मराठीचा अभिमान :अओ:

Submitted by बेफ़िकीर on 2 May, 2012 - 06:58

मराठी भाषा नामशेष होईल, मराठी माणसाला खुद्द महाराष्ट्रातच दुय्यम स्थान मिळू शकेल व महाराष्ट्राबाहेरच्या जनतेच्या प्रभावाखाली महाराष्ट्रातील बहुतांशी व्यापार उदीम व इतर क्षेत्रे येऊ शकतील अशी भीती नेहमीच व्यक्त करण्यात येते. प्रत्येकाचे एक अनुभवविश्व असल्याने प्रत्येकाचा एक दृष्टिकोनही असणार व ते समर्थनीय आहेच. मुंबईतील सामान्य नागरीकाला गुजराथी, दाक्षिणात्य व उत्तर प्रदेशी नागरीकांचे वाढते वास्तव्य व प्रभाव बिथरवेल तर कोल्हापूर, सातारा अशा शहरांमध्ये ही अडचण भेडसावणे तुलनेने कमी असेल.

मात्र मला काही मते व्यक्त करावीशी वाटत आहेत व उदार मनाने ती प्रकाशित होऊ द्यावीत अशी विनंती. ही मते दोन तीन विषयांवर आहेत, त्यामुळे अर्थातच एकाच लेखात दोन ते तीन विषय समाविष्ट होत आहेत.

१. भाषेचा अभिमानः

भाषा हे प्रथमतः संवादाचे माध्यम आहे. ज्यांना मराठीत संवाद करता येतात अथवा मराठी ही ज्यांची मातृभाषा आहे त्यांना ती केवळ त्यांच्या वाडवडिलांकडून वारश्यात मिळालेले एक संवादाचे माध्यम आहे. या उपर मराठी किंवा कोणत्याच भाषेला काही महत्व नाही. भाषेत निर्माण होणारे साहित्य अथवा भाषा बोलणार्‍या लोकांची संख्या यावर भाषेचा दर्जा ठरणे चूक वाटते. मराठीत ज्ञानेश्वर, तुकाराम व इतर महान संत व कवी तसेच लेखक झाले यामुळे मराठी मोठीही होत नाही आणि त्या लोकांच्या महानतेत मराठीचे श्रेयही काही नाही. त्यांनी उपलब्ध त्या संवादाच्या माध्यमातून त्यांचे संवाद केले इतकेच.

मराठी हे एका प्रदेशात निर्माण झालेले संवादाचे माध्यम आहे. आंधळे जसे ब्रेल लिपीतून अथवा मुके जसे हातवार्‍यातून संवाद साधतील तसेच प्रत्येक भाषा अधिक अचूक पद्धतीने संवादनिर्मीती करते. मराठी या भाषेला प्राधान्य मिळावे ही भावना एखादे संकेतस्थळ राबवू शकेल, पण समाजामध्ये ती भावना सर्वमान्य व्हावी (मराठेतरांनाही मान्य व्हावी - निदान महाराष्ट्रापुरती) हे अशक्य आहे. माध्यमे, विशेषतः चित्रपट यातून मराठीपेक्षा कितीतरी इतर भाषा (हिंदी, तेलगु) अधिक प्रभावीपणे रुजलेल्या आहेत. त्या रुजणे शक्य आहे तर मराठी का नाही आणि मराठीच्याबाबतीत इतका नकारात्मक दृष्टिकोन का असे विचारले गेल्यास उत्तर आहे की 'आपण ज्याला मराठीचा अभिमान वगैरे म्हणतो' तो मुळात आपल्याला नसतोच. म्हणजे मराठी माणसाला नसतो. आपल्याला मराठी रुजावी असे बेसिकली वाटत नाही अणि हे चुकीचेही नाही. मराठी माणूस प्रामुख्याने नोकरी व शेती या व्यवसायात असून शेतकर्‍याला मराठीतून काम साधता येत आहे व नोकरदार माणूस प्रगतीशील असल्याने जी भाषा प्रभावी आहे त्यात बोलू लागतो.

जेनेटिकली व हिस्टॉरिकली (आँ?) मराठी माणूस हा अभिमान, जाज्वल्ल्य अभिमान वगैरेपासून दूरच असतो. काही प्रमाणात यातच त्याच्या विकसनशीलतेचे गुपीतही दडलेले असू शकते. 'ज्याने काम साधते त्या भाषेत मी बोलणार' हा त्याचा सहसा दृष्टिकोन असतो.

दुसरे कारण म्हणजे मराठी माणूस दुबळा आहे. आपल्या समाजात आज असलेले मराठी अभिमानशाहीचे पक्ष, जसे शिवसेना , मनसे हे देशाच्या राजकारणाच्या संदर्भात क्षुल्लक पक्ष आहेत. मुळात त्यांचे स्वरूप राष्ट्रीय नाही. त्यात पुन्हा त्यांचा वकूबही त्यांनी मुंबई व महाराष्ट्रापुरताच मर्यादीत ठेवलेला आहे. बिहार्‍यांना हाकलून देण्याने काहीही होणार नाही आहे. मराठी माणसाला कष्ट शिकवायला हवे आहेत, जे कोणीच करत नाही. कष्ट करणारे अनेक प्रांतीय मराठी माणसांना येथेच येऊन सेवा पुरवत आहेत. त्या सेवा व सेवा पुरवण्यामागील कष्टाची तयारी हे मराठी माणसाला 'रेडिमेड' मिळत आहे. ते 'सोप्पे' आहे. 'सोप्पे' करण्याकडे कोणाचाही व खास करून मराठी माणसाचा नैसर्गीक कल असतो. हे आपल्या इतिहासातील फितुरी, भ्रष्टाचार यातून सातत्याने दिसतेच.

तिसरी गोष्ट म्हणजे 'हक्काची भावना'! मराठी माणसाला महाराष्ट्र, पुणे, मुंबई किंवा आपली भाषा ही आपल्या हक्काची वाटणे हेच मुळात गैर आहे. ज्याला आज आपण महाराष्ट्र म्हणतो तो संस्थाने खालसा झाल्यावर या स्वरुपात आलेला आहे. ज्याला देश म्हणतो तो गेली साठ पासष्ट वर्षे अस्तित्वात आहे. देश ही संकल्पना त्यामानाने अधिक प्रभावी आहे. याचे कारण देश या भूमीला एकच कायदा लागू होत आहे. एकच शासनपद्धती आहे. त्यामुळे 'ज्यांना देश या संकल्पनेबाबत फारसे काही वाटत नाही' किंवा 'वाटल्याचे कधी दिसत नाही' अशांनी मराठी भाषा व महाराष्ट्राबाबत प्रेमभावना बाळगणे हे गंमतीशीर आहे. उद्या बिहारमध्ये मुद्दाम मराठी शाळा काढतील आणि त्याचा उपयोग बिहारींना महाराष्ट्रात पाठवण्यासाठी करतील. तसे केल्यास केवळ त्या पाठवलेल्यांना मराठी येते म्हणून आपण त्यांना आनंदाने स्वीकारणार नाही. समजा एकेका परप्रांतीयाला शोधून बाहेर पाठवायचे ठरवले तर देशाचा कायदा आडवा येईल. समजा उद्या आठ कोटींऐवजी महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी झाली आणि वाढीव चार कोटींपैकी तीन कोटी परप्रांतीयच असले तर आपोअपाच संवादाचे साधन म्हणून मराठी कमी पडू लागेल. या बाबतीत कायदा असू शकत नाही. याचे कारण 'देशाचा' कायदा लागू पडतो. याबाबतीत मनातल्या मनात काहीतरी ध्येय ठरवूनही काही होऊ शकत नाही कारण त्याला कोणतेच खास स्वरूप नसते.

चळवळ हा चौथा प्रकार आहे. मराठी माणूस (पुन्हा मातीचाच गुण की काय) सामाजिक व जाहीर पातळीवर काही एक बोलतो व स्वतःच्या घरात दुसरेच राबवतो. ही बाब मात्र अशी आहे की जी केवळ मराठीच करतो असे नाही तर कोणीही करतोच. आपण इंग्रजी माध्यमात मुलांना पाठवणार, त्यांना ते पाचवीत असताना सेल फोन देणार आणि त्यावरचे एसेमेस इंग्रजीत असणार, आपण त्यांना फेसबूक वापरायला देणार जे इंग्रजीत असणार आणि शेवटी त्यांना परदेशात पाठवणार जेथे (बहुतांशी अशा देशात की) इंग्रजीच बोलली जाते. मग इतके असले तर मराठीचा अभिमान हवाय कशाला? भारतात असलेला सर्वात आवडता खेळ साहेबाचा आहे, शासनपद्धतीचे अधिष्ठान साहेबाचे आहे, ९० टक्क्याहून अधिक व्यापार साहेबाच्या भाषेत चाललेला आहे मग मराठीचा अभिमान कशासाठी हवा आहे? काही जण मराठीत बोलतात हे पुरे आहे की?

पाचवा प्रकार म्हणजे मराठी बोलण्यात मिळणारी सहजता आपल्याला (मराठी भाषिकाला - व असेच प्रत्येक इतर भाषिकाचे परभाषेबाबत) इतर भाषा बोलताना मिळत नाही. आपली ती मातृभाषा नसते. यामुळे आपल्याला किंचित प्रमाणात परकीय झाल्यासारखे वाटते. पण पैसा मात्र त्याच परकीय भाषेचा वापर करून मिळत असतो. त्यामुळे अगदी हिंदी म्हणालो तरी परकीय वाटत असले तरी साहेब उत्तर हिंदुस्तानी असल्यास झक मारत हिंदी स्वीकारावी लागते. अगदी तो पुण्यात मीटिंगला आला तरी. मग मारवाड्यांनी काय घोडे मारले आहे? ते तर कोणत्याही हिंसक किंवा भाषिक चळवळीत सामील नसतात.

मराठी भाषेचा अभिमान ही एक काल्पनिक संकल्पना असून तिचा नेमका अर्थ काय हे सांगायला जाणारे फक्त बिहारी, मारवाडी, गुजराती आणि शेट्टींबाबत नापसंती व्यक्त करत असतात असे दिसते.

मराठी भाषा मेली तर काय? :-

कधी मरेल? जेव्हा मराठी बोलणारा शेवटचा माणूस मरेल तेव्हा. शेवटचा माणूस कधी जन्माला येईल? जेव्हा मराठी ही मातृभाषा म्हणून स्वीकारणारे शेवटचे कुटुंब अशा माणसाला जन्म देईल तेव्हा. याचाच अर्थ कौटुंबिक पातळीवर मराठीचा प्रसार आवश्यक आहे. हे असे असताना 'हे डॅडी' आणि 'हाय मॉम' हे स्वीकारणारे आपणच. 'गर्ल फ्रेन्ड' आणि 'बॉय फ्रेन्ड' हे आमच्या लहानपणी (एक म्हणण्याची पद्धत 'आमच्या' - माझ्या म्हंटले की वजन कमी होते असे मराठी साहित्यिकांनी बनवलेले मूर्ख मत) 'बापरे' करून हासण्याच्या लायकीचे शब्द होते. आजकाल मुली 'ओह ही इज जस्ट अ फ्रेन्ड ऑफ माईन, नॉट अ बॉय फ्रेन्ड डॅड' म्हणताना दिसतात. संस्कृती बदलली ठीक, पण 'नुसता मित्र आहे, प्रियकर नाही' हे वाक्य ऐकायला जड जाईल ना? त्यामुळे इंग्रजीचा सहारा. मग मराठी मेली तर काळजी कसली ? है की नै?

बरं मराठी मरेल म्हणजे नक्की काय होईल? आज जसे कोणी संस्कृत बोलत नाही तसे कोणी मराठी बोलणार नाही.तेव्हा तुम्ही आम्ही असू थोडेच? पण मग आजपासूनच काळजी घ्यायला हवी ना, असे विचारणार्‍यांना पुढचा प्रश्न. कसली काळजी? प्रत्येक भाषा मरतेच. केव्हा ना केव्हातरी मराठीही मरणारच.

मराठीतील श्रेष्ठतम साहित्य नष्ट होईल? किंवा कालबाह्य होईल किंवा अज्ञातवासात जाईल? आज काय करतोय आपण त्या साहित्याचे? आपण तर मुलांना इंग्रजी वाचायला लावतो. घरात मला हवे तसे आणि बाहेर समाजाला हवे तसे आपण वागतोच की?

महाराष्ट्रात परभाषिक आले तर? :-

आपण जाऊ बाकीच्या राज्यात! तिथे संधी नसतील तर निर्माण करू. पहिले शेट्टी उपहारगृह तयार करण्यापूर्वी तो शेट्टी मराठी भोजनालयात वेटर थोडीच होता पुण्यातल्या? तो आला तो थेट डोसा उत्तप्पा घेऊनच आला की?

आपण अमेरिकेत जातोच की? तो तर वेगळा देश असूनही आपल्याला (त्यांच्या कायद्यानुसार फिट्ट असलो तर) स्वीकारतो. महाराष्ट्र तर काय? भारताचे एक राज्य. इथे कोण अडवणार?

आपण काढू दोन खोल्यांपैकी पुढच्या खोलीत किराणा मालाचे दुकान आणि मागच्या खोलीत बेडरूम कम स्वयंपाकघर कम लिव्हिंग रूम?

आपली तर बुवा अशी मते आहेत.

तुम्ही हवे तर अनुमोदन द्या नाहीतर या मतांना उडवून लावा.

पण मला मते बदलता आली तर नक्की आपले आभार मानेन.

धन्यवाद (लेख वाचल्याबद्दल) Happy (शीर्षकात स्मायलीची अक्षरे मुद्दाम तशीच दिली आहेत)

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

भाषेच्या बाबतीत हा प्रकार सगळिकडेच दिसुन येतो. इंग्रजांनाही आज अमेरीकेत, ऑस्ट्रेलीया, आफ्रीका किंवा भारतात बोलली जाणारी इंग्रजी अभिमानास्पद वाटत असेल का?
शिक्षणाचे माध्यम म्हणाल तर इंग्रजीत शिकलेल्या बर्‍याच मंडळींचं इंग्रजी म्हणजे आनंदच असतो. मराठी जगवायची असेल तर, घरी आणि शाळांमध्ये वाचनाची आवड लावायला हवे. चांगलं साहीत्य, त्यातलं काय गोड आहे, ( जसं चिनी कींवा फ़्रेन्च खाण्याची आवड/ सवय) ते सांगायला हवं त्यात रंजकता हवी. आज दहा वर्षे शाळेत मराठी शिकुनही, पुढे दोन वर्षांनंतर, चार चांगले लेखक, कवि आठवत नाहीत. हे टक्केवारी पुरतं मराठी शिक्षण निरुपयोगी आहे. निबंध लिहीतानाही, हे असं लिहिलं अर्धा मार्क, पुढे अस लिही, दिड मार्क नक्की.., परीक्षेपुरते निबंध पाठ करुन लिहीणे, हे भयानक आहे. मला आठवतं, शाळेत, "माझा मित्र" निबंध लिहिताना माझ्या उनाड मित्राचं, घरी कोणी नसणं, पैसा आहे पण पालकांना वेळ नाही, बाप जमदाग्नी तर आई अति प्रेमळ, सगळेच गुन्हे पोटात घालणारी वगैरे, माझ्या कुवती प्रमाणे लिहीलं होतं आणि माझ्या मराठीच्या गुरुजींनी कौतुक केलं होतं. आजच्या पद्धतीत हे मार्कांच्या शर्यतीत कुठे बसणारच नाही.
आमच्या शाळेत कथाकथन असायचं. मोठमोठे लेखक पहायला, ऎकायला मिळत, सहजच, त्यांची पुस्तक शोधुन वाचायचा प्रयत्न होई. हे करायला हवय. आज एखाद्या टिव्ही सिरीयल मध्ये १२ सेकंदाचा रोल केला कि तो / ती सेलेब्रीटी होते, पहायला लोकं गर्दी करतात.त्या पेक्षा, मराठी लेखक, कवि आपल्याला एवढा आनंद देतात, केवढ विश्व दाखवतात. त्यांना शाळेत न्यायला हवय. मुलांना त्यांची, मराठीची तोंडओळख, एक गंमत म्हणून, काहीतरी रंजक जादूगिरी म्हणून करुन द्यायला हवीय, फक्त एक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नव्हे!
साहित्य संमेलन - एक मनोरंजक बातमी एवढीच न रहाता किंवा फ़ुकट पर्यटनाची मुठभरांसाठी सोय न रहाता, अधिकाधिक मराठी प्रेमींचा एक प्रचंड उत्सव असायला हवा. त्यातले ते असंबद्ध वाद, लाजिरवाण्या निवडणुकांचा तमाशा, ह्यापेक्षा, यशस्वी आणि उदयोन्मुख साहित्यिक अधिकाधिक लोकांच्या संपर्कात यायला हवेत. मुलांना लिहीतं करायला हवय. भाषेची वेगवेगळी वळणं, ढंग, प्रकार, जसं मालवणी, अहीराणी, नागपुरी, इंदुरी, कोळी बांधवांची, ठाणे जिल्ह्यातली, पुणेरी.. किती तरी आल्हाददायक प्रकार, आणि शहरी व्यवहारी भाषेपेक्षा गोड, जिवंत. त्यातले खास शब्द, ठसके, हरकती, ही मजा त्याचा अभ्यास करणा यांनी सर्वसामान्यांना, तरुणांना, लहान मुलांना रंजकतेने सांगायला हवीय. आज बयाचदा, मनातलं व्यक्त करताना, ईंग्रजी, हिंदुस्तानी किंवा इतर भाषीक शब्दांना अचुक मराठी शब्द सुचत नाही इतकी आपली बोलीभाषा बहुभाषीक झाली आहे. एक खेळ म्हणून, धमाल, बिन्धास्त, कूल, हॉट वगैरेना मराठी शब्द शोधायला मजा येईल ना?
>>> जेनेटिकली व हिस्टॉरिकली (आँ?) मराठी माणूस हा अभिमान, जाज्वल्ल्य अभिमान वगैरेपासून दूरच असतो.<<< अतिरेकीपणा पासून दुर् रहाणं चांगलच की. अभिमान आणी आक्रस्ताळेपणा यातला फरक मराठी माणसाला कळत असल्यानं असं घडत असेल का? चांगल्या संस्कारांमुळे सारासार विचारबुद्धी, स्वता:ची मतं असणे, आंधळेपणाने कुणाच्याही मागे न जाणे, हे दोष कि गुण? सहिष्णुता सहनशिलता, स्वार्थासाठी भाषा, राज्य ह्या झेंड्याखाली येउन गट- गर्दीच्या दडपणाने इतरांना न छळणे ह्यालाच आजकाल दुबळेपणा समजला जात आसेल तर दोष कुणाचा? शिक्षा होणार नाही ह्याची खात्री असताना पक्ष-संघटनेच्या कवचाखालून रस्त्यावर होणारी गुंडागर्दी, विध्वंस हे समर्थपणाचं लक्षण असेल, तर आहोत आम्ही दुबळे.
असो, जिव्हाळ्याच्या विषयाला हात घातल्याबद्दल बेफ़िकीर, तुम्हाला धन्यवाद.

अभिनंदन बेफिकीर, मूलगामी विचार करणारा लेख व प्रतिसादांमध्येही अभ्यासू वैविध्य.

माझा एक स्थितीशील विचार असा की ही भाषा मरणार बिरणार काही नाही, क्षीणावेल आपल्याच थोड्याशा पराभूत वृतीमुळे, पण चुकीच्या इलाजांनी तिला बळकटी येणार नाही.

मान्य,मराठीच्या गळचेपीचे खूप पुरावे मिळतात, मान्य, मराठी लोकांचंही खूप काही चुकत असतं. पण तरीही 'ब्रँड मराठी' आक्रमकपणे विकावा लागेल, एका छुप्या अजेंडामधून.

जसं की पंजाबी,बंगाली संगीत/साहित्य हिंदी सिनेमाच्या अंतःस्तरात जाणवत असतं,
दक्षिणी /गुजराथी खाद्यपदार्थांची बाजारपेठ सर्वदूर भरभराटत राहते,
तसा मराठीचा प्रभावगट अमराठी वर्तुळांमध्ये विस्तारायला हवा.

आणि हो, कै. दिलिप पुरुषोत्तम चित्रेंसारखे द्वैभाषिक/बहुभाषिक लेखक या पिढीतही पुढे यायला हवेत ज्यांची दखल केवळ अमराठीच नव्हे तर परदेशी विद्वानांनाही घ्यावी लागते.ज्यांची प्रज्ञा अनेक भाषांच्या पटावर खेळी करते. या अशा गोष्टींमधूनच ग्लोबलायझेशनच्या काळात 'मराठीपण' जिवंत राहते.

Pages