझ्याच समोर बसायची ना ती जपमाळ घेऊन? असं फरफटत नेलंस तिला ? असाच असतो तुझा न्याय? I hate you God ..I hate myself.. (जमिनीवर कोसळून घेते).

काका- (तिला कसंबसं उठवून सेटीवर बसवत) उमा बस्स. आता रागवेन मी तुझ्यावर. किती कामं आहेत आणि ती तुलामलाच करायचीत. ही कामं म्हणजे जुलूम वाटतो बाळा पण अशा वेळी ही कामंच ताळ्यावर आणतात.बंधनात ठेवतात आपल्याला. पावशेवहिनी जरासा चहा मिळेल का आम्हाला? हॉस्पिटलात गेलं पाहिजे.

उमा-मी कुठेच जाणार नाही.मी काहीही करणार नाही. तुम्हीच जा काका, पावशेकाकू.मला एकटं रहायचंय.

काका- उमा तू अजूनही नॉर्मल नाहीयेस..अग असं एका फटक्यात इतकं आडवं व्हायचं ?shame on you उमा.या एवढ्या वाचनाचा,विचारांचा,विवेकाचा उपयोग काय तुझ्या ? दुर्घटना काय फक्त कथाकादंबर्‍या सिनेमानाटकं नाहीतर महाकाव्यातच घडतात ? आणि हे तुझं बोलणं तुला न शोभणार्‍या बायकी attitude चं आहे उमा.तू या घराचा कर्ता पुरुषही आहेस .तुला नाही एवढी सवलत देणार मी. हे ओझं दादांवर का टाकणार आहेस? स्वतःच्या आयुष्याला सन्मुख हो उमा. मी,पावशेकाकू किती पुरे पडणारोत? आमच्याही वयांकडे बघ..किती बोलायला लावते आहेस मला..
(पावशेकाकू आतून चहा घेऊन येतात.)

उमा-( अचानक खूप शांत) काकू.. त्या मोठ्या डब्यातली बिस्किटं पण आणता ?मळमळतंय मला. आत्ता पित्ताच्या उलट्या सुरू होऊन नाही परवडणार. खरंच मला कोसळून नाही चालणार.काका.चला. चहा . निघायचंय आपल्याला लगेच.

(काका,पावशेकाकू अवाक होऊन बघताहेत.. )

पडदा..

भारती बिर्जे डिग्गीकर

contd..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ओह, कहानीमें जबरदस्त ट्विस्ट आ गया.......
अब, आगे क्या होनेवाला है ????
पहिल्या -पहिल्यांदा ही प्रेमकथा वाटत होती - पण आता सस्पेन्सभरी झालीये की......