सहप्रवास ८

Submitted by भारती.. on 20 July, 2012 - 16:24

http://www.maayboli.com/node/36306
http://www.maayboli.com/node/36383
http://www.maayboli.com/node/36420
http://www.maayboli.com/node/36450
http://www.maayboli.com/node/36481
http://www.maayboli.com/node/36480
http://www.maayboli.com/node/36550

सहप्रवास ८

(मठाचं साधंसंच कार्यालय.भिंतींवर दत्तगुरुंची एक तसबीर. मठाची पाटी 'अवधूत चिंतन मठ ',दहिवाडी, सातारा.भारदस्त ग्रंथराजांनी भरलेलं एक कपाट.भारतीय बैठका..स्वामीजी व कालचीच तरुण मुलगी,तेच प्रौढ गृहस्थ बसलेले आहेत्.कुणीतरी लेकुरवाळी बाई मध्येच येऊन पाया पडून वगैरे जाते आहे. उमा प्रवेशते.)

स्वामी- ये उमा,बैस. काल तुझ्याशी जे सविस्तर बोलणं झालं त्यातले काही मुद्दे उद्याच्या विश्वस्तांच्या मुख्य बैठकीत येतील. त्याआधी तुम्हा तिघांच्या कानावर घालावेसे वाटलेले काही विचार.. उमा,तुला माहितीच आहे, ही अरुंधती कुळकर्णी. हिचे आई वडील मठाशी पूर्वीपासून संबद्ध.अरुंधती गातेही छान. तुझ्याच वयाची, थोडी लहान असेल . हे पाटील. म्हणजे खरेच दहिवाडीचे पाटील.अरु,पाटील,हीच उमा. दादा नाईकांची मुलगी .तुम्ही तसं ओळखताच तिला. आपल्याकडे मानसोपचारार्थ ही आपणहून आली. या मुलीने कुणास ठाऊक कसा माझ्या मनाचा ताबा घेतला आहे.इथल्या कार्यपद्धतीचं तिने तिच्या परीने निरीक्षण करून काही विस्तार सुचवला आणि श्री ईश्वरेच्छेने त्याच दिवशी एका भक्ताने-आपल्या देशमुखांचा मुलगा कॅनडाला गेलेला राजेश्वर देशमुख-मोठी देणगीही पाठवलीय .काही विचार प्रत्यक्षात उतरवण्यास संधी आहे.

अरुंधती- स्वामीजी,तुम्ही जे म्हणाल ती आम्हा सर्वांसाठीच पूर्वदिशा आहे.मग ते कुणीही सुचवलेलं का असेना.. जो विचार तुम्हाला ग्राह्य वाटतो तो तुमचाच.

उमा- खरंच आहे.त्यांना मी काही सुचवावं इतका माझा अधिकारही नाही.पण गेल्या पंधरवड्यात बर्‍याचशा मोकळ्या वेळात स्वामींनी मला इथे नामस्मरण,ध्यान करायला सांगितलं..माझं मन इतकं कुठे सूक्ष्मात स्थिरावणारं आहे? अवती भोवतीच्या गोष्टींचंच बरंच निरीक्षण झालं..

पाटील-( बोलण्यात एक सातारकडचा हेल पण माणूस परिपक्व )सूक्ष्मात स्थिरावनारं मन इथे फक्त स्वामीजींचं.आपन प्रयत्न करनारेच उमाताई.

स्वामी- तर मठाला नेहमी नाईलाजाने हाताळावा लागणारा प्रश्न आहे अनाथ अर्भकांचा,त्यांचा मठाच्या भजनपूजन कीर्तनादि कार्यक्रमांशी काही संबंध नाही..मठाचा गावाच्या समाजजीवनाशी संबंध फक्त विश्वस्तमंडळाने चालवलेल्या प्राथमिक शाळेत गरजू गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यापुरता..आता या परित्यक्त मुलांना रीतसर सांभाळण्यासाठी आपण एक आनंद-ओवरी सुरू करणार आहोत. परित्यक्त अर्भकं सांभाळणार कोण? तर काही काळ त्यांच्या कुमारी किंवा अन्यथा निरुपाय झालेल्या माता, अर्भकासोबत ,ज्या नंतर निघूनही जातील.गावातल्या काही विनापाश स्त्रिया,निराधार वृद्धही येथेच राहून इतर कामे सांभाळतील्.एक समिती यांची निवड करेल,वेळोवेळचे निर्णय घेईल...
(काही काळ स्तब्धता. हे पचनी पडलं आहे असं अरु,पाटील दोघांच्याही चेहर्‍यावरून वाटत नाही.)

पाटील-स्वामीजी, हा आवाका फार मोठा होनार आहे असं नाही वाटत आपल्याला ? आपलं मनुष्यबळ, आर्थिक बळ या सगळ्याला हा घास मोठा आहे भलताच.

स्वामी- आपुलिया बळे नाही मी बोलत! परवा उमाचं बोलणं ऐकताना मलाही ते भाबडं ,अव्यावहारिक वाटलं,पण काल ही देणगी हाती आली तेव्हा पुनः एकदा कळलं की बळ आपलं नसतंच. ते देणारा वेगळाच असतो.तो देण्यासाठी आपली निवड करत असतो फक्त.

अरु- अनाथ मुलं मठाच्या पायरीवर सोडून दिली जातात तेव्हातेव्हा त्यांचा प्रश्न आपल्यासमोर येतो खरा पण आजवर आपण तो सोडवलाही आहे- जिल्हापातळीवरच्या अनाथाश्रमात ती मुलं पोचवून! हे अंगावर घेणं म्हणजे गैरव्यवहारांना उत्तेजन देणं वाटतं मला तरी. या सगळ्यांसाठी आपण का म्हणून सोयी निर्माण करायच्या ? अधर्माने वागणार्‍यांसाठी धर्माच्या स्थानी जागाच नाही..

स्वामी- या सोयी निर्माण नाही केल्या तर या अभाग्यांनी जावं कुठे? परवा केरबाच्या शेतात एक मेलेलं मुंग्या लागलेलं स्त्री अर्भक मिळालं. ज्या समाजात आपण रहातो त्यातच निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. त्यांना सामोरं न जाण्याने ते सुटत नाहीत्.शिवय धर्म कोणासाठी आहे अरु? 'ज्यासी आपंगिता नाही-त्यासी धरी जो हृदयी-तोची साधू ओळखावा-..देव तेथेची जाणावा!' तूच तर छान गातेस हा अभंग!

उमा- मी मुंबईत श्रद्धानंद महिलाश्रमाचं काम पाहिलंय.आपणही या आनंद-ओवरीच्या कामकाजात तशीच गुप्तता पाळावी कारण एखादी भरल्या दिवसांची वाट चुकलेली स्त्री आपल्या लेकराला तिथे जन्म देऊन हातापायात बळ आल्यावर आपल्या अज्ञात मार्गाने परत जाऊ शकेल.

पाटील- विचार तर मोठा मानूसकीचा आहे .. हे सगळं आपन केलं नाही तर आपली मानसं दुसर्‍या धर्मात जाऊ शकतात म्हनून यात शक्य असेल तर उतरनं योग्यही आहे.प्रश्न पैशांचाही नसेल तरी पन स्वामी,योग्य मानसांची वान आहे या गावात. कुनाकडे सोपवनार एवढं जोखमीचं काम?

स्वामी- माणूस तर तुमच्या समोरच आहे. ही उमा इथे कशासाठी आली असं तुम्हाला वाटतं? आणि तिच्या देखरेखीखाली गावातल्या तीन-चार वेगवेगळ्या वयोगटातल्या कर्मनिष्ठ बायकांची नावं मला सुचताहेत. रस्ता निघत जाईल.माणसं भेटत जातील.समिती बनेल उमाच्या नेतृत्वाखाली.

अरु- उमा! पण स्वामीजी,ही इथे कायमची राहील असं वाटतं तुम्हाला? या शहरी मुली इथे स्थिरावत नाहीत. शिवाय हिने मठाची दीक्षासुद्धा घ्यायचं नाकारलं असं ऐकतो आम्ही..क्षमा करा समोरच बोलल्याबद्दल,पण हे कसलं बक्षीस देताय आपण हिला उर्मटपणाचं ?

(उमा ऐकून गंभीर. मग सावरते.)

उमा- अरुंधती! ऐकलंस ना फक्त? की प्रत्यक्ष अनुभवलंस? काना-डोळ्यातलं चार बोटांचं अंतर विसरू नकोस. अजून खूप मोठं व्ह्यायचंय तुला. अशी हलक्या कानाची होऊ नकोस. मी,माझी दिवंगत आई आणि बाबा.. कोणत्याही पंथाची दीक्षा घेऊन स्वतःला बांधून घ्यायचं नाही असं फार पूर्वीच ठरवलं होतं आम्ही.म्हणूनच केवळ दीक्षेला अत्यंत नम्र नकार दिला.स्वामींच्या व्यक्तिमत्वाबद्दल व कार्याबद्दल खूप आदर आहे मला..त्यांच्या शब्दाखातर कोणत्याही दीक्षेशिवाय अथक काम करेन मी.माझ्या इथे रहाण्याबद्दल म्हणशील तर ही दोन वर्षे माझं अर्धवट राहिलेलं पोस्ट ग्रॅज्युएशन मी इथूनच correspondence ने पूर्ण करेन.. इथेच राहून.

स्वामी-दीक्षा हा एक सोपस्कार आहे.पवित्र पण सोपस्कारच. मी ती कुणावरही लादत नाही. त्यासाठी पिंड खर्‍या अर्थाने तयार झालेला नसला तर तो एक वृथा सोपस्कार ठरतो! उमाचा पिंड स्वतंत्र आहे,तिला वाटलं तर ती दीक्षा घेईल नाहीतर आपल्या वाटेने निघूनही जाईल..मी फक्त तिची दोन वर्षांची इथली उपस्थिती गृहित धरली आहे. अर्थात तिने तिची विद्यावेतनाची नोकरी आपल्यासाठी सोडलीय म्हणून तिला जमेल तेवढे प्रतीकात्मक वेतन मठाकडून मिळेल!

उमा- (हेलावून) स्वामी माझ्यावर खरं तर खूप मोठा विश्वास टाकलात तुम्ही.तो सार्थ करायचा जिवापाड प्रयत्न करेन मी.खरं तर ज्या प्रयोजनाच्या मी शोधात होते ते तुम्ही मला दिलं आहे हे मी आयुष्यभर विसरणार नाही.

स्वामी- पुरे उमा. सगळ्याच भावनांची शब्दात उधळमाधळ करायची नसते.मी निघतो आता.चलणार पाटील ? गावातली काही कामं बाकी आहेत.

(दोघे उठतात.आता अरु आणि उमाच आमनेसामने.एक अवघडलेली शांतता. मग उमाच बोलणं सांधण्याचा प्रयत्न करते.)

उमा- माझी या सगळ्यातली भूमिका तुला पसंत पडलेली दिसत नाही अरुंधती..तशी परकीच आहे मी तुम्हा सर्वांसाठी अजून्..थोडा वेळ द्यावा लागेल आपल्याला एकमेकांना.

अरुंधती-वेळ आमच्याकडे पुष्कळ आहे ग. पण एवढ्या थोड्या वेळात स्वामीजींना एवढं प्रभावित कुणीच केलं नव्हतं! सांभाळ ग बाई उमा-उद्या आपल्या वाटेने निघून जाशील आणि मधल्यामध्ये स्वामीजींचा तपोभंग व्ह्यायचा! म्हणजे आपला मूळ रस्ता सोडून दुसरा धरण्याबाबत बोलतेय हं मी फक्त. गैरसमज नको करून घेऊस!

( फणकार्‍याने निघून जाते! उमा अवाक. अतिशय घायाळ भावावस्था .)

उमा- परमेश्वरा! हाही एक जुनाच अनुभवव्यूह. एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीचं प्रेम सहजपणे वाट्याला यावं पण त्याबरोबरच क्षुद्रांची क्षुद्रताही. नको झालंय काहीही सोसणं आता..पण घट्ट हो आता उमा..कुठे कुठे कुणाकुणापासून पळशील तू? हे गाव,हा मठ, ही आनंद-ओवरी आत्तातरी तुझी आहे.सर्वस्वाची ऊर्जा निरपेक्षपणे ओत या जगात.विसर भूत़काळ आणि विसर भविष्यकाळही. कामात बुडून जाण्याची नशा कर..बुडून जा- आत्मविस्मरणाच्या कडेलोटापर्यंत जा..

( अचानकपणे प्रकाश आणि प्रीता प्रवेशतात- त्यांना बघून-)

-अरे प्रकाश! प्रीता! तुम्ही? इथे?! मला कळवलं सुद्धा नाहीत! surprise ! आणि मी आत्ताच भूतकाळ विसरायचं ठरवत होते..

प्रीता- कायकाय विचित्र गोष्टी करत असतेस तू उमा! असं ठरवून कोणी काही विसरतं वाटतं? कधी इतकी शहाणी वाटतेस..कधी खात्री होते की वेडपट आहेस..

प्रकाश- अग मुद्दामच तुला न कळवता आलो.आधी दादांना भेटलो,तू कशी आहेस चौकशी केली.मगच थेट इकडे आलो.बरं वाटलं तुझं डोकं ठिकाणावर आल्याचं पाहून.

उमा- म्हणजे? मी काय कपडे फाडत होते अंगावरचे, की दगड मारत होते येणार्‍याजाणार्‍यांना? (हसते).

प्रकाश- उमा किती काळजी केली आम्ही सर्वांनी तुझी माहितीय तुला? पण आधी एक गुड न्यूज देतो..मी आणि प्रीताने लग्न करायंचं ठरवलंय..

उमा- (चकित) ग्रेट न्यूज! मला कधीच कसं जाणवलं नाही?

प्रीता- तुझं लक्ष त्या मेघःश्यामकडे! कुणी त्याला तर पळवणार नाही ना,इकडे!!

प्रकाश- चूप ग प्रीता-नको टोमणे मारूस तिला. खूप सोसलंय आणि खूप सोसायचंय तिला.उमा,मेघःश्याम परदेशी चाललाय पण त्या आधी तुला भेटायला येणारेय . तयार रहा!

उमा- मेघ?! परदेशी! (शांतपणे) ही दुसरी गुड न्यूज!! Let us celebrate !

(पडदा.)

भारती बिर्जे डिग्गीकर

गुलमोहर: 

मनापासून आभार शशांकजी फीडबॅकसाठी अन विविध उपयुक्त सूचनांसाठीही.लिहिण्याबाबत सध्या जुनेच समीकरण माझ्या कूर्मगतीसाठी योग्य वाटतेय.. :))