सिनेमा सिनेमा- पुन्हा एकदा

Submitted by शर्मिला फडके on 2 May, 2012 - 00:47

भारतीय सिनेमा शंभर वर्षांचा झाला. आजवर या सिनेमामुळे मनाला असीम आनंद मिळाला. सिनेमांचं ऋण मनावर सुखाचं ओझं ठेवून आहे, ते अंशतःही उतरवण्याची इच्छा नाही मात्र या निमित्ताने आवडत्या सिनेमांवर लेख लिहून निदान कृतज्ञता तरी व्यक्त करणे मस्ट आहे.

मला सिनेमा बघायला आवडतो, त्यावर लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला आवडतं, जो सिनेमा पाहिलेला नाही त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं, जे सिनेमे आवडले नाहीत, त्यांच्यावरही बोलायला आवडतं, ते का आवडले नाहीत त्याबद्दल विचार करायला आवडतं. थोडक्यात सांगायचं तर मला सिनेमा कसाही आवडतोच.

काही सिनेमे बुद्धीने बघायचे, काही नजरेने, काही मनाने. काही उगीचच.
काही सिनेमे कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही, काही सिनेमे नक्की का आवडले हे समजत नाही, समजावूनही देता येत नाही.

प्रत्येकाचा सिनेमा वेगळा, प्रत्येकाकरता सिनेमा वेगळा. एकच सिनेमा एकाला आवडतो, एकाला नाही. आपल्याला सिनेमा का आवडला हे कोणी कोणाला पटवून द्यायला जाऊ नये. दुस-याने सांगून सिनेमा समजत नाही, दुसर्‍याला आवडला म्हणून तिसर्‍याला आवडेलच असं नाही.

सिनेमाला जितका जबरदस्त नॉस्टेलजिया चिकटून असतो तितका इतर कोणत्याच गोष्टीला नाही. सिनेमाचा नॉस्टेलजिया म्हणजे खरं तर तो सिनेमा ज्या दिवसांमधे बघीतला, ज्यांच्यासोबत बघीतला त्यांचा नॉस्टेल्जिया असतो. सिनेमाला आजूबाजूच्या जगाचे संदर्भ चिकटून असतात आणि आवडत्या सिनेमांच्या तुकड्यांसोबतच ते मनात येतात.

सिनेमा आठवतात आणि आवडतात तेव्हा अनेकदा त्यातले तुकडे तुकडेच आठवतात. आवडत्या सिनेमांवर बोलताना किंवा लिहिताना त्यांचं मग एकसंध कोलाज मनात तयार होतं. सिनेमा पॅराडिसोमधल्या त्या शेवटच्या दृश्याप्रमाणे ते विलोभनीय असतं.

सिनेमांमधल्या प्रत्येक आवडत्या गोष्टींचं एक स्वतंत्र युग असतं. एखादं युग दिलिपकुमारचं, एखादं अमिताभचं, कधी ते बिमलदांचं असतं, कधी व्ही.शांतारामांचं.
प्रत्येकाचं वैयक्तिकही एक युग असतं. त्या त्या वयात आपण त्यातून प्रवास करतो.
माझ्याबाबतीत कधी एक युग कृष्ण-धवल सिनेमांचे, इस्टमन कलरचे, प्यासा-कागझ के फूलचे, दिलिप-राज-देव-शम्मीचे, एसजे-खय्याम, रवी, मदनमोहन आणि असंख्य आवाजांचे. दिग्दर्शकांचेही एक स्वतंत्र युग. गुरुदत्त पासून ऋषिकेश मुखर्जीं, बासू चटर्जींचे, बासू भट्टाचार्यांच्या अमर-मानसी ट्रिलॉजीचे, गुलझारचे, सत्यजित रेंच्या चारुलता, पाथेरपांचालीचे..
सिनेमांचे ऋतू वेगळे आणि प्रत्येकाचे त्यातल्या आठवणींचे तुकडेही वेगळे. कुणाच्या कोलाजमधे मधुबाला असते कुणाच्या वहिदा, कधी देवचा स्टायलिश रोमान्स मनात उरतो कधी शर्मिला टागोरच्या खळ्या, स्मिताच्या नजरेचे, अमोल पालेकरच्या साधेपणाचे, राजेश खन्नाच्या हळव्या लुक्सचे काही तुकडे असतात. अमिताभच्या मैं और मेरी तनहाईचे, लालजर्द गालिच्यावर नाचणार्‍या पाकिझाचे, तारोंका जाल मेरे दिल निसार पुछो ना हाल मेरे दिल का.. म्हणणा-या नुतनच्या सावळ्या, प्रसन्न हास्याचे असतात, साधनाच्या विलभनीय साध्या सौंदर्याचे असतात.. तेरा मेरा प्यार अमर, फ़िर क्युं मुझको लगता है डर.. चंद्र आकाशात असतो, दुधाळ चंदेरी प्रकाश तिच्या अंगाखांद्यावरुन निथळत असतो.. कधी त्यात आख्ख्या मोगलेआझमही असतो. त्याचे तुकडे करणंच अशक्य.

ब्लॅक ऍन्ड व्हाईट सिनेमांमधे काहीतरी अनोखी जादू होती.
माझ्या मनातल्या कोलाजवर जास्तीत जास्त तुकडे ब्लॅक ऍन्ड व्हाईट हिंदी सिनेमाचे आहेत, मधाळ आणि मॅजिकल तुकडे.. काळजात रुतून बसलेले, अनाडीतली वो चांद खिला.. मधे चंद्राच्या प्रकाशात नहाणारी नुतन, आणि जाने क्या तुने कही.. म्हणत मान वेळावून मागे पहाणारी वहिदा पहावी तर कृष्णधवलच.
कोलाजमधे ’हम नशे में है संभालो हमे तुम.. असा आसमानावर तरंगणारा लताचा आवाजही आहे आणि त्यासोबतच्या लाखो चमकत्या चांदण्याही आहेत.

पहिला आठवणीतला थिएटरमधे बघितलेला सिनेमा शोले. धुवांधार पाऊस होता आणि मी, माझी बहिण आणि आई थिएटरवर आधी जाऊन उभे होतो, छत्रीतही भिजवणारा पाऊस होता तो, बाबा आणि माझा धाकटा भाऊ, तो तर जेमतेम चार-पाच वर्षांचा, ते नंतर येणार होते. आम्ही आपली वाट बघतोय, भिजतोय, बाबा काही येईनात, सिनेमा सुरु झाला, खच्चून भरलेलं थिएटरचं आवार सुनसान झालं. आम्ही तिघी आपल्या भिजतोच आहोत. आणि मग अर्ध्या तासांनी बाबा आले. भाऊ त्यांच्या खांद्यावर झोपून गेलेला. त्यांना वेगळ्याच थिएटरमधे सिनेमा आहे असं वाटलेलं. ठाण्याच्या पूर्व भागातल्या आनंदमधे आम्ही उभ्या आणि बाबा पश्चिमेच्या वंदना, आराधना सगळीकडे फ़िरुन आलेले. त्यानंतर आईबाबांचं कडाक्याचं भांडण झालं होतं का आठवत नाही, पण त्या दिवशी अर्ध्यातून बघितलेल्या त्या शोलेची एक एक दृश्य मनावर कोरुन आहेत. त्यानंतर पुन्हा आम्ही मिनर्व्हाला ७० एमएमच्या भव्य पडद्यावर शोले पाहीला. मग असंख्य वेळा पाहीला.

सिनेमा आपण नक्की का बघतो हा विचार माझ्या डोक्यात जाणीवपूर्वक कधी आलेला आठवत नाही, तसा तो कोणी करत असेल असंही वाटत नाही. हिंदी सिनेमा इतक्या आपल्या डीएनए मधेच फ़िट बसवलेला आहे.
भानू अथैयांच्या स्टुडिओत माझं भान हरपून जातं. कारण तिथे आजूबाजूला सगळीकडे माझ्या आवडत्या सिनेमांच्या खुणा पसरुन असतात. साहिब बिबि और गुलाममधल्या मीना कुमारीची छोट्या बहुच्या रेशमी साडीतली, अनोख्या बंगाली घडणीच्या दागिन्यांनी सजलेली, भांगात सिंदूर भरलेलं भारवून टाकणारी तस्बिर असते, वक्त, पाकिझा, संगम या सिनेमांमधल्या पोषाखांच्या डिझाईन्सने भरलेली स्केचबुक्स असतात आणि भानूकडे तर हजारो आठवणींचा अनमोल खजिनाच असतो. मला पाऊलही उचलवत नाही तिथून. भानू शम्मी कपूरच्या देखणेपणाबद्दल, चार्मबद्दल बोलत असते, वहिदा रेहमानच्या ग्रेसफ़ुल हालचालींबद्दल बोलत असते आणि मी फ़क्त ऐकत असते.
तेव्हा मला हिंदी सिनेमा किती आवडतो हे पुन्हा एकदा समजतं.

हिंदी सिनेमा पिढ्यांमधला पूल आहे.
आई तिने पाहिलेल्या सिनेमांच्या, देव आनंदच्या, राजकपूरच्या आवाराच्या गोष्टी सांगते, मी शाळेत असताना आईने आणि मी एकमेकींसोबत बघितलेल्या अमिताभ बच्चनच्या, ऋषिकेश मुखर्जींच्या आणि अमोल पालेकरच्या सिनेमांच्या कहाण्या आम्ही मिळून आता माझ्या मुलींना सांगतो तेव्हा त्यात सिनेमाची कथानकं नसतात, पण तरीही त्या सिनेमांच्याच कहाण्या असतात. माझ्या आईला सिनेमांचं जबरदस्त वेड. आम्ही बहुतेकवेळा दर शुक्रवारी रिलिज होणार्‍या सिनेमांपैकी निदान एक तरी पहायचोच. ठाण्याला थिएटर्स खूप. आणि त्यातलं मल्हार तर घराच्या अगदीच जवळ.
माझ्या मुलींना माहीत असतं सिनेमातलं अमुक एक दृश्य आलं, गाण्यांमधला अमुक एक शब्द, कडवं आलं की आई असेल तिथून येणार आणि स्क्रिनवर नजर खिळवणार, त्या मग त्याकरताच हाका मारुन मारुन बोलावतात.

दादरच्या शारदामधे काश्मिर की कलीतलं एकही गाणं ऐकू आलं नव्हतं. म्युझिक सुरु झालं रे झालं की पब्लिक उभं राहून आरडाओरडा करत टाळ्या पिटत गाणी म्हणायला लागायची. तो माहोल अनुभवताना अंगावर काटा उमटला.
राज कपूर 'तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी..' गाताना समोर बसलेल्या टवटवीत चेहर्‍याच्या नुतनकडे बघत मिश्किलपणे डोळ्यांतून हसत एक भुवई उंचावत 'मै जो मरता हूं तो क्या, और भी मरते होंगे..' म्हणतो तेव्हा कलिजा खलास होतो.
राजेश खन्ना 'वो शाम मस्तानी मदहोश किये जाय.. ' गात नायिकेभोवती रुंजी घालत फिरतो तेव्हा हृदय (माझंच) आनंदाने भरुन जातं.
अमिताभ बच्चन जखमी नजरेने पहात कोणतेही संवाद म्हणतो तेव्हा काळजाच्या आत हलतं.

माझा रोमान्स हिंदी सिनेमातल्या या सगळ्या चार्मिंग, हॅन्डसम नायकांसोबत सुरु झाला तो आजतागायत.
हिंदी सिनेमाच तुम्हाला ही मुभा देत असतो. आपला हिरो शोधण्याची.

जेम्स बॉन्डचे सिनेमे बघण्याचं, शोधून शोधून मॅटिनीला लागलेले सिनेमे बघण्याचं कॉलेजातलं वेड आठवतं तेव्हा खरे आठवतात त्यावेळचे धमाल, उनाडक्यांचे दिवस, पावसातल्या भटकंतीचे, बिनाकारणाने खिदळत रहाण्याचे, स्वत:ला ग्रेट समजत माना उंचावत रस्त्यातून बघितलेल्या सिनेमावर ’अभ्यासू’ चर्चा करत चालण्याचे दिवस.
आणि मग होणार्‍या नवर्‍यासोबत इरॉस, एक्सलसियरमधे बघितलेले, आता नावही आठवत नसलेले सिनेमे. अनेकदा त्याच्या घरी कोणी नाही याची संधी साधून त्याच्याकडच्या व्हिसिडी प्लेयरवर बघितलेले सिनेमे.
नवर्‍याच्या आणि माझ्या त्यानंतर कधी सिनेमांच्या आवडी जुळल्या नाहीत, पण काही फ़रक पडत नाही आम्हाला, सिनेमांची आवड कॉमन आहे इतकंच पुरतं.
हिंदी सिनेमा नॉस्टेल्जिया जागवतो.

माझा आवडता हिंदी सिनेमा अशा तुकड्यांमधे आहे. कधी तो गाण्याच्या टेकिंगमधे असतो, कधी दिग्दर्शनात, कधी सेट-डिझाइनिंगमधे, कधी कॉस्च्युम डिझाइनिंगमधे. गीतकारांच्या शब्दांमधल्या भावनेत, संगीतकारांच्या स्वरांत आणि गायक गायिकांच्या आवाजाच्या समुद्रात माझे असंख्य आवडते सिनेमे डुबक्या मारतात.

मेरा सायामधल सुनिल दत्त कातर, हळव्या आठवणींच्या जाळ्यात गुरफ़टून असतो, त्याला सारखी सारखी साधनाची आठवण येते, तशी मला आत्ता सिनेमातल्या आवडत्या दृश्यांची येतेय. कारण मला हिंदी सिनेमा आवडतो.

कोणते सिनेमे बघायला जास्त आवडतात या प्रश्नाचं उत्तर माझ्याबाबतीत सोपं आहे. मानवी नात्यांची गुंतागुंत, स्त्री-पुरुष नात्यातले आकर्षणाचे, प्रेमाचे, दुराव्याचे, तीरस्काराचे, पुन्हा एकमेकांकडे परतून येण्याचे, प्रगल्भतेचे पैलू ज्या सिनेमांमधून दिसतात ते सिनेमे मला बघायला जास्त आवडतात. माणसांमधलं अमूर्त नातं पडद्यावर खुलत जाताना बघायला मला आवडतं.
मात्र सिनेमामधे परिसरही दिसायला हवा. त्यात प्रवास हवा. नात्यांचा आणि माणसांचा.

सिनेमा म्हणजे नटनट्या नाही, कथानकही नाही. सिनेमा या सगळ्याच्या पलीकडचा असतो.
जागतिक सिनेमा बघताना हे पलिकडचं दिसायला आणि समजायला लागलं.

सिनेमा जास्तीतजास्त पाहीला जातो कॉलेजच्या वर्षांमधे. मी सुद्धा सर्वात जास्त संख्येने सिनेमे ८०-९० याच दशकात पाहीले. पण का कुणास ठाऊक नंतरची बरीच वर्षं ८० ते ९० हे दशक सिनेमांच्या दृष्टीने सर्वात टुकार दशक असं अनेकदा वाटायचं. त्यामागचं कारण कदाचित ’गाणी’ हे असण्याची शक्यता आहे. आवडती, वारंवार ऐकायला येणारी, गाजलेली गाणी सगळी ६० ते ७० दशकातली. गाण्यांच्या बाबतीत म्हणजे जर ६० ते ७० हे दशक सुवर्णाचे मानले तर ८० ते ९० हे दशक तद्दन प्लास्टीकचे.

पण खरं तर हिंदी सिनेमांमधला ख-या अर्थाने कटेम्पररी सिनेमा ८० ते ९० मधलाच. अंकुर, निशांतने सत्तरच्या दशकात सुरु केलेली नव्या, समांतर सिनेमाची चळवळ हिंदी सिनेमाच्या पारंपारिक प्रेक्षकांपासून जरा दूरच राहीली होती. मात्र या दशकातल्या कटेम्पररी, नव्या विषयाच्या सिनेमांच्य बाबतीत असं झालं नाही. कलात्मक आणि व्यावसायिकतेचं उत्तम भान या दशकातल्या सिनेमांना होतं. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला.
कथा, चष्मेबद्दूर, अर्थ, सिलसिला, अर्धसत्य, मासूम, उत्सव, सारांश, उमराव जान, अंकुश, पुष्पक, मिर्चमसाला, कयामत से कयामत तक, तेजाब, मिस्टर इंडिया, मैने प्यार किया.. असे अनेक तर्‍हांचे सिनेमे या दशकात येऊन गेले आणि त्याचा ठसा अजूनही आहे.

प्रत्येकाचा सिनेमा वेगळा. प्रत्येकाची सिनेमा बघण्याची कारणे वेगळी. प्रत्येकाकरता सिनेमाचा अर्थही वेगळा.

सिनेमांवर अभ्यासूपणाने, बारिकसारीक संदर्भांसहीत, तांत्रीक गोष्टी, दिग्दर्शन, अभिनय सर्वांवरच लिहिणारे, बोलणारे, चर्चा करणारे, चर्चासत्र भरवणारे असंख्य जण आजूबाजूला असतात.

सिनेमावर कोणी जुन्या आठवणी उगाळत, नव्या सिनेमांवर कडवटपणे लिहितात, कोणी एखादा दिग्दर्शक पकडून त्याच्या सिनेमांची चिरफ़ाड करत, स्क्रिप्ट उतरवून काढल्यासारखे लेख लिहितात, कोणी गाणी एके गाणी करत त्यावरच लिहितात, कोणी निरस तांत्रिक बाबींवरच चर्चा करतात.. कोणी अती भावूकपणे डोळ्यातून टिपं गाळणारे लेख लिहितात, कोणी उथळ लिहितात, कोणी भरभरुन लिहितात.. मी सगळंच वाचते.
कारण मला हिंदी सिनेमा आवडतो.

दोन्ही हातांनी हिंदी सिनेमाच्या डिव्हिडीज उलट्या पालट्या करताना मनाला विलक्षण आनंद होत असतो.. मनातलं कोलाज झगमगून उठत असतं.

त्या त्या दिवसांतले मित्र-मैत्रिणी, जातात, रहातात, अधून मधून भेटतात किंवा कायमचेही दुरावतात. पण सिनेमा कायमच सोबत रहातो.

आठवणींमधे रुतून बसलेल्या, कायम सोबत असणार्‍या, आवडत्या सिनेमांबद्दल इतरांना सांगूनच सिनेमाचं देणं फ़ेडता येऊ शकेल कदाचित.

वाचत रहा..

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख...
सिनेमा या समस्त भारतीयांप्रमाणे माझ्याही अत्यंय जिव्हाळ्याच्या विषयावर सविस्तर पोस्ट वीकांताला टाकतो...

हिंदी सिनेमा - एक अद्भुत प्रकार ........त्याची वाटचाल, तो काय होता, कसा होता, काय देतो हे सगळं या लेखात इतकं उत्तम मांडलंय की या सगळ्याचं कौतुक कसं करावं हेच कळत नाहीये.

सर्व प्रतिसादही इतके सुरेख आहेत की त्यालाही सुरेख म्हणताना शब्द अपुरे पडताहेत...

हिंदी सिनेमा ही एक न संपणारी जादूच आहे - अनंत काळापर्यंत जनमानसाला मोहित करणारी अशी जादू.... प्रत्येकावर वेगळीच मोहिनी घालणारी जादू .... जिचे रंग अजूनही विटलेच नाहीत अशी जादू ..... भविष्यातही जी आपले अद्घुत असेच राखून राहील अशी नित्यनूतन जादू..... भल्याभल्या जागतिक समीक्षकांनाही अचंबित करणारी, भारतीयांनाच काय पण विश्व व्यापून राहिलेली जादू.....

धन्यवाद सगळ्या सिनेमाप्रेमींना.

रार- हो तुझी ती लेखमाला वाचली होती. खूपच सुरेख लिहित होतीस. पण मधेच बंद केलीस तु ती. आता भारतीय सिनेमाच्या शताब्दीनिमित्त पुन्हा सुरु कर. मजा येईल.

दिनेशदा- कोणत्याही पिढीत सिनेमा प्रेक्षकांमधे तीन कॅटेगरीज कायमच रहाणार. सिनेमा हे माध्यम म्हणून त्याकडे गांभिर्याने, जाणतेपणाने बघणारे, सिनेमा म्हणजे फक्त तीन तास टाईमपास असं म्हणत पैसा वसुल कॅटेगरी सिनेमालाच प्राधान्य देणारे आणि तिसरे सिनेमाकडे मनोरंजन म्हणूनच बघतानाही चांगली अभिरुची जपत चांगल्या सिनेमांना प्राधान्य देणारे मध्यममार्गी प्रेक्षक. आणि या तिनही कॅटेगरीजच्या संख्येत जशी कमी अधिक वाढ होईल तशीच ते सिनेमे बनवणार्‍यांच्या संख्येत होईल. जागतिक सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायलाच हवा. असे सिनेमे दाखवणार्‍या प्रभात किंवा आशय सारख्या सिनेसोसायट्यांना जास्तीत जास्त सभासद मिळायले हवेत. तसे ते आता मिळतही आहेत. विशेषतः कॉलेजवयीन. ही चांगली गोष्ट आहे.

ललिता- हो. ही अशी गाणी तोंडपाठ असणं ही देण रेडिओवरच्या विविध भारती आणि बेला के फूलची. तसंच गुरुवारच्या छायागीत आणि रविवारच्या रंगोलीची.

फारेन्ड- मस्त प्रतिसाद. तुझ्याकडून तो अपेक्षितच होता मला. गाण्यांच्या बाबतीत तुझं म्हणणं पटलं. साठीचं दशक (५०-६०) हा सिनेसंगिताचा सुवर्णकाळ हे खरंच. साहिर, मजरुह ऐन भरात होते तेव्हा आणि संगीतकारही. मात्र ६०-६५ मधली गाणी जास्त ऐकली गेली म्हणून तो काळच लिहिताना डोळ्यापुढे आला.

नीधप- हो. त्यातल्या त्यात अजून वाईट काळ खरंच ९०-९२ होता. शिवाय त्या सिनेमांमधल्या फॅशन्स हा अजून एक भयाण प्रकार. खूप मिडिऑकर काळ होता तो. असं का याचं अ‍ॅनालिसिस करायला पाहीजे खरं तर.

दीपांजली- तुझ्या पोस्ट्समधून वारंवार येणार्‍या सिनेसंदर्भांवरुन तुला हे वाक्य नक्कीच पटणार याबद्दल मलाही काही शंका नाही Proud

अनघा- तंबूतला सिनेमा हा प्रकार अनुभवला नाही मी पण त्याबद्दल वाचायची खूप उत्सुकता आहे.

मुक्ता- सिनेप्रेमींचं रक्त सारखंच असतं. :प

पराग- ट्युलिपचं साहिर, गुलझार, गुरुदत्त, बर्गमनवरचं लिखाण वाचल्यावर माझ्या लेखमालेत मी त्यांचा उल्लेखही करु नये खरं तर. अजून लिहित नाही ती किती वेळा सांगूनही त्याला काय करायचं?

राजकाशाना- "जर मॉडर्निस्ट चळवळींमधून भारतीय समाज गेलाच नाही तर मग भारतीय सिनेमाला कुरोसावा आणि अंतोनियोनीच्या फूटपट्ट्या लावून का मोजायचं?" >>> विचारात पाडून जातय वाक्य. चित्रकला आणि सिनेमा यांची वाटचाल भारतात किती समांतररित्या झाली हे पुन्हा एकदा जाणवून गेलं. याबद्दल वेगळा अभ्यास करायलाच हवाय.

आगाऊ- अगदी असाच अनुभव मला आवारा नेही दिला. तो सिनेमा आहे माझ्या या लेखमालेत. श्री-४२० बद्दल लिही ना तु. वाचायला आवडेल.

बेफिकिर- अमिताभ इतका 'छाया हुवा' होता या दशकावर त्यामुळेच असेल कदाचित पण सिनेमांमधे विविधता खूप कमी होती. कयामत से चा उल्लेख केला मी.

टवाळ- इसाकभाई, शिरिष कणेकर, अभिजित देसाई हे खरंच सिनेमा जगले. भावनिकता प्रमाण मानून सिनेमा बघणार्‍यांची ही पिढी होती.

साजिरा- तारे जमीन पर बघताना रडायला आलं तेव्हा मला अ‍ॅक्चुअली इतकं बरं वाटलं. आपली संवेदनशीलता जी माध्यमांच्या कोलाहलात कुठेतरी हरवूनच गेलीय किंवा बोथट झालीय असं वाटत होतं त्याला सुखद छेद देणारा क्षण होता तो. मध्यंतरी कोणीतरी लिहिलं होतं की 'विरहगीते' किंवा दर्दभरी गाण्यांच्या जॉनरच हल्लीच्या सिनेमांमधून नाहीस झालाय कारण त्याला साजेसे प्रसंगच नसतात. खरंच आहे ते. कैलाश खेरचं 'या रब्बा..' गाण्याचा अपवाद वगळता दु:खाने हलवून सोडणारी गाणी आठवतच नाहीयेत आत्ता मला.

अँकी- नक्की लिही.

शशांक- अगदी पटलं.

प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.

.

आमच्या गावात होता तंबू वाला सिनेमा.

बायका न पोर पडद्याच्या दुसर्‍या बाजूने बसत, सगळ्या हालचाली विरुध्द दिशेने मग..असे उलटे सिनेमे पण खूप एन्जॉय केले. उन्हाळ्यात त्या तंबूचे छप्पर उडे किंवा एखादी भिंत उडून जाइ, किंवा एखादा दरवान दयाळूपणे/आतल्या लोकाना एसी ची हवा म्हणून ती भिंत "गुंडाळून " ठेवी, न आम्हाला कुणाच्या तरी अंगणात बसून सिनेमा बाघायाला मिळे.
उन्ह्ळ्यात बाहेर अंगणात झोपायचो तेव्हा ९ ते १२ च्या शो चे सगळे संवाद अगदी स्प्श्ट ऐकू येत..अन तो सिनेमा बघितला असेल तर बंद डोळ्यानी परत अख्खा सिनेमा बघता यायचा:)

छानच लेख.
सिनेमाचा नॉस्टेलजिया म्हणजे खरं तर तो सिनेमा ज्या दिवसांमधे बघीतला, ज्यांच्यासोबत बघीतला त्यांचा नॉस्टेल्जिया असतो.>>>>>अगदी अगदी
वर्षातून १..२ वेळा आम्ही(घरातले) ट्रिपला जायचो. तेव्हा मुद्दाम फक्त १ किंवा जास्तीत जास्त २ त्यावेळच्या नविन आवडत्या गाण्यांची कॅसेट बरोबर घ्यायचो. माग संपुर्ण वेळ तीच गाणी ऐकली जायची अगदी कंटाळा येईपर्यंत .....त्यामुळे ती गाणी आणि ट्रिप हे समीकरणच होऊन जायचे.

किती सुरेख लिहीलयस शर्मिला. वाक्यागणिक अगदी अगदी म्हणावेसे वाटत होते. सगळ्यांच्या प्रतिक्रियापण खूप आवडल्या.

लेगोमटन स्लीव्हज + ए लाइन तंबू कट ड्रेसेस, मल्टिकलर बांगड्या, सागर वेणी आणि नक्षीदार टिकल्या, प्रचंड ढगळ ब्लेझर्स, फ्लिक्स वाढवलेले हिरो, किती ते दुखभरे कॉलेजचे दिवस आमचे नि, +१११.
त्यांतही ८५ ते ९५ हा काळ हिंदीसाठी प्लास्टीकचा मानला तर या काळातले मराठी पिक्चर्स चायना मेड प्लास्टीकचे म्हणावे लागतील. Happy
मराठी चित्रपटांनी कात टाकली ती 'बिनधास्त' पासून..

सुरेख लिहीलयस शर्मिला. लेख खुपच आवडला, पटला. Happy

अशी गाणी तोंडपाठ असणं ही देण रेडिओवरच्या विविध भारती आणि बेला के फूलची. तसंच गुरुवारच्या छायागीत आणि रविवारच्या रंगोलीची. >> खरय Happy

शर्मिला :).
थिएटर मधे जाऊन सिनेमा पहायच्या मेमरीज पण सही असतात.. लहानपणी मल्टिप्लेक्स वगैरे नसायची, एका थिएटर ला एकच सिनेमा.. लहानपणापासून ते कॉलेज बंक करून गेलेल्या सगळ्या मेमरीज ताज्या आहेत :).
पुण्यात मंगला, नीलायम, नटराज ला जाऊन सिनेमा पहाणे म्हणजे सर्वात आवडती एन्जॉयमेन्ट.. नंतर नटराज पडलं :(.
अता घरी बसून डीव्हीडी बघताताना तसा फील कुठे येतो..

वा मस्तच!

सिनेमा त्यातून सगळ्यात आधी हिंदी म्हणजे खरंच कमाल सेलिब्रेशन! त्यातून मिळणारा आनंद, अनुभुती अवर्णनीय .. Happy

मस्त लेख नेहमी प्रमाणेच. डीजे नटराज बद्दल अगदी अगदी. मी तिथे पाहिलेला मॅकेन्नाज गोल्ड आणि पाकिजा.
पाकिजा कळला नाही आणि मॅकेन्ना अजूनही ऑलटाइम फेव. १०४.८ फुल्ली फिल्मी चॅनेल वर एक मे पासून गोल्डन मोमेंट्स ऑफ सिनेमा येते आहे. जरूर ऐका. तसेच त्या चॅनेल वर प्रसिद्ध गाण्यांची गजल रुपे,
राम प्रसाद व उत्पल दत्त यांच्यातील विनोदी संवाद, जीवन में सिनेमा के फायदे, जीवन में क्रिकेटके फायदे इत्यादी
आचरट पणा कायम येत राहतो. पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

अतिशय चांगला लेख, आणि साजिरा, नीधप, फारेन्ड वगैरेंच्या प्रतिक्रियाही उत्तम ! शर्मिलाताईंच्या या विषयावरच्या सर्व लेखांचा मी फॅन आहे. Happy
'तीन प्रकारचे प्रेक्षक' या वर्गीकरणाशी मी अंशतः(च) सहमत आहे. या तीनही प्रकारात मी प्रेक्षक म्हणून असंख्य कोलांट्या-उड्या मारल्या आहेत. शिवाय अशा प्रकारांची अनेक पर्मुटेशन्स-काँबिनेशन्सही आहेत, हे शर्मिलाताईसुद्धा मान्य करतील.
८०-९० चे दशक कितीही टुकार असले तरी त्या सिनेमांचे मायबोलीवर अफाट ऋण आहे, हे नाकारता येणारच नाही. हे सिनेमे नसते तर आपल्याला फारएन्ड, श्रद्धा, स्वप्ना-राज यासारख्या लेखकांचे छप्परतोड लिखाण वाचायला मिळाले असते का? Rofl

आहा डिजे, नटराज टॉकिज... सूरसंगम तिथे बघितला होता. एकदम फ्यामिली गेटटुगेदर टाइप्स. मग ९ वीची परिक्षा संपल्यावर आमच्या अ वर्गातल्या बर्‍याचश्या आणि १० वीची परिक्षा नुकतीच संपलेल्या अ वाल्या अश्या मिळून साधारण ४०-५० जणी पुष्पक बघायला गेलो होतो. काय धमाल ती...
तसं ते मंडईतलं मिनर्व्हा.. जंगल बुक आणि तत्सम बरेच सिनेमे तिथे पाह्यले. आजोबा(आईचे वडिल), माझा धाकटा काका, मी आणि माझा मावसभाऊ अशी टिम असायची.
असो फारच विषयांतर.. Happy

सिंगल स्क्रीनला सिनेमा पहायला जायचं म्हणजे -
- आधी तिकीटं
- मग बाहेरचं मोठं पोस्टर
- उत्सुकतेनं पाहिलेली आतली लहान पोस्टर्स (ज्यात प्रत्यक्ष सिनेमातली दृष्यंच असायची)

असं करत करत प्रत्यक्ष सिनेमा सुरू होईपर्यंत मस्त वातावरणनिर्मिती व्हायची, फोकस्ड राहिलं जायचं Proud

मल्टीप्लेक्समधे ही मजा नाही. गेलं, की आधी आपल्याला हवा असलेला सिनेमा कुठल्या स्क्रीनला आहे, आपण नक्की त्याच स्क्रीनची तिकिटं घेतली आहेत ना, हीच चिंता.
आत गेल्यावर नेमका आपल्या स्क्रीनचा दरवाजा कुठेतरी लांब, कोपर्‍यात, दिसणार नाही असा असतो. तो शोधा. चहूबाजूंना चालू ४-५ सिनेमे, आगामी १०-१२ सिनेमे यांची खंडीभर पोस्टर्स. फोकसच जातो तिथे !!
(साजिराची इण्टर्व्हलनंतर निराळ्याच स्क्रीनला जाऊन बसल्याची पोस्ट आठवली :हाहा:)

जरा विषयांतर झालं... पण माझ्या सिनेमा-नॉस्टॅल्जियात हा मुद्दाही येतो.

चांगल्या आठवणी आहेत की! याहून जास्त विषयांतर हिन्दी सिनेमात सुद्धा सहज होते Happy

तेव्हा प्रत्येक टॉकीज्/थिएटरचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते. शहरातील्/बाहेरील लोकेशन, पार्किंग, जवळची ठिकाणे, तेथे येणारे टीपिकल पब्लिक, ब्लॅक, चहा/वड्यांची चव, एसी-नॉन एसी, वरचे मोठे व आतले ईष्टोरी सांगणारे काचेतील छोटे पोस्टर्स, तेथे पाहिलेले आधीचे चित्रपट हे सर्व मिळून तयारे होणारे. त्या काळात पाहिलेले बरेच चित्रपट निदान पहिल्यांदा कोणत्या "टॉकीज" ला पाहिले हे इतक्या वर्षांनंतर सुद्धा लक्षात असेल कित्येकांच्या.

औंध, खडकी कडून "कॉर्पोरेशन" कडे येणारी बस नव्या पुलाच्या अलिकडे डावीकडच्या खालच्या रस्त्याकडे गेली की आमच्या माना डावीकडे मंगलाचा पोस्टर बघायला. त्यात बच्चन असेल तर आणखीनच. आणि बच्चनचे बहुधा बरेच हिट पिक्चर मंगलालाच होते. नटराज च्या पुढे एक कॅडबरीच्या रंगाची ठळक पट्टी होती. ती आमच्या शाळेसमोरून (बाल शिक्षण मंदिर) दिसायची. एकही पोस्टर दिसले नाही तरी ती पट्टी सुद्धा दिसली तरी आवडायचे. लक्ष्मी रोडने जाताना अलका, विजय वरचे पोस्टर्स पाहिले नाहीत असे कधी झाले नसेल.

तेव्हा म्हणजे नटराज, मंगला आणि राहुल ही "शाही". ७० एमएम पडदा, वातानुकुलित, आतमधेही भरपूर जागा, बाहेरही मोठा परिसर. उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवण असेल पण नटराज मधे आत गेल्यावर जरा बरे वाटते असे जाणवायचे. नंतर कळाले की ते "एअरकंडिक्शन" मुळे आहे Happy पण आमची दोस्ती बच्चन मुळे मंगलाशी जास्त. नटराजला एक "बरसात की एक रात" व "दो और दो पाँच" सोडले तर बच्चन फारसा पाहिल्याचे आठवत नाही. मॅटिनीला शोले मात्र बरेच आठवडे होता. राहुल ला तेव्हा फक्त इंग्रजी लागत. अलंकारही जवळजवळ तितकेच चांगले पण लांब. तेथे फक्त "नमक हलाल" पाहिल्याचे आठवते. तो तेथे वर्षभर ठाण मांडून बसला होता.

नीलायम अगदी शाही नाही पण तरीही एकदम चांगले होते. तेथे "डॉन", "याराना", "खुद्दार" आठवतो. तसेच शाळा कॉलेजातील मुलींच्या झुंडी सायकलवरून येउन पाहताना बघितलेल्या होत्या तो "कयामत से कयामत तक".

अलका, विजय, प्रभात तेव्हाच्या टीपिकल पुणेरी मध्यमवर्गीय घरासारखे - शाही अजिबात नाही पण साधे आणि बर्‍यापैकी नीटनेटके. अलकाची दोन रूपे असत. बराच काळ इंग्रजी चित्रपट लागायचे आणि मग "दादांचा" चित्रपट आला की वर्षभर एकदम देशी रूप.

आर्यन व मिनर्व्हा पाडायच्या आधी तेथे चित्रपट बघितले. मिनर्व्हा ची पुण्यातील इमेज डोक्यात बसल्याने मुंबईचे मिनर्व्हा चांगले असेल असे वाटतच नाही. वसंत म्हणजे टोटल फ्यामिली वाले. जयाप्रदा-जीतेन्द्र-के राघवेन्द्र राव छाप. रतन जेथे होते तो भाग आता बघितला तर येथे एक आख्खे थिएटर होते असे वाटणार नाही. अपोलो, अल्पना, श्रीनाथ, श्रीकृष्ण येथेही पूर्वी "नॉर्मल" पिक्चर्स लागत. परवा अल्पनावर आलेली कळा बघितली. कदाचित इतर बर्‍याच छोट्या चित्रपटगृहांचे असेच झाले असेल. खडकीला मित्र तेव्हा राहात असल्याने एक्सेलसियर, जयहिंद व अरूण येथेही अनेक चित्रपट पाहिले. तेथे दर एक दोन आठवड्याने बदलत. (वेळ मिळाला तर आणखी टाकतो).

बाकी एम्पायर, विजयानंद, लक्ष्मीनारायण, कॅपिटॉल (व्हिक्टरी), सोनमर्ग, येथेही काही पाहिले. यातील काहींची नावे सांगता येण्यासारखी नाहीत :P, पण मित्राबरोबर सकाळी बाहेर पडून सारसबागेत डबा खाऊन लक्ष्मीनारायणला मिथुनचा "सुरक्षा" पाहिल्याचे आठवते. सोनमर्गला "अमर अकबर अँथनी".

होपफुली बोअर झाला नसाल हे वाचून Happy

ललिता,
पोस्टर बद्दल अगदी अनुमोदन :).
कुठला सिनेमा थिएटर ला आहे, ते उंच पोस्टर वरून लांबूनच सम्जायचं !
एका थिएटर ला एकच सिनेमा त्यामुळे हे मोठा लोंढा वाट पहायचा आत जाण्या साठी Happy
अगदी खूप लहानपणी माँटेसरीत असतानाच्या काळातली 'आप तो ऐसे न थे' , लुटमार वगैरे ची पोस्टर ही लक्षात आहेत मला , नळस्टॉप ला लागायची त्या आइस क्रिम च्या दुकाना जवळ:).
नटराज-नीलायम-मंगला खालोखाल कधीतरी राहुल, अलंकार-वसंत ला वगैरे गेलीये.
इंग्लिश सिनेमे अलकाला ला, मराठी साठी प्रभात-विजय !
अता फारेंड ची पोस्ट वाचून लक्ष्मी नारायण चे ही काही सिनेमे आठवले :).

सन ८७ ते ९४ प्रत्येक मे आणि दिवाळिच्या शाळेच्या महिनभरच्या सुट्टित मामाच्या गावि व्हिडिओ पार्लर वर जवळ जवळ दर दिवस १ याप्रमाणे कमितकमि ४०० सिनेमे तरि पाहिलेत (त्यावेळि नविन सिनेमे पण व्हिडिओ वर उपलब्ध असायचे). १०ते १५ मामे-आते भावन्ड रात्रि ९ते१२ चे शो. त्यातुन जर भुताचा सिनेमा असेल तर घरि परत येताना सर्व एकमेकाचे हात पकडुन येणार.
आठवड्यातुन एक दिवस मालेगावला टॉकिजला (टाकि-खास मालेगावचा शब्द ) जाउन सिनेमा पाहायचा.
खुप खुप दिलय हिन्दि सिनेमाने.

फारेंड अमिताभचे चित्रपट थेटरात पाहण्याचा वयाचा आहे? आँ Wink

मला हम, अजूबा, आँखे, कभी खुसी आणि तत्समच थेटरात पाहिलेले आठवतात. Sad
'दिवार' वगैरे थेटरात पाह्यला काय मजा आली असती. अहाहा..

'दिवार' वगैरे थेटरात पाह्यला काय मजा आली असती. >> त्या काळातला 'मॅटिनी शो' हा प्रकार पण आता बंद झाला. नाहीतर दिवार थेटरात नक्की पहायला मिळाला असता Sad

मस्त लेख ! आवडला.

सहजच आठवल ' झनक झनक पायल बाजे' हा चित्रपट हाऊस्फुल्ल चालला होता, खुपदिवस वाट बघून शेवटी कसाबसा (ब्लॅक मधे वगरे तिकिट मिळवून :फिदी:) बघायला मिळाला. ३/४ दा तरी बघीतला होता गोपीकृष्णांच्या नृत्यासाठी.
मधे लेकीला दाखवला तेव्हा म्हणाली डान्स मस्त आहेत, पण इतके दळण पिक्चर तुम्ही ३/४ दा कसे पाहु शकता ? Uhoh Proud
ब्लॅक & व्हाईट सिनीमे / गाणी लागली की लेक १ सेकंद देखील त्या चॅनलवर थांबू देत नाही. Proud

ब्लॅकने घेतलेली तिकिटं - हा नॉस्टॅल्जियाचा अजून एक मुद्दा.

वरती, फारेंडने लिहिलंय, त्याप्रमाणे, कुठल्या थेटरात कुठला सिनेमा पाहिलाय हे लक्षात राहिलंय, त्याचप्रमाणे कुठले सिनेमे ब्लॅकनं तिकिटं घेऊन पाहिलेत हे ही लक्षात राहतं कायम Lol

कुठल्या थेटरात कुठला सिनेमा पाहिलाय हे लक्षात राहिलंय, त्याचप्रमाणे कुठले सिनेमे ब्लॅकनं तिकिटं घेऊन पाहिलेत हे ही लक्षात राहतं कायम <<<

Proud
+१००००००००००००००००

Pages