गीत जन्मले काव्यामधुनी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आजपर्यंत गाण्यांवर जे लेख लिहिले ते सहज चाळताना लक्षात आलं की सगळे हिंदी चित्रपट संगीतावर लिहिले. असं कसं झालं? मराठी गाण्यांवरचं प्रेम खरं तर हिंदी गाण्यांपेक्षा जुनं! गदिमा, शांताबाई शेळके, पाडगांवकर, जगदीश खेबुडकर, पी. सांवळाराम या आणि अशा अनेक कवींच्या रचनांमधूनच लहानपण, तारुण्य, आता मध्यमवय सगळं उमजायला मदत झाली. आयुष्यातले सगळे बरे-वाईट अनुभव माझ्या वाट्याला येण्यापुर्वीच त्यांना या गीतकारांनी कागदावर मांडले. या एकेका गीतकारावर एक लेख लिहून पुरणार नाही इतकं अफाट आणि दर्जेदार काम त्यांनी करुन ठेवलं आहे. पण तरी मराठी गाण्यांवर काहीच लिहू नये मी?

माझ्या पीढीच्या लहान मुलांची भाषेशी अोळख झाली तशीच माझीही 'इथे इथे बस रे मोरा' ने झाली, पुढे बालवाडीत (तेव्हा प्ले ग्रुप, के.जी., मॉंटेसरी वगैरेंचं फॅड नव्हतं) 'मनीमाऊचं बाळ किती गोरं गोरं पान' किंवा 'आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो', मग पुढे घरातल्या रेडिअोवर वाजणारी 'नाच रे मोरा आंब्याच्या वनात' आणि 'झुकुझुकु झुकुझुकु आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी' ही आणि अशी गाणी यावर माझं लहानपण पोसलं. त्यातूनच पुढे कवितांची आवड निर्माण झाली, इतकी की शाळेचं वर्षं सुरु व्हायच्या आधी पुस्तकं आणली की मराठीच्या पुस्तकाला कव्हर घालेपर्यंतही धीर नसायचा! आधी त्यातल्या कविता वाचून काढायच्या! अभियांत्रिकी महाविद्यालयात जाऊनही किंवा नंतर कितीतरी वर्षं संगणक क्षेत्रात काम करुनही ते प्रेम, आकर्षण आजतागायत कमी झालेलं नाही.

याचं श्रेय मात्र बऱ्याच जणांचं - सर्वप्रथम आईचं, जिनी वाचनाचे संस्कार केले, सगळे प्रकार वाचून बरं-वाईट शोधायला शिकवलं, पुस्तकं विकत घेऊन वाचायला शिकवलं; इतकं की वाचनाचा आनंद वाटून घ्यायच्या बाबतीत मला मैत्रिणीची गरज कधी पडलीच नाही. अजुनही काही वाचलेलं आवडलं की ताबडतोब आईला फोन करून सांगितल्याशिवाय चैन पडत नाही.

दुसरं श्रेय माझ्या मराठीच्या शिक्षकांचं. सुदैवाने मी कायम हुषार मुलांच्या तुकडीत असल्याने सगळ्याच विषयांना चांगले शिक्षक सतत लाभत गेले. आणि भाषांच्या बाबतीत तर नक्कीच! महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या शिक्षकांनी भाषेबद्दल मनात प्रेम निर्माण केलं. धडा ज्या पुस्तकातून घेतला असेल त्याची माहिती देऊन ते मूळ पुस्तक वाचायला प्रोत्साहन दिलं. आजही मला आठवतं, पु.लं.च्या 'पूर्वरंग' मधला काही भाग धडा म्हणून होता, तो शिकवताना सर अगदी आमच्यासारखेच डोळ्यांत पाणी येईपर्यंत हसत होते. खरं तर किती वेळा त्यांनी तो धडा शिकवला असेल आणि 'पूर्वरंग' वाचलं असेल, पण तरी ते त्यात पूर्णपणे बुडुन जात असत. एरवी सहस्रबुद्धे सर शाळेचे मुख्याध्यापक आणि अत्यंत कडक शिस्तीचे (अर्थात घरी मातोश्री शिक्षिका असल्याने ते मला तसे मवाळच वाटायचे...) पण मराठी शिकवायला वर्गात आले की एक वेगळेच सर वाटायचे. जो धडा / कविता असेल त्याप्रमाणे त्यांचा चेहरा बोलायचा, बदलायचा. माझ्या सगळ्यांत लक्षात राहिलं ते म्हणजे 'पृथ्वीचे प्रेमगीत'. सहस्रबुद्धे सरांनी ज्या रसिकतेनी, प्रेमानी शिकवलं ते विसरणं अशक्य आहे. इतकं की पुढे जेव्हा 'विशाखा' घेतलं तेव्हा आधी ती कविता उघडली आणि पाहिलं की पाठ्यपुस्तकात होती त्यापेक्षा जास्त कडवी आहेत का. आजही कविता पाठ आहे यांत कुसुमाग्रजांच्या लेखणीचं सामर्थ्य तर आहेच पण माझ्या मनात सरांनी ज्या तऱ्हेनी ती शिकवली त्यामुळे ती जास्तच खोलवर जाऊन बसली.

तिसरं श्रेय अर्थातच जे कवी मला वाचायला मिळाले त्या कवींचं. ते ऋण तर न फिटण्यासारखं. पण का कोणास ठाऊक, गद्य वाचनाच्या बाबतीत जसे मी नव-नवे लेखकांचे लेखनही वाचते तसे काव्याच्या बाबतीत मात्र झालं नाही. कुसुमाग्रज, बोरकर, बालकवी, तांबे, सावरकर, पाडगांवकर, बापट, विंदा, सुरेश भट जितक्या प्रेमानी वाचले जातात तसे इतर कवी नाही फारसे वाचले जात. खरं तर कविता एकदा वाचून कधी पुरत नाही - विशेषतः या कवींच्या कविता जितक्या वाचाव्यात तितके दरवेळेस नव-नवे पदर मोकळे होत राहतात. त्यामुळे कदाचित असंही असेल की अजून यांच कविता वाचून झाल्यासारखं वाटंत नाही त्यामुळे पुढे सरकावंसंच वाटंत नाही. किंवा असंही असेल की हे सगळे कवी जरी वेगवेगळ्या वृत्तीचे असले तरी प्रत्येक कवी इतक्या ताकदीचा आहे की नवीन काही वाचलेलं जर त्या ताकदीचं नसेल तर रसभंग होईल अशी मनात कुठेतरी भीति असते.

दुर्दैवाने मराठी समीक्षाकारांनी कवी आणि गीतकार अशी वर्णसंस्था मराठी गाण्यांच्या बाबतीत करुन ती इतकी रुजवली की गदिमांसारख्या गीतकारालाही त्यांच्याकडून कवीचा दर्जा मिळाला नाही. खरं तर वर उल्लेखलेल्या (आणि तसे अनेक) गीतकारांनी रूढार्थाने जे कवी मानले जातात अश्या कुठल्याही कवीच्या तोडीस तोड रचना केल्या. पण केवळ त्यांच्या ध्वनीमुद्रिका निघाल्या किंवा ती चित्रपटातून लोकप्रिय झाली एवढाच दोष त्यांना या वर्णसंस्थेच्या खालच्या पायरीवर ढकलायला, काव्यापेक्षा त्यांच्या रचना हिणकस दर्जाच्या मानायला पुरेसा ठरला.

पण अशाही काही कविता आहेत, ज्या आधी काव्य रुपाने प्रसिद्धीस पावल्या आणि मग त्यांचंच गीत बनून त्या आणखी कितीतरी लोकांपर्यंत पोहोचल्या. अश्या काही आवडीच्या कवितांचा हा वेध.

अजुनी रुसुनी आहे (अनिल) - या काव्याची पार्श्वभूमी अत्यंत करुण आणि हृदयाला हात घालणारी आहे. कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे हे त्यांच्याकाळातले एक विलक्षण जोडपे. त्या काळात प्रेमविवाह करणे आणि पती-पत्नीनी एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करणे या दोन्ही गोष्टी सहज पचनी न पडणाऱ्या. पण या जोडप्याने ते करुन दाखवलं. दोघेही साहित्यिक, रसिक. दुर्दैवाने कुसुमावतींचं निधन झाल्यावर त्यांच्या अचेतन देहाकडे पाहून अनिलांच्या तोंडून सहजपणे ही कविता बाहेर पडली. जणू आपल्या पत्नीचं निधन झालं नसून ती केवळ आपल्यावर रुसली आहे, नाराज झाली आहे अशी मनाची (खोटीच) समजूत घालायचा हा प्रयत्न आपल्याही काळजाला हात घातल्याशिवाय रहात नाही.

समजूत मी करावी म्हणूनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताही तू हसावे
ते आज का नसावे? समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना

प्रेमाच्या अभिव्यक्तीची परिसीमा वाटते मला ही कविता म्हणजे. कवी अनिल त्यांच्या कवितेला कशा प्रकारची चाल लावावी या बाबतीत फार चोखंदळ होते. कुमारांनी लावलेली चाल आणि गायलेलं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं - त्यात नवीन किंवा आश्चर्याचं काही नाही कारण कुमार अत्यंत प्रतिभावान कलाकार होते आणि गायकीवरचं त्यांचं प्रभुत्व तर वादातीत आहे; पण स्वतः कवी अनिल अत्यंत नाराज होते असं वाचल्याचं स्मरतं. त्यांच्यामते लावलेल्या चालीने त्या कवितेचा आत्मा, तिची शोकात्मताच हरवली. एका दृष्टीने ते बरोबरही वाटतं कारण ही काहीच पार्श्वभूमी माहित नसेल तर रुसलेल्या प्रियेची समजूत काढण्यासाठी केलेले काव्य अशीच समजूत गाणं ऐकल्यावर होते आणि वास्तवापासून फारच दूर नेते. कुमारांसारख्या विचारवंत आणि बुद्धीमान कलाकारानेच ही चाल लावली असल्यामुळे एक रसिक म्हणून माझा मात्र फार गोंधळ उडतो.

गर्द सभोंती रान साजणी (बालकवी) - निसर्गतील सौंदर्य, प्रेम, आनंद आणि संगीत हे आणि प्रामुख्याने इतकेच काव्यविषय बनवून त्यावर कविता लिहिणं ही एका कवीसाठी अतिशय कठीण आहे असं मला स्वतःला वाटतं. अनेक कारणांसाठी - एक तर निसर्गाची जादू शब्दांत पकडण्यासाठी चपखल शब्द हवेत - नुसते एकदा नव्हे, तर सतत! आणि तेही कसे? तर कविता म्हणजे जणू एखाद्या चित्रकाराने रंगवलेले रम्य निसर्गचित्र वाटावे इतके प्रभावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं त्याचा कळत-नकळत परिणाम प्रत्येक व्यक्तीवर होत असतो आणि कलाकाराच्या अभिव्यक्तीत त्याची छाया त्याच्याही नकळत अनेकदा पडत असते. बालकवींचा मूत्यू झाला तेव्हा पहिले महायुद्ध सुरु होते - याचाच अर्थ त्यांच्या छोट्याश्या आयुष्यात त्यांनी ज्या काव्यरचना केल्या त्यातील काही कवितातरी जगात पहिल्या महायुद्धाची रणधुमाळी सुरु झाली आणि बालकवींचा मृत्यू झाला त्या मधल्या चार वर्षांत झाल्या. इतकी उलथा-पालथ अवती-भवती होत असता बालकवींचा काव्यविषय आणि त्यांचा जीवलग सखा मात्र नेहमीप्रमाणेच निसर्ग हाच होता. त्यांच्या कविता वाचल्या की हे तर लगेचच ध्यानात येतं की ही नुसतीच कवीमनाची अभिव्यक्ती नाही तर निरागस, निसर्गात हरवलेल्या आणि आजूबाजूच्या जगात राहूनही न राहणाऱ्या कवीची रचना आहे. खरं तर बालकवी केशवसूत, रेव्हरंड टिळक वगैरे प्रखर सामाजिक जाणिवा असलेल्या कवींच्या नंतरच्या काळातले कवी. त्यांच्या पिढीतल्या इतर कवींवर या कवींच्या विचारांचा पगडा निश्चित होता. पण 'धर्मवीर' सारखी एखादी कविता सोडली तर बालकवी मात्र काव्यातून जनजागृती, बंड वगैरेपासून कायम दूरच राहिले. 'हिरवे हिरवे गार गालिचे', 'आनंदी आनंद गडे, इकडे-तिकडे चोहीकडे', 'क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे', 'ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन' असे निसर्गातच रमले. या कविता वाचताना सगळ्यांत आधी मला जाणवतो तो कवीची निरागसता. 'बालकवी' ही मिळालेली उपाधी इतकी सार्थ कराणारी कविता त्यांनी कायम लिहिली. त्यानंतर लक्षात येणारी दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची शब्दसंपदा आणि कवितेतील शब्दयोजना. असं वाटतं की हा कवी योग्य शब्दासाठी कधीच अडकून बसला नसेल तर उलट शब्दच त्यांच्याजवळ हात जोडून उभे असावेत आपल्याला कधी संधी मिळते याची वाट बघत! आणि ते शब्द तरी किती ऋजू! हा निसर्गकवी केवळ शब्दांद्वारे आपल्यासमोर चित्र, स्पर्श, ध्वनी, गंध अश्या सगळ्या प्रकारे त्या निसर्गाचं वर्णन इतक्या हळुवारपणे, इतक्या नेमकेपणाने, इतक्या प्रेमाने करतो की हळव्या मनाचा वाचक त्या चित्रात हरवलाच पाहिजे.

'तूं तर चाफेकळी!' ही बालकवींच्या काही अपूर्णच राहिलेल्या कवितांमधली एक. नुसतीच कविता वाचली तर बालकवींच्या इतर निसर्गचित्रांसारखीच वाटते. या अश्या काही कविता अपूर्ण का राहिल्या हे आता कायमचं कोडंच राहिल. पण ही कविता जरी अपूर्ण असली तरी इतर कवितांसारखी पुस्तकांत अडकून पडली नाही तर त्यातल्या निवडक अोळी तरी नाट्यगीताच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचल्या. १९६४ साली आलेल्या 'मत्स्यगंधा' या नाटकाचा विषय धीवरकन्या सत्यवती आणि पराशर मुनी यांचा प्रणय आणि त्यानंतर पराशरांनी तपसाधनेसाठी हिमालयात निघून जाणे, नंतर चांद्रवंशीय आणि कुरु-कुलाचा राजा शंतनू आणि सत्यवती यांचा प्रेमविवाह, त्यांच्या लग्नासाठी सत्यवतीच्या वडिलांनी तिच्या मुलांना राजपद मिळावं ही घातलेली अट आणि पित्याच्या सुखासाठी शंतनूचा ज्येष्ठ पुत्र देवव्रत याने आजन्म ब्रह्मचर्याची घेतलेली भीष्मप्रतिज्ञा हा. नाटककार वसंत कानेटकर जरी रविकिरण मंडळाच्या संस्थापकांपैकी एक कवी गिरीश यांचे पुत्र असले तरी वसंतरावांनी स्वतः गद्यलेखनच मुख्यत्वे करुन केले. आपल्या नाटकांमधुन त्यांनी असंख्य विषय समर्थपणे हाताळले. त्यातलेच एक नाटक 'मत्स्यगंधा'. नाटकाचा विषय पौराणिक असल्यामुळे की काय पण 'सौभद्र', 'स्वयंवर' याप्रमाणे हे ही संगीत नाटक म्हणून लिहिले. आणि नाटकातली पदे स्वतः लिहून आपल्या वडिलांचे झालेले संस्कार आपल्यापुढे आणले. फक्त एक गीत तेवढे वसंतरावांनी स्वतः लिहिले नाही. सत्यवतीच्या तोंडी असलेल्या एका गीतासाठी मात्र वसंतराव, बालकवींच्या या अपूर्ण कवितेकडे वळले. मुळात अपूर्ण अश्या या कवितेतील, नाटकातील प्रसंगाला शोभतील अश्या काही अोळी तेवढ्या निवडून त्यांना पं. जीतेंद्र अभिषेकींसारख्या प्रतिभावान संगीतकाराने 'बैरागी भैरव' रागात बांधले आणि आशालता वाबगांवकरांनी गीत गायलंही आणि रंगमंचावरही सत्यवतीच्या भूमिकेत सादर केलं.

सरणार कधी रण (कुसुमाग्रज) - छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला नुसता एक अभिष्कित राजा दिला नाही तर माणसातलं मराठीपण परत मिळवुन दिलं, आपल्या धर्माचा, देशाचा अभिमान जागा केला. हे सगळं त्यांनी समाजातले सगळे घटक बरोबर घेऊन केलं आणि आपलं मराठीपण, हिंदुत्त्व यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी मोगली साम्राज्य किंवा त्यातला माणूस यांना शत्रू न मानता त्या माणसातल्या वाईटाचा नाश करण्याचा अादर्श आपण तर पाळलाच पण आपल्या सैन्यातल्या आणि मंत्रीमंडळातल्या प्रत्येक माणसाकडूनही तीच अपेक्षा ठेवली - नव्हे ते पाळलं जाईल हे पाहिलं. त्यामुळे त्यांच्याबरोबरीने सगळ्या जाती-धर्मांचे लोक 'श्रींची इच्छा' पूर्ण करण्यासाठी तेवढ्याच हिरिरीने, इर्षेने झगडले. या सगळ्यां लढायांत महाराजांना त्यांचे कित्येक सवंगडी गमवावे लागले. प्रत्येकाने आपल्या प्राणांची आहुती महाराजांच्या एका शब्दाखातर किंवा महाराजांचा प्राण वाचवण्यासाठी किंवा हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आनंदाने दिली; पण दर वेळी महाराजांना आपल्या आयुष्याचा एक भाग निघून गेल्यासारखं वाटलं असेल. असे प्रसंग आपल्या प्रजेवर, सैन्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या प्रत्येक राजासाठी/ नेत्यासाठी महाकठीण असावेत असं वाटतं. एकीकडे त्या त्यागाची गरज तर मोठं चित्र डोळ्यांसमोर असलं की पटते - पण ती बुद्धीला. संवेदनशील राजाला आपल्यासाठी, आपल्या स्वप्नासाठी, तत्त्वासाठी कुणाचातरी प्राण जाणं म्हणजे आपल्याच प्राणाचा तुकडा तोडल्यासारखं वाटावं यातच त्या राजाची महानता सामावलेली आहे.

असाच एक प्रसंग पावनखिंडीत जीवाची बाजी लावून मोजक्या सवंगड्यांबरोबर खिंड लढवत प्राणार्पण करणाऱ्या बाजीप्रभूंच्या शौर्याचा, धैर्याचा, राजांवरच्या प्रेमाचा आणि भक्तीचा. शरीरावर अशी एकही जागा नाही जिथे वार झालेला नाही. नखशिखांत रक्ताने नाहिलेले बाजीप्रभू अंगात कणभरही ताकद नसताना फक्त जिद्दीच्या जोरावर खिंड लढवत राहिले, राजे विशाळगडावर सुखरूप पोहोचावेत म्हणून. उरला-सुरला प्राण कान होऊन इषाऱ्याच्या तोफेच्या आावाजाची वाट पहात होता. एकदा तो आवाज ऐकला की राजे विशाळगडावर पोहोचले हे समजून बाजींच्या शरीराला विश्रांती आणि जीवाला मुक्ती मिळाली असती. महारांजांचं चरित्र माहीत नाही आणि या प्रसंगाने ज्याचं मन हलत नाही तो मराठी माणूस नाही! इतकी व्याकुळता आणि पराक्रमाचा संगम एके ठिकाणी असल्यावर कुसुमाग्रजांसारख्या देशावर प्रचंड प्रेम करणाऱ्या कवीला त्यावर कविता लिहाविशी वाटावी यात आश्चर्य ते काय! मोजक्या पण अचूक शब्दांत तो सगळा प्रसंग आपल्यासमोर उभा करण्याची ताकद कवितेत आहे. कुसुमाग्रजांची नवनवोन्मेषशालिनी लेखणी अशा प्रसंगी तेजाळून निघते. १९४२ साली प्रसिद्ध झालेल्या 'विशाखा' या काव्यसंग्रहातून 'पावनखिंडीत' ही १९३२ साली कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता पहिल्यांदा रसिकांनी वाचली असावी.

पावन-खिंडित पाऊल रोवुन
शरीर पिंजेतो केले रण
शरणागतीचा अखेर ये क्षण
बोलवशील का अता घरी?

महाराजांचं जीवन गीतसंग्रहाच्या रुपाने रसिकांसमोर सादर करायचं जेव्हा पं. हृदयनाथ आणि लता मंगेशकरांनी ठरवलं तेव्हा ही कविता त्या गीतसंग्रहात अोघानी येणं क्रमप्राप्तच होतं. कवितेच्या शब्दांना पूर्ण न्याय देणारी चाल हृदयनाथांनी लावली आणि लताने इतक्या तन्मयतेने आणि जीव अोतून गाणं गायलं आहे की कितीही वेळा ऐकलं तरी डोळ्यांना केव्हा धारा लागतात ते कळतंही नाही. 'शरणागतीचा अखेर ये क्षण' ही अोळ ऐकली की हृदयाचे टाके तटतट तुटल्यासारखं वाटतं. या एका अोळीत बाजींची सगळी व्याकुळता, महाराज गडावर पोहोचले की नाही ही भीति, शरीर साथ सोडणार आणि राजांना दिलेलं वचन अपूर्ण राहणार ही यातना सगळं-सगळं सामावलं आहे. प्राणांचे कान करुन ऐकत असलेला तोफेचा आवाज कधी होणार? कधी हे शरीर सोडुन कुडीतला आत्मा घरी जाणार? कधी ते बोलावणं येणार?

गुणि बाळ असा जागसि कां रे वायां? (गोविंदाग्रज) - राम गणेश गडकरींनी आपल्या या नावाने भावबंधन, पुण्यप्रभाव, एकच प्याला अशी संगीत नाटकं लिहिली, पण बहुतेक नाटकांतील पदे मात्र गडकऱ्यांनी लिहिली नव्हती. हे एक आश्चर्यच कारण गडकरी स्वतः कवीही होते. गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यानी ज्या कविता लिहिल्या त्या 'वाग्वैजयंती' या एकाच काव्यसंग्रहात प्रसिद्ध झाल्या, त्याही १९२१ साली! म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी! जेमतेम पस्तीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ज्या दर्जाची साहित्यसंपदा निर्माण केली त्याची बरोबरी कित्येकदा शेक्सपियरशी केली जाते. गडकऱ्यांच्या मृत्यूला आज नव्वद वर्षे होऊन गेली, पण त्यांच्या नाटकांची गोडी आजही कमी झालेली नाही. तसंच त्यांच्या काव्याचं. छंदबद्ध कवितेपासून मुक्तछंदापर्यंत आणि छोट्या चार अोळी कवितेपासून दीर्घकवितेपर्यंत सगळे काव्यप्रकार आणि निसर्गगीत, बालगीत, मूल मृत्यूशय्येवर असलेल्या आईच्या मनाची वेदना व्यक्त करणारी कविता, प्रेमकविता, देशभक्तीपर कविता असे सगळे काव्यविषय त्यांनी समर्थपणे हाताळले. त्यांच्या काव्यरचनांचा एक विशेष म्हणजे कवितेच्या आधी ते एक छोटासा परिच्छेद लिहून काव्याची पार्श्वभूमी विदित करीत, ज्यामुळे वाचकाला कविता समजायला, त्यातला रस घ्यायला आधीच त्याची मनोवृत्ती तयार झालेली असे.

'पांच देवीचा पाळणा' या कवितेत गडकरी अशी कल्पना करताहेत की बालशिवाजी झोपायची वेळ झाली तरी अजुन झोपायचं नाव घेत नाही, वाळे वाजवित तसाच जागा! अश्या वेळी जणू मराठेशाहीच्या संरक्षक पांच देवता - तुळजापूरची तुळजाई, सातारची मंगळाई, प्रतापगडाची भवानी आई, पुण्याची पर्वती आणि पाराची वरदायी - या बाळाला झोपवायचा प्रयत्न म्हणून हा पाळणा जिजाऊबाईसाहेबांच्या मुखातून म्हणताहेत अशी कल्पना या कवितेत केली आहे. जरी हा पाळणा असला तरी बालशिवाजीसाठीचा पाळणा असल्याने पुढे कोणते पराक्रम गाजवायचे आहेत याची झलक जणू आई बाळाला दाखवते आहे. 'बाळा, मोठं झाल्यावर तुला इतके सगळे पराक्रम गाजवायचे आहेत, तेव्हा आत्ता लहान असताना तरी निजून घे; मोठा झालास की तुला स्वराज्याशिवाय दुसरा विचार सुचणार नाहिये', असंच जणू जिजाऊबाईसाहेब शिवबाला सांगत आहेत.

ही शांत निजे बारा मावळ थेट । शिवनेरी जुन्नरपेठ ।।
त्या निजल्या ना तशाच घाटांखाली । कोकणच्या चवदा ताली ।।
ये भिववाता बागुल बघ तो बाळा । किती बाई काळा काळा ।।
इकडे हे सिद्दी-जमान ।
तो तिकडे अफजुलखान ।
पलिकडे मुलुखमैदान ।
हे आले रे तुजला बाळ धराया ।।
नीज रे, नीज शिवराया ।।

हृदयनाथांनी अगदी शांत आणि कमीत कमी वाद्य वापरुन कवितेला चाल लावली आहे - जणू त्या वाद्यांच्या आवाजानेही शिवबाची झोप चाळवेल. लताच्या आवाजात आईचं ममत्व, बाळाला झोपवायचे सगळे उपाय थकल्यावर येणारी हतबलता तर आहेच पण हे कुणी साधं बाळ नाही तर बालशिवाजी आहे याचंही भान आहे.

ने मजसि ने (सावरकर) - देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी घरावर तुळशीपत्र ठेवायचा वारसा घेऊनच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लहानाचे मोठे झाले. आयुष्यात जे-जे केलं ते डोळ्यांपुढे एकच उद्दीष्ट ठेवून - स्वातंत्र्यप्राप्ती आणि समाज घडवणं. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी त्यांना सशस्त्र क्रांतीचा मार्ग पसंत होता, भारतीय जनतेवर अनन्वित अन्याय करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला कळणाऱ्या भाषेतच बोललं तर लवकर परिणाम होईल असा त्यांचा विश्वास होता. बॅरीस्टरची पदवी मिळवण्यासाठी सगळं मागे सोडून लंडनला गेले, तर तिथेही स्वस्थ बसवेना. तिथे तर आणखी समविचारी असे मदनलाल धिंग्रा, सेनापती बापट असे सहकारी अभिनव भारत समाजात मिळाले. त्यामुळे बॅरिस्टरची परिक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांना पदवी द्यायला नकार देण्यात आला. निमित्त घडलं सावरकरांनी लिहिलेल्या, इटलीला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या मॅझिनीच्या चरित्राचं. त्याच सुमारास मदनलाल धिंग्रा कर्झन वायलीला गोळ्या घालून मारल्यामुळे पकडले गेले. त्याला विरोध केल्यामुळे सावरकरांवरचा इंग्रजी सत्तेचा रोष आणखीच वाढला. एकूण लंडनमधून चालणारं क्रांतीकार्य धोक्यात आलं. १९०९ सालची ही गोष्ट.

त्यातच वडिल वंधू बाबाराव सावरकर आणि धाकटे बंधू बाळाराव सावरकर दोघांना अटक झाल्याचे कळले आणि पोलिसांनी घरातील स्त्रियांना निर्दयपणे भर पावसात घराबाहेर काढलं आणि घराला टाळं ठोकलं. क्रांतीवीरांना समाजाची सहानुभूती जरूर मिळते, पण सरकारी रोषाची भीति वाटून त्या क्रांतिकारकांच्या घरच्यांना आसरा देण्याची, मदत करण्याची हिंमत मात्र सर्वसामान्य जनतेत नसते. त्यामुळे या महान क्रांतिकारकांच्या घरच्या बायकांना धर्मशाळेची वाट धरावी लागली. तिकडे स्वतः सावरकरांना आपल्याला कधीही अटक होईल हे स्पष्ट दिसत होतं. कितीही झालं तरी क्रांतीकारी असले तरी ती माणसंच असतात. अश्या मनःस्थितीत ब्रायटनच्या किनाऱ्यावर बसले असता समोर अथांग सागर होता आणि त्याच्या पलिकडे त्यांची मातृभूमी पारतंत्राच्या शृखंलांमध्ये जखडलेली होती. नकळत त्या सागराला उद्देशून सावरकरांच्या तोंडून 'सागरास' या कवितेच्या अोळी निघाल्या. जणू त्या सागरानेच आपली प्रतारणा केली आहे अश्या भावनेने उद्विग्न मनाने कवितेच्या अोळी बाहेर पडत होत्या.

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं । सृष्टिची विविधता पाहूं
तइं जननी-हृद विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठिं वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलों या तव वचनीं । मी
जगदनुभव-योगें बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा प्राण तळमळला

अशी आधी त्या सागराची मनधरणी केली, त्याने आपल्याला परत आणण्याचे भारतभूला वचन दिले होते त्याची आठवण करुन दिली. मग त्याची प्रिय अशी सरिता, तिच्या विरहाची शपथ घातली. तरीही त्या सागराचे मन द्रवत नाही म्हटल्यावर मात्र त्याला आठवण करुन दिली की आपले वचन पाळ नाहीतर काय होईल तुला माहीत आहे; मागे एकदा अगस्ति ऋषींनी एका आचमनात आख्खा सागर पिऊन टाकला होता, तसे पुन्हा होईल अशी भीतिही त्याला घातली.

या फेन-मिषें हंससि निर्दया कैसा । कां वचन भंगिसी ऐसा?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें?
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशीं
तरि आंग्लभूमि-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आतां । रे
जो आचमनीं एक क्षणिं तुज प्याला । सागरा प्राण तळमळला

मंगेशकर भावंडांनी कवितेला चाल लावल्यामुळे आणि गायल्यामुळे गीताला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण का कोणास ठाऊक मला ती चाल कधीच आवडली नाही. त्या चालीत सावरकरांच्या मनःस्थितीचा आणि परस्थितीचा गाभाच हरवल्यासारखा वाटे मला. कदाचित त्याचं कारण असं असेल की पहिल्यांदा मी ही कविता ऐकली आईच्या तोंडून आणि त्याची चाल अगदीच वेगळी होती. सहज गुणगुणल्यासारखी पण कवितेतली आर्तता कायम ठेवणारी अशी ती चाल होती. आई ती चाल सावरकर-भक्त असलेल्या तिच्या वडिलांकडून शिकली होती. आणि लहान वयात त्या चालीचा प्रभाव पडल्यामुळे पुढे मंगेशकर भावंडांनी गायिलेलं गीत कधीच भावलं नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सीम भक्त असलेले आणि स्वतः देशभक्तीचं कार्य केलेले प्रख्यात संगीतकार आणि गायक स्व. सुधीर फडके यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धाचं एकच स्वप्न होतं ते म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या जीवनावर आधारीत चित्रपट काढायचा. त्यासाठी प्रसंगी प्रकृती साथ देत नसतानाही गाण्याचे कार्यक्रम करुन चित्रपटनिर्मितिसाठी सागणारा निधी गोळा करायचं काम बाबुजी करतच राहिले. चित्रपटाचं काम सुरु झालं, पण बाबुजींच्या स्वप्नाला साकार करण्याइतक्या आणि सावरकरांच्या स्मृतीला न्याय देण्याइतक्या दर्जाचं काम होईपर्यंत बाबुजी चित्रीकरण करतंच राहिले. शेवटी-शेवटी तर जणू त्यांनी मृत्यूला शपथ घातली असावी आणि मृत्यूचीही हिंमत झाली नाही त्यांना हात लावायची. बाबुजींनी चित्रपट पूर्ण झाल्याचं डोळेभरुन पाहिलं आणि काही दिवसांतच त्यांची जीवनज्योत मालवली.

चित्रपटात बाबुजींनी स्वतः हे गीत म्हटलं आहे. साथीला मला वाटतं फक्त हार्मोनियम. पण बाबुजींच्या तोंडुन ते गीत बाहेर पडायला लागलं आणि मी केव्हा त्याच चालीत गुणगुणायला लागले मलाही कळलं नाही. अचानक माझ्या लक्षात आलं, लहानपणापासून जी चाल डोक्यात बसली होती, ती हीच! म्हणजे आजोबा, बाबुजी - थोडक्यात त्या पिढीची ती चाल होती. मला स्वतःला तीच चाल या कवितेला पूर्ण न्याय देते असं वाटतं.

जोगिया (गदिमा) - गजानन दिगंबर माडगूळकर या एका व्यक्तीने मराठी साहित्यात जितकी, जितक्या प्रकारची आणि ज्या दर्जाची भर घातली तशी दुसरी कोणतीही व्यक्ती डोळ्यांपुढे येत नाही. काय लिहिलं नाही गदिमांनी? कथा, आत्मचरित्र, कविता, चित्रपटासाठी तर कथा-पटकथा-संवाद-गीतं सगळं काही. आणि या सगळ्यांचा मुकुटमणी म्हणजे 'गीत रामायण', ज्याचं भाषांतर प्रत्येक भारतीय भाषेत झालं! कोणत्याही साहित्यकाराने केवळ तेवढी एकच साहित्यनिर्मिती केली असती तरी तो महान ठरला असता! मग गदिमांना तर काय म्हणावं? सरस्वतीचा आशीर्वाद घेऊनच ते जन्माला आले असावेत. शब्द जणू त्यांच्यासमोर हात धरुन उभे असावेत, कधी आपला उपयोग या आधुनिक वाल्मिकींना होईल याची वाट बघत.

अश्या या शब्द आणि भाव सम्राटाच्या 'जोगिया' नावाच्या कवितासंग्रहात पहिलीच कविता आहे - 'जोगिया'. देहविक्रय करुन आणि लोकांचं मनोरंजन करुन आपल्या पोटाची खळगी भरणाऱ्या एका गणिकेच्या आयुष्याची कहाणी. आपल्यालाही मन आहे, भावना आहेत याचा जणू या बाजारात तिला विसर पडलाय. आलेला प्रत्येक माणूस केवळ एकच इच्छा घेऊन आपली माडी चढतो हा आजवरचा अनुभव. अचानक एके दिवशी तिच्याकडे एक तरुण येतो आणि तिला पाहून म्हणतो की माझी तुझ्यावर प्रीति जडली आहे. हे असं कधी आजवर घडलंच नाही! त्यामुळे हसून ती गणिका त्यालाही इतरांसारखाच समजून त्याच्यासाठी विडा करायला घेते आणि म्हणते की थोडा दाम वाढवा आणि या पुन्हा. हे ऐकताक्षणी तो तरुण निघून गेला - इतका अचानक की पानावर लावायला घेतलेला बोटांवर चुना असलेला हातही थबकतो. एका क्षणात त्या गणिकेला आपण काय गमावलं याची जाणीव होते. तिला तर त्याचं नावही माहीत नसतं, पण तरी वेड्या आशेनी तो परत येईल म्हणून त्याची वाट पहात राहते. जणू भांगेत तुळस लावायला कृष्णच दारी येऊन जावा आणि आपण त्याला अोळखूही नाही या जाणिवेने तिच्या अंतरंगी जोगिया झंकारायला घालायला लागतो.

कवितेच्या सुरुवातीला केवळ चार अोळींत गदिमांनी नुकत्याच संपलेल्या तिच्या मैफिलीचे वर्णन कसे केले आहे पहा -

कोन्यांत झोपली सतार, सरला रंग,
पसरली पैंजणें सैल टाकुनी अंग,
दुमडला गालिचा, तक्के झुकले खालीं,
तबकांत राहिले देठ, लवंगा, सालीं.

दुसऱ्या कोणाला पानभर लिहूनही जे जमलं नसतं ते चित्र गदिमा चार अोळींत उभं करतात. कवितेच्या शेवटी आपण काय गमावलं आणि एका सच्च्या प्रीतीचा उपमर्द केला याची जाणिव झालेली ती गणिका आपल्या परीने त्या प्रेमिकाची मनोमन पूजा करते, तिला माहित असलेल्या मार्गानेच.

तो हाच दिवस हो, हीच तिथी, ही रात,
ही अशीच होत्यें बसलें परि रतिक्लांत,
वळुनी न पाहतां, कापित अंधाराला,
तो तारा तुटतो - तसा खालती गेला.
हा विडा घडवुनी करितें त्याचें ध्यान,
त्या खुळ्या प्रीतिचा खुळाच हा सन्मान;
ही तिथी पाळितें व्रतस्थ राहुनि अंगें,
वर्षांत एकदां असा 'जोगिया' रंगे.

'घरकुल' चित्रपटासाठी रामचंद्र चितळकरांनी कवितेला अतिशय सुंदर चाल दिली. त्या गणिकेचं आधीचं जीवन, त्या निरागस प्रेमिकाची प्रेमाची साद, नकळत तिच्या हातून त्याची झालेली चेष्टा, नंतर लक्षात आल्यावरची तिची तडफड, पश्चात्ताप आणि शेवटच्या अोळींमधली तिची मानसपूजा - सगळं अगदी नेमकेपणानी समजून ही कविता चितळकरांनी गीतबद्ध केली आहे. चालही अशी की जणू ती गणिका आपलं आयुष्य या कवितेमधून गुणगुणून सांगते आहे. फैयाजनी गीताला अगदी पूर्ण न्याय दिलाय! शब्द आणि त्यामागचे भाव समजून, त्या गणिकेच्या मनातला जोगिया आपल्यासमोर मूर्तीमंत उभा केला आहे.

आता परत वाचताना लक्षात येतंय, कितीतरी आवडीच्या कविता, ज्यांची सुंदर गीतं बनली - त्याबद्दल लिहायचं राहूनच गेलं! बोरकर, भा. रा. तांबे, आरती प्रभू, सुरेश भट, महानोर - हे सगळे कसे राहिले? परत कधीतरी यांच्या एखाद्या तरी कवितेबद्दल लिहायलाच हवं!

प्रकार: 

खुप खुप सुंदर लिहितीयेस! सकस आणि सरस !
अजुन सगळा लेख वाचून व्हायचा आहे, पण तरीही लिहिल्याशिवाय राहवेनाच. अत्यंत आवडता विषय आणि त्यावर लिहीणारी तू हे मस्त काँबिनेशन आहे Happy लेखाची प्रस्तावना म्हणजे तर आपल्या पिढीच्या मराठी गाणी आणि कविता आवडणार्‍या सर्वांचं उत्तम प्रातिनिधीक मनोगत आहे.

थांबू नको प्लीज, अजुन भरपूर अपेक्षित आहे. वाट बघतेय.

व्व्वाह.... मस्तं लिहिले आहे...

माझं प्रचंड आवडतं गाणं... अजुनी रुसुनी आहे..
मी पण आजपर्यंत रुसलेल्या प्रियेची समजूत काढण्यासाठी केलेले काव्य असेच समजत होते..
पण काव्याची पार्श्वभूमी खरचं हेलावून टाकणारी आहे...

लेख आवडला.. Happy

सहिच लिहीलेस प्रिया.....खरेच एक सहज, सुंदर आणि समृध्द लिखाण.......... Happy

खूप खूप आवडले.........पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत...... Happy

छान लिहिलेयस. खूप आवडलं. लहानपणापासून ह्या सगळ्या कविता अतिशय सुंदर सूर लेऊन गाणी म्हणूनच सामोर्या आल्या, आवडत आल्या आहेत. त्यांच्याविषयी इतकी सारी छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार! Happy
अशाच अजून अनेक अनेक कविता-गाण्यांवर वाचायला आवडेल. वाट बघतेय पुढच्या लेखाची. Happy

वा वा वा वा काय सुरेख लिहिलंय मराठी कवितांबद्दल, गाण्यांबद्दल, कवींबद्दल.....
तसंच सुरेल चालींबद्दल - फारच छान - एखाद्या अति सुरेल, अति तरल मैफिलीचाच अनुभव दिला या लेखाने......
मनापासून धन्यवाद....

पं. हृदयनाथ मंगेशकर जेव्हा सारेगमपचे परिक्षक होते तेव्हा कमलाकर सोनटक्केंचा एक टीकात्मक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यांच्याही मते मंगेशकरांची चाल ही वीररसप्रधान आहे जी तिथे अपेक्षितच नाही. हे वाचेपर्यंत मला त्या चालीबद्दल अशा प्रकारची जाणीवही झालेली नव्हती. पण नंतर मात्र 'वीर सावरकर'मधली बाबूजींची ( खरंतर पारंपरिक) चाल समर्पक आहे हे पटलं.

फैयाजांची जोगिया मी अजुन ऐकलेली नाही, आता मिळवायला हवी कुठून तरी.

पुढचा बेत काय आहे? तुझा विचार चालू आहे की आम्ही सुचवायचे आहे? यासंदर्भातले असंख्य विषय आहेत ज्यावर तू अनंत लिहू शकशील. तू पायात एक गोंडस पिल्लू सोडलंयस, आता ते सतत तिथेच घोटाळत राहील Happy

मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या प्रतिक्रिया कायमच मला प्रोत्साहन देत असतात. मायबोलीवर लिहिणं तसं माझ्यासाठी नवीनच आहे पण सगळी आपलीच माणसं असल्यामुळे धीर येतो.

सई, माझं दुसरं एका विषयावर लिखाण सुरू होतं पण ते वेगळ्या माध्यमासाठी. डोक्यात तसे दोन-चार विषय घोळताहेत, पण माझ्याहातून लिहून होईल असं वाटत असेल तर जरूर विषय सुचवा, त्या निमित्ताने कदाचित एरवी माझ्या डोक्यात आला नसता अश्या विषयावर लिहून होईल. माझ्याकडे घरकुल ची VCD आहे. मी iTunes मधून ते गाणे विकतही घेतले. VCD मधून काढून घेऊन पुढे त्यावर संस्करण करणे कधीकधी कंटाळवाणे वाटते.

सई - आत्ताच जरा शोधलं तर http://www.hummaa.com/music/song/konyat-zopali-satar/130379# इथे ऐकायला मिळतंय.