मराठीचा अभिमान :अओ:

Submitted by बेफ़िकीर on 2 May, 2012 - 06:58

मराठी भाषा नामशेष होईल, मराठी माणसाला खुद्द महाराष्ट्रातच दुय्यम स्थान मिळू शकेल व महाराष्ट्राबाहेरच्या जनतेच्या प्रभावाखाली महाराष्ट्रातील बहुतांशी व्यापार उदीम व इतर क्षेत्रे येऊ शकतील अशी भीती नेहमीच व्यक्त करण्यात येते. प्रत्येकाचे एक अनुभवविश्व असल्याने प्रत्येकाचा एक दृष्टिकोनही असणार व ते समर्थनीय आहेच. मुंबईतील सामान्य नागरीकाला गुजराथी, दाक्षिणात्य व उत्तर प्रदेशी नागरीकांचे वाढते वास्तव्य व प्रभाव बिथरवेल तर कोल्हापूर, सातारा अशा शहरांमध्ये ही अडचण भेडसावणे तुलनेने कमी असेल.

मात्र मला काही मते व्यक्त करावीशी वाटत आहेत व उदार मनाने ती प्रकाशित होऊ द्यावीत अशी विनंती. ही मते दोन तीन विषयांवर आहेत, त्यामुळे अर्थातच एकाच लेखात दोन ते तीन विषय समाविष्ट होत आहेत.

१. भाषेचा अभिमानः

भाषा हे प्रथमतः संवादाचे माध्यम आहे. ज्यांना मराठीत संवाद करता येतात अथवा मराठी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांना ती केवळ त्यांच्या वाडवडिलांकडून वारश्यात मिळालेले एक संवादाचे माध्यम आहे. या उपर मराठी किंवा कोणत्याच भाषेला काही महत्व नाही. भाषेत निर्माण होणारे साहित्य अथवा भाषा बोलणार्‍या लोकांची संख्या यावर भाषेचा दर्जा ठरणे चूक वाटते. मराठीत ज्ञानेश्वर, तुकाराम व इतर महान संत व कवी तसेच लेखक झाले यामुळे मराठी मोठीही होत नाही आणि त्या लोकांच्या महानतेत मराठीचे श्रेयही काही नाही. त्यांनी उपलब्ध त्या संवादाच्या माध्यमातून त्यांचे संवाद केले इतकेच.

मराठी हे एका प्रदेशात निर्माण झालेले संवादाचे माध्यम आहे. आंधळे जसे ब्रेल लिपीतून अथवा मुके जसे हातवार्‍यातून संवाद साधतील तसेच प्रत्येक भाषा अधिक अचूक पद्धतीने संवादनिर्मीती करते. मराठी या भाषेला प्राधान्य मिळावे ही भावना एखादे संकेतस्थळ राबवू शकेल, पण समाजामध्ये ती भावना सर्वमान्य व्हावी (मराठेतरांनाही मान्य व्हावी - निदान महाराष्ट्रापुरती) हे अशक्य आहे. माध्यमे, विशेषतः चित्रपट यातून मराठीपेक्षा कितीतरी इतर भाषा (हिंदी, तेलगु) अधिक प्रभावीपणे रुजलेल्या आहेत. त्या रुजणे शक्य आहे तर मराठी का नाही आणि मराठीच्याबाबतीत इतका नकारात्मक दृष्टिकोन का असे विचारले गेल्यास उत्तर आहे की 'आपण ज्याला मराठीचा अभिमान वगैरे म्हणतो' तो मुळात आपल्याला नसतोच. म्हणजे मराठी माणसाला नसतो. आपल्याला मराठी रुजावी असे बेसिकली वाटत नाही अणि हे चुकीचेही नाही. मराठी माणूस प्रामुख्याने नोकरी व शेती या व्यवसायात असून शेतकर्‍याला मराठीतून काम साधता येत आहे व नोकरदार माणूस प्रगतीशील असल्याने जी भाषा प्रभावी आहे त्यात बोलू लागतो.

जेनेटिकली व हिस्टॉरिकली (आँ?) मराठी माणूस हा अभिमान, जाज्वल्ल्य अभिमान वगैरेपासून दूरच असतो. काही प्रमाणात यातच त्याच्या विकसनशीलतेचे गुपीतही दडलेले असू शकते. 'ज्याने काम साधते त्या भाषेत मी बोलणार' हा त्याचा सहसा दृष्टिकोन असतो.

दुसरे कारण म्हणजे मराठी माणूस दुबळा आहे. आपल्या समाजात आज असलेले मराठी अभिमानशाहीचे पक्ष, जसे शिवसेना , मनसे हे देशाच्या राजकारणाच्या संदर्भात क्षुल्लक पक्ष आहेत. मुळात त्यांचे स्वरूप राष्ट्रीय नाही. त्यात पुन्हा त्यांचा वकूबही त्यांनी मुंबई व महाराष्ट्रापुरताच मर्यादीत ठेवलेला आहे. बिहार्‍यांना हाकलून देण्याने काहीही होणार नाही आहे. मराठी माणसाला कष्ट शिकवायला हवे आहेत, जे कोणीच करत नाही. कष्ट करणारे अनेक प्रांतीय मराठी माणसांना येथेच येऊन सेवा पुरवत आहेत. त्या सेवा व सेवा पुरवण्यामागील कष्टाची तयारी हे मराठी माणसाला 'रेडिमेड' मिळत आहे. ते 'सोप्पे' आहे. 'सोप्पे' करण्याकडे कोणाचाही व खास करून मराठी माणसाचा नैसर्गीक कल असतो. हे आपल्या इतिहासातील फितुरी, भ्रष्टाचार यातून सातत्याने दिसतेच.

तिसरी गोष्ट म्हणजे 'हक्काची भावना'! मराठी माणसाला महाराष्ट्र, पुणे, मुंबई किंवा आपली भाषा ही आपल्या हक्काची वाटणे हेच मुळात गैर आहे. ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो तो संस्थाने खालसा झाल्यावर या स्वरुपात आलेला आहे. ज्याला देश म्हणतो तो गेली साठ पासष्ट वर्षे अस्तित्वात आहे. देश ही संकल्पना त्यामानाने अधिक प्रभावी आहे. याचे कारण देश या भूमीला एकच कायदा लागू होत आहे. एकच शासनपद्धती आहे. त्यामुळे 'ज्यांना देश या संकल्पनेबाबत फारसे काही वाटत नाही' किंवा 'वाटल्याचे कधी दिसत नाही' अशांनी मराठी भाषा व महाराष्ट्राबाबत प्रेमभावना बाळगणे हे गंमतीशीर आहे. उद्या बिहारमध्ये मुद्दाम मराठी शाळा काढतील आणि त्याचा उपयोग बिहारींना महाराष्ट्रात पाठवण्यासाठी करतील. तसे केल्यास केवळ त्या पाठवलेल्यांना मराठी येते म्हणून आपण त्यांना आनंदाने स्वीकारणार नाही. समजा एकेका परप्रांतीयाला शोधून बाहेर पाठवायचे ठरवले तर देशाचा कायदा आडवा येईल. समजा उद्या आठ कोटींऐवजी महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी झाली आणि वाढीव चार कोटींपैकी तीन कोटी परप्रांतीयच असले तर आपोअपाच संवादाचे साधन म्हणून मराठी कमी पडू लागेल. या बाबतीत कायदा असू शकत नाही. याचे कारण 'देशाचा' कायदा लागू पडतो. याबाबतीत मनातल्या मनात काहीतरी ध्येय ठरवूनही काही होऊ शकत नाही कारण त्याला कोणतेच खास स्वरूप नसते.

चळवळ हा चौथा प्रकार आहे. मराठी माणूस (पुन्हा मातीचाच गुण की काय) सामाजिक व जाहीर पातळीवर काही एक बोलतो व स्वतःच्या घरात दुसरेच राबवतो. ही बाब मात्र अशी आहे की जी केवळ मराठीच करतो असे नाही तर कोणीही करतोच. आपण इंग्रजी माध्यमात मुलांना पाठवणार, त्यांना ते पाचवीत असताना सेल फोन देणार आणि त्यावरचे एसेमेस इंग्रजीत असणार, आपण त्यांना फेसबूक वापरायला देणार जे इंग्रजीत असणार आणि शेवटी त्यांना परदेशात पाठवणार जेथे (बहुतांशी अशा देशात की) इंग्रजीच बोलली जाते. मग इतके असले तर मराठीचा अभिमान हवाय कशाला? भारतात असलेला सर्वात आवडता खेळ साहेबाचा आहे, शासनपद्धतीचे अधिष्ठान साहेबाचे आहे, ९० टक्क्याहून अधिक व्यापार साहेबाच्या भाषेत चाललेला आहे मग मराठीचा अभिमान कशासाठी हवा आहे? काही जण मराठीत बोलतात हे पुरे आहे की?

पाचवा प्रकार म्हणजे मराठी बोलण्यात मिळणारी सहजता आपल्याला (मराठी भाषिकाला - व असेच प्रत्येक इतर भाषिकाचे परभाषेबाबत) इतर भाषा बोलताना मिळत नाही. आपली ती मातृभाषा नसते. यामुळे आपल्याला किंचित प्रमाणात परकीय झाल्यासारखे वाटते. पण पैसा मात्र त्याच परकीय भाषेचा वापर करून मिळत असतो. त्यामुळे अगदी हिंदी म्हणालो तरी परकीय वाटत असले तरी साहेब उत्तर हिंदुस्तानी असल्यास झक मारत हिंदी स्वीकारावी लागते. अगदी तो पुण्यात मीटिंगला आला तरी. मग मारवाड्यांनी काय घोडे मारले आहे? ते तर कोणत्याही हिंसक किंवा भाषिक चळवळीत सामील नसतात.

मराठी भाषेचा अभिमान ही एक काल्पनिक संकल्पना असून तिचा नेमका अर्थ काय हे सांगायला जाणारे फक्त बिहारी, मारवाडी, गुजराती आणि शेट्टींबाबत नापसंती व्यक्त करत असतात असे दिसते.

मराठी भाषा मेली तर काय? :-

कधी मरेल? जेव्हा मराठी बोलणारा शेवटचा माणूस मरेल तेव्हा. शेवटचा माणूस कधी जन्माला येईल? जेव्हा मराठी ही मातृभाषा म्हणून स्वीकारणारे शेवटचे कुटुंब अशा माणसाला जन्म देईल तेव्हा. याचाच अर्थ कौटुंबिक पातळीवर मराठीचा प्रसार आवश्यक आहे. हे असे असताना 'हे डॅडी' आणि 'हाय मॉम' हे स्वीकारणारे आपणच. 'गर्ल फ्रेन्ड' आणि 'बॉय फ्रेन्ड' हे आमच्या लहानपणी (एक म्हणण्याची पद्धत 'आमच्या' - माझ्या म्हंटले की वजन कमी होते असे मराठी साहित्यिकांनी बनवलेले मूर्ख मत) 'बापरे' करून हासण्याच्या लायकीचे शब्द होते. आजकाल मुली 'ओह ही इज जस्ट अ फ्रेन्ड ऑफ माईन, नॉट अ बॉय फ्रेन्ड डॅड' म्हणताना दिसतात. संस्कृती बदलली ठीक, पण 'नुसता मित्र आहे, प्रियकर नाही' हे वाक्य ऐकायला जड जाईल ना? त्यामुळे इंग्रजीचा सहारा. मग मराठी मेली तर काळजी कसली ? है की नै?

बरं मराठी मरेल म्हणजे नक्की काय होईल? आज जसे कोणी संस्कृत बोलत नाही तसे कोणी मराठी बोलणार नाही.तेव्हा तुम्ही आम्ही असू थोडेच? पण मग आजपासूनच काळजी घ्यायला हवी ना, असे विचारणार्‍यांना पुढचा प्रश्न. कसली काळजी? प्रत्येक भाषा मरतेच. केव्हा ना केव्हातरी मराठीही मरणारच.

मराठीतील श्रेष्ठतम साहित्य नष्ट होईल? किंवा कालबाह्य होईल किंवा अज्ञातवासात जाईल? आज काय करतोय आपण त्या साहित्याचे? आपण तर मुलांना इंग्रजी वाचायला लावतो. घरात मला हवे तसे आणि बाहेर समाजाला हवे तसे आपण वागतोच की?

महाराष्ट्रात परभाषिक आले तर? :-

आपण जाऊ बाकीच्या राज्यात! तिथे संधी नसतील तर निर्माण करू. पहिले शेट्टी उपहारगृह तयार करण्यापूर्वी तो शेट्टी मराठी भोजनालयात वेटर थोडीच होता पुण्यातल्या? तो आला तो थेट डोसा उत्तप्पा घेऊनच आला की?

आपण अमेरिकेत जातोच की? तो तर वेगळा देश असूनही आपल्याला (त्यांच्या कायद्यानुसार फिट्ट असलो तर) स्वीकारतो. महाराष्ट्र तर काय? भारताचे एक राज्य. इथे कोण अडवणार?

आपण काढू दोन खोल्यांपैकी पुढच्या खोलीत किराणा मालाचे दुकान आणि मागच्या खोलीत बेडरूम कम स्वयंपाकघर कम लिव्हिंग रूम?

आपली तर बुवा अशी मते आहेत.

तुम्ही हवे तर अनुमोदन द्या नाहीतर या मतांना उडवून लावा.

पण मला मते बदलता आली तर नक्की आपले आभार मानेन.

धन्यवाद (लेख वाचल्याबद्दल) Happy (शीर्षकात स्मायलीची अक्षरे मुद्दाम तशीच दिली आहेत)

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

छान

भाषा हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे.

भाषा संवर्धन वगैरे बकवास गोष्टी आहेत, ते ठरवून होत नसते.

जग असेपर्यंत माणूस व्यक्त होण्यासाठी बोलून साध्य होत असलेली कुठलीतरी भाषा वापरणारच, सगळ्याच भाषा संपल्या तर त्यावेळचा माणूस नवीन भाषा निर्माण करेल.

उर्दूची निर्मिती हे अशा प्रकारचे एक उदाहरण मला वाटत आहे.

अपभ्रंश ह्या भाषेचा अंत हे ही भाषा नष्ट झाल्याचे उदाहरण.

हम्म. पण हा प्रश्न मला वाटते नुसता मराठी पुरता नसून सर्व भारतीय भाषांचा आहे. कदाचित तमिळ आणि गुजराती ह्याला अपवाद म्हणून असेल पण ह्याही भाषांना असा प्रश्न कधी ना कधी भेडसावेलच. हिंदीपेक्षा इंग्रजीचा प्रभावाच जास्त ऱ्हासाला जास्त कारणीभूत आहे. नसीम तालेब सारखा लेखक पण म्हणतो इंग्रजी ही किलर भाषा आहे. पण ह्याला काही उपाय आहे असे वाटत नाही. जर लोकांना वाटले तरच भाषा जगेल. असो.

मस्त... एकदम रोखठोक आणि 'रिअलिस्टिक'! उगाच फुकाच्या गप्पा आणि भावनात्मक आवाहनं नाहीत. आवडला लेख.

मलाही हा लेख रोखठोक वाटला... ' त्या' लेखातील अनेक गोष्टी पटल्या नव्हत्या... इंग्रजी, हिंदी शिकूच नका, असा हेका लावलेला तर अजिबातच आवडला/पटला नव्हता... पुलं इंग्रजी शिकले नसते तर आज किती तरी त्यांचं साहित्य आस्तित्वातच आले नसते.

परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा,तरी |
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ||
भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे
|गुलाम भाषिक होऊनी आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका ||
- कुसुमाग्रज

अमुक भाषेला विरोध, तमुक लोकाना विरोध यात संस्कृती रक्षणापेक्षा राजकीय कारणेच जास्त असतात.

भारत हा एक देश आहे. इथे आपल्याच देशातल्या कुणा भाषेला, कुण्या लोकाना परप्रांतीय म्हणणं हेच पटत नाही.

सगळा नाही पटला, पण आवडला.
भाषा हि प्रवाही असते, असावी. यात नवेनवे शब्द येत राहणारच. वाक्यरचनाही बदलणार. त्यावर इतर भाषांचा प्रभाव पडणारच. मग त्याला भाषेची भेसळ म्हणायची,
कि भाषा समृद्ध झाली असे म्हणायचे ?
आपल्याला ज्ञानेश्वरीतली भाषा, आज शिकून घ्यावी लागते. पण त्याकाळी ती भाषा
सर्वांना सहज कळत होती, म्हणून तर ती रचना, त्या भाषेत झाली.
त्यावेळी होती ती मराठी, आता आपण बोलतो ती मराठी आणि काही वर्षांनी बोलू, तीदेखील मराठीच असेल.

>>अँटीमॅटर | 2 May, 2012 - 17:11
भाषेचा अभिमान असावा दूराभिमान नको.

-- तुमच्या प्रतिसादातला 'दूराभिमान' शब्द पटला. दूराभिमान = दूर राहून अभिमान Happy

अत्यंत पटले आणि नवरा युपीचा आहे म्हणून जास्तच भावला हा लेख. Proud

मराठी = शिवाजी महाराज याचाही अतिरेक झालाय. नुसताच अभिमान अभिमान असं ओरडून काय फायदा? खरंतर अजूनही शिवाजी महाराजांनाच वापरावं लागतय ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यानंतर कोणी इतकं उत्तुंग झालंच नाही का? नसेल तर का नाही? विचार करा.

आपली माणसं अमेरीकेत जाऊन स्वतःची संस्कृती जपतातच ना? मग गुजराथ्यांनी, बिहारींनी इथे येऊन त्यांची जपली तर काय बिघडतं? मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात इतर राज्यांत राहणार्‍या काही जणांचे अनुभव वाचले. त्यातल्या गुजरातमध्ये राहणार्‍याने गुजराथी लोकांबद्दल किती सुंदर लिहिले होते. आपण उगाच इतरांबद्दल कडवटपणा दाखवतो. जर आपल्याकडे गुण असतील तर ते इतर ओळखतीलच. मुळात आपल्यात इतरांनी ओळखण्याइतके गुण आहेत का? हे तपासावे लागेल.

मध्यंतरी बिहारी लोकांना त्यांच्या राज्यात परत पाठवले म्हणून नाशिकमधल्या उद्योगधंद्यावर परिणाम झाला होता.

एक साधंच उदाहरण म्हणजे अनेक मराठी ड्रायव्हर ठेऊन अनेक प्रकारचे अनेक मनस्ताप भोगून झाल्यावर आताचा माझा युपीचा ड्रायव्हर गेली अनेक वर्षे आमच्याकडे टिकला आहे. कारण त्याचा अ‍ॅटिट्युड, वागण्या-बोलण्यातली नम्रता, वक्तशीरपणा, सतत हसतमुखाने काम करण्याची इच्छा. जी गोष्ट माझ्या अनुभवातल्या एकाही मराठी ड्रायव्हरकडे नव्हती. मुळात (माझ्यासकट) मराठी माणसात सॉफ्ट स्किल्स कमीच असतात बहुधा.

हे म्हणजे..कधीतरी मरायचंच आहे ना...मग कशाला घ्या काळजी,कशाला करा उपचार?
संपूर्ण जीवनाकडेच आपण असे पाहणार असू तर मग ठीक आहे...चालून जाईल....पण हे शक्य आहे का?
मी,माझे,आपले,आमचे...हे शब्द आधी हद्दपार करा आणि मग वैश्विकतेच्या गप्पा मारा.
बाकी चालू द्या...युक्तिवाद! Happy

या लेखाबद्दल म्हणायचं तर थोडा पटला थोडा नाही...

अवांतर... वरती तुम्ही आंधळा हा शब्द लिहिला आहे तो जरा दाताखाली येतोय्...त्याजागी अंध शब्द जास्त बरा वाटेल्....
वाटलं तर घ्या... Happy

मराठीचा आभिमान :अ ओ

या लेखातील 'अ ओ ' वगळता सर्व कळले.

तुका म्हणे उगी राहावे
जे जे होईल ते पहावे.

हे उमजले.

मला एक सांगावस वाटतं
केरळचा अनुभव आलाय त्यामुळे तिथलंच सांगते.
केरळमध्ये तुम्हाला रहायच असेल तर तुम्हाला मल्याळम शिकावीच लागते. मला शिकावीच लागली.
अगदी लिपी देखील.
तिथे अगदी बसचे बोर्डदेखील मल्याळम मध्ये असतात. त्या लोकांना हिंदी येत नाही याचा त्यांना अभिमान वाटतो.आणि इंग्रजी येत असुनही अगदीच वाईट परिस्थिती झाली तरच ते ती वापरतात.
मला वाटतं म्हणुनच दुबईतही शिक्षणासाठी दक्षिण भारतीय भाषा उपलब्ध करुन दिल्या जातात.
आणि मराठीबद्दल सांगायचं झालं तर माझी एक बिहारी मैत्रिण मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली तरी तिला मराठी "पुढे चला" याखेरिज येत नाही. का विचारल्या उतर हे की मुंबईमध्ये कोणी मराठी बोलतच नाही.
अगदी आजचा प्रसंग चिंचवडमध्ये एका दुकानात गेलेले, मी मराठीतुन बोलत होते तरी उत्तर इंग्रजीतुन मिळत होती. कारण विचारल्यास म्हणे मराठीमध्ये बोलण्याची आम्हाला परवानगी नाहिये
ते प्रोफेशनल दिसत नाही म्हणे.हे अस केरळमध्ये कधीच झालं नसतं.
हा इतर राज्यातला आणि आपल्या राज्यातला फरक मला जाणवला म्हणून मी त्याला उत्तर दिलं की तुला माझ्याशी बोलायचं असेल तर मराठीतुनच बोल नाही तर दुसर्‍याला पाठवं..
हा नक्कीच फुकटचा अट्टाहास नाहीये. मला माझ्या भाषेबद्दल अभिमान आहे आणि इतर कोणी अपमान करत असेल तर माझ्याकडुन शांत बसवलं जाणार नाही.

राहिली गोष्ट परभाषिकांनी आपल्या राज्यात यायची तर मला एक सांगायला आवडेल मला कोची मध्ये एक मल्याळम बोलणारा बिहारी दुकानदार भेटला. त्याला विचारलं मल्याळम कसा शिकलास तर म्हणाला त्याशिवाय मी इथे जगुच शकलो नसतो
मला वाटतं आपल्याकडे पण हेच झालं पाहिजे म्हणजे मराठीला डाऊनमार्केट म्हणलं जाणार नाही
अर्थात हे माझं वैयक्तीक मत आहे.

रीया,

>> मला वाटतं आपल्याकडे पण हेच झालं पाहिजे म्हणजे मराठीला डाऊनमार्केट म्हणलं जाणार नाही

१०० % अनुमोदन! त्याकरिता मंत्रालायातली मराठीद्वेष्टी लॉबी मोडून काढावी लागेल.

आ.न.,
-गा.पै.

अहो रत्नागिरी परिसरात आंब्याच्या बागांमध्ये कामासाठी आणि राखणेसाठी परप्रांतीय मजूर आणि नेपाली गुरखे ठेवावे लागतात,आता बोला ...............

मराठी माणसात कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे ,हे खरे आहे

काहीतरी मूलभूत स्वरूपाचा बदल मराठी समाजाने आपल्या वृत्ती मध्ये केला पाहिजे

रीया, तुझा प्रतिसाद फार आवडला. छानच लिहिले आहेस. Happy

पण मराठी माणसे जितकी इतरभाषिकांना समाविष्ट करून घेतात तितक केरळीय लोक करताना दिसत नाहीत. हे देशाच्या कायद्यानुसार चुकीचे धोरण आहे व ते प्रभावीपणे राबवले जात आहे. भारतातील कोणत्याही माणसाला हिंदी अथवा इंग्लिशमध्ये देशभर कुठेही संवाद साधता यायला काय हरकत असावी? Happy नाही का?

येथिल माझा आधीचा प्रतिसाद बहुधा उडवला गेलेला दिस्तोय! ठीके!
मी पुन्हा नोन्दवतो, माझेपर्यन्त कळकळ पोचली, पण लेखात व्यक्त केलेल्या मतांशी मी असहमत आहे.
(प्रत्येक वाक्यावाक्याचा प्रतिवाद करायला/त्यातिल भीषण गर्भितार्थ नेमका उचकटवुन मान्डायला मला आवडले अस्ते, पण वेळेअभावी सध्यातरी शक्य नाही Sad ) असो.

रीयाला १०० % अनुमोदन.

मराठी माणसात कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे >>>>> मराठी समाजात शिक्षणाचे प्रमाण बिहारी किंवा उत्तर भारतियांपेक्षा जास्त असावे. म्हणून आपण शारिरीक कष्टात कमी पडतो.

रिया, अगदी बरोब्बर!
अन शिवाय इकडे अन तिकडे एक फरक आहेच आहे.
इकडे तुम्ही "मराठीतच बोला" असा आग्रह धरु लागल्यास, उच्चशिक्षित विद्वान लोक लगेच तर्‍हतर्‍हेचे बौद्धिक फाटे फोडत असा आग्रह कसा चूक आहे हे तुमच्या आमच्या माथी मारू लागतात. किम्बहुना, अशा तर्‍हेने नेमके उलटे सुचवित जाणे/बोलता येणे हे इकडील "प्रतिष्ठितपणाचे/सो कॉल्ड सोबर माणसाचे" लक्षण बनले आहे. सर्वधर्मसमभाव तसाच सर्वभाषासमभाव यान्चे अन्गी अगदी ठासून भरलेला असतो, बहुतेक वेळा अशा बहुतेकान्ची पुढची पिढी कॉन्वेन्ट मधे शिकुन परदेशात स्थाईक व्हायच्या तयारित असते व त्यान्ना खरेतर "मराठी" जगली काय की मेली काय याचेशी काहीच सोयर सुतक नसते, बस्स, आला दिवस जरा शान्ततेत सुखाने जावा इतक्याच मोजक्या अपेक्षेने कसल्याही आन्दोलनान्ना यान्चा विरोधच अस्तो. तेव्हा हे असेच चालायचे.
चिन्चवडच्याच मोरया गोसावी मन्दिराबाहेरील दुकानात जेव्हा बायकोला हिन्दी बोलावे लागले तेव्हा मी तडकलोच होतो की इथे इतक्या गाभ्यात देखिल दुसरी भाषा बोलावी लागत असेल तर मराठीच्या थडग्याची ही सुरवात आत्तापासूनच करावी हेच बरे!
"समोरच्याने कोणती भाषा बोलावी हा आग्रह/सक्ति धरता येत नाही, पण तुमच्या थोबाडातुन कोणती भाषा बाहेर पडावी हे तर तुम्हीच ठरवु शकता ना? तर मग मराठीतच बोल" या शब्दातच लिम्बीला त्या दुकानदारासोबतच सुनावल्यावर, दुकानदार नन्तर आपसुक तोडक्यामोडक्या मराठीत बोलू लागला हे सान्गणे न लगे. दरवेळेस तसे घडेलच असे नाही.
मराठी सोडून अन्य भाषा माझ्या शत्रुन्च्या नाहीत, पण मराठी टिकवायची असेल, तर दैनन्दिन बोली भाषेत मराठीचा वापर "निदान महाराष्ट्रात तरी Sad अनिवार्यच अस्ला पाहिजे. मग या अपेक्षेला, वरील लेखात/प्रतिसादात व्यक्त केल्याप्रमाणे कोणीही कितीही कसलेही रन्ग चढवोत. अन हेच ते मराठी पण / मराठी बाणा मराठीला तगवेल असा विश्वासही आहे.

>>> मराठी माणसात कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी आहे

असहमत! महाराष्ट्रात बहुसंख्य नागरिकांचा व्यवसाय शेती व शेतीशी संबंधित कामे हा आहे. या व्यवसायात भरपूर शारीरीक कष्ट करावे लागतात. महाराष्ट्रात प्रथमपासूनच मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. त्यात सुद्धा ब्ल्यू कॉलर कर्मचार्‍यांना भरपूर शारीरीक कष्ट करावे लागतात. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे.

Pages