मराठीचं काय होणार?

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

बेफिकीर यांचा मराठीचा अभिमान Uhoh हा लेख नक्कीच विचार करायला लावणारा आहे. लेखातले काही मुद्दे पटले तरी त्यामधे भविष्यात काय घडू शकेल, याबद्दल जे विचार मांडले आहेत ते मला पटले नाही. थोडे पुढे जाऊन मी असे म्हणेन कि त्यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरले तरी त्यामागची कारणे मात्र त्यांनी मांडलेली नसतील. त्यांच्या एकेक विधानाचे मुद्देसूद खंडण करणारा हा लेख नाही. तर मनात आलेले काही वेगळे विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

१. मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्रः
माणसाच्या सामाजिक उत्क्रांतीमधे दोन परस्परविरोधी गोष्टींचा समावेश आहे. पहिली की कुठल्यातरी गटाचा/कळपाचा आपण हा भाग आहोत, त्या गटाशी आपलं नातं आहे हे जाणवणं ही आपली अगदी मूलभूत गरज आहे. परिस्थितीनुसार आपण ते कळप बदलत असतो. पण (सर्वसामान्य माणूस) कळपाशिवाय राहू शकत नाही. आणि दुसरी म्हणजे एका ठराविक मर्यादेबाहेर आपण त्या कळपामधे आहोत याची आपल्या जाणीव होत नाही. म्हणजे उदा. जर तो कळप ५००० (हि संख्या फक्त उदा. साठी) च्या पुढे गेला तर आपोआप त्या कळपाचे उपकळप होतात. त्यामुळे
त्याला अभिमान म्हणा काहीही म्हणा पण जितका कळप मोठा, तितकी उपकळपाची भावना जास्त प्रबळ. आजही प्रामुख्याने हिंदी बोलणार्‍या राज्यात जाऊन पहा. मी भोजपुरी आहे, मी बिहारी आहे अशा भावना नष्ट झाल्या नाहीत. प्रामुख्याने ख्रिस्ती असणार्‍या अमेरिकन समाजात मी कॅथॉलिक आहे, मी प्रॉटेस्टंट आहे, मी इव्हेंजलीकल आहे, मी बॉर्न अगेन आहे, मी युनायटेड मेथॉडीस्ट आहे हे चालूच आहे. त्यामुळे सगळे इंग्रजी बोलायला लागले, जरी अगदी मराठी भाषा नष्ट झाली तरी आपण मराठी आहोत किंवा महाराष्ट्राचे आहोत ही भावना नष्ट होणार नाही.

२. अर्थ एव प्रधानः
हा मुद्दा वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येईल. किंवा वरचा मुद्दा १ नेहमीच का खरा ठरत नाही, सगळेच उपकळप टिकून का रहात नाही याचं हे कारण.
२-१) इस्त्रायल या देशात ९९% लोकांना ईंग्रजी चांगली बोलता येते. प्रत्यक्ष इस्त्रायलमधे गेलात तर हिब्रू भाषेचा अभिमान म्हणून हिब्रूतच बोला असे अजिबात दिसत नाही. पण म्हणून हिब्रू मेली नाही. हिब्रू टिकून आहे कारण त्यांना संस्कृतीचा नक्कीच अभिमान आहे पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे पैसे आहेत. तिथल्या ग्राहकांपर्यत पोहोचण्यासाठी त्या भाषेशी / संस्कुतीशी निगडीत परस्परावलंबी पर्यावरण संस्था निर्माण झाली आहे जी भाषा टिकून ठेवते आहे.
२-२) अमेरीकेत सरसकट इंग्रजी बोलली जाते. स्पॅनीश बोलणारे आर्थिकदॄष्टया गरीब आहेत. लाखो लोक बेकायदेशीरपणे रहातात. इतकेच नाहि तर आपण स्पॅनीशच बोलत राहिलो तर गरीबच राहू, त्यासाठी इंग्रजी बोलले पाहिजे याची त्यांना जाणीव होते आहे. पण काही वर्षांपूर्वी जनगणनेत असा शोध लागला की स्पॅनीश बोलणारे ज्या प्रमाणात वाढताहेत, त्यामुळे काही वर्षांनी ती मुख्य भाषा असणार आहे. सहाजिकच बाजारपेठेला एक मोठा ग्राहकवर्ग दिसायला लागला आणि स्पॅनीश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या भाषेवर आधारीत टिव्हि , रेडीयो चॅनेल्स इत्यादी परस्परावलंबी पर्यावरण संस्था निर्माण झाली, जी पुन्हा स्पॅनीश टिकून ठेवायला मदत करते.
२-३) मराठी बोलणारे ७-८ कोटी लोक आहेत. जितके लोक इटालियन बोलतात त्यापेक्षा जास्त लोक मराठी बोलतात. युरोपात इतक्या आजुबाजुला विविध भाषांची आक्रमणे होत असतानाही इटालियन टिकून आहे. मराठी भाषिकांकडे पैसा आल्यावर, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजारपेठेला मराठीची जास्त आवश्यकता वाटू लागली. मग टीव्ही चॅनल, त्यांच्यामधल्या स्पर्धा, गाण्याचे कार्यक्रम या "बाजारूकरणामुळेच" अधिकाधिक मराठी व्यक्तींना रोजगार उपलब्ध होऊ लागला. चांगली मराठी बोलता येणे ही आवश्यकता असणारे व्यवसाय तयार होत गेले. मराठी चित्रपटांमधे पैसे आहेत हे कळाल्यावर जास्त मराठी चित्रपट तयार होत आहेत, पाहिले जात आहेत. थोडक्यात धंदा म्हणून "मराठी" वाढते आहे. आणि हे स्वागतार्ह आहे. कारण ही "मराठी" फक्त काही समिक्षकांनी गौरवलेली साहित्यकृती नाही. तर अनेकांचा पोटापाण्याचा उद्द्योग आहे. मग भले ते रोजच्या व्यवहारात हिंदी का इंग्रजी का बोलत असेना. त्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी, जाहिरातींच्या जगात वेगळं दिसण्यासाठी का होईना, मराठीचा वाढता आधार घेतला जातो आहे.
२-३)हे मराठीचंच वेगळेपण किंवा मोठेपण अजिबात नाही. किंवा बेफिकीर यांचा मुद्दाच वेगळ्या बाजूने मांडतो. हे त्या त्या प्रदेशात रहाणार्‍या संवादाचे माध्यम आहे. पण त्यामुळेच त्या त्या प्रदेशांमधल्या ग्राहकांपर्यंत जास्त प्रभावीपणे जाण्यासाठी स्थानिक भाषा बाजारपेठेला जास्त महत्वाची वाटू लागली आहे. भारतातल्या प्रसारमाध्यमातल्या कुठल्याही कॉन्फरन्सला हा मुद्दा नेहमी निघतो. इंग्रजी जाहिराती आणि त्यामुळे संपर्क होऊ शकणारे फक्त शहरी भागातले ग्राहक यांच्या तुलनेत स्थानिक जाहिराती आणि शहराबाहेर रहाणारे, आता नव्याने पैसे असणारे ग्राहक जास्त फायदेशीर ठरत आहेत. शहरी भागातसुधा , भाषेचा संस्कृतीचा उपयोग करून जास्त टार्गेटेड ग्राहकांपर्यंत जाणे आवश्यक होते आहे. थोडक्यात गेल्या १०-१२ वर्षात सगळयाच स्थानिक भाषांवर इंग्रजीचे आक्रमण होऊन सुद्धा, त्या भाषांची भरभराटच होते आहे. आणि या लाटेला मराठी कशी अपवाद असेल?
२-४) अमेरिकेत सगळीकडेच इंग्रजी बोलली जाते. पण पुन्हा त्या त्या राज्यातल्या स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी , तिथल्या स्थानिक संस्कृतीकडे लक्ष दिले जाते आणि जितका त्या संस्कृतीचा भाग ग्राहक निर्माण करून देतो तितकी ती संस्कृती टिकवणारी परस्परावलंबी पर्यावरण संस्था वाढत जाते. कधी कधी बाजारपेठेत चालत असेल तर मुद्दाम नसलेली संस्कृतीही तयार केली जाते. उदा Groundhog day

२-५)त्यामुळे मराठी संस्कृती आणि भाषा टिकून राहील याची मला नक्की खात्री आहे. उलट पैसे दिसायला लागल्यावर भूतकाळात गेलेल्या कित्येक रुढी पुन्हा परत येताना दिसतात. उदा. कितीतरी जुने "मराठी" दागिने मधे ऐकिवात नव्हते ते आता सरार्स मिळतात. काही मराठी प्रसिद्ध व्यक्तिंवर फारतर पूर्वी डॉक्यूमेंटरी निघाली असती. आता सिनेमा निघतो, तो भरपूर चालतो त्यावरून अजून १० सिनेमे काढायला लोकांना स्फूर्ती मिळते. जे "मराठी" विषय कालबाह्य झाले होते, ते पुन्हा जिवंत होतात आणि त्या संस्कृतीशी नातं सागणार्‍याला परत तो कोण आहे याची जाणीव करून देतात.

जोपर्यंत ७-८ कोटी लोकांपर्यत पोहोचण्यासाठी मराठी हे प्रभावी साधन असणार आहे (आणि त्या लोकांकडे खर्चासाठी पैसे आहेत) तोपर्यंत मला तरी मराठीच्या भवितव्याची चिंता वाटत नाही.

संदर्भ:
1. "Television media: Regional content is preferred more by the Indian
viewers" Report on Vernacular content, Internet and Mobile Association of India, published in Sept 2010
2. "Over 70% internet users prefer to access the net in Indian languages, with English users at just 28%, down from 41% in 2007 ", India online 2008 report, Juxt Consult
3. "English is saturated. We are seeing more consumers from non metros and small towns and we can reach them only through local languages" Author's informal conversation with then CEO of MakemyTrip.com, IAMAI conference, 2007, Mumbai
4.Vernacular Content on The Web – Patterns, Capabilities and Barriers to Consumption Revealed by IAMAI, WATBLOG,
http://www.watblog.com/2009/01/09/vernacular-content-on-the-web-patterns...
5.Internet Untapped Success Lies In Villages & Local Languages, Minister of State for Communications and IT, Sachin Pilot,
http://www.watblog.com/2012/03/16/internet-untapped-success-lies-in-vill...
6. List of languages by number of native speakers
http://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_number_of_native_speakers

प्रकार: 
शब्दखुणा: 

मराठीसाठी बाजारपेठ आहे हे कळल्याने मराठिचा उपयोग वाढण व मराठीसाठी नव्या बाजारपेठा तयार करण हे दोन्ही गरजेचच आहे! रैना म्हणते त्या प्रमाणे "मराठी" भाषेसाठी बाजारपेठ अजुन किति वर्षे शिल्लक राहिल? हा प्रष्ण आहेच. कारण "मराठी" ही भाषा म्हणुन जशी कमकुवत होत जाईल तशी तशी ही बाजारपेठही रोडावत जाईल. मराठीसाठी बाजारपेठ निर्माण करण्याच काम किती होते? हा माझ्या दृष्टिने महत्वाचा प्रष्ण आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर मराठी संगीत नाटकांनी अशी बाजारपेठ १९ व्या शतकात निर्माण केली. नाटक म्हणुन संगीत नाटकांची मराठी बाजार्पेठ लयास गेली पण त्यातल्या संगीताला अजुनही बाजारपेठ आहे. संत साहित्याचेहि असेच म्हणता येइल. हे मुलभुत काम होणे महत्वाचे आहे.

पण इतर अनेक बाबतीत जसे की आर्थीक, वैज्ञानिक व सामाजीक पातळीवर अशी बाजारपेठ बनवणे जमलेले नाही. ह्याचे महत्वाचे कारण ह्या विषयात महाराष्ट्रात मुलभूत काम होत नाही व झाले तरी ते मराठितुन व्यक्त होत नाही. ह्यामुळे अपोआप भाषा म्हणुन मराठिला ह्या विषयात दुय्यम दर्जा येतो.

भविष्यातील "मराठी" भाषेची बाजार्पेठ कशी असेल हे आजच्या धोरणावर व आजच्या "मराठी" म्हणवणार्‍या समाजावर अवलंबून असते/ आहे. आज जर मराठी न लिहिता / वाचता येणारे "मराठी" लोक निर्माण केले तर मराठी कमकुवत होत जाईल अशी शक्यता वाटते. ह्या ठिकाणी कमकुवत म्हणजे गुंतागुंतिचे विचार , सौंदर्य व इतर गोष्टी मांडण्याची असमर्थतता असा घ्यावा.

केवळ बोलिभाषा म्हणुन मराठी जिवंत राहिल इतकिच आपली अपेक्षा आहे का? असे झाले तर हे म्हणजे मराठीचे घड्याळ पुन्हा ९०० वर्ष मागे नेण्यासारखे आहे. तेंव्हा एक २४/२५ वर्षाच्या पोराने ह्या केवळ बोलिभाषेतही गुंतागुंतीचा विचार नुस्ता सांगताच येत नाही तर तो इतक्या विल्क्षण सुंदरतेने सांगता येतो कि ह्या भाषेची अक्षरे अमृताशी पैजा माऋ शकतात हे दाखवून दिले होते....

मराठीला टिकण्यासाठी गरज अशा जिगरबाजांची आहे असे खूप वाटते...

ग्लोबल विलेज आणि चित्रलिपीबद्दल नंदिनीशी सहमत. सध्या स्माइली, नेहमीच्या वाक्यांची संक्षिप्त रूपे प्रचलित आहेत. तीच पुढे लिखित भाषेत सर्वव्यापी होतील असे मलाही वाटते.

ग्लोबल विलेजची भाषा इंग्रजीतून उद्भवलेली असेल असेही वाटते.

बाकी, मूळ लेख, रैना, साजिरा यांचे प्रतिसाद विचार करायला भाग पाडतात.

वृत्तपत्रांचे उदाहरण इथे चुकीचे आहे. इथे भाषेचा कुठलाही संबंध नाही. भारताबाहेर जगात सगळीकडे वृत्तपत्रांचे दिवस भरले आहे. भारतातही हे कधीतरी झाले तर नवल वाटणार नाही.

२००९ या एका वर्षात , १०५ इंग्रजी वृत्तपत्रे बंद पडली.

अमेरिकेत कुठल्या गावात , कधी इंग्रजी वॄत्तपत्रे बंद पडत आहेत याचा तपशीलवार नकाशा.

Newspaper Death watch.: Newspapers are fastest shrinking US industry.

मराठी भाषा किंवा मराठी म्हणजे कोण याच्या व्याख्या काळाप्रमाणे बदलत जाणार. आणि तशा जाव्यात तरच ती भाषा टिकून राहील.

अशी कल्पना करा , १२ व्या शतकातला एक मराठी माणूस सध्याचं शुद्ध मराठी वाचत असेल, तर त्याचा हे मराठी आहे यावर कदाचित विश्वासच बसणार नाही. तो म्हणेल किती कानडी, फारसी, उर्दू, संस्कृत शब्दांची भेसळ करून तुम्ही बोलताहात आणि याला मराठी म्हणतात?

अजून १००-२०० वर्षांनी जे बोललं जाईल त्याला आपण मराठी म्हणणार नाही. पण त्या व्यक्तीच्या दृष्टीने तो मराठीच असेल आणि मराठीत बोलत असेल. (जसे आपण स्वतःला समजतो)

आणि ज्याला आपण इंग्रजी म्हणतो ते इंग्रजीही तसं नसेल हे ही ओघानंच आलं.

एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच जाणवली असेल की मराठी बोलणार्‍यांची भारताबाहेरची टक्केवारी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. अमेरीका, आखाती देश, पूर्वेकडचे देश अशी सर्वदूर मराठी भाषिकांची पसरण झाली आहे. त्यामुळे आपल्या भाषेला मरण येण्याची शक्यता कमी वाटते उलटपक्षी हिंदी, मल्याळी, गुजराथी प्रमाणेच भारताबाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात बोलली जाणारी अजून एक भारतीय भाषा अशी काही वर्षात मराठीची ओळख व्हायला हरकत नाही. Happy

पण व्याकरणाच्या दृष्टीने मराठी चुकीचे बोलण्याचे प्रमाण निश्चितच वाढले आहे. साजिराच्या पोस्टला या बाबतीत पूर्णपणे अनुमोदन. शुद्धलेखन-भाषांतर या चुका माध्यमे सर्रास करतात.

लेख आणि प्रतिसाद दोन्ही आवडले.
भाषा प्रवाहीच असणार याबाबत दुमत नाहीच.
पण मराठीत संवाद साधणे हि मानसिक गरज, यापुढील पिढीत राहिल का ? अशी मला शंका वाटते.
सध्या तरुण मूलांत जी भाषा बोलली जाते, तिला मराठी म्हणणे जरा अवघड वाटतेय.
हि मानसिक गरज टिकावी, यासाठी काहितरी केले पाहिजे. नेमके काय ते मला आता नीट सांगता येत नाही.

माझ्या बाबतीत, मायबोली सोडली (आणि अर्थातच नेटवरची मराठी वर्तमानपत्रे, साप्ताहिक) तर माझा मराठी
बोलण्याशी संबंधच राहिलेला नाही.

प्रथम लेख वाचला तेव्हा मराठी ही भाषा टिकणार हे नक्की हे जाणवलेच

आता सर्व प्रतिसाद वाचले आणि एकाच विषयाचे इतर अनेक कोन समजले

(जसे बाजारपेठ, व्यावहारिक दृष्टीतून होणार्‍या प्रयत्नांमागे भाषाप्रेम असणे / नसणे, वृत्तपत्रांची अवस्था इत्यादी)

हेच प्रथम वाटले नाही हा माझ्या आकलनशक्तीचा अभाव / दोष

आता असे म्हणावेसे वाटत आहे:

तेच जे माझ्या लेखात नोंदवायचा मी प्रयत्न केला की 'आपल्या भाषेचे काय होणार' ही चिंता आपल्याला (आजच्या माणसाला) का असावी हे लक्षात येत नाही (आणि असल्यास त्याचा दोष इतर भाषिकांवर का ठेवण्यात यावा)

पुनरुक्तीबद्दल क्षमस्व

अर्थातच या लेखातील सर्वच विचार व आशावाद पटले व आवडले

(मायबोली हे संकेतस्थळ - तसेच आणखीन काही स्थळे - हे मराठी लोकांना एकत्र बांधून ठेवत आहेत. भाषेच्या जपणुकीसाठी व संवर्धनासाठी हे कार्य फार महत्वाचे ठरेल असे वाटते. )

पण आजचा मराठी माणूस वाढत्या प्रमाणात आपल्या पुढच्या पिढीला व्यवहार्य दृष्टिकोनातून परभाषांचा अभ्यास करायला लावत आहे व यातही त्याचा दोष नाही असे वाटते

धन्यवाद

=====================

अजय यांच्यासाठी एक शंका / प्रश्नः

जसे स्थानिक भाषिकांच्या बाजारपेठेला नजरेत ठेवून माध्यमांमधून फायद्यासाठी काही उपक्रम होत आहेत तसेच याच स्थानिकांना इतर भाषांमध्ये असलेल्या तशाच / इतर उपक्रमांचे वाढीव आकर्षण वाटल्यामुळे 'मराठी माणसालाच इतर भाषा अधिक आवडू लागणे' शक्य नाही का

वृत्तपत्रांच्या बाबतीत जे दिसतेय की पुढची पिढी मराठी वृत्तपत्रे वाचत नाही; तसेच दूरदर्शन वाहिन्या, एफेम यांच्याबाबतीतही होते का?
आंतरजालावर चित्र वेगळे असेल, पण मातृभाषा मराठी सांगणार्‍यांतले आणि आंतरजाल उपलब्ध असलेले यांत मराठी संस्थळावर येणार्‍यांचे प्रमाण किती?

बोलीभाषेपेक्षाही, ज्या भाषेत जास्तीतजास्त लिहीले, वाचले जाते ती भाषा जास्त काळ टिकून राहते. जितके नवीन साहित्य तयार होत राहील, तितके ते वाचले जाईल, त्याचा प्रसार होईल, लोक परत त्याच भाषेच विचार करतील आणि परत व्यक्त होतील. चित्रपट, नाटकं, पुस्तकं ही जितकी जास्त तितकी भाषेची मुळं जास्त खोल.

मला वाटते व्यवहारासाठी जी भाषा वापरली जाते ती अधिक टिकेल किंवा (आर्थिक वगैरे) सामर्थ्यशाली समाजाची भाषा अधिक टिकेल

कारण लिहिले, वाचले जाणारी भाषा, जर ती भाषा बोलणारे संपले तर कशी टिकेल?

दिनेशदाना अनुमोदन. भाषा प्रवाही असणे वेगळे आणि भाषेत बोलणे आणि मुख्य म्हणजे व्यवहार थांबणे वेगळे. भाषेत वेगवेगळे शब्द बाहेरून येणे आणि ते मुख्य प्रवाहात मिसळून जाणे वेगळे. भाषा प्रवाही आहे म्हणून चिंता कशाला करा हे काही पटत नाही. प्रश्न असा आहे कि पुढच्या पिढीला मराठीबद्दल आस्था नसणे आणि त्याहून मुख्य म्हणजे गरज संपणे हा आहे. आणि हेच चिंतेचे कारण आहे.

>जसे स्थानिक भाषिकांच्या बाजारपेठेला नजरेत ठेवून माध्यमांमधून फायद्यासाठी काही उपक्रम होत आहेत तसेच याच स्थानिकांना इतर भाषांमध्ये असलेल्या तशाच / इतर उपक्रमांचे वाढीव आकर्षण वाटल्यामुळे 'मराठी माणसालाच इतर भाषा अधिक आवडू लागणे' शक्य नाही का.

भाषा आवडू लागेल यात शंका नाही. पण त्यातले किती जण पूर्णपणे मातृभाषेकडे दुर्लक्ष करतील? सध्याही जपानी/चिनी/जर्मन भाषा आवर्जून शिकणारे , बोलणारे आहेत पण ते म्हणून त्यांना आधीच येत असणारी हिंदी/मराठी/गुजराती सोडून देत आहेत का?

>वृत्तपत्रांच्या बाबतीत जे दिसतेय की पुढची पिढी मराठी वृत्तपत्रे वाचत नाही;
माझ्या माहितीतल्या आकडेवारी नुसार पुढच्या पिढीचे सगळ्याच भाषेतली "कागदावरची छापील वृत्तपत्रे" (यात हिंदी/ईंग्रजी याही भाषा आल्या) वाचायचे प्रमाण कमी होत आहे. जर तुम्हाला आत्ता जगातल्या बातम्या इतर माध्यमातून मिळत असतील तर २४ तासानंतर ती बातमी छापून येईपर्यंत शिळी झालेली असते. ज्या देशांमधे अजून इतर माध्यमे पुरेशा लोकांपर्यंत पोहोचली नाहीत, त्याच देशांत पर्याय नसल्याने वृत्तपत्रे टिकून आहेत. जी वृत्तपत्रे फक्त बातम्या न देता, विश्लेषण देण्यावर भर देतात ती ही टीकून आहेत कारण असे दर्जेदार विश्लेषण इतर माध्यमात मिळेलच असे नाही.

Screen shot 2012-05-25 at 10.22.59 AM.png

मराठीला मरण नाही. पुणे वॉरीअर्स मेले तरी मुंबईच्या चौपट लायका लायकी नसलेल्या संघाला. लाँग लिव्ह मराठी (माणुस).

अजय, तुम्ही म्हणताय हे transition phase मध्ये लागू होईल. बेफिकीर म्हणताहेत ती (ceteris paribus) utlimate stage आहे. पण अशा ट्रॅन्झिशन फेजमध्ये तुमचे मुद्दे योग्य रित्या लागू होतात.

काय सुंदर चर्चा वाचायला मिळाली, लेख व त्यावरील प्रतिसाद दोन्ही एकाच विषयाला किती वेगवेगळे पैलु असु शकतात हे दाखवुन देत आहेत.....

'मराठीकाका' अनिल गोर्‍यांच्या फेसबुक स्टेटसवरून हा बाफ आठवला. आणि पुन्हा वाचला. बेफिकिरांचाही याच दरम्यान आलेला (आणि अजयच्या मूळ पोस्टमध्ये उल्लेख झालेला) बाफही या निमित्ताने पुन्हा वाचला.

--
Anil Gore
Yesterday at 9:40am ·
इंग्रजीत २६ अक्षरे असून जोडाक्षर प्पाद्धात नाही, म्हणून इंग्रजीत फक्त २६ एकाक्षरी शब्द असून शकतात, तर फक्त ६७६ दोन अक्षरी शब्द असू शकतात आणि त्यातील जेमतेम १०० पेक्षा कमी शब्दांचे गोंधळात टाकणारे भलते, भलते उच्चार होतात तसेच जेमतेम ५० शब्दांना अद्याप अर्थ आहेत. १ ते ५ अक्षरे एकापुढे एक लिहून फारतर ३ लाख अक्षरक्रम होतात आणि त्यातील जेमतेम २० % मांडणीचा तसाच भलता भलता गोंधळात टाकणारा उच्चार होतो तसेच त्यापैकी फार थोड्यांना आजवर अर्थ लाभले आहेत. देवनागरी लिपीत ५२ अक्षरे, त्यातील १६ स्वर असल्याने हजारो एकाशारी शब्द होतात, लखू दोन अक्षरी शब्द होतात आणि १ e ५ अक्षरी शब्दांची संख्या कोट्यवधी आहे, ज्यातील ९० % मांडणीचे नेमके आणि प्रत्येकी एकमेव उच्चार होतात. लेखन आणि वाचन या दोन्हीसाठी यामुळेच देवनागरी लिपी जगात सर्वोत्तम आहे. जगातील हे सर्वोत्तम उत्पादन आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवले आहे. चला, आपण त्याची निर्यात करून समृद्ध, संपन्न होऊ या!
--

परवाच ह्या बाफाची आठवण झाली. मी सध्या ज्या भागात काम करते तो गावाकडे आहे. शहरी नाही.
कामगारांचे असे एक आपले वाच नालय आहे. परवा लंच नंतर पाहिले तर शिस्तीत रजिस्टर मध्ये लिहून नोंदी
करून वगैरे वाचनालयाचे काम चालले होते. दि वाळी अंक , स्वामी वगैरे मेजर कादंबर्‍या ह्यांची
देवाण घेवाण होत होती. मस्त वाटले बघून. मराठी व स र्व उप प्रकार, कोकणी, अगरी पुणेरी ह्यातूनच मेजर
बोलने होत असते.

परतीच्या प्रवासात एक पाटी नेहमी दिसते. : येथे चहापाणी, साखरपुडा, हळदीसाठी होलसेल भावात मट्न मिळेल. तुपगाव प्राथमिक शाळेत मुले खेळत व गाणी म्हणत असतात. शाळा पण अगदी टुमदार छोटी शी आहे.

जोपर्यंत दैनंदिन व्यवहार मराठीत होत आहेत, तोपर्यंत भाषा जिवंतच राहणार. इंटरनेटच्या माध्यमातुन भाषा अधिक वाढिस लागतेय, हे चांगलं लक्षण. Happy

Pages