बीज अंकुरे अंकुरे- मराठी भाषा दिवस २०१२

Submitted by संयोजक on 20 February, 2012 - 22:17

beej_ankure copy.jpg

मराठी भाषा दिवस २०१२ निमित्ताने थोडे मुद्द्याचे बोलुया?
इथे खाली दिलेल्या मुद्द्यांवर लिहिणे अपेक्षित आहे.

  • आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­
  • तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
  • मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
  • तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
  • महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
  • मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
  • लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
  • परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
  • प्रांजळ अनुभव लिहिणे अपेक्षित आहे. चांगले वाईट काही नाही. फक्त प्रांजळ अनुभव. कोणी काय करावे, काय करायला हवे होते,असे उपदेशपर कृपया लिहू नका. फक्त तुम्ही काय करता तेवढे लिहिणे अपेक्षित आहे.

* हा धागा संयोजकांकडून प्रशासित आहे हे कृपया लक्षात घ्या! दोषारोप न करता फक्त सद्य परिस्थिती कथन करणे आणि आपला मानस; एवढेच लिहावे ही विनंती आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारताबाहेर स्थाईक झालेल्या मराठी पालकांपुढे परदेशात आपल्या मुलांना मराठी भाषा कशी शिकवायची हा प्रश्न असतो. मराठी बोलणं त्यातल्यात्यात घरच्या घरी मुलं शिकतात. परंतु मराठी वाचन आणि लेखन शिकवण्यासाठी रितसर शाळेची उणीव भासते.

उत्तर अमेरिकेतील बॉस्ट्न शहरात अशाच काहीशा गरजेतून सुमारे ३० वर्षांपूर्वी काही भारतीय रहिवाशांनी एकत्र येउन, भारतीय संस्कृती आणि भारतातीय भाषांचं, रितसर, अभ्यासक्रमानुसार शिक्षण प्रदान करणार्‍या एका शाळेची स्थापना केली. शिशुभारती नावाची ही शाळा, हा उपक्रम, इतका यशस्वी झाला आहे की आता बॉस्ट्नमधे त्याच्या तीन शाखा आहेत. ९० शिक्षक आणि कित्येक इतर स्वयंसेवक मिळून ह्या तीन शाखा चालवतात ज्यात ८०० हून अधिक मुले, केजी ते आठवी या वर्गांमधून शिकतात. यात मराठी मुलांची संख्या सुमारे १०० आहे. शिशुभारतीत हिन्दी, मराठी, तमिळ, गुजराथी, कन्नड आणि तेलगु अशा सहा भारतीय भाषा शिकवल्या जातात. मुले कुठलीही एक भाषा आणि भारतीय संस्कृती, असे दोन विषय शिकतात. शाळा दर रविवारी अडीच तास असते. रितसर होमवर्क, उपक्रम, परिक्षा वगैरे दिल्या जातात आणि त्यात पास व्हावं लागत असल्यामुळे मुलं व्यवस्थित अभ्यासही करतात.

या शाळेच्या माध्यमातून मुले नुसती भाषाच शिकतात असं नाही तर शाळेनिमित्त इतर मराठी मुलांशी त्यांची दोस्ती होते, तसेच पालकांचेही एकमेकांशी मैत्री-संबंध जुळून येतात आणि मराठी लोकांना, भारतीय लोकांना, एकत्र आणण्याचे एक महत्वाचे कामही साध्य होते. बॉस्ट्नच्या रहिवाशांना मिळालेलं हे खरं वरदानच म्हणायचं!

वा! अमर..
८०० हून अधिक मुले, केजी ते आठवी या वर्गांमधून शिकतात>> बापरे!! बराच मोठा प्रकल्प दिसतो आहे हा.
आणि आठवीनंतर?
सहज विचारते आहे.

आमची मुलगी इंग्रजी माध्यमातील शाळेत आहे. वयवर्षे ४. अजून शाळेत मराठी हा विषय नाही म्हणून घरीच गाणी, गोष्टी, रोजचे संभाषण याद्वारे मराठी भाषा शिकवतो. त्यामुळे कधीतरी गमतीशीर प्रमाण भाषेतला एखादा शब्द वापरते उदा- 'अद्भूत'. शाळेने मध्यंतरी इंग्रजी घरी बोला असा फतवा काढला होता. तिच्या वयासाठी आम्हाला ते योग्य वाटले नाही म्हणून आम्ही केले नाही.
तिच्या मराठी मैत्रिणींचे पालक घरी इंग्रजी बोलतात आवर्जून, त्यामुळे तिचेही इंग्रजीप्राविण्य सुधरते आहे. Proud आम्ही मराठी बोलतो, न जाणो त्यांचे मराठीप्राविण्य सुधरेल थोडेसे.

मराठी पुस्तकांबाबत मी ज्योत्स्ना प्रकाशनाची ऋणी आहे. त्यांची लहानमुलांसाठीची पुस्तकं मुलगी इतकी एन्जॉय करते की ज्याचे नाव ते! तसेच रामायण आणि लोककथा वाचून दाखवायला सुरवात केली आहे. अजूनतरी तिला मजा येते आहे.

कुटुंबात ४-१५ या वयाची मुले आहेत. पैकी दोघी परदेशात. सगळी भावंड जमली की मराठीतून भांडतात अजूनतरी, हेच पाहुन बरे वाटते कधीकधी.

आम्ही दिल्लीला रहातो. घरात आपापसात हिंदीमध्ये बोलल्या जाते. मुलाशी बोलताना मात्र आम्ही दोघेही आमच्या मातृभाषेत बोलायचा शक्यतोवर प्रयत्न करतो. बर्‍याच वेळा आपापसात बोलता बोलताच त्याच्याशी बोललं गेल्याने हिंदीतही त्याच्याशी बोललं जातं.

सध्या तो इंग्रजी माध्यमाचा प्ले ग्रूपमध्ये जातोय. महिनाभरात मोठ्या शाळेत जायला लागेल. शाळेत मराठी हा विषय नसेल. त्याला मराठी यावं म्हणून माझ्या परिने मराठी पुस्तकं वाचून दाखवणं, रात्री गोष्ट सांगणं, गाणी ऐकवणं असं मी करत असते. सध्यातरी त्याला मराठी व्यवस्थित समजतं. बर्‍याच वेळा तो बोलायचा पण प्रयत्न करतो. सलग किमान ४-५ वाक्य बोलू शकतो. काही शब्द तर मराठीतलेच वापरतो जसं की उंदिरमामा. अगदी हिंदी गोष्टीमध्ये सुद्धा शेरखानाच्या अंगावर उंदिरमामा चढत असतो. Happy माहेरी गेल्यावर मात्र तिथे तो मराठीच जास्त बोलतो.

शाळेत पुढेमागे हिंदी भाषा आणि मुळाक्षरं शिकवली जातिल, त्यामूळे किमान त्यासाठी मला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. (नवर्‍याला मात्र पंजाबी मुळाक्षरं शिकवायला जास्त प्रयत्न करावे लागतिल. Happy )त्याला मराठी व्यवस्थित बोलता यावं आणि मराठी वाचनाची आवड निर्माण व्हावी अशी इच्छा आहे.

ज्योत्स्ना प्रकाशनाच्या पुस्तकांसाठी रैनाला अनुमोदन. Happy खूपच छान आणि सोप्या भाषेतली पुस्तकं आहेत त्यांची.

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­
हो. बोलता, लिहिता (कधी कधी चुकत माकत ) आणि उत्तम रीत्या वाचता येते.
इतर मित्र मैत्रिणींशी मराठीत बोलणे आणि संवाद होतो.

तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
माझी मुलगी इंग्लिश माध्यमामधून शिकली (कॉन्व्हेंट नव्हे) पण घरी व आजूबाजूला मराठी मध्यमवर्गीय वातावरण असल्याचा आणि बहुतांशी लोक मराठीतून बोलत असण्याचा फायदा झाला असावा. तसेच तिच्या शाळेमध्ये इतर पालक, आम्ही जेंव्हा भेटत असू, आपापसात मराठीतूनच बोलत असू. हेही पाहण्याने, अनुभवण्याने फरक पडतो, असे मला वाटते. त्याचप्रमाणे तिच्या वाचनाच्या आवडीचा मी उपयोग करुन घेतला. असा मी असामी हे तिने सलग वाचलेले मराठी पुस्तक, आणि वाचताना ती जेव्हा जेह्वा खुदखुदली, मला अगदी धन्य झाले, की तिच्या पर्यंत ते विनोद पोहोचले - म्हणजेच तिला भाषा समजली, हा आनंददायी अनुभव होता. मनाचे श्लोक वाचायला दिले. इतर पुस्तकेही. शाळेमध्ये १०० मार्कांचे संस्कृत होते, त्याचा फार फायदा झाला, असेही वाटते, संस्कृत लिहिता, वाचता आणि बोलता येत असल्याने मराठीचा तिला एवढा बाऊ वाटला नाही बहुतेक.

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
पुरवण्या आणि जमतील तसे कार्यक्रम - ह्याचा उपयोग झाला.

तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?

मुलांना मराठी येत नसेल आणि तुम्हांला येत असेल तर शिकवणे आपल्या हातात आहे असे मला वाटते. मी तेच केले. वातावरणानेही खूप फरक पडतो. माझी मुळं मी जपत गेले, त्यांच्याविषयी मुळात मला आदर आहे, आणि त्यामुळे ते आपसूक काही प्रमाणात तरी लेकीमध्ये नक्कीच रुजले. तिच्या संस्कारक्षम वयात तिने ते अधिक सहजरीत्या आत्मसात केले आणि त्याविषयी आत्मीयता आणि गोडी उत्पन्न झाली, असे मला वाटते.

* आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का? ­
* तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
* मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?

# मी मुलीशी जवळजवळ ७५% मराठीतून बोलते. मुलीलाही मराठी छानपैकी बोलता येतं. (पण कधीकधी तिची वाक्यरचना, शब्दप्रयोग इंग्रजीच्या वळणानं जातात.) अजून तिला मराठी/हिंदी वाचायची तितकीशी सवय नाही. या सुट्टीत तोच उपक्रम राबवायचा आहे. बरीचशी हिंदी, मराठी पुस्तकं आणून ठेवली आहेत. नुकतीच तिच्या मावसभावंडांकडून फास्टर फेणेचा खजिनाही मिळाला आहे. ती सगळी पुस्तकं बसून तिच्याबरोबर वाचणार आहे.

माझी मुलगी माझ्या सर्व नातेवाईकांशी व्यवस्थित मराठीतून बोलते. माझी आई जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा ती आजीबरोबर मराठी सिरीयलसही बघते. पण बिल्डिंगमध्ये सर्व भाषिक मुलं असल्याने ती मित्रमैत्रिणींशी (अगदी मराठी मित्रमैत्रिणी असतील तरी) इंग्लिशमधूनच बोलते.

शाळेत तिची तिसरी भाषा मराठी आहे. शाळेत इयत्ता पहिलीपासून मराठीचा तास घेतला जातो. त्यात गेले तीन वर्षं बोलण्यावरच भर दिला जात आहे. चौथीपासून मराठी लिखाणास सुरूवात होईल.

माझ्या मुलीला पहिल्यापासूनच मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा शिकायला मिळाल्या. अगदी लहान असल्यापासून जे वाक्य ती माझ्याशी मराठीतून बोलायची तेच वाक्य तिच्या बाबांशी हिंदीतून बोलायची. हे अगदी आपसूक झाले. पण तरीही मराठी मातृभाषा असल्याने तिच्याबाबतीत मराठीचं पारडं नेहमीच जड राहिलंय. तिची मातृभाषाही आम्ही मराठी/हिंदी अशीच लिहितो.

* लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?

# अगदी लहान मुलांची पुस्तकं पाहिली तर अतिशय सुरेख पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. ती सुध्दा अत्यंत वाजवी दरात. ज्योत्स्ना प्रकाशन (जी मी ही लहानपणापासून वाचली आहेत आणि वरही सगळ्यांनी यांचा उल्लेख केलाच आहे), माधुरी पुरंदरे, प्रथम ची अनेक सुरेख पुस्तकं आहेत. अजून माझ्याकडे अशा प्राथमिक पातळीवरचीच पुस्तकं आहेत. पुढे हळूहळू पातळी वाढवेनच.

पण तरीही मला असं वाटतं की इंग्रजी माध्यमातून शिकणार्‍या मुलामुलींकरता (काही अपवाद वगळता) त्यांची मातृभाषा दुय्यमच रहाणार. मला कितीही जड भाषा असलेलं मराठी पुस्तक जितकं सहजपणे वाचता येतं तसंच जर जड इंग्रजी भाषा असलेलं पुस्तक असेल तर काहीसा कंटाळा येतो. तसंच या मुलांचं होत असणार.

* परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?

# मी परदेशात रहात नाही. पण माझ्याकडे अगदी उलट परिस्थिती आहे. घरी फारसे सणवार होतच नाहीत. एका अर्थी मीच मराठी संस्कृतीपासून बर्‍यापैकी लांब गेले आहे. घरी रूढार्थानं देवही नाहीत. तरी दसरा, गुढीपाडवा, दिवाळी, रक्षाबंधन थोड्याफार प्रमाणात साजरे केले जाते. पण मुळात मलाच सण साजरे करण्यात फारसा राम दिसत नसल्याने ते संस्कार पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करण्यात फार यशस्वी होईन असं दिसत नाही.

हो मामी. गोट्या सारखी पुस्तकंही दे मुलीला तुझ्या. माझ्या मुलीने गोट्या मालिकाही पाहिली होती आणि गोट्या वाचायलाही खूप आवडायचं तिला. Happy

हो, शैलजा. नक्कीच. ज्या ज्या पुस्तकांनी मला आनंद दिला ती सगळी पुस्तकं तिच्याकरता आणायची आहेत. जरा सुरूवात होऊ दे. Happy

वाचते आहे. Happy

माझ्या एका भाचीला ती जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असली तरी आई-बाबा-आजी इत्यादी लोकांच्या फर्ड्या मराठीमुळे तिच्या वयाच्या तिसर्‍या वर्षापासून 'अप्रतिम', 'विलक्षण' असे शब्द आपल्या बोलण्यात पेरून तिच्या टीचर्ससह सर्व लोकांना थक्क करायची कला अवगत झाली होती व आहे!
दुसरी एक भाची शाळा इंग्रजी माध्यमाची असली तरी तिथे संस्कृतवर भर असल्यामुळे खणखणीत श्लोक म्हणते. घरी तिचे आजी आजोबा तिच्याशी शुद्ध मराठीत बोलतात.

मध्य प्रदेशात राहणारी भाची मात्र हिंदी + इंग्रजीत जास्त कंफर्टेबल असते. तिथे इंग्रजी, हिंदी शाळेत शिकवले जाते व बाहेर संभाषण हिंदीतच आहे. घरी बाकीचे सदस्य मराठीत बोलले तरी तिला मराठी तितके चांगले बोलता येत नाही. तिच्या आईवडिलांचे शिक्षणही हिंदी + इंग्रजी माध्यमातील असल्यामुळे त्यांची बोली भाषा हिंदीमिश्रित मराठी आहे. तिला वाचनाची गोडी अद्याप तरी नाहीए. घरात इतर कोणी पुस्तके फारसे वाचत नाही. लायब्ररीतून आणलेले पुस्तक (हिंदी/ मराठी/ इंग्रजी), मासिक (हिंदी/इंग्रजी) व रोजचे वर्तमानपत्र (हिंदी/इंग्रजी) इतपतच मोठ्यांचे वाचन असते. तिच्यासाठी आणलेली हिंदी व इंग्रजीतील सोपी सोपी पुस्तके ती वाचते. पण वाचनापेक्षा घराबाहेर जाऊन हुंदडण्यात व दंगा करण्यात जास्त रस आहे तिला.

अमर, बॉस्टनचा उपक्रम मस्तच आहे.
आम्ही रहातो त्या भागात मराठी/भारतीय कुटुंब खूप कमी आहेत. त्यामूळे घराबाहेर रोज वापरायची भाषा इंग्रजी आहे. मात्र घरात मराठीच बोलले जाते. माझा मुलगा लहान असताना घरात बोलायची भाषा मराठी, गोष्टीची पुस्तके १०% मराठी ९०% इंग्रजी, टिव्ही इंग्रजी असे होते.
त्याला घरीच मराठी लिहायला वाचायला शिकवले. मात्र जसा जसा तो मोठा होत गेला तसे मराठी पेक्षा इंग्रजी भाषेवरील प्रभूत्व वाढत गेले. त्याला मराठी बोलता येते. मराठी लिहिण्यापेक्षा टाईप करणे त्याला सोपे वाटते. मराठी वाचन इंग्रजीच्या मानाने खूप कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वेळेचा अभाव आणि त्यामुळे सरावाचा अभाव. काही वेळा पुस्तकातील टाईप त्रासदायक वाटला, खूप टायपो होते म्हणुनही तो वैतागतो. काही वेळा कथा विषयाशी तो रिलेट करु शकत नाही. मराठी पुस्तक एकत्र वाचायला किंवा मी वाचलेले ऐकायला त्याला आवडते. रामनगरीतले किस्से किंवा पुलंचे म्हैस, असा मी असामी तले किस्से वगैरे त्याला खूप आवडतात. तो ६वीत असताना आम्ही एकत्र शामची आई वाचले होते. जवळ जवळ सहा महिने उपक्रम चालला. एक पॅरा त्याने वाचायचा एक पॅरा मी. मग त्यातील त्याला न कळलेल्या गोष्टी समजावून सांगणे, त्यासाठी जालावर माहिती शोधणे, फोन करुन आजीला विचारणे चालायचे. इथल्या शाळेत बुक प्रोजेक्टसाठी करतात तसे पुस्तकात उल्लेख केलेले पदार्थही करुन बघितले. त्याला खूप मजा आली. शामची आई जाते तेव्हा माझ्या बरोबर तो ही रडला.
झी मराठी किंवा इटिव्ही मराठी वरील काही कार्यक्रमही त्याला आवडतात. मराठी गाणी आवडतात. नेट वर उपलब्ध झाल्यास मराठी नाटक, चित्रपट बघितले जातात. त्याला न कळलेला कन्सेप्ट समजाउन सांगत चित्रपट बघताना काही वेळा ३ तासाचे ५ तास होतात. :). महाराष्ट्र मंडळात विनोदी नाटक असेल तर तो आवर्जून बघायला येतो.
घरी तसेच महाराष्ट्र मंडळात मराठी पद्धतीने सण सोय बघून साजरे केले जातात. घरकामात तो मदत करतो त्यामुळे आपोआप मराठी पद्धतीचा स्वयंपाक, कुठल्या सणाला काय बनवतात, कुळधर्म्,पुजेची तयारी वगैरे तो शिकला.
तो स्वतःला मराठी hoosier समजतो. Happy

माझी बहीण अमेरिकेतील ज्या शहरात राहते तेथील मंदिरातर्फे शनि-रवि चालविल्या जाणार्‍या मराठी व हिंदी वर्गांत गेली २ वर्षे भारतीय मुलांना शिकविते.

तिच्याकडून वेळोवेळी तिच्या वर्गातील अनुभवांबद्दल ऐकले आहे :

१. मुले ट्रान्स्पोर्ट साठी आईवडिलांवर अवलंबून असल्यामुळे जर आईवडील मोटिव्हेटेड असतील तरच मुलांची उपस्थिती मराठी वर्गांसाठी व्यवस्थित टिकू शकते. आईवडिलांचे इतर कार्यक्रम / बिझी स्केड्यूल असेल तर मुलांच्या क्लासवर त्याचा थेट परिणाम दिसतो. काही वेळा 'होमवर्क झाला नाही' म्हणूनही मुले यायची टाळाटाळ करतात. आणि त्यांना त्याबद्दल शिक्षा करूनही चालत नाही!

२. या क्लासमधून पालकांची आपल्या मुलांना जुजबी मराठी बोलता यावे / बोललेले समजावे/ थोडेसे लिहिता यावे इतपतच अपेक्षा असेल (जी तिला जाणवली) तर त्याचाही मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. शिवाय अशा क्लासला मुलांच्या अगदी इटुकल्या पिटुकल्या तोडक्या मोडक्या यशाचे खूप तोंडभरून कौतुक करावे लागते.... माझ्या बहिणीला पुणेरी सवयीमुळे असे कौतुक करणे सुरुवातीला खूप जड गेले! Proud

३. बहीण दर वेळेला भारत भेटीतून तिच्या क्लासच्या मुलांसाठी सोप्या मराठीतील भरपूर पुस्तके, साहित्य, तक्ते इ. घेऊन जाते. नव्या नव्या कल्पना लढवून त्यांचा मराठीतील रस कायम राखण्यासाठी, त्यांनी क्लासला सातत्याने येत राहावे यासाठी तिची धडपड चालू असते. भारताच्या स्वातंत्र्यदिनाला / प्रजासत्ताक दिनाला तिने सगळ्या मुलांकडून मराठीतील देशभक्ती गीताची जोरजोरात तयारी करवून घेऊन ते गीत मंदिरातील कार्यक्रमात त्यांच्या आईवडिलांसमोर सादर करायला लावले होते तेव्हा सार्‍या पालकांना अगदी 'अऽहाऽहा' झाले होते!

आम्ही अमेरिकेत चाळीस वर्षांपूर्वी आलो. भारताशी संबंध जवळपास संपूर्णपणे तुटलेला
. इथल्या वातवरणात रहायचे, इथल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे या भानगडीत, मराठी बोलणे ऐकणे फाSर क्वचित. मराथी जनताहि फार नव्हती. नेहेमी भेटतील असेहि नाही! फोनवर बोलायला सुद्धा वेळ पाहिजे ना? आत्तासारखे इंटरनेट, फोन, व्हिडियो, झी टीव्ही वगैरे प्रकार नव्हते. घरी जेव्हढे बोलू त्यातून काय ते शिकले.
त्यामुळे आमचे अनुभव गेल्या १५- २० वर्षात आलेल्या लोकांपेक्षा वेगळे.

१. बहुतेक सगळे समजते, बोलायला मुलगी लाजते. पण आजोबा आजी शी बोलू शक्त असे, मावशीशी बोलू शकते.
२. आम्ही आसपासच्या लोकांनी प्रयत्नपूर्वक 'मराठी शाळा' काढली, मुलांना आवडतील असे कार्यक्रम ठेवले, त्यामुळे पुष्कळ मुले मर्यादित प्रमाणात का होईना, अक्षरे वाचू लागली, लिहू लागली. घरी नेहेमी मराठीत बोलून त्यांची सवय टिकवली.
३. आजकालचे भारतीय टीव्ही वरील मराठी कार्यक्रम, मराठी वृत्तपत्रे कटाक्षाने त्यांना बघू देत नाही!!
अहो 'डिसिजन घेणं डिफिकल्ट झालय' , 'सुपर्ब परफॉर्मन्स' , गरज नसताना वाक्येच्या वाक्ये इंग्रजीत, हे असले पाहून काय मराठी शिकणार त्यातून?
नि मुळात अमेरिकेतले इंग्रजी नि भारतातले इंग्रजी यात बराच फरक वाटतो त्यांना. नि अ‍ॅक्सेंटहि वेगळेवेगळे , बोलायचे विषय वेगळे, असे असल्याने समजणे कठीणच जाते. क्वचित आपआपसात मराठीत बोलू शकतात!
शेवटून दुसरा प्रश्नः
भारतीय, विशेषतः मराठी सण घरी साजरे केल्याने, बरेचसे मराठी रितीरिवाज, शब्द, त्यांना, तसेच आमच्या अमेरिकन जावयाला सुद्धा कळतात! उदा. उपवास, उष्टे, ओवाळणे, दसरा, पाडवा, दिवाळी, देवळात जाणे, पूजा नि पुजेचे विधी इ.
का ओवाळायचे, का खाली वाकून नमस्कार करायचा इ. कळते

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­
मुलगा १६ वर्षांचा आहे. त्याला मराठी लिहिता, बोलता, वाचता येत नाही. सावकाश बोललं तर फक्त बर्‍यापैकी समजतं.

तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता?
मुलगा अडीच वर्षांचा असताना अमेरिकेत रहायला आलो. त्याआधी मराठी, कानडी, (मोडकंतोडकं) इंग्रजी आणि हिंदी उत्तम बोलायचा. इथे आल्यावर दिवसाचे ८ तास डे केअरला जायला लागला. तीन महिन्यांत इतर भाषा विसरला. संध्याकाळी तो आणि आम्ही थकून आल्यावर 'मराठीत बोलला नाहीस तर तुझ्याशी बोलणार नाही' वगैरेचे प्रयोग करायची इच्छा झाली नाही. फक्त त्याच्याशी मराठीत बोलत राहिलो. त्यामुळे 'भात जळला आणि करपला' यातला फरक कळण्याइतपत मराठी बरं होतं. आम्ही बाकी काही विशेष प्रयत्न केले नाही.

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
नाही. यातल्या कशाचाही उपयोग करून घेतल्या जात नाही. आजी-आजोबांशी संवाद तिकडून मराठी इकडून इंग्रजी आणि न समजलेल्या शब्दांचं भाषांतर आई-वडील असा सीन असतो.

महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते. मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
न्यूयॉर्कात ज्या ठिकाणी होतो तिथे वीएंड स्कूल नव्हती. असती तर कदाचित घातलं असतं, पण कधाचितच. जे काय चाललंय ते उत्तम आहे. मराठीवाचून त्याचं अडत नाही. आम्ही मराठी वातावरणात वाढलो म्हणून मुलाला मराठी यायलच हवं यावर आम्हा दोघांचाही विश्वास नाही. त्याला मारून मुटकून शिकवायची इच्छा १३ वर्षांपूर्वीही झाली नाही, आत्ताही नाही. भविष्यात त्याला स्वतःला शिकावसं वाटलं तर उत्तम!

लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
हल्लीची फारशी पुस्तकं बघण्यात आली नाही. माझी आई लहान मुलांची पुस्तकं लिहिते. आजीची पुस्तकं म्हणून काही कथा वाचून दाखवल्यात पूर्वी, पण मराठीत सांगितलेल्या कथा फारशा लक्ष देऊन त्याने ऐकल्या नाही. लहानपणची बडबडगीतं मात्र अजूनही म्हणून दाखवलेली आवडतात. (त्याच गाण्यांच्या सिड्या मात्र आवर्जून ऐकल्या नाही.)

परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
आम्हाला स्वतःलाच 'मराठी' सणवार नेमके काय्काय ते कळलेलं नाही. नागपंचमी, संक्रांत, वटपौर्णिमा यातलं काहीही साजरं केल्या जात नाही. त्यातल्यात्यात दिवाळी करतो, म्हणून तेवढी माहिती आहे. खास मराठीपण म्हणजे नेमकं काय उतरावं? माहिती नाही.

थोडक्यात मुलानं उत्तम 'मराठी' व्यक्ती व्हावं यापेक्षा उत्तम्/भली व्यक्ती व्हावं इतकंच अपेक्षीत आहे.

अटलांटा मधे देखील गेली ३ वर्षं मराठी शाळेचा उपक्रम सुरू आहे.भारती विद्यापीठ ने आखलेला अभ्यासक्रम येथे शिकवला जातो.आपल्या सणावाराची ओळख करून देणे. मराठीत लिहायला वाचायला शिकवणे.एखादा विषय देऊन त्यावर वक्तृत्व ,निबंध लेखन असे बरेच उपक्रम सुरू असतात. माझ्या बर्याच मैत्रिणी ह्या उपक्रमाशी सलग्न आहेत. कुणी शिक्षक म्हणून कुणी स्वयंसेविका आणी बर्याच जणींची मुलं ह्या शाळेत जातात. त्याच जोडीला चिन्मय मिशन तर्फे संस्कार वर्ग चालवले जातात. ईथे आपली स्तोत्रं श्लोक ईत्यादी शिकवले जातात. जमल्यास ह्या शिक्षकांपैकी कुणालातरी ईथे अधीक माहिती द्यायला सांगीन. आमची लेक अजून अडीच वर्षांचीच आहे त्यामुळे ह्या शाळेत जायला अजून वेळ आहे आम्हाला.

आम्ही घरी कटाक्षाने मराठीत बोलतो. गाणी, गोष्टी मराठीत सुरू असतात. माझी मुलगी साधारण वर्षाची असताना बोलायला लागली. ती अस्खलीत मराठी बोलू शकते.अवघड शब्द पण सहजतेने उच्चारू शकते. ईथे तिच्या शाळेतून आणी डॉक्टरकडून आम्हाला नेहेमी हेच सांगण्यात आलं की घरी मातृभाषेतच बोला.मुलं फार सहजतेने भाषा शिकतात. आता तिला ईंग्रजीची पण सवय होतेय हळूहळू. एखादा शब्द अडला तर विचारते.व्याकरणाची पण गंमत आहे अजून पण केवळ शाळेत ऐकून तिला जितकं येतंय तेही आमच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे.

पुस्तकांची तिला गोडी आहे. यंदाच्या देशवारीत भरपूर मराठी पुस्तकं पण आणलीत.(ह्यातल्या बर्याच पुस्तकांमधल्या व्याकरणाच्या आणी शुद्धलेखनाच्या चुका पाहून वाईट वाटलं.) आता वाचता येत नसलं तरी केवळ पुस्तकातली चित्रं पाहून ती पूर्ण गोष्टं सांगू शकते. मराठी चार्ट्स,पुस्तकं, बर्गे सुलेखनाच्या पाट्या,अंतरजालावर उपलब्ध असलेले व्हिडीओज ह्यावर सध्या भर आहे. आमच्या मित्रमैत्रिणींमधे गेल्या एक दोन वर्षांत भोंडला, गणपती, चैत्रागौर, संक्रांत हळदीकुंकू असे उपक्रम पण आवर्जून साजरे केले जात आहेत. त्यामुळे मराठी सणवारांची थोडी माहिती पण होतेय.

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­

नाही, दोघांपैकी एकाला मराठी थातुरमातुर, अमराठी अ‍ॅक्सेंटसह आजी आजोबांशी जरुरीपुरतं बोलता येतं. बोललेलं कळतं पण उत्तर हमखास इंग्लिशमध्येच येतं. लिहिता, वाचता दोघांनाही येत नाही. मुलांचे मित्र फारसे मराठी नसल्याने त्यांची आपापसात बोलायची भाषाही इंग्लिश आहे. स्वतःला एक्सप्रेस करण्याकरताही इंग्लिश ही भाषाच जवळची वाटते.

तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.

मराठी नाही पण हिंदी भाषेचे क्लास त्यांनी लावले होते. मी एक कल्चरल क्लास म्हणूनच त्याकडे बघत होते पण जेव्हा हिंदीचा अभ्यास, गृहपाठ करायची वेळ आली तेव्हा मुलांना क्लास आवडेनासा झाला. आत्ताही ती एका घरगुती हिंदी क्लासला जातेय जिथे भाषा अशी नाही पण भारतातले सण, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ह्या दिवसांचं महत्व ती आवडीने समजून घेऊन लक्षात ठेवतेय. मराठी क्लास इथे जवळपास नसल्याने लावायचा प्रश्न आलेला नाही किंवा लावावा, नाही ह्याबद्दल विचार केलेला नाही.
दोन्ही मुलं भारतीय सेमी क्लासिकल म्युझिक शिकतात. गेल्या वर्षी मुलीने आणि तिच्या गाण्याच्या क्लासमधील अमराठी मुलींनी इथल्या पब्लिक लायब्ररीत 'रेशमाच्या रेघांनी' गायलं होतं.

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?

नाही,ह्याऐकी काहीही आमच्याकडे नाही. लहान मुलांचे असे मराठी चित्रपट दाखवल्याचे आठवत नाहीत.

तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.

मी ह्यात बसत नाही.

महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.

वर लिहिला आहे तो एकमेव अनुभव माझ्या गाठी जमा आहे.

मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?

मराठी बोलता यायला हवं असं वाटतं. भारतातल्या आजी आजोबांशी, भावंडांशी तेच एक संवाद साधायचं साधन आहे असं वाटतं. लिहिता, वाचता यायलाच हवं असा माझा अट्टाहास अजिबातच नाही. आणि त्यामुळेच शनिवार, रविवार अर्धा, पाऊण तास गाडी हाकत मराठी क्लासला वगैरे नेण्याचा आटापिटाही करवत नाही.

लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?

माझ्याकडे खास अशी मराठी गोष्टीची पुस्तकं नाहीत त्यामुळे कल्पना नाही.

परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?

मराठीपणा यावा म्हणून नाही पण आपल्या सणांची माहिती व्हावी म्हणून करावेत.

आम्हाला दोघांनाही मुलाला मराठी आणि इंग्रजी दोन्हीही भाषा उत्तम याव्यात अशी इच्छा होती त्यामुळे घरी कटाक्षाने मुलाशी लहानपणापासून मराठी बोलायला सुरुवात केली. आता तो ४ वर्षांचा आहे, आणि मराठी अस्खलित बोलतो. मराठी पुस्तके, जिंगल टून्स वरच्या मराठी गोष्टी, आजी आजोबांच्या भेटी इत्यादी मुळे मराठी बोलणे उत्तरोत्तर चांगले होत गेले. नवीन शब्द कळला की त्याचा अर्थ विचारून तो वाक्यात वापरायला त्याला खूप आवडते. मराठी अजून वाचता येत नाही पण लवकरच मराठी बाराखडी शिकवायला सुरुवात करणार आहे. ह्या वयात मुलांना खूप जिज्ञासा असते, काहीही नवीन मिळेल ते शिकायला आवडते. माझा मुलगा कालनिर्णय पाहून १ ते ३० आकडे ओळखायला शिकला आणि मला विचारून १ ते १०० म्हणायला. कुठल्याही मराठी शाळेत टाकायची अजुनतरी गरज पडलेली नाही आहे. घरी दिवाळी गणपती इ. सण साजरे होतात पण सणांपेक्षा दैनंदिन वागणूक/व्यवहार इत्यादीतूनच मराठीपण उरतले आहे असे वाटते.

# आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­

माझा लेक १३ वर्षांचा आहे. बर्‍यापैकी मराठी बोलतो. आपण बोललेलं (खाचाखोचांसकट) समजतं. लिहितावाचता येत नाही.
वर बॉस्टनच्या शाळेचा उल्लेख आहे तशीच मराठी शाळा इथेही असते. त्याला घातलं होतं, पण लवकरच तो कंटाळला. 'मला मराठी लिहितावाचता येण्याची गरज काय' या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हतं.
तो मुळात गप्पिष्ट आणि गोतावळ्यात रमणारा आहे त्यामुळे भारतातल्या नातेवाइकांशी आम्ही सुट्टीला जातो तेव्हा किंवा एरवी चॅटवर वगैरे कसंही करून संवाद साधतोच.

# तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.

घरात मराठीच बोललं जातं. मी त्याच्याशी मराठीतच बोलते. यात 'फेजेस' होत्या. म्हणजे सुरुवातीला अर्थातच मराठी बोलायचा. त्याची शाळा आणि माझी नोकरी सुरू झाल्यावर इंग्रजीचा प्रभाव वाढला. तेव्हा आधी मी त्याने माझ्याशी मराठीतच बोलावं असा आग्रह धरत असे. पण मग संवाद होणं महत्त्वाचं आहे, कोणत्या भाषेत हे दुय्यम आहे असं जाणवल्याने मीच तो हट्ट सोडला. पण आता (कोणीच कुठलेच हट्ट न धरताही) तो आपोआपच घरात मराठीच बोलतो.

# मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?

आजीआजोबा इथेच असतात. त्यांच्या नादाने क्वचित काही मराठी कार्यक्रम कधी पाहिले असतील तर. पण त्यात त्याने कधी रुची घेतल्याचं दिसलं नाही. शीर्षकगीतं मात्र लगेच पाठ होतात. (मध्यंतरी त्याला "माझिया प्रियाला प्रीत कळेना" आळवतांना मी या कानांनी ऐकलं! :P)
अलीकडेच त्याला आवडलेले दोन मराठी चित्रपट म्हणजे 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' आणि 'बालगंधर्व'.

# मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?

आधी लिहिल्याप्रमाणे त्याला आप्तांशी सहज संवाद साधण्यापुरतं मराठी उत्तम येतंच. आणखी प्रयत्न करणं नाही गरजेचं वाटत. वर मृणने लिहिलं तसं तो माणूस म्हणून चांगला होणं महत्त्वाचं वाटतं. भाषेबिषेचा आग्रह मागे पडला आहे.

# लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?

ही कुठली आहेत काही कल्पना नाही.

# परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
देवतार्जन आणि व्रतवैकल्यांपासून आम्हीच आता मनाने बरेच दूर गेलो आहोत. सणावारांचा संदर्भ आमच्या लेखी पारंपारिक खाद्यपदार्थ करण्याइतकाच उरला आहे म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. Happy
पण त्याला त्या त्या ऋतूतल्या सणांची, त्यामागच्या संभाव्य कारणांची माहिती मात्र आवर्जून देते. त्याला त्याचे सांस्कृतिक संदर्भ समजून घ्यायला आवडतंही. (आणि ते खाद्यपदार्थही आवडतात.) Happy

'मायबोली'चा उल्लेख केल्यावाचून ही पोस्ट अपूर्ण राहील. मायबोलीच्या काही मेळाव्यांना (गटग) हजेरी लावल्यापासून हे संकेतस्थळ आणि मायबोलीकरांवर त्याचा भारी लोभ जडला आहे. केवळ एका (कॉमन) भाषेच्या दुव्याने माणसं अशी जोडली जातात याचं त्याला फार अप्रूप वाटतं. सज्ञान झाला की सर्वात आधी मायबोलीचा आयडी काढणार असं केव्हाच ठरलं आहे. तेव्हा त्यासाठी मराठी लिहायला शिकला तर सांगता येत नाही. Happy

तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.>>>>>
माझी मुलगी आठ वर्षाची आहे ती मराठी माध्यमाच्या शाळेत शिकते हा निर्णय मी व तिच्या बाबाने तिच्या जन्माच्याही आधी घेतलेला.मुलांनी त्यांच्या मातृभाषेतुन शिक्षण घेणे उत्तम या मताचे आम्ही दोघेही आहोत, तिला शाळेत घालताना घरातल्यांपेक्षा बाहेरच्या लोकांनी जीव खाल्ला. अगदी आमच्या आर्थिक परिस्थिती पासुन मुलीच्या आय क्यु पर्यंत अनंत तर्क लढवले.सुरवातीला या सगळ्यांना खरमरीत उत्तरे दिली पण आताशा फक्त हसुन सोडुन देतो, ह्यालोकांशी वाद घालण्यात अर्थ नाही हे अनुभवांती समजले.

शाळांची परिस्थिती इ>>>> मुलीला शाळेत घालताना शाळा घरा जवळ असावी हा ही आमचा क्रायटेरीया होता पण घराजवळच्या शाळांची अवस्था भयानक होती, तिथल्या शिक्षकांचं मराठी ऐकुन मी जवळच्या शाळेचा हट्ट सोडुन लेकीला दादरच्या बालमोहन विद्यामंदिर मध्ये घातलं. ही एक शाळा अजुनही स्वतःचा लौकीक राखून आहे. बालवर्गात साधारण वर्षभर त्यांना फोनिक्स इंग्लिश शिकवल होतं, त्या बेसवर लेक बर्‍यापैकी इंग्रजी वाचते (सध्या मुव्हीच्या खाली येणारी सबटायटल वाचून, मुव्ही समजण्याचे तिचे प्रयत्न चालू आहेत), मी व तिचा बाबा बर्‍याचदा तिच्याशी इंग्रजीमध्ये बोलतो त्यामुळे बोलते ही छान.
मातृभाषेत शिकण्याचा सगळ्यात मोठा फायदा हा की शिकवलेल्या कविता तिला छान समजतात त्यामुळे तिला पाठांतर करावे लागत नाही. छान छान पुस्तक वाचायला आवडतात तिला. आणि तिच्याकडे तिच्या उद्योगांसाठी भरपूर वेळ असतो. नो ट्युशन आणि झटपट अभ्यास Happy

आम्ही अमेरिकेत आलो तेव्हा सानिका दिड वर्षाची होती,नुकतीच बोलायला सुरवात केली होती.तिला त्यावेळी खूप बालगीते ऐकवली/दाखवली.तिला ती आवडायची,ती म्हणायची.त्यानंतर ही घरात मराठीतूनच बरचसं संभाषण होत असल्याने बोलण्यासाठी जास्त मेहेनत घ्यावी लगली नाही.सानिका मराठीत बर्यापैकी व्यवस्थीत बोलू शकते.गेल्या वर्षीपासून मराठी अक्षर ओळख चालू केली आहे.सध्याच नॉर्थ कॅरोलायनात राहायला आलोत.इथे दर रविवारी मराठी शाळा भरते. चार वर्ग आहेत.तिथे जायला सुरवात केल्यापासून मराठीच्या आभ्यासाला वेग आलाय.ती मराठी उच्चार मात्र स्पष्ट आहेत.याच कारण हे असेल की लहान्पणापासून ती काही संस्कॄत श्लोक म्हणत आली आहे.
शाळेत जायला सुरवात झाली तसे ईग्रजी ही रुळले. मित्रमंडळात फार मराठी नव्हते (हिंदी भाषिक जास्त)तरीही एखदा मराठी मित्र/मैत्रीण दिसले की तो/ती पण मराठीत बोलते म्हणून ही खूष व्हायची, आणि मुद्दाम तिच्याशी मराठीतून बोलायची.
खरं सांगायचं तर लहान वयात कोणतीही भाषा मुल लवकर आत्मसात करतं.इथल्या शाळेतही अनेक देशातून आलेली मुलं आहेत.शिक्षकही मुलाला दुसरी भाषाही येते म्हणून कौतुक करतात.मायबोली च्या मराठी भाषा स्पर्धे मुळे आणखी प्रोत्साहन मिळाल.आणि स्वतःहून गाणी म्हणणं आवडू लागलं.
तिच्यासाठी नवनीत ची छोटी पुस्तके ,अक्षरलिपी आणलीये .ती तिला आवडतात.मराठीतून गोष्ट ऐकायलाही आवडते.स्वतःचं नाव मराठीतून लिहीता आलं त्या दिवशी ती प्रचंड खूष झाली होती. त्यानंतर आठवडाभर शाळेतल्या प्रत्येक वर्कशीट वर नावाच्या ठिकाणी मराठीतून नाव लिहीत होती Happy आता मराठीतून पत्र लिहून तिला आजी-आजोबांना चकीत करायचय.
घरी सण वार फक्त मराठीच नव्हे तर सर्वच देशी/विदेशी थोड्याप्रमाणात साजरे करतोच.तिला चालीरितींची ओळख व्हावी, का करतो ते ही समजावं म्हणून.
सध्यातरी तिला भाषा समजणं ,तिने ती नीट वापरणं ह्यावर जास्त भर देतोय.

छान आहे विषय. वर लिहिलेल्यांपैकी परदेशात राहणार्‍यांसारखेच माझेही अनुभव आहेत. मागे कुठेतरी दाद ने लिहिल्याप्रमाणे, बीज रुजणार आहे की नाही त्याचा विचार न करता जमेल तेवढं रोवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणखी विस्ताराने लिहीन लवकरच.

? आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­

ऊ. माझ्या मुलिंची वयं ६ आणि ऑल्मोस्ट ९ आहेत. बोललेलं सगळं समजतं पण साधं सोप्पंच. इथल्या बाकीच्या मराठी मुलांशी संवाद त्या इंग्रजीमधूनच करतात.

? तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.

उ. खरं सांगायचं तर मराठी यावं म्हणून मी खास काही प्रयत्न करत नाही. उच्चार स्पष्ट व्हावेत म्हणून थोडे श्लोक म्हणवून घेते आहे सध्या(म्हणजे गेले २-३ आठवडे फक्त). पण ते केवळ तिने बोललेलं (इंग्लिश)दुसर्‍याला समजेल इतकं क्लीयर असावं म्हणूनच.

? मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?

आजीआजोबांशी बोलण्यावरून आमच्याकडे झक्काझक्की असते. ते इथे असतात तेव्हा एकदमच चांगलं जमतं. कोणत्या भाषेत बोलायचं ह्यावर फार काही कटकटी होत नाहीत. पण फोनवर त्या बोलाय्लाच तयार नसतात. त्यातून मराठी तर नाहीच. मग आम्हला इंटर्प्रीटर गिरी करायचा उत्साह असेल तर संवाद होतो. कारण आजीआजोबांना इंग्लिश कळत असलं तरी यांचा अ‍ॅक्सेंट नाही समजत.
पण जेव्हा जेव्हा महिनाभर इंडिया ट्रीप होते किंवा आजीआजोबा इथे येतात तेव्हा त्य चुरुचुरु मराठी बोलायला लागतात.

? मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?

उ. खूप गरज नाही वाटत. आम्ही बोललेलं समजलं तरी खूप झालं. कधिकधी वाटतं की स्पॅनिश बोलता आलं तर जास्त उपयोग होईल Happy

?लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?

उ. मी वाचून दाखवली तर मनोरंजन होईल.पण पूर्वी आणलेल्या vcd त्यांनी पाहिलेल्या आणि आवडलेल्या पण(जिंगल्ट्युन्स)

? परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?

उ. ह्यावर स्वातीचा प्रतिसाद कॉपीच करायला हवा. सणांविषयी माहिती असण्यापेक्षा मला स्वत:ला त्यांना आपले पदार्थ आवडलेले जास्ती आवडेल. कालच मोठीने धाकटीला मदत करण्याच्या बोलीवर तिला लग्गेच खीर करून दिली होती.
काल लिहायला विसरले ते म्हणजे गेले ३ वर्ष घरी १० दिवस गणपती बसवणे चालू केले आहे. त्यामुळे अंगात खास मराठीपण उतरेल की नाही ते माहित नाही पण रोज आरती म्हणल्याने १०व्या दिअवसापर्यंत बरीच पाठ झालेली असते. घरात ३०-३५ लोक जेवायला असतात त्यामुळे होणारा धांगड्धिंगा त्यांना आवडतो.

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­

आमच्या मुली साडेसहा आणि अडीच वर्षे वयाच्या आहेत. दोघींना मराठी बोलता येतं आणि समजतं. मोठी मुलगी आता शाळेत जाते त्यामुळे तिचं मराठी खुप बदलु लागलय हे खेदाने नमुद करावेसे वाटते! मागच्या वर्षापर्यंत ती खुप छान ९०-९५% मराठी बोलायची पण आता ती मराठीतही अनेक इंग्रजी शब्द पेरते! 'आई मी हे finish केलं' 'मला तुझ्याजवळ झोपायचं feel होतं आहे!' असं काहीतरी बोलते! आम्ही अनेकवेळा तेच वाक्य मराठीत बोलुन तिला विचारतो उदा. 'तुला माझ्याजवळ झोपावसं वाटतय का?' किमान तिच्या कानावर मराठी पडावं असा आमचा हेतु असतो!

लहानीशी बोलताना मोठीने मराठीतच बोलावं असा अलिखित नियम आहे!
मुलींचे काका पण इथेच असतात. त्यांच्या दोन मुली १५ आणि ३ वर्षे वयाच्या आहेत. मोठी मुलगी १० व. होईपर्यंत भारतात होती. ती बरच मराठी बोलते. तिच्याशी आमच्या मुली मराठीत बोलतात आणि त्यांच्या लहानीशी इंग्रजीत! एकत्र आल्यावर मराठीतच बोलायचे असे आम्ही सांगत असतो पण......

माझ्या दोन मैत्रीणी अलिकडेच भारतात कायमच्या गेल्या. त्या असेपर्यंत मुलांच्या मराठी बोलण्याला चांगलाच हातभार लागत होता! आजुबाजुला बोटावर मोजण्याईतके भारतीय आहेत त्यात ते तमिळ/केरळी आहेत. त्यांच्याशी इंग्रजीतच बोलावे लागते. हिंदीही येत नाही त्यांना! Sad

तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.

अजुन मराठी भाषा लिहा/वाचायला शिकवले नाही!

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?

मराठी चॅनल्सवरची भाषा ऐकुन घरी केबल/डीश घ्यायचे कटाक्षाने टाळतो आहोत! भयंकर बोलतात ती लोकं! (वर झक्कींनी लिहीले आहेच!) मराठी पुस्तके मात्र वाचुन दाखवतो आणि ती त्यांना आवडतात पण! लहान मुलांच्या मराठी डीव्हीडी मोठ्या मुलीने खुप बघितल्या आहेत. लहानी फार बघत नाही. 'गाढवाचं लगीन' सारखी वगनाट्य मोठीला आवडतात. कदाचित अ‍ॅक्शनपॅक्ड असल्याने असेल पण ती बघते.
मुलींचे वडील मराठी-इंग्रजी ऑनलाईन शब्दकोषाचे काम करताहेत. तसेच ते विकीवर मराठीतुन लिहीतात अधुनमधुन. त्या चर्चा सुरु असल्या की आपोआपच थोरली त्याबद्दल विचारते. याचाही आम्हाला त्यांची मराठीची रुची वाढवण्यासाठी उपयोग होतो.

तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?

अजुन मराठी शाळा नाहीये इथे. हिंदी शिकवण्याचा मानस आहे. जेणेकरुन देवनागरी अक्षरओळख होईल!

लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
हो!

परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?

नक्कीच! मागच्या वर्षापासुन गणपति बसवायला लागलो आहोत. त्याआधी मित्रांकडे जायचो. एकदा शाळेतुन येतांना रस्त्यात एका घरातुन फायर प्लेसमध्ये जळत असलेल्या लाकडाचा वास येत होता. त्या लोकांनी जळणात बहुदा काहीतरी सुवासिक (उदबत्तीसारखे) टाकले असावे. मोठी मुलगी म्हणाली, 'आई गणपतिसारखा वास येतोय ना? आपण आता गणपति बसवणार आहोत ना?' आरती म्हणताना मुलींना खुप मजा येते. दिवाळी/रांगोळी/पुरणपोळी/श्रीखंड-पुरी आवडते. मला वाटत हे मराठीपणच आहे!

मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण करण्यात/जोपासण्यात मायबोलीचा फार मोठा वाटा आहे! मुलींना इथे प्रकाशित होणार्‍या बालकविता आवर्जुन वाचुन दाखवते. मोठी मुलगी मधुन मधुन विचारते की नवीन काही आलयं का मुलांसाठी?

इथल्या वातावरणात त्यांची मराठीची गोडी टिकवुन ठेवणे फारच आव्हानात्मक आहे. पण आम्ही घरात मराठी वातावरणच ठेवण्याचा (जेवण, बोलण, वाचन, रहाणीमान) प्रयत्न करत रहाणार!

संयोजकांना एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की, चर्चेचा फॉरमॅट फारच आवडला. सर्व प्रश्न दिले असल्याने, मुद्देसुद उत्तरं येताहेत. आम्हाला लिहायलाही सोपं पडतं (जास्त डोकं चालवावं लागत नसल्यानं आमच्यासारख्यांचं फावतं). Happy धन्यवाद.

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­

माझा मुलगा ८ वर्षांचा आहे .. अगदी अस्खलित वगैरे नाही पण तो घरी आमच्याशी, इकडच्या (अमेरिकेतल्या) (आमच्या) मित्र-मंडळींशी त्याला येतं तेव्हढ्या मराठीत संवाद साधतो .. लिहीता, वाचता येत नाही .. बर्‍याच वेळा बोलण्यात काही नविन, अर्थ आठवत नसलेला शब्द आला तर त्याचा अर्थ विचारतो .. पण त्याच्या मित्र-मैत्रिणींशी मात्र तो इंग्रजीतूनच बोलतो .. त्यातले काही मराठी बोलणारे आहेत पण आपांपसांत मात्र ते इंग्रजीतूनच बोलतात ..

तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा

खास प्रयत्न काहीच नाही .. घरी शक्य तितका संवाद मराठीतून करतो .. आणि बरेच मित्र-मैत्रिणी (आमचे) मराठी असल्यामुळे एकत्र जमल्यावर मराठीतूनच बोलणं होतं ..

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?

माझ्याबरोबर कधी कधी तो मराठी नाटक, सिनेमे बघतो .. त्यातल काहीबाही त्याला आवडतं जसं की 'चार दिवस प्रेमाचे' हे नाटक त्याला त्यातल्या पोरकट(?) विनोदांमुळे आवडलं .. राजा शिवछत्रपती ही मनमोहन देसाईंची मालिका त्याने आमच्याबरोबर DVD वर बघितली .. लवून मुजरा करणे, घोडे, तलवार इ. प्रकार त्याला आवडले .. त्याला गाण्याची थोडीफार आवड आहे त्यामुळे आमच्याबरोबर मराठी गाणी ऐकतो, त्यातली काही गुणगुणण्याचा प्रयत्न करतो ..

मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?

इथल्या, भारतातल्या नातेवाईक, मित्र-मडळींबरोबर त्याचा संपर्क असावा इतपत मराठी तरी तो नेहेमी बोलेल अशी इच्छा आहे .. त्यासाठी आम्ही (त्याचे आई-बाबा) आमचं मराठीपण शक्य तितकं जतन करू .. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची कालानुरूप थोडीफार माहिती त्याला असावी अशीही इच्छा आहे ..

परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?

उतरत असणारच .. इकडे रहात असल्यामुळे आम्ही जमतो तसा ख्रिसमस साजरा करतो तसंच आपले भारतीय, मराठी सणवार, परत एकदा कालानुरूप, साजरे केले तर चांगलंच .. अर्थात सणवार साजरे करणं ह्यापासून स्वाती म्हणते तसं लांब गेलो आहोत पण जेव्हढं शक्य आहे, इच्छा आहे तेव्हढं करायलाच हवं असं वाटतं .. त्याच्यावर कसली सक्ती नाही पण सहजरित्या मराठीपण उतरत असेल तर आम्हाला ते आवडेलच .. Happy

मुलगी ७ वर्षाची आहे. मराठी संपूर्ण समजत. पण लिहिता,वाचता येत नाही. मुळाक्षरांची ओळख करुन दिली आहे. बोलता साधारण १० मोडक्या तोडक्या वाक्यांच्या पलिकडे येत नाही. त्यातही तीची आवडती वाक्य
मी चतुर आहे . डॅडा , वेडा आहे. अशी आहेत. Proud
तसच बोलताना चूका होतील होतील या भितीनेही ती बोलत नाही .

आम्ही एक चूक केली ज्यामूळे अजुनही मला पश्चाताप होतो ती लिहिते.
मुलगी दिड वर्षा पर्यंत घरी होती. मराठी उत्तम समजत होते. बोलताही येत होते. नंतर ती डे केअर मध्ये जायला लागली. ती छान रुळलीही तिथे. पण डे केअर मधून "सुचना समजत नाहीत", उत्तर काय देते समजत नाही वगैरे कन्सर्नस येवू लागले. अर्थात मी आणि तिच्या डॅडने थोडस पॅनिक होउन ताबडतोब तिच्याशी इंग्रजी मधून संवाद साधायला सुरुवात केली. परिणाम असा झाला कि ती हळुहळु ती मराठी विसरत गेली आणि फक्त इंग्रजी बोलू लागली. थोड पॅनिक न होता आम्हाला सुवर्णमध्य काढता आला असता जे जमल नाही.

हल्ली मीच तिला मराठी घरी शिकविते.सध्या बाराखडी सुरु केली आहे. मराठी क्लास होता. परंतु आमच्या एरियात रिस्पॉन्स न मिळाल्याने बंद पडला. अजून दोन मराठी क्लास आहेत. पण अनुभव नाही.
आता पुढच्या फॉल पासून मीच घरात क्लास सुरु करावेत असा विचार करीत आहे. बघू कस काय जमतय.

आमचे मराठी मित्र मैत्रिणी फारसे नाहीत. साउथ इंडियन जास्त. त्यामूळ त्यांच्याशी इंग्रजी मध्येच बोलते.

मुलीला मराठी नीट बोलता येत नाही याच स्पष्टच सांगायच झाल तर मला खूप वाईट वाटत. प्रामुख्याने आजी आजोबांशी फोनवर संवाद साधताना तिला खुप काही सांगायच असत परंतु ते बर्‍याचदा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मुलीला भाषा शिकायला आवडत अस तिच्या स्पॅनिश भाषेतील प्रगती वरुन माझ्या लक्षात आलयं.

मराठी गोष्टींमध्ये "मारणे" वगैरे असेल तर तिला आवडत नाहीत. पण मराठी कविता खुप आवडतात. मराठी कार्यक्रम विनोदी असला कि ती आवडीने पहायची. पण त्यातला विनोद कितपत समजत होता याचा मला संशय आहे. Happy

सणवार , मुख्य्त्वेकरुन 'गणपती' तिच्यासाठी बसवायला सुरुवात केली. तिला आरत्या (इंग्रजी अ‍ॅक्सेंट मध्ये) छान म्हणता येतात. एकुणच भारतीय संस्कृतीच खुप आकर्षण आहे. रांगोळ्या घालणे , फुलांच्या माळा तयार करणे , वाती बनवणे, तोरण लावणे, देवाभोवती सजावट करणे इत्यादी गोष्टी अतिशय आवडत्या आहेत. शुभंकरोती म्हणायला खुप आवडत. तिच रोजच खाण संपुर्ण भारतीय नसल तरी , सणावाराचे खाणे ,पुरी , करंजी इत्यादी पदार्थ आवडतात.

एकुणच 'संस्कृती' वगैरे पाळायची म्हणुन नव्हे तर एक उत्तम भाषा म्हणुन मराठी तिने आत्मसात करावी अस मला वाटत.

अगदी माझ्या जिव्हाळ्याचा विषय.

माझा मुलगा अडीच वर्षांचा असताना आम्ही गुजराथला गेलो. घरात मराठी (आणि केवळ मराठीच) बोललं जातं. त्यामुळे बोली भाषेचा प्रश्न नव्हता. मुलाला (नाईलाजास्तव इंग्रजी माध्यमाच्या) शाळेत घातल्यावर बोली भाषेव्यतिरिक्‍त मराठीशी त्याचा हळूहळू संबंध तुटत चाललाय हे माझ्या लक्षात यायला लागलं. मग मी दरवर्षी पुण्यातून त्याच्यासाठी त्या-त्या इयत्तेची बालभारतीची पुस्तकं न्यायला सुरूवात केली. गोष्टीच्या पुस्तकांसारखी रोज ती त्याला शेजारी बसवून वाचून दाखवायचे. शाळेत हिंदी मुळाक्षरं आणि सोपे शब्द तो शिकत होताच. त्यामुळे अक्षरओळख होत होतीच. शिवाय विकास प्रकाशनाची जी जी मराठी गोष्टींची पुस्तकं तेव्हा बाजारात उपलब्ध होती ती सगळी मी विकत घेतली होती. पुण्यात तेव्हा ‘सकाळ’ची ‘बालमित्र’ नावाची एक पुरवणी यायची, दर शुक्रवारी. माझ्या सासूबाई त्या सगळ्या पुरवण्या जपून ठेवायच्या; सुट्टीत आम्ही पुण्याला आलो की तो गठ्ठा त्याच्यासमोर ठेवायच्या. पुढचे किमान चार दिवसतरी तो त्या गठ्ठ्यात हरवून गेलेला असायचा. माझ्या सासूबाई पूर्वी बालवाडी चालवायच्या. तेव्हाची अनेक गाणी, बडबडगीतं त्यांच्याकडून ऐकून त्याला तोंडपाठ होती.

मुलगा साधारण चौथी-पाचवीत गेल्यावर मी त्याला दिवाळी अंकातले त्याला रुचीपूर्ण वाटतील असे लेख वाचून दाखवायचे. उदा. - वन्यजीवनावरचे अनिल अवचट यांचे लेख. ‘संभाजी’ कादंबरीचा एक मोठा भाग एका वर्षीच्या साप्ताहिक सकाळच्या दिवाळी अंकात आला होता. रोज थोडं थोडं करून मी त्याला तो सगळा वाचून दाखवला होता.
त्याच्यासाठी ३-४ वर्षं ‘किशोर’ अंकाची वर्गणी भरली होती. त्यातल्या शेवटच्या पानावरचं चित्र-शब्दकोडं आम्ही मिळून सोडवायचो.
‘एका रानवेड्याची शोधयात्रा’, ‘बोक्या सातबंडे’चे सगळे भाग - ही त्याच्यासाठी विकत घेतलेली पहिली ‘पुस्तकं’ म्हणता येतील अशी. त्यानं वाचली नाहीत तर सगळी त्याला वाचून दाखवायची असं मी ठरवलं होतं. पण ‘ए.रा.शो.’चं पहिलं प्रकरण वाचून दाखवल्यावर त्यानं आपणहून उरलेलं पुस्तक वाचून काढलं. तिथे मी पहिलं ‘हुश्श!’ केलं.
अनिल अवचटांची ‘सृष्टीत गोष्टीत’ आणि ‘वनात जनात’ ही पुस्तकंही त्याला खूप आवडायची.

त्याच दरम्यान कधीतरी गुजराथमधे मराठी च्यानलं दिसायला सुरूवात झाली होती. त्यामुळे ते मराठीही त्याच्या कानावर पडायला लागलं. (तेव्हा कळलं काहीही नव्हतं, पण ‘पिंपळपान’ ही मालिका त्याला अजूनही आठवते.)

त्यापुढचा टप्पा अर्थातच पु.लं.च्या सीड्या. (त्याबद्दल मी पूर्वी लिहिलेलंच आहे. http://www.maayboli.com/node/5208) पु.लं.ची विनोदपध्दती ऐकून ऐकून डोक्यात भिनल्यावर त्यांची माझ्याकडची काही पुस्तकं त्यानं वाचून काढली.
दोन वर्षांपूर्वी मी त्याला ‘किमयागार’ (त्याला विज्ञानाची अतिशय आवड आहे.) आणि ‘शाळा’ ही पुस्तकं आणून दिली. ठाण्यातल्या साहित्य संमेलनाच्या पुस्तक प्रदर्शनाला त्याला घेऊन गेले.

या सगळ्यात एक झालं मात्र - आईनं पुस्तकं आणून द्यायची आणि आपण ती वाचायची अशी त्याला सवय लागली. महाराष्ट्रात आल्यावर मी अगदी असोशीनं त्याच्यासाठी लायब्ररी लावली. पण तिथे जाऊन पुस्तकं शोधून आणण्याचा तो कंटाळा करायला लागला. यावर अजून मला उपाय सापडलेला नाही. Sad (आणि सापडला तरी आता तो अमलात आणण्याच्या वयाच्या पलिकडे गेलाय तो!)

गुजराथ सोडून महाराष्ट्रात परतल्यावर माझा भर होता तो म्हणजे त्याला चांगले-चांगले मराठी सिनेमे, नाटकं आणि अन्य लाईव्ह कार्यक्रम दाखवणे यावर. थिएटरमधे जाऊन मराठी सिनेमा पाहणे या गोष्टीनं तो इतका एक्साईट झालेला होता की विचारता सोय नाही. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील व्याख्यानमाला, ‘मराठी बाणा’, बालगंधर्वसारखे कार्यक्रम (http://www.maayboli.com/node/27296) हे ही दाखवून झालं.

सणवार, देवधर्म, कुळाचार यांचं प्रमाण मुळात आमच्या घरातच नगण्य आहे. वर कुणीतरी लिहिलंय त्याप्रमाणे ते-ते पदार्थ करून खाणे यापलिकडे जवळपास नाहीच. त्यामुळे मराठीपणाशी ओळख आणि सणवार यांचा त्याच्या वाढीत फारसा वाटा नव्हता. (उलट महाराष्ट्रात परतल्यावर तो गुजराथची ‘नवरात्री’ मिस करतो खूप :फिदी:)
उच्चार सुधारण्याच्या दृष्टीनं त्याला रामरक्षा आणि अथर्वशीर्ष मात्र मी लहान वयातच तोंडपाठ म्हणायला शिकवलं होतं.

मराठी भाषेत मुलांसाठी चांगली पुस्तकं अगदी थोडी आहेत. पण जी आहेत त्याचा पुरेपूर वापर करून घेतला तरी मुलांच्या वाढीच्या सुरूवातीच्या टप्प्यात तेवढं बास आहे असा माझा अनुभव आहे.

# आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­ मुलगा आता साडे-चार वर्षाचा आहे. मराठी बोलता येत नाही. कळते बरेचसे. काही काही शब्द हटकुन मराठी (लागलं, पाणी, वाटी) बोलतो. संदर्भ माहिती असेल किंवा टोनवरुन मोठी मोठी वाक्य बोललेली कळतात. ग्रॉसरीच्या पिशव्या बघत 'ह्या मिरच्या नको होत्या, मोठ्या भज्यांच्या मिरच्या हव्या होत्या' म्हंटलं की 'डॅडी यु गॉट समथिंग राँग' सांगता येतं Happy

# तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा. :-
दोन-अडीच वर्षाचा होता तोपर्यंत मराठी बोलत होता. मी मराठीतुन बोलायचे. डॅडी थोडं थोडं हिंदी, मराठी आणि इंग्रजी बोलायचा. ह्या वयातल्या इतर मुलांप्रमाणे त्याला पण घरी/शाळेत भाषा बदलायला कधी काही त्रास झाला नाही. नंतर कधी तरी आमच्याकडुनच रुळ बदलला गेला. आता पुन्हा त्याच्याशी मराठी बोलायला सुरुवाते केली आहे. आता मोठा झालाय त्यामुळे त्याला ' भाषा' म्हणजे काय, इंग्रजी/मराठी/स्पॅनिश ह्या भाषा आहेत हे सांगता येतय, त्याला ते समजतं आहे. त्यामुळे शिकवणे सोपे जातेय.

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते? :
सुरुवातीला त्याला मराठी गाणी इ च्या सीडी आणल्या होत्या. पण एक तर इथल्या मानाने आपल्याकडचे अ‍ॅनिमेशन किंवा एकूण चित्रपट वगैरे फार बाळबोध आहे. त्याला आता अजिबात इंटरेस्ट येत नाही बघायला. भारतीय पुराणकथा मलाच त्याने ऐकाव्या अशी इच्छा नाही. पुस्तकं बरीच आहेत लहान मुलांची. ती अधुन मधुन वाचून (भाषांतर करत) दाखवते.

तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
: इथे आहेत शाळा. पण आठवड्याचे पाच दिवस तो ८ तासांपेक्षा जास्त घराबाहेर असतो. त्यात अजून शनिवार-रविवार पण त्याच्या खनपटीला बसायची इच्छा नाही.

मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
: सध्या तरी मराठीत बोलते, इंग्रजी शब्दांना मराठी प्रतीशब्द (?) सांगते. त्याला ळ, ण आणि ज्ञ हे शिकवणे मला महत्वाचे वाटते. एकदा त्याच्या जिभेला वळण लागले की तो जन्मभर ज्ञानेश्वरांना ग्यानेश्वर म्हणेल Wink तेव्हा त्याचा सराव करवुन घेते.

मराठी शिकवावे वाटते ते केवळ आजी-आजोबांना त्याच्याशी संवाद साधणे सोपे जावे म्हणून. सध्या ते बिचारे जमतील तशा इंग्रजीत त्याच्याशी बोलतात.

आणि मराठी त्याची 'मातृ'भाषा आहे Wink आम्हाला फक्त मराठी शिकुन चालणार नाहीये. 'पितृ'भाषा पण आहेच शिकायची. अर्थात तो कितपत रस घेतो त्यावर सगळे अवलंबुन आहे. नुसतेच बोलायला जमले, मराठीत लिहिणार/ वाचणार नाही म्हंटला तर आग्रह धरणार नाही.

लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का? : वर लिहिल्याप्रमाणे गोष्टींचे विषय, मांडणी, चित्र, छपाई-कागद इ बाळबोध वाटते इथल्या मानाने.

परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?: सणवार म्हणजे खायला पुरी आणि खेळायला फचिनमामा एवढेच कळते सध्या Happy

आम्हाला फक्त मराठी शिकुन चालणार नाहीये. 'पितृ'भाषा पण आहेच शिकायची.>>>> Happy
इकडे मायबोलीवर असे बरेच जण आहेत, त्यामुळे त्या दुसर्‍या मातृ किंवा पितृ भाषेची गोडी वाढवण्यासाठी दुसरी बाजू काय आणि कसे प्रयत्न करते हेही वाचायला आवडेल. Happy

सणवार म्हणजे खायला पुरी आणि खेळायला फचिनमामा एवढेच कळते सध्या>>> Lol

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? ­
तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता?
मुलगी जवळजवळ नऊ वर्षाची आहे. (जन्मापासून तोक्यो मधेच आहे) घरात मराठीच बोललं जातं. त्यामुळे ती पण स्वच्छ मराठीच बोलते. सुरुवातीला घरात बोलताना तिनी मराठीतच बोलावं, इतर शब्दांची सरमिसळ वाक्यात करु नये ह्याकडे लक्ष द्यावं लागायचं, किंवा अधुन मधुन टोकावं लागायचं.
शाळेत हिंदी असल्यामुळे पाचव्या वर्षापासून देवनागरी येतं. त्यामुळे मराठी वाचते. मुळात वाचनाची मनापासून आवड असल्यामुळे इंग्रजी पुस्तकांच्या बरोबरीनीच भरपूर मराठी वाचन करते. (नवीन पुस्तक नसेल तर तीच तीच पुस्तकं ती परत परत वाचते) मुख्यत्वेकरुन "बोक्या सातबंडे", "चिंटू" आणि "फास्टर फेणे". पण रैना म्हणाली तसं ज्योत्स्ना प्रकाशनच्या पुस्तकांनी तिला आधी मराठी वाचायची गोडी लावली आणि ह्या सगळ्याच पुस्तकांनी तिला ती यशस्वीपणे टिकवुन ठेवता आल्ये.

मी मराठी माध्यमात शिकलेली असल्यामुळे बर्‍याचदा माझ्या तोंडात तिला गणितं समजावुन सांगताना मराठी आकडे, पाढे आणि भागाकार, बाकी, हातचा वगैरे असे शब्द येतात. (सुरुवातीला अनावधानानी यायचे आता तिला पण सवय झाली त्याची)

मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?
इथे तोक्योमधे जे काही मराठी मित्रमंडळ आहे त्यांच्याशी ती स्वत:हून मराठीतच बोलते. पण तशी संधी फारशी येत नाही. मित्रमंडळात असताना इंग्रजी/हिंदी/जपानी असंच बोललं जातं.

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?

"बालमित्र" सारख्या पुरवण्या पुण्यात आजीनी जपून ठेवलेल्या असतात. त्याचा उपयोग तिकडे गेल्यावर सुट्टीत होतो वाचायला. "चिंटू" वाचायच्या निमित्तानी "सकाळ" हातात घेते आणि मग मामेभावंडाबरोबर क्रिकेटच्या बातम्या वाचते फक्त Proud
लहान असताना "जिंगलटुन्स" च्या सिडीज बघायची. "नक्षत्रांचे देणे" मधल्या कुठल्याही सिडीज लावल्या तरी आपणहुन ती गाणी बघायची/ऐकायची.

महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?

वीकेंड स्कूल्सचा अनुभव नाही

लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?

वरती लिहिल्येत ती सगळीच पुस्तकं Happy

परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
सणवार म्हणजे फक्त गणपती, राखीपौर्णिमा आणि दिवाळी साजरी करतो. ललितानी म्हटल्याप्रमाणे मराठीपणाशी ओळख होण्यात त्याचा फारसा वाटा नाही.

Pages