ओट्स चे धिरडे (फोटोसहीत)

Submitted by दिनेश. on 17 July, 2010 - 06:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक कप रोल्ड ओट्स, अर्धा कप बारिक रवा किंवा पाऊण कप तांदळाचे पिठ, एक कप आंबट ताक,
एक चमचाभर हिरव्या मिरचीचे लोणचे, (किवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या वा मिरपूड.) एक चहाचा चमचा जिरे, हिंग, मीठ, आवडत असेल तर अर्धा चहाचा चमचा साखर, (थोडी साखर घातली तर सोनेरी रंग येतो ) तेल वा तूप.

क्रमवार पाककृती: 

आंबट ताकात ओट्स पंधरा ते वीस मिनिटे भिजवा. त्यात मिरचीचे लोणचे वा मिरच्या मिसळून, मिक्सरमधून फ़िरवून घ्या. मग त्यात बाकिचे जिन्नस (तेल सोडून) मिसळा आणि नीट ढवळून घ्या. साधारण इडलीच्या पिठाइतपत सैल असूद्या. लागल्यास पाणी वा रवा (वा तांदळाचे पिठ मिसळा)

नॉन स्टिक पॅनवर थोडेसे तेल वा तूप टाकून त्यावर या मिश्रणाचे धिरडे टाका. गॅस अगदी मंद असु द्या.
आधी झाकण ठेवा आणि मग झाकण काढा. उलटायची वा परतायची घाई करु नका. पॅन थोडेसे हलवून बघा,
जर धिरडे खालून सूटले असेल तरच उलटा. दोन्ही बाजूने, सोनेरी रंग आला पाहिजे.
वरुन कुरकुरीत आणि आतून मऊ असे धिरडे होते. यात हवा तर बारिक चिरलेला कांदा व आल्याचे तूकडे, कोथिंबीर पण टाकू शकता. सोबत जवसाची चटणी घ्या, म्हणजे आरोग्यपुर्ण अशी न्याहारी होईल.

रव्यापेक्षा, तांदळाच्या पिठामूळे जास्त कुरकुरीतपणा येतो. तसेच मिरच्यांच्या जागी लोणचे वापरले तर जास्त चांगली चव येते.
बाकी मी आढ्याला मिरच्या टांगून, आमटी तिखट झाली, म्हणणाऱ्यांपैकी असल्याने लोणचे संपवायचे, असे वेगवेगळे उपाय शोधावे लागतातच.

वाढणी/प्रमाण: 
चार मध्यम धिरडी होतील.
अधिक टिपा: 

हा प्रकार मंद आचेवरच करायचा आहे. वेळ नसेल तर सगळे मिश्रण एकदम पॅनमधे घाला, व खाताना तूकडे करुन घ्या.
उद्या परवा फोटो टाकतो.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे धिरडे खरच मस्त अन पौष्टिक! मी यात कांदा बारिक चिरुन घालते. खुप टेस्टी लागतात. नवरा, मुले अगदी आनंदाने खातात. Happy आणि हो अगदी एक एक आठवडा फ्रिजमध्ये हे पीठ असते.
धन्यवाद दिनेशदा.

अगो, पाककृतीच्या शब्दखुणांमध्ये 'ओट्स' आणि 'धिरडे' असे दोन शब्द आहेत. तू ओटसचे धिरडे सर्च केले त्यामुळे नसेल सापडले. ओट्स धिरडे असे देऊन बघ, पहिलीच कृती येते.

पाककृती लिहिणार्‍या सर्वांनीच पाककृतीचे शिर्षक शब्दखुणांमध्ये सुद्धा दिले तर नंतर शोधणार्‍यांना ते सोप्पे होइल.

आजच हे केले एकदाचे. किती दिवसापासुन विचार होता... एकदम मस्त लागतात ही धिरडी. दिनेशदा थँक्स. आता त्यात भाज्या किसुन वगैरे कशी लागतील ते पुढील वेळेस करुन पाहणार.

आमच्याकडे हे धिरडे आता आठवड्यातून दोनदा तरी बनतेच. ओट्स मिक्सरमधून वगैरे काही काढत नाही. दह्यात जरा वेळ भिजवते. मग त्यातच रवा, पाणी घालते. आले किसून आणि पालक बारीक चिरुन घालते बरेचदा. नाहीतर मग गाजर किसून, कोथिंबीर, मिरची असेही करते. नवर्‍याला आणि मुलालाही फारच आवडले आहे. धन्यवाद परत एकदा Happy
कालच केले होते त्याचा हा फोटो. रवा आणि दह्यामुळे रवा डोशासारखे लागते.

Oats dhirade.jpg

दिनेशदा,
धिरडे खुप छान आहेत चव पण मस्त असणार..
अमेरिकेत चटणी चे कारले इन्डियन स्टोअर्स मधे कोणत्या नावाने मिळतात्त

मस्त रेसिपी. दिनेशदा, तुम्ही खरच gr8 आहात, किती चांगल्या रेसिपी करता आणि मायबोलीवर share पण करता. मी नेहमी रेसिपी द्यायची म्हणते पण आळस माझा मित्र आहे.
लहान मुलांसाठी oats चा cake करता येतो , आणि oats रवा खीर पण चांगली होते.

सहीच...मस्त...ओट्स मधे व्हरायटी मिळाली. अजुन काही असतील ओट्स मधे तर नक्की शेअर करा.

परवा ही धिरडी करताना कच्च्या पालकाच्या पानांची पेस्ट घातली भिजवलेल्या पीठात! छान हिरवा रंग आला. Happy आणि मग तीळाच्या चटणीबरोबर गट्टम ! Happy

या सगळ्या अ‍ॅडीशन्स बघता, हा एक आदर्श नाश्ता होऊ शकतो.
सकाळच्या न्याहारीत, गाजर, पालक, तीळ, ओट्स असे पदार्थ असले कि निदान दुपारच्या जेवणापर्यंत तरी आधार होईल.

काल मी पण ट्राय केली ही धिरडी. मी त्यात गाजर किसून घातलं आणि ओट्स आणि ओट्ब्रॅन समप्रमाणात घातलं. तीळ्-खोबरं-दाणे-लसणाच्य कोरड्या चटणीबरोबर छान लागलं. काल रात्रीच २ जास्त धिरडी करून ठेवली आणी ती ऑफीसमध्ये नाष्ट्याला आनली आणि मावेत गरम करून मस्त लागली. पुढच्या वेळी रव्याऐवजी तांदूळाचं पीठ घालणार म्हणजे कुरकुरीत होतील.

दिनेशदा, आज मी करून बघितलं. (तुम्ही रेसिपी दिली कधी आणि मी करतिये कधी... :इश्श:) हसू नका हं आळशीपणाला...

1 275.jpg

<लहान मुलांसाठी oats चा cake करता येतो , आणि oats रवा खीर पण चांगली होते.> रेसिपि येउ द्या लवकर

रैना, बाजारात ते रोल्ड ओट्स किंवा क्वीक कुकिंग ओट्स या नावाने मिळतात.
पोह्यासारखे चपट असतात, पटकन शिजतात.

आज केली ओटस ची धिरडी .. मीही मिक्सर मध्ये वाटलं नाही .. छानच झाली ..

ह्याचं अजूनही हेल्दी व्हर्जन करायचं तर नॉन-डेअरी वापरता येईल का दह्याला पर्याय म्हणून? (म्हणजे पाणी घालता येइलच पण ती आंबटसर चव आणि जाळी पडणे हे दह्यावर अवलंबून असेल तर काय पर्याय वापरता येईल?)

धन्यवाद दिनेशदा ..मीही धिरडे केले आज ...मस्तच झाले. मुलीला ही आवडले हे विशेष! Happy
नेहमी गोड गोड ओटस ब्रेकफास्टला खातो त्यामुळे कांदा गाजर टाकुन केलेले धिरडे आवडले.
पण दही न टाकता केले म्हणुन जाळी नाही पडली वाटते Uhoh

आहा, यम्मी आहे टेस्ट! आज दिल्याबरहुकूम बनवले. पुढच्या वेळेपासून भाज्या वगैरे प्रयोग सुरू करेन.

ओट्स ना सद्गती मिळेल अशी चिन्हं दिसू लागली आता. एरवी खीर बोअर होते आणि तथाकथित मसाला ओट्स त्याहून.

Pages