ओळखीचा पाऊस

Submitted by रीया on 2 March, 2012 - 05:32

"ओळखीचा पाऊस"

अशाच एका संध्याकाळी
पाऊस होता मुसळधार
अनोळखी ही नजर माझी
शोधत होती एक आधार

तोच म्हणे पाऊस अचानक
अनोळखी मज म्हणशी का गं
माझीच सखे अनेक रूपे
तुझाच जणू अविभाज्य भाग

मी ही राणी पोटामध्ये
लखलखणारी वीज ठेवतो
तरीही खोट्या आनंदाने
ढगामधुनी गडगडतो

तू ही अशीच ठेवतेस ना ग
हृदयामध्ये दाबून कळ
हास्य घेउनी ओठांवरती
मनामधले झाकतेस वळ

मीही बघ न जमिनीला
भेटायाला वरून येतो
जाताना मी होऊन रिता
तिला प्रफुल्लीत करून जातो

तुझीही ओंजळ संपून जाते
तुझ्याच सार्‍या लोकांसाठी
तुझी स्वप्ने तुझ्या अपेक्षा
तुझ्या मनाची होते माती

वेदनेचे रूप माझे
ध्वनी रिमझिम रिपरिप गडगड
तुझ्या मनातले भाव लपवीते,
तुझीच सखये अखंड बडबड

माझ्या सार्‍या दु:खाचे
सुंदर इंद्रधनू बनते
तुझ्याही सार्‍या अश्रुंचेही
एक एक कडवे बनत जाते

रंग रूप ही एक आपले
आपण दोघे श्याम सावळे
सांग सखे मग कसे म्हणावे
रूप तुझे माझे वेगळे?

पटले मजला त्याचे म्हणणे
मी हि केला जरा विचार
अनोळखी हा कसा ग मजला?
हाच आहे खरा आधार

तसा आणखी पाऊस हा
नजरेच्या ही परिचयाचा
आकाशातून कोसळताना
कधी पापण्या ओलावायचा

जेंव्हा जेंव्हा येतो पाऊस
तेंव्हा आता हुरूप येतो
दर्पणाची मग नसते गरज
मलाच माझे रूप दावतो

मी ही आता न चुकता
पावसाची वाट पाहते
आनंदाने मनापासुनी
त्याला माझी साथ देते

पावसाला नवी सखी अन
मला नवासा मित्र मिळाला
आता आम्हा दोघांचा ही
एकटेपणा दूर पळाला

-प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस

गुलमोहर: 

____________________/\____________________ >>>
भुंग्याबरोबरच माझाही प्रणाम स्वीकार करावा !!!

पाऊस आनि "मी" ची तुलना आवडली. Happy

तरीही खोट्या आनंदाने
ढगामाधुनी गडगडतो >>> ढगामधुनी हवंय का ते?? घाई घाईत टाईप केली होती का?

व्वा .... पाऊसप्रेमींना अत्तापासूनच पावसाचे वेध लागलेत Happy
चांगली जमलेय कविता.
----------------------------------------------------------------------------------------
एक प्रांजळ, वैयक्तिक मत : कवितेतील इतर शब्दांचा विचार करू पाहता
’मज’, ’मजला’, ’मनीची’ ’मुखीची’ अशा शब्दांऐवजी सहज साधे शब्द;
एकूण बाजाला अधिक समर्पक वाटले असते असं वाटतं.
-----------------------------------------------------------------------------------------

सख्ये योग्य नाही.
भुंग्याने म्हटल्याप्रमाणे 'सखे', सखये' ही सखीसाठी असलेली संबोधने योग्य आहेत.
यातील 'सखे' हा शब्द इथे जास्त योग्य असेल असे वाटते.

रियु, आता मग एवधे केलेस बदल तर अजून एक : "सख्ये" ते सखये की सखे असं हवय का???
>>>
मी स्वतःच क्न्फ्युज आहे
सख्ये कि सखये कि सखे???
नक्कि काय हवय??
सखे असावे बहुदा

कवितेतील इतर शब्दांचा विचार करू पाहता
’मज’, ’मजला’, ’मनीची’ ’मुखीची’ अशा शब्दांऐवजी सहज साधे शब्द;
एकूण बाजाला अधिक समर्पक वाटले असते असं वाटतं.

>>>>

मला दुसरे बसणारे शब्द सापडलेच नाहित Sad

क्रुपया सुचवावेत

खूप छान!!!
"माझ्या सार्‍या दु:खाचे
सुंदर इंद्रधनू बनते
तुझ्याही सार्‍या अश्रुंचेही
एक एक कडवे बनत जाते " क्या बात है!!!

मस्त...
फक्त मिलिंदाने सांगितल्याप्रमाणे ते 'सख्ये'चं सखे करुन घे . सखये पण चाललं असतं, पण इथे त्यामुळे लय तुटतेय Happy