बीज अंकुरे अंकुरे- मराठी भाषा दिवस २०१२

Submitted by संयोजक on 20 February, 2012 - 22:17

beej_ankure copy.jpg

मराठी भाषा दिवस २०१२ निमित्ताने थोडे मुद्द्याचे बोलुया?
इथे खाली दिलेल्या मुद्द्यांवर लिहिणे अपेक्षित आहे.

  • आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­
  • तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
  • मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
  • तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
  • महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
  • मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
  • लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
  • परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
  • प्रांजळ अनुभव लिहिणे अपेक्षित आहे. चांगले वाईट काही नाही. फक्त प्रांजळ अनुभव. कोणी काय करावे, काय करायला हवे होते,असे उपदेशपर कृपया लिहू नका. फक्त तुम्ही काय करता तेवढे लिहिणे अपेक्षित आहे.

* हा धागा संयोजकांकडून प्रशासित आहे हे कृपया लक्षात घ्या! दोषारोप न करता फक्त सद्य परिस्थिती कथन करणे आणि आपला मानस; एवढेच लिहावे ही विनंती आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­

मुलगा तिसरीत आणि मुलगी पहिलीत असताना भारताबाहेर आलो, तोवर त्यांच शिक्षण इंग्रजी माध्यामातुनच झालेलं असलं तरी, आजुबाजुला वावर मराठी बोलणा-यांचाच असल्यामुळे घरातही फक्त मराठीच बोलत असल्यामुळे उत्तम मराठी बोलता येतं. पुढेही बाहरेन आणि आता दुबई मधे घरातलं वातावरण बदललं नाही' नाही म्हणायला लेखन, वाचनावर थोडा परिणाम झाला. पण तरी दोघांपैकी एकाला मराठी वाचायची आवड आहे. लिहालाही येतं.
मुलं इतर मुलांशी मराठीत बोलण्यावरुन एक गोष्ट आवर्जुन सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे...इथेच जन्मल्या वाढलेल्या लहान चुलतभावाला या दोघांमुळे उत्तम मराठी बोलता समजायला- बोलता यायला लागलं .

तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
वेगळ काही करावं लागलं नाही. पण लहान असताना. मराठी पुस्तकं वाचून दाखवणं, कविता वाचून दाखवणं या गोष्टी केल्या.

इथे आवर्जून मायबोलीचा उल्लेख करावा लागेल. इथलं बरच काही त्यांना वाचता येतं Proud वाचायला आवडत Happy मराठीची गोडी लागण्याच कारण मायबोलीसुद्धा आहे.

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
मराठी मालिका, इतर कार्यक्रम वेगवेगळ्या कारणानी पाहिल्या जातात. कार्यक्रम नाटकांमधे फार रस घेत नाहीत. पण चित्रपट आवडतात. भारतात गेल्यावर शब्दांच्या भेंड्या हा हमखास खेळ आहे. मग आलटून-पालटून भाषा बदलून खेळला जातो. अजून तरी आवडतंय हे सगळ मुलांना

तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?

---
लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
सध्या काय पुस्तक मिळतात पाहिलेलं नाहिये त्यामुळे काही बोलता येणार नाही.
परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
सणांमुळे मराठीपण>> फक्त सणांमुळे मराठीपण असं ठामपणे म्हणता येणार नाही. फारतर त्या सणाची माहिती होत असेल.

माझी मुलगी ७ १ /२ वर्षाची आहे,ती वर अमरने उल्लेख केलेल्या शिशुभारती शाळेत जाते.तिला मराठी बोललेल उत्तम समजत,बोलण मात्र ऑन/ऑफ असत. म्हणजे बोलते पण्,दिवसातले बररेच तास ईंगजी कानावर पडते त्यामूळे तिला व्यक्त व्हायला ती भाषा आवडते.आम्ही अवाजवी आग्रह धरत नाही. आजी-आजोबांशी उत्तम संवाद मराठीतुन साधते.तिच्या अभ्यास्क्रमानुसार आता तिला अंक लिहता बोलता येतात.२ अक्षरी शब्द लिहता येते. तिच्या शाळेत कल्चर सुद्धा शिकवले जाते त्यामुळे तिला भारतिय सणवारांची बरिच माहित झालिये या वर्षी त्यांना महाभारत शिकायला आहे.
आम्ही तिच्याशी कायम मराठीतच बोलतो.आजु-बाजुला मित्र परिवार मराठी आहे
आवडते सण्-वार आम्ही साजरे करतो.
(पोस्ट अपुर्ण)

१. आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­

माझी मुलगी आता १० वर्षांची आहे आणि तिला उत्तम मराठी बोलता येते. मधे मधे इंग्रजी शब्द येतात पण ते तर तिच्या आईच्या बोलण्यात पण येतातच Proud
शाळेत मराठी किंवा इतर कुठच्या भाषेत बोलायला बंदी असल्याने तिथे इंग्रजी किंवा हिंदी बोलले जाते पण एरवी मराठी मुलांशी मराठीत बोलते.

२. तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता?

ती ५ वर्षांची असताना आम्ही अमेरिकेत होतो. तिथे गेलो तेव्हा ती सुरेख मराठी बोलत असे. पण तिला तिथे शाळेत त्रास होउ नये म्हणुन आम्ही तिच्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. ही आमची एक मोठी चूक झाली. त्यानंतर तिने एकदम मराठी बोलणं सोडुन दिलं. इतकच काय स्वप्नात पण इंग्रजीत बडबडू लागली. तेव्हा मात्र आम्ही तिच्याशी पुन्हा मराठीत बोलायला सुरु केलं. बर्‍याच प्रयत्नांनंतर ती पुन्हा मराठीत बोलु लागली, तेव्हा आमची एक भारत ट्रीप पण कामी आली. Happy नंतर तिथेही ती बर्‍यापैकी मराठीत बोलत असे. भारतात परतल्यावर तर प्रश्नच नाहिये. मैत्रिणी, नातेवाईक, टिव्ही मधुन तिचं मराठी आणि हिंदीपण बहरतय. Happy

३. तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.

माझ्या नवर्‍याची फार इच्छा होती की मुलीला मराठी शाळेत टाकावं पण त्याला माझा विरोध असल्याने ती इंग्रजी शाळेत शिकते. Proud

४. मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?

सकाळ बालमित्र तिने वाचावा असा मी आग्रह करते पण ती एकतेच असं नाही. मराठी चित्रपट, मालिका तिला आवडत नाहित पण नाटकं मात्र ती आवडीने पहाते.

५. लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?

तिला पुस्तक वाचायला फार आवडतं पण केव़ळ इंग्लिश. मराठी वाचायला फार कटकट करते. मी आणलेली मराठी पुस्तकं अशीच पडुन असतात. मी वाचुन दाखवली तर आवडतं पण स्वतः वाचायचं नसतं. मराठी गोष्टी ऐकायला मात्र फार आवडतं तिला. अजुनही रात्री गोष्ट सांगायचा हट्ट करते. Happy

६. परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?

नक्कीच. गणपती, दिवाळी, होळी, गुढीपाडवा साजरा करायला तिला फार आवडतं. रांगोळी काढणे, आरत्या म्हणणे तिला आवडते.

>>आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­ <<
हो येते चांगले येते. लिहिता/वाचता नाही येत, अंदाज लावते. इतरांशी ईंग्रजीच बोलते.
>>तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? <<
मुलीचा जन्म भारतातला(पुण्याचा). भारतात असताना आजीआजोबा कारणीभूत होते थोडेफार मराठीसाठी. खरे तर मीच मराठी नाहीये पण मुलीची नानी (माझी आई) इंदोरी मराठी बोलायची, नाना मूळ गुजराती पण पुण्यात राहिल्याने मराठी असे असल्याने तिला अर्धे मराठी/ अर्धे गुजराती बोली असे यायचे. बंगाली उत्तम बोलायची कारण पितृभाषा व दादा दादी कायम बरोबर. इथे अमीरीकेत आल्यावर पुर्वेकडच्या लोकांनी ताबा घेतला मग मी सावध झाले मग मी ई ना चोलबे करून मराठी शिकवायला घेतले पण माझेच मराठी धेडगुजरी(पुण्याचा प्रभाव म्हणा ) मग सोडून दिले.. अर्थात मी काही खास प्रयत्न नाही केला व शेवटी बंगालीने बुरुज काबीज केला कारण दादा दादी इथेच असल्याने. Proud सध्या काहीही विचारा मराठी/गुजरातीत, तिचे उत्तर ईंग्रजीत असते मूड नसला तर्(तिच्यामते मूड असेल तर मातृभाषा/पितृभाषा बोलते). आणि ९५% तिचा मूड उडाला असतो कुठेतरी.( ती मूड उडाला म्हणायची लहानपणी) Proud
ह्या निरिक्षणानंतर मुलांना ज्याच्यात गोडी असेल ती भाषा आपोआप शिकतात असे माझे मत पडले. Happy
आज तीला जबरदस्ती न करता माझ्या किमान इच्छा पुर्‍या झाल्यात. त्या ह्याच की तिला मराठी बरे, गुजराती बरे पण बंगाली उत्तम(ती तिच्या आजीकडून बांगला गीतं शिकते) असे येते. माझे मत होते की जर ती ईंग्रजी शिवाय परदेशातील दोन भाषा शिकते(चायनीज, स्पॅनीश) मग भारतातील भाषेने काय घोडे मारले... म्हणजेच शिकायला का जड जावे? मग मातृभाषा का नाही? किंवा पितृभाषा का नाही? तिने एकतरी भारतीय भाषा शिकावी ही माझी सुप्त इच्छा पुरी झालीय न सांगता.
तिला मराठी म्हणी मात्र आवडतात कारण त्याचा प्रयोग तिच्यावरच होतो मी रागात असले की,
जसे गाढवाला गूळाची चव काय(भारतीय जेवणाला तीने नाक मुरडले की), आधीच हौस त्यात पडला पाउस,कावळा बसला आणि फांदी तुटली,गाढवापुढे वाचली गीता....
ह्या सर्व म्हणींचा अर्थ कळतो ह्याचा मला एकदा साक्षात्कार झाला जेव्हा तिने तिच्या बाबावर प्रयोग केला, जेव्हा त्याने भोपळ्याच्या भाजीला नाक मुरडले व ती पटकन म्हणाली, मॉम युवर फेव म्हण.. गाढवाची... काय ते... (ती असे अर्धे मराठी/ईंग्रजी बोलते.. पण परत तो पुण्याचा(पूणे शहराचा जन्मजात) प्रभाव असावा असे समजून गोड मानून मी कौतूकाने बघते) Proud

>>तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा. <<
नाही.

>>मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते? <<
सुरुवातीला नानी पेपरातला बाकविभागातील जोक वाचून दाखवायची व मुलगी जोरात हसायची(वय वर्षे ३ असताना). मग स्वतःच पेपर आणून मला जोक वाचून दाखवा सांगायची. काय कळायचा ते माहीत नाही पण हसायची. कविता वाचून दाखवायला सांगायची पन बहुधा तो रंगीत बालविभाग बघून असेल व माझी आई कविता वाचन खूप छान करते लहान मुलांसाठी त्यामुळे लहानपणी मुलीला आवडत असेल पण आता काहीही मराठी वाचत नाही, बघत नाही.. गाणं मात्र आवडते ते गाण्याची आवड व बांगला गाणं शिकतेय म्हणून व मराठीतील भावंगीते तीला जवळची वाटतात, बाकी खास आवड नाही.
>>>>मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का? <<
वरती लिहिलेय की, जर परदेशी भाषा शिकावे असे वाटते तर मातॄभाषा का नाही जमणार? त्यात काय कठीण ह्या मताने मी तिला मराठी/गुजराती/बांगला शिकायला अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहीत केलेय जबरदस्ती न करता. ह्यात सहभाग नाना-नानी/दादा-दादींचा ज्यास्त आहे. तरी मी नकळत हे दाखवले की आपली भाषा येण्यात मजा हीच की ती तू कुठेही कोड भाषा म्हणून वापरु शकतेस.. ईंग्रजी काय कोणीही बोलते. Proud

>>लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का? <<
माहीती नाही.

>>परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का? <<
मराठीपण म्हणजे काय नक्की? मराठी खाणं, बोलणं म्हणजे मराठीपण?

सणाचा संबध अश्या कुठल्या एका गोष्टीवर अवलंबून नसतो/नसावा. गणपती गुजराती, मराठी, कन्नडा, बांगला सगळे आणतात. नवरात्र बांगला, मराठी, गुजराती सगळेच करतात. मग सणवाराचा व मराठीपणाचा काय संबध खरेच कळले नाही. घरी नवरात्रा जोरात चालते(बांगला प्रभाव), गरबा खेळतो, होळी खेळतो(इंदोरचा प्रभाव)...

मुलीला नटायला, सजायला आवडते, घरी लोकं आलेली आवडतात सण असल्याने म्हणा की अशीच तेव्हा सणाने हे वाढते असे वाटत नाही. सणवार फक्त खाद्यवार असतात तेव्हा त्याने काही परीणाम वगैरे होत नाही की तू मराठी आहेस, गुजराती आहेस ... तेव्हा मला हा सबंध चुकीचा वाटतो.

ही पोस्ट खास संयोजकांचे आभार मानण्यासाठी लिहित आहे. माझ्या आधीच्या पोस्टमध्ये मी लिहिले होते की शाळेत जायला लागल्यावर मुलाला केवळ इंग्लिश येत नसल्याने खूप कठीण गेले आणि मग त्याला इंग्लिशची सवय करण्याकरिता मी त्याच्याशी मुद्दाम इंग्लिशमधूनही बोलायला सुरुवात केली. ह्या चर्चेमुळे गेल्या वर्षात मला आत्तापर्यंत न जाणवलेली गोष्ट ह्या दोन दिवसांत जाणवतेय की हल्ली तो बहुतांशी इंग्लिशमधून बोलतोय, विचारही इंग्लिशमधून करतोय आणि माझ्याही नकळत त्याने इंग्लिशमधून विचारलेल्या प्रश्नांना मी ही बरेचदा इंग्लिशमधूनच उत्तरं देतेय. मराठी पुस्तकं अधूनमधून वाचून दाखवत असले तरी ह्या उपक्रमाच्या निमित्ताने जेव्हा मी त्याच्याकडून गोष्ट टेप करुन घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला मराठीतून गोष्ट सांगता येत नाहीये, विचार अडकतायंत हेही नव्यानेच लक्षात आलं.

परदेशातून राहायचं, भारतात राहिलो तरी मुलांना इंग्रजी माध्यमात घालायचं हे जर करायचंच असेल तर मला मराठीची जेवढी ओढ आहे तेवढी त्याला नसणार हे तर स्वीकारायलाच हवं. ते स्वाभाविकही आहे. आणि मराठी आलं नाही, त्याने इंग्लिशमधूनच विचार केला तर त्याचं नुकसान होणार आहे असंही नाही. मुद्दा फक्त भावनिक आहे. भाषा हे संवादाचं साधन आहे. मराठी त्याला यावं असं मला वाटतं ते केवळ त्याच्या आजी-आजोबांशी त्याला संवाद साधता यावा म्हणून आणि आम्ही/तो कुठेही राहिलो तरी भारतात गेल्यावर त्याला भाषेमुळे कधीच बुजल्यासारखं वाटू नये असंही मनापासून वाटतं म्हणून. ही गोष्ट वेळेवर लक्षात आली म्हणून बरं झालं. उद्या त्याला मराठीत बोलावसं नाही वाटलं तर त्याचं कारण आम्हीच प्रयत्न केले नाहीत हे असायला मला नकोय. हा सगळा विचार ह्या एका धाग्यामुळे झाला.
अमॄता, तुझ्या पोस्टने डोळे उघडण्याचंही काम केलं आणि दिलासा देण्याचंही. त्याबद्दल तुझेही आभार मानते Happy

१.आपल्या मुलांना मराठी लिहित वाचता, बोलता येतं का? असल्यास कितपत? मुलं इतर मराठी
मुलांशी मराठी बोलतात का?
- सध्या बाळ फ़क्त अडीच वर्षांचा आहे त्यामुळे काहीच लिहिता वाचता येत नाही. मराठी,कानडी,इंग्रजी,तुळू कळतं. हिंदी थोडं फ़ार समजतं.
- इतर मराठी मुलांशी बोलयची वेळ अजून आलेली नाही.

२.इंग्रजी माध्यम-
इथे मराठी (मातृभाषा) किंवा कानडी (पितृभाषा) यांची एकही बरी शाळा नसल्याने इंग्रजी माध्यमात घालणं क्रमप्राप्त आहे.नर्सरीपासूनच इंग्रजी,कानडी आणि हिंदी लिहायला शिकवतात त्यामुळे मराठी लिहिता येईलच. सध्या जिंगल्टुन्सवर मराठी,इंग्रजी आणि हिंदी गाणी ऐकून म्हणता येतात. स्मरणशक्ती तीव्र असल्याने एकदोनदा ऐकल्यावर गाणी ल़क्षात राहतात. बाळाने स्वत:च स्वत:ची भाषा कानडी आहे हे ठरवले आहे त्यामुळे कानडी बडबडगीते अधिक आवडीने पाहतो. तो लहान असल्यापासून त्याच्याशी सतत वेगवेगळी मराठी गाणी स्वत: रचून म्हटल्याने आत्ता तो ही एकदम मस्त मिश्र कवी झालाय. आईला मस्का लावायचा असेल तर आईविषयी तात्काळ गाणी रचून म्हणतो. ताजं उदाहरण ’आई बंतु आई,गोडगोड आई,लाल-लाल आई.” Happy
यातलं क्रियापद बहुदा कानडी असतं.

३. मराठी प्रसार माध्यमे आज्जी आजोबा इ.
माझे आईबाबा सध्या इथे १५ दिवस आलेत,त्यामुळे तर आता बरंच मराठी शिकलाय. तिकडच्या आजी-आजोबांना दोन्ही भाषा येतात,पण कानडि मुख्य. आता हळूहळू मराठी पुस्तकं आणायला हवीत.य धाग्यावर बर्‍याच चांगल्या कल्पना मिळाल्यात. सध्या प्रसारमाध्यम म्हणजे फ़क्त जिंगलटुन्स.

४. सण- वेळेच्या कमतरतेअभावी आम्ही घरी कुठलाच सण करीत नाही. तसंही सीमा भाग असल्याने जवळपास सगळे सण सारखेच आहेत. नवर्याला मराठी संस्कृतीची आवड असल्याने बाळ ५ वर्षांचा झाल्यावर गणपती बसवायचं ठरलं आहे.

मी सध्या सीमा भागात राहाते.सतत भाषेवरून इथल्या मराठी,कानडी आणि तेलगू राजकारणी लोकांच्यात भांडणे होत असतात. भाषेच्या आधारावरच महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्र हा भाग आपापल्या हद्दित ओढायला बघता. पण या भागाचि एक चमत्कारिक केमिस्ट्री झाली.बहुतेक सगळ्यांना या तिनही भाषा + हिंदी येतं. एकही भाषा शुद्ध येत नाही तरी सामान्यांचे सगळे व्यवहार नीट चालतात. त्यामुळे भाश्हेबबत जास्त आग्रही राहू नये असे वाटते. तरिही मला बाळाने एकतरी भाषा शुद्ध बोलावी असं वाटतं आणि ते फ़क्त इंग्रजीबद्दलच होईल अशी खात्री आहे. Happy
माझा बाळ एक वर्षाचा असल्यापासूनच त्याला प्ले होममध्ये घातलं होतं कारण आजूबाजूला मुलं नाहीत. पण दीड-दोन वर्षांचा झाला तरी काही बोलेच ना तो.आम्ही दोघं, नवरा कानडी असला तरी घरात मराठी बोलतो. त्याला सांभाळणार्‍या बाई तेलगू आणिबाकीच्या भाषाहि बर्यापैकी बोलणार्‍या होत्या. तो १ वर्षाचा झाल्यावर आमचं काम वाढल्याने आम्ही दोघं त्याला फारतर ३-४ तास वेळ देऊ शकायचो.तो ३ तास प्ले स्कुल आणि नंतर बराच वेळ शेजारच्या तुळु बोलणार्‍या कानडी आंटींकडे असायचा. यामुळे त्याने स्वतःच स्वतःची भाषा कानडी ठरवली. मग आम्हाला केव्हातरी कळलं की याला कानडीच नीट समजतं. मागचे ८ महिने आम्ही त्याला सांभाळायला कानडी बाई ठेवल्यात आणि आम्हीही कानडी बोलतोय याच्याशी म्हणून तो आमच्याशी सगळं मनातलं बोलायला लागलाय नाहीतर पहिल्यांदा खूप चिडचीड करायचा. आत्ता हा बेस वापरून त्याला इतर भाषा शिकवणं सोप्पं झालंय.
पण तरिही माझं बाळ मिश्र भाषा बोलणार हेच खरं. आणि सीमाभागात असल्याने हीच आता त्याच्या मातेची भाषा (मातृभाषा) झालीय हे त्याहून खरं. Happy

--आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­

माझी मुलगी सहा वर्षांची आहे. तिला मराठी बोलता येतं पण मूड लागला तरच! आताच्या राहण्याच्या ठिकाणी मराठी मित्रपरिवार लाभला आहे, मराठी मंडळातही जात आहोत. त्याचा परिणाम म्हणून की काय, पूर्वीपेक्षा जास्त वेळा हा मूड लागतो आहे. हा मोठाच फरक जाणवतो आहे. कधीतरी अचानक "काय काय, तुझ्या नाकात दोन पाय" ऐकवते. मित्रमैत्रिणींशी मात्र मराठी बोललेलं कधीच ऐकलं नाही.

--मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
तिला गोष्टी, गाणी, नाटकं सिनेमे आवडतात त्यामुळे ती मराठी, हिंदीही क्वचित अर्थ कळला नाही तरी पाहते, ऐकते. यूट्यूबवरच्या झी मराठी चॅनलची ती फॅन आहे. सारेगमप, फू बाई फू, अगदी आम्ही सारे खवय्ये सुध्दा! खरं तर पल्लवी जोशीच्या भयाण इं-मराठीमुळे तिला सारेगमप छान समजलं असावं!
मायबोलीवरच्या गणेशोत्सव आणि मभादि सारख्या उपक्रमांचा खूप मोठा फायदा होतो आहे. इतर मुलांचा सहभाग बघायला तिला आवडतं आणि म्हणूनच करावंसंही वाटतं.
आजी आजोबांना तिने मराठी बोलण्याची वाट बघत बसण्यापेक्षा इंग्लीशमध्ये का होईना, संवाद साधणं जास्त मोलाचं वाटतं.

--महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
सुरुवातीला मराठी शिकवणं हे काहीसं सक्तीने, काहीसं परदेशात राहतो आहोत ही बोच लागून केलं गेलं. त्यावेळी ती प्रीस्कूलमध्ये इंग्लीश आणि घरी शुध्द मराठी बोलत असे. पण एके दिवशी अचानक मराठी बोलणं बंद झालं. आमच्या सक्तीच्या जाचाने असेल, किंवा त्याच दरम्यान केजीत गेल्यावर मोठ्या शाळेचा अनुभव घेतल्यामुळे असेल, किंवा मराठी वातावरणाच्या अभावाने असेल, पण तिने काही काळ असहकार पुकारला. त्यानंतर, ही आपलीच आवड किंवा गरज आहे, तिची नव्हे, ती मोठेपणी यातलं काही स्वीकारणार नाही, अशा निराशेने आम्हीच ते काही काळ बंद ठेवलं. आता, तिने ते स्वीकारावं असा आग्रह न ठेवता, तिला केवळ एका, तिच्या नजरेत परक्या, संस्कृतीची ओळख जमेल तशी करून द्यावी असं ध्येय ठेवलं आहे. त्यामुळे आम्हाला जितकं पटतं, सहज स्वभावानुसार घडतं, तिला जितकं झेपतं, तसं आणि तितकंच करतो आहोत. हल्ली घरी मराठी लिहावाचायला शिकायला सुरुवात केली होतीच, आता इथल्या मराठी शाळेतही नुकतीच जायला लागली आहे.

--लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
तिला आवडतील अशी मराठी पुस्तकं मला अजून सापडली नाहीयेत. पूर्वी आवडत त्या प्राण्यापक्ष्यांच्या गोष्टींत आता तिला फारसा रस वाटत नाही. आणि थोड्या मोठ्या मुलांसाठीच्या गोष्टींतलं वातावरण समजत नाही किंवा मनोरंजक वाटत नाही.

--परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?पूजा, व्रतं, सण साजरे करण्याची आमची मानसिकता कधीच नव्हती. तरीही, तिला समजलंच पाहिजे म्हणून काही काळ रेटलं गेलं. खरं म्हणजे, सणवाराचं निमित्त साधून मित्रपरिवार एकत्र जमवणं इतकंच माझ्या हातून होतं आणि मग त्याला सणवारच का म्हणायचं ते मलाच ठाऊक नाही.

माझे थोडे विद्रोही विचार आहेत त्या बीज अंकुरेच्या बाबतीत .
मराठी ही काही माझ्या आईवडिलांची भाषा नाही. पण आम्ही वाढलो मराठी मुलुखात. तेंव्हा जाणीवपूर्वक आई मराठी शिकली अन तिने आम्हाला स्थानिक भाषा, सतत ऐकणार / वापरली जाणार म्हणून मराठी शाळेत घातलं. ती बेरजा, वजाबाक्या, पाढे हे सगळं मराठीतून परत शिकली अन अजूनही मराठीच वापरते.

आई वडिलांनी वाचनाची गोडी लावली तेंव्हा येत असलेल्या सर्व भाषांमधली वयानुरुप पुस्तके वाचायला लावली - हिंदी मराठी इंग्रजी तिन्ही भाषांमधली वर्तमानपत्रे नियतकालिके येत असत घरी. स्थानिक भाषेवर प्रभुत्व अन एकंदरीत भाषेकडे लक्ष देणे या दोन गोष्टींवर भर होता.

त्यामुळे मला तरी माझी भाषा म्हणून मुलांना मराठी शिकवण्यासाठी आटापिटा करावा असे वाटत नाही. मोठीला भाषेची आवड आहे, कल आहे, तिला रस असला तर ती शिकेल तिला हवे तेंव्हा. मी मराठी मुलुखात असते तर नक्कीच दोघांना मराठी शिकवलं असतं . बेंगळूरु/ हैदराबाद मधे असते तर स्वतः शिकून त्यांना स्थानिक भाषा शिकवल्या असत्या.

नातेवाईकांनी बोललेलं मराठी अन तेलुगु दोघांना कळतं. आजी आज पुरणपोळी करशील किंवा ' नानम्मा पेसरट्टू कावालि ' वगैरे म्हणायलाही जमतंय . तेवढ्या संभाषणापुरत्या दोन्हीकडच्या भाषा येतात.

इथे मुलांना स्थानिक भाषा अस्खलित यावी, त्यांनी प्रमाणभाषा बोलावी ( आय वॉज लाइक ओ एम जी वगैरे बोलू नये ) , भाषेची वेगवेगळी रुपं त्यांच्या परिचयाची व्हावीत, नाटके, कविता, आणि इतर साहित्य प्रकारांशी त्यांचा परिचय व्हावा याबद्दल आम्ही सतर्क असतो . शाळेत स्पॅनिश शिकवतात त्यातही दोघांना चांगली गती आहे. मोठीला मधूनमधून मँडरिनची इन्फॉर्मल शिकवणी असते. त्यात तिचा इंटरेस्ट टिकला तर फॉर्मली शिकवायचा विचार आहे.

आम्ही कितीही आटापिटा करून मराठी लिहायला वाचायला शिकवलं तरी त्याचा वापर फारतर दुकानाच्या पाट्या किंवा पुस्तकाचे नाव वाचण्यापलिकडे जाणार नाही. रेसिपी वाचणे सुद्धा फार दूर!

गाण्यांचे अर्थ , सिनेमा नाटकातले पंचेस हे कळायला जितकं मराठीचं एक्स्पोजर लागेल ते इथे परदेशात राहून जमवणे संडे स्कूलच्या आवाक्यातलं नाही.

त्यांच्यापेक्षा शंकर महादेवन जास्त मराठी म्हणायचा !

मेधा, पोस्ट आवडली, मात्र तुम्ही या पोस्टला विद्रोही का म्हणालात ते समजले नाही. ज्या मुलखात रहायचे तिथली भाषा यावी म्हणून तुमची आई मराठी शिकली हे कौतुकास्पद! माझी मैत्रीण तेलगू भाषिक होती. इंग्रजी मिडियमचा पर्याय आमच्या गावात नव्हताच. तिच्या वडिलांनी मराठी शिकून घेतले होते.

मेधा,
चांगली पोस्ट आहे.
गाण्यांचे अर्थ , सिनेमा नाटकातले पंचेस हे कळायला जितकं मराठीचं एक्स्पोजर लागेल ते इथे परदेशात राहून जमवणे संडे स्कूलच्या आवाक्यातलं नाही. >>> हो.
माझाही असाच अनुभव आहे. लेकीला संभाषणापुरतं मराठी येतं. आजी आजोबांशी मराठीतच बोलते. घरी शक्यतो मराठी बोलायचा प्रयत्न करतो पण १८ महिन्यांची असल्यापासून डेकेअरला जायला लागली, त्यात नवर्‍याला मराठी येत असलं तरी तो मूळचा मराठी नसल्याने त्याचा संभाषणाचा कल इंग्रजीकडे असल्याने मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड अशी सरमिसळ होते. इथल्या काही मित्रमैत्रिणींची मुलं अगदी सफाईदार मराठी बोलतात. त्यांचं कौतुक वाटतं. पण ती मुलं इतकं छान मराठी बोलतात 'म्हणून' माझ्या मुलांनी मराठी बोलावं असं वाटलं नाही. तसे मराठी शिकवायचे प्रयत्न जरूर केले, उदा. मराठी शाळेत घातलं. पण तिला रस वाटला नाही म्हणून सोडून दिलं. आता स्वतःहून म्हणते आहे की मराठी आणि कन्नड शिकायचं म्हणून. तिला मराठी अस्स्खलित बोलता आली तर उत्तमच, पण माझ्यामते (मेधा म्हणते त्या प्रमाणेच) कुठल्याही भाषेचं सौंदर्य समजायला त्या भाषेतलं साहित्य, संगीत, कला, नाटक यांची जाणिव व्हायला हवी. मग ती भाषा मराठीच हवी असा आमचा आग्रह नाही. इथे राहिल्याने बाकी अनेक भाषांची ओळख होते आहे, त्यात तिला रस वाटला तर जरूर त्याप्रमाणे प्रोत्साहन देउ. तसंही हिंदी गाणी आणि काही सिनेमे आवडतात, एक दोन हिंदी भाषिक मैत्रिणी आहेत त्यामुळे हिंदीही बर्‍यापैकी समजतं आणि बोलते.
घरी सगळे सण साजरे केले नाही तरी गणपती मोठा असतो, दिवाळी जोरदार होते. होळी ही साजरी करतो. पण हे सगळे सण तिला सणांची ओळख व्हावी यापेक्षाही आमच्यासाठी करतो. त्या त्या दिवशीचा आमचा उत्साह, धावपळ, आनंद, तिला या सणांना आमच्या लहानपणी काय करायचो हे सांगणे वगैरे पाहून तिलाही त्याबद्दल आत्मियता वाटते आणि ती मनापासून त्यात सामिल होते. रोज संध्याकाळी देवाला दिवा लावायची माझी सवय आहे. यात धार्मिकतेपेक्षा संस्कार आणि सवयीचा भाग जास्त आहे त्यामुळे संध्याकाळचे घरातले-बाहेरचे दिवे, देवापुढचा दिवा-उदबत्ती तिलाही आवडतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'अमेरिकन' असण्याबरोबरच 'भारतीय' असल्याचा तिला अभिमान आहे. भारतातल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असते. भारताबद्दल काही चांगली बातमी वाचली की तिला आनंद होतो. ती बातमी शाळेतल्या अमेरिकन मित्रमैत्रिणींना आवर्जून नेउन दाखवते. स्वतःचे 'रूटस' याबद्दल ती विलक्षण जागरूक आहे आणि सध्या आम्हाला एवढं पुरेसं आहे.

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का? >>

हो. अस्खलित. इतर म्हणजे कोण हा मात्र प्रश्न आहे. कारण मुलगी जन्मल्यापासून अमेरिकेतच होती त्यामुळे आपोआपच इंग्रजीची सवय आहे. पण तिच्याशी कोणी मराठीत बोलले की आपोआप मराठी. स्विच सारखे टर्न ऑन आणि ऑफ होते. सफाईदार लिहिण्यासाठी एकदिवसाआड शुद्धलेखनाचे २० मिनिटं असतात. (जो माझा दबाव म्हणा हवं तर कारण शाळेत तसे काही सांगीतले नाही) त्यामुळे तिला काही सांगीतले तर ती व्यवस्थित लिहिते. लिहिने गेल एक वर्ष सुरू आहे. बोलने मात्र बोलता यायला लागल्यापासून. आता पुण्यात देखील इतर मराठी मुलं आपसात इंग्रजीत बोलतात. (ज्या सोसायटीत मी राहतो ती व अनेक आजूबाजूला पाहण्यात आलेली मुलं) त्यांच्या सोबत ती आपोआप इंग्रजीतच बोलते.

तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा. >>

अमेरिकेत राहण्यामुळे आपोआपच प्ले स्कुल ते तिसरी इंग्रजी शाळा होती . घरी आम्ही मराठीच बोलतो त्यामुळे मराठी बोलन्याबाबत तसा प्रश्न नव्हता, पण प्ले स्कुलला गेल्यावर तिने घरातही इंग्रजी संवाद साधन्याचा प्रयत्न केला, जो आम्ही समजुतदारपणे हाणून पाडला. तिला प्ले स्कुलला जाईपर्यंत तिथे राहूनही जुजबी इंग्रजी यायचे कारण आम्ही घरी मराठीच बोलत असू, त्यामुळे काही खास शब्द जे वयाच्या दुसर्‍यावर्षी मराठीतच लागत, ते आम्ही इंग्रजीत कॉपी करून तिच्या मिसला दिले. उदा aai paahije = I want to talk my mother इत्यादी मग तिची मिस तिला समजावून सांगी की आई कशाला पाहिजे?

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते? >> रुची आहे. नाटकं, यु ट्युब इ वरून मराठी कार्यक्रम आम्ही एकत्र बघत असू. शिवाय सारेगमप लिटिल चॅम्प मध्ये लहान लहान मुलं मराठीतून उत्कृष्ट गीत सादरकरतना पाहून तिला मजा वाटत असे. अग्गोबाई आणि इतर लहान मुलांची गाणी जसे ए आई, भोलानाथ वगैरे वगैरे तिच्या रोजच्या आवडीची गाणी. तशीच इंग्रजीपण गाणी पण ती तितक्याच तन्मयतेने गाते / ऐकते.

शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का? >>

हो गरजेचे वाटते. माणूस म्हणून चांगले असने जसे गरजेचे तसेच योगायोगाने जी भाषा जन्मल्यावर मातृभाषा म्हणून लाभते ती येण्यात गैर काहीच नाही. अनेक भाषा येण्यामुळे माणसाला झाला तर फायदाच होतो, तोटा होत नाही, शिवाय घरी जर मराठी बोलत असू अन तिच भाषा आपल्याच पाल्याला निट येत नसेल तर थोडे लक्ष देऊन शिकवणे गरजेचे वाटते. (ह्यात दुमत होऊ शकेल तरी लिहिले) असे वाटन्यात मराठी किंवा कुठल्याही भाषेचा अभिमान, संस्कृती असे मुद्दे अजिबात नाहीत. मला मराठी आवडते म्हणून पाल्याशी संवाद साधायला मराठीच. घरी मी घरच्यांशी इंग्रजी संवाद साधू शकत नाही.

अमेरिकेत असताना तिला कळायला लागल्यावर मोठ्या स्टोअर्स मध्ये आमच्याशी मराठी बोलताना लाज वाटत असावी कारण ती इंग्रजीतून सुरुवात करू पाहत असे किंवा मराठी अगदीच हळू बोलत असे (कुजबुजल्यासारखे). तेंव्हा तिला समजावून सांगीतले की बघ काही लोक स्पॅनिश बोलतात, काही जर्मन काही चायनिज, तैवानिज तसे आपण मराठी. जर ती लहान मुलं त्यांच्या आई बाबासोबत अमेरिकेत राहूनही जर्मन / रशीयन व्यवस्थित बोलत असतील तर तुला वाईट / लाज वाटन्याचे काही कारण नाही. तिला मग ते पटले. शिवाय केजी मध्ये सताना तिची मैत्रीन जर्मन होती आणि ती घरी जर्मन बोलायची. एक दोन पिढ्या अमेरिकेत राहूनही चायनिज, जर्मन, रशियन, अल्बेनियन अश्या अनेक लोकांनी आपली (म्हणजे त्यांची) संस्कृती टिकवून ठेवली. जसा ख्रिसमस होतो तसाच मार्दी ग्रास. हे ती शाळेतच शिकली. त्यानंतर तिला कधीही ती मराठी बोलते (मॉल, स्टोअर्स मध्ये इतर अमेरिकन्स समोर) म्हणून न्युनगंडाची भावना आली नाही.

परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का? >>

मराठीपण म्हणजे काय? हा मात्र मला प्रामाणिक प्रश्न आहे. हां भारतीय पण उतरेल काय तर ह्याचे उत्तर हो. त्यामुळे तिथे अन इथे मुव्ह झाल्यावर घरी झेंडा लावने, तिथे असताना भारतीय संस्कृती (इथे संस्कृती हा शब्द व्यापक आहे, केवळ सणवार हा अर्थ नाही) म्हणजे काय, भारतात काय चांगल्या गोष्टी अन काय वाईट ह्याचे जाता येता सहज शिक्षण मात्र दिले आहे. आणि मराठी मंडळाच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे सणवार आपोआप झाले. तसेच घरी आम्ही दिवाळी, दसरा, गणपती असे सण आवर्जून साजरे करायचो पण अगदी वटपोर्णिमा टाईप सण कधी इथेही केली नाही, तिथेही आणि आणि परतोनि आल्यावरही नाहीच करणार.

पुस्तक वाचताना तिचा कम्फर्ट मात्र इंग्रजीचा आहे. ती पुस्तक खाऊन टाकते. Happy पण मराठीची सवय हळूहळू (इतर वाचन) लावत आहे.

इथे संयोजकानी चांगल / वाईट, बरोबर/चूक असे जजमेंट द्यायचे नाही, आरोप/प्रत्यारोप करायचे नाही असे दिले असताना लोकं का आपल्या प्रतिक्रिया देताहेत दुसर्‍यांच्या पोस्ट वर?

एरवी आहेत ना विषय बरोबर्/चूक सांगायला तिथे चर्चा कराना. Wink नाहीतर इतर बीबी आहेतच.

हा प्रतिसाद कदाचित अवांतर, वरती दिलेल्या मुद्यांना सोडून आहे. असल्यास सांगणे, उडवून टाकेन..

मला रैना म्हणली सकाळी की मी माझ्या विद्यार्थ्यांवर इथे लिहावं.. मी गेले २-३ वर्षं पदव्युत्तर अभ्यासक्रमाला अत्यंत कॉस्मॉपॉलिटन म्हणता येईल अशा देशी-विदेशी मुलांना एका संशोधनसंस्थेत पुरातत्वशास्त्राच्या पदवीसाठी शिकवतेय. त्यातल्या मराठी विद्यार्थ्यांविषयीची निरिक्षणं -
मुळातच २ भाग पडलेले असतात. एक इंग्लिश माध्यमातून शिकलेले आणि दुसरा मराठी माध्यमातून शिकलेले. जे मराठी माध्यमातून शिकलेले असतात त्यांचा इंग्लिशच्या नावाने अक्षरशः ठणाणा असतो. म्हणजे कळत नाही अगदीच असं नाही पण एक जबरदस्त भीती असते. इंग्लिश माध्यमातून शिकलेले विद्यार्थी म्हणून त्यांची मराठी 'चांगली' नसतेच. म्हणजे बोलीभाषेपुरतीच असते. जरा मराठीतले जड शब्द आले की नांगी टाकलीच म्हणून समजा. दुसरीकडे जे मराठीतून शिकलेले असतात त्यांची भाषा बरी असते पण त्यांचीही शब्दसंपत्ती पहिल्या गटापेक्षा खूप उजवी असते असं नाही हे दुर्दैवाने लक्षात आलंय. जर यदाकदाचित यांनी उत्तरपत्रिका मराठीत लिहिल्या तर त्या वाचताना अनन्वित त्रास होतो. पुलंच्या भाषेत सांगायचं तर कर्ता कर्म क्रियापद सगळं रानोमाळ सैरावैरा असतं, जत्रेत मुलंमाणसं हरवतात तसं.. त्यांना काय लिहायचं असेल त्याचा अंदाज घेत घेत वाचायचं...
आणि भाषा येणं म्हणजे काय? तर त्या भाषेतील सांस्कृतिक संदर्भ माहित असणं, ते उमगणं, त्याचा आस्वाद घेता येणं, थोडीफार त्या भाषेतील साहित्य, कला परंपरांविषयी जाणीव असणं, इ. इ. हे जर असं धरायचं असेल तर मग या दोन्ही गटांना मराठी जवळजवळ येतच नाही असं म्हटलं तरी चालेल इतकी भयाण परिस्थिती आहे. एखाददुसरा अपवाद वगळता वरील कुठलेही संदर्भ फोड करून समजावून सांगितल्याशिवाय कळत नाहीत. इंग्लिश चांगलं येतं म्हणणार्‍यांमधेही बहुतेक इंग्लिश साहित्य, पाश्चात्य सांस्कृतिक संदर्भ यांच्या विषयी पूर्ण अज्ञानच असतं. या दोन्ही गटांना फक्त पॉप एन्टरटेनमेन्टमधून झिरपलेली भाषा आणि सांस्कृतिक संदर्भ बर्‍यापैकी माहित असतात.. मला तर बरेच वेळा वर्गात शिकवताना कुठेतरी पूर्ण परग्रहवासी वर्गाला शिकवतोय असं वाटत रहातं. म्हणजे आधी ययाति कोण, परिक्षित कोण, दुष्यंत कोण, ट्रॉय म्हणजे काय, रनेसां म्हणजे काय अशी ओळखपरेड करायची, त्याच्या गोष्टी सांगायच्या आणी मग तो संदर्भ शिकवायचा!
मला इथे चूक बरोबर म्हणायचं नाहीये, पण निदान कुठल्यातरी एका भाषेतून तरी अशा जाणिवा विकसित झाल्या पाहिजेत असं वाटत रहातं. खरं बोलू? मला तुम्हा परदेशस्थ मंडळींच्या मुलांचं मराठी आणि या पोरांचं मराठी यात फारसा गुणात्मक फरक नसावा असं वाटतं. निदान तुमच्या मुलांची त्या संस्कृतीशी तरी नाळ जुळते पण ही अशी पोरं मात्र मला फार अधांतरी वाटतात. यांची नक्की कशाशी नाळ जुळलीये माहित नाही.

मी पहात असलेले मराठी विद्यार्थी हे त्यांच्या पिढीचं अगदी नगण्य प्रातिनिधित्व करतात हे जरी मान्य असलं तरीसुद्धा माझ्या दृष्टीने ही काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे. इथे प्रश्न फक्त मातृभाषेच्या अट्टाहासाचा नाहीये तर आपण जिथे रहातो तिथली भाषा, तिथले सांस्कृतिक संदर्भ, जाणिवा आत्मसात करून घेण्याचा असतो. ती मातृभाषा असणे-नसणे ही पुढची गोष्ट आहे.

मला जे वाटतंय ते मी नीट मांडू शकलेय की नाही माहित नाही. असो.

त.टी. : काल लिहिताना काही गोष्टी स्पष्ट झाल्या नाहीत असं वाटलं.
मुळात मी २ मुद्यांविषयी एकत्र लिहिलं होतं - सांस्कृतिक साक्षरता (हा मुद्दा या चर्चेपेक्षा तसा अवांतरच आहे हे मान्य) आणि मराठी भाषाकौशल्य.
१. मी जेव्हा मराठीत लिहिता येत नाही असं म्हणते तेव्हा मला बोली मराठी (उदा: आपण माबोवर प्रतिसादाला बहुतांशी जी भाषा वापरतो तशी) अभिप्रेत नाही. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमात उत्तरपत्रिकेत लिहिताना तुम्हाला स्वतःचे विचार मुद्देसूदपणे नेमक्या शब्दात लिहिणं अपेक्षित असतं. इथे कुठलीही पाठ्यपुस्तकं, गाईड्स नसतात. अशा वेळी अनेको संदर्भग्रंथ वापरूनच परीक्षेचा अभ्यास करायला लागतो. इतके वर्षं, अगदी पदवी परीक्षेपर्यंत असलेली घोकंपट्टीची सवय इथे सोडून द्यावी लागते. आणि मग जेव्हा स्वतःला समजलेलं कागदावर मांडायची वेळ येते तेव्हा जो काही भाषेचा राडा होतो म्हणता महाराज! तीच गोष्ट संशोधनावर/ अभ्यासावर मराठीत बोलताना होते. इथे मी भाषेची 'शुद्धता/प्रमाणिता' वगैरे मुद्दे पहातच नाही, तर अगदी वाक्यरचना, शब्दयोजना इ. विषयी लिहितिये. म्हणून मग मला प्रश्न पडतो की नक्की यांनी मराठी/ सेमी-इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतलं म्हणजे काय केलं?
या गटात शहरी, अर्धशहरी आणि ग्रामीण अशा सगळ्या स्तरांवरचे मराठी विद्यार्थी अंतर्भूत आहेत

२. सांस्कृतिक साक्षरता म्हणजे आपण जिथले रहिवासी आहोत (राज्य/देश) यांच्या परंपरांविषयी (भाषा, साहित्य, कला, लोकपरंपरा) आणि जाणिवांविषयी किमान माहिती असणे. अगदी वृत्तपत्रं, लोकप्रिय पुस्तकांमधून मिळणारी माहिती असेल तरीसुद्धा चालेल - पण सजगपणे आपल्या भोवतालविषयी माहिती करून घेणे. आणि नी ने लिहिलंय तसंच किचपलिकडे फारसं काहीच न पहाणार्‍या (मराठी-अमराठी) विद्यार्थ्यांचं प्रमाण फार मोठं आहे. या अभ्यासक्रमाला ते स्वेच्छेने/ आवड आहे म्हणून आलेले असतात. बहुतेक जण इतिहासाची पदवी घेऊन आलेले असतात. तेव्हा त्यांना परत रनेसां, ट्रॉय, होमर, प्रसिद्ध पौराणिक/ लोककथा असं जर परत एकदा मुळापासून विशद करून सांगायला लागणार असेल तर हे पदवीपर्यंत अभ्यासात नक्की काय करत होत? आवड असेल तर यांनी या गोष्टी कशा वाचल्या नाहीत? हे प्रश्न खूपच स्वाभाविकपणे पडतात...
असो. पोस्ट खूपच लांबली. क्षमस्व!

>> आणि भाषा येणं म्हणजे काय? तर त्या भाषेतील सांस्कृतिक संदर्भ माहित असणं, ते उमगणं, त्याचा आस्वाद घेता येणं, थोडीफार त्या भाषेतील साहित्य, कला परंपरांविषयी जाणीव असणं, इ. इ

नेमकं लिहिलंस. आणि मला वाटायचं की हे परस्परपूरक असेल.

>> यांनी उत्तरपत्रिका मराठीत लिहिल्या तर त्या वाचताना अनन्वित त्रास होतो.
ही पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणारी आधी मराठी माध्यमातून शिकलेली मुलं?

हो, आणि तीही प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र या विषयाची पदवी घेण्यासाठी आलेली. कुणी अमर चित्र कथा सुद्धा वाचलेल्या नसतात गं (मराठी-अमराठी). मूळ परंपरागत गोष्टीच माहित नसतात, ढोबळमानाने रामायण महाभारत सोडून. अशांना धर्म, मूर्तीशास्त्र इ. विषय शिकवताना फेफरं येतं इतक्या मुळापासून गोष्टी विशद करायला लागतात!

अत्यंत कॉस्मॉपॉलिटन म्हणता येईल अशा देशी-विदेशी मुलांना एका संशोधनसंस्थेत पुरातत्वशास्त्राच्या पदवीसाठी शिकवतेय. त्यातल्या मराठी विद्यार्थ्यांविषयीची निरिक्षणं - >>
पुण्यात ? अतिशय वाईट वाचलं वाचून . या सर्वाला बव्हंशी पालकच जबाबदार नाहीत का ?
मागे स्वातीने एक ब्लॉग लिंक दिली होती नव्या युवा पिढीत साहित्याबद्दल किती अनास्था आहे यावर. त्याची आठवण झाली

खरंतर इथे कोणाच्या पोस्ट विषयी खल करायचा नाहीये हे माहीतेय. पण काही पोस्ट्स वाचून मलाही लिहावसं वाटतंय. वरच्या पोस्ट्स उडल्या तर माझीही उडवेनच.
मी पहात असलेले मराठी विद्यार्थी हे त्यांच्या पिढीचं अगदी नगण्य प्रातिनिधित्व करतात हे जरी मान्य असलं तरीसुद्धा >>> हे कळीचे वाक्य आहे वरदाच्या प्रतिसादातले हे कृपया विसरु नका.
पुरातत्त्व्शास्त्राच्या पदवीसाठी येणारे विद्यार्थी हे सामान्य पुण्यात शिकणार्‍या विद्यार्थ्यांबाबत अंदाज बांधायला नक्कीच पुरेसे नाहीत. शिक्षणाविषयी / भाषेविषयी जास्त जागरुक असणारे, जास्त चांगल्या प्रकारे भाषा व त्या अनुषंगाने येणार्‍या सांस्कृतिक इ. जाणिवा हे सर्व असणारे विद्यार्थी इतर इंजिनिअरींग मेडीकल, बीकॉम-बीएस्सी, मायक्रो अन इतर हजार विषयांच्या पदवीसाठी जातात असे समजायला बराच वाव आहे. कदाचित वरदाने उल्लेखलेले विद्यार्थी फारशी चांगली शैक्षणिक उपलब्धता नसलेल्या खेड्यातल्या वगैरे भागांतून देखील आले असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कृपया पालकांविषयी किंवा विद्यार्थ्यांविषयी अनुमान काढण्याची घाई करायला नको.

मवा, हा गट प्रातिनिधिक म्हणण्याइतका मोठा नाही हे खरं आहे. पण ही स्वेच्छेने पुरातत्त्वशास्त्र शिकायला आलेली मुलं आहेत म्हणून वाचून नवल वाटलं.

>> कदाचित वरदाने उल्लेखलेले विद्यार्थी फारशी चांगली शैक्षणिक उपलब्धता नसलेल्या खेड्यातल्या वगैरे भागांतून देखील आले असण्याची शक्यता आहे.

पण ती म्हणते आहे ना, की
>> अत्यंत कॉस्मॉपॉलिटन म्हणता येईल अशा देशी-विदेशी मुलांना एका संशोधनसंस्थेत पुरातत्वशास्त्राच्या पदवीसाठी शिकवतेय. त्यातल्या मराठी विद्यार्थ्यांविषयी

संयोजक, हे जजमेन्ट नाही. तरीही इथे चर्चा नको असेल (पण ती कुठेतरी व्हायला हवी ना?) तर या पोस्ट्स जरूर उडवा. Happy

स्वाती, कॉस्मॉपॉलिटन चा नक्की अर्थ काय ? त्याचा भाषेशी नक्की संबंध काय ? यावर विचार करते. Happy
स्वेच्छेने कुठल्याही पदवीसाठी किती जण येतात हाही एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. Happy
चर्चा व्हावी असे संयोजकांनाही वाटत असेल तर त्याचा वेगळा धागा यायची वाट पाहूया. Happy

मवा Happy

>> चर्चा व्हावी असे संयोजकांनाही वाटत असेल तर त्याचा वेगळा धागा यायची वाट पाहूया
होय. Happy

मवा , कॉस्मोपोलिटिअन म्हणजे , वेगवेगळ्या संस्कृती ,विचार ,आचार यांना जवळ करणे. थोडक्यात आपल्या देशाच्याच संस्कृती , राहणीमान याची कास न धरता वेगवेगळ्या देशातील रिती (चांगल्या/वाईट) , इथिक्स इत्यादी स्वीकारणारे.

सॉरी झंपी. फक्त माहिती सांगितली. जज नाही केल कि चर्चा पण नाही. Proud

सीमा, मलाही असाच अर्थ माहीत होता. पण मग याचा एखादी विशिष्ट भाषा / मात्रूभाषा चांगल्या प्रकारे येण्याशी त्याचा नक्की संबंध काय हे कळले नाही. भाषा येणे-न येणे हे कॉस्मोपॉलिटन असणे-नसणे याच्याशी संबंधित नसावे असे मला वाटते.

एकूणात हल्लीच्या मुलांचे भाषाविषयक ज्ञान त्या पोस्टमधल्या विद्यार्थ्यांवरुन अनुमानित करता येणार नाही असा माझा मुद्दा होता. असो.

सीमा, सॉरी मला कशाला म्हणताय? संयोजकाचे पाय धरा...च्च च्च.. अहं माफी मागा... नाही सॉरी म्हणा, ते बरं दिसेल मराठीला साजेसं.

( चर्चा नाही, जजमेंटल नाही म्हणत म्हणत आता 'फक्त' मत मांडतेय , माहीती लिहितेय म्हणून सगळेच लिहिणार दिसतय) Proud मी पण आता लिहितेच , काय म्हणून सांगू.. 'फक्त' विचार सांगितला असे लिहिते शेवटी. Wink

(इथेच मराठीची अवस्था दयनीय आहे वाटतं. कारण संयोजकानी मराठीतच ह्या बीबीसाठी केलेली 'अपेक्षा' समजलेली नाहीये. ;))

वरदाच्या पोस्टमधल्या कॉस्मोपोलिटिअन चा अर्थ शब्दशः नसून वेगवेगळ्या राहणीमान, संस्कृती थरांमधून आलेला mix समूह असा असावा असे मला वाटतेय.

अमर बागुलांनी पहिल्या पानावर 'शिशुभारती' बद्दल लिहिलं आहे. तशी शाळा सगळीकडे असती तर किती बरं झालं असतं..

आमच्या भागात (VA, DC, MD) ४-५ मराठी शाळा आहेत. त्याशिवाय फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतली अशी मराठी शाळा, त्या अनेक असतील. आमची अशीच उन्हाळी शाळा होती/आहे (मोठा तिथे जायचा, आता नाही. धाकटा अजून जात नाही).

ही शाळा लायब्ररीच्या एका हॉलमध्ये वीकेन्डला भरते. सगळ्या वयाची मुलं एकाच वर्गात. तिथे येणार्‍या मुलांचे आई-वडीलच ही शाळा चालवतात, म्हणजे तिथे शिकवतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत काही आजी-आजोबा भारतातून येतात त्यांचाही सहभाग असतो कधीकधी.

अभ्यासक्रमाचं स्वरुप अंक-अक्षर ओळख, संभाषण, व्याकरण इ. मग गाणी, गोष्टी, कोडी, विनोद इ. मध्ये मुलांचा सहभाग. काही मुले थोडी वर्षं भारतात राहून इथे आलेली असतात किंवा नुकतीच आलेली असतात त्यांना थोडं जास्त चांगलं मराठी येतं. मग ती बाकीच्यांना मदत करतात. गृहपाठ असतो. पूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीभर शाळा असते. मग वर्षभरात मुलांची रुची टिकवून ठेवून भाषेच्या संपर्कात ठेवणे हे पालकांचे काम.

एरवीही मुलांचे वीकेन्ड गेम्स, वाढदिवस, अजून कसले वाद्य, नाच इ. चे क्लास यात जात असतात. तशीच ही एक अ‍ॅक्टिव्हिटी! Happy शाळा उपलब्ध नसेल तर तुम्ही काही मित्र-कुटुंबे मिळून चालू करु शकता. ओळखी नसतील तर स्थानिक मराठी मंडळ यात मदत करु शकते. घरी एकट्याने शिकवण्यापेक्षा हा चांगला पर्याय आहे कारण मुले इतरांबरोबर जास्त चांगलं शिकतात. शाळेचे/क्लासचे वातावरण तयार होते. ज्यांना अंतरांमुळे सतत एकत्र येणे जमत नसेल त्यांनी व्हर्चुअल शाळा चालवयाला हरकत नाही. तशी मला परदेशस्थ लोकांच्या मुलांसाठी मायबोलीवर सुरु करायची होती पण लहान मुले आणि वेबसाइट्चे कायदे यामुळे मुलांना सहभागी करुन घेता येणे अवघड आहे.

धाकट्याला (इयत्ता तिसरी) अजून मराठी शिकण्यात रस नाही.
म्हणतो, 'फायदा काय?'
हल्लीची मुलं हुषार! मी हिंदी-संस्कृत शिकताना असा विचार केला नव्हता. Happy
मला उत्तर देता येत नाही. पण प्रतिप्रश्न सुचतो, 'नुकसान काय आहे?'

जोवर शैक्षणिक आणि इतर प्रगतीत अडथळा येत नाही तोवर सॉकर, कराटे इ. सारखीच एक भाषा शिकायची. आणि मग भाषाच शिकायची तर ती आपली का नको? अलिकडे बहुभाषिकांची संख्या वाढली आहे. या मुलांना दोन तरी भाषा शिकाव्याच लागणार. ते शालेय अभ्यासक्रमातूनच होईल, आपल्यापैकी काही तीन नाही शिकलो? तेही हिंदी आणि इंग्रजी इयत्ता ५ वी पासून सुरुवात करुन!

खरं तर प्राथमिक शाळेतल्या मुलांकडे भरपूर वेळ असतो. ती जशी वरच्या वर्गात जातील तसा हा वेळ शाळेतल्या अभ्यासामुळे कमी कमी होत जातो. म्हणून सुरु करायचे असेल तर मराठी शिकवणे तेव्हाच सुरु झालेले बरे. डे केअरमुळे सुरुवातीला मराठी टिकले नसले तरी हरकत नाही. शाळेतली प्रगती नॉर्मल असेल तर त्यांच्या क्षमतेबद्दलही शंका घेण्याचे कारण नाही. लवकर सुरु केले आणि नंतर त्यांची रुची टिकून राहिली तर ते शिकणं चालू ठेवण्याची किंवा जे शिकले त्याचा उपयोग करण्याची संधी त्यांना उपलब्ध असते. पहिल्यापासून सुरुवात करावी लागत नाही. नाही टिकली तर पुढच्या शिक्षणाच्या धबडग्यात ते आपोआप मागे पडते. भाषा 'कितपत' यावी म्हणजे 'उपयोग' होईल असे मोजमाप करणे अवघड आहे. त्यामुळे कामचलाऊ संभाषणापुरते असले तरी ते काहीवेळा पुरेसे असते.

मुलांसारखाच पालकांनाही हा प्रश्न पडत असेल की "फायदा काय?" मुलांचा कल बघून विचार करत असतील, काहीतरी लादल्यामुळे मुलांचे नुकसान होईल अशी भीती वाटत असेल, कदाचित त्यामागे परिश्रम घ्यावे लागत असण्याचेही कारण असू शकेल. एखादी गोष्ट सहजासहजी होत असेल तर माणूस त्याच्या फायद्या-तोट्याचा फारसा विचार करत नाही. पण वेळ आणि कष्ट पडत असतील तर हा प्रश्न पडतो, 'Is it worth effort?' दोष त्यांचाही नाही. जीवनपद्धती धावपळीची आहे. वेळ कमी असतो, इतर प्रायोरिटीज असतात.. जवळपास जास्त मराठी माणसे नसतात, नातेवाईक, आजी-आजोबा नसतात.

म्हणूनच सुरुवातील म्हटलं तसं,
अमर बागुलांनी पहिल्या पानावर 'शिशुभारती' बद्दल लिहिलं आहे. तशी शाळा सगळीकडे असती तर किती बरं झालं असतं..

छान आहेत सगळ्याच पोस्ट.
केदारच्या पोस्टीतला ठामपणा आवडला. Happy

खरे तर सगळ्यांचे विचार आणि अभिप्राय विषयाला अगदी पूरक असे आहेत. मला वाटतं जसजसा हा विषय पुढेपुढे सरकत आहे तसतसा तो अधिकाधिक मनमोकळा आणि स्पष्ट होत चाललेला आहे.

अजून बर्‍याच मायबोलिकरांनी ह्या विषयावर इथे लिहिलेले नाही. ते इथे येतील नि लिहितील अशी अपेक्षा.

लिखाणासाठी सर्व मायबोलिकरांना माझ्या शुभेच्छा.

मी नंतर लिहिन. वेळ मिळाला की Happy

वरदाची पोस्ट फारच पटली मला कारण माझ्या विद्यार्थ्यांबद्दल थोड्याफार फरकाने हाच अनुभव आहे माझा.
मुंबई विद्यापीठात नाटक शिकण्यासाठी आलेल्या, मुंबईतच जन्मलेल्या-वाढलेल्या, मराठी मुलाचे मराठी भयंकर असू शकते. मराठी भाषा म्हणून सर्व गोष्टींचा आस्वाद घेण्याची शक्यताच उरलेली नसते. पॉप आणि किच च्या पलिकडे काहीच माहित नसते. कदाचित हिरो बनून चित्रपटसृष्टीला हादरवून सोडायची महत्वाकांक्षा पालकांना आणि मुलांना इतर काही बघू देत नसावी. पण अभिनयाने हादरवायचे तर सुरूवातीला निदान आपली मातृभाषा तरी उत्तम यायला हवी ही अपेक्षा यांना अति वाटते. हिच मुले पुढे मराठी सिरीयल्समधे कामे करू लागतात आणि एकूणात टेलिव्हिजन मधले मराठी हे किती भयाण आहे याची सगळ्यांना कल्पना आहेच.
या मानाने मराठी ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याचे मराठी नक्कीच भले असते असा माझा अनुभव. ते कदाचित प्रमाण भाषा बोलत नसतील. त्यांच्या त्यांच्या प्रदेशातील लहेजासकट बोलत असतील. पण निदान त्यांची अवस्था वरती वरदाने वर्णन केल्याप्रमाणे 'अधांतरी' नसते.
तरीही मराठी अभिनेता म्हणून उभे रहायचे तर तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातून आलेले असा पण प्रमाण मराठी येणे आवश्यकच आहे. रोजच्या बोलण्यात वापरू नका हवे तर पण त्यावर कष्ट घ्यायला हवेतच. ह्याकडे कानाडोळा केला जातो.

Pages