सहप्रवास ४

Submitted by भारती.. on 16 July, 2012 - 06:08

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420

सहप्रवास ४

(ऑफिसच्या इमारती असलेला शहराचा एक भाग..वेळ रात्रीची. निर्मनुष्य ओसरलेल्या रस्त्यावरचा एक बस-स्टॉप.एका हॉटेलचा दर्शनी भाग पलिकडे दिसतोय.तुरळक कुणीतरी एकटंदुकटं झपझप घराकडे निघालेलं.मेघःश्याम आणि उमा दोघेच जण स्टॉपवर.)

उमा- वेळ कसा गेला कळलंच नाही रे.रात्र झाली..सांगून आलेय तरी आक्का वाट पहात असेल.आणि हा कुठला स्टॉप निवडलास ! इथे तर बस सुद्धा येत नाहीय..

मेघःश्याम- म्हणून तर निवडलाय !तुझी प्रूफ्स सगळी वाचली हॉटेलातच पण अजून कुठे निघावंसं वाटतंय..खूप काही बोलायचंय उमा.गोची आहे या शहराची. निवांत बसायला बोलायला जागाच नाहीत. हॉटेलात अजून किती वेळ काढणार.. हा शेवटचा स्टॉप आपला आजचा.म्हणजे अक्षरशः स्टॉपच! यायलाच सहा वाजवलेस.आत्ता साडेआठ तर होताहेत.

उमा- ग्रेटच आहेस मेघःश्याम! कमी का वाजलेत? त्यातून हा सगळा ऑफिसेसचा भाग. नऊच्या आत पॅक-ऑफ करायचंच हं. आणि आता काय राहिलं बोलायचं ? तुझा सगळा एपिसोड विंचरून काढला आपण. तुला हवी ती कल्चरल ब्यूटी यावी म्हणून त्यात अभंग पेरले,बोलीभाषेतले चंद्रभागेच्या वाळवंटातले संवादाचे तुकडे घातले-माहितीच्या भागांचं एडिटिंग केलं..आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगते मेघ,खूप जिव्हारी पोचणारेय हा पीस.माझी आठवण कर लोक सांगतील तेव्हा. महाराष्ट्राचं हृदय आहे पंढरपूर.

मेघःश्याम - माझी आठवण कर म्हणे! पुरे कर आता ते पंढरपूर प्रकरण.मला काही वारकरी inclinations नाहीयेत तुझ्यासारखी. खूप मनापासून करतोय सगळं, पण तसा कशातच नाही. हं..ते अभंगांचं खूप छान जमलंय सगळं .म्हणजे मीसुद्धा हललो बघ आतून.तू गुणगुणतेस छानच उमा-तुझी आठवण किती तर्‍हांनी करतो मी..तुझं बोलणं ,गप्प होणं,रागावणं,जीवभाव व्यक्त न करणं..उमा,तुला विसरतोच कधी मी ? म्हणे आठवण कर!

उमा- चूप रहा मेघ.उगीच फिल्मीपणा करू नकोस.चांगली ओळखते मी तुला. दिवसाचे दहा तास ती प्रीता भोवती घोटाळत असते. माझी आठवण करायला कधी सवड काढतोस तू? (हसते).

मेघःश्याम - नॉनसेन्स.प्रीता कुठे आठवली तुला? कधीतरी ऑफिसात ये ग . प्रीतापेक्षाही ग्लॅमरस मुली माझ्या अवतीभवती असतात .. त्यांची नावं तुला माहीत नाहीत .तीही माहिती करून घे म्हणजे तेवढाच कल्पनाशक्तीला जास्त वाव! किती महागामोलाची भेट आहे ही उमा . नुसतं निरर्थक बोलून दवडते आहेस..खरंच का तुला एवढंच बोलायचं आहे? मला एवढंच सांगायचं आहे? उमा, काय विचार केला आहेस भविष्याबद्दल?

उमा- मेघ,फार कमी माणसं तुझ्यासारखी नशिबवान असतात राजा-आपल्या भविष्याबद्दल आपण विचार करू शकणारी..तू काय विचार केला आहेस तुझ्यामाझ्या भविष्याबद्दल तेवढं एक सांगून टाकच आता. ते जास्त महत्त्वाचं.

मेघःश्याम -उमा, खूपखूप आवडतेस तू...या आवडण्याचा अर्थ काय उमा ? लग्नाचा वगैरे अजून विचारच येत नाहीय मनात. म्हणजे घरात,ऑफिसात तसे प्रस्ताव येत असतात ग,पण प्रत्येक प्रस्तावाच्या मागे एक अदृष्य Balance-sheet असतं फायद्यातोट्याचं.तू या सगळ्याच्या पलिकडे आहेस उमा.कधी इतकी हाताशी आहेस असं वाटतं-(तिचा हात हातात घेतो-ती झटकन हात सोडवून मागे सरते)-कधी इतकी दुष्प्राप्य.अशी का आहेस उमा ? अशी का अवघडतेस? माघार घेतेस ?

उमा- अरे लहानपण खेड्यात गेलंय ना माझं..बोलण्याइतकी आधुनिकता वागण्यात कुठून येणार माझ्या ? मेघ,एवढं गोड बोलतो आहेस-पण आमच्या खेड्यात असल्या बोलण्याला काही अर्थ नसतो रे.तू मागणी घालतो आहेस का मला? बघ हेही मलाच बोलायला लावलंस.. मला स्वत;बद्दल कसला आत्मविश्वास वाटावा रे? तुझ्यासारखा प्रेमिक मिळाल्यावर कठीणच आहे माझं. खरं तर एक अक्षरही न बोलता इथून निघून जावंसं वाटतंय मला .

मेघःश्याम - अपराधी वाटायला लागलंय मला.मला थोडा वेळ दे उमा. पण संपर्कात रहा ग. एकटं नको पाडूस मला. ..इतकं dynamic असतं आयुष्य- आता आमच्या या टी.व्ही. कार्यक्रमांची निर्माती बघ ना- रेहाना -इतकी Aggressive possessive आहे माझ्याबद्दल.

उमा-(संतापून) पुरे मेघःश्याम हेच ऐकायला थांबवलं आहेस का मला इथे? असं कर ना,तुझ्या आत्मचरित्रात लिही सवडीने सगळं.मीही निवांत वाचेन ना.कदाचित या बस-स्टॉपचाही एक प्रसंग असेल..किती romantic.. ज्यातून काहीच निष्पन्न होत नाही ना ,त्या नात्यांमधला रोमान्स तर अजूनच गडद होत असतो.

मेघ्;श्याम- झाली पुनः सुरुवात तुझ्या खोचून बोलण्याला अन विपर्यास करण्याला..उमा कसं होणार आपलं? आपण जर एकत्र आलो तर कदाचित खूप जमेल आपलं,कदाचित जराही नाही.

उमा- आपण एकत्र आलो तर.. जर आणि तर.. आणि 'एकत्र आलो' म्हणे! Live-in मध्ये का रहायचंय? बाबा कितीही permissive असले तरी फक्त एकत्र रहायला मला परवानगी देतील असं नाही वाटत मला. किती Non-committal बोलतोस मेघःश्याम-तुला भेटण्या आधी मन किती चित्रं रंगवतं आणि प्रत्यक्ष भेटणं म्हणजे शेवट चिडचीड आणि वादांमध्ये!

मेघःश्याम- यालाच घाबरतो मी उमा. चिडचीड आणि वाद! हेच ऐकत मोठा झालोय.. मी आईबरोबर रहातो,वडील परदेशी रहातात एवढंच माहितेय तुम्हा सर्वांना.खरं तर विभक्त आई वडिलांचा एकुलता एक मुलगा मी- असे कडाकडा भांडायचे दोघे.. लग्न या शब्दाला बिचकणारा भूतकाळ आहे माझा.आधी तणावग्रस्त,मग बेफिकिरीने पार झालो त्या कालखंडातून. आयुष्य खूप अर्थपूर्ण आहे आणि ते मनसोक्त जगायचंय मला. मला म्हणजे आपल्याला ग! प्लीज समजून घे उमा-नातं कोणतंही नाहीय सध्या तरी पण माझं माणूस आहेस तू अन तुझं माणूस आहे मी..उमा,आपलं जगणं नासवायचं नाही, खूप फ्री रहायचं.मजा करायची.प्रत्येक आव्हान म्हणजे एक लढाई असेल किंवा एक प्रेयसी!जिंकायचं दर वेळी.अजून खूप बाकी आहे. तू आवडतेस पण खात्री होत नाही की मी तुला सुखच देईन..दु;खच देणार असेन तर ते आताच्या दुरावण्याचंच असू दे. नंतर धिंडवडे नकोत.

उमा- किती अभद्र बोलतोस रे.. या बोलण्याचंच किती दु:ख देतोस.निघतानिघता याहून काही गोड फिल्मी नाही का बोलता येणार मघासारखं? झूठाही सही !

मेघःश्याम- I am sorry उमा,यासाठी नाही भेटलो आपण आज.. कुठून कुठे गेलं हे सगळं..उमा, कशी आहेस सोन्या..आईची आठवण काढून रडत असशील एकटीच्.मला माहितेय ते. ग्रूपमध्ये कोणी आईवरून गाणं म्हटलं की अश्रू लपवायची तारांबळ.. खरी नशिबवान तूच ग,असे हवेहवेसे आईवडील मिळाले तुला..इतकी साधी समर्पित शिक्षणक्षेत्रातली माणसं,एकमेकांवर आणि तुझ्यावर इतकं प्रेम करणारी. ही नशिबं पैशांनी नाही विकत मिळत ग ..नवीन काय करते आहेस उमा ?

उमा-वेळ नाही मिळत रे मेघःश्याम. ना चित्रप्रदर्शनांसाठी ,ना नाटकं बघण्यासाठी. नाही म्हणायला चेकॉव्ह, सार्त्रची नाटकं वाचत बसते अधूनमधून..तुला गंमत सांगू , ही क्लासिक नाटकं आताशा मनाच्या थिएटर मध्येच चांगली दिसू शकतात असं वाटू लागलंय..कसं तुडवत जायचं आयुष्याचं वाळवंट ते समजून घेण्यासाठी.. काहीच कथानक नसतं का रे या जगण्याला? पण मजा बघ ,आजच्या आपल्या भेटीसारखे काही क्षण मात्र असतात.कथानकाचा आभास निर्माण करणारे.

मेघःश्याम- कथानक असतंच उमा.त्याचे सुस्पष्ट टप्पे खूप दूरदूरवर असतात. खूप पुढे पोचल्यावर कळत असावेत ते.उमा,रागावली नाहीस ना माझ्यावर? नीट सांगता नाही आलं मला.थांबशील ना माझ्यासाठी? तुला हव्या त्या शब्दात तुला हवे ते प्रश्न विचारण्याची तयारी करतोय मी.. भेटत रहाशील ना?

उमा- वेळ संपत आलीय.. खूप शांत वाटतंय आता. म्हणजे आधी घुसळण जिवाची,मग शांती.अभिमान वाटतो तुझा मेघ.भेटत राहूच आपण.चल सोड मला टॅक्सीनेच आता.काही वाटतंय का एवढी रात्र केल्याचं? की त्या रेहानाबरोबर असाच उशीर करायची सवय झालीय?
(मेघःश्याम वैतागून मारत असलेली टपली चुकवते..दोघेही निघतात.)
पडदा.
भारती बिर्जे डिग्गीकर
contd..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वा, छान वेग घेतंय हे कथानक. जरा भराभर येऊ द्या नं पुढचे भाग..... नाहीतर उत्सुकता नाहीशी होते