’जनगणमन ’,रविंद्रनाथ टागोर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर

Submitted by दामोदरसुत on 26 January, 2012 - 07:29

आज प्रजासत्ताक दिन! तो प्रजासत्ताक झाला स्वातंत्र्यप्राप्तीमुळे! स्वातंत्र्य मिळाले ते सशस्त्र क्रांतिकारक, जहाल, मवाळ, समाजसुधारक अशा सर्वांच्या प्रयत्नांमुळे! या प्रजासत्ताकाचे राष्ट्रगीत होण्याचे भाग्य ज्या काव्याच्या वाट्याला आले त्या ’जनगणमन ’ ची शताब्दी नुकतीच धूमधडाक्यात साजरी झाली. त्याचवेळी ’वंदेमातरम’ या गीताचीही आठवण झाली; आणि जाणवले की ’जनगणमन’ चे भाग्य त्याच्या रचनाकाराच्या भाग्याशी तर ’वंदेमातरम’चे विधिलिखित क्रांतिकारकांच्या विधिलिखिताशी जोडले गेले आहे.
आणी म्हणून आठवण झाली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले रविन्द्रनाथांचे अभिनंदन !
रविंद्रनाथ टागोर (कि ठाकूर?) यांना १९१३ चे नोबेल प्राईज़ मिळाल्याचे अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या सावरकरांना कळले त्यावेळी ते कातड्याचे सोधणे गुंडाळून कोळसे भरण्याचे काम करीत होते. {त्याकाळी सर्वत्र कोळशावर अवलंबून असणारी बाष्पयंत्रे [स्टीम ईंजिने] वापरली जात.} एका श्रेष्ठ भारतीय कवीला हा सन्मान मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी ’रविंद्रनाथांचे अभिनंदन’ या शीर्षकाची कविता रचून त्यांचेकडे पाठवली. ’सावरकरांची कविता’ या (इ-बुक) संग्रहात ती ४०वी आहे. जिज्ञासूंनी ती मुळातून संपूर्ण वाचावी. त्या कवितेत ते म्हणतात-
हा घुमे जय कैंचा
भारवी कालिदासांच्या
धरि अधृत मान मुकुटाचा ! का रवी?
मलधूम कोळशांतुनिया
सोधणे चर्मि उडवुनिया
मी राजकवे तव विजया ! साजवी

पुढे कवितेत ते म्हणतात, “ भारतमाता आपली राजधानी परत जिंकून घेण्यासाठी वाफेवर चालणार्‍या इंजिनातून निघाली. मीही तारुण्यसुलभ उत्साहाने माझी वीरश्रीने भरलेली गीते घेऊन तिच्याकडे गेलो, तर ती म्हणाली, ’माझ्याकडे वीरगीते रचणार्‍या व गाणार्‍यांची मुळीच उणीव नाही. उणीव आहे ती बाष्पयंत्रावर चालणार्‍या माझ्या रथाला गती मिळावी म्हणून स्वतः कोळसे होऊन जळून जाणार्‍यांची. तर तू तेथे जा.’ तिच्या आज्ञेप्रमाणे महाकवी होण्याची माझी आकांक्षा बाजूला ठेवून, मी हे दुसरे कर्तव्य स्वीकारले.”
सशस्त्र क्रांतिकारकांच्या पराक्रमामुळेच बलाढय व मुत्सद्दी ब्रिटिश सरकार अधिक क्रांतिकारक निर्माण होऊ नयेत यासाठी क्रांतिकारकांचा कठोरपणे पूर्ण बीमोड करायचे. पण त्याचबरोबरच, निःशस्त्र चळवळी करणार्‍यांच्या कांही मागण्यांबाबत वाटाघाटी सुरु करून त्यापैकी थोडया मान्य करीत असे. अशा तऱ्हेने भारतमातेचा रथ स्वातंत्र्याच्या दिशेने ढकलण्याचे फ़ार मोठे काम, स्वातंत्र्यसंग्रामाच्या प्रखर वणव्यात कोळश्याप्रमाणे जळून जाणाऱ्या क्रांतिकारकांनी केलेले आहे.
पुढे ते म्हणतात- ”भारतमातेने स्वतंत्रता देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी जो यज्ञ आरंभला त्यावेळी यज्ञाची पूजा करताना गुलाबाची एक कळी यज्ञात वाहिली, तर दुसरी स्वतःचे केसात खोवली, त्यामुळे ती पूर्ण उमलू शकली. त्या कळीच्या गौरवात समस्त गुलाबपुष्पांचाच गौरव झाला आहे. त्यामुळे यज्ञात वाहिलेली ही कळी तुमचे अभिनंदन करीत आहे.”
पुढे ते म्हणतात- ”महाकवी होऊन पूजेतील तोरण होण्याची माझी आकांक्षा होती, पण चंदनाप्रमाणे झिजत राहून देवतेच्या अंगाचा दाह कमी करण्याचे काम माझ्या वाटयाला आले.”
सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा किती विलोभनीय पैलू आहे हा? दुसर्‍यांच्या प्रतिभेलाही दाद देणारा व प्रतिकूलतेचे हलाहल पचवणारा!

गुलमोहर: 

शीर्षक चुकिचे वाटते.
बाकी माहिती उद्बोधक आहे. पण फक्त वरील माहितीवरून काही जण असेही म्हंटतील की "सावरकरानी रविन्द्रनाथांचे निखळ अभिनंदन केले नाही".

सुसुकुजी,
'महाकवी होण्याची महत्वाकांक्षा , क्षमता , त्या क्षमतेची जाणीव आणि आत्मविश्वास असलेल्या व्यक्तिने केलेले अभिनंदन आहे हे!' 'स्वयमेव मृगेंद्रता' असे ज्याचे व्यक्तिमत्व त्याने काव्यक्षेत्रात ज्याच्या मृगेंद्रतेला जागतिक मान्यता मिळाली आहे अशा टागोरांना भारवी, कालिदासादीकांच्या पंक्तीत बसविले आहे. अंदमानातून त्यांना स्वताविषयीही रविंद्रनाथांना काही सांगावासे वाटले तर त्यात गैर काय आहे?
एक माहिती अशी आहे की नंतरच्या काळात केव्हांतरी शांतिनिकेतनात सावरकरांच्या साहित्यावर (जे प्रामुख्याने मराठीत आहे.) चर्चाही झाली होती. याविषयी नेमकी माहिती कोणास असेल तर त्यांनी कृपया द्यावी.

छान

लेख फार काही सांगून जाणारा वाटला नाही त्यापेक्षा संपूर्ण कविता दिली असतीत तर परिणाम जास्त झाला असता
असो ; माझ्या मते सावरकरांच्या कवितांवर मी काही बोलावं अशी योग्यता माझ्यात नाही. पण संत ज्ञानेश्वरानांतर आजपर्यंत सावरकरांइतका जातिवंत प्रतिभावंत महाकवी मराठी मातीत अजूनतरी जन्माला आला नाहीय हे मात्र नक्की
सुसुकु :तुम्हाला जर असं म्हणायचं असेल तर बिनधास्त म्हणा ना !...........काही जण असेही म्हंटतील की>>>>असं पाल्हाळ लावायची काय गरज ?

प्रतिसादाबद्द्ल सर्वांना धन्यवाद!
वैभवजी, संपूर्ण कविता देता आली असती. पण जरी ती दिली तरी सावरकरांच्या कविता अतिशय संस्कृतप्रचूर असल्याने फारच थोडे लोक ती पूर्ण वाचण्याची शक्यता वाटली. त्यामुळे ती कोठे वाचता येईल तेवढी माहिती देऊन कवितेचा आशय पोहोचविण्याचा प्रयत्न केला. त्या आशयातही सावरकरांनी स्वताला स्वातंत्र्यसंग्रामात कसे जाणूनबुजून झोकून दिले होते आणि त्यापायी त्यांना ज्या यमयातना सोसाव्या लागत होत्या त्याकडे ते कसे पाहात होते ही गोष्ट माझ्या मनाला भिडली म्हणून मायबोलीवर लिहिली इतकेच! लेखाद्वारे त्यापलिकडे कांही सांगायचे होते असे नाही. खरे तर अशी कांही कविता त्यांनी अंदमानातून पाठवली हेच फार थोड्या लोकांना ठाऊक असेल. त्या नरकपुरीतही सावरकरांच्या प्रतिभेने जी शिखरे गाठली आहेत ती स्तिमित करणारी आहेत. त्यांच्या बेडी, सायंघंटा, मरणोन्मुख शय्येवर, हे निद्रे या कविता अवश्य वाचाव्यात.

<<<तुम्हाला जर असं म्हणायचं असेल तर बिनधास्त म्हणा ना !>>>

नाही हो, असे म्हणायचे अजिबात नाही आहे. चु.भु. दे.घे.

ज्या समर-बाष्परथकक्षी।
चिरविवासिता कम लाक्षी ।
भारती राजधानीसी । परतते ॥
घनदाट भाट बंदीचा ।
सुस्वरात सुस्वर साचा ।
कोलाहल रणघोषांचा । क्रांतिच्या ॥
मी तरुण धृष्टतेसरशी ।
‘जावोचि’ वदे त्या कक्षी ।
ही वीरगीतिही माझी । ऐकिली ॥
कविकक्ष पूर्ण हा माझा ।
परि उणीव तेथे जा जा ।
क्रांतिच्या बाष्पयंत्राचा । कक्ष तो ॥
देवीची आज्ञा ऐशी ।
मलधूम कोळशामाजी ।
त्या अग्निप्रेरक कक्षी । मी खपे ॥
हा आज घुमे जय कैची ।
भारवी कालिदासाचा ।
धरी अधृत मान मुकुटाचा । का रवी ।
मलधूम कोळशातुनिया ।
सोधणे चमि उडवुनिया ।
मी राजकवे तंव विजया ।
साजवी ॥
तद् यज्ञागारी जेथे ।
ऋत्विग्वर बसले होते ।
हवनाहि वीतिहोमाते । अर्चिता ।
अलकात खोवुनि एका ।
करि अन्य गुलाबी कलिका ।
ये यज्ञपूजना देखा । भारती ।
निजदास्यमोचना माता ।
बद्धांजलि मधली हाता ।
ती कळी दीप्तदहनीं त्या । अर्पिते ॥
घे प्रफुल्लता निजगंधी ।
भ्रमराची भुलवी मांदी ।
कळी दुजी गुलाबी परि ती ।
अलकिची ॥
भावूनि तद् यशाचा की ।
अलिपुंज-गुंज त्यामाजी ।
परिणती गुलाबत्वाची । आपुल्या ॥
अलकिंच्या गुलाब फुलत्या ।
रे खुलत्या फुलत्या तुज त्या ।
अभिनंदी दहनात्तुनि त्या । ती कळी ॥
किती चंदन तोरण हारी ।
हे या नव देवद्वारीं ।
दिव्यार्थ किति कलाकुसरी । सूचवी ॥
कंचनी खनियले कोठे ।
रत्नात जडविले कोठे ।
मधुकुसुम मालिका डुलते ।
नव नवी ॥
ह्या पुण्यदिन उष:काली ।
पूजेची दाटी झाली ।
त्या वानित्ति शत नरनारी । तोरणा ।
देवळात जगदंबेचा ।
हरु ताप पुजारी तीचा ।
लघुखंड उगाळी साचा । चंदनी ॥
झिजझिजत सहाणेवरती ।
लघुखंड तो तुला देती ।
घे रण्यात तोरणा प्रणती । मानुनी ॥

<<<<हा घुमे जय कैंचा
भारवी कालिदासांच्या
धरि अधृत मान मुकुटाचा ! का रवी?
मलधूम कोळशांतुनिया
सोधणे चर्मि उडवुनिया
मी राजकवे तव विजया ! साजवी
>>>>

सामान्य ओळी वाटल्या.

प्रसाद गोडबोले
धन्यवाद!
बेफिकिरजी,
माझ्यासारख्या संस्कृतबद्दल अगदीच सामान्य माहिती असलेल्या वाचकालाही कोणाच्याही मदतीशिवाय कळतील अशा कवितेच्या मूळ चार ओळीतरी लेखात असाव्यात म्हणून रविन्द्रनाथांच्या विजयाचा आनंद त्यांनी कसा व्यक्त केला त्याचा उल्लेख असलेला भाग ठळकपणे दिला आहे इतकेच. त्या ओळी सावरकरांच्या प्रतिभेची कल्पना येण्यासाठी दिल्या नव्हत्याच.
ज्यात कांहीच तथ्य नसते असे कांहीतरी विपर्यस्त लिहून वादविवादाचा धुरळा कांही जण जाणून बुजून उडवितात असे मला वाटते. तो टाळता येईल तितका टाळण्याचा आपण प्रयत्न करूयात!

समयोचित लेख, माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
संपूर्ण कविता दिल्याबद्दल "भूत" यान्नाही धन्यवाद Happy

>>> सामान्य ओळी वाटल्या. <<<<
वाटणारच्च! एसी हापिसात बसुन चकचकीत स्क्रिनवर नुस्त्या वाचताना त्या तशाच वाटणार यात नवल ते काय? त्याजरा नीटपणे समजुन घ्यायच्या असतील तर त्या रचताना जे वातावरण/परिस्थिती सावरकरान्चे आजुबाजुला होती त्याचे एकदशान्शाने जरी परिस्थिती तुमचे आजुबाजुला असेल, तरच त्या ओळीन्ची महती तुम्हाला कळू शकेल, तोवर तुम्ही तुमच्या "समजुतीत" रहाण्यास स्वतन्त्रच आहात! नै? Proud