काज पांडुरंगाचे....

Submitted by पुरंदरे शशांक on 15 April, 2011 - 03:29

काज पांडुरंगाचे....

कटेवरी हात | विचाराल मात | पाहतसे वाट | भक्तांची मी ||

कुठे गेला ज्ञाना | नामाही दिसे ना | टाहो ऐकू ये ना | तुकयाचा ||

आता येथ सारी | गर्दीचीच वारी | नावा वारकरी | उरलासे ||

भक्तीचा जिव्हाळा | नामाचा उमाळा | सकळ लोपला | इये काळी ||

काय उरलेसे | काज ते कोणते | मजलागि निके | कळेचिना ||

परि कोपर्‍यात | दिसे कोणी गात | पूर्ण तो भावात | बुडालेला ||

असोनी आंधळा | भक्तिचा तो मळा | दिसे की फुलला | परिपूर्ण ||

होवोनी तल्लीन | गातसे भजन | पूर्ण एकतान | वांछाहीन ||

तोचि की एकला | दिठीवान भला | येर तो आंधळा | जन वाटे ||

गेला गेला शीण | गेलो विसरुन | पांडुरंगपण | पूर्ण माझे ||

राहे मी निवांत | त्याच्या हृदयात | काज सापडत | माझे मला ||

गुलमोहर: 

वाह.........अप्रतिम रचना....... Happy
<<तोचि की एकला | दिठीवान भला | येर तो आंधळा | जन वाटे ||>>
अश्या त्या एकासाठीच देव अजून तेथे थांबला आहे.......

आशय आवडला .... व्यवस्थित मांडला गेलाय
..... छान
राहे मी निवांत | त्याच्या ह्रदयात | काज सापडत | माझे मला ||
….. हे जास्त आवडलं

आवडली Happy

दाद यांची दाद अगदी नेमकी भावना व्यक्त करते .............

रचना म्हणाल तर ...कुणालाही प्रेमात पाडेल अशी!! .अगदी विठ्ठलाला सुद्धा !!

_________/\______________

गेला गेला शीण | गेलो विसरुन | पांडुरंगपण | पूर्ण माझे ||
राहे मी निवांत | त्याच्या ह्रदयात | काज सापडत | माझे मला ||

सर्वांगसुंदर ......:)

अप्रतिम !
अभंग खूप अप्रतिमच आहे . मी जे देवळात मांडले त्यापेक्षा कितीतरी सुंदर . केवळ अप्रतिम. हेच शिकतोय तुमच्या साहित्यकृतीतून .

फार पूर्वी ऐकलेले
रुक्मिणी पांडुरंगाला विणवतेय की आपण पंढरपूर सोडून जाऊ कारण तुझ्याभोवतालची गर्दी या अर्थाच्या गीताची आठवण झाली . शब्द आठवत नाहीत .