मराठीचा अभिमान :अओ:

Submitted by बेफ़िकीर on 2 May, 2012 - 06:58

मराठी भाषा नामशेष होईल, मराठी माणसाला खुद्द महाराष्ट्रातच दुय्यम स्थान मिळू शकेल व महाराष्ट्राबाहेरच्या जनतेच्या प्रभावाखाली महाराष्ट्रातील बहुतांशी व्यापार उदीम व इतर क्षेत्रे येऊ शकतील अशी भीती नेहमीच व्यक्त करण्यात येते. प्रत्येकाचे एक अनुभवविश्व असल्याने प्रत्येकाचा एक दृष्टिकोनही असणार व ते समर्थनीय आहेच. मुंबईतील सामान्य नागरीकाला गुजराथी, दाक्षिणात्य व उत्तर प्रदेशी नागरीकांचे वाढते वास्तव्य व प्रभाव बिथरवेल तर कोल्हापूर, सातारा अशा शहरांमध्ये ही अडचण भेडसावणे तुलनेने कमी असेल.

मात्र मला काही मते व्यक्त करावीशी वाटत आहेत व उदार मनाने ती प्रकाशित होऊ द्यावीत अशी विनंती. ही मते दोन तीन विषयांवर आहेत, त्यामुळे अर्थातच एकाच लेखात दोन ते तीन विषय समाविष्ट होत आहेत.

१. भाषेचा अभिमानः

भाषा हे प्रथमतः संवादाचे माध्यम आहे. ज्यांना मराठीत संवाद करता येतात अथवा मराठी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांना ती केवळ त्यांच्या वाडवडिलांकडून वारश्यात मिळालेले एक संवादाचे माध्यम आहे. या उपर मराठी किंवा कोणत्याच भाषेला काही महत्व नाही. भाषेत निर्माण होणारे साहित्य अथवा भाषा बोलणार्‍या लोकांची संख्या यावर भाषेचा दर्जा ठरणे चूक वाटते. मराठीत ज्ञानेश्वर, तुकाराम व इतर महान संत व कवी तसेच लेखक झाले यामुळे मराठी मोठीही होत नाही आणि त्या लोकांच्या महानतेत मराठीचे श्रेयही काही नाही. त्यांनी उपलब्ध त्या संवादाच्या माध्यमातून त्यांचे संवाद केले इतकेच.

मराठी हे एका प्रदेशात निर्माण झालेले संवादाचे माध्यम आहे. आंधळे जसे ब्रेल लिपीतून अथवा मुके जसे हातवार्‍यातून संवाद साधतील तसेच प्रत्येक भाषा अधिक अचूक पद्धतीने संवादनिर्मीती करते. मराठी या भाषेला प्राधान्य मिळावे ही भावना एखादे संकेतस्थळ राबवू शकेल, पण समाजामध्ये ती भावना सर्वमान्य व्हावी (मराठेतरांनाही मान्य व्हावी - निदान महाराष्ट्रापुरती) हे अशक्य आहे. माध्यमे, विशेषतः चित्रपट यातून मराठीपेक्षा कितीतरी इतर भाषा (हिंदी, तेलगु) अधिक प्रभावीपणे रुजलेल्या आहेत. त्या रुजणे शक्य आहे तर मराठी का नाही आणि मराठीच्याबाबतीत इतका नकारात्मक दृष्टिकोन का असे विचारले गेल्यास उत्तर आहे की 'आपण ज्याला मराठीचा अभिमान वगैरे म्हणतो' तो मुळात आपल्याला नसतोच. म्हणजे मराठी माणसाला नसतो. आपल्याला मराठी रुजावी असे बेसिकली वाटत नाही अणि हे चुकीचेही नाही. मराठी माणूस प्रामुख्याने नोकरी व शेती या व्यवसायात असून शेतकर्‍याला मराठीतून काम साधता येत आहे व नोकरदार माणूस प्रगतीशील असल्याने जी भाषा प्रभावी आहे त्यात बोलू लागतो.

जेनेटिकली व हिस्टॉरिकली (आँ?) मराठी माणूस हा अभिमान, जाज्वल्ल्य अभिमान वगैरेपासून दूरच असतो. काही प्रमाणात यातच त्याच्या विकसनशीलतेचे गुपीतही दडलेले असू शकते. 'ज्याने काम साधते त्या भाषेत मी बोलणार' हा त्याचा सहसा दृष्टिकोन असतो.

दुसरे कारण म्हणजे मराठी माणूस दुबळा आहे. आपल्या समाजात आज असलेले मराठी अभिमानशाहीचे पक्ष, जसे शिवसेना , मनसे हे देशाच्या राजकारणाच्या संदर्भात क्षुल्लक पक्ष आहेत. मुळात त्यांचे स्वरूप राष्ट्रीय नाही. त्यात पुन्हा त्यांचा वकूबही त्यांनी मुंबई व महाराष्ट्रापुरताच मर्यादीत ठेवलेला आहे. बिहार्‍यांना हाकलून देण्याने काहीही होणार नाही आहे. मराठी माणसाला कष्ट शिकवायला हवे आहेत, जे कोणीच करत नाही. कष्ट करणारे अनेक प्रांतीय मराठी माणसांना येथेच येऊन सेवा पुरवत आहेत. त्या सेवा व सेवा पुरवण्यामागील कष्टाची तयारी हे मराठी माणसाला 'रेडिमेड' मिळत आहे. ते 'सोप्पे' आहे. 'सोप्पे' करण्याकडे कोणाचाही व खास करून मराठी माणसाचा नैसर्गीक कल असतो. हे आपल्या इतिहासातील फितुरी, भ्रष्टाचार यातून सातत्याने दिसतेच.

तिसरी गोष्ट म्हणजे 'हक्काची भावना'! मराठी माणसाला महाराष्ट्र, पुणे, मुंबई किंवा आपली भाषा ही आपल्या हक्काची वाटणे हेच मुळात गैर आहे. ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो तो संस्थाने खालसा झाल्यावर या स्वरुपात आलेला आहे. ज्याला देश म्हणतो तो गेली साठ पासष्ट वर्षे अस्तित्वात आहे. देश ही संकल्पना त्यामानाने अधिक प्रभावी आहे. याचे कारण देश या भूमीला एकच कायदा लागू होत आहे. एकच शासनपद्धती आहे. त्यामुळे 'ज्यांना देश या संकल्पनेबाबत फारसे काही वाटत नाही' किंवा 'वाटल्याचे कधी दिसत नाही' अशांनी मराठी भाषा व महाराष्ट्राबाबत प्रेमभावना बाळगणे हे गंमतीशीर आहे. उद्या बिहारमध्ये मुद्दाम मराठी शाळा काढतील आणि त्याचा उपयोग बिहारींना महाराष्ट्रात पाठवण्यासाठी करतील. तसे केल्यास केवळ त्या पाठवलेल्यांना मराठी येते म्हणून आपण त्यांना आनंदाने स्वीकारणार नाही. समजा एकेका परप्रांतीयाला शोधून बाहेर पाठवायचे ठरवले तर देशाचा कायदा आडवा येईल. समजा उद्या आठ कोटींऐवजी महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी झाली आणि वाढीव चार कोटींपैकी तीन कोटी परप्रांतीयच असले तर आपोअपाच संवादाचे साधन म्हणून मराठी कमी पडू लागेल. या बाबतीत कायदा असू शकत नाही. याचे कारण 'देशाचा' कायदा लागू पडतो. याबाबतीत मनातल्या मनात काहीतरी ध्येय ठरवूनही काही होऊ शकत नाही कारण त्याला कोणतेच खास स्वरूप नसते.

चळवळ हा चौथा प्रकार आहे. मराठी माणूस (पुन्हा मातीचाच गुण की काय) सामाजिक व जाहीर पातळीवर काही एक बोलतो व स्वतःच्या घरात दुसरेच राबवतो. ही बाब मात्र अशी आहे की जी केवळ मराठीच करतो असे नाही तर कोणीही करतोच. आपण इंग्रजी माध्यमात मुलांना पाठवणार, त्यांना ते पाचवीत असताना सेल फोन देणार आणि त्यावरचे एसेमेस इंग्रजीत असणार, आपण त्यांना फेसबूक वापरायला देणार जे इंग्रजीत असणार आणि शेवटी त्यांना परदेशात पाठवणार जेथे (बहुतांशी अशा देशात की) इंग्रजीच बोलली जाते. मग इतके असले तर मराठीचा अभिमान हवाय कशाला? भारतात असलेला सर्वात आवडता खेळ साहेबाचा आहे, शासनपद्धतीचे अधिष्ठान साहेबाचे आहे, ९० टक्क्याहून अधिक व्यापार साहेबाच्या भाषेत चाललेला आहे मग मराठीचा अभिमान कशासाठी हवा आहे? काही जण मराठीत बोलतात हे पुरे आहे की?

पाचवा प्रकार म्हणजे मराठी बोलण्यात मिळणारी सहजता आपल्याला (मराठी भाषिकाला - व असेच प्रत्येक इतर भाषिकाचे परभाषेबाबत) इतर भाषा बोलताना मिळत नाही. आपली ती मातृभाषा नसते. यामुळे आपल्याला किंचित प्रमाणात परकीय झाल्यासारखे वाटते. पण पैसा मात्र त्याच परकीय भाषेचा वापर करून मिळत असतो. त्यामुळे अगदी हिंदी म्हणालो तरी परकीय वाटत असले तरी साहेब उत्तर हिंदुस्तानी असल्यास झक मारत हिंदी स्वीकारावी लागते. अगदी तो पुण्यात मीटिंगला आला तरी. मग मारवाड्यांनी काय घोडे मारले आहे? ते तर कोणत्याही हिंसक किंवा भाषिक चळवळीत सामील नसतात.

मराठी भाषेचा अभिमान ही एक काल्पनिक संकल्पना असून तिचा नेमका अर्थ काय हे सांगायला जाणारे फक्त बिहारी, मारवाडी, गुजराती आणि शेट्टींबाबत नापसंती व्यक्त करत असतात असे दिसते.

मराठी भाषा मेली तर काय? :-

कधी मरेल? जेव्हा मराठी बोलणारा शेवटचा माणूस मरेल तेव्हा. शेवटचा माणूस कधी जन्माला येईल? जेव्हा मराठी ही मातृभाषा म्हणून स्वीकारणारे शेवटचे कुटुंब अशा माणसाला जन्म देईल तेव्हा. याचाच अर्थ कौटुंबिक पातळीवर मराठीचा प्रसार आवश्यक आहे. हे असे असताना 'हे डॅडी' आणि 'हाय मॉम' हे स्वीकारणारे आपणच. 'गर्ल फ्रेन्ड' आणि 'बॉय फ्रेन्ड' हे आमच्या लहानपणी (एक म्हणण्याची पद्धत 'आमच्या' - माझ्या म्हंटले की वजन कमी होते असे मराठी साहित्यिकांनी बनवलेले मूर्ख मत) 'बापरे' करून हासण्याच्या लायकीचे शब्द होते. आजकाल मुली 'ओह ही इज जस्ट अ फ्रेन्ड ऑफ माईन, नॉट अ बॉय फ्रेन्ड डॅड' म्हणताना दिसतात. संस्कृती बदलली ठीक, पण 'नुसता मित्र आहे, प्रियकर नाही' हे वाक्य ऐकायला जड जाईल ना? त्यामुळे इंग्रजीचा सहारा. मग मराठी मेली तर काळजी कसली ? है की नै?

बरं मराठी मरेल म्हणजे नक्की काय होईल? आज जसे कोणी संस्कृत बोलत नाही तसे कोणी मराठी बोलणार नाही.तेव्हा तुम्ही आम्ही असू थोडेच? पण मग आजपासूनच काळजी घ्यायला हवी ना, असे विचारणार्‍यांना पुढचा प्रश्न. कसली काळजी? प्रत्येक भाषा मरतेच. केव्हा ना केव्हातरी मराठीही मरणारच.

मराठीतील श्रेष्ठतम साहित्य नष्ट होईल? किंवा कालबाह्य होईल किंवा अज्ञातवासात जाईल? आज काय करतोय आपण त्या साहित्याचे? आपण तर मुलांना इंग्रजी वाचायला लावतो. घरात मला हवे तसे आणि बाहेर समाजाला हवे तसे आपण वागतोच की?

महाराष्ट्रात परभाषिक आले तर? :-

आपण जाऊ बाकीच्या राज्यात! तिथे संधी नसतील तर निर्माण करू. पहिले शेट्टी उपहारगृह तयार करण्यापूर्वी तो शेट्टी मराठी भोजनालयात वेटर थोडीच होता पुण्यातल्या? तो आला तो थेट डोसा उत्तप्पा घेऊनच आला की?

आपण अमेरिकेत जातोच की? तो तर वेगळा देश असूनही आपल्याला (त्यांच्या कायद्यानुसार फिट्ट असलो तर) स्वीकारतो. महाराष्ट्र तर काय? भारताचे एक राज्य. इथे कोण अडवणार?

आपण काढू दोन खोल्यांपैकी पुढच्या खोलीत किराणा मालाचे दुकान आणि मागच्या खोलीत बेडरूम कम स्वयंपाकघर कम लिव्हिंग रूम?

आपली तर बुवा अशी मते आहेत.

तुम्ही हवे तर अनुमोदन द्या नाहीतर या मतांना उडवून लावा.

पण मला मते बदलता आली तर नक्की आपले आभार मानेन.

धन्यवाद (लेख वाचल्याबद्दल) Happy (शीर्षकात स्मायलीची अक्षरे मुद्दाम तशीच दिली आहेत)

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

मास्तुरेन्शी सहमत Happy मराठी माणुस कष्ट करण्यात कुठेच कमी पडत नाहीच, उलट दरवेळेस सरसच ठरतो.
[पण त्याचबरोबर, वर नताशाने मान्डलेल्या मुद्याशी देखिल विशिष्टप्रकारे सहमत... बाकी शिक्षणाचे सर्व प्रकार सोडून देऊन, पिढीजात व्यावसायीक शिक्षणाचे तर नावही न घेता, राजकीय मतान्चे गरजेपोटि कस्ल्यातरी सामाजिक की फामाजिक समरसता वगैरे घोषणा देत देत नै त्या अभियान्नन्तर्गत ज्या प्रकारचे (सामुहिक कॉपिन्गचा मराठवाडा/लातुर प्याटर्न सहित) शिक्षण देऊन "दहाव्वी बाराव्वी" पास झालेले "सुशिक्षीत" बेकार गावोगन्ना तयार होताहेत, त्यान्ची "अभिलाषा" जर टेबलखुर्चीवर बसुन काम करण्याची असेल, तर कष्ट न करू इच्छिणार्‍यान्ची सन्ख्या साहजिकच जास्ती दिसणार, पण इथे "मराठी भाषाभिमानाचा" काहीही संबन्ध नाही, वर "मी नताशा"ने म्हणल्याप्रमाणे, इकडे जे काय आहे त्या तथाकथित शिक्षणाचा प्रसार जास्त असल्याने अर्धवट बुद्धिमान्द्याने कष्ट न करु इच्छिनार्‍यान्ची तत्कालिक वाढलेली सन्ख्या दिसते यात नवल नाही, अजुन दहावीस वर्षात बाकी राज्यात देखिल हीच परिस्थिती असेल, इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात तर घरची असलेली शेतीवाडी कसायलाही कोणी माणुस गावान्मधुन शिल्लक उरणार नाही. पण तरीही याचा संबंध मी भाषाभिमानाशी जोडू शकत नाही. जोडायचा असेलच, तर ही विदारक होऊ घातलेली परिस्थिती बदळण्यास भाषाभिमानाचा उपयोगच होईल. अर्थात, तसे न होऊ देण्याकरता, अन ज्या जशा आहे त्या परिस्थितीचा "राजकीय" लाभ उचलण्याकरता, व वर उल्लेखिलेली अर्धवट बुद्धिमान्द्यत्व आलेली दहावी/बाराव्वी झालेली अमाप बेकार प्रजेच्या "असन्तोषाची" वाफ दुसरीकडे भलतीकडेच वळविण्याकरताचे नेहेमीचे उपाय म्हणजे ब्रिगेडी वगैरे चळवळिन्ना उठाव देणे हे होय! कुठून का होईना, कोणीही का भरडेना, पब्लिकचे लक्ष भलतीकडे वळवलेच पाहिजे हा राजकारणाचा पहिला मूलमन्त्र आम्ही नेमेची येतो पावसाळा या धर्तीवर नियमित बघतोच आहोत.]

भारताच्या बाकिच्या राज्यातील लोक इथे येऊन राहतात याचा अर्थ महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी जास्त आहेत, तुलनेने सुरक्षितता जास्त आहे, असा होत नाही का ?
केरळमधे भरपूर परदेशी पर्यटक येतात, त्यांच्यावर नाही होत ती सक्ती, मल्याळम
बोलायची ? हि मस्ती केवळ बाकिच्या राज्यातील लोकांसाठीच.

दिनेशदा ह्यांच्याशी सहमत. मुळातच महाराष्ट्र जास्त खुल्या मानाने बाकीच्यांना स्वीकारतो म्हणून इकडे लोक आले. बाकीच्या राज्यांपेक्षा नक्कीच जास्त सुरक्षित आणि रोजगाराच्या संधी आहेत म्हणून लोक येतात. वर जो किस्सा आहे की बिहारी ड्रायव्हर जास्त काम करतो तर ते स्वाभाविकच आहे. दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर माणूस स्वतःला स्थिरता येण्यासाठी जास्त काम करतोच. हेच लोक इकडे का बर आले? आणि तेही इतक्या प्रमाणात? माझ्या माहिती प्रमाणे गुजरातेत अनेक उच्च पदस्त मराठी लोक आहेत आणि त्यांच्या बद्दल पण असेच मत आहे की ही लोक जास्त प्रामाणिक आणि कामसू आहेत.

>>>> मुळातच महाराष्ट्र जास्त खुल्या मानाने बाकीच्यांना स्वीकारतो म्हणून इकडे लोक आले. बाकीच्या राज्यांपेक्षा नक्कीच जास्त सुरक्षित आणि रोजगाराच्या संधी आहेत म्हणून लोक येतात. <<<<
नक्कीच! हे तुमचे म्हणणे बरोबरच आहे.
प्रश्न उरतो की "ते तसे आहे" असे केवळ मान्य करुन पुढे जाण्याने, ते तसेच का आहे ही बाब दुर्लक्षिली जाते, की खरे तर "ते तसेच" असण्यामागे येथिल इतिहास्/सन्तमहन्त/अन होय, छ्त्रपती शिवाजी राजे देखिल कारणीभूत आहेत, त्यान्नाच विसरुन, किन्वा त्यान्ना तेवढेच विसरुन बाकी जगाच्या बाबी आत्मसात करायला निघालेल्या पूर्णत्वाने बुद्धिमान्द्य आलेल्यांबद्दल्/वा त्यान्चे आत्मघातकी/आत्मवन्शघातकी मतान्बद्दल काय बोलावे बरे?
महाराष्ट्रात सुरक्षितता का वाटते याच बरोबर, तुलनेत "हलकी कामे" करण्यासही महाराष्ट्रात सहजासहजी माणूस मिळत नाही यास जर कुणी "मराठी" माणसाचा शिष्टपणा वा कष्ट न करण्याची वृत्ती असे घाऊक मोजत असेल, तर ते अमान्यच करावे लागेल. महाराष्ट्रातही माणुस मिळतो हलकी कामे करण्यास, पण त्यास "गुलामासारखी" वागणूक देऊन चालत नाही, व ज्यास वर कुठेतरी कौतुकाने हसतमुख सर्व्हिस वगैरे लाळघोटेपणाच्या हान्जी हान्जी करणारान्च्या सारख्या अपेक्षा मान्डल्या आहेत त्याही त्याजकडून मिलत नाहीत, अन हे केवळ ड्रायव्हर वगैरे बाबतच नव्हे तर यच्चयावत ठिकाणी पहायला मिळेल, सबब, तुम्हाला "हुकुमाचे ताबेदार गुलाम" हवे असतील, तर महाराष्ट्रात शोधुच नका, कारण गेली कित्येक शतके, येथिल कुणीही गुलाम म्हणून रहायचे स्विकारलेले नाही! अन येथिल हीच वृत्ती जी येथिलच राकट देशा कणखर देशा, दगडान्च्या देशातुन ज्या भाषेतुन सन्वर्धित होत राहिली तिच्याबद्दल कुणाला लाज वाटत असेल, कमीपणा वाटत असेल, वा ती जगली काय मेली काय फरक पडत नसेल, तर त्यान्चे मत त्यान्ना लखलाभ.
कधी कधी भाताच्या राशीत देखिल गारगोटिचे खडे येतातच... तसेच हे. Proud
ताठ कण्याच्या मरहट्ट्यान्ना पावलापावलावर त्यान्नी झुकावे अशी अपेक्षाच कशी काय करतात बोवा लोकं? Proud

प्रश्न भाषेच्या जगण्या किंवा मरण्याबद्दल उपस्थित केलेला आहे ह्याचा विसर पडता कामा नये तेव्हा प्रतिसाद भाषे/भाषांच्या संदर्भात आले तर वाचायला बरे वाटेल.

>>> तेव्हा प्रतिसाद भाषे/भाषांच्या संदर्भात आले तर वाचायला बरे वाटेल. <<<<
नक्कीच Happy
फक्त मूळातुन आलेले प्रतिसाद ज्या शिवाजी ते ड्रायव्हर इत्यादिक मुद्यान्ना स्पर्ष करतात त्यान्ची दखल आधी घेतो आहे. मग मराठी भाषेच्या जगण्यामरण्याचे बघुच बघु हो! Happy

Lol

भारतातील कोणत्याही माणसाला हिंदी अथवा इंग्लिशमध्ये देशभर कुठेही संवाद साधता यायला काय हरकत असावी? नाही का?

>>>>>

हरकत नसावी. पण यामुळेच मराठी मागे पडत नाहीये का?
म्हणजे उगाच सो कॉल्ड स्टेटस सिंबॉलच्या नावाखाली मराठी बोलणं टाळणं हे चुकीचच नाही का?
आज मराठी शाळांमध्ये मुलगा शिकतोय म्हणल्यावर लोकं नाकं मुरडतात.
अगदी माझ्या स्वतःच्या बाबतीत लोकांना "ती मराठी शाळेत शिकुन पण आता एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतेय" हे अस म्हणताना ऐकलय Sad
मला इतकचं वाटतं जर तुम्हाला मराठी येत तर इतर भाषा मुद्दाम बोलण्याचा अट्टाहास का करावा?

कणखर,
नुसता भाषेचा प्रश्न घेवून चालणार नाही हो. कितीही नाही म्हटले तरी भाषा ही भाकरीशी निगडीत आहे. वरचे मुद्दे त्याच अनुषंगाने आहेत. तरीही भाषा १-२ पिढ्या जपतात पण पुढील पिढीला त्याचे महत्वच वाटले नाही किंवा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले नाहीत तर हे असेच होणार. माझे असे मत आहे की हा प्रश्न फक्त मराठीचा नक्कीच नाहीये. बाकीच्या भाषांना पण हाच प्रश्न भेडसावत असणार आहे.

पूर्वीच्या काळात राजेशाही, संस्थानं होती... माझ्या संस्थानात तू आलास की मी तुला मारणार, मी तिकडे गेलो की तू मला मारनार.. आता पुन्हा संघराज्यीय संस्कृती रक्षणाच्या नावाने पुन्हा हेच येणार असे दिसते आहे.. संस्थान> मुघल साम्राज्य> इंग्रजी वसाहत> संघाराज्य लोकशाही ... आणि आता पुन्हा चाक फिरवून पुन्हा संस्थानशाही ! जय हो! Proud

भारतातल्या कोणत्याही माणसाला कुठेही जायचा अधिकार आहे.. आता समजा अकुणी महाराष्ट्रात आला, तरी संस्कृती पालनाच्या दृष्टीने तो त्या संस्कृतीचा पाहुणा झाला ना? मग तिथली संस्कृती टिकवणं ही त्याची म्हणजे नव्या माणसाची कशी जबाबदारी? तुमची संस्कृती तुम्ही टिकवायची. मराठी बोला, गणपती बसवा. मोदक खावा.. तुमची भाष्हा शिकणं त्याला गरजेचं वाटलं तर तो शिकेल, नाही तर नाही.. जे तुमचे कर्तव्य आहे, त्याचं लोढणं त्याच्या गळ्यात का घालायचं? त्याची मातृभाषा, त्याची लुंगी, त्याचा रसगुल्ला ही त्याची संस्कृतीदेखील भारतीय संस्कृतीच आहे. आणि ती त्याला प्यारी असेलच.

मराठी लोक हिंदी बोलतात, याचं खापर नेहमीप्रमाणेच परप्रांतीय आणि काँग्रेसचे धोरण याच्यावर इथल्या लोकानी फोडले आहे.. पण महाराष्ट्रात हिंदी रुजते त्याला कारण लिपिमधील साम्य आणि हिंदीचे एक्पोजर.. साबणाच्या कवरवर नहाने का साबुन असे लिहिलेले असते. डॉक्टरने खोकल्याचे औषध दिले, त्याच्यावर खासी की दवा, दिनमें दो चम्मच तीन बार लिहिलेले असते.. चौथीच्या पोराला मॅगी किंवा सांबार मसाल्याचे पाकिट दिले की तो त्यावरचा बनाने का तरीका घडाघडा वाचून दाखवतो, अजून तो पाचवीला हिंदी शिकायला गेलेलाही नसतो. हिंदी चॅनेल, मासिकं, गाणी हे तर चालूच असते... त्यातून आपले लोक हिंदी शिकतातच. कुणालाही काँग्रेसवाले किंवा परप्रांतीय स्वप्नात जाऊन हिंदी शिकवत नाहीत. आता ती आपापसात कितपत वापरावी, हा ज्याचात्याचा प्रश्न. त्यासाठी इतर लोकाना आणि कुठल्य पक्षाला कशाला जबाबदार ठरवायचं?

>>> हा ज्याचात्याचा प्रश्न. त्यासाठी इतर लोकाना आणि कुठल्य पक्षाला कशाला जबाबदार ठरवायचं? <<<<
इथे कुणी रे कुठल्या पक्षाला जबाबदार धरलय? Angry
मी तर नाय ब्वॉ! हांऽ, आधीच सान्गुन ठेव्तोय Wink

'त्या' धाग्यावर लिहिलय . महाराष्ट्रात हिंदी चालते कारण काँग्रेस! ( तो कुठलातरी मराठी सिनेमा आहे. त्यात एक खुळं पोरगं सारखं ओरडत असतं.. बाबा लगीन. बाबा लगीन.. तसं काहीही झालं की बाबा काँग्रेस. बाबा काँग्रेस! Proud )

जामोप्या, वर वर बघता तू म्हणतोस ती कारणे महाराष्ट्रात बच्चा बच्चाला हिन्दी समजते याकरता पटतात. मान्य.
पण तोच बच्चाबच्चा, जरा थोडा मोठा होऊन अकलका पक्का झाला की तीच हिन्दी डोक्यावर घेऊन मिरवतो अन मायबोलीला पायदळी तुडवतो, त्यास मात्र गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र राज्याच्या सरकारी धोरणानुसार हिन्दीच्या विशिष्ट परिक्षा दिल्यास पदोन्नती वगैरे धोरणेच कारणीभूत आहेत. आता गेली कित्येक वर्षे महाराष्ट्र राज्याचे सरकारी धोरण कोणत्या पक्षाच्य आखत्यारित होते ते तुच तपास बोवा. होना, उगाच मी नाव घेत नाही (ह्यारीपॉटर मधल्यासारखे, तो , ज्याच नाव घ्यायच नस्त.... तस आहे हे देखिल तोच पक्ष ज्याच नाव घ्यायच नस्त Wink ).
खर तर हिन्दी सिनेमा तगला तो महाराश्ट्रामुळेच, पण आजही हिन्दीसिनेमामालिकान्मधे मराठी माणूस (सहसा बाई) केवळ घरकामाच्या बाईच्या भुमिकेतच दाखविली जाते, का हो? का नाही गुजराथी/मारवाडी/राजस्थानी/बिहारी/युपी/दाक्षिणात्य स्त्री घरकामगार म्हणून दाखवली जात? हलक्या कामाच्या भुमिकान्चे तोन्डी तेवढे मराठी सन्वाद/मराठी/महाराष्ट्रीय वेषभुषा याद्वारे हे परभाषिक निर्माते काय दाखवु/लादू इच्छितात? अन अशा नालायक मालिकान्चे "हिन्दी" बिनबोभाट न बोचता समजते म्हणुन मराठी जनान्चे मी कौतुक करु म्हणता?

[पण त्याचबरोबर, वर नताशाने मान्डलेल्या मुद्याशी देखिल विशिष्टप्रकारे सहमत>> मी अजून तरी काहीच म्हटले नाहीये हो या चर्चेत Uhoh

अहो तुम्ही नाही हो, "मी नताशा" ही आयडी... इथे आहे http://www.maayboli.com/user/38537
नामसाधर्म्यासारखे आयडीसाधर्म्य, दुसरे काय? आधीच्या पानावर त्यान्ची पोस्ट आहे.

प्रतिसादकांचे आभार. कोणाच्याच मताचे खंडन करावे असा हेतूच असू शकत नाही कारण या विषयात प्रत्येकाची स्वतःची मते असू शकतात व ती सापेक्ष असतात. त्यामुळे मलाही (हे प्रतिसाद वाचल्यानंतर पुन्हा / नव्याने) जे म्हणायचे ते म्हणून पाहतो.

चर्चा ड्रायव्हर आ विषयावर घसरायला नको होती. ते एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. मुळात त्या उदाहरणाची व त्यातून निर्माण झालेल्या भावनांची खिल्लीही उडवली जायला नको आहे. ते त्या सदस्याचे स्वत:च्या अनुभवातून झालेले मत आहे. जसा मोरया गोसावीसमोर मराठी बोलले जात नाही याचा राग तसाच मराठी ड्रायव्हर प्रामाणिकपणे कष्ट करत नाही याचा राग. मोरया गोसावी किंवा गणपती हा एकट्या मराठी माणसांचा देव नाहीच मुळी. सर्वप्रांतीय गणेश या देवाला मानतातच. (जसे कोलकात्यात दूर्गापूजा होते म्हणून कोणत्याही देवीच्या मंदिरासमोर बंगालीच बोलायला हवे हे चूक आहे तसेच मोरया गोसावी मंदिराबाहेर असा आग्रह धरणेही भारत देशाच्या कायदानुसार चूक आहे. मुळात असा आग्रह धरणार्‍यांनी मराठी ही भाषा निर्माण केलेली नाही वा तिच्या वृद्धीसाठी (असे सुनावण्याव्यतिरिक्त) काही खास केल्याचे (अजूनतरी) ऐकिवात नाही. तसे काही केले असल्यास (फक्त सुनावण्याशिवा) येथे जरूर नमूद करावे. मधप्रदेशात भरपूर लोक मराठी बोलतात व त्या राज्याने हे वास्तव स्वीकारलेले आहे की मराठेशाहीचे हे अंश तसेच राहणार आहेत. तेथे हिंदीच बोलले जावे यावरून वाद होताना दिसत नाहीत.

दुसरे - रीयाच्या प्रतिसादाबाबतः तिचे म्हणणे असे:

<<पण यामुळेच मराठी मागे पडत नाहीये का?>>

मुळात मराठी मागे पडण्याचे वाईट वगैरे वाटणे हेच गैर आहे असा मूळ लेखातील मुद्दा आहे. एक तर आपण मराठीचे निर्माते नाहीत, आज व्यवहार मराठीत (सहसा) होत नाहीत म्हणून आपण इंग्रजी माध्यमात मुलांना घालतोच घालतो आणि मराठी राहिली नाही असा प्रकार आपल्या हयातीत होणार नाही कारण आपण तेव्हा जिवंत असूच. केवळ आपण मराठी कुटुंबात जन्मलो म्हणून मराठीबाबत अभिमान वाटायला हवा हा विचार 'अ‍ॅडिक्वेट' वाटत नाही Happy

<<बाकीच्या भाषांना पण हाच प्रश्न भेडसावत असणार आहे.>>

चैतन्य ईन्या यांचा हा विचार 'विचार करायला लावणारा' वाटतो. इतर भाषिकांना मुळात हा प्रश्न वाटतो का, वाटला तर ते काय करतात आणि जे काही करतात ते भारताच्या कायद्याच्या व्याप्तीत आहे का असे अनेक प्रश्न मनात येतात. पुन्हा केरळचेच उदाहरण. केरळमधील लोकांनी 'सर्वांना बोलता यायला पाहिजे व येत असावी' अशा इंग्रजी अथवा हिंदी भाषेत आमच्याशी बोलावे असे त्यांना कोणी तेथे जाऊन सुनावू शकेल काय? वास्तविक पाहता मोरया गोसावी हे भारतातील एक हिंदू देवस्थान. येथे नमाज पढला जाऊ नये हे कायद्यात बसेल, पण येथे मराठीच बोलावे हे कायद्यात बसणार नाही.

बेफी - लेख सुस्पष्ट आहे. अभिनन्द्न.

मी स्वत: मराठी आणि संस्कृत या भाषांविषयी एवढा अलिप्त राहू शकत नाही. मला स्वतःला माझी पृथ्वी, माझा देश, माझे राज्य, माझा गाव, माझे कुटुंब, माझी शाळा, माझी भाषा, माझ्या परंपरा (काहीच) याविषयी अभिमान व प्रेम आहे. ह्या सर्व गोष्टी निरंतर नाहीत, अपरीवर्तनीय नाहीत म्हणून त्या टिकवण्यासाठी प्रयत्न न करणे पटत नाही.

पण खूप मुद्दे पटत नाहीत.
- जेनेटिकली व हिस्टॉरिकली (आँ?) मराठी माणूस हा अभिमान, जाज्वल्ल्य अभिमान वगैरेपासून दूरच असतो.
माझे मत - ऐतिहासिक दृष्ट्या हे चूक.
प्रश्न - जेनेटिकली का?
- मराठी माणूस दुबळा आहे.
माझे मत - ऐतिहासिक दृष्ट्या हे चूक. तसेच माझ्या अमराठी मित्रांचे मत असे नाही.
- या उपर मराठी किंवा कोणत्याच भाषेला काही महत्व नाही
माझे मत - भाषेला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक असे अनेक-कंगोरे युक्त महत्व आहे.
- मराठी माणसाला महाराष्ट्र, पुणे, मुंबई किंवा आपली भाषा ही आपल्या हक्काची वाटणे हेच मुळात गैर आहे.
प्रश्न - का?
माझे मत - स्वाभाविक आणि बरोबर आहे.
- मराठी भाषेचा अभिमान ही एक काल्पनिक संकल्पना ...
माझे मत - सर्व अभिमान ह्या काल्पनिकच आहेत. फक्त काही "सं" म्हणजे चांगल्या असतात.

काही मुद्दे पटतात.
- भाषा हे प्रथमतः संवादाचे माध्यम आहे.
- महाराष्ट्रात परभाषिक आले तर?....
- मराठी माणसाला कष्ट शिकवायला हवे आहेत, जे कोणीच करत नाही.
माझे मत - बरोबर. माझ्या ओळखिचे विक्रेते, शेतकरी, मंगल-कार्यलये, भोजनालये, वाणी .... सर्व लोक हेच म्हणतात. मलाही तसेच अनुभव आहेत. परन्तु येणारे पर-प्रांतिय कामसू आहेत म्हणून सर्वच पर-प्रांतिय कामसू आहेत हे चूक.

काही अवांतर मते.
- पण 'नुसता मित्र आहे, प्रियकर नाही' हे वाक्य ऐकायला जड जाईल ना?
नाही. पण "नुसताच मित्र आहे" किंवा "फक्त मित्रच आहे" हे जास्त हलके वाटेल.
- त्या लेखावरील खाझी मते त्या लेखावरच वाचा.

कित्येक वर्षे महाराष्ट्र राज्याच्या सरकारी धोरणानुसार हिन्दीच्या विशिष्ट परिक्षा दिल्यास पदोन्नती वगैरे धोरणेच कारणीभूत आहेत.

सरकारी नोकर्‍या एकुण लोकांपैकी पाच टक्के तरी लोक करतील असतील का? हिंदीची परिक्षा दिली म्हणून सगळीकडे हिंदी हे काय पटत नाही... तसे तर मग लोकं १०० मार्कांचं संस्कृत घेऊन परिक्षा देऊन ९९ मार्क देखील मिळवतात.. काय उजेड पाडतात? कुठली तरी चार सुभाषित आणि पंचतंत्रातल्या गोष्टीतला कुत्र्या मांजराच्या संवादाचा पाच ओळीचा उतारा भाषांतरीत करणे इतकाच ना? का लोक घडाघडा संस्कृत बोलत नाहीत?

भाषा ही उपयोगीतेवर वापरली जाते. हिंदीची उपयोगिता नक्कीच जास्त- म्हणजे लोकाना आकर्षित करण्याइतकी आहे. म्हणून लोक हिंदी बोलतात.

एकेकाळी काही लोक प्राकृत बोलत होते, तेंव्हा काही लोक संस्कृत बोलायचे म्हणे. मग तेंव्हा समाजात फूट वगैरे नव्हती का पडत? मग आज काही लोक हिंदी बोलतात तर समाजात फुट पडेल अशी भीती का वाटते?

चर्चेसाठी पुनर्प्रकाशित (इतर सिमिलर लेखावर या लेखाबाबतची मते आढळली)

मरत असले तर मरूदेत असा हेतू नाही. पण मरू नये म्हणून केलेले प्रयत्न व मरू नये म्हणून असे असे करावे सदरात मोडणार्‍या कल्पना संकुचित वाटल्या. उदाहरणार्थ वाण्याला मराठीत बोल असे म्हणणे.

लेखातील काही मुद्दे पटलेत.
परंतु दुबळे म्हणजे नेमके काय? महाराष्टाचा ईतिहास सांगण्याची गरज नाहीच, शिक्षणात भरपुर पुढे आहेच, मेहनतीत आहे. सरकारी धोरण बरोबर नसल्याने काही प्रमाणात माघे आहे. आय ए एस, आयपीस चे प्रमाण कमी आहे.
भाषा म्रूत होणार नाहीच
महाराष्टात ईतर राज्यातुन स्थायीक झालेले ही मराठी वापर काही अंशी का असेना करतातच

हा लेख वाचल्यानंतर अगदी छोटासा उपाय मी गेले दोन दिवस केला. खरेदी निम्मित पिंपरी-चिंचवड मध्ये हिंडताना प्रत्येक परभाषिक दुकानदाराशी मी मराठीत बोलले. माझे पती मात्र सवयीप्रमाणे हिंदीत बोलत होते. तर जवळ जवळ प्रत्येक दुकानदार माझ्याशी मराठीत तर यजमानांशी हिंदीत बोलला.

आपणच आधी मराठीत बोललो तर आपोआपच समोरच्याला मराठीत बोलावे लागेल.

लेख आवडला. संस्कृत मधून पहिल्यांदा प्राकृत झाली. आता कोणी प्राकृत आपले म्हणत नाही, मग मराठी आली, काही वर्षांनी मराठीतून mhinglish होइल आपल्याला बदलत गेलेली भाषा समजणार सुद्धा नाही. आता लोकमान्यांची मराठी किंवा ब मो पुरंद-यांची मराठी वेगळी वाटते. तसेच काहीसे पुढे पण होईल.

आंधळे जसे ब्रेल लिपीतून अथवा मुके जसे हातवार्‍यातून संवाद साधतील तसेच प्रत्येक भाषा अधिक अचूक पद्धतीने संवादनिर्मीती करते.<<

बेफीजी, दिवे घ्या, पण माझ्या माहितीतील अनेक आंधळे, किंबहुना आमच्या अंधशाळेतील सगळेच विद्यार्थी व शिक्षकही मराठी बोलतात.

बाकी लेखातील एकंदर म्हणण्याशी सहमत.

***

लिंबूजी.

श्री. जामोप्या यांचेशी आपली अरेतुरे करण्या इतकी मैत्री झाल्याचे पाहून आनंद झाला. मायबोलीवर सार्वजनिक शिष्टाचार सोडून इतक्या इन्फॉर्मली तुम्ही बोलता यामागे तुमचे सगळे धार्मिक सात्विक गुणच असावेत असे दिसते. (किंवा तुमचे वय, तुमची 'पात्रता' इतकी मोठी असावी, की सेवानिवृत्त डॉक्टरांना (वय/पात्रता) तुम्ही अरेजारे करणे हे नैसर्गिकच असावे.) असो.

दुकाने, हॉटेल्स इ. आस्थापनांत, व सामान्यतः सगळ्याच व्यवहारात आपण स्वतःहून मराठीचाच वापर करावा या आपल्या म्हणण्याशी सहमत. विषेशतः ज्या ठिकाणी आपण पैसे देऊन सेवा घेत आहोत अशी ठिकाणे. अगदी पंचतारांकित हॉटेल असेल तरी शुद्ध मराठीत बोलावे. वेटरला/इतर स्टाफला 'समजले' नाही तर थोडासा आवाज चढवला की बरोबर कळते Wink

@मनस्वी
>>हा लेख वाचल्यानंतर अगदी छोटासा उपाय मी गेले दोन दिवस केला. खरेदी निम्मित पिंपरी-चिंचवड मध्ये हिंडताना प्रत्येक परभाषिक दुकानदाराशी मी मराठीत बोलले. माझे पती मात्र सवयीप्रमाणे हिंदीत बोलत होते. तर जवळ जवळ प्रत्येक दुकानदार माझ्याशी मराठीत तर यजमानांशी हिंदीत बोलला. <<

अभिनंदन.
संभाषण सुरू करताना मराठी माणूस जास्त वेळा हिंदी/इंग्रजीतून सुरुवात करतो असे दिसते. इतर भाषक लोक त्यांची मातृभाषा प्राधान्याने वापरतात. पण आपण मराठी बोलणे सुरु केल्यास अनेकदा समोरचा मराठी बोलणारा निघतो.

एक अवांतर निरिक्षण.
बिगर-मराठी स्त्री वर्ग हा जरा जास्त भाषाप्रेमी असतो असे वाटते. माझ्याकडे येणार्‍या अमराठी जोडप्यापैकी पुरुष व्यवस्थीत मराठी बोलतात. बायका हट्टाने मराठी बोलणे टाळतात. विशेषतः मारवाडी. बर्‍याचदा या बायकांना नीट मारवाडीही येत नसते. मोडकी तोडकी हिंदी मुद्दाम बोलतात, मराठी येत असली तरी.

सेवानिवृत्त डॉक्टरांना (

मी सेवा निवृत्त नाही. लिंबु भाऊंपेक्षा वयाने अगदी लहान आहे. मला कुणीही एकेरीवर बोलावले तरी चालेल. Happy

बहुतांशी सहमत आहे. प्रश्न मराठी माणसाच्या बर्‍यावाईट गुणांपेक्षाही त्याचा अर्थकारणावर असणार्‍या प्रभावाचा आहे. मराठी उद्योजक आणि व्यापारी यांची संख्या आणि आर्थिक बळ मर्यादित आहे आणि ते इथून पुढे वाढण्याची शक्यता दिसत नाही.चाकरमान्यांची संख्या आणि महत्व दिवसेंदिवस वाढतं आहे पण ते 'ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी' या तत्वाने चालणार यात नवल नाही.
शेतकरी आणि शेतमजूर यांची टक्केवारी खूप मोठी असली तरी आपल्या राज्याच्या उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा सातत्यानं घटतो आहे. कृषी क्षेत्राच्या वाढीचा दरही खूप कमी आहे. त्यामुळे या मंडळींचा राज्याच्या अर्थकारणावरचा प्रभाव खालावत चालला आहे. संख्याबळामुळे त्यांना राजकीय क्षेत्रात अजूनही भरपूर महत्व आहे हे खरं पण राज्याचं झपाट्याने नागरीकरण सुरू आहे आणि आता नागरी लोकसंख्येची टक्केवारी जवळपास निम्म्यावर जाऊन ठेपली आहे. महानगरं फुगतायत आणि त्यापेक्षा थोडी लहान शहरंही खूप वेगानं विस्तारत चालली आहेत. नागरी क्षेत्रातलं दरडोई उत्पन्न ग्रामीण क्षेत्राच्या तुलनेनं जस्त आहेच परंतु वाढीचा वेग ही खूपच जास्त आहे. ज्या नागरी क्षेत्रात आणि अकृषिक क्षेत्रात अशा तर्‍हेनं आर्थिक बळ केंद्रीत होतं आहे, त्या क्षेत्रात मराठीपेक्षा इंग्रजीला जास्त महत्व आहे ही वस्तुस्थिती आहे. हे trends किंवा कल ओसरण्याचं चिन्ह नाही.
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर सर्वात जास्त प्रभाव अर्थकारणाचा असतो हे [कुणाला हे मार्क्सिस्ट तत्वज्ञान आहे असं वाटलं तरी] नाकारता येणार नाही. हे वास्तव लक्षात न घेता 'मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे का?' असा टाहो फोडण्यानं काहीच साध्य होणार नाही.
-प्रभाकर [बापू] करंदीकर.

Pages