मैफल

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

# 'माहेर' मासिकाच्या ऑक्टोबर २०११ अंकामधे पूर्वप्रकाशित.
# मायबोलीवर आयोजित केल्या गेलेल्या एका कथाबीज स्पर्धेतील मुद्यांवरून ही कथा बनवली होती. तेव्हा मर्यादित स्वरूपात लिहीलेली ही कथा नंतर विस्तारीत केली होती.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

"थोडा. थोऽऽडा कमी पडतोय बघ. जऽरा वर लागुदे.." हवेत चिमुट नाचवून, डोळे बारिक करत सुधीर म्हटला, "किंऽचित."

त्याच्या तिरक्या मानेकडे बघुन चंदू हसला. समजल्यागत मान हलवली आणि परत आकारात चालू झाला.
'पट्टी लावून मोजावा' त्याप्रमाणे चंदूचा सुर अचूक बदलला, सुधीरने चिमटीत पकडला होता तितकाच!

"हांऽ! आता कसा बरोब्बर लागलाय. आता हीच पट्टी धर. " सुधीर खुशीत बोलला, "दोन मिनिटात अशी सतार लावतो की बघतच बसाल!!".

तबल्याशेजारी असलेली ती 'हातोडी' उचलुन मी हलकेच सुधीरच्या पाठीत घातली. "सुधर्‍या!! लेका, चंदू गाणार आणि त्याच्या सुरावर तु सतार लावणार! तुझी म्हणजे सगळी उलटी गंगाच आहे बघ. दंडवत आहे तुला!
ती शेजारची पेटी काय 'पेटी-पूजनासाठी' आणलीये होय रे? काढ की ती! " मी सुधर्‍याला म्हटलं.

"असुदे रे, त्यात काय एवढं? आपले आपणच तर आहोत. " मला थांबवत चंदु बोलला. "आणि असंही आता तु चाल्लायस! 'तबलजीशिवाय' आमच्या कुठल्या मैफिली होणार? काय रे सुधर्‍या? "
सुधर्‍याही आम्हा दोघांकडे बघुन मान हलवु लागला. चंदूचं म्हणणं खरंच होतं. पण माझं मन मानत नव्हतं.
"असं का म्हणतोस रे? इथे जवळच तर आहे मी. काय देश सोडून चाललोय की काय? आणि अधेमधे सुट्टी मिळली की येईनच की. मलाही तुमच्याशिवाय करमणाराय होय रे? " मी मनापासुन म्हटलं.
चंदू माझ्याकडं पाहून हसला, मग सुधीरकडे वळून "हां. मी धरतो पट्टी. ह्याचं सोड. तू लाव. ", माझ्याकडे हात करत बोलला.

दोनचार मिनीटात सुधीरची सतार सुरात आली, तसा तोही खुश झाला.
"तु सुरु कर, मी पकडतो." त्यानं चंदूला म्हटलं. पडत्या फळाची आज्ञा. लग्गेच चंदूने आकारात सुरुवात केली. पहिली सम आली तसा मीही ठेका धरला आणि सुधीरनं सतार छेडली.

* * * * * * * * *

मी, सुधीर आणि चंद्रवदन. जिवाभावाचे दोस्त. शाळेत असल्यापासून बरोबर. अगदी तिन्ही त्रिकाळ एकत्र! एकमेकांकडे जेवणं, कधीमधी घरी राहणं वगैरे कशा कशात म्हणून औपचारिकता आड आली नाही. मुख्य म्हणजे घरच्यांनी कधीही तसं मानलं नाही.

बघता बघता कॉलेजात जाण्याची वेळ आली. अकरावीला चांगले मार्क मिळाले, तसे मी आणि सुधीरने 'सायन्स' घेतले व चंदूने "आर्ट्स'. खरे तर आम्ही त्यालाही "सायन्स घे!" म्हणून मागे लागलो होतो, कारण वडिलांचे एक स्नेही हल्ली घरी आले की नेहेमी म्हणत, "चिरंजीवांस सायन्स घ्यायला सांगा होऽ. सायन्स घेतले की पुढे पी.डी. नंतर इंजिनीअरींग करता येईल. इथुन पुढे त्यात भरपूर नोकर्‍या येतील!" .
पुढं खिन्नपणं "नाहीतर आहेच आमच्यासारखं कारकुंडेपणाचं जगणं! काय? " असंही जोडत.
जसजसा काळ लोटत गेला, तशी आम्हा तिघांची 'एकछाप' आयुष्यं एकमेकांपासुन बदलत बदलत गेली. त्याची सुरुवात मात्र इथेच!

तसे पाहता चंदूलाही मार्क काही कमी नव्हते, पण त्याचा विचार पक्का होता. त्याला 'संगीतामधे' रस होता. त्यात काहीतरी भरीव, ठोस काम करायचं होतं. सायन्स घेतले तर त्यात हे शक्य होणार नसल्याने तो आर्ट्स मधे गेला होता. चंदूच्या गाण्याच्या आवडीबद्दल, तयारीबद्दल सगळ्यांना माहिती आणि आदराभिमान तर होताच, आणि "म्हणूनच त्याने कला शाखा निवडली आहे" ही गोष्टही सर्वांनाच ठाऊक होती.

अखेर कॉलेज सुरु झाले. आठवडाभर झाला असेल, जोराचा पाऊस लागला. कॉलेजला जायचं तर नदी ओलांडावी लागे. ह्या पावसात नदीला अशी काही ओढ लागे, की पाय टाकताच माणुस निर्माल्यासारखा आत ओढला जाई. पात्र हे मोठ्ठं फुगलेलं. मग सक्तीची विश्रांती. आणि पाऊस चालुच. घराबाहेरही पडता येणार नाही इतका!

चौथ्या दिवशी संध्याकाळी एकदाचा पाऊस थोडा कमी झाला, तसा सुधीर आणि चंदू बोलवायला आले, "देवळात जाऊ!" तसा उशीरच झाला होता, पण 'लगेच परत येऊ' म्हणत आम्ही निघालो. सततच्या पावसानं घरात बसून बसून मन बुरसटल्यासारखं झालं होतं व म्हणुनच आम्ही लगेचच बाहेर पडलो.

एरवी दुपार टळली की बरेच लोक नदीत पोहायला येत. पण पावसाळ्यात नदी रुप बदलते म्हणतात. वीस-वीस वर्षांचा अंदाज चुकतो आणि माणुस थेट तळाला. अशा वेळी मरणार्‍यापेक्षा बघणाराच दुर्दैवी! समोरचा वाहत जातो आणि मी लाचार! मरणारा सुटेल, बघणार्‍याचाच अंत. अशा वेळी कोणीही नदीच्या वाटेला जात नाही.
हलकासा शिडकावा पडल्यानंतरची नदी वेगळी आणि आभाळ फाटल्यावरची वेगळी. एक आशावादी, आणि दुसरी ?? तरीही एकदोन वेडे होतेच पाण्यात. पण आताशा अंधार पडु लागल्याने तेही हळुहळु बाहेर पडु लागले.

पोहुन-सवरुन झालं की सर्वजण तिथल्या मारुतीच्या मंदिरात डोकं टेकवुन जात. हेही गेले आणि मंदिराबाहेर आम्ही तिघेच राहिलो. अंधार वाढत गेला तशी रातकिड्यांची किरकिर वाढु लागली होती. घरात कंटाळुन बाहेर आलो खरे, पण त्या ओशट वातावरणात आता बसवेना. "चला, जावं परत आता!" सुधीर म्हटला.
तेवढ्यात, "तुम्ही दोघं बडे बाप की अवलाद आहात रे. म्हणून सायन्स वगैरे परवडतं तुम्हाला! आमचं काय आहे? " चंदू अचानक बोलला!

आम्ही चमकलोच! "काय रे? हे काय एकदम?" मी म्हटलं. खुप खोदून खोदुन विचारलं तरी सांगेना. मग नेहेमीचा उपाय "शप्पथ"! "तुला आपल्या मैत्रीची शप्पथ आहे बघ !" असं म्हटल्यावर मग, "नवीन काही नाही रे. तेच सारं. काहीही म्हणा, 'जेवणात जसं मीठ, तसा आयुष्यात पैसा!'
ते तुमचे सायन्सवाले काका खरेच सांगतात. पैसा सर्वात महत्त्वाचा आहे बाबांनो! आणि त्यातही वडिलांनी मिळवुन ठेवला असला तर आणखीनच! " चंदू आमच्याकडे न बघता म्हटला.

मला चंदूचा रागच आला. एक तर मला दुसरीकडे बघुन कोणी बोललेलं अजिबात आवडत नाही. अशी माणसं काहीतरी खोटं बोलत असतात व म्हणूनच समोरच्याला तोंड दाखवायला घाबरतात. पण चंदू? त्यानं असं का करावं? फार आश्चर्य वाटलं त्याच्या बोलण्याचं. कारण इंजिनीअरिंगचा खर्च आमच्या घरच्यांनाही परवडणारा नव्हता. कर्ज काढावं लागलं नसलं तरी घरी बर्‍याच गोष्टींमधे काटकसर करुनच हे शक्य होणार होतं. माझे मार्कही चांगले होते, ज्यामुळे शिष्यवृत्तीही मिळु शकली असती. केवळ वडिलांचा पैसा असं काहीच नसताना चंदूनं असं का म्हणावं हे मला समजत नव्हतं.
पण मी त्याला काहीएक बोललो नाही. कट्ट्यावरुन उठत खुणेनंच दोघांना "चला.." म्हटलो आणि आम्ही घराकडे निघालो.

* * * * *

पी.डी.नंतर मला इंजिनीअरिंगला प्रवेश मिळाला. पण सुधीरला काही ते इंजिनीअरिंग आवडेना. जास्त त्रास करून न घेता त्याने इंजिनीअरिंगला रामराम ठोकला व तो बी.एस.सी.ला गेला. मला मात्र इंजिनीअरिंग आवडु लागले. पण अभ्यासासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागे. एकत्र अभ्यास करण्यासाठी बरेचदा दुसर्‍या मित्रांबरोबर जास्ती राहु लागलो व आमचे मार्ग परत वेगळे झाले.

बघता बघता माझे चौथे वर्षही संपत आले आणि एका कंपनीने परीक्षेचा निकाल लागायच्या आतच मला नोकरी देणार असल्याचे सांगितले. खूप छान वाटले त्या दिवशी. संध्याकाळी सुधीरच्या घरी गेलो. तो चंदूकडेच गेल्याचे
समजले.

"हे पेढे! नोकरी मिळाली!!!" मी दोघांना पेढा देत सांगितले. दोघेही फार खुश झाले. चंदूने मला खोलीतल्या देवाला नमस्कार करायला लावला. तिथल्या लक्ष्मीच्या तसबिरीला नमस्कार करुन "अशीच कृपा राहुदे~" मी म्हटलं.
"नोकरी दिल्लीला आहे.", मी सांगितलं.
सुधीर आणि चंदू एकमेकांकडे बघु लागले. " म्हणजे आता परत एकमेकांपासून लांब ". मलाही वाईट वाटलं. पण तिथला अनुभव आणि मुख्य म्हणजे पैसा चांगला होता. त्यामुळे फेरविचार करण्याचा प्रश्नच नव्हता.
थोडा वेळ तिथल्या गोष्टींच्या गप्पा झाल्या आणि मग उरलेल्या कामांची आठवण झाल्याने 'निघतो ..' म्हणालो.
"अरे थांब!" चंदू बोलला. माझा हात आपल्या हातात घेत बोलला, "हे बघ. तू जायचायस आता. तेव्हा उद्या रात्री तुमचं ते 'केळवण' वगैरे संपलं की या 'खोलीवर'. सुधर्‍या तूला वेगळं सांगायला नकोय. तूही येच. झकासपैकी मैफल करु. परत कधी वेळ मिळेल कोण जाणे. काय? " थोडंसं हसत चंद्या सगळं बोलला खरा पण त्याचं हे हळवं आमंत्रण अगदी आतून आलेलं समजत होतं. घाई होतीच पण मलाही जावंसं वाटतच होतं.

आठवडाभरानंतर दिल्लीला जायला निघायचं होतं. पहिल्यांदाच इतका दूर जाणार, म्हणुन मावशीनं आपुलकीनं जेवायला बोलावलं होतं, त्याचंच चंद्यानं 'केळवण' बनवलं होतं. त्याच्या मैफिलीचं आमंत्रण स्विकारुन, 'आमंत्रण' कसलं? 'बोलावणं'. काही कामं निघाली आणि त्या दिवशी काही जमलं नाही. बहुतेक आता पुढच्या वर्षीच असा विचार मनात आला. तेवढ्यात चंदूच घरी आला. सगळी तयारी होईस्तोवर बसून राहिला. आणि रात्री दहाच्या सुमारास म्हटला, "चल. मैफल! " त्याचा आग्रह मोडवेना. पण अजून एक काम आठवलं तसं " तू हो पुढे" म्हटले, तसा तो निघाला. पोचायला थोडा उशीरच झाला. घरी पोचलो, बाहेर भिंतीला टेकून सायकल लावली.

चंद्रवदनाचा 'रियाज' बाहेरही ऐकु येत होता !!! बर्‍याच दिवसांनी गाणं ऐकत होतो. दार ढकललं, तर ते उघडंच होतं. दार उघडल्या उघडल्या उदबत्तीचा मंद सुगंध दरवळला. चंदनाचा वास खोलीत सर्वदूर पसरला होता.
उजवीकडच्या भिंतीवर सरस्वती आणि लक्ष्मी. तसबिरीवरचा ताजा हार आणि समोरची उदबत्ती.
'खोलीत' एक मोठ्ठं जाजम अंथरलेलं. कोपर्‍यात ते दोन तबले. चंदू बसला होता, तिथं दोन तांबे भरुन ठेवले होते.
खोलीवर असणार्‍या दोन पेट्यांपैकी एक, चंद्रवदननं हाताशी घेतली होती आणि डोळे मिटुन तो आकारात गात होता. पेटीवर बोटं लिलया फिरत होती. नेहेमीप्रमाणंच.. मी दारातच उभा राहुन ऐकत होतो.
गाणं चालु झालं, ' तुज, मागतो मी आता.'
'यमन' राग!!! माझा आवडता!!! बरोबर, मी चाल्लो होतो ना?

" तुज मागतो मी आता ~
~ मज द्यावे एकदंता " चंद्रवदननं गात होता.
बरोबर आणलेला तबला घेऊन मी त्याच्या उजवीकडे बसलो.पिशवीतून तबला बाहेर काढला. डग्गा तिथलाच घेतला नेहेमीप्रमाणे. हा मृदंगासारखा वाजणारा माझा तबला, भजनांबरोबर वाजवताना वेगळीच मजा येते म्हणुन आणायचो. देवीला, वाद्याला नमस्कार केला.
"तु ज - - ", भजनी ठेका चालु झाला.
"मागतो मी आता..." चंद्रवदन गाता गाता हसला. डोळे बंदच होते. पुढच्या समेला बरोब्बर उजवा हात, "हां!!!"
मधेमधे आलाप घेत, चंदू गात राहिला. "तु ज , मागतो मी आ - ता. "
गाणं संपता संपता सुधीरही आलाच. "या बुवाऽऽऽ" चंदू हसून बोलला.

सुधीर आत आला. त्याने पटकन कोपर्‍यातली सतार उचलली. चंद्याच्या डावीकडे बसला.
देवीच्या तसबिरीला, वाद्याला नमस्कार झाला.

"हांऽ! आता कसा बरोब्बर लागलाय. आता हीच पट्टी धर. " सुधीर खुशीत बोलला, "दोन मिनिटात अशी सतार लावतो की बघतच बसाल!!".

" बर बर. लाव. " चंदू.

मग आमच्या लेव्हलची दोनतीन गाणी झाली आणि परत चंद्रवदन चालू झाला. साधारण अर्धा-पाऊण तास त्याला साथ दिल्यावर हौशी लोक, अर्थात मी आणि सुधर्‍या दमलो. मग उरला चंद्रवदन, त्याची पेटी आणि त्याचा रियाज!!! सुरुवात आमच्या लाडक्या रागांपासुन झाली खरी पण हळुहळु गाडी स्वतःच्या लाडक्या गाण्यांकडे वळली. मधेच मग एकदोन अनोळखी गाणी झाली. साथ द्यावीशी वाटत होती, पण हात दमले होते.
गाणं संपलं, चंद्रवदननं ग्लासभर पाणी प्यालं.

मग आमच्याकडे पाहून हसला. "अल्हैय्या बिलावल."
"उस्ताद, त्रिताल..." माझ्याकडे बघत बोलला. आणि " कवन बटरियाऽ , गयी लोऽ माई दे हो बताई.. " संथ चालु केलं.
हा विलंबित घेतो आणि मधेच थांबल्यासारखं करतो. मग माझी लय बिघडते. त्यामुळे "फास्ट घे की", मी बोललो.
मला हातानंच थांबवत चार-पाच मिनिटं संथ गतीमधेच गाणं चालू राहिलं.
मग परत "बुवाऽ.. " आणि हातानं मात्रा मोजून दाखवू लागला.
"१, २, ३, ४ ", "१, २, ३, ४ ", "१, २, ३, ४ ", "१, २, 'कवन बट' " "हां!!!" अशी काहीतरी सम दाखवली.
मी परत जोर करत साथ द्यायचा प्रयत्न चालु केला. "कवन बटरियाऽ , गयी लोऽ माई.. " चंदू गातच होता.
मधेच कमीजास्ती वजन देऊन माझी सम चुकवत होता. चुकलो की हसायचा. मीही थांबून परत समेवर पकडायचो. पाचसात मिनिटे त्याच्या वेगात वाजवले आणि हातात गोळे आले. हा माणूस गात होता. पेटीवर हात चालू होते, सूर देत होते.
आम्ही साहजिकच हार मानली आणि गाण्यांचा आनंद घेण्यासाठी भिंतीला टेकून ऐकत बसलो.

शेवटचे गाणे झाले तेव्हा एक वाजला होता. चंदूला अक्षरशः थांबवावे लागले.
मी जाऊ लागलो तसा " तुझी गाडी आहे रे पहाटे. नाहीतर आपलं गाणं रात्रभर चालवलं असतं तुझ्यासाठी.", चंद्रवदन जणू काही गुन्हा केल्यासारखाच बोलत होता. न राहवून मी त्याला मिठी मारली. "भैरवी तेवढी गाऊ नकोस. लवकरच परत येईन. चल सुधर्‍या, निघतो. भेटुच. " सुधर्‍याचा हात हातात घेत मी म्हटले. त्यानेही मिठी मारली. निरोप घेऊन मी सायकलवरुन घरी जायला निघालो. पहाटे अर्थातच स्टँडवर आले दोघेही. 'ये लवकर' म्हटले. आणि मी दिल्लीला निघालो.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

" पहिल्या वर्षी रजा नसते म्हणून ऐकले होते. रजा मिळाली तरी इथवर येणे अवघडच. तिथे दिल्लीला मरणाची थंडी. सगळे व्यवहार हिंदीमधून. खरेच.. एकंदर कसे काय होणार आहे? कोण जाणे. " गाडीमधे बसल्यावर तिथल्या गोष्टी मनात येउ लागल्या.
तेवढ्यात रात्री चंदूने दिलेल्या पेढ्याची आठवण झाली. त्याने दोनचार दिले होते. एखाद दुसरा खिशातच होता. मी पेढा तोंडात टाकला. त्याच्या चवीबरोबर कालची मैफल परत आठवली. चंदू आणि सुधीरबरोबरची इतकी वर्षंही परत आठवू लागली..

सुधीर आणि मी पहिल्यापासूनच बरोबरच असू पण चंदू आमच्या शाळेत आला तो पाचवीला. चौथीपर्यंत कोकणातच कुठेसा होता. चंदूची आई, त्याच्या लहानपणीच गेली होती, त्यानेच सांगितले होते. तिने त्याचे नाव फार छान ठेवले होते - 'चंद्रवदन'! चंदू चकचकीत, देखणा. नावाप्रमाणेच - 'चंद्रवदन!' एखाद्या कथेमधल्या राजकुमारासारखा गोरागोमटा. त्याच्या आईला आम्ही बघितले नव्हतेच, पण "एकदम आईवर गेला आहे" असे त्याचे वडिल एकदा म्हटले होते. त्याला 'चंद्या' वगैरे म्हणताना मलाच कधी कधी वाईट वाटे, 'त्यांनी एवढे चांगले नाव ठेवले आहे आणि आपण त्याचे चंदू काय, चंद्या काय...'

माने गल्लीमधल्या, त्या कोपर्‍यातल्या घरात, की 'खोलीच' म्हणूया त्याच्या भाषेत? वडिलांनी ही जागा घेऊन दिली, तेव्हापासून चंद्रवदन एकटाच तिथे राही. "आपण जिथे राहतो, ते आपले घर!" सगळेच म्हणतात. पण इतकी वर्षे झाली, तरी चंदूच्या मनाने ती खोली 'घर' म्हणून स्विकारली नव्हती. खोलीच म्हणे तो तिला. त्याचे चूकही नव्हते तसे पाहिले तर. घराला घरपण येते ते माणसांमुळे. इथे हा एकटाच सदाशिव. दिवस आमच्यासोबत कसाही जाई, पण रात्री घरात दिवा लावायला, देवाचे म्हणायला लावायला आई नसेल, कधी प्रेमाने छोटामोठा खाऊ आणायला, कधी ओरडायला बाप जागेवर नसेल तर घर ते कसले? ती तर खोलीच! त्याचा हिशोब अगदीच काही चूकीचा नव्हता.

चंदूचे वडिल कोकणात भिक्षुकी करीत. स्वतःला हौस, पण गळ्यात 'सूर' नाही, म्हणुन एकुलत्या एका मुलाला गाणे शिकायला लावले. एकटा राहू शकण्याच्या वयाचा झाल्यावर लगेचच कोकणातून बाहेर काढले. शिकण्यासाठी, त्याच्या उन्नतीसाठी. "
"आता कोकणात भिक्षुकी करणारे काय कमी आहेत? तिथे काय मिळणार होता पैसा?? त्यापेक्षा मुंबईला गेले असते तर.." चंदूच एकदा म्हटला होता.
परिस्थिती सदैव यथातथा असल्यामुळेच बहुतेक चंदूच्या मनात हे 'गरीब-श्रीमंत' वगैरे घुसले असावे असे मला वाटते. आता आम्ही तरी श्रीमंत म्हणजे असे काय श्रीमंत होतो? माझे वडिल शाळेत शिक्षक, तर सुधीरचे पोस्टात. त्यात कुटुंब मोठे. आमच्याही घरी सदैव कोणी ना कोणी पाहुणे असणारच.

शाळा सुरु झाली की नवी पुस्तके किंवा नवे गणवेश वगैरे दर वर्षी नक्कीच झाले नाहीत. वडिल अधुनमधुन एखादे कापड मिळाले तर माझ्यासाठी नवा शर्ट शिवुन घे म्हणत. एकेक चड्डी बरीच वर्षं असे अंगावर. आणि सणाच्या दिवशी ठेवणीतली हाफ-पँट! . 'गोडधोड'मधे नेहेमी 'शेवयाची' नाहीतर गव्हाची खीर. मग 'आमच्या घरी फाजिल श्रीमंती आहे, असे ह्याला का वाटावे?' मला कधीच समजले नाही.

नंतर एकदा सहज विषय निघाला, तेव्हा "ज्याच्याकडे पैसा असतो, त्याच्या डोक्यात असं कशाला येईल?" , चंदूचे उत्तर तयार होते. " 'पैसे नसले तरी चालतील. मला फक्त 'एवढं' मिळालं, की मला अजुन काऽही नको. ' असे असते अशा लोकांचे! ", चंदू म्हटला. मी चिडलोच होतो, सुधीरने दाबल्यामुळे विषय वाढला नव्हता.

हे सारे आठवताच "हेच चंद्याला कळत नाही!" मनात आले आणि रागच आला. मी तो पेढा पटकन गिळून टाकला.
बाटलीतून आणलेले पाणी गटागटा प्यालो... बस सुरु झाली. ह्या बसमधुन उतरल्यानंतर खरा प्रवास सुरु होणार होता जो रेल्वेने करायचा होता. आयुष्याची गाडी अजून वेग घेणार होती. इथून पुढच्या नव्या आयुष्याची जणू
काही ही नांदीच होती...

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

ह्या जगातली न थांबणारी गोष्ट म्हणजे काळ. तो कोणासाठी थांबत नाही. माणूस जाग्यावर बसून राहिला तरी तो पुढे सरकत जातो. आपण उठून उद्योगाला लागलो तरीही तो पुढे सरकतच जातो. आपापल्या मनगटाच्या जोरावर जो तो काळाच्या बरोबर जाऊ पाहतो. काही जणांना ते साधते, तर काही जणांना चकवून काळ पुढे निघून जातो.
मी तर मनगटाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारा. नव्या आव्हानांना नेटाने सामोरा जाणारा. त्यामुळेच कामात लवकर प्रगती करत गेलो. इतरांपेक्षा लवकर पुढे गेलो. यंदा कंपनीत 'जॉईन' होऊन दहा वर्षे झाली आणि आज त्याबद्दलच कंपनीत छोटासा सत्कार समारंभ होता. सरांनी छानसे भाषणही दिले, "ह्यांच्याकडून अमुक-अमुक शिका!" म्हटले. मोठा सुंदर कार्यक्रम झाला. त्या नशेतच मी घरी परतलो.

दमल्यामुळे घरी येऊन लवकर झोपायचे होते, पण अजून झोप लागली नव्हती. तेवढ्यात रात्री अकरा वाजता टेलिफोन वाजला. "हॅलो! हॅलो, कोण बोलताय?" पलिकडून आवाज आला.
स्वतः फोन करून "कोण बोलताय?" बोलणार्‍यांचा मला फार राग येतो.
"तुम्ही सांगा, तुम्ही कोण बोलताय?" मी रागावर ताबा ठेवत प्रतिप्रश्न केला.
"अरे! बरोबर लागलेला दिसतो आहे. अरे , मी चंदू. आपलं चंद्रवदन!" पलिकडून आवाज आला.

"चंद्रवदन!"
दहा वर्षानंतर हा आवाज ऐकला. बघता बघता दहा वर्षे लोटली! कसा असेल तो? काय करत असेल आता? आणि त्याने कुठुन मिळवला असेल हा नंबर?
"हॅलो! बोल चंद्रवदन. मीच बोलतो आहे. " मी म्हटले.
"हॅलो. हॅलो... " तिकडचा आवाज बंद झाला.
मी पुन्हा प्रयत्न केला पण आवाज बंदच.
मी फोन ठेवून दिला.
माझ्याकडे त्याचा टेलिफोन नंबर नसल्याने मी फोन करु शकलो नाही.
थोड्या थोड्या वेळाने अजून तीनदा फोन वाजला खरा, पण 'हॅलो' च्या पुढे काहीच नाही.
"काय झालं असेल? कदाचित पैशाचा प्रॉब्लेम? नक्की असेच असेल. पण नकोच. काही चांगली बातमी असो! " मनात विचार आले. "ह्या दिवाळीत पक्कं घरी जायचं!" मी ठरवले आणि खोलीतला दिवा बंद केला.

दिवा बंद केला, तरी आता झोप येईना. चंदू आणि सुधर्‍या. काय करत असतील दोघे? दिल्लीला आल्यापासुन संपर्क तुटला तो तुटलाच. खरंच, काय करत असतील दोघे?
सुधर्‍या नीट मार्गी लागला होताच. लग्नही वेळेत केलं त्यानं.. पाच-एक वर्षं झाली असतील. मुलंबाळंही झाली असतील एकास दोन ?? असा विचार येताच थोडंसं हसू आलं.
कामाच्या गर्दीमधे सुधर्‍याचं लग्नंही बुडालं. आता कितीही वाटलं तरी जाता येणारे थोडंच?
मग थोडा राग येऊ लागला. परिस्थितीचा. कदाचित चुकलेल्या निर्णयांचा. की परिस्थितीच? उत्तर सापडेना.

सुधर्‍याची खुशाली, प्रगती समजली. पण चंदू? तो काय करत असेल आता? आणि अजूनही खोलीवरच रहात असेल? मिळकत काय? संगीतावरची कमाई अशी किती असणार? बर, बाकी सारे ठिकसे चालले तरी अचानक कधी गरज पडली तर काय करत असेल? लग्न. लग्न केले असेल काय? हल्लीच्या काळात गाण्यावर पैसे मिळतील? का अजूनही चंदू....??
पूर्वी काहीही झाले असो. इथे मी काहीही कमावले असो. घरच्यांच्या, मित्रांच्या गरजेला कामी न येणारा पैसाच जर मी मिळावला असेल, तर त्याची किंमत खरेच तितकी, जितकी त्यावर लिहीली आहे? की सगळ्यांची एकच-एक मोठे 'शून्य'?
विचार करता करता डोक्यात प्रश्नांचे एक वारुळच उभे राहिले. पाठीवर प्रश्नाचे ओझे घेऊन, एकामागुन एक मुंग्या येऊ लागल्या. तो भार माझ्यावर रिता करु लागल्या. आता माझ्याच्याने सहन होईनासे झाले. भेटलेच पाहिजे.
"दुसर्‍या दिवशीच शिपायाकडून तिकीटे बुक करुन घेऊ" म्हणत झोपेची आराधना करु लागलो.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

थंडी दिल्लीला अधिक खरी. पण गावाकडची थंडी परत लहानपणाची आठवण जागी करून गेली. दिवाळीच्या दिवशी पहाटेच गावी पोहोचलो. हवेतला गारव थोडासा सुखद, थोडासा बोचरा होता. काही मुलांच्या हाती 'केपा' होत्या. त्या मुलांचे पहाटे उठून त्यावर दगड घालणे सुरु होते. केपा फटा-फट फुटत होत्या.
दोघांना भेटुन भावाच्या घरी जावे असे मी ठरवले. आईवडिल भावाकडे राहू लागल्यापासून गावातले घर रिकामेच होते बहुतेक. "हे घर तरी चंदूला वापरायला??? " मनात विचार आला. विचार करत करत सुधीरचे घर कधी आले समजलेच नाही.

बाहेर एक स्त्री रांगोळी काढत होती. सडा नुकताच झालेला दिसत होता. मातीचा वास अजुनही येत होता. " हीच सुधर्‍याची पत्नी.. " असं वाटलं.
"सुधीर आहे का घरात?" मी तिला म्हटलं.
"कोण?" म्हणत सुधीरच बाहेर आला. हसून त्याने मला मिठी मारली आणि ओढतच घरात घेऊन गेला.
सुधीरची बायकोच होती ती. तिने लगेच चहा आणून दिला.
माझा चहा होईस्तोवर सुधीरला काही धीर धरवेना. " चल, चंद्रवदनलाही भेटु... ", सुधर्‍या म्हटला.
" पण बदलला नाहीस रे अजिबात! इतक्या वर्षांनी भेटतोय्स! मला तर वाटलं होतं, मराठी तरी बोलतोस का नाही आता!!! "
मी नुसताच हसलो. सुधर्‍याच्या घराचा दुसरा मजला नवा दिसत होता. नवा म्हणजे तरी दोनतीन वर्षं झाल्यासारखा. पण त्याला अजून रंग दिला नव्हता. "पैसा!" मनात आले! "नाचवतो माणसाला पैसा!"

"चल, खोलीवर जाऊ" चहा होताच सुधीर बोलला. सुधीरच्या घरापासून दहाच मिनिटांच्या अंतरावर 'खोली' होती !
"चंद्रवदन अजुनही खोलीतच राहतो? १० वर्षं!!!! १० वर्षं कसा काय हा माणुस इथे असा राहु शकतो??? " मनात विचार चालु झाला. पण मनातले विचार लगेच बोलण्याचे वय आता गेले होते. का मोकळेपणा गेला होता?
मी सुधीरला काहीएक बोललो नाही.

खोलीपाशी पोचलो. चंद्रवदन बाहेरच उभा होता. घरासमोर बसलेल्या गाईला चारा देत होता. मी दिसताच त्याने धावत येऊन मला मिठी मारली.
"कसा आहेस?" तो म्हटला.
"ठिक." तोच प्रश्न मीही त्याला केला.
"मी मजेत रे..." , चंद्रवदन. "तु एकटाच आलास तो??"
"हो. एकटाच आलोय. " मी.
सवयीप्रमाणे परत त्याला 'तोच' प्रश्न करायचा मुर्खपणा नाही झाला. लग्न केलेच नव्हते तर त्याने ?
" बाकी, 'ह्या' लेव्हलचं कोणी, एरवी मला 'अरे-तुरे' करत नाही, नाही? " मनात 'तुच्छ' विचार आला. मग स्वतःचाच राग.
पैशाच्या मागे जात जात हे काय झाले आहे आपले? सगळीकडे तेच दिसते. पैसा, स्टेटस!
सगळे असुनही मी 'कसा?', तर 'ठिक'. 'अशा' अवस्थेतही हा मात्र 'मजेत'. मग जीवनात 'यशस्वी' कोण?? "

पण खोलीत शिरताच मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. चंदूच्या 'खोलीचे' आता 'घर' झाले होते!
नजरेने द्वाडपणे घरभर धावता कटाक्ष टाकलाच. लक्ष्मी आणि सरस्वतीच्या तसबिरी. कोपर्‍यातल्या कपाटामधे आठ तबले! पूर्वी फक्त दोन असत तेही बाहेर. शेजारच्या कपाटात काय असेल? तीन फुटी कपाट होते. नक्की हार्मोनियमच!
दुसर्‍या कोपर्‍यात दोन तंबोरे ठेवले होते आणि एक सतार. "ही तर सुधर्‍याची! ", मी अचानक बोललो.

"हो. त्याने मला दिली आहे वापरायला. तबला पेटी आणि गायनाचे विद्यार्थी जास्त आहेत. सतारीला कोणी नाही सध्या. मीच अधुनमधुन वाजवतो" चंद्रवदन बोलला. " पण सुधीरएवढी नाही येत अजुन. "
यावर सुधीर हसला आणि चंदूला कोपरापासून नमस्कार केला. चंदूही हसला.
"गिरिजाऽ" चंदूने हाक मारली. चंद्रवदनाची पत्नी गिरिजा बाहेर आली. तीने येताना सरबत आणलं.
तिच्या मागून एक गोंडस मूल बाहेर आले. पण आम्हाला बघताच परत आईच्या मागे दडले.
"आईच्या मागे लपतोय~" मी म्हटलं तोच चंदू म्हटला, "अरे नाही रेऽ, हा हिच्या बहिणीचा मुलगा. थोडा वेळ बाहेर गेलेत ते म्हणून त्याला इथे सोडला आहे. ते इथेच शेजारी राहतात. आणि आत्ता कुठे आमचं लग्न झालंय!
ते ऐकून मजा वाटली. थोडा वेळ गप्पा झाल्या.
बोलता बोलता समजले, की तो फोन चंदूने लग्नानिमित्त आमंत्रण द्यायलाच केला होता. नंतर लाईन लागेनाशी झाली असावी, संपर्क तुटला..

एकंदर चंदूचा भरलेला परिवार बघुन मला आनंद वाटला पण स्वतःची कीव वाटली.
आपल्या मनात काय चालु होते, आणि प्रत्यक्षात सारे किती सुंदर आहे!
पैसा आणि आनंद याचं गणित चंद्रवदनने माझ्याहून चांगल्या पद्धतीने सोडवले होते. त्याच्यापाशी मित्रांसाठी वेळ होता, भले पैसे कधी कमी असोत.
तेवढ्यात सुधीरने सतार काढली, वाद्याला नमस्कार केला आणि तारा छेडल्या.

माझ्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. दहा वर्षं!!! 'दहा वर्षं' फार मोठी असतात. ह्या तारेने आणि ह्या सुराने क्षणात मला दहा वर्षं मागे नेले. फार हळवे व्हायला झाले.
"माफ कर देवी मला. 'मैफल' अर्धवट सोडुन गेलो होतो." सरस्वतीला नमस्कार करण्याचं नाटक करत, मनात माफी मागू लागलो. सदैव लक्ष्मीच्या कृपेकडेच आशा लावण्यातली चूक समजली होती. सरस्वती देवीची कृपा झाली तर लक्ष्मीचीही होईल हा साधा नियम कळूनही वळला नव्हता. सरस्वती देवीपुढे मी हात जोडले, " मला परत पूर्वीसारखं 'मन' दे देवी!!! "

नमस्कार करुन तबल्यावर बसलो. "सांभाळुन घे रे चंद्या, सुधर्‍या "
" हो, उस्ताद! सावकाशच घेऊया पहिलं गाणं. ", चंद्रवदन बोलला. "त्रिताल. द्रुत. हं! "

गाणं सुरु झालं. कुठलास तराना होता. भैरवी होती ती. चंद्रवदन जोरदार गाऊ लागला. माझे हात थकू लागले.
जणु काही तीच आमची दहा वर्ष जुनी मैफल चालू होती. छोट्याश्या विश्रांतीनंतर फिरुन आम्ही सुरु झालो होतो.
गाव सोडताना झालेल्या गैरसमजांवर विचार करण्यापेक्षा अधूनमधून भेट घेणं चांगलं ठरलं असतं. पण आज त्याचीही भैरवी झाली होती.

"बरं झालं सुधर्‍याशी चंदूबद्दल काही बोललो नाही. थेट त्याच्या कर्तुत्त्वावर मी शंका घेतली होती. पण आता मनात काही विचार पक्के होत होते. मधेच लक्ष तालाकडे. मधेच तानेकडे... खरं सांगायचं तर, एका मोठ्या विश्रांतीनंतर मन, सुधीर - चंद्रवदनच्या 'समाधानाच्या, मैत्रीच्या मैफिलीत' नव्याने सामिल होऊ पाहत होतं...

* * * समाप्त * * *

प्रकार: 

ताल, लय जमलीय............. समेवर देखील योग्य ठीकाणी आलात. मस्त ............ सही..............

वा !
खुपच सुंदर Happy

मस्तच लिहिलय. मला संगीतातलं काहि कळत नाहि. पण तरीहि कथा मनाला स्पर्शुन गेली.
>>>

+१००००