मिश्र भाज्यांचं सूप

Submitted by prady on 29 August, 2010 - 14:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक एक जुडी
टोमॅटो ३
दुधी भोपळा ५-६ गोल चकत्या
गाजर १ मोठं किंवा १०-१२ बेबी कॅरेट्स
कोबी १ छोटा तुकडा
कांदा १ छोटा किंवा आकाराने मोठा असेल तर अर्धा
लाल भोपळा एक छोटा तुकडा
तमालपत्र ३-४ पाने
लवंगा ३-४
चवी प्रमाणे मीठ, साखर, मीरपूड
क्रीम (ऐच्छीक)

क्रमवार पाककृती: 

पालक आणी दुधीभोपळ्याच्या चकत्या सोडून ईतर भाज्यांचे छोटे तुकडे करून घ्यावेत.
कुकरच्या डब्यात भाज्या ठेवून साधारण बुडतील ईतपत पाणी घालावे.
ह्यातच तमालपत्र आणी लवंगा घालाव्यात.
भाज्या शिजल्यावर सूप मिक्सर मधून काढायच्या आधी लवंग आणी तमालपत्र काढून टाकायचं आहे. लवंगा पटकन दिसत नाहीत त्यामुळे दुधीभोपळ्याच्या चकत्यांना टोचून ठेवाव्यात म्हणजे सापडतात चटकन.
एखादी शिट्टी पुरेशी आहे भाज्या शिजायला.
कुकरचं झाकण उघडलं की आधी सांगितल्या प्रमाणे लवंग तमालपत्र काढून टाकावं. भाज्यांचं पाणी फेकू नये. त्याच पाण्यात भाज्या मिक्सर मधे वाटून घ्याव्यात.
हे सूप गाळायचं नाही. भाज्यांचं उरलेलं पाणी घालून हवं तेवढं पातळ करून घ्यावं.
चवी प्रमाणे मीठ , साखर , मीरपूड घालून एक उकळी काढावी.
गरम गरम सूप सर्व्ह करावं.

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

वरून आवडत असल्यास क्रीम घालावं.
किंवा एखादा डावभर दूध घालावं. छान चव येते.

माहितीचा स्रोत: 
वहिनी आणी आई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान प्रकार आहे.
आमच्याकडे मला सुकवलेल्या मिश्र भाज्या मिळाल्या (त्यात कांदा, बटाटा, लीक, केल्,गाजर आहेत.) त्याचे बाकी काही प्रकार मला आवडले नाहीत. हे सूप करुन बघतो.

मस्तच लागत हे सूप .मी तर पूर्ण दूधी भोपळा घालते.एरवी भाजी केली तर उरते . पण सूपात अख्खा भोपळा संपतो .
मी दाट्पणा येण्यासाठी भिजवलेले मूग किवा मूगाची डाळ टाकते. हल्ली आठवड्यातून एकदा पोट्भरीचे म्हणून हा प्रकार करते.

मस्त सूप प्रॅडी. मी नेहेमी करते. मी त्यात बीट पण टाकते. कधी कधी बीन्स पण. लवंगा-तमालपत्र नाही टाकत, पण टाकून पाहिन आता.
मुलाला खूप आवडते, आणि पोटात भरपूर भाज्याही जातात.

मस्त सूप Happy

मी तमालपत्र नाही घालत. लवंग आणि दालचिनीचा तुकडा घालते. कधी कधी लवंग/दालचिनी ऐव्जी इटालियन हर्ब्ज घालते.

यात वरतुन क्रिम ऐवजी थोडं गार्लिक बटर पण मस्त लागत Happy

मस्त रेसिपी प्रॅडी! २-३ भाज्या एकत्र करुन सुप करते पण अशा प्रकारचं कधी केलं नाहीये!
मुग/गार्लिक बटर घालण्याची कल्पना पण सही वाटतेय.

छाने रेसिपी. माझी आई करते साधारण अश्याच पद्धतीने.
मी दाट्पणा येण्यासाठी भिजवलेले मूग किवा मूगाची डाळ टाकते>> ही आयडिया छान.

वावा! थंडीच्या दिवसांतलं कंफर्ट फूड! युनिव्हर्सिटी कॅफेटेरियात मिळायचं. त्यात पांढरे बीन्स / बटर बीन्स घातलेले असायचे, म्हणून मी पण घालते. दाटपणा तर येतोच, चवही छान लागते.

धन्यवाद सगळ्यांना. ह्या सूपला खरंतर वेगळा दाटपणा आणावा लागत नाही. भोपळ्यामुळे येतोच. पण मुगाची डाळ, बीन्स वगैरे घालून अजून हेल्दी काउंटर वाढेल. करून बघेन मी पण पुढल्या वेळी.

आजच मैत्रिणीकडे हे असं सूप प्यायले. तिने त्यात एक कांदा, १ झुकिनी, ३ टोमॅटो, १ गाजर घालून कुकरला ४,५ शिट्ट्या केल्या. मग ब्लेंडरमध्ये मीठ, पास्ताचं हर्ब सिझनिंग घालून चांगलं ब्लेंड केलं आणि गरम गरम सर्व (इंग्लिश) केलं. मस्त लागलं. आता मी बर्‍याचदा डाएट फूड म्हणून करुन पिणार आहे.

काय भन्नाट लागतंय सूप! आहा! थॅक्स प्रॅडी! नेहेमी करणार आता हे मी!
दुधी भोपळा संपला होता त्यामुळे पालक्,ब्रोकोली,कांदा,बटाटा, गाजर, टोमॅटो घालून केले.. नवर्‍याला आवडते म्हणून croutons, extra black pepper and butter आहे यात. पण काहीही न घेता असलं अफाट लागतंय. नीलोबाने पण ओरपले! Happy

IMG_0586_0.JPG

बस्के, मस्त फोटो. Happy
प्रॅडी, माझ्याकडे सध्या मिकसर नसल्याने मला करता आले नाही हे सूप आज.
लोक्स, हे सूप तुम्हाला आवडले असेल तर अरुंधती चे बीटाचे सूप पण आवडेल. तिला विचारा रेस्पी. यम्मी आहे ते पण.

वाहवा!! एकदम मस्त लागतं हे सूप. बस्केचा फोटो पण भारी आहे Happy

आमच्याइथे सूप पॅकेट म्हणून ह्या सर्व भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात असलेलं एक पाकिट मिळतं. त्याचं तीन माणसांसाठी भरपूर सूप होतं.

अरे वा डाएट सूप छानच आहे. तो फोटो पण तोंपासू एकदम. संडेसाठी नवा प्रयोग Wink

आजारी व्यक्तींना तोंडाची गेलेली चव परत आणायला एक चविष्ट पर्याय म्हणूनही हा सूप देऊ शकतो. Happy

मीही दूधी भोपळा + बटाटा + टोमॅटो या भाज्या उकडून असंच सूप करते. दाटपणा साठी मूठभर मूगडाळही घालते. तूप किवा बटर आणि मीठ व मिरपूड घालून मिक्सर मध्ये वाटलेले उकडलेल्या भाज्यांचे वाटण आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळते. लवंग/ दालचिनी कधी ट्राय नाही केलं. पुढच्या वेळी ट्राय करेन.

बस्केच्या फोटो मध्ये ब्रेडचे तळलेले तुकडे दिसताहेत का सूप मध्ये तरंगताना? Uhoh या सूप मध्ये ते कसे लागतील?

प्रॅडी, परवा,करुन बघितले हे सूप.खूप आवडले आम्हाला.लवंग-तमालपत्राची छान चव उतरते.रेसिपीसाठी धन्यवाद Happy

तुमच्या रेसिपीने केलेले सूप गेले दोन आठवडे रात्रीचे नेमाने घेते आहे. जोडीला बाकी काही नाही. आज प्रथमच वजन केले अन कळले ७ पाउंड कमी झाले आहेत. डायाबिटीसने खूप त्रस्त झाले आहे म्हणून हा प्रयोग केला. चालणे पण सुरु आहे. आता हे तर रुटिन सुरु ठेवेनच आणि अधेमधे बदल म्हणून दही दलिया करेन म्हणतेय. रेसिपीबद्दल धन्यवाद!

अमी