बारा ए. वे. ए. ठि. एक खरे सत्य

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

बाराचे ए. वे. ए. ठि. हे जसे होण्यानंतर गाजते तसे ते होण्यापूर्वीही गाजत असते. मुळात ए. वे. ए. ठि होणार की होणार नाही यावर बर्‍याच लोकांचे विशेषतः 'बाहेरच्यांचे' एकमत नसते. बाराकरांना चिथवण्याचे बरेच प्रकार हल्ली चालू झालेले दिसतात याचीही गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. इतर लोक GTG करतात तेव्हा त्यात मुले धरून तीन तीन लोक अलेले असतात यालाच महत्व असते, पण त्याकडे बाराकरांनी लक्ष देण्याचे कारण नाही. खरं तर कुणाच्याच बडबडीकडे बाराकरांनी लक्ष देण्याचे कारण नाही कारण इतर लोक आले नाही आले तरी बाराकरांची वर्षातून कमीतकमी दोन ए. वे. ए. ठि. पूर्ण होतातच. कोणीही नवीन सदस्य आले (आणि दर चार सहा महिन्यात एक दोन येतातच) की त्यांना बाराबाफवरच्या तमाम महानगांना भेटायची उत्सुकता लागतेच. इथे एवढे विद्वताप्रचूर लिहितात (पाजळतात) ते नक्की कसे असतील हे बघायची उत्सुकता सगळ्यांनाच असते. मग आम्ही म्हणजे सगळे बाराकरही कंबर कसून तयारीला म्हणजे (लिस्टा करायला लागतो). 'ऐनवेळी गळणार्‍यांची संख्या येणार्‍यांच्या संख्ये एवढी असली' तरी 'त्याचे काही विशेष नाही' असे धरून ए. वे. ए. ठि. करता येते.

यावेळी ए. वे. ए. ठि. व्हायच्या आधीच वृत्तांताचे नांव काय द्यावे यावर चर्चा. 'नदी आधी वहाणा काढून उभे रहाणे' यालाच म्हणत असावेत. त्यात मराठे आणि संख्या दोन्हीचा उल्लेख असावा अशीही एक टूम निघाली. तश्या बर्‍याच सूचना आल्या (असल्या सूचना मलाच का
येतात? मी काय ठेका घेतलाय का घाऊक वृत्तांत लिहिण्याचा? असा प्रश्न मला पडला आहे) तरी 'बारात मराठे पीर भेटले माठ' हे मात्र जरा अतीच होतंय. म्हणजे बाराकरांवर जळा पण किती जळाल याला काही सीमा? तर हे शीर्षक अजीबात चालणार नाही असं ठरवण्यात येत आहे, आणि त्यामुळे शीर्षकाविरहीत वृत्तांत अशी नवीन पध्दत चालू करणेत आलेली आहे.

दुपारी बारा वाजता आम्ही देवळात जमण्याचे ठरवले होते, हे लक्षात असेलच (प्रत्येक वाचणार्‍यांने हे लक्षात ठेवलेच पाहिजे नाहीतर लक्ष्या ओरडेल) तसे पोहोचलो. भाई आणि मी हे तर नेहमीचेच. तिथे गेल्यावर अजून कोणीही आलेले नव्हते. बाकी मंडळी कुटुम्बकबिल्यासमवेत येणार होती त्यामुळे त्यांना वेळ लागणार याही खात्री होती (नवरा बायकोचे एकमत होऊन बाहेर पडता पडता किती उशीर होतो, हे कुठल्याही नवर्‍याला विचारा). तसंच झालं. व्यंकटेशाचे दर्शन होईपर्यंत भाईंचे दर्शन झालं, आणि आम्ही जागा आणि इतर मायबोलीकर यांच्या शोधात निघालो. Community Center मध्ये जाऊन जागेचा शोध घेईपर्यंत आम्हाला एकही बाराकर भेटला नाही. परत येताना मात्र झक्की आणि त्यांच्या पत्नी (एकच आहे, पण अनेकवचन हे आदराने वापरलेले आहे) दिसल्या. गाडीतून उतरून झक्की आमच्यापुढे चालत होते. त्यांची बायको बरोबर असल्याने आम्ही त्यान्ना 'आनंदराव' अहो 'आनंदराव' अश्या बर्‍याच हाका मारायचे प्रयत्न केले, पण त्यांना या नांवाची सवय नसावी. मुळात त्यांनी भला मोठ्ठा कोट घातला होता, त्याची टोपी (म्हणजे कोटाची) ती त्यांच्या कानालाच काय संपूर्ण चेहर्‍यालाच झाकून टाकत होती. समोरून पाहिले असते तर कॅलेन्डरमध्ये बुध्द किंवा कृष्ण वगैरे दाखवतात तेव्हा त्यांच्या मागे 'सूर्यप्रभा' वगैरे दाखवतात तसे दिसले असते, फरक एवढाच की कोट काळा टोपी काळी त्यामुळे त्याला 'अमावास्याप्रभा' म्हणावे लागले असते. झक्कींच्या (चालण्याच्या...) वेगाशी स्पर्धा करत आम्ही त्यांना गाठले (तेव्हा ते गारठलेले वाटले) आणि देवळात पुन्हा एकदा शिरलो, तेव्हा अजून एक खंदा, आणि नेहमीचा शिलेदार म्हणजे स्वाती हजर होती. ती आमच्या आधी देवळात आली असेलही, कारण नवर्‍याला कुठेतरी कामाला लाऊन स्वतः आली होती, तेव्हा एकमत होण्याचा (वरती पहा) प्रश्न नव्हता. आम्ही शोधत असता ती देवळातल्या पूजा साहित्याच्या दुकानात लपली असावी अशी एक शंका आली.

भाईंनी मैत्रेयीचा फोन आल्याचे सांगितले, तेव्हा त्यावेळी ती घरून निघण्याचा विचार सुरू करत असावी, आणि म्हणजेच ती बाराच्या ए. वि. ए. ठि. ला (इथे बारा म्हणजे घड्याळाचे किंवा सरदारजीचे घ्यावे, बाग राज्य नव्हे) सुमारे साडेबाराला घरून निघून दिडपर्यंत पोहोचेल यावर एकमत झाले. आता इतरांची वाट बघणे आणि त्यांना हुडकून काढणे याला पर्याय नव्हता. खरं तर मी (आणि फक्त मीच) 'मायबोली' चा ट्रेडमार्क (मराठीत काय म्हणतात हो याला?) असलेला चहा-पैरण (T-Shirt) घालून आलो होतो, पण त्यावर मी कोट घालून गेलेलो असल्याने TradeMark लपला गेला होता. भाई तसे नवीन व्यक्तींना टिपण्यात पटाईत आहेत (इथे टिपणे म्हणजे पटकन शोधणे असा अर्थ घ्यावा, नेमबाजी नव्हे). ते 'माया साने' या व्यक्तीला टिपण्याच्या प्रयत्नात असताना मी त्यांना 'शांतेचं कार्ट' आठवा भाई, 'माया साने बनावट आहे' हे सांगून टाकले. आयडी बनावट, नांवही बनावट असताना आता मुलं असणेही बनावट निघालं तर काय करावं याचा
विचार करत असताना अचानक एका जुन्या पुराण्या मायबोलीकरणीने (म्हणजे खूप पूर्वीपासून सदस्य असलेल्या) येऊन बोलायला सुरूवात केली. उलटतपासणी करणार होतो, पण तेवढ्यात तिच्या हातातली पुस्तकं पाहून (आणि बरोबर दोन लहान मुलं पाहून) ती शोनू असल्याचे सिध्द झाले.

यथावकाश गृहिणी, श्री. गृहिणी (म्हणजेच लधुळे) आणि त्यांची मुले येऊन पोहोचली. चित्र्यांनी 'मुलगा आजारी' असे कारण सांगून ऐनवेळी टांग दिली, पण खरे कारण 'देवळात जाऊन मसाला दोसा खाण्यापेक्षा, घरी बसून मासे, चिकन खावे आणि रविवार साजरा करावा' असा सुज्ञ विचार त्यांनी केला अशी बातमी आहे. मैत्रेयी, निराकार अजून येतच होते. इथे 'चिरंजीव आदित्य गातो' ही बातमी भाईंना कळली आणि त्यांनी त्याचे बौध्दिक घ्यायला सुरुवात केली. चिरंजीव आदित्य हा जरी मायबोली मेंबर नसला तरी त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे. (तो स्वातीचा मुलगा, बेटा, राजा वगैरे वगैरे असला तरी गेल्या ए. वे. ए. ठि. ला आपल्या जन्मदात्रीचे वय चार चौघात निर्भीडपणे जाहीर करून त्याने आपले स्वातंत्र्य सिध्द केलेले आहे) भाईंनी रागाचे बोल, आरोह, अवरोह थाट, मिंड, पंचम असे प्रश्न विचारायला सुरूवात केल्यावर मला एकदम पु. ल. आठवले. (मैत्रेयी आणि निराकार अजून येतच होते).

'सांग, नेपोलीयनचा जन्म केव्हा झाला,' हा प्रश्न जेवायचा ताटावर विचारला असताना ,

'त्याची आई, बाळंत झाल्यावर,' असे उत्तर दिल्यावर, त्यांच्या माऊलीने त्यांना पाहुण्याच्या आधी जेवायला वाढून घ्यायचे ठरवून टाकले होते.

इथे आलेल्या माऊलीने ते वाचले नसावे, किंवा मागे वय जाहीर केल्याचा सूड म्हणून बचाव केला नसावा. शेवटचा उपाय म्हणून चिरंजीव आदित्यने एक काहीतरी (राग, बंदीश, तोडा, खयाल, कवन, काव्य, ओळ, अंतरा, तान, सट्टा पैकी एक) म्हणून दाखवले. खरं तर तो मस्त गायला, म्हणजे जे काही गात होता ते आम्हीच काय, आजूबाजूने जाणारे साउदींडियन लोक पण थांबून ऐकू लागले (मी शेजारी मद्रासी बोलू लागले तरी थांबून ऐकतो, पण इतर लोक गाणं ऐकायला थांबतात.) साऊदिंडियन तर बोलताना ऐकायला पण थांबत नाहीत. खरं तर तो अजून गायला असता पण त्यात अचानक तो 'काफी' की काहीतरी म्हणाला आणि मला 'फुकट चहाची' आणि काफिटेरियाची आठवण झाली. बाकीच्या मंडळींचे दर्शन पण झालं होतं (म्हणजे व्यंकटेश्वराचे दर्शन) आणि सोबत लहान मुलं (हे कारण पण होतं) तेव्हा खाद्यगृहाकडे वळणे क्रमप्राप्त होतं. (वाट बघावी पण त्याला पण मर्यादा असावी (खाण्याची) हा धडा घेण्यासारखा आहे). खाद्यगृहात मात्र गर्दीच गर्दी. सगळे मायबोलीकर एकत्र बसणेच काय, मी आणि माझी थाळी ( 'डिश' या अर्थाने) एकत्र बसणं पण शक्य वाटत नव्हतं). रांगेत पहिलं कोणी उभं रहावं हे ठरत नसल्यासारखे 'पहले आप पहले आप' करत सगळे मागे पुढे करत होते. (मैत्रेयी आणि निराकार अजून येतच होते). खरं तर भूक सगळ्यांनाच लागली होती, वडे, भज्यांचा वास पण भूक चाळवत होता, 'काफी' चा राग नव्हता कॉफी प्रेमच होते, पण रांगेत उभे राहिलो तर लोक काय म्हणतील म्हणून मंडळी मागे पुढे करत होती. मला रांगेत उभं राहून जेवण घेणे आवडत नाही (संदर्भ परदेसाई).

एवढ्यात एक हिरवा पंजाबी. म्हणजे हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली एक युवती, ललना, सुकन्या किंवा तसेच काहीतरी. भाई लगेच म्हणाले, 'ही इसाबेला, किंवा माया साने, किंवा शांतेची कोणीतरी' भाईंची डिटेक्टिवगिरी बहुतेक वेळा बरोबर चालते. मागे 'अजयकुमारांचा' शोधही त्यांनीच लावला होता (संदर्भ यापूर्वीचे देवळातले ए. वे. ए. ठि). (मैत्रेयी आणि निराकार अजून येतच होते). ते कुटुम्बीय पण
आमच्याकडे पाहून स्माईली देऊ लागले आणि ते इसाबेल्ला आणि मंडळी आहेत हे लगेच कळले. स्वातीने (नेहमीप्रमाणे) सभ्यपणे स्वतःचे नांव आणि आदित्यची ओळख करून दिली, झक्कींना इसाबेलानेच (मायानेच) नाही तर त्यांच्या श्रीयुतानी पण एका सेकंदात ओळखले (ते पण छुपे मायबोलीकर असावेत). बाकी झक्कींना काय कोणीही ओळखतो. पन्नास माणसे असली तरी 'ते.. ते. झक्की' असं लोक पटकन ओळखतात.

इथे अजून एक विनोद सांगणे आवश्यक आहे (नाहीतरी वृत्तांत वाचताना मजा कशी येणार)....

'माझ्या Closet मध्ये ना, कित्तीतरी पंजाबी पडलेत," एक बाई (ललना, युवती वगैरे) आपल्या मैत्रिणीला सांगत असते.
'पण तरी हिला नेहमीच हा मराठी लागतो," त्यांचे यजमान स्वतःकडे बोट दाखवत म्हणाले.

भुका लागल्याचे निमित्त सांगून आम्ही सगळे रांगेत उभे राहिलो. 'भुका' वरून लक्षात आलं असेलच की तिथे अनेक प्रकार होते, त्यामुळे प्रत्येकाला 'भुका' लागल्या होत्या. झक्कीनी डोसा किंवा काहीतरी घेऊन ते नाहीसे झाले ते सगळ्यांचे खाणे उरकल्यावर उगवले (ते ही कला एका विषिष्ठ शहरात शिकलेत म्हणतात). शोनू ओळ्ख दाखवत रांगेत घुसली (म्हणजे मध्येच) रांगेत उभे राहून काय घ्यावे ते ठरवताना भाईंना कुणीतरी 'वोलुपट्टु' की तत्सम काहीतरी (बोर्डावर) दिसलं. पुरणपोळी असं शोनूने सांगितल्यामुळे त्यांनी ते घेतलं. चवीचं माहीत नाही पण खाताना त्यांच्या चेहरा बघवत नव्हता. 'त्या पुरणपोळीचे हेच काय ते रूप' असं झालं असावं. ते मला पण तो प्रकार खाण्याचा आग्रह करत होते. आणि हो, मैत्रेयी आणि निराकार.... पोहोचले. मागून उत्तमआई (मधुरिमा) आणि कुटुंबीय पण पोहोचले. त्यानी लाडू आणलेले नव्हते. इसाबेला सर्व साधारणपणे पाच मिनिटानंतर एक अशी लोकांना ओळखण्याचे प्रयोग करत होती. (दाढीवाले भाई, चांदवाले भाई असे ते क्लू होते)बरेच क्लू दिल्यावर तिला क्लू लागले. बाकी वेळ ती मुलांचे खाणेपिणे वगैरेत मग्न होती. देवळातली गर्दी आणि, कॅफेतली लाईन बघून बाहेर पडावे लागले. चहा आता नको तर नंतर म्हणत झक्कीही सामील झाले.

बाहेर आल्यावर नक्की काय करावं यावर एकमत होईना. आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी मी मराठीविश्वात 'उभ्या उभ्या विनोद' सादर करून आलो होतो. ते मी पुन्हा सादर करावेत असं भाईंचे म्हणणे होते, पण 'पाय दुखतात' हे कारण सांगून मंडळींनी हसणे टाळले तर काय? म्हणून मी तो बेत हाणून पाडला. मंदीराच्या खाली असलेल्या हॉल मध्ये बसून गप्पा मारायचा प्रयत्नास फारसे यश आले नाही, तिथून हाकलण्यात आले, तेव्हा यापुढे शिशिर ए. वे. ए. ठि. मंदीरात न करता इतर कुठेतरी करावे असे ठरवायला हवे (झक्किंच्या घरी नेहमी नेहमी जाता येणार नाही, तेव्हा आता दुसरी जागा शोधावी लागेल) आणलेले लाडू (शेंगदाणा आणि तीळ), पेढे (सुखाडिया), ब्राऊनी, गोळ्या अश्या प्रकारांची देवाण घेवाण झाली. गृहिणी आणि लक्ष्मीकांत सगळ्यांना घरी आलात तरच चहा मिळेल असं म्हणाले होते. पण हो, की नाही ते ठरत नव्हते. पोटोबा पूर्ण करून विठोबाच्या दर्शनाला गेलेली मंडळी अजून आली नव्हती. तेवढ्या वेळात चि. आदित्यने गाणे म्हणावे असा एक प्रस्ताव भाईंनी ठेवला, पण तो त्याने लगेच हाणून पाडला (एकदा पटला, पण नंतर मॉम्स टर्न की काहीसे म्हणाला). मग स्वातीने एक मस्त गाणं म्हटलं. या गाण्याला साऊदिंडियनच काय तर काही 'तमे केम छो' पण थांबून ऐकू लागले. यापुढच्या ए. वे. ए. ठि. ला पेटी, तबल्यासकट बसायला हवे हे निश्चित झालं.

मला वेळ नव्हता तेव्हा मी निघालो. आता उरलेला वृत्तांत, 'बारात मराठे पीर भेटले ....' या शीर्षकाखाली कुणीतरी लिहील..

तळटीप:
१. या वृत्तांतात काही इंग्रजी शब्द आहेत, पण त्यासाठी मी आगावू परवानगी घेतलेली आहे.
२. चि. आदित्य आणि त्यांच्या मातोश्री गाणे शिकत असून उत्तम गातात... खात्री असावी.
३. 'इसाबेल्ला' उर्फ माया साने यांचे खरे नांव उघडकीस आणण्याची परवानगी मी घेतली नाही (आणि खरंतर विसरलो).
४. सौ. झक्की, 'लाडूंवरून' त्यांना परावृत्त करत होत्या, पण त्यांची पूर्ण Reaction कळली नाही.
५. सुपरमॉम यानी लाडू आणले नाहीत, तसे इसाबेल्ला यानी पण नाहीत.
६. स्वातीने लाडूसन्यास घेतला आहे असे ऐकतो. बाकी ती 'अर्धीच आली' असाही एक प्रवाद आहे.
७. श्री अजयकुमार यांना दिलेले काम एवढे मोठे असावे की त्यासाठी किमान चार तास तरी लागावेत.
८. शोनू यानी आपण सर्वात सिनियर (मायबोलीवर) असल्याची शक्यता वर्तवली, पण भाई त्यांनाही दोन चार महिन्यांनी सिनियर आहेत हे (खोटेच) सिध्द झाले.
९. 'मायबोली' Trademark असलेला T-Shirt मी एकट्याने घातलेला असल्याने मीच खरा आणि एकुलता मायबोलीकर हे सिध्द करणे कठीण गेले नाही.
१०. हा लेख 'दादरा' ठेक्यात मी लिहिलेला आहे (तेवढा एकच मला येतो) बाकी थाट, आरोह, अवरोह, वादी, प्रतीवादी, विसंवादी आदित्य सांगेल.
११.'देव आहे की नाही' या प्रकरणावर कायमचा पडदा. झक्की स्वतः वर (म्हणजे देवळात वरच्या मजल्यावर) जाऊन बघून आले. देव तिथे होताच. अजून कुठला कुठला बाफ बंद करता येईल यावर विचार चालू आहे.

(पुर्वार्ध समाप्त)......

उत्तरार्धाची जबाबदारी नियमाप्रमाणे 'संदीप चित्रे' यांनी (त्याना संजयासारखी (मालाकार नव्हे, महाभारतातला) दूरदृष्टी असल्यास) अगर मैत्रेयी यानी घ्यायची आहे. (समाप्त)

प्रकार: 

चित्र्यांनी ए.वे.ए.ठि चुकवले पण त्यामुळे हजार कामे करावी लागली !!!

lol विनय Happy
या वेळचं ए वे ए ठि अगदी नावाप्रमाणे झालं! देवळात एकाच इडलीडोसागृहात (प्रचंड गर्दीमधे ) सगळे मायबोलीकर एका वेळी हजर होते. गर्दीमुळे वेग्वेगळ्या टेबलापाशी बसून आपापल्या पदार्थांवर एकाच वेळी ताव मारत होते! येवढे लांब प्रवास रिकाम्या पोटी करून आल्यामुळे कुणाला एकमेकाच्या तोंडाकडे बघायलासुद्धा वेळ होत नव्हता Happy अशा रितीने यावेळी पोटे तेवढी भरून घेतली ..गप्पा गॉसिप्स वगैरे तपशील पुढच्या ए वे ए ठि ला भरून काढायचे ठरले.. Happy

८. शोनू यानी आपण सर्वात सिनियर (मायबोलीवर) असल्याची शक्यता वर्तवली, पण भाई त्यांनाही दोन चार महिन्यांनी सिनियर आहेत हे सिध्द झाले.
माझी चुक.. शोनु सिनियर आहे रे..
- अनिलभाई

विनय, लिहिलंयत नेहेमीप्रमाणे मस्तच. पण या वेळी 'सामाजिक' च्या बी बी वर का नाही ?
(हा एक भोचक प्रश्न नसून भाबडा प्रश्न आहे हे कृपया ध्यानी घ्यावे. हो.. आजकाल तुम्हाला प्रश्न वगैरे विचारायची भीतीच वाटते. 'मी काय ठेका....' वगैरे एकदम तावातावाने उत्तर देता.)
आणि कोणीतरी काल ए. वे. ए. ठि. ला 'तुमचा चेहरा नेहमी हसरा असतो..' वगैरे बाता मारत होतं.

\blue{चित्र्यांनी ए.वे.ए.ठि चुकवले पण त्यामुळे हजार कामे करावी लागली !!!}
म्हणजे ए. वे. ए. ठि. ला आला असता तर ती कामे करावी लागली नसती असे वाटते का तुम्हाला?

किती वर्षे झाली तुमच्या लग्नाला? अडीच की तीन?

उलट तिथे आलात म्हणून डझनभर जास्तच कामे पडली असती.

काहो, इथे निरनिराळ्या रंगात, ठळक टायपात वगैरे कसे लिहायचे?

वृत्तांत अगदी ठेक्यात! उत्तम!
लाडवाशिवाय आणि मुख्य म्हणजे चहाशिवाय सगळं सुरळीत पार पडलं! Happy
आदित्य काही पुढच्या ए. वे. ए. ठी. ला येत नाही. (बरंच छळलंत त्याला असं दिसतंय! गुणी पोर बिचारं!)
मुळात ए. वे. ए. ठि होणार की होणार नाही यावर बर्‍याच लोकांचे विशेषतः 'बाहेरच्यांचे' एकमत नसते..
'झाले' ह्यावरही एकमत नाही. वृत्तांत काय काल्पनिक सुध्दा लिहितात लोक! Happy

-मृण्मयी

अक्षरशः ह.ह.पु.वा. लागली. .... केवळ अशक्य लिहिलं आहे ... अर्थात त्यात आश्चर्य ते काय म्हणा Happy

परागकण

lol विनय
जबरा लिहिल आहे Happy

की बोब्बाट्टिलू असं नाव होतं बहुतेक त्या प्रकाराचं. आणि त्याची पुरणपोळीशी तुलना करणं म्हणजे.... बोब्बाट्टिलूला पुरणपोळी म्हणण्यासारखंच आहे!!

झक्कांनी चहा दिलाच नाही, ते बहुतेक तुम्ही त्यांना 'आनंदराव' म्हटल्याचा राग येऊन असावं. पुढल्या वेळी लक्षात ठेवा.
'देव आहे की नाही' असा बाफ नाहीये. 'देव म्हणजे काय' असा आहे.

झक्का आता 'वर (म्हणजे देवळाच्या वरच्या मजल्यावर) दिसला तो देवच का?' असा नवीन बाफ सुरू करून त्यावर त्यांना कोण, कधी आणि कश्यावरून उथळ आणि पांचट (इ.) म्हणालं होतं याबद्दल सविस्तर लिहीणार आहेत.

विनै वृतांत झकास! साउदिंडियन खास करून आवडले Happy
कधीतरी तुम्हा दिगज्जांना भेटावयाचे आहे. स्वातीताई ते बोब्बट्लु (bobbatlu) असे आहे.
आदीपण गाणं छान म्हणतो हे ऐकुन आनंद झाला. तुम्हा दोघांचं गाण ऐकायला तरी भेटू म्हणत्ये.

विनय,
तुमचा व्रुत्तांत वाचुन परत ए.वे.ए.ठि.झाल्या सारखं वाटले.झकास लिहीला आहे.तुम्ही ईतका वेळ देउन हे सगळं लिहिता तर तुम्हालाचं पहिलं पारितोषिक द्यायला हवं आहे.

साउदींडियन , उत्तम आई, चहा-पैरण ----- लोल

काहीच्या काही लिहिलं आहे...:-)
पण ही लिहिणार्याची कमाल आहे की खरंच इतकी धमाल आली?

१. Tiu धमाल आली म्हणजे काय? आलीच. (नाहीतर कशाला लिहू.... Happy
२. Isabella पहिलं बक्षिस आधीच गेलंय आता दुसरं मला.
३. chinnu एकदा भेटच. एक गाणं ऐकलस की......
४. चहा (जो आयुष्यात मिळण्याची शक्यता नाही) आणि बोबट्ट्ल्लू राहिले. पुढच्यावेळी बघू.

(यापुढे थंडीत देऊळ नाही.. हे ठरलं .. अगदी कोणतेही 'गज' आले तरी)...

'परदेसाई' विनय देसाई

>>chinnu एकदा भेटच.
नक्कीच!
>>एक गाणं ऐकलस की......
म्हणजे नक्की काय म्हणायचयं तुम्हाला?
Happy

धमाल वृत्तांत एकदम! ह्यावेळी कुणी माणूस फोटू काढत नव्हता का? कुठे लिंक दिसली नाही अजून!

विनय,
एकदम धमाल वृतांत आहे. याच्या पुढच्या (स्प्रिंगमधल्या) ए.वे.ए.ठी. ला सगळ्यांना घेवुन या डी. सी. ला म्हणजे आम्हालापण अशीच धमाल करायला मिळेल.

देसायनु...... मानला तुमका... आता थोड्या वेळा पुर्वीच सौ ला वाचुन दाखवल..... फुल्ल टु कॉमेडी....
Happy

वा फारचं गोड लिहिता तुम्ही Happy

आता उत्तरार्ध किंवा मध्यार्ध कोण लिहिणार आहे?

अशक्य लिहिलं आहे विनय... मजा आली. Happy

बी गेल्या वर्षीच्या ए वे ए ठि ला आत्त्ता पोहोचलास का तू Proud
विनय लिहा बर यावेळचा वृत्तान्त Happy

अरे गेल्यावर्षीच्या वृत्तांतावर आता प्रतिक्रिया? TubeLight Effect म्हणता तो हाच का?

विनय लिहा बर यावेळचा वृत्तान्त<< लिहिला लिहिला.. तोही लिहून झाला...

विनय Happy