खान्देशी लोणचे!

Submitted by मी_आर्या on 31 May, 2011 - 02:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

परवाच आईला सोबत घेउन लोणचे केले. आईच्या हातचे लोणचे आमच्या आख्ख्या फॅमिलीत प्रसिद्ध आहे. इथे पुण्यातही कॉलनीत, ओळखीच्यांकडे असे कुठुन कुठुन तिला बोलावणे असते लोणचं टाकण्यासाठी. एकदा तर बहिणीने नाशिकहुन फोन करुन ऑनलाईन लोणचे घातले होते. त्याची चवही अप्रतिम आली होती. Happy
सगळी कृती आईचीच...मी फक्त हेल्पर.

एकाच गोष्टीबद्दल माफ करा लोक्स. लोणचं (ऑफीसातुन संध्याकाळी घरी गेल्यावर) रात्री टाकल्याने फोटो म्हणावे तितके चांगले आलेले नाहीत.

साहित्यः
कैर्‍या: १० किलो
मीठः दीड किलो
गोडेतेलः २किलो
ब्याडगी मिरची तिखटः अर्धा किलो
ब्याडगी मिरची आख्खी: पाव किलो किंवा अंदाजे
मोहरी दाळः ३ पाव
बडीशेपः अदपाव ( एक मध्यम वाटी भरुन)
मेथी: १५० ग्रॅ.
धणे: १५० ग्रॅ.
लोणच्याचा मसाला:
हिंगः २ चमचे
चक्रफुल (७-८), दालचिनी(८-१०, बोटाच्या एका पेराएवढी), मिरे(१८-२०), लवंगा(२०), सुंठ (बोटाच्या पेराएवढे २ तुकडे), मसाला वेलदोडे १०. हा सगळा मसाला थोडा जाडसर कुटुन.जायफळ (एक तुकडा) व हिरवे वेलदोडे (१०-१२), ४ चमचे साखरेबरोबर मिक्सरमधे बारीक करुन

क्रमवार पाककृती: 

सर्वप्रथम कैर्‍या दोन दिवस पाण्यात भिजत ठेवाव्यात. नंतर व्यवस्थित कोरड्या पुसुन सुड्याने(कैरी फोडण्याची विळी) फोडी करुन घ्याव्यात. आतला गर इ. काढुन टाकुन कैरीच्या फोडीसुद्धा पुसुन घ्याव्यात.

kairi
नंतर फोटोत दाखवल्याप्रमाणे आणि प्रमाण दिल्याप्रमाणे सगळे जिन्नस कढईत टाकावे.

masala
गोडेतेल गरम करुन (कडकडीत पण उकळते नको) ते यात हळुहळु टाकावे...म्हणजे लाल तिखट खरपुस भाजले जाते आणी छान लाल रंग येतो शिवाय चवीतही फरक पडतो. ब्याडगी आख्खी मिरची तव्यावर थोड्या तेलावर भाजुन घ्यावी आणि यात कालवावी.

tel
सर्व जिन्नस एकत्र करुन थोडा वेळ मुरु द्यावे. नंतर कैर्‍यांवर पसरवत जावे.
mix

mixture
एका बाजुला लोणच्याची बरणी (खरं तर चिनीमातीचीच घेणे सोयिस्कर, पण मी इथे सुरवातीला प्लॅस्टीकच्या बरणीत भरलय), व्यवस्थित पुसुन घ्यावी आणि मगच त्यात लोणचे भरावे.
baran1

फोडींच्या वर तेल येइल इतके तेल असावे.
barani
बरणीला वरुन नाडी असलेला कपडा बांधतात, त्याला 'दादरा' म्हणतात आमच्याकडे.
कैर्‍यांना नंतर मीठामुळे पाणी सुटत जाते. म्हणुन ८-१० दिवसांनी लोणचं खालीवर करत जावे. आवडत असल्यास गुळ चिरुन घालावा.

अधिक टिपा: 

लोणचं टिकण्यासाठी मीठ आणि बुडतं तेल आवश्यक आहे.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व जिन्नस एकत्र करुन थोडा वेळ मुरु द्यावे. नंतर कैर्‍यांवर पसरवत जावे.>>>>किती मुरु द्यायचे? ४ वर्ष, ५ महिने??? Proud

मस्त Happy दालचिनी, लवंग घातल्याने छान वेगळीच चव येत असेल Happy गुजराथी लोणच्यात पण असते ना दालचिनी लवंग इ?

<<मी मजेत म्हटलं ग, पण लोणचं एकदम तोंपासु कॅटेगरीतलं दिसतंय<<
धन्स..मी ही मजेत घेतेय गं! Proud
अ‍ॅक्च्युअली भावाचा कोपर्‍यात पडलेला कॅमेरा वापरला...घाईघाईत!

<<दालचिनी, लवंग घातल्याने छान वेगळीच चव येत असेल गुजराथी लोणच्यात पण असते ना दालचिनी लवंग इ?<<
हो लाजो आणि जायफळ सुद्धा! कधी कधी मला वाटतं आईचं माहेर गुजराथी गल्लीत होतं म्हणुन गुजराथी पदार्थांची छाप असते तिच्या स्वैपाकात.

हे लोणचे मी खाल्लेय. मसाला घातलेले लोणचे पहिल्यांदाच खाल्लेले. इथे फोटो दिसत नाहीयेत पण पाकृवरुन अंदाज आला. आणि कालच या लोणच्याची चर्चाही झाली घरात. लोणचे लागते एकदम फर्मास पण भयानक तिखट. माझ्या जिभेला एवढ्या तिखटाची सवय नाहीय... पण परत एकदा सांगते, लोणचे महाभयानक मस्त लागते. आणि तिकडच्या कै-याही जरा वेगळ्या असतात, फ्लेशी कमी नी फायबर खुप असते त्यामुळे लोणच्याची फोड बराच वेळ चघळत बसता येते.

<<<लोणचे लागते एकदम फर्मास पण भयानक तिखट. माझ्या जिभेला एवढ्या तिखटाची सवय नाहीय..<<
तिखट नाही गं...तिकडच्या मिरच्याच इतक्या तिखट नसतात. त्यात इथे आम्ही ब्याडगीच वापरलीय नुसतं रंग येण्याशी कारण . Happy

लोणच्याच्या कैर्‍या करकरीत असतात तोपर्यंत आंबट्च चांगले लागते. जरा मुरल्या की गुळ/ साखर टाकावी म्हणजे गोड-आंबट लोणचे छान लागते.
जुन जुलै मधे शाळा सुरु झाली की सुरवातीला आमच्या डब्यात लोणचं पोळीच असायची. लोणच्याच्या खारमधे आणि तेलात भिजलेली पोळी मुद्दाम उरवुन ठेवायची नि संध्याकाळी घरी आल्यावर खायची.
अ प्र ति म चव! Happy

मी मुरलेले खाल्लेय.. ज्यात गुळ वगैरे होते नी तेल एकदम कमी होते. अगं तुझ्या लेखी तिखट नसेल पण मला तरी खुप तिखट लागले. पण खुपच आवडलेले.

मंजुतै.. हे वर्षाचं लोणचं असतं इतक्या कमी प्रमाणात टाकत नाही गं आम्ही. आणि हे आईने दिलेले प्रमाण आहे...तिलाच विचारुन सांगते.

अगं काल तुझ्या ब्लॉगवर हे लोणचे पाहिले. तु इथे टाकलेलेस ते लक्षातच नव्हते. सध्या मौसम आहेच, लगे हाथ हे लोणचे करायला घ्यायलाच हवे.

काय खतरा फोटो आहेत!! विशेषकरून तो बरणीचा वरून घेतलेला फोटो जबरदस्त तोंपासोडणारा आहे!!! Happy

सॉरी लोक्स्...मध्यंतरी चेकच केलं नव्हतं!
कमी प्रमाणात लोणचं घालायचं असेल तर लवकरच जिन्नसांचे प्रमाण सांगते.
त्याआधी आता हे लोणचं कसं दिसतय ते पाहुन घ्या. Happy

loncha2

मी_आर्या फोटो बघून तोंडाला पाणी सुटले. माझी आज्जीपण असच लोणचं करायची...पण त्यात थोडी बडिशेप असायची...एक किलोचे प्रमाण दिल्यास मी पण करुन बघेन...

पाच किलो कैरीसाठी:
बारीक मीठः ३०० ग्रॅ.
लाल तिखटः १५०ग्रॅ.
ब्याडगी मिरची आख्खी: ५० ग्रॅ. देठ काढुन
हळदः २चमचे( पोह्याचा)
हिंगः १ चमचा
मोहरी दाळः ४०० ग्रॅ.
मेथी: २५ ग्रॅ.
धणे: ५० ग्रॅ.
बडीशेपः ५० ग्रॅ.
इतर मसाला: चक्रफुल (३-४), दालचिनी(३-४ बोटाच्या एका पेराएवढी), मिरे(१०-१२), लवंगा(१०-१२), सुंठ (बोटाच्या पेराएवढा १ तुकडा), मसाला वेलदोडे ४-५. हा सगळा मसाला थोडा जाडसर कुटुन.जायफळ (अर्धा तुकडा) व हिरवे वेलदोडे (७-८), २ चमचे साखरेबरोबर मिक्सरमधे बारीक करुन.
गोडेतेलः सव्वा किलो

वा मस्त पाकृ.
खानदेशी खिचडीबरोबर पापड आणि हे लोणचे एकदम ब्येष्ट काँबिनेशन असते. Happy