गंगामाई..

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या वर्षी व्हॅलीचा ट्रेक केला. व्हॅली, हेमकुंड, हिमाचलात काढलेले दहा दिवस कधी आयुष्यात विसरेन असे वाटत नाही. काही काही योग आयुष्यात असावे लागतात, आणि जेह्वा अचानक असे ते पदरात पडतात, तेह्वा ती अनुभूती शब्दांत मांडणे खरे तर अशक्य. हिमालयाचे कडे, पहाड सामोरे येण्याआधीही इथे हरिद्वारला सामोरी आली ती गंगामाई. आतापरेंत गंगामाईबद्दल बरेच काही ऐकले, वाचले होते, पण जेह्वा तिला पाहिले, तेह्वा ऐकणे, वाचणे किती फोल होते, ते अगदी जाणवले. गंगामाईने खरेच वेड लावले, आणि आता ते कधी कमी होईल असे वाटत नाही. होऊही नये, ही प्रार्थना. हे सारे मी अतिशय भारावून जाऊन लिहिले आहे, हे मलाही जाणवते. मुळात माझे मन सश्रद्ध आहे, असे काही भव्य, दिव्य पाहिले की मला भारावून जायला होते. वेडेपणा आहे, पण असूद्यात.

'गंगामाई' हा अनुभव घेतल्यावर मनात उमटलेले हे काहीबाही..

****

गाडी हरिद्वारला पोहोचेपरेंत संध्याकाळ झाली होती. हवेत उष्मा होता. हरिद्वारचं स्टेशन मला आवडलं. बाहेरुन स्टेशनलाही एखाद्या मंदिरासारखा आकार दिलेला, मध्यभागी लायटिंग केलेला चमकणारा ॐ. सामान सुमान घेऊन स्टेशनच्या बाहेर पडलो. भरपूर गर्दी. माणसे पुढल्या गाड्यांची वाट बघत बसली होती, पहुडली होती. बायका साड्या वाळवत होत्या. लोकांचे खाणे वगैरे सुरु होते. माहौल निवांत होता. सगळे गंगामैय्याच्या चरणी आपली पापं, चिंता वगैरे वाहून निवांत असणार. माईच्या कुशीत चिंता कसली? तीही सगळं काही स्वीकारुन वाहतेच आहे युगानुयुगे... तिचा तोच धर्म आहे.

ठेसनाबाहेरच सामोसे, जिलब्या बनवण्याचे ठेले होते. अजूनही काय काय मिठाया होत्या. काहीच घेतलं नाही पण, एकतर हृषिकेशला पोहोचायचं होतं वेळेत. पुन्हा हरिद्वारला होतो, काहीच नाही तर निदान इतका मोह तरी आवरतो का बघावं, म्हणलं! जमलं तेवढ्यापुरतं तरी. लई झालं, इतकं जमलं तरी खूप आहे. ठेसनाबाहेर बस घेऊन डायवरबाबा तयार होते. सामान टाकलं आणि हृषिकेशच्या दिशेने निघालो..

****

स्टेशनातून वळण घेऊन डायवर सायबांनी बस बाहेर काढली.

रस्त्यावरुन एका जुन्या रथातून बसून कोणी साधूबाबा, कोण्यातरी बिनमहत्वाच्या पिठाचे स्वामी मिरवणूकीने चालले होते. बिनमहत्त्वाचे आणि मुख्य म्हणजे गाठीशी पैसा नसलेले असावे. गर्दी नव्हती त्यावरुन अंदाज. समोर आणि मागे मिळून चार शिष्य. सगळ्यांनी भगवी, लाल धोतरे नेसलेली. गंधाचे, भस्माचे पट्टे. शेंड्या. समोर एक सनईवाला, एक ताशेवाला. इतकेच लोक. हसूही आले आणि अचंबामिश्रित कौतुकही. बरोबर गर्दी नव्हती, मग कसं काय मी असं बसू रथात? लोक हसतील का? वगैरे स्वामीजींना काही वाटले नव्हते बहुतेक. शिष्यही चामरे ढाळत होते, त्याच भक्तीभावाने. निदान कर्तव्यभावनेने.

प्रत्येकजण आपले कर्तव्य, धर्म पाळत होते का? हीच का निष्ठा असते? अशीच? हे उगाच लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेणार्‍यांपैकी होते की खरेच भगवंतापाशी, वा जिथे कुठे स्वतःच्या श्रद्धा वाहिलेल्या होत्या, तिथे मनापासून विश्वास टाकून आपले कर्तव्य पार पाडणारे सत्शील जीव होते? कोणास ठाऊक. जो जे वांछिल, तो ते लाहो, हेच एक अंतिम सत्य असेल असे वाटू लागले. माऊलीने सगळे, सगळे खूप, खूप आधी सांगून ठेवले आहे..

मला मात्र ह्यापैकी काहीच जमले नसते, जमणारही नाही बहुधा. कितीतरी वेळा, कितीतरी कारणांनी लाज वाटली असती, ऑकवर्ड झाले असते. अशी निष्ठा अंगी बाणवू शकेन तो सुदिन. अशी निष्ठा अंगी बाणवणे कधीतरी जमावे, ही इच्छा. आता इथून गंगामाई आणि तिचे हरिद्वार, पुढे हृषिकेश, कधीतरी भेटणार आहे तो हिमालय, एकूणातच एकामागून एक धडे द्यायला सुरुवात करणार आहेत, ही खूणगाठ मनाशी बांधायला सुरुवात केली. घेता, किती घेशील दो करांनी... सनईचे सूर फार फार मोहवून गेले. शांत, गंभीर असे सूर. कधीतरी मरहूम उस्ताद बिस्मिल्लां खाँ, त्यांची सनई आणि त्यांची अलाहाबादची गंगामैय्या ह्यांच्यावरची एक डॉक्युमेंटरी पाहिली होती, त्याची फार फार आठवण झाली. उगाच भरुन यायला लागले. आत्ताशी अजून दर्शन होणार आहे, तर ही गत? एवढ्यातच असे होऊन कसे चालेल?

अजून एक वळण आले आणि सोबत पाण्यावरुनच वाहत येतो, असा गार वारा.

नेहमीच्या गार वार्‍यात आणि पाण्यावरुन वाहत येणार्‍या गार वार्‍यात एक फरक असतो नेहमी, म्हणजे असं आपलं माझं मत. नेहमीचा गार वारा जरासा कोरडासा. म्हणजे तुमचा जीव सुखावेल, पण एका अलिप्तपणे. तुमच्याभोवती रेंगाळणार नाही, तुमच्यात स्वतःला गुंतवून घेणार नाही. तुमच्या अंगावरुन म्हणता म्हणता पुढे निघून जाईल. एखाद्या बैराग्यासारखा. अडकणार नाही, आठवणी ठेवणार नाही.

त्याउलट पाण्यावरुन वाहत येणारा वारा. त्याची जातकुळीच वेगळी आहे लोकहो. हा केवळ सुखावणारा वारा नसतो, हा शांतवणारा वारा. तुमच्याभोवती मायेने रेंगाळणारा, एखाद्या खर्‍याखुर्‍या दोस्ताप्रमाणे हलके हलके तुमच्या मनात शिरणारा. तुमच्याही नकळत तुमच्या मनातली खळबळ म्हणा, चिंता म्हणा, तत्समच जे काही असते, ते सारे, सारे दूर करणारा. जिवाला विसावा देणारा वारा. कोरडेपणाचा मागमूस नसलेला. असा वारा अनुभवल्याबरोब्बर पाणी कुठे आहे, हे नजरेने शोधायला सुरुवात केली.

एक फार मोठाही नाही पण अगदीच नगण्यही नाही, असा कालवा सामोरा आला. मनात आले, ही गंगा? अशी कालव्यातून काढली आहे की काय शहरातून? भंजाळलोच! अविश्वास, अविश्वास! ही कशी असेल? नक्कीच नाही. ती तर जगन्नाथ पंडितांची गंगामाई आहे. त्यांनी भोगलेल्या सार्‍या तापत्रयातून त्यांना सोडवणारी. आपल्या अमर्याद मायेची फुंकर त्यांच्या श्रांत, क्लांत मनावर हळूवारपणे घालणारी.. भोळ्या सांबाने पार्वतीचा प्रसंगी कोप सहन करत मस्तकी धारण केलेली गंगा. कोण्या भगिरथाच्या पूर्वजांना उद्धरणारी गंगा. आजही जनमानसाच्या श्रद्धेचे स्थान असलेली गंगामैय्या. दिल्या शब्दाला जागून युगानुयुगे अव्याहत वाहते आहे.

अजून दर्शन दिले नाही माईने...

मला वाटते, कोणीतरी अत्यंत अविश्वासाच्या आणि धक्का बसल्याच्या सुरात म्हणाले पण! ही गंगा??? ही?? अशी??? की माझ्याच डोक्यात माझ्याच मनातले शब्द ऐकू आले होते? कोणास ठाऊक. पण ही गंगा नाहीये, असेही कळाले. हुश्श.. गंगेला बघायला डोळे अणि मन आसुसल्यासारखे झाले होते. कधी दिसेल माई? आत्ता? आत्ता? अजून थोडे पुढे गेल्यावर? डोळे भरुन बघता येईल का? किती वाचले आहे आणि किती ऐकले होते आजवर तिच्याबद्दल! खूप अपेक्षा, दडपण, आशा वगैरे अशांसारख्या आणि नेमक्या कसल्या ते अजूनही न उमगलेल्या भावना मनात बाळगून मी गंगेची वाट पहात होते आणि एक पूल लागला भला मोठा. गंगेवरचा पूल. मिट्ट काळोखाचा रंग मैय्याने पांघरुन घेतला होता. काहीच दिसत नव्हते, फक्त आवाज येत होता, संथसा. चुबळुक, चुबळूक.. किंवा पलक्, पलक् असा. की लपक्, लपक्? पलक् की लपक् हेच ठरवता येईना. राम की मरा - तसा गोंधळ. शेवटी लक्षात आले की पलक् असो की लपक्, फरक नै पेंदा. पलक लपकतेही सबके मनमें घर बसा लेती हैं माई. उसके बाद भूलना नामुमकीन. आयुष्यभरासाठीची ओढ. तीच मैया, तीच सखी, तिचाच आधार.

अर्धवट अंधारामध्ये नदीला घाट बांधला आहे, हे जाणवले, साधारणसे दिसले. दगडी सुबकसा, विस्तीर्ण घाट. मनात आले, तिथेच पथारी पसरावी. माईच्या सोबतीने तिथेच शांतपणे झोपून जावे. कोणाची भीती? माई काळजी घेईल. नक्कीच.

मनातल्या मनात माईला हाका मारल्या. तिने ऐकल्या का?

****

तितक्यात बसच्या दुसर्‍या बाजूच्या खिडक्यांबाहेर लक्ष गेले. ओह्हो! दिसली, माई दिसली.. आणि कशी? अवाक् व्हायला झाले! छाती दडपली एकदम. आपल्या सर्व सौंदर्यसामर्थ्यसौष्ठव आणि ऐश्वर्यानिशी माई वाहत होती. तिच्या लाटा सातत्यपूर्ण नाद करत इतक्या वेगाने पुढे पुढे सरकत होत्या! जणू काळाच्या वेगाला मागे टाकतील. छे! शब्दांत ते दृश्य पकडणे मला केवळ अशक्य आहे! कसे दिसत होते ते? जणू काही आताच कात टाकलेल्या नागिणी सुसाटत धावत होत्या! मनात आले, माईने खरेच तर सांगितले होते भगिरथाला. तिचा वेग सहन होणे अशक्य. हा तर अंगावर येऊ पाहणारा वेग होता.

जराशा दुरूनच पाहत होतो, तरीसुद्धा तसे बर्‍यापैकी ओझरते पाहतानाही तो वेग असह्य झाला होता, विलक्षण ओढ लावत होता, भुरळ पाडत होता... तर प्रत्यक्ष तिच्या सन्मुख असणार्‍यांची काय स्थिती होत असेल? जीव इतक्या काकुळतीने अस्वस्थ होऊ लागला होता, एक प्रकारची उलघाल आणि एक विलक्षण उर्मी दाटू लागली होती आणि वाटले, बस्स! बेभानपणे ह्या लाटांवर स्वतःला तनामनाने झोकून द्यावे, माई नेईल कुठे ते. सखी आहे, सांभाळूनच नेईल, आणि एकदा झोकून दिल्यावर पुढची पर्वा कोणाला? कशाला? खरंच. विल़क्षण मोहाचा क्षण. नुसते वाटले. कुडी झोकायला धीरही खरोखरच झाला असता की नाही, कल्पना नाही. उर्मी दाटणे वेगळे आणि कृती करणे त्याहून वेगळे. निरनिराळ्या जबाबदार्‍यांनी पाय मागे ओढले. जबाबदार्‍या नसत्या तर झोकून दिली असती का कुडी? जमले असते? काय, कोणास ठाऊक.. छंद म्हणून विचार पुरला आहे मात्र सद्ध्या. असो.

किती किती ओढ लावते गंगामाई! पंडित जगन्नाथांनी कोणत्या भावविभोर अवस्थेत तिचे वर्णन, स्तुती आणि शब्दाने पूजा बांधली असेल, ह्याची पुसट, पुसट जाणीव झाली, न झाली. किती प्रकर्षाने स्वतःला तिच्या लाटांवर झोकून, फेकून द्यावेसे वाटले आणि पुढे तिचे निरनिराळे प्रवाह पाहताना, अनुभवताना वाटतच राहिले. जमेल तितके ते दृश्य पहायला प्रयत्न केला. बस थांबणार नव्हती, फार फार दु:ख होत होते बस न थांबत असल्याचे.

ऐलतटापासून काही अंतरावर असलेल्या पुलावर आमची बस धावत होती आणि आत बसलेले आम्ही काही जीव, गंगेला होता होई तेवढे डोळ्यांत, मनात साठवत होतो. पैलतट भाविकांनी थोडाफार गजबजलेला होता, काठांवरच्या देवळांतून दिवे लागले होते. माईची आरती सुरु होती. मोठमोठी निरांजने, आरत्या तेवत होत्या, झांजा, मृदंग, ढोल वाजवणारेही डोळ्यांनी टिपले, मोठा नाद करणार्‍या घंटा घेऊन लोक उभे होते. मोठ्या मोठ्या ज्योतींचा उजेड पाण्यावरुन परावर्तीत होत होता. आरतीचा आवाज आणि वाद्यांचे नाद एकमेकांत मिसळले होते. माई आरतीचे सोपस्कार करुन घेत मार्गक्रमण करतच होती. एका कोणत्या तरी क्षणी मनावर अगदी गारुड झाले. घशात हुंदका दाटू झाला आणि डोळे चुरचुरायला लागले. हिला सोडून पुढे जायचे? पुन्हा दर्शन? सगळे मोह, माया, बंधनं पाश सोडून लोकांना हिचा आश्रय का करावासा वाटतो, कशी प्रेरणा मिळते, का इच्छा होते, ह्याचा थोडा थोडा उलगडा झालासे वाटले..

पण आता वाटते, खरेच का झाला उलगडा?

****

हे जे काही सौंदर्य समोर उन्मुक्तपणे वाहते, ते मृदुमुलायम नक्कीच नसते. आपल्याच मस्तीत वाहते माई. आपल्याच धुंदीत. आखीव रेखीव वगैरे असे काही नाही माईपाशी. बस्स, एक आवेग आहे, मत्त उन्मत्तपणा आहे आणि ते केवळ तिलाच शोभून दिसते. किती बोलावे तिच्याबद्दल? न बोलवे काही. सिर्फ एहसास हैं ये, रुहसे महसूस करो. गंगामाई ही केवळ अनुभवण्यासाठी आहे. शब्द, विचार सारे काही थिटे पडते तिच्यापुढे. तिला म्हणावेसे वाटले, नव्हे, प्रवासात पुन्हा, पुन्हा मनातल्या मनात तिच्याशी बोलताना म्हटले, त्वं साक्षादात्मासि नित्यम्| ऋतं वच्मि| सत्यम् वच्मि|.. काहीही मनात येत होते, सातत्याने घडत राहिलेल्या अफाट गंगादर्शनाने मी पदोपदी भारावले आणि मन सतत भरुन, उचंबळून येत राहिले, हे मात्र नक्की.

आता पुन्हा कधी दिसेल? कळाले की आता अख्खा रस्ता दिसणार आहेत गंगेचे प्रवाह, गोविंदघाटीपरेंत अगदी. खरंच? खरंच का? किती आश्वस्त वाटले तेह्वा. माई बरोबरीने येणार होती, साथ सोबत करणार होती. उगीच का ती सखी आहे? तिच्याशी मनातल्या गोष्टी बोलत प्रवास होणार तर. कोणत्या जन्मीचे पुण्य फळाला आले होते! काय सांगू हिला? विदध्या: समुचितम्! अजून काय मागायचे गं? कधीतरी तुझ्या काठाकाठाने फिरायची इच्छा आहे. पार गंगोत्रीपरेंत जायचे आहे बघ. तुझ्या संगतीने तुझ्या काठावर फुललेले, वसलेले जीवन पहायचे आहे, शिकायचे आहे. एकदा तरी तुझ्या किनार्‍यावर तुझ्या लाटांचा नाद ऐकत आणि आकाशातले चांदणे बघत निवांत पहुडायचे आहे. तुझ्या संदर्भातल्या कथा कहाण्या आठवायच्या आहेत आणि बस्स, शांत, शांत व्हायचे आहे. कधी बोलावशील पुन्हा?

****

माई तात्पुरती दृष्टीआड झाली. तिचा नाद मात्र मनामध्ये अव्याहत ठाण मांडून राहिला. अजूनही आहे. म्हटले ना मी, भूलना नामुमकीन.

जसे जसे पुढेपुढे जात होतो, नजारे उलगडत होते. कोणत्या नजार्‍याला म्हणावे की नजारा हो तो ऐसा हो? डावे उजवे ठरवणे फार कठीण झाले होते, आणि तेवढ्यात एक फार, फार सुरेख जागा आली. निव्वळ अप्रतिम म्हणावी, अशी.

एक मोठा पूल गंगेच्या पात्रावर बांधला होता, हिमालयाच्या रांगांमधून गंगा मनमुराद वाहत होती. आमची वाट एका काठाने जात होती आणि वाटेची दुसरी बाजू हिमालयाच्या पहाडांनी तोलून धरली होती. रस्त्यावर आमच्याशिवाय कोणी, कोणी नव्हते. सकाळच्या उन्हांत गंगेचे पात्र किती लोभस दिसावे, त्याला काही सीमा? अवर्णनीय, अप्रतिम वगैरे शब्दही पोकळ वाटावेत. काही घटना, अनुभव नुसते जगायचे आणि जपायचे. गंगेच्या पाण्यावरची त्या सकाळच्या वेळी आभा तर मी जन्मात विसरणार नाही. काहीतरी फार पवित्र आणि जिवाला वेड लावणारे असे समोर वाहत होते. किती जवळून. पुन्हा एकदा वाटले, झोकावे का स्वतःला? मन कधीच झोकून दिले. जवळच असलेल्या खडकावर, उंचच उंच निळ्या, हिरव्या पहाडांच्या साक्षीने आणि वाहणार्‍या पाण्याच्या सोबतीने जगाच्या अंतापरेंत तिथेच बसून रहावेसे वाटले. काही काही क्षण, काळाचा काही भाग आपल्याला किती निर्मळ भावना देऊन जातात. दुर्मिळ असतात. त्यापैकी हा नक्कीच एक. अजून ते सारे तसेच्या तसे डोळ्यांपुढे येते. वेड लागते. कधीतरी तिथूनही पुढे निघावे लागले..

****

अतिशय अनिच्छेने गाडीत बसून मार्गाला लागलो. एके ठिकाणी खायला म्हणून थांबलो. तिथेही गंगा अशीच वाहत होती. भरभरुन. पहाडांच्या सोबतीने. पडाड तरी कसे. उंचनिंच. एकाच वेळी मनात भरणारे आणि धडकीही भरवणारे. गंगेचा प्रवाहही तसाच आहे. जरी मनात धडकी भरली तरीही कसले अनाकलनीय आकर्षण वाटत राहते? पुन्हा पुन्हा ओढ वाटते? सारेच गूढ. तिथूनही पुढे निघालो.

****

सकाळी सहाला हृषिकेशहून निघालो, ते कौडीयालला खायला थांबलो. इथे प्रामुख्याने गंगेच्या प्रवाहामध्ये राफ्टींग चालते. जिथे थांबलो, ते एक छोटेसे हॉटेल होते. ह्या हॉटेलचा समोरचा रस्ता ओलांडला की छोटी छोटी कॉटेजेस होती, खाली जायला छोटासा रस्ता, पायर्‍या होत्या. मघा रस्त्यावर गाडी थांबली होती तेह्वाच पलिकडे गंगा वाहताना दिसली होती. लांब वाटली होती, तेह्वा लांबून का होईना, पुन्हा एकदा पाहूयात म्हणून, पायर्‍या उतरलो, आणि पाहतो तो काय, ही इथ्थेच अशी हातभर अंतरावरुन गंगा प्रवास करत होती! नशीबावर विश्वास बसेना.

तेच जीवघेण्या सौंदर्याने नटलेले पहाड. तेच शुभ्र पाणी. तोच वेगवान प्रवाह आणि हे सारे नि:शब्दपणे अनुभवत तेच ते आम्ही. आम्ही सारेच समोर जे काही दिसत होते, त्याने मंत्रमुग्ध झालो होतो. कॉटेजेसमध्ये जे कोण भाग्यवान मुक्काम ठोकत असतील, त्यांचा हेवा, हेवा वाटला....

****

संपूर्ण प्रवासात बाजूने गंगेचा प्रवाह दिसत राहिलेला. सोबतीला उंच निंच, हिरवे, निळे, करडे, आकाशापरेंत पोहोचणारे, अंगाखांद्यांवर ढग बाळगून असलेले पहाड. ह्याच सदाबहार दृश्यांनी सतत मोहिनी घातली, वेड्यासारखे वेड लावले आणि थकवलेही. गंगा आणि हिमालय, हाच हिमाचलाचा आत्मा. आमच्या नशिबाने साथ दिल्याने त्याचे दर्शन घेण्याचे भाग्य पदरी आलेले आम्ही.

****

बसने रस्ता कापताना प्रथम देवप्रयागपाशी पोहोचलो. भागिरथी आणि अलकनंदेच्या संगमाचे ठिकाण. तिथे थांबलो. कमालीचे उन होते. कातडी करपवणारे उन. सहन होत नव्हते इतके तीव्र, पण त्या प्रयागापुढे सारे काही विसरायला झाले.... वर ढणाढणा उन आणि खाली भागिरथी आणि अलकनंदा आपापल्या मार्गाने पुढे येऊन एकत्र होऊन, गंगा म्हणून मार्गक्रमण करत होत्या. दोन्ही तीरांवर दाटीवाटीने पिवळ्या, निळ्या रंगांची घरे. काय अफलातून सुरेख दिसत होते सारे. पहाडांवर घरे बांधून लोक राहतात. तिथे जाऊन २-३ दिवस का होईना, रहावे, अशी फार फार इच्छा झाली. दिवसभर नदीचा नाद कानांवर पडला की कसे वाटत असेल, हे जाणून घ्यायचे होते. तिथल्या रहिवाशांचा हेवाच हेवा वाटला. रोज त्या नद्या वाहताना अनुभवायच्या, त्यांचा नाद ऐकायचा..

इथे पाऊस कसा पडत असेल? त्यावेळी ह्या नद्या कशा भासत असतील? कशा वाहत असतील? रोरांवत असतील? फुफाटत असतील? रौद्र निसर्गाचे ते एक रुपडे पहायचे फार मनात आहे. आणि चांदण्या रात्री कशा दिसत असतील? नुसती कल्पना करुन माझ्या अंगावर काटा येतो! भारावून जायला होते. रात्रीच्या चंद्रप्रकाशात ते दुधाळ पाणी किती मोह घालत असेल पाहणार्‍याला... तेही पहायचे आहे मला. पहाटवेळी? संध्याकाळी? अमावास्येला?

****

किती, किती पहायचे राहून जाते आणि चाकोरीबद्ध आयुष्य मात्र गळ्यात पडते, ह्याची प्रकर्षाने नव्याने जाणीव होत राहिली. कधी योग आहे, पाहू. एव्हाना मी आतापरेंत दिसलेल्या हिमाचल, हिमालय आणि गंगेच्या प्रेमात इतकी बुडाले आहे, की काय सांगावे! इश्कने फक्त गालिबच निकम्मा होतो की काय?

समाप्त.

प्रकार: 

चांगलं मांडलं आहेस ग. मला एवढं मांडता येत नाही पण गंगेचा प्रवाह बघून छाती दडपते मात्र.

हरिद्वारच्या त्या गंगेच्या घाटाकडे जाणार्‍या गल्ल्या बघितल्या आहेस नां? दोन्ही बाजूंना ते धाबे, स्वीट्स आणि अनेक दुकानं. तर ते पदार्थ चाखण्यासाठीच एकदा हरिद्वारला जायचं असा प्लॅन मागच्या वर्षी आमच्याकडे झालाय. Wink

धन्यवाद बित्तुबंगा. आज रात्री फोटोही टाकते, लेखातच.
२-३ च आहेत माझ्यापाशी.

आडो, मलाही जायचं आहे परत. लक्ष्मणझूला पहायचा राहिला आहे! Wink

पार्थिवतेच्या क्षितिजापुढती जाऊनि ही राहिली
आणि मज माउलीच जाहली!

सुरेख लिहिलं आहेत. एवढ्या चांगल्या पद्धतीनं मनातल्या भावना मांडता येणं हे एक गिफ्टच आहे. अभिनंदन. Happy

फोटो बघायला आवडतील! >> + १.

अतिशय सुंदर Happy मनाने फिरुनपण आलो Happy

>> किती, किती पहायचे राहून जाते आणि चाकोरीबद्ध आयुष्य मात्र गळ्यात पडते, ह्याची प्रकर्षाने नव्याने जाणीव होत राहिली. >> १००% मोदक Happy हिच खंत टोचत रहाते !

सुंदर.. खुप छान लिहीलंय.. आवडलं..:)
फेबमध्ये २ आठवडे ऋषिकेशला होतो.. गेल्यावर पहील्याच दिवशी गंगानदीचे गंगामैया मध्ये रुपांतर कधी झाले ते कळलंच नाही.. रोज सकाळ संध्याकाळ तिच्या काठावरच.. संध्याकाळी तिची आरती अनुभवने तर अलौकीक असा आनंद देऊन जायचा..:)

>गेल्यावर पहील्याच दिवशी गंगानदीचे गंगामैया मध्ये रुपांतर कधी झाले ते कळलंच नाही. >> सतिशभाऊ, अगदी, अगदी. तसेच झाले मलाही, काही क्षणांत.

भावस्पर्शी.... Happy गंगेची विविध टप्प्यांवरची रूपे याची देही याची डोळां मनात साठवून घेताना तुझी काय मनस्थिती असेल याची फक्त कल्पनाच करू शकते!! गंगेचं गारुड आहे हेच खरं! आणि ते कधी संपूच नये असं वाटतं! Happy

भयंकर सुरेख लिहिल आहेस!! इतक छान लिहित येणं हे खरच गिफ्ट आहे Happy
तु काढलेल्या फोटोची साथ पण पाहिजे ह्या लेखाला..

काय लिहिलंयस! साक्षात गंगामैय्याने तुझा हात धरून लिहून घेतलंय. भारी नशीबवान ग तू! आणि फोटो तर छान आहेतच. अगदी आपण प्रत्यक्ष पहातोय असं वाटलं. वा! दिल खुष हो गया!

जीवन शोर आये और जाये...शाश्वत बस सन्नाटे रे !
पं.चुन्नुलाल मिश्रा संधीप्रकाशात गंगामैयाच्या काठावर बसून गाताहेत ह्या ओळी... असा भास झाला हे लिखाण वाचताना Happy

Pages