बीज अंकुरे अंकुरे- मराठी भाषा दिवस २०१२

Submitted by संयोजक on 20 February, 2012 - 22:17

beej_ankure copy.jpg

मराठी भाषा दिवस २०१२ निमित्ताने थोडे मुद्द्याचे बोलुया?
इथे खाली दिलेल्या मुद्द्यांवर लिहिणे अपेक्षित आहे.

  • आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­
  • तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
  • मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
  • तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
  • महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
  • मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?
  • लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
  • परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?
  • प्रांजळ अनुभव लिहिणे अपेक्षित आहे. चांगले वाईट काही नाही. फक्त प्रांजळ अनुभव. कोणी काय करावे, काय करायला हवे होते,असे उपदेशपर कृपया लिहू नका. फक्त तुम्ही काय करता तेवढे लिहिणे अपेक्षित आहे.

* हा धागा संयोजकांकडून प्रशासित आहे हे कृपया लक्षात घ्या! दोषारोप न करता फक्त सद्य परिस्थिती कथन करणे आणि आपला मानस; एवढेच लिहावे ही विनंती आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­ >>>>>
माझा मुलगा सध्या सव्वा चार वर्षांचा आहे. मराठी चांगलं बोलतो. वाचनाचा सराव सुरु केला आहे, लिखाण अद्याप नाही. संपूर्ण मराठी वातावरणात असताना मराठी मुलांशी मराठीतून बोलयचा प्रयत्न करतो (जसं कि भारतात गेल्यावर) मात्र अमराठी /इन्ग्रजी वातावरणात मराठी मुलांशी बोलताना मराठीचा वापर होत नाही ( जसं कि वर्गातील एकमेव मराठी मैत्रीण).

तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.>>>>>
घरी बोलताना मराठी आणि इंग्लिश यांचा समतोल वापर असतो. त्यामुळे बोली मराठीसाठी तरी विशेष वेगळे प्रयत्न करावे लागत नाही. मात्र बोलताना दोन्ही भाषांची सरमिसळ होणार नाही, याची दक्षता घेतो.

मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?>>>>>
लहान मुलांचे, चांगले मराठी चित्रपट मुलाला दाखवते, बोक्या सातबंडे वगैरे. तो आवडीने पाहतो. मराठी गाणी ऐकवते, तो लहान असल्यापासून. passive listening चा एक भाग म्हणून. सुरुवातीला बन्द कर म्हणायचा , नंतर गोडी लागली Happy
लहान असताना व अजूनही, नातेवाईकांशी वा आजी-आजोबांशी फोनवर बोलताना त्याने मराठीतूनच बोलले पाहिजे असा माझा आग्रह असतो. माझ्यादृष्टीने ते फार महत्वाचे आहे. कारण फोनवर बोलताना भाषा हे संवादाचे एकमेव माध्यम असते. नातवाला मराठी येत नाही म्हणून आजी-आजोबांना मोडक्या-तोडक्या इंग्रजी भाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न करावा लागणे हि माझ्यामते फार केविलवाणी परिस्थिती आहे. हे होउ नये म्हणूनहि त्याला मराठी बोलता येणं आवश्यक वाटतं.

महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.>>>>>
ह्या भागातील वीकेंड स्कूल्स चा शोध घेणे चालु आहे. जमल्यास ते हि करवून घ्यायचा विचार आहे.

लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?>>>>>

दुर्दैवाने ह्या बाबतीतला माझा अनुभव आणि मत फारच वाईट आहे. अपवाद फक्त माधुरी पुरन्दरे, अक्षरबाग- कुसुमाग्रज वगैरेंचा. चांगल्या पुस्तकांच्या शोधात आहे. पण भारताबाहेर असल्याने मर्यादा येतात.

परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?>>>>>
मी सणवार, कर्मकांड ह्यापासून दूर असते. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे, एक 'मराठी' व्यक्ति बनण्यापेक्षा एक भली व्यक्ति बनणं जास्त महत्वाचे.

हे मी माझ्या चारी भाचेकंपनीबद्दल लिहीत आहे. वयोगट ३ ते ९ वर्षे.

आपल्या मुलांना मराठी बोलता, लिहिता, वाचता येते का? येत असेल तर कितपत येते? मुलं इतर मराठी मुलांशी मराठीत बोलतात का?­
मराठी माध्यमात जाणारी आहे तिला अर्थातच मराठी बोलता लिहीता वाचता येते. इंग्रजी माध्यमातला आताशी पहिलीत आहे. त्याला स्पष्ट स्वच्छ मराठी बोलता येते. लिहीता वाचता येत नाही.
तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकत असतील तर तुम्ही मुलांना मराठी भाषा कशा प्रकारे शिकवता? त्यासाठी काय प्रयत्न करता? तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तो अनुभवही जरुर लिहा.
मुळात घरातच मराठी वातावरण असल्याने मराठी शिकवण्याचे कष्टच घ्यावे लागले नाहीत. संपूर्ण बोलणे मराठीतून असते. मराठी माध्यमातून शिकल्याने एक फायदा मात्र स्पष्टपणे दिसतो. आपण ज्या भाषेतून विचार करतो तीच आपली व्यक्त होण्याची भाषा असेल तर मूल पटकन प्रकट बोलू, लिहू शकते. भराभर आपले म्हणणे मांडू शकते. इंग्रजी माध्यमातला जो आहे, त्याचे मात्र थोडे गोंधळ उडतात. सुई डोळ्यासमोर दिसत असली तरी त्याला शाळेत शिकवलेले 'नीडल" आठवावे लागते. आणि त्या वेळात सुईबद्दल काय बोलायचे होते हेच कधीकधी तो विसरतो. Proud जोक्स अपार्ट, पण पुण्यातल्या मराठमोळ्या घरात हे अपरिहार्य वास्तव आहे. आपण तोडक्यामोडक्या इंग्रजीतून मध्येच "तू काय खाणारेस रे?" आणि लगेच " keep your shoes in the cupboard." असे नाहीच बोलू शकत. आणि यात मुलांची धांदल उडते.
मराठी प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या) / कार्यक्रमांचा (चित्रपट,नाटक, खेळ, गोष्टी, रेडियो, आजी-आजोबा, मराठी मंडळ इ.इ.)उपयोग करुन घेता का? मुलांना या सगळ्यात कितपत रुची वाटते?
हो तर, बालमित्रसाठी आमच्याकडे धडपड असते. आम्ही चंपक, चांदोबासाठी भांडायचो तसे ही मुले भांडताना बघून (कधी नव्हे तो) आनंद होतो. सर्वात मोठी मानसी वाचून दाखवते व इतर ते ऐकतात. गाणी, गोष्टी पाठ आहेतच. शिवाय मराठी सिनेमातले विनोदही कधीकधी समजतात.
तुमची मुलं मराठी माध्यमातून शिकत असतील तर तिथले अनुभव, शाळांची परिस्थिती इ.
महाराष्ट्राबाहेर देशात किंवा परदेशी असाल तर काय करता? वीकेंड स्कूल्सचे अनुभव असतील तर ते.
मुलांना मराठी येत नसेल तर काय करायचा मानस आहे? शिकवणे गरजेचे वाटते का? त्यासाठी आपल्या सगळ्यांना काही करता येईल का?

खरंतर मानसीला मराठी माध्यमात घालण्याचा विचार फक्त एवढयाच साठी केला होता. आता पहिलीपासून इंग्रजी असल्याने पुढे तिचे काही अडेल असे वाटत नाही. आमच्या मते, इंग्रजी ही एक व्यवहारासाठी लागणारी भाषा आहे फक्त. आपल्या शाळा कॉलेजातले आदर्श शिक्षक, मोठमोठे प्रोफेसर, शास्त्रज्ञ कुठे होते इंग्रजी माध्यमात? तरीही आज इंग्रजीतून लेक्चर देतातच. इंग्रजी येण्यासाठी आपले इतिहास, भूगोल इंग्रजीतून शिकण्याची गरज नाही. मला स्वतःला शिवाजीमहाराजांचा इतिहास इयत्ता चौथी, इंग्रजीतून शिकण्याची कल्पनाही करता येत नाही. मला व्यक्तिश: इंग्रजी माध्यमातले फालतू लाड (आठवड्यातले २ दिवस हा ड्रेस, ते शूज, काही चक्रम प्रोजेक्ट प्रकरणे, अभ्यासापेक्षा वह्यांना कव्हर लावणारी अवाजवी शिस्त) यांचा मनस्वी तिटकारा आहे. नाईलाज असणार्‍या मुलांविषयी कणव वाटते. पण पुण्यात समस्या अशी आहे की अहिल्यादेवी, नूमवि या मुलींच्या शाळांचा जो अजूनही दर्जा कायम आहे तो मुलांच्या शाळेबाबत एकीतही नाही. याच नाईलाजास्तव अद्वैतला इंग्रजी माध्यमात घातले आहे.

लहान मुलांसाठी सध्या जी मराठी पुस्तके आहेत ती मनोरंजन करणारी वाटतात का?
परदेशात राहताना घरी मराठी सणवार साजरे केल्यामुळे मुलांमधे काही खास मराठीपण उतरते का?

आम्ही अजून आमच्याच पिढीचा वारसा देत आहोत. ज्यांनी आमचे त्या वयात मनोरंजन केले तीच पुस्तके. सणावारांनी निश्चितच त्यांच्या मनाला मराठीपणाचा स्पर्श लाभतो.

*इंग्रजी माध्यमाविषयीचे हे विचार फक्त माझे मत आहे कृपया त्यातून कोणीही वैयक्तिक राग मानू नका. Happy

आम्ही तीन वर्षांपासुन सिड्नीत आहोत, माझी मुलगी मुद्रा ८ वर्षाची आहे खुप छान मराठी बोलते सुंदर अक्षरात लिहिते अन वाचतेही. ऑस्ट्रेलियन मराठी विद्यलयात ती तिसरीत आहे,गंमत म्हणजे ही शाळा आमच्या घरापासुन ५०किमी वर आहे तिची शाळा अडीच तास आणि जायला यायला अडीच तास असा आमचा सगळा रविवार शाळेतच जातो,ही सगळी खट्पट तिला मराठी यावे म्हणुनच....
रोज रात्री तिला मराठी गोष्टी वाचुन दाखवणे,मराठी चित्रपट पाह्णे,अधुन मधुन मराठी म्हणी,विनोद सांगुन मराठीची गोडी टिकवुन ठेवणे चालूच असते. भाषेतल्या गंमती-जंमती सांगणे उदा. आम्ही दोघे बैल-गाडीतुन चाललो होतो, मी मेलेला कुत्रा चालतांना पाहिला वगैरे वगैरे... मग तिला खुप मजा येते हे सगळं ऐकयला.. आणि वाचायलाही, इ-सकाळमधील चिंटू ती आर्वजून वाचते..
घरात मराठी सगळेच बोलत असतील तर मुलांना फार कठीण जात नाही, परदेशात आपली भाषा टिकविणे तितकेच कठीण...
पण मराठी मित्र-मैत्रीणींशी मराठीतच बोलायला सांगणे,मराठी मंड्ळाच्या कार्यक्रमांना जाणे,त्यात भाग घेणे,रेडिओ ऐकणे यामुळे मुलांचा शब्द्संग्रह आणि रुचीही वाढते
पालकांनी मुलांशी मराठीतच बोलणे तितकेच गरजेचे आहे..

रोचक आहेत प्रतिसाद.

आता ८ वर्षांनंतर काय परिस्थिती आहे आधी प्रतिसाद दिलेल्यांची?

Pages