उप्पीट (पण वेगळं, रूनी यांच्या सजेशननुसार चहाच्या आधणाचं)

Submitted by pradyumnasantu on 30 April, 2012 - 16:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रवा (नेहमी उप्पीटासाठी घेता तितका किंवा ८/१० मिनिटे भाजून): १ वाटी
पाणी: ४ वाट्या
साखरः ६ टीस्पून्स
मीठः ३/४ टी स्पून (पाऊण चमचा)
हिरवी मिरची: १ मिरची
वेलच्या: ४ अख्ख्या उघडून
आले: जाडजूड तीन इंच (ठेचून किंवा मिक्सर मध्ये वाटून)
फोडणीसाठी तूप्/तेल, हिंग, मोहरी, कांदा चिरून.

क्रमवार पाककृती: 

पाण्यात साखर, वाटलेले आले, वेलच्या व मीठ घालून उकळत ठेवावे. तोवर रवा भाजून घेऊ शकता. भाजलेला रवा बाजूला ठेवावा.
भरपूर उकळून पाणी गाळून घ्यावे.
तूप्/तेलावर कांदा परतून मिरची,मोहरीची फोडणी करावी व फोडणीत उकळलेले पाणी ओतावे. लगलीच विस्तव अति मंद करून रवा घालावा. गुठळ्या न व्हाव्यात यासाठी हलवत रहावे व विस्तव मिडीयम करून झाकण द्यावे.
पाच मिनिटांनी उहदून हलवावे. वाफ आली असल्यास खायला घ्यावे. आवडत असल्यास ओले अथवा सुके खोबरे पसरू शकता.

वाढणी/प्रमाण: 
दोन्/तीन व्यक्ती
अधिक टिपा: 

आल्यामुळे व साखरेमुळे अप्रतिम तिखट-गोडसर चव येते. साखर्-मीठ्-आले व मिरची हे प्रमाण अनुभव व आवड यानुसार कमीजास्त करावे.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या उप्पीटाची प्रॅक्टीस झाल्यावर पाण्यात साखरेबरोबर मीठ घालणे थांबवावे. मीठ शेवटी घालावे, म्हणजे पाणी उरल्यास त्यात चहा बनविता येईल व आल्याच्या चहाचाही अस्वाद घेता येईल.

साखर घालून केलेले उप्पीट कधी खाल्ले नाहीये. शिरा + उपीट असा प्रकार वाटतोय हा.
वेगळे उप्पीट म्हणण्यापेक्षा चहाच्या आधणाचे उपीट म्हणा लोक लगेच धागा उघडून बघतील Happy

रूनी: शीर्षकात बदल केला आहे. बघुया आता कितीजण धागा उघडून साखर व आल्याच्या उप्पीटाचा स्वाद घेतात. विश्वास ठेवा, हा पदार्थ फार चांगला लागतो.

चहा आणि रूनी हे दोन जास्तीचे जिन्नस घातल्याने उप्पीटाचा टीआरपी वाढू शकतो. मी ही नुसतंच उप्पीट वाचलं नसतं पण आता वाचलं. Proud

मस्तय रेसिपी आणि मला वाटतं नेहमीपेक्षा पटकन होणारी. माझी आई असा तिखट-शिरा करते. फक्त आलं वेलच्या नसतात.

Even i follow the same method but i avoid suger...i think i should give it a try... By d way can neone tell me how to type in marathi?real difficult for me

अश्या पद्धतीने केलेला उपमा आम्ही प्राचीच्या हातचा खाल्लेला आहे. एकदम मस्त केला होता तिने Happy रव्यात पाणी घालणे आणि पाण्यात रवा घालणे, या दोन्हीची चव वेगळी लागते. पाण्यात रवा घातल्यावर गुठळ्या होऊ न देणे हे काम कौशल्याचे आहे असे मला वाटते.

बाकी, स्वाती२ ला अनुमोदन!! चहाच्या आधणाचं उप्पीट असं शीर्षक वाचल्यावर चहा पावडर घालून केलेलं उप्पीट असं वाटतंय Uhoh

वेगळीच पद्धत आहे.. करुन बघेन. फक्त मला ६ चमचे साखर आणि १ मिरची हे प्रमाण बदलावं लागेल.. ४ मिरच्या आणि ३ चमचे साखर.

ही साधारण पणे आंन्ध्रा मधली पध्धत आहे. मी असाच करते. फोडणीत हव्यात्या भाज्या जसे मटार, कांदा, गाजर अगदी बारीक चीरुन घालायच्या. भाज्या शीजल्या की, त्यात हे आधणाचे पाणी घालायचे. त्यात थोडा लिंबु रस घालायचा. चांगले उकळले की भाजलेला रवा घालायचा.

फोडणीत उडदाची डाळ घालायला विसरु नका तसेच कढीपत्ता, आणि लाल मिरच्या पण. एकदम झकास आलं लिंबु साखर आणि कढीपत्त्याच्या चविचा झकास उपमा तयार होतो.

मी कधी कधी कोरडा रवा भाजुन घेते. मग फोडणी करुन त्यात उडीद डाळ आणि लाल मिरची, ड्राय ओनीयन ( वाळवलेला कांदा), कढीपत्ता घालते. मग भाजलेला रवा घालते . थोडे परतुन गार करुन हवा बंद बरणीत ठेवुन देते. ही बरणी फ्रीजात ठेवायची. मग काय हवा तेंव्हा उपमा तयार. जेंव्हा उपमा करायचा असेल तेंव्हा तयार रव्याच्या प्रमाणात ४ पट पाणी घ्यायचे, मस्त उकळायचे, त्यात साखर + आलं + वेल्दोडा + उकडलेले मटार ( हवे तर) घालायचे. चांगली उकळी आली की तयार रवा मिश्रण टाकायचे. वाफ आली की उपमा तय्यार. वरुन कोथिंबीर घालायची.

जर कोणी पाहुणे येणार असतिल, तर आदल्या दिवशी ही तयारी करुन ठेवता येते. म्हणजे लोकं आल्या वर आपण स्वयंपाक घरात अडकणार नाही. तसाच शीरा ही आधी कोरडा परतुन ठेवता येतो. पाण्याचा हात लागता कामा नये.

असे पदार्थ घरगुती पध्धतिने इंस्टंट बनवता येतात. उदा . आमटी, कण्यांचा मऊ भात, पोहे, गोड शीरा , खिचडी. मी हैद्रबाद ला असताना माझ्या कडे लीमीटेड साधन सामुग्री होती. मुलगी पण तान्ही होती. तिला घेवुन मला बाजारात जाता येत नसे. मग मुंबई हुन जातानाच असे इंस्टंट पदार्थ घेवुन जात असे. तिचा खीमट भात पण असाच इंस्टंट करुन नेला होता. ( मिक्सर न्हवता ना)

गरज ही शोधाची जननी आहे.

मला वाटले की पाकृमधले पाणी रुनी यांच्या सजेशननुसार आहे. Happy

१ कप रव्याला ४ कप पाणी जास्त नाही होणार? करुन बघायला हवे.

मी केलं होतं. छान झालं. मी एरवीही आलं घालते, पण एवढं नाही. उरलेल्या पाण्याचा चहा केला, थोडे 'अननसाचे सांबारे' मध्ये घातले. Happy
साधना, ते खूप उकळायचे आहे त्यामुळे पाणी जरा कमी होते पण तरी उप्पीट नेहमीपेक्षा जास्त मऊ झाले. गरम गरम छान लागले.

आज सकाळी नाष्ट्याला या पद्धतीने उपीट केले होते. सगळे अगदी वर सांगितलेल्या प्रमाणातच घेतले. छानच झाले. फक्त मला चार ऐवजी सव्वा तीन-साडे तीन कपच पाणी लागले आणि ६ चमचे साखर जास्त झाली. पुढच्यावेळी २-३ चमचेच साखर घालेन. पाण्यात मीठ घातले नव्हते म्हणून उरलेल्या आधणात चहा केला.

मी आज चहाच्या आधणाचं उप्पीट केलं. अप्रतिम झालं Happy
अगदी आजोळच्या गोडीळ उप्पीटाची आठवण आली. साखर मात्र ४ च चमचे घातली. आलं नव्हतं घरात म्हणून जिंजर पावडर घातली. आता यापुढे उप्पीट असच करणार.

अरे वा, म्हणजे आज माझ्यासकट खुप जणांच्या घरी हाच नाश्ता होता तर..

खरेच खुप अप्रतिम झाले हे उप्पिट. मी पाणी बरोबर चारपट घेतले होते, उकळल्यावर थोडे कमी झाले. उरलेले अगदी बरोबर उप्पिटासाठी पुरले.

रच्याकने, उपमा आणि उप्पिट यात फरक काय?

मी दोन्ही सारखेच, फक्त कारवारी/सौदेंडीयन भागात उप्पिट आणि आपल्याकडे उपमा म्हणतात असे समजत होते. पण आज मुलीने एक घास तोंडात टाकताच हे उप्पिट आहे म्हणुन जाहिर केले Happy मी तिला फरक विचारला तर ती म्हणाली उपमा ताकात करतात, तो पांढरा असतो. मी रवा थोडा लालसर भाजत असल्याने माझा उपमा/उप्पीट नेहमीच लालसर दिसते. मी कधी ताकात केला नाही उपमा. त्याव्यतिरिक्त अजुन काही फरक आहे असे मला तरी माहित नाही, जाणकारांनी प्रकाश पाडावा Happy

टीआरपीसाठी नाव बदललं का? मी उलट 'चहाच्या आधणाचं उप्पीट' म्हणुन ही रेसिपी उघडत नव्हते. मला चहा अज्जिबातच आवडत नाही. नावावरुन मला वाटलं कि चहा उकळुन ते पाणी ( ब्लॅक टी) उप्पीट मधे टाकलं असेल. Happy

Mi aaj kel hot. Sakhar thodi jast jhalati ani shevati gas war kiti vel thevayacha yacha andaj ala nahi. Anubhav kami asalyane. Pudhachya veles jamel nakki Happy

Pages