सिनेमा सिनेमा- पुन्हा एकदा

Submitted by शर्मिला फडके on 2 May, 2012 - 00:47

भारतीय सिनेमा शंभर वर्षांचा झाला. आजवर या सिनेमामुळे मनाला असीम आनंद मिळाला. सिनेमांचं ऋण मनावर सुखाचं ओझं ठेवून आहे, ते अंशतःही उतरवण्याची इच्छा नाही मात्र या निमित्ताने आवडत्या सिनेमांवर लेख लिहून निदान कृतज्ञता तरी व्यक्त करणे मस्ट आहे.

मला सिनेमा बघायला आवडतो, त्यावर लिहायला, इतरांनी लिहिलेलं वाचायला आवडतं, जो सिनेमा पाहिलेला नाही त्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं, जे सिनेमे आवडले नाहीत, त्यांच्यावरही बोलायला आवडतं, ते का आवडले नाहीत त्याबद्दल विचार करायला आवडतं. थोडक्यात सांगायचं तर मला सिनेमा कसाही आवडतोच.

काही सिनेमे बुद्धीने बघायचे, काही नजरेने, काही मनाने. काही उगीचच.
काही सिनेमे कितीही वेळा पाहिले तरी मन भरत नाही, काही सिनेमे नक्की का आवडले हे समजत नाही, समजावूनही देता येत नाही.

प्रत्येकाचा सिनेमा वेगळा, प्रत्येकाकरता सिनेमा वेगळा. एकच सिनेमा एकाला आवडतो, एकाला नाही. आपल्याला सिनेमा का आवडला हे कोणी कोणाला पटवून द्यायला जाऊ नये. दुस-याने सांगून सिनेमा समजत नाही, दुसर्‍याला आवडला म्हणून तिसर्‍याला आवडेलच असं नाही.

सिनेमाला जितका जबरदस्त नॉस्टेलजिया चिकटून असतो तितका इतर कोणत्याच गोष्टीला नाही. सिनेमाचा नॉस्टेलजिया म्हणजे खरं तर तो सिनेमा ज्या दिवसांमधे बघीतला, ज्यांच्यासोबत बघीतला त्यांचा नॉस्टेल्जिया असतो. सिनेमाला आजूबाजूच्या जगाचे संदर्भ चिकटून असतात आणि आवडत्या सिनेमांच्या तुकड्यांसोबतच ते मनात येतात.

सिनेमा आठवतात आणि आवडतात तेव्हा अनेकदा त्यातले तुकडे तुकडेच आठवतात. आवडत्या सिनेमांवर बोलताना किंवा लिहिताना त्यांचं मग एकसंध कोलाज मनात तयार होतं. सिनेमा पॅराडिसोमधल्या त्या शेवटच्या दृश्याप्रमाणे ते विलोभनीय असतं.

सिनेमांमधल्या प्रत्येक आवडत्या गोष्टींचं एक स्वतंत्र युग असतं. एखादं युग दिलिपकुमारचं, एखादं अमिताभचं, कधी ते बिमलदांचं असतं, कधी व्ही.शांतारामांचं.
प्रत्येकाचं वैयक्तिकही एक युग असतं. त्या त्या वयात आपण त्यातून प्रवास करतो.
माझ्याबाबतीत कधी एक युग कृष्ण-धवल सिनेमांचे, इस्टमन कलरचे, प्यासा-कागझ के फूलचे, दिलिप-राज-देव-शम्मीचे, एसजे-खय्याम, रवी, मदनमोहन आणि असंख्य आवाजांचे. दिग्दर्शकांचेही एक स्वतंत्र युग. गुरुदत्त पासून ऋषिकेश मुखर्जीं, बासू चटर्जींचे, बासू भट्टाचार्यांच्या अमर-मानसी ट्रिलॉजीचे, गुलझारचे, सत्यजित रेंच्या चारुलता, पाथेरपांचालीचे..
सिनेमांचे ऋतू वेगळे आणि प्रत्येकाचे त्यातल्या आठवणींचे तुकडेही वेगळे. कुणाच्या कोलाजमधे मधुबाला असते कुणाच्या वहिदा, कधी देवचा स्टायलिश रोमान्स मनात उरतो कधी शर्मिला टागोरच्या खळ्या, स्मिताच्या नजरेचे, अमोल पालेकरच्या साधेपणाचे, राजेश खन्नाच्या हळव्या लुक्सचे काही तुकडे असतात. अमिताभच्या मैं और मेरी तनहाईचे, लालजर्द गालिच्यावर नाचणार्‍या पाकिझाचे, तारोंका जाल मेरे दिल निसार पुछो ना हाल मेरे दिल का.. म्हणणा-या नुतनच्या सावळ्या, प्रसन्न हास्याचे असतात, साधनाच्या विलभनीय साध्या सौंदर्याचे असतात.. तेरा मेरा प्यार अमर, फ़िर क्युं मुझको लगता है डर.. चंद्र आकाशात असतो, दुधाळ चंदेरी प्रकाश तिच्या अंगाखांद्यावरुन निथळत असतो.. कधी त्यात आख्ख्या मोगलेआझमही असतो. त्याचे तुकडे करणंच अशक्य.

ब्लॅक ऍन्ड व्हाईट सिनेमांमधे काहीतरी अनोखी जादू होती.
माझ्या मनातल्या कोलाजवर जास्तीत जास्त तुकडे ब्लॅक ऍन्ड व्हाईट हिंदी सिनेमाचे आहेत, मधाळ आणि मॅजिकल तुकडे.. काळजात रुतून बसलेले, अनाडीतली वो चांद खिला.. मधे चंद्राच्या प्रकाशात नहाणारी नुतन, आणि जाने क्या तुने कही.. म्हणत मान वेळावून मागे पहाणारी वहिदा पहावी तर कृष्णधवलच.
कोलाजमधे ’हम नशे में है संभालो हमे तुम.. असा आसमानावर तरंगणारा लताचा आवाजही आहे आणि त्यासोबतच्या लाखो चमकत्या चांदण्याही आहेत.

पहिला आठवणीतला थिएटरमधे बघितलेला सिनेमा शोले. धुवांधार पाऊस होता आणि मी, माझी बहिण आणि आई थिएटरवर आधी जाऊन उभे होतो, छत्रीतही भिजवणारा पाऊस होता तो, बाबा आणि माझा धाकटा भाऊ, तो तर जेमतेम चार-पाच वर्षांचा, ते नंतर येणार होते. आम्ही आपली वाट बघतोय, भिजतोय, बाबा काही येईनात, सिनेमा सुरु झाला, खच्चून भरलेलं थिएटरचं आवार सुनसान झालं. आम्ही तिघी आपल्या भिजतोच आहोत. आणि मग अर्ध्या तासांनी बाबा आले. भाऊ त्यांच्या खांद्यावर झोपून गेलेला. त्यांना वेगळ्याच थिएटरमधे सिनेमा आहे असं वाटलेलं. ठाण्याच्या पूर्व भागातल्या आनंदमधे आम्ही उभ्या आणि बाबा पश्चिमेच्या वंदना, आराधना सगळीकडे फ़िरुन आलेले. त्यानंतर आईबाबांचं कडाक्याचं भांडण झालं होतं का आठवत नाही, पण त्या दिवशी अर्ध्यातून बघितलेल्या त्या शोलेची एक एक दृश्य मनावर कोरुन आहेत. त्यानंतर पुन्हा आम्ही मिनर्व्हाला ७० एमएमच्या भव्य पडद्यावर शोले पाहीला. मग असंख्य वेळा पाहीला.

सिनेमा आपण नक्की का बघतो हा विचार माझ्या डोक्यात जाणीवपूर्वक कधी आलेला आठवत नाही, तसा तो कोणी करत असेल असंही वाटत नाही. हिंदी सिनेमा इतक्या आपल्या डीएनए मधेच फ़िट बसवलेला आहे.
भानू अथैयांच्या स्टुडिओत माझं भान हरपून जातं. कारण तिथे आजूबाजूला सगळीकडे माझ्या आवडत्या सिनेमांच्या खुणा पसरुन असतात. साहिब बिबि और गुलाममधल्या मीना कुमारीची छोट्या बहुच्या रेशमी साडीतली, अनोख्या बंगाली घडणीच्या दागिन्यांनी सजलेली, भांगात सिंदूर भरलेलं भारवून टाकणारी तस्बिर असते, वक्त, पाकिझा, संगम या सिनेमांमधल्या पोषाखांच्या डिझाईन्सने भरलेली स्केचबुक्स असतात आणि भानूकडे तर हजारो आठवणींचा अनमोल खजिनाच असतो. मला पाऊलही उचलवत नाही तिथून. भानू शम्मी कपूरच्या देखणेपणाबद्दल, चार्मबद्दल बोलत असते, वहिदा रेहमानच्या ग्रेसफ़ुल हालचालींबद्दल बोलत असते आणि मी फ़क्त ऐकत असते.
तेव्हा मला हिंदी सिनेमा किती आवडतो हे पुन्हा एकदा समजतं.

हिंदी सिनेमा पिढ्यांमधला पूल आहे.
आई तिने पाहिलेल्या सिनेमांच्या, देव आनंदच्या, राजकपूरच्या आवाराच्या गोष्टी सांगते, मी शाळेत असताना आईने आणि मी एकमेकींसोबत बघितलेल्या अमिताभ बच्चनच्या, ऋषिकेश मुखर्जींच्या आणि अमोल पालेकरच्या सिनेमांच्या कहाण्या आम्ही मिळून आता माझ्या मुलींना सांगतो तेव्हा त्यात सिनेमाची कथानकं नसतात, पण तरीही त्या सिनेमांच्याच कहाण्या असतात. माझ्या आईला सिनेमांचं जबरदस्त वेड. आम्ही बहुतेकवेळा दर शुक्रवारी रिलिज होणार्‍या सिनेमांपैकी निदान एक तरी पहायचोच. ठाण्याला थिएटर्स खूप. आणि त्यातलं मल्हार तर घराच्या अगदीच जवळ.
माझ्या मुलींना माहीत असतं सिनेमातलं अमुक एक दृश्य आलं, गाण्यांमधला अमुक एक शब्द, कडवं आलं की आई असेल तिथून येणार आणि स्क्रिनवर नजर खिळवणार, त्या मग त्याकरताच हाका मारुन मारुन बोलावतात.

दादरच्या शारदामधे काश्मिर की कलीतलं एकही गाणं ऐकू आलं नव्हतं. म्युझिक सुरु झालं रे झालं की पब्लिक उभं राहून आरडाओरडा करत टाळ्या पिटत गाणी म्हणायला लागायची. तो माहोल अनुभवताना अंगावर काटा उमटला.
राज कपूर 'तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी..' गाताना समोर बसलेल्या टवटवीत चेहर्‍याच्या नुतनकडे बघत मिश्किलपणे डोळ्यांतून हसत एक भुवई उंचावत 'मै जो मरता हूं तो क्या, और भी मरते होंगे..' म्हणतो तेव्हा कलिजा खलास होतो.
राजेश खन्ना 'वो शाम मस्तानी मदहोश किये जाय.. ' गात नायिकेभोवती रुंजी घालत फिरतो तेव्हा हृदय (माझंच) आनंदाने भरुन जातं.
अमिताभ बच्चन जखमी नजरेने पहात कोणतेही संवाद म्हणतो तेव्हा काळजाच्या आत हलतं.

माझा रोमान्स हिंदी सिनेमातल्या या सगळ्या चार्मिंग, हॅन्डसम नायकांसोबत सुरु झाला तो आजतागायत.
हिंदी सिनेमाच तुम्हाला ही मुभा देत असतो. आपला हिरो शोधण्याची.

जेम्स बॉन्डचे सिनेमे बघण्याचं, शोधून शोधून मॅटिनीला लागलेले सिनेमे बघण्याचं कॉलेजातलं वेड आठवतं तेव्हा खरे आठवतात त्यावेळचे धमाल, उनाडक्यांचे दिवस, पावसातल्या भटकंतीचे, बिनाकारणाने खिदळत रहाण्याचे, स्वत:ला ग्रेट समजत माना उंचावत रस्त्यातून बघितलेल्या सिनेमावर ’अभ्यासू’ चर्चा करत चालण्याचे दिवस.
आणि मग होणार्‍या नवर्‍यासोबत इरॉस, एक्सलसियरमधे बघितलेले, आता नावही आठवत नसलेले सिनेमे. अनेकदा त्याच्या घरी कोणी नाही याची संधी साधून त्याच्याकडच्या व्हिसिडी प्लेयरवर बघितलेले सिनेमे.
नवर्‍याच्या आणि माझ्या त्यानंतर कधी सिनेमांच्या आवडी जुळल्या नाहीत, पण काही फ़रक पडत नाही आम्हाला, सिनेमांची आवड कॉमन आहे इतकंच पुरतं.
हिंदी सिनेमा नॉस्टेल्जिया जागवतो.

माझा आवडता हिंदी सिनेमा अशा तुकड्यांमधे आहे. कधी तो गाण्याच्या टेकिंगमधे असतो, कधी दिग्दर्शनात, कधी सेट-डिझाइनिंगमधे, कधी कॉस्च्युम डिझाइनिंगमधे. गीतकारांच्या शब्दांमधल्या भावनेत, संगीतकारांच्या स्वरांत आणि गायक गायिकांच्या आवाजाच्या समुद्रात माझे असंख्य आवडते सिनेमे डुबक्या मारतात.

मेरा सायामधल सुनिल दत्त कातर, हळव्या आठवणींच्या जाळ्यात गुरफ़टून असतो, त्याला सारखी सारखी साधनाची आठवण येते, तशी मला आत्ता सिनेमातल्या आवडत्या दृश्यांची येतेय. कारण मला हिंदी सिनेमा आवडतो.

कोणते सिनेमे बघायला जास्त आवडतात या प्रश्नाचं उत्तर माझ्याबाबतीत सोपं आहे. मानवी नात्यांची गुंतागुंत, स्त्री-पुरुष नात्यातले आकर्षणाचे, प्रेमाचे, दुराव्याचे, तीरस्काराचे, पुन्हा एकमेकांकडे परतून येण्याचे, प्रगल्भतेचे पैलू ज्या सिनेमांमधून दिसतात ते सिनेमे मला बघायला जास्त आवडतात. माणसांमधलं अमूर्त नातं पडद्यावर खुलत जाताना बघायला मला आवडतं.
मात्र सिनेमामधे परिसरही दिसायला हवा. त्यात प्रवास हवा. नात्यांचा आणि माणसांचा.

सिनेमा म्हणजे नटनट्या नाही, कथानकही नाही. सिनेमा या सगळ्याच्या पलीकडचा असतो.
जागतिक सिनेमा बघताना हे पलिकडचं दिसायला आणि समजायला लागलं.

सिनेमा जास्तीतजास्त पाहीला जातो कॉलेजच्या वर्षांमधे. मी सुद्धा सर्वात जास्त संख्येने सिनेमे ८०-९० याच दशकात पाहीले. पण का कुणास ठाऊक नंतरची बरीच वर्षं ८० ते ९० हे दशक सिनेमांच्या दृष्टीने सर्वात टुकार दशक असं अनेकदा वाटायचं. त्यामागचं कारण कदाचित ’गाणी’ हे असण्याची शक्यता आहे. आवडती, वारंवार ऐकायला येणारी, गाजलेली गाणी सगळी ६० ते ७० दशकातली. गाण्यांच्या बाबतीत म्हणजे जर ६० ते ७० हे दशक सुवर्णाचे मानले तर ८० ते ९० हे दशक तद्दन प्लास्टीकचे.

पण खरं तर हिंदी सिनेमांमधला ख-या अर्थाने कटेम्पररी सिनेमा ८० ते ९० मधलाच. अंकुर, निशांतने सत्तरच्या दशकात सुरु केलेली नव्या, समांतर सिनेमाची चळवळ हिंदी सिनेमाच्या पारंपारिक प्रेक्षकांपासून जरा दूरच राहीली होती. मात्र या दशकातल्या कटेम्पररी, नव्या विषयाच्या सिनेमांच्य बाबतीत असं झालं नाही. कलात्मक आणि व्यावसायिकतेचं उत्तम भान या दशकातल्या सिनेमांना होतं. प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला.
कथा, चष्मेबद्दूर, अर्थ, सिलसिला, अर्धसत्य, मासूम, उत्सव, सारांश, उमराव जान, अंकुश, पुष्पक, मिर्चमसाला, कयामत से कयामत तक, तेजाब, मिस्टर इंडिया, मैने प्यार किया.. असे अनेक तर्‍हांचे सिनेमे या दशकात येऊन गेले आणि त्याचा ठसा अजूनही आहे.

प्रत्येकाचा सिनेमा वेगळा. प्रत्येकाची सिनेमा बघण्याची कारणे वेगळी. प्रत्येकाकरता सिनेमाचा अर्थही वेगळा.

सिनेमांवर अभ्यासूपणाने, बारिकसारीक संदर्भांसहीत, तांत्रीक गोष्टी, दिग्दर्शन, अभिनय सर्वांवरच लिहिणारे, बोलणारे, चर्चा करणारे, चर्चासत्र भरवणारे असंख्य जण आजूबाजूला असतात.

सिनेमावर कोणी जुन्या आठवणी उगाळत, नव्या सिनेमांवर कडवटपणे लिहितात, कोणी एखादा दिग्दर्शक पकडून त्याच्या सिनेमांची चिरफ़ाड करत, स्क्रिप्ट उतरवून काढल्यासारखे लेख लिहितात, कोणी गाणी एके गाणी करत त्यावरच लिहितात, कोणी निरस तांत्रिक बाबींवरच चर्चा करतात.. कोणी अती भावूकपणे डोळ्यातून टिपं गाळणारे लेख लिहितात, कोणी उथळ लिहितात, कोणी भरभरुन लिहितात.. मी सगळंच वाचते.
कारण मला हिंदी सिनेमा आवडतो.

दोन्ही हातांनी हिंदी सिनेमाच्या डिव्हिडीज उलट्या पालट्या करताना मनाला विलक्षण आनंद होत असतो.. मनातलं कोलाज झगमगून उठत असतं.

त्या त्या दिवसांतले मित्र-मैत्रिणी, जातात, रहातात, अधून मधून भेटतात किंवा कायमचेही दुरावतात. पण सिनेमा कायमच सोबत रहातो.

आठवणींमधे रुतून बसलेल्या, कायम सोबत असणार्‍या, आवडत्या सिनेमांबद्दल इतरांना सांगूनच सिनेमाचं देणं फ़ेडता येऊ शकेल कदाचित.

वाचत रहा..

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages